Friday, December 9, 2022

हसरे दुःख

प्रिय भा. द.

'हसरे दुःख' वाचून झाले. ह्यापूर्वीच पत्र पाठवायला हवे होते. परंतु गेले दोन- तीन महिने फार गडबडीचे गेले. त्यामुळे निवांतपणे पत्र लिहिणे जमले नाही. त्यातून हल्ली मला जडलेल्या कंपवाताच्या विकारामुळे हात थरथरतो आणि लेखन कष्टदायक होते. दुर्वाच्यही होते. लिहिण्यातला उत्साह ओसरतो. नाईलाज आहे. 

चॅप्लिन हा विनोदी लेखक, नट, चित्रपट-दिग्दर्शक. अशा कलावंतांचा परात्पर गुरु आहे. त्यांच्या निर्मितीतला आनंद लुटताना संगीतातल्या स्वयंभू गंधारासारखा, जीवनात वारंवार येणाऱ्या कटु अनुभवांचा अनाहत नाद उमटतो. त्या अनुभवाला तोड नाही. जगण्याची ही 'कळवळ्याची रीती' त्याच्या दर्शनी विनोदी असणाऱ्या कथेतून आणि अभिनयातून सतत जाणवत राहते. चॅप्लिनच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा हा मूलमंत्र तुम्ही नेमका टिपला आहे.

प्रचंड दारिद्र्य आणि त्या पोटी जन्माला येणारी भूक, मानहानी, आजार ही भुतावळ दरिद्री माणसाच्या मानगुटीवर सदैव बसलेली असते. त्यात 'भूक' हे महाभूत. ह्या भयंकर भुताने छळलेले चॅप्लिन कुटुंब! रोजची दुपार कशी ढळेल याची चिंता करीत त्या दरिद्री संसाराचा गाडा ओढणाऱ्या हॅनाची ती जीवघेणी धडपड, चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांच्या अभागी बालपणातले मनाला चटका लावून जाणारे प्रसंग तुम्ही कमालीच्या आत्मीयतेने रंगवले आहेत. चरित्रनायकाशी तुम्ही साधलेली एकरुपता हे तुमच्या ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य मानले पाहिजे. केवळ तपशिलाने भरलेली माहिती असलेले हे लेखन नाही. चॅप्लिनच्या अभिनयाचे, त्याच्या कथांचे विश्लेषण वगैरे करण्याचा इथे अट्टाहास नाही. खूप सहृदयतेने आणि जिव्हाळ्याने सांगितलेली चार्ली नावाच्या महान कलावंताच्या जीवनाची कहाणी आहे.

ह्या रचनेत कल्पनाविलास नाही. इष्ट परिणामासाठी घुसडलेल्या निराधार दंतकथांना इथे स्थान नाही. या कहाणीतला जिव्हाळ्याचा सूर मात्र मन हेलावून टाकणारा आहे. 

हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी तुम्ही चार्लीचे चित्रपट आणि चॅप्लिनविषयक साहित्य याचा कसून अभ्यास केल्याचे ध्यानात येते. पण तुमची भूमिका कलावंत साहित्यिकाची आहे. तपशील गोळा करून ते ओझे कागदावर रिकामे करणाऱ्या पढिक पंडिताची नाही. चॅप्लिनचे मोठेपण जाणवते ते तुमच्या कसलाही आव न आणता केलेल्या साध्या लिखाणामुळे. म्हणून चॅप्लिन हा मोठेपणाच्या उच्चास्थानावर बसलेला थोर माणूस वगैरे न वाटता वाचकाला मित्रासारखा वाटतो. वाचकाशी चरित्रनायकाचा असा स्नेहभाव जुळवणे ही तुमची किमया आहे. ह्यातच तुमचे चरित्रकार म्हणून यश आहे. कथेचा ओघ कुठेही न अडता चालू राहिला आहे. 

मराठीत एक चांगले चरित्र आल्याचा आल्हाददायक प्रत्यय आला. मनाला खूप समाधान वाटले. तुमचे अभिनंदन करतो आणि चार्ली चॅप्लिनचा एक परमभक्त या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो. 

-भाई

0 प्रतिक्रिया: