Thursday, January 13, 2022

असे हे पु. ल.

असे हे पु. ल.

हे आहे एका पुस्तकाचं शिर्षक. बालशंकर देशपांडे (वसंत मासिकाचे संपादक) यांनी १९६८ साली लिहीलेल्या. मनोरंजन प्रकाशनातर्फे 'असे हे पु.ल.' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सुमारे २५० पानांच्या या पुस्तकात बालशंकर देशपांडे यांनी पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्यिक कार्य कर्तृत्वाचे सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाची विभागणी दोन भागात आहे -

१) व्यक्तिदर्शन
२) वाॾमयविवेचन

पहिल्या भागात पु लंची लहानपणापासूनची जडणघडण, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध नोकऱ्यांमध्ये भटकंती करताना सुरू झालेली पु लं ची कला आनंद यात्रा, मखमलीच्या पडद्याकडून रुपेरी पडद्याकडे झालेला सहज प्रवास आणि त्याहीपेक्षा सहजतेने सिनेसृष्टीचा घेतलेला निरोप, मधल्या काळात झालेला प्रेमविवाह, मग ऑल इंडिया रेडिओतील ड्रामा प्रोड्यूसर, त्यानंतर बी.बी.सी.मधे प्रशिक्षण घेऊन दूरचित्रवाणीवर सांभाळलेली जबाबदारी, पुढे सुरू केलेले बहुरुपी प्रयोग, पद्मश्री चा किताब आणि साहित्य अकादमी पुरस्कार, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद असा १९६८ पर्यंतचा पु.लंचा प्रवास या भागात येतो.
            
वांॾमय विवेचन या भागात पु.लंचे विनोदी लेख संग्रह, प्रवासवर्णन, एकांकिका, नाट्यकृती, व्यक्तिचित्रण, बालवाॾमय याबरोबरच त्यांनी लिहीलेली लोकनाट्यं (आजचा वग, पुढारी पाहिजे), कादंबरी - अनुवाद (एका कोळियाने, काय वाट्टेल ते होईल), विडंबन यांच्याबाबतचे विवेचन ही बालशंकर देशपांडे यांनी केले आहे. विशेषतः 'काय वाट्टेल ते होईल' या पुस्तकाची दखल घेतल्याबद्दल लेखकाचे खास आभार मानायलाच हवेत. त्याच प्रमाणे पु.लं. नी रूढार्थाने विडंबन लिहीले नसले तरी 'कवटपोळियेचा दृष्टांतु' , अंमलदार मधील बेबंदशाहीतल्या स्वगताचे विडंबन, 'अंगुस्तान विद्यापीठ', 'शांभवी - एक घेणे' असे पु.लं. च्या लेखनातले निवडक नमुने सादर करून अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांचा गद्य अवतार पु.लं. नी आणला याकडे लक्ष वेधल्याबद्दलही लेखकाचे कौतुक करायलाच हवे.

मराठी वांॾमयाचा गाळीव इतिहास, खुर्च्या - एक न नाट्य हे सगळं नंतरच्या काळात अवतरलंय पण विडंबनकार पु.लं. वर शिक्कामोर्तब करणारं आहे. पुस्तकात शेवटी पु.लंचा जीवनपट, पु.लं.बाबत तो पर्यंत प्रकाशित झालेल्या लेखांची सूची, पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्य आणि कला निर्मितीची सूची जोडलेली आहे. तसेच पु.लं. चे काही विशेष फोटो या पुस्तकात पाहायला मिळतात. 'असे हे पु.ल.' या पुस्तकाला पु.लं. चे सुहृद मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांची रसाळ प्रस्तावना आहे. खास मंवि शैलीत (आठवा पुरूषराज अळूरपांडे) राजाध्यक्षांनी पु.लं. चे गुणविशेष आणि लेखक बालशंकर देशपांडेंच्या लेखनाचे विशेष अधोरेखित केले आहेत. बालशंकर देशपांडे यांच्या विधानाचा आधार घेऊन या पुस्तकामुळे एखाद्या समर्थ समालोचकाला पु.लं.च्या समग्र वाॾमयाचं आणि व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन घडवण्याचा चेव आलाच तर इथे देशपांडेंनी बरीचशी प्राथमिक सिध्दता टापटिपीने मांडून ठेवली आहे हे देखील राजाध्यक्ष आवर्जून सांगतात.

हे पुस्तक लिहीलं तेंव्हा पु.ल.पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे होते. ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, एक झुंज वाऱ्याशी अशा कलाकृती त्यांच्या हातून निर्माण व्हायच्या होत्या. आणीबाणी पर्वातील पु.लं.चे तिखट दर्शन व्हायचे होते, पु.ल.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे होते .... आणि बरंच काही घडायचं होतं त्यामुळे आज हे पुस्तक वाचताना त्याचं अपरिहार्यपणे असलेलं अपुरं रुप जसं रुखरुख लावतं तसंच निदान एका टप्प्यापर्यंतच तरी त्यांचं कर्तृत्व एकत्र मांडलंय याचं समाधान ही वाटतं. त्याचबरोबर मराठीतल्या अन्य कोणा साहित्यिकाबाबत - त्याची लेखन कारकीर्द सुरू - खरंतर ऐन बहरात असताना असं पुस्तक सिध्द झालेलं नाही हे जाणवून पुन्हा एकदा पुरुषोत्तमाय नमो नमः म्हणावसं वाटतं.

माझ्यासाठी हे पुस्तक खासमखास आहे कारण पुस्तकांच्या आतल्या पानावर खुद्द पुलंची स्वाक्षरी आहे (सोबत फोटो टाकलाय) आता पु.लं. ची सही घेतलेलं पुस्तक मला रद्दीच्या दुकानात मिळावं हा माझा भाग्ययोग...

- मकरंद जोशी
makarandvj@gmail.com

0 प्रतिक्रिया: