Tuesday, November 13, 2018

प्रिय पु.ल. यांस

प्रिय पु.ल.

आज ८ नोव्हेंबर , तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होईल. तुमची वाढदिवसाची व्याख्या आणि “घोडा किती वर्षाचा झाला तरी झोपतो कसा बघा गाढव??” हा प्रश्न आम्हास चांगलाच ठाऊक आहे. वर्षानुवर्ष आम्ही तुमचं ऐकत आलोय,वाचत आलोय , आज आमच थोडं !!! विश्वास आहे कि तुम्ही ऐकाल.

लिहता वाचता येऊ लागल्यानंतर,शाळेत असताना ,अभ्यासाबाहेरही पुस्तके असतात ,ती बरच काही शिकवतात हे आम्हाला समजले तुमच्याकडूनच. पुस्तकं वाचणे, निखळ हसणे आणि आपल्याला सुद्धा असे लिहता आले पाहिजे हे वाटून, लिहण्याची इच्छा निर्माण केली ती तुम्हीच !!! आणि एकदा ती सवय लागली ती कायमचीच.

तुमची पुस्तके वाचताना ‘ अरे हे तर किती साध-सरळ simple आहे, मला का नाही अस सुचत?? हे सारखं वाटायचं, अजूनही ते वाटणं आहेच. लोकांना हसवणे हे विदुषक बनून वाकुल्या दाखवून किवा गुदगुल्या करण्याइतकं सोप्प नाही हे तेव्हाच समजलं. एखाद्या विषयाचं इतकं खोलवर ज्ञान एखाद्याला कसं असू शकतं , माणसाचा व्यवसाय, राहणीमान , देश, गावं , यानुसार त्याच्या सवयी , बोलण्याची पद्धत याचं निरीक्षण करून ते शब्दात उतरवणं (ते देखील भन्नाट उपमा देत) यामुळेच आम्हाला वेड लागलं , हो अक्षरशः महाराष्ट्र वेडा झाला.

आपल्या ओळखीचा एखादा माणूस, काही वर्ष भेट नाही झाली तर अनेकदा तो आठवणीतून निघून जातो, समोर आला तर ओळखायलाही होत नाही, पण कधी न पाहिलेली, जिवंत नसलेली, तुमची पुस्तकातली पात्र लोकांना आज इतक्या वर्षानंतरही त्यांच्या खाण्यापिण्याच्या , बोलण्याच्या सवयी सकट लक्षात आहेत. कस काय हो पु.ल. ??

सखाराम गटणे – नाव जरी घेतलं तरी आम्ही आमचे सगळे प्रोब्लेम विसरून, फिदीफिदी हसू लागतो, त्याची बोलण्याची पद्धत कशी असेल ? कोणी नाटकं इतकं सिरीयसली घेतं का, म्हणून त्याची नक्कलसुद्धा करु लागतो. आम्हाला अमुक तमुक पुस्तके त्याचे लेखक आठवणार नाही पण “केतकी पिवळी पडली” चे लेखक सं. त. कुडचेडकर आहेत हे इतक्या वर्षानंतरही लक्षात आहे.

आज नंदा प्रधान वाचायला घेतला कि, इतकं विचित्र, वेडवाकड आयुष्य असूनही हा नंदा असा शांत कसा? काय अजब रसायन असेल हा प्राणी? हे प्रश्न विचार करायला लावतात. इंदू वेलणकरने नंदाला लिहलेलं पत्र वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येत पु.ल. आणि आमच्या अंगावर काटा !!. नंदाची कथा वाचून जाणवलं कि “पु.ल.” हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. केवळ हसवणे, विनोद करणे, काहीतरी उपमा देऊन लोकांची वाहवा मिळवणे हे तर समुद्राच्या वर येणाऱ्या लाटांचे फेस आहेत, त्या समुद्रात खोलवर दडलेली जगण्याची शिकवणी या नंदाने बाहेर काढली.

पु.लं तुम्ही आम्हाला हसवले,अगदी मनसोक्त,निखळपणे, त्यासाठी कोण व्यक्ती समाजाची चेष्टा करावी नाही लागली तुम्हाला. आजकाल कित्येक YouTube channels आलेत, standup कॉमेडी करणारे,रियालिटी शो मध्ये perform करणारे आणि त्यांच्या jokes वर टाळ्या पिटणारे परीक्षक, हे तुम्ही कधी पाहिलच नाही. त्यांची कला, मेहनत, हे सर्व वाईट व व्यर्थ असे अजिबात नाही पण आमच्यासाठी तुम्हीच पहिले standup comedian.

“comedian” – हसवणूक करणारा, हा शब्द तुमच्यासाठी वापरताना जरा keyboard अडखळतो (laptop वर लिहतो ना आजकाल सो…). पु.ल. म्हणजे ते विनोदी लेखक ना ? ते सिंहगड रोड च garden त्याच नाव त्यावरून ठेवलं right ?? बास इतकीच काही लोकांना तुमची ओळख असते.

समजायला जड वाटणारी नाटके, संस्कृत श्लोक,लांबलचक शब्द आणि किचकट संदर्भ यात अडकलेली मराठी तुम्ही अलगद आमच्या समोर आणून ठेवली. अगदी आमची रोजची बोलीभाषा आम्हाला इंटरेस्टिंग करून दाखवली. आमचे बोट पकडून पोस्ट ऑफिस,मुंबई,पुणे,नागपूर फिरवले. वर्हाडी बोली चा ठसका दाखवला. चायनिस, इटालियन डिश सोडून आपल्या मातीत इतक्या सगळ्या पदार्थांची आम्हाला नव्याने ओळख करून दिलीत. पानवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला,धोबी,मास्तर,कट्ट्यावर रमणारे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या गमज्या, रेल्वेच्या प्रवासातील गमतीशीर लोक, महाराष्ट्राची लाडकी लालपरी,तिने प्रवास करायची मजा, कोकणच्या लोकांच्या सवयी,त्या वाड्या,पारावरच्या चर्चा,चाळीमधली भांडकुदळ, भन्नाट वल्ली माणसं हे सगळं सगळं आम्हाला घरबसल्या समजलं, तुमच्यामुळेच.

रोज धावपळ करणे,कमवणे,नोकरी करणे,मरून जाणे या पलीकडे पाहायला लावले तुम्हीच. छंद असणे किती महत्वाचे असते, कलेविण जीवन व्यर्थ हे समजवणारे तुम्हीच !! प्रत्येक वेळेस वाचला तरी चितळे मास्तरांच्या कथेच्या शेवटी हसता हसता डोळ्यात पाणी येतेच हो. कुठून शिकलात हि जादू ??? “एक शून्य मी” मधला नायक हा सर्वसामान्य ,मध्यमवर्गीय माणूस होता. कुटुंबासाठी झटणारा, काटकसर करणारा , थोडक्यात समाधान मानणारा होता. पण तरी दुःखी नाही, निराश नाही, त्रासलेला नाही. आयुष्य जगणारा, कोणत्याही प्रसंगी, कश्याही परिस्थितीत हसण्याचे कारण शोधणारा तो साधा माणूस , त्याला तुम्ही hero बनवलात. म्हणून तुम्ही ग्रेट आहात. कधी कधी वाटते कि एक नाही चांगले १०-१२ पु.ल. असणार, एक लिहणारा, एक अभिनय करणारा , संगीत देणारा, कविता करणारा, चित्रपट निर्मिती करणारा, दिग्दर्शन करणारा, रेडियो वर एक, दूरदर्शन साठी एक, आणि हे सगळं झाल्यावर समाजकार्यासाठी एक !!! इतक करूनही कधी जमिनीवरचा पाय कधी थोडाही हवेत नाही?? कमाल आहे !!!

पुस्तकात आहेत तसे आपुलकी दाखवणारे लोक भेटत नाही आता,घराची दारे बंद झाली,अंगावर खेकसणारे दुकानदार गेले, कपडे वेळेवर न देणारे धोबी गेले, चाळीहि गेल्या आणि त्यातले वल्लीपण गेले, पट्टीच्या धाकावर शिकवणारे मास्तर गेले (गोड इंग्लिश बोलणाऱ्या miss असतात म्हणे), सायकली गेल्या,पारावरचे कट्टे गेले,लग्नातले नारायण गेले आणि event manager आले, म्हणूनच कदाचित आम्ही हे सगळं अजूनही तुमच्या पुस्तकात शोधत असतो आणि ते कधीच हरवून नाही देणार.

आज इतकी वर्ष झाली, काळ बदलला, माणस, भाषा बदलली, तार- टेलिफोन जाऊन स्मार्ट फोन आले, पुस्तक जाऊन किंडल आले, सिरी, अलेक्सा, या artificial intelligence न वेड लावलं, फेसबुक, युट्यूब, नेटफ्लिक्स ने जगभरातले विडीयो दिसू लागले, पण तरी तुम्ही काही स्मरणातून जात नाही. तुमची पात्र, व्यक्तिचित्र आहे तशी लोकांना आवडतात म्हणूनच तुम्ही अजरामर आहात. पुढचं काही माहित नाही (मराठी आडनाव लावणारी , इंग्लिश medium वाली “mamma बघ ती cat. इट्स cute ना??” असं मराठी बोलणारी पिढी कितपत मराठी जगवेल जरा शंका आहेच तरीही)

आता तुम्ही म्हणाल “कसलं रे, मी काही ग्रेट नाही. माझा काही पुतळा वगेरे कधी बनलाच तर त्याखाली लिहा ‘या माणसाने आम्हाला हसवले बस्स !!” वाक्यात आम्ही थोडा बदल मात्र करू – “ या माणसाने आम्हाला हसायला शिकवले आणि जगायलाही..!” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही आमच्या मातीत जन्म घेतलात याबद्दल कायम ऋणी,

तुमचे सर्व मराठी चाहते !!

अभिषेक काळे

Friday, November 9, 2018

पु. ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)

"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ नोव्हेंबरपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं पुलंच्या आठवणी जागवत आहेत त्यांचे मेहुणे - सुनीताबाई देशपांडे यांचे धाकट बंधू - सर्वोत्तम ठाकूर. पुलंचा तब्बल 50 वर्षांचा सहवास ठाकूर यांना लाभला. या काळातल्या काही निवडक आठवणींना त्यांनी दिलेला हा उजाळा...

पुलंची आणि माझी पहिली भेट झाली ती त्यांच्या लग्नातच. त्यांच्या लग्नाचाही वेगळाच किस्सा आहे. पुढं पुलंची सहधर्मचारिणी झालेली सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई ही माझी थोरली बहीण. आम्ही तिला माई म्हणत असू. - माईशी पुलंचं लग्न ठरलं त्या वेळी नाटकांत नुकतच काम करायला लागले होते. एवढे प्रसिद्धीला आलेले नव्हते. लेखक म्हणूनही त्यांचा तेवढा नावलौकिक त्या वेळी झालेला नव्हता. पुलं आणि माई यांनी लग्न अगदी साधेपणानं केलं. समारंभ करायचा नाही, असं त्यांचं आणि माईचं ठरलंच होतं. कोणताही आहेर त्यांनी घेतला नाही. नोंदणी पद्धतीनं हे लग्न झालं. त्या वेळी पुलं आमच्या कोकणातल्या - रत्नागिरीतल्या - घरी पहिल्यांदाच आले होते. ता. 13 जून ही लग्नाची तारीख ठरली होती. वडील काही कामानिमित्त आदल्या दिवशी कचेरीत गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या मित्रांना "तुम्ही उद्या येणार आहात ना रजिस्टरवर सह्या करायला?' असं विचारलं. तेव्हा ते मित्र म्हणाले ः ""उद्याची कशाला वाट बघायची? आत्ताच येतो!'' मग ही मित्रमंडळी घरी आली.

वडील म्हणाले ः ""लग्नसमारंभ आजच उरकून घेऊ या.'' पुलंना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. अत्यंत साध्या म्हणजे घरच्याच कपड्यांत पुलं आणि माई यांचं लग्न, ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी - म्हणजे 13 जूनऐवजी 12 जूनलाच - झालं. मी 12 जूनला कामानिमित्त बाहेर गेलो होतो; त्यामुळे लग्नाला उपस्थित नव्हतो. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आलो तर तोपर्यंत पुलं आणि माई यांचं लग्न लागूनही गेलं होतं! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी आमच्या घरातल्या हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. 25-30 लोकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. "पुलंना या कार्यक्रमात गायला लावायचं,' असं वडिलांनी ठरवलं होतं. मात्र, पुलंना याची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली नव्हती. मैफल जमली तेव्हा पुलंनी वडिलांना विचारलं ""गाणं कोण गाणार आहे?'' तेव्हा वडील म्हणाले ः ""तुम्हीच...!'' स्वतःच्या लग्नात स्वतःच गाणं म्हणणारे पुलं हे बहुदा पहिलेच असावेत! पुलंनी एक पैसा वा वस्तू आहेर म्हणून आमच्याकडून घेतली नाही. रजिस्टरचा सरकारी कागद त्या वेळी माईनं स्वतःच आठ आण्यांना आणला होता. केवळ आठ आण्यांच्या खर्चात पुलं-माई यांचं लग्न पार पडलं. पुलं आणि माई लग्नानंतर मुंबईला निघाले तेव्हा आम्ही आमच्याजवळचा ग्रामोफोन त्यांना भेट दिला होता.

***

आम्ही सगळे नंतर पुलंना भाई म्हणू लागलो. एकदा सहज मी त्यांना म्हटलं ः ""भाई, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहिजे.'' त्यावर भाई लगेच म्हणाले ः ""अरे, मी नाही रे... माझ्यापेक्षा कुसुमाग्रज मोठे साहित्यिक आहेत. ज्ञानपीठाचे मानकरी ते व्हायला हवेत.'' त्या काळी भाईंच्या व्यक्तिमत्त्वानं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं. स्वतः उत्तम साहित्यिक असूनही भाईंनी दुसऱ्या साहित्यिकासाठी हे कौतुकोद्गार काढले होते. एखादा साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाचं कौतुक अपवादानंच करताना आढळतो; पण भाईंचा स्वभाव तसा नव्हता. ""कुसुमाग्रज माझ्यापेक्षा ग्रेट आहेत,'' असं भाई म्हणाले. तो प्रामाणिकपणा भाईंकडं होता. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि स्वतः ग्रेट असूनही त्याचा मोठेपणा न मिरवता इतर जण आपल्यापेक्षाही मोठे आहेत, हे ओळखून त्यांचा आदर-सन्मान करणं हे भाईंच्या स्वभावाचं वेगळेपण होतं.

***

-मला तब्बल 50 वर्षं त्यांचा सहवास लाभला. या प्रदीर्घ सहवासात मला त्यांची काही वैशिष्ट्यं जाणवली, ती अशी ः वेळेबाबत काटेकोरपणा, खाण्याविषयीच्या विशिष्ट आवडी-निवडी नसणं, कुणाबद्दलही वाईट न बोलणं, कुणाचाही द्वेष न करणं...
कार्यक्रम कुठलाही असो, तो ठरलेल्या वेळेवरच सुरू होईल याची दक्षता ते अगदी काटेकोरपणे घेत असत. "आज जेवायला हेच पाहिजे अन्‌ असंच पाहिजे', असा त्यांचा हट्ट कधीच नसायचा. अमुकतमुक पदार्थाविषयी ते आग्रही नसायचे. जे काही ताटात वाढलं जायचं त्याचा ते आनंदानं स्वाद घेत जेवायचे. मासे ही त्यांची विशेष आवड होती. कुणाविषयीही ते कधी वाईट बोलले आहेत वा त्यांनी कुणाचा द्वेष केला आहे, असं मला त्यांच्या प्रदीर्घ सहवासात कधीच आढळून आलं नाही. पुलंना एखाद्या व्यक्तीमध्ये काही वेगळेपणा (स्पार्क) दिसला की त्या व्यक्तीला पुढं आणल्याशिवाय ते राहत नसत. भाईंनी असं अनेकांचं जीवन घडवलं आहे. पुढच्या काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं "वस्त्रहरण' हे गंगाराम गवाणकर लिखित नाटक सुरवातीला चालत नव्हतं. त्यामुळं "शेवटचा एक प्रयोग करून थांबायचं', असं त्या मंडळींनी ठरवलं होतं. भाईंनी तो प्रयोग पाहिला आणि त्यांना ते नाटक अतिशय आवडलं. त्या नाटकासंबंधी त्यांनी पत्र लिहिलं. त्यानंतर "वस्त्रहरण' लोकांना एवढं आवडलं, की त्याचे प्रयोगांवर प्रयोग होत राहिले आणि त्या नाटकानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
***

भाईंना वेगवेगळ्या क्षेत्रांतले अनेक लोक भेटायला येत असत. ते कुणालाही कधीही भेटायला तयार असायचे. भेटायला येणाऱ्या व्यक्तीनं आधी वेळ घेऊन भेटायला यावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असायची. त्यातही विचार त्या व्यक्तीच्याच हिताचा असायचा व तो असा की त्या व्यक्तीला आपल्याला पुरेपूर वेळ देता यावा. समजा, एखादी व्यक्ती वेळ न ठरवता भेटायला आली आणि त्याच वेळी आणखी कुणीतरी आधीच भेटायला आलेलं असेल तर नंतर आलेल्या त्या व्यक्तीलाही वेळ देता येत नसे आणि समोर आधीच बसलेल्या व्यक्तीशीही बोलणं नीट होत नसे. हा घोळ-घोटाळा टाळण्यासाठी "आधी वेळ घेऊन' येण्याची अपेक्षा ते बाळगायचे आणि त्याबाबतीत आग्रहीसुद्धा असायचे.
***

पुलंचं राजकारणाशी सूत कधीच जमलं नाही. पुलं नेहमीच राजकारणापासून लांब राहिले. कोणत्याही गोष्टीसाठी राजकारण्यांची मदत घेणं त्यांनी टाळलं. याबाबत एक विशेष आठवण सांगावीशी वाटते. नरसिंह राव हे पंतप्रधान असतानाची गोष्ट. तेव्हा ते पुण्यात येणार होते. "पुण्याच्या दौऱ्यात भाईंना भेटावं' असं राव यांना सुचवण्यात आलं होतं. त्यामुळे राव यांच्या सोबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पाच-सहा अन्य मंत्री भाईंना भेटायला घरी येणार होते. अनेक कलाकार स्वतः पंतप्रधानांची भेट घेतात; पण इथं पंतप्रधानच भाईंकडं येणार होते. त्या वेळी निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या. या भेटीत आपल्यासोबत फोटो काढले जाऊन त्यांचा वापर निवडणुकांसाठी केला जाऊ शकतो, हे भाईंच्या लक्षात आलं. मग भाईंनी राव यांना पत्र लिहिलं ः "तुम्ही मला भेटायला येणार असल्याचं समजलं. मात्र, त्याच वेळी माझी मुंबईतल्या "नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस ' इथं महत्त्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग रद्द होऊ शकत नाही; त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही.' पंतप्रधान आपल्याला भेटायला आल्यास त्या भेटीचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो, असा विचार भाईंनी कधीच केला नाही.
***

क्षुल्लक गोष्टींतूनही भाईंना वेगळं काहीतरी सुचायचं. एकदा ते एसटीतून प्रवास करत होते. त्या एसटीला एक म्हैस आडवी आली. या साध्याशाच प्रसंगावर त्यांनी "म्हैस' नावाची एक खुमासदार विनोदी कथा लिहिली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. पुलंची बुद्धिमत्ता विलक्षणच होती. एरवी, वयानं आणि कर्तृत्वानं मोठ्या माणसांवर व्यक्तिचित्रं लिहिली जातात; पण भाईंनी त्या वेळी दोन-तीन वर्षांच्या असलेल्या माझ्या मुलाचं - दिनेशचं - व्यक्तिचित्र लिहिलं होतं!
माझं आणि भाईंचं फार जवळचं नातं होतं. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकायला होतो आणि कॉलेजच्याच होस्टेलवर राहत होतो, तेव्हाची आठवण सांगतो. तेव्हा भाई चित्रपटात काम करत असत. पुण्याला गुप्ते यांच्या आउटहाऊसमध्ये दोन खोल्या होत्या, त्यातल्या वरच्या एका खोलीत पुलं भाड्यानं राहत असत. पुढं त्यांना काही दिवसांनी पुण्यातच नवीन फ्लॅट मिळाला. ते होस्टेलवर आले आणि मला म्हणाले ः ""मला आता चांगली जागा राहण्यासाठी मिळाली आहे, तेव्हा तू आमच्याकडंच राहायला चल.'' मी होस्टेल सोडून त्यांच्या घरी राहायला गेलो. त्या वेळी मला साहजिकच खूप बरं वाटलं. पुढच्या काळात आमचाही पुण्यात चार खोल्यांचा फ्लॅट झाला; पण आम्ही तिथं कधीच उतरायचो नाही. कारण, "पुण्याला गेलो की भाईंकडंच मुक्कामी उतरायचं', हे ठरून गेलेलं होतं. पुढं मी कामानिमित्त काही वर्षांसाठी अमेरिकेत स्थायिक झालो. एकदा भाई अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मला भेटायला येण्यासाठी त्यांना दोन-तीन हजार मैलांचा प्रवास करावा लागणार होता. केवळ मला भेटण्यासाठी म्हणून ते तेवढा प्रदीर्घ प्रवास करून आमच्या अमेरिकेतल्या घरी येऊन गेले. त्यांच्यात आणि माझ्यात असं स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं होतं.

पुढं मी अमेरिकेची नोकरी सोडून पुन्हा भारतात आलो. तेव्हा भाई ज्या इमारतीत राहायचे, त्याच इमारतीत राहायला गेलो. अमेरिकेची नोकरी सोडून आलो, याचं दुःख मला तेव्हा झालं नाही. कारण, आता भाईंच्या सहवासात राहायला मिळणार होतं, भाईंचा सहवास मिळणार होता आणि या बाबीचा आनंद त्याहूनही अधिक होता.
***

भाईंची सामाजिक बांधिलकीची जाणीव तीव्र होती आणि सक्रिय होती. त्या वेळी अपघातग्रस्तांसाठी "लीला मुळगांवकर रक्तपेढी' चालवली जात असे. त्या रक्तपेढीला 40 हजार रुपयांची गरज होती. भाईंकडं त्या वेळी पैसे नव्हते; मग त्यांनी ते 40 हजार रुपये आपल्या नाट्यप्रयोगांतून उभे करून दिले. अशा समाजकल्याणाच्या कामासाठी भाईंनी सन 1964-65 च्या दरम्यान "पु. ल. देशपांडे फाउंडेशन'ची स्थापना केली. त्या काळी नाटकाच्या तिकिटाचा सगळ्यात जास्त दर होता सात रुपये. त्या वेळी ते सात रुपयेही फार वाटायचे. कारण, सात रुपयांमध्ये महिन्याची खानावळ होत असे. परिणामी, भाईंवर तेव्ही टीका झाली होती. नाटकांमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती, कलाकार रात्र रात्र जागून लोकांचं मनोरंजन करत असते; मग तिनं का बरं हलाखीत राहावं, असं भाईंचं म्हणणं होतं. नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसंच तिला नीटनेटकं जीवन जगता यावं यासाठी भाईंनी नाटकाच्या तिकिटांचे दर जास्त ठेवले होते. भाईंनी जेवढे पैसे कमावले, त्यातला बहुतांश वाटा हा जगालाच परत दिला. भाईंनी अनेक चांगल्या, तसंच लोककल्याणाच्या कामांसाठी देणगी दिली; पण त्याविषयीची प्रसिद्धी कुठं कधी केली नाही. एका माणसानं भाईंचं नाटकातलं काम पाहून त्यांना रोलेक्‍स घड्याळ भेट दिलं होतं. ते ऑटोमॅटिक घड्याळ होतं. रोलेक्‍ससारखी महागडी घड्याळं घालून मिरवणारी मंडळी आज आपण अनेकदा पाहतो. मात्र, भाईंनी ते घड्याळ कधीच वापरलं नाही. इतके ते साधे होते. "प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा समाजातल्या गरजवंतांच्या गरजांकडं लक्ष द्या,' ही महत्त्वाची शिकवणूक मला भाईंकडून मिळाली. तिचं पालन करण्याचा मी प्रयत्न करतो.
***

भाईंची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. ती कमालीची होती. "नाच रे मोरा', "इंद्रायणी काठी' अशा अनेक गाण्यांना भाईंनी संगीत दिलं. ती गाणी खूप लोकप्रियही झाली. "इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हा अभंग गाऊन पंडित भीमसेन जोशी त्यांच्या बहुतेक मैफलींची सांगता करत असत. "गुळाचा गणपती' या चित्रपटातलं "ही कुणी छेडिली तार?' हे गाण भाईंचं खूप आवडतं गाणं होतं. कलाकाराची गाण्याची मैफल संपल्यावर गाणं कसं, किती उत्तम झालं, त्यात काय काय आवडलं याविषयी भाई कौतुक करायचे. गाण्यात काय कमी होतं आणि काय चुकलं यावर ते कधीच बोलायचे नाहीत. त्या गाण्यातल्या चांगल्या बाजूविषयीच ते बोलायचे. हा त्याचा स्वभाव होता. कलाकाराच्या कमकुवत गुणांवर भाष्य करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांवर भाष्य करून त्याला उत्तेजन देणं अधिक महत्त्वाचं, असं भाईंचं मत होतं. भाईंनी अशा प्रकारे अनेकानेक नवकलाकारांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना पुढं आणण्यात पुढाकार घेतला.
***

"ऑल इंडिया टेलिव्हिजन'चे भाई हे प्रमुख होते; पण त्यांना कधीच कोणत्याही पदाचा मोह आणि अहंकार नव्हता. मिळणाऱ्या पदापेक्षा आपलं लेखन आणि अभिनय, नाटकांचे प्रयोग यातच त्यांनी धन्यता मानली. याबाबत कविवर्य विंदा करंदीकरांची भाईंविषयीची एक आठवण आहे. विंदांना पारितोषिक मिळालं होतं आणि त्या पारितोषिकाची रक्कम त्यांनी दान केली होती. त्या वेळी विंदांची मुलाखत घेतली गेली. "तुम्ही पुलंसारखं दान केलंत...' असं त्या मुलाखतकारानं त्या मुलाखतीदरम्यान म्हटलं. त्या वेळी विंदा त्याला म्हणाले ः ""माझी तुलना पुलंसोबत होऊ शकत नाही. मला पुरस्कार मिळाला होता, ते माझे स्वतःचे पैसे नव्हते. पुलंनी स्वतः त्रास घेऊन दुसऱ्यांना देण्यासाठी पैसे मिळवले. हे असं करणं खूप वरच्या "लेव्हल'चं आहे. मी ती "लेव्हल' गाठू शकत नाही.''
***

भाई शेवटच्या काळात आजारी होते. त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास व्हायचा; पण त्यांनी आपल्या आजारपणाचा बाऊ कधीच केला नाही. त्यांना चालायला त्रास होत असे, बोलताही येत नसे. अतिशय सावकाश बोलावं लागत असे. असं असतानाही ते शेवटपर्यंत आनंदी राहिले. शेवटी शेवटी शारीरिक त्रास वाढल्यामुळं भाईंनी लोकांना भेटणं फारच कमी केलं होतं. लोकही समजून घेत त्यांना. तरीदेखील कुणी भेटायला आलं तर, भाई त्यांच्याशी बोलले नाहीत, असं कधीच झालं नाही. कुणाशीही बोलताना "मी फार मोठी व्यक्ती आहे,' असा त्यांचा आविर्भाव कधीच नसे. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे ते त्या व्यक्तीशी संवाद साधत असत. शेवटच्या आजारपणातही त्यांची स्मरणशक्ती जशी तल्लख होती, तशीच त्यांची विनोदबुद्धीही तेवढीच जागृत होती. एकदा दिनेश घरी लॅपटॉप घेऊन आला. कॉम्प्युटरला मराठीत संगणक म्हणतात. "लॅपटॉपला मराठीत काय म्हणणार,' असं आमचं संभाषण सुरू होतं, तेव्हा पुलं पटकन म्हणाले ः "अंगणक!' कारण, लॅपटॉप आपण आपल्याबरोबर कुठंही घेऊन जाऊ शकतो ना...!
***

लग्नानंतर पत्नीचं नाव बदलायची प्रथा आपल्याकडं प्रचलित आहे. अलीकडं ती काहीशी कमी झाली असली तरी 50-60 वर्षांपूर्वीची स्थिती वेगळी होती. माझ्या बायकोचं नाव सुशीला होतं. तिचं नाव बदलायला नको, असं माझं मत होतं. मात्र, माझ्या मोठ्या वहिनीचंही नाव सुशीलाच होतं. त्यामुळं "एका घरात दोन सुशीला कशा चालणार?' असा प्रश्न निर्माण झाला.
मग "तुझ्या बायकोचं नाव अंजली ठेवावं,' असं भाईंनी सुचवलं. ते मला आवडलं आणि सुशीलाची अंजली झाली. ही पुलंनी मला दिलेली भेट आहे, असं मी मानतो.


सर्वोत्तम ठाकूर
रविवार, ४ नोव्हेंबर २०१८
(शब्दांकन : उत्कर्षा पाटील)
सकाळ


अमृतानंदाचा वारकरी - जयंत साळगावकर

पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख पु.ल. प्रेम ब्लॉगसाठी पाठवल्याबद्दल श्री. अक्षय देसाई ह्यांचे खुप आभार.


पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही
                         
येत्या ८ नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’.. साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, दिग्दर्शक, संगीतकार, बहुरूपी नट, वक्ते अशा नाना रूपांत आलम दुनियेस ज्ञात असलेल्या पु. ल. देशपांडे नामक खेळियाचं जन्मशताब्दी वर्ष सुरूहोत आहे. त्यानिमित्ताने पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख आम्ही पुन:प्रसिद्ध करीत आहोत.

पंचवीसेक वर्ष झाली असतील. कुमार गंधर्वाचा ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम रवींद्र नाटय़मंदिरात होता. त्याची तिकिटे मी खूप आधीच काढून ठेवली होती. पण ऐनवेळी काही कारणामुळे मला त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मुलांना पाठविले. कार्यक्रम संपवून मुले घरी आली. त्यावेळी दहा-बारा वर्षांच्या असलेल्या मोठय़ा मुलाचे डोळे आनंदाने चमकत होते. तो आनंदातिशयाने मला सांगू लागला.. ‘‘आज मी पु. लं.ना हात लावला.’’ मला अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्याने स्पष्टीकरण केले. त्या कार्यक्रमात पु. लं. पहिल्या रांगेत बसले होते आणि मुले दुसऱ्या रांगेत! मध्येच केव्हातरी त्याने पु. लं.ना हात लावला होता आणि आपण एव्हरेस्टच जिंकले अशा थाटात तो ते मला सांगत होता. पु. लं.च्या आणि माझ्या ऋणानुबंधांची त्याला कल्पना नव्हती. पण शाळेत आणि इतरत्र पु. लं.बद्दल बरंच काही ऐकलेलं. हा नावाचा पुरुषोत्तम खरोखरीच ‘पुरुषोत्तम’ आहे हे त्याला समजले असणार आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष पु. लं.ना हात लावला ही फार मोठी बहादुरी झाली, अशा आनंदाने चिरंजीव वावरत होते.

त्यानंतर आठवडय़ानंतर पु. लं.च्या एकपात्री ‘बटाटय़ाच्या चाळी’चा प्रयोग होता. त्या कार्यक्रमाची तिकिटे मी काढली आणि मोठय़ा मुलाला बरोबर घेऊन गेलो. मध्यंतरात पु. लं.ना भेटण्यासाठी रंगपटात जाऊ लागलो तर सुनीताबाईंनी अडवले. म्हणाल्या, ‘‘मध्यंतरात भाई कोणाला भेटत नाहीत.’’ पण बाईंचा रोष पत्करून मी आत गेलो आणि पु. लं.ना भेटलो. ते माझ्याशी अतिशय मोकळेपणाने आणि प्रेमाने बोलले. मी त्यांना ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या कार्यक्रमात तुम्हाला हात लावल्याबद्दल मुलाला कसा ब्रह्मानंद झाला ते सांगितलं. पु. लं. हसले आणि त्यांनी मुलाचा गालगुच्चा घेतला. त्या क्षणी आमच्या चिरंजीवांना अस्मान ठेंगणे झाले.

पु. लं.चा निरोप घेऊन मी निघालो तेव्हा तो म्हणाला, ‘‘एवढय़ा मोठय़ा माणसाशी तुमची ओळख आहे?’’ त्यावेळी पिताजींबद्दल त्याच्या डोळ्यात जो आदराचा भाव चमकून गेला, तसा तो त्यानंतर कधीच दिसला नाही.

आपला माणूस!


जवळपास महाराष्ट्रातल्या गेल्या तीन पिढय़ा पु. लं.बद्दल हा असा आदर आणि सन्मान मनात बाळगून आहेत. पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही, तो चारचौघांशी मिळून-मिसळून वागणारा, इतरांच्या मनात स्वत:विषयी आपुलकी निर्माण करणारा असा असावा लागतो. तात्यासाहेब शिरवाडकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले त्या दिवशी गोदावरीला पूर यावा तसा आनंदाचा महापूर नाशिककरांच्या उत्साहाला आला होता. नाशकातील दुकानात एक पेढय़ाचा तुकडा किंवा फुलवाल्याकडे एक फुलाची पाकळी शिल्लक राहिली नव्हती. तात्यासाहेबांच्या अंगणात जी चाहत्यांची दाटी झाली होती त्यात काही अंगठेबहाद्दरही होते. त्यांनी तात्यासाहेबांचे लेखन वाचलेही नसेल; त्यांना फक्त आपले तात्या मोठय़ा गौरवाला पात्र झाले एवढेच समजत होते आणि त्यामुळे ‘तात्यांचा गौरव तो आपला गौरव’ अशीच प्रत्येकाची भावना होती. पु. लं.च्या बाबतीतही त्यांच्या चाहत्यांची दृष्टी अशीच आहे. पु. लं. कोणाही परिचित व्यक्तीशी बोलताना त्याची इतक्या आपुलकीने आणि जवळिकीने चौकशी करतात, की हा एवढा मोठा माणूस आपला आहे, आपल्या जवळचा आहे, या भावनेने समोरचा माणूस सुखावतो. पु. लं. आपलेच आहेत असे वाटणाऱ्यांपैकी मी एक.

आजकाल बसच्या रांगेत अर्धा तास कुणी जवळजवळ उभे राहिले तरी तेवढय़ा बळावर आपली दाट मैत्री असल्याचा उल्लेख करण्याचा शिरस्ता आहे. इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये तीन तास शेजारी बसले की झालेच ‘परममित्र!’ मैत्रीच्या नात्याचे इतके ‘लोकशाहीकरण’ झालेल्या आजकालच्या दिवसांत मी पु. लं.ना मित्र म्हणताना कचरेन. कारण माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध या असल्या मैत्रीच्या खूप पलीकडचे आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा मला नेहमीच एक आधार वाटत आलेला आहे. अडचणीच्या वेळी त्यांनी मला धीर दिला आहे, आधार दिला आहे. त्यांनी सहज म्हणून उच्चारलेल्या शुभेच्छा माझ्याबाबतीत वरदान ठरल्या आहेत.

पु. लं.चा आणि माझा तसा परिचय १९५२-५३ चा. ‘लोकसत्ता’कार ह. रा. महाजनींबरोबर मी पुण्याला गेलो होतो. तिथे महाजनींबरोबर डेक्कन जिमखान्यावर फिरत असताना आठ-दहा तरुणांचा घोळका समोरून आला. त्यातल्या चष्मा लावलेल्या, पांढरा शर्ट काळ्या पॅन्टमध्ये खोचलेल्या एका तरुणाने महाजनींची काहीतरी फिरकी घेतली. महाजनी रस्त्यावरच संतापले. थोडे पुढे गेल्यावर मी महाजनींना विचारले. ‘‘कोण होता तो?’’ महाजनी म्हणाले, ‘‘पु. ल. देशपांडे.’’ हे नाव मी ऐकून होतो, लिखाण थोडेफार वाचले होते, पण प्रत्यक्ष दृष्टिभेट झाली तेव्हा मी ‘लोकसत्ता’त राशिभविष्य लिहीत होतो. पु. लं. म्हणाले, ‘‘म्हापणकरासारखे लिहू नकोस, साळगावकरासारखे लिही.’’ म्हणजे नक्कल करू नका. स्वत:चा वेगळा ठसा ठेवा, असे त्यांना सांगायचे होते.

पुढे पु. लं. मुंबईत वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहू लागले. कारणपरत्वे त्यांच्या घरी माझे येणे-जाणे वाढू लागले. दि. वि. गोखले यांनी लिहिलेल्या आणि मी प्रकाशित केलेल्या ‘माओचे लष्करी आव्हान’च्या माहितीपूर्ण आणि वजनदार पुस्तकाला पु. लं.नी फार सुंदर प्रस्तावना लिहिली.

पु. लं.ना ‘सुपारी’

‘कालनिर्णय’ सुरू झाल्यानंतर त्यात पु. लं.नी लिहावे असे वाटले. त्या काळात दिनदर्शिकेत लेख लिहिणे ही नवीच गोष्ट होती. पु. लं.ना समक्ष भेटूनच लेख लिहिण्याची विनंती करावी म्हणून मी त्यांना पुण्याला फोन लावला आणि भेटायला येत असल्याचे सांगितले. पु. लं. म्हणाले, ‘‘मी पुढल्या आठवडय़ात मुंबईत येतो आहे, तेव्हा भेटू.’’ त्यावर ‘‘मला तुम्हाला पुण्यातच भेटावयाचे आहे. एक सुपारी द्यायची आहे..’’ असे मी सांगितले.

‘‘मुंबईवाल्याची सुपारी म्हणजे मला धास्ती वाटते,’’ असे पु. लं. म्हणाले. तेव्हा मी ‘‘मग सुपारीऐवजी नारळ घेऊन येतो,’’ असे उत्तर देऊन खरोखरीच नारळ, केळी, हार असे सर्व साहित्य घेऊन पु. लं.च्या पुण्याच्या घरी गेलो. त्यांना लेख लिहिण्याबद्दल विनंती केली. पु. लं.नी विषयाची चर्चा केली आणि लिहिण्याचे मान्य केले. त्यावर सुनीताबाई मला म्हणाला, ‘‘हा ‘होय’ म्हणाला असला तरी जमेलच असे गृहीत धरून चालू नका. त्याच्यामागे व्याप खूप आहेत.’’ लेख मिळणार नाही अशा समजुतीने मी परत आलो. पण आठ दिवसांत पु. लं.चा उत्तम लेख घेऊन मधू गानू मुंबईला आले आणि त्यानंतर गेली कित्येक वर्षे पु. लं. नियमितपणे ‘कालनिर्णय’मध्ये लिहीत आले.

घरगुती पु. लं.

पु. लं. एन. सी. पी. ए.त आले आणि आमच्या गाठीभेटी वारंवार होऊ लागल्या. पु. लं. संगीतात किंवा साहित्यात रस घेताना जसे आनंदित होतात तसा भोजनाचा आस्वादही चोखंदळपणे घेतात. उत्तम जेवणाची त्यांना आवड आहे. आमच्या घरी ते जेवायला असले की सगळ्या घरातच आनंदाचे गुलाबपाणी शिंपडलेले असते. माझी बायको स्वत: मन लावून स्वयंपाक करते. पु. लं.चे बोलणे ऐकण्यासाठी मुले, सुना सगळेच उत्सुक असतात आणि नातवंडे भाईकाकांना ‘गोष्ट सांगा..’ असा आग्रह करतात. माझ्या बायकोच्या पाककौशल्याची स्तुती करणारे एक पत्र पु. लं.नी पाठवले ते पत्र आमच्या सौं.च्या दृष्टीने विजयपत्रच झाले. ते पत्र आल्यापासून ‘आमटीत मीठ कमी पडले’ किंवा ‘एखादा पदार्थ बिघडला’ असे म्हणण्याची सोय उरलेली नाही. ‘पु. ल. देशपांडे यांनी माझ्या स्वयंपाकाची स्तुती केली आहे. त्यांच्या शिफारशीपुढे तुमच्या मताची काय किंमत?’ अशा विजयी दृष्टीने आमचे कुटुंब आमच्याकडे पाहते. कोणी पाहुणा आला तर त्या पत्राची झेरॉक्स प्रत त्याला आवर्जून दाखविली जाते. पु. लं.कडून मिळणारी शाबासकी हे ईहलोकीचे एक वरदानच आहे.

पुलंचा वरदहस्त

मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाला पु. लं.च्या प्रशंसेचा लाभ झाला आणि ते नाटक सबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. बाबा आमटेंच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष प्रथम वेधले गेले ते पु. लं.च्यामुळे. अनेक दलित साहित्यिकांना, किंबहुना एकूणच दलित साहित्याला प्रारंभीच्या काळात पु. लं.नी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले. पु. लं.कडून शाबासकी मिळावी, त्यांनी आपले कौतुक करावे असे प्रत्येक लेखकाला, कलावंताला मनापासून वाटत असते. आणि अगदी नवोदित लेखकाशीसुद्धा पु. लं. इतके आस्थेने आणि आपुलकीने बोलतात, की त्यांचा हुरूप निश्चितपणे वाढतो.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी जयवंत दळवींनी पु. लं.ना. ‘पुलस्वामी’ आणि सुनीताबाईंना ‘पुलस्वामिनी’ अशी बिरुदे बहाल केली. वेगवेगळे पीठाधीश, शंकराचार्य अशांचा उल्लेख नावाने न करता ‘श्रीचरण’ म्हणून करण्याची प्रथा आहे. पु. लं.ना फोन केल्यावर मी ‘श्रीचरणांचा विजय असो..’ असे गमतीने म्हणतो. पु. लं. केव्हातरी ‘वत्सा, तुजप्रद कल्याण असो..’ असा जुन्या नाटकातल्या ऋषीमुनींसारखा आशीर्वाद देतात. मन नाराज असते तेव्हा किंवा समोरच्या अडचणी पार करताना हैराण झालो असताना पु. लं.ची पुस्तके वाचणे हा एक ‘अक्सीर इलाज आहे असा माझा प्रदीर्घकाळचा अनुभव आहे. माझ्यापुरते म्हणाल तर ‘खोगीरभरती’ हे माझ्या अधिक आवडीचे पुस्तक.

एक वेगळे रूप

खरे म्हणजे धर्मशास्त्र आणि ज्योतिष हे माझ्या व्यासंगाचे आणि आवडीचे विषय. पु. लं. तसे रूढ अर्थाने धार्मिक नाहीत आणि ज्योतिषावर त्यांचा विश्वास नाही. तरीही त्यांच्या माझ्यातला जिव्हाळा वाढत गेला हे खरे आहे. आम्ही तासन् तास बोलत बसलो तरी त्यात ज्योतिषाविषयी एक अवाक्षर येत नाही. एकदाच मला पु. लं.नी एका विदुषीच्या विषयात विचारले होते, ‘तिच्या कुंडलीत बाराही घरांत शनीच आहे का हो?’ भविष्याची आणि भविष्य सांगणाऱ्यांची पु. लं.एवढी चेष्टा कोणीच केली नसेल. असे असले तरी पु. लं.ना ज्योतिषाची प्राथमिक माहिती तर आहेच, पण काही बारकावेही माहीत आहेत, हे त्यांच्या लिखाणातून समजून येते. पु. लं. धार्मिक नसले तरी काही विशिष्ट धार्मिक परंपरांचा त्यांना आदर आहे. ते श्रीलंकेत गेले असताना तिथल्या बुद्ध मंदिरात गेले. ‘कोलंबोतल्या बुद्ध मंदिरातली ती प्रचंड मूर्ती पाहून मस्तक नमते. तिथे मुंडी दाबायला पुजारी, बडवा कोणी लागत नाही,’ असा शालजोडीतला टोला त्यांनी दिला आहे. त्या बुद्ध मंदिरात मूर्तीच्या पायाशी पु. लं.ना साल नावाचे एक सुवासिक फूल दिसले. पुढे चार महिने पु. लं.ना तो वास प्रत्येक बुद्ध मंदिर पाहताना येत होता. पु. लं.ची प्रवासवर्णने वाचताना शब्दाशब्दातून त्यांची रसिकता व्यक्त होत असते आणि आपण त्यांच्यासोबत त्या, त्या देशात हिंडत आहोत असे वाटत राहते.

पु. लं. रूढ अर्थाने धर्मपंडित नाहीत, पण ‘जाखाईजोखाईतून ज्ञानेश्वरांसारख्यांनी अडाणी जनतेला हितोपदेशाकडे नेण्याचे कार्य जसे केले, तसे कार्य करणाऱ्या बंडखोर संतांची परंपरा निर्माण झाल्याखेरीज धर्माचे खरे स्वरूप सामान्यांना कळत नाही,’ असे धर्मविचाराचे सार सांगणारे वाक्य ते सहज लिहून जातात. पु. लं. हे गणेशाचे भक्त नसले तरी इंडोनेशियाच्या प्रवासवर्णनात ‘श्रीगजाननाची मूर्ती मला अतिशय आवडते. किंबहुना गणपतीवर लहानपणापासून मी अतिशय प्रसन्न आहे. आमच्यासारख्या स्थूलप्रकृती बैठय़ा माणसाची ही एकमेव इष्टदेवता. शिवाय लेखनकामासाठी हा आम्हाला जोडणारा दुवा आहेच..’ असे मिश्कील गणेशवर्णन आहे. पु. लं.च्या लिखाणात आढळणारा एक विशेष असा की, आपल्या जगभरच्या प्रवासातून त्यांनी उघडय़ा डोळ्यांनी सगळ्या गोष्टी नीट निरखल्या आहेत. ठिकठिकाणचे लोक जगतात कसे? वागतात कसे? त्याबरोबरच त्यांचे समाजजीवन कसे आहे? ते लक्षपूर्वक टिपले आहे. त्यामुळे विविध आचार-धर्माच्या चालीरीतींतील साम्य आणि विरोध ते सहज जाता जाता सांगून जातात. सांगताना त्यांच्या खास शैलीतली फटकेबाजी असतेच.

पूर्वी एन. सी. पी. ए.च्या गेस्ट हाऊसमध्ये जेवणाची सोय नव्हती. एके दिवशी पु. लं.चा मर्ढेकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम होता. दुपारचे जेवण आमच्या घरून गेले. ऐनवेळी कोणी पाहुणा आला तर गैरसोय नको म्हणून जेवण थोडे अधिक पाठविले होते. डबा पाहिल्यावर पु. लं. लगेच म्हणाले, ‘‘इतके जेवल्यावर मर्ढेकर कुठले? नुसता ढेकरच!’’

हजरजबाबी पुलं

पं. भीमसेन जोशी हे सवाई गंधर्वाचे शिष्य! पंडितजी नेहमी देशविदेशात विमानाने फिरतात म्हणून पु. ल. त्यांना ‘हवाई गंधर्व’ म्हणत. मुंबईचे एक धनाढय़ गृहस्थ देणगी दिल्यावर आपल्या नावाचा फार आग्रह धरतात. पु. लं.चे म्हणणे : त्यांनी लग्न करतानाही बायकोला ‘माझे नाव लावशील तरच माळ घालतो’ असे सांगितले असणार.

पु. लं.च्या निरीक्षणशक्तीची झलक त्यांच्या व्यक्तिचित्रणांत हमखास आढळते. ‘अहो, कसला गांधी? जगभर गेला, पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमके ठाऊक.. इथे त्याच्या पंच्याचं कौतुक नाही नि दांडीचंही नाही. आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्याहीपेक्षा उघडे! सुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही. तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं. इथे निम्मं कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हास कसले?’ यात रत्नागिरीच्या माणसाच्या स्वभावाचीच नव्हे, तर भाषेचीही वैशिष्टय़े पुरेपूर उतरली आहेत. पुलं महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या बोलीभाषा सहजपणे त्या- त्या ढंगात बोलू शकतात. पु. लं. आणि ग. दि. माडगूळकर एकमेकांशी या रत्नांग्रीच्या खास मराठीत बोलत असत. या बोलीभाषांच्या ज्ञानाचा त्यांनी ‘ती फुलराणी’च्या प्रारंभीच्या प्रवेशात फार उत्तम उपयोग करून घेतला आहे. विनोदी लेखक, नाटककार, प्रसिद्धी न करता लाखो रुपयांच्या देणग्या देणारा दाता, श्रेष्ठ वक्ता, संगीतकार, नट, दिग्दर्शक इत्यादी विविध गुणांनी पु. लं. महाराष्ट्रात अजोड लोकप्रियता गाठीशी बांधून असले तरी बालपणी झालेल्या ऋग्वेदींच्या संस्कारांमुळे असेल कदाचित, पण मनाने पु. लं. तत्त्वचिंतक आहेत. त्यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक घ्या, ‘बटाटय़ाच्या चाळी’तील स्वगत पाहा किंवा कोणताही विनोदी लेख घ्या; मार्मिक आणि प्रसन्न विनोदात वाचकाला हसून ठेवीत असतानाच ते त्याला चटकन् अंतर्मुख करतात. माणसांच्या सहवासाची मनस्वी आवड असलेल्या या सरस्वती पुत्रोत्तमाला वारकऱ्यांच्या दिंडीशी आपल्या जीवनवारीचे नाते जोडावेसे वाटते. हे नाते सांगताना ते म्हणतात, ‘पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह अधिक असतो. म्हणून तर खरे वारकरी एकमेकांना उरापोटी भेटत शेकडो मैलांची वाट तुडवीत जातात. नुसत्या विठ्ठलाचे दर्शन मोटारीतून जाऊन-येऊन मिळते.. पण मग ती वारी नव्हे. मी पूर्वेची वारी केली. ती जीवनाच्या वाटा निरनिराळ्या नादात चालणाऱ्या देशोदेशींच्या अनोळखी वारकऱ्यांना भेटावे म्हणून. आणि आनंद हाच, की माझिया जातीचे मला खूप खूप लोक भेटले.’

असे आनंद देणारे आणि घेणारे जीवनयात्री त्यांना नेहमीच भेटत राहोत. त्यांच्या संगती वाटचाल करण्याचे बळ आणि अनुकूलता त्यांना निरंतर लाभो, एवढीच प्रार्थना. 

-- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Wednesday, October 31, 2018

पु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार - अनिल गोविलकर


फार वर्षांपूर्वी प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळ्यांचे "गोरी गोरी पान, फुलासारखी छान" हे बालगीत अतिशय लोकप्रिय झाले होते, इतके की कवी ग.दि.माडगूळकरांनी कौतुकाने "अहो खळे, या गाण्याने मी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलो". वास्तविक माडगूळकर, त्याआधीच घरगुती झाले होते पण यानिमित्ताने त्यांनी श्रीनिवास खळेकाकांचे कौतुक करून घेतले. अशाच वेळी कुणीतरी या गाण्याचे कौतुक करीत असताना, खळ्यांनी मात्र आपली आवड म्हणून "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या बालगीताचे नाव घेतले. वास्तविक प्रस्तुत बालगीत प्रसिद्ध नक्कीच होते परंतु कालौघात काहीसे मागे पडले होते. अर्थात त्यानिमित्ताने काही लोकांना या गाण्याचे संगीतकार पु.ल.देशपांडे आहेत, ही माहिती "नव्याने" समजली. पु.ल. आपल्या असंख्य व्यापात वावरत असताना, त्यांनी आपल्यातील संगीतकार या भूमिकेबाबत नेहमीच अनुत्साही राहिले आणि खुद्द संगीतकारच जिथे मागे रहात आहे तिथे मग इतरेजन कशाला फारसे लक्षात ठेवतील? परंतु संगीतकार म्हणून पु.लं. नी ललित संगीतात काही, ज्याला असामान्य म्हणाव्यात अशा संगीतरचना केल्या आहेत. बऱ्याचशा रचना कालानुरूप अशा केल्या आहेत आणि त्यात फारशी प्रयोगशीलता आढळत नाही परंतु चालीतील गोडवा, शब्दांचे राखलेले औचित्य आणि काहीवेळा स्वररचनेवर राहिलेला नाट्यगीतांचा प्रभाव आणि त्यातूनच निर्माण झालेले "गायकी" अंग, यांमुळे गाणी श्रवणीय झाली आहेत.

पु.लं. नी आपल्या सुरवातीच्या काळात भावगीत गायनाचे कार्यक्रम केले होते. त्या दृष्टीने विवरण करायचे झाल्यास, त्यांनी गायलेली गाणी फारशी ऐकायला मिळत नाहीत. "पाखरा जा" सारखे अपवादात्मक गाणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, आवाज "कमावलेला" नाही, पण रुंद, मोकळा आणि स्वच्छ आहे. त्याला "गाज" फार नाही पण गोड, सुरेल आहे. त्यात किंचित सुखावणारी अनुनासिकता आहे पण लवचिकपणा फार नसल्याने फिरत ऐकायला मिळत नाही. एकूणच बहुतेक भर हा उस्फूर्तता असावी, असे वाटते. अर्थात अचूक शब्दोच्चार हा महत्वाचा मुद्दा विशेषत्वाने मांडायला लागेल. असेच एक लक्षात राहण्यासारखी रचना म्हणजे "उघड दार". या गायनात आवाजाची फेक वेधक आहे. "दार" मधील "दा" अक्षरावरील तयार षडजामधला आ-कार सुरेख लागलेला आहे. वरती उल्लेख केलेल्या "पाखरा जा" मधील "पहा" या शब्दावर छोटी चक्री तान आहे. परंतु मघाशी म्हटल्याप्रमाणे आवाजावर शास्त्रीय संगीताचे संस्कार नसल्याने, घेतलेल्या ताना या, दोन, तीन स्वरांपुरत्या असल्याने एकूणच स्वररचनेला विलॊभनीयता आणणाऱ्या आहेत. त्यामुळे एक विधान ठामपणे करता येते, ललित गायकाला प्रत्येक प्रकारची गाणी गाता येणे गरजेचे असते आणि तिथे मात्र पु.लं. च्या गायनात काहीसे थिटेपण जाणवते. पुढे "बटाट्याची चाळ" या संगीतिकेतील गायन ऐकायला मिळते पण ते गायन हे बव्हंशी कविता वाचन स्वरूपाचे झाले आहे. मुळात त्या रचनेत संगीताचे स्थान तसे गौण असल्याने, असे झाले असावे. असे असले तरी एकूणच पु.लं.चा आपल्या गायनावर फार विश्वास नसावा, असेच वाटते. 
पु.लं.चा खरा सांगीतिक आविष्कार ऐकायला मिळतो तो त्यांच्या हार्मोनियम वादनातून. मला देखील काही प्रख्यात गायकांना साथ करताना ऐकण्याची संधी मिळाली होती. अर्थात यात त्यांचे जाहीर वादनाचे कार्यक्रम देखील समाविष्ट आहेत. वाद्य वाजणारे कलाकार बहुदा त्या वाद्याच्या प्रेमात पडतात. समजा ते वाद्य हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन झाले तर तर त्या वाद्याचा अतोनात गौरव करण्याकडे प्रवृत्ती वळते. या दृष्टीने बघता पु.लं.चे तसे झाले नाही. त्यांनी आपले पेटीवादन कधीही व्यावसायिक तत्वावर केले नाही, किंबहुना आनंदनिधानाचे स्थान, इतपतच त्यांच्या आयुष्यात या वाद्याचे स्थान राहिले, असे म्हणता येईल. त्यांनी या वाद्याच्या कमतरते विषयी बऱ्याचवेळा जाहीर मतप्रदर्शन केले होते आणि ते वाजवी असेच होते. अर्थात इतर कुठल्याही वाद्याकडे पु.ल. वळले नसल्याने, या वाद्याच्या अनुरोधानेच त्यांच्या संगीत प्रभुत्वाबद्दल काही विधाने करता येतील.

आता जर का पेटी या वाद्याचीच घडण लक्षात घेतली तर आपल्याला काही ठाम विधाने करता येतील. हातानेच भाता चालवायचा असल्याने "दमसास"ची अडचण उद्भवत नाही. दीर्घ स्वरावली आणि ताना घेता येतात तसेच सर्व सप्तकात फिरता येते. गळ्यापेक्षा बोटांचे चापल्य अधिक त्यामुळे जलद ताना सुलभतेने घेता येतात. परंतु या वाद्यात दोन अडचणी प्रामुख्याने येतात. १) तिच्यातील स्वरस्थाने आणि भारतीय संगीतातील स्वरस्थाने यात फरक पडतो. २) सर्वात मोठा फरक म्हणजे पेटीच्या स्वरांत तुटकपणा फार जाणवतो. एक स्वर झाल्यावर दुसरा स्वर परंतु इतर तंतुवाद्यांत असा प्रवास करताना स्वरांतील सातत्य राखणे जमू शकते आणि तिथे पेटी कमी पडते. पुढचा मुद्दा असा, भारतीय संगीतात "मींड" या अलंकाराला अतोनात महत्व असते आणि तिचे अस्तित्व पेटीतून दाखवणे जवळपास अशक्य होते आणि याचे मुख्य कारण स्वरांतील तुटकपणा ठळकपणे ऐकायला मिळतो. आणि हा दृष्टिकोन ध्यानात ठेऊनच आपल्याला पु.ल. एक वादक याचा धांडोळा घ्यायचा आहे. बोटांचे छापल्या तर महत्वाचे खरेच पण भाता सक्षमपणे हलवणे तसेच स्वरांचा नाद अवश्य तिथे लहान-मोठा करणे, एकाच स्वर दीर्घकाळ त्याच "व्हॉल्युम" मध्ये ठेवणे इत्यादी बाबींतून मैफिलीत रंग भरणे, यात पु.ल. निश्चित वाकबगार होते. मुळात पेटी हे संथ, मुक्त आलापीचे वाद्यच नव्हे - जसे सतारीत अनुभवता येते. विलंबित स्वराला जे सातत्य, दीर्घता हवी असते ती पेटिट सुट्या-सुट्या स्वरांतून मिळत नाही.

मी स्वतः: वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर केली साथ ऐकली आहे. आदर्श साथ जी गायकाच्या बरोबर जाते पण भारतीय संगीतात ठरीव संहिता अशी कधीच नसते म्हणजेच गायक जे त्या क्षणी सुचेल त्या स्वरावली घेत असल्यामुळे पुढच्या क्षणी येणारी स्वरावली ही नेहमीच अनपेक्षित असते, त्यामुळे साथ देणारा "बरोबर" जाऊ शकत नाही - तो मागोवा घेत असतो. यात गायकाच्या पेशकारीच्या शक्य तितक्या जवळपास वावराने, इतकेच पेटी वादकांच्या हातात असते. पु.लं.च्या बाबतीत हे कौशल्य ठळकपणे ऐकायला मिळते. बरेचवेळा गायकाने जी स्वरावली घेतली आहे, त्याचे प्रत्यंतर आपल्या वादनातून देणे अंडी इथे पु.ल. नेमके वादन करताना आढळतात. तसेच कधीकधी "मोकळ्या" जागेतील "भरणा" अतिशय कुशलतेने करताना आढळतात. अर्थात प्रत्येकवेळी असे करता येईल असे शक्य नसते परंतु वसंतराव देशपांड्यांच्या बाबतीत पु.लं.नी हे स्वातंत्र्य घेतल्याचे मी अनुभवले आहे. एकतर वसंतरावांचा गळा कोणत्यावेळी कुठे आणि कशी झेप घेईल याची अटकळ बांधणे महामुश्किल असताना, त्यांना साथ करताना ही व्यवधाने अचूकपणे सांभाळल्याचे समजून घेता येते.

आता पुढील भाग म्हणजे पु.लं.ची ललित संगीतातील कामगिरी. इथे त्यांनी दोन स्तरांवर संगीत दिग्दर्शन केले आहे. १) भावगीत, २) चित्रपट गीत. तसे पाहता, आविष्काराच्या दृष्टीने दोन्ही आविष्कार एकाच पातळीवर वावरतात पण चित्रपट गीत बांधताना, प्रसंगाची पार्श्वभूमी, आजूबाजूचे "सेटिंग" वेळेची मर्यादा इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. पु.लं.ची बरीचशी चित्रपट गीते ही त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील आहेत. अर्थात बरेचवेळा आर्थिक चणचण हा मुद्दा असल्याने वाद्यमेळाच्या विविधतेवर मर्यादा आल्या. अर्थात अशी मर्यादा असून देखील त्यांनी काही अत्यंत संस्मरणीय रचना दिल्या, हे मान्यच करायला हवे. मी सुरवातीला एक मुद्दा मांडला होता, पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. "माझिया माहेरा जा" सारख्या गीतांतून मास्तर कृष्णरावांच्या प्रभावाचा अनुभव घेता येतो. तसेच "हसले मनीं चांदणे" सारख्या (राग चंद्रकौंस) गाण्यातून बालगंधर्वी शैलीचा प्रभाव जाणवतो. सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे शब्दांचे औचित्य सांभाळणे - "माझिया माहेरा" या गाण्यातील "हळूच उतरा खाली" इथे स्वर पायरीपायरीने उतरवून, शब्दांबाबतली औचित्याची भावना सुरेख मांडली आहे. तसेच "तुझ्या मनात कुणीतरी हसलं ग" (राग पहाडी) सारख्या रचनेत प्रसन्नतेचा भावस्थितीनुसार लय काहीशी द्रुत ठेवणे हे संगीतकार म्हणून नेमके जमले आहे.
                                     
त्यांची खास गाजलेली दोन भावगीते - "शब्दावाचून कळले सारे" आणि "माझे जीवन गाणे". मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेल्या प्रसन्न कवितेला पु.लं. नी खरोखरच चिरस्मरणीय अशा चाली दिल्या आहेत. "दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया" सारख्या चित्रपटगीतांत "पुरिया" रागाचा समर्पक उपयोग केला आहे. तसे बघितले चाल साधी आणि सरळ आहे पण तेच या चाळीचे खरे वैशिष्ट्य म्हणायला हवे. दुसरे गाजलेले चित्रपट गीत म्हणजे "इंद्रायणी काठी" हे भजन. या रचनेवर देखील मास्तर कृष्णरावांचा प्रभाव आढळतो. असे असले तरी गायनावर बालगंधर्व शैली पुसली जात नाही - विशेषतः: "विठ्ठला मायबापा" हा पुकार तर खास बालगंधर्व शैलीतला. भीमपलास रोगावरील धून असली तरी रागाचे अस्तित्व वेगळे ठेवले आहे. "ही कुणी छेडिली तयार" हे केदार रागावर आधारित गाणे असेच विलोभनीय झाले आहे. यात गिटार वाद्याचा उपयोग लक्षणीय आहे जरी वसंर्तवाचा ढाला आवाज काहीसा विक्षेप आणत असला तरी. वर उल्लेखलेल्या "नाच रे मोरा" ही रचना तर बालगीत म्हणून चिरंजीव झालेली आहे. गाताना काहीसा बोबडा उच्चार, हलकेच निमुळता होत जाणारा स्वर तसेच सुरवातीच्या "नाच" मधील "ना" आणि शेवटी येणाऱ्या "नाच" मधील हलका "ना" यांचा गमतीदार विरोध इत्यादी अनेक गुणविशेषांनी हे गाणे नटले आहे. असेच अप्रतिम गाणे "करू देत शृंगार" सारखी विरहिणी अजरामर झाली आहे. कवितेतील आशय अतिशय नेमक्याप्रकारे जाणून घेऊन, तितकीच तरल स्वररचना सादर केली आहे. अर्थात आणखी एक उणीव असे म्हणता येणार नाही कारण त्यात आर्थिक कारणे दडलेली आहेत पण सगळ्याचा स्वररचनांमध्ये वाद्यमेळाचे प्रयोग फारसे बघायला मिळत नाहीत.
                                 
एकूणच खोलात विचार करता, पु.लं.च्या संगीताचा साक्षेपाने विचार केल्यास, सारांशाने असे म्हणता येईल, की त्यांचा व्यासंग हा "साधना" या सदरात मोडणे अवघड आहे. त्यांच्या आस्वाद यात्रेतील एक वाटचाल असे म्हणता येईल. असे असले तरी, महाराष्ट्राने त्यांच्या विविध पैलूंवर अतोनात प्रेम केले पण यात या माणसाच्या सांगीतिक कर्तबगारीची विशेष जण ठेवली नाही आणि कदाचित पु.लं.नी देखील फार गांभीर्याने याकडे पाहिले नाही.


अनिल गोविलकर
मुळ स्रोत- http://govilkaranil.blogspot.com/2018/10/blog-post.html

पु.ल. एक आनंदयात्री

दिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का? विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास सुरुवात केलीच. त्यांच्या पुस्तकातून पुलंची ओळख होत गेली ती अशी, पु.ल. म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व, पु.लं. म्हणजे बुद्धीविभव, सर्जनशील वक्ता, पु.लं. म्हणजे संगीताभिनयाचा जाणकार, पु.लं. म्हणजे गरुडाची निरीक्षणशक्ती असणारा डोळस लेखक, पु.लं. म्हणजे निखळ, निरागस, निर्हेतुक आनंदोत्सव घडविणारा कवी, जिंदादिल आस्वादक, रसिक जीवनयात्री, पु.लं. म्हणजे मराठी मनाचा आरसा प्रामाणिक, सचेतन, सहृदय. हे सारं लिहिलं खरं पण कानात रावसाहेब खेकसले, ‘हे कसलं हो असलं मिळमिळीत?’ मग हा रूळ ताबडतोब बदलून टाकला. म्हटलं, पु.लं. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा, पु.लं. म्हणजे मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेते, पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांचे मानकरी,साहित्य समेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष;तेवढ्यात शंकऱ्या किणकिणला, ‘आमचे बाबा कीनई नारूच्या बाबांपेक्षा चिक्कार शक्तीवान आहेत, पोट पुढे असलं म्हणून काय झालं?’ लेखाला सुरुवात केली खरी न् पण असामी ची ओळख काय म्हणून झाली नक्की, हा प्रश्न काही सुटेना. मग मात्र ठरवून टाकलं की, या विदुषकाचा मुखवटा धारण केलेल्या विनोदकार, नाटककार, कवी, गायक, वादक, वक्ता आणि बैठ्या मैफिलींच्या अनभिषिक्त सम्राट असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा द्यायचा हे आपल्या लेखाचं निमित्त.

पुलंनी त्यांच्या लेखनातून आनंद दिला आणि आपण रसिकांनी तो पुरेपूर लुटला. ‘विनोद’ हा पुलंच्या लेखनाचा मूलाधार होता पण त्यांना हशा मिळविण्यासाठी कधी विनोद करावा लागला नाही. खरं तर सुमार आणि सपक विनोद हे विनोदाचे शत्रू पुलंच्या विनोदात कधी दिसलेच नाहीत. असामी असामी मधला बेमट्या उर्फ धोंडो भिकाजी जोशी चे डी बी अंकल हा प्रवास अनुभवताना आपण त्यांच्याबरोबर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास अनुभवला. सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा, आवडी असणारा तो, त्याच्या त्या केविलवाण्या आयुष्याला हसत असताना आपण त्याचे कधी होऊन गेलो ते कळलंच नाही; ते वाचताना वा ऐकताना आपण स्वत:लाच हसत होतो याचंही भान आपल्याला उरलं नाही. उलट चार्ली चाप्लीनला पुलं ‘तू माझा सांगाती’ असं का बरं म्हणत असतील हे आपल्याला मनोमन पटलं.

पुलंनी जसा हा माणूस उभा केला तशीच बटाट्याच्या चाळीचीही निर्मिती केली. तिच्यातून नुसती चाळच नाही तर मुंबईसुद्धा भेटली. अगदी तिचा कधीही अनुभव न घेतलेल्यालाही ती जवळची वाटली. त्यांनी या चाळीला एक स्वतंत्र, संवेदनक्षम आणि बोलकं व्यक्तिमत्त्व दिलं. त्या चाळीबरोबरच सुतकी आवाजात ‘पंत, तुम्ही उपास सुरु केलाय?’ असं म्हणणारे कुशाभाऊ, ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ हे विचारणारा फर्ताडो, पट्टीच्या न सापडणाऱ्या सुरात गाणाऱ्या वरदाबाई, ‘कुठल्याशा किल्ल्याला चिखल किती लागला ते पन्हाळगडच्या पावनखिंडीची लांबी रुंदी काय होती’ असली कागदोपत्री प्रवासाची इत्थंभूत माहिती असणारे बाबुकाका खरे ही सगळी मंडळीही आपल्याला तिथेच भेटली किंबहुना ती रूपं बदलून आजन्म भेटत राहतील. पुलंचं लेखन नुसतंच व्यंग किंवा विसंगती दाखवणारं नव्हतं तर त्यावर ते एक मार्मिक भाष्य करीत, कधी त्यात खोचक चिमटेही घेत असत पण त्या विनोदाचा दर्जा कायमच निखळ अन् निकोप असे.

पुलंचं लेखन खरंतर आपण वाचत नाहीच ते ऐकत असतो. बहुतेक त्यांना लिहिण्यापेक्षा बोलायला अधिक आवडत असणार म्हणून असेल. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गोळाबेरीज’ आणि ‘मैत्र’ यासारख्या पुस्तकातून त्यांने लिहिलेल्या व्यक्ती आपल्याला खरोखर भेटतात. ‘सर, हे पेढे.’ म्हणत सुरातील अजिजी दाखवणारा सखाराम गटणे, ‘इथे सगळेच पंचेवाले, अन त्याच्यापेक्षा उघडे.’ असं बिनधास्तपणे सांगणारा अंतू बर्वा, ‘आम्ही पाहतोय, महाराज पाहताहेत..’ म्हणत शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करणारे हरितात्या, सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी, ‘हं, ‘नाना फडणवीस’ अशी सही केली’ म्हणणारे बघुनाना, ते ‘आयुष्यात व्रत एकच केलं, पोरगं सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून लख्खं करून जगात पाठवून देणे!’ असं म्हणणारे चितळे मास्तर अशी जर या वल्लींची यादी करावयास सुरुवात केली तर ती संपणारच नाही. पुलंच्या समृद्ध भाषेमुळे, संवेदनशीलतेमुळे, लोकसंग्रहामुळे, आणि अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे विनोद केवळ हासण्यापुरते मर्यादित न राहता त्या मागची कारुण्याची लकेरही आपल्या नजरेस येते.

बरं, पुलंच्या लेखनाच्या वैविध्याबरोबर विषयांचंही वैविध्य होतं; त्यांना कुठल्याही विषयाचंही वावडं नव्हतं. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व, त्याचा अभ्यास त्यांनी वापरलेल्या परिभाषेतून दिसून येई. त्यांची प्रवासवर्णनंही अशीच वैशिष्ट्यपूर्ण मग ते ‘जावे त्याचा देशा’ असो किंवा ‘अपूर्वाई’. त्यांची आठवणी लिहिण्याची हातोटी विलक्षण होती. अपूर्वाई तील एक आठवण, प्रवासात हॉटेलमधल्या फ्रेंच वेटरशी संवाद करण्याचा प्रसंग गुदरला, तेव्हा पु.लं म्हणतात, ’दूध हवं, हे सांगण्यासाठी कागदावर एक गाय काढली - काढली कसली, गोहत्याच ती!’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या विनोदबुद्धीवर काय बोलावं? आपल्याला मराठी कळतं त्यामुळे आपण हे वाचून आनंद घेऊ शकतो, अनुवाद वगैरे ऐकण्या-वाचण्याची वेळ आपल्यावर येत नाही याबद्दल कृतज्ञ राहावं इतकंच.
असं असलं तरीही, पुलं विरोधी गटही काही कमी नाही, नुसतेच विनोदी, उथळ, वरवरचे, फक्त जे लोकांना ऐकायला आणि वाचायलाच आवडेल असे लिहिले असे आरोपही होत या लेखनावर आले. पण त्यांनी त्यांच्या लेखनातून विषमता, अन्याय, दंभ, मत्सर ही समाजाची कुरूपता मुद्दाम कधी दाखवली नाहीत. स्वत:च्या दु:खाचे मनोरे रचून आपल्याला रडवले नाही; उलट रडू येईपर्यंत हसवले. आणि विरोधकांना त्यांच्या विरुद्ध मतासह आपले मानले. आताचा काळ तर असा आहे की, पुलंचे कित्येक विनोद, किस्से, कोट्या या स्वत:च्या नावाने दडपून लोक ते व्हॉटस् अॅपताना, फेसबुकताना किंवा त्याची पुणेरी पाटी बनतानाही दिसून येते. कदाचित हेच त्या लेखकाचं यश असेल, की त्याचा विनोद हा सर्व सामान्य माणसाला इतका जवळचा वाटतो. पुलंचं लेखन आपण जितके वेळा वाचतो तितके वेळा ते आनंदच देतं, त्याचं कंटाळा येत नाही. आता उदाहरणच द्यायचं तर, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती, ‘संगीत संशयकल्लोळ’ मधील संगीत नसते, तर बरे झाले असते, असे म्हणण्याइतके मधुर आहे, किंवा एकदा मर्ढेकरांच्या कविता सादर करायला जाण्यापूर्वी भरपेट जेवण झाल्यावर ‘इतके जेवण झाल्यावर मर्ढेकर कुठला? नुसता ढेकर.’ हे आणि असं खुमासदार लेखन न आवडेल तरच आश्चर्य. त्यातून पुलंनी त्यांच्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत ते ऐकवलं तर आणखी लज्जतदार. अक्षरांशी थोडाफार संबंध आलेला असा एकही माणूस नसेल ज्याने पुलंचं नाव ऐकताच त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला हात घातला जाणार नाही वा उत्साहाची लहर उठणार नाही.
त्यांच्यातला लेखक एक उत्तम अभिनेता म्हणून भेटतो तो ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात आणि तितकाच परिणामकारक दिग्दर्शक भेटतो ‘वाऱ्यावरची वरात’ किंवा ‘वटवट’ सारख्या सामुहिक नाट्यप्रयोगांचे मोट वळताना. त्यांना एक कसबी लेखक, गायक, वादक, अभिनेता म्हणून ओळखू लागतो तोवर ‘शिकवीन चांगलाच धडा’ म्हणत ‘ती फुलराणी’ समोर उभी राहते,त्यांच्या भाषा आणि बोलींच्या अभ्यासाची आपल्यावर मोहिनी घातली जाते,आणि त्यांच्यातला नाटककार खुणावून जातो. ‘सुंदर मी होणार’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ सारखी नाटकं, रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण नाटकं म्हणून आजही आठवली जातात.

पुलंच्या लेखनातून जसे ते अगदी मनापासून भिडतात तसेच ते त्यांच्या अभिनयातून आणि अभिवाचनातून आपल्याला मनोमन भावतात. गुळाचा गणपती, किंवा बटाट्याची चाळ मधील त्यांच्या लयबद्ध हालचाली असोत किंवा म्हैस मधील कित्येक आवाजांचे प्रकार असोत, हा सगळा खटाटोप ते लीलया साधून जातात. म्हणूनच की काय, आपण त्यांनी संगीत दिलेली ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम’, ‘माझे जीवनगाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’, किंवा ‘हसले मनी चांदणे’ यासारखी गोड गाणी कधी विसरूच शकणार नाही. एरवी मिश्कील असणारे पु.लं इतर कवींच्या कविता मात्र अतिशय गांभीर्याने ऐकवत असत. ‘आनंदयात्रा कवितेची’ हा बा. भ. बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करताना उत्तम आस्वादक असलेल्या पुलंकडून त्याचं कवितांवर असलेलं प्रेम वाक्यावाक्यातून जाणवत राहतं. सरीवर सरी आल्या गं, किंवा समुद्रबिलोरी ऐना यासारख्या कविता म्हणतानाचा त्यांचा सुरेल आवाज ऐकत रहावासा वाटतो. या बहुरूपी अवलियाचं रुपडं आपण जितकं म्हणून शोधू, पाहू तितकं रंगीबेरंगी दिसू लागतं.

या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती असावेत, एकाविषयी आश्चर्य, कौतुक वाटावं तोवर दुसरा समोर यावा. त्यांची अशीच एक विलक्षण गोष्ट वाटली ती म्हणजे ते वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मुद्दाम शांतीनिकेतन मध्ये जाऊन बंगाली भाषा शिकले, त्या भाषेचा, परिसराचा अभ्यासही केला. जर कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिथे जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची ही त्यांची धारणा. हे त्याचे केवळ तत्व म्हणून मानले नाही तर त्यांनी तसे अनुभव घेऊन ते ‘वंगचित्रे’ मधून त्यांच्या शब्दातही मांडलेदेखील.

पुलंच्या ठायी हे सारे गुण तर होतेच होते पण त्याहीपेक्षा अफाट माया आणि प्रेम होते ते ‘माणूस’ या गोष्टीविषयी. त्यामुळे त्यांनी असंख्य माणसांना आपलेसे करून घेतले आणि सत्पात्री दानही केले. या त्यांच्या सव्यापसव्याचे शिस्तबद्ध दिग्दर्शन केले ते त्यांच्या पत्नीने ‘सुनीताबाई’ यांनी. रसिकांनी जसे त्यांच्यावर प्रेम केले तितकेच प्रेम पुलंनी समाजावर, मुक्तहस्ताने आणि आजन्म केले. त्यांच्यासाठी बोरकरांनी लिहिलेल्या या कवितेच्या ओळी खरंच किती समर्पक आहेत बघा,..

जराशप्त या येथल्या जीवनाला | कलायौवने तूच उ:शापिले |
व्यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू | निराशेत आशेस शृंगारिले |
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी | तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली |


तुझ्यासारखा तूच आनंदयात्री | तुवां फेडिली गाठ प्राणातली |

युवोन्मेष दिवाळी अंक २०१८
नंदिता गाडगीळ

Tuesday, June 19, 2018

परीसस्पर्श - सतीश पाकणीकर

माझ्या "पुलकित" मित्रमैत्रिणिंनो, आज मेजवानी आहे आठवणींची, पुण्यातील प्रसिध्द प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेली पुलंची एक आठवण आणि छायाचित्र पाहुन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले माझ्या, तुमच्यासाठी शेअर करण्याची परवानगी सतीशजींनी आनंदाने दिली त्यासाठी आपण त्यांचे कृतज्ञ राहू. 

*कट वन* - १९८६ च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन’. उद्यापासून म्हणजेच १३ जून १९८६ पासून ते १६ जून १९८६ पर्यंतच्या काळात माझे पहिलेच स्वतंत्र प्रकाशचित्र प्रदर्शन. प्रदर्शनाचे नाव ‘ स्वरचित्रांच्या काठावरती ...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. चित्रकार संजय पवार, भाऊ नार्वेकर, प्रमोद देशपांडे, संदीप होले, जयंत पाठक हे जिवलग मित्र व माझे दोन्ही भाऊ हेमंत व हरिष सर्वांनी मिळून रात्रभर जागून प्रदर्शनाचा ‘डिस्प्ले’ केलेला.
उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्र विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्र रामदास पळसुले आणि नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’ मधील ही पहिलीच वेळ. संजय पवारने केलेले निमंत्रण तर सर्वांना अतोनात आवडलेले. संगीत क्षेत्रातील सर्व नामवंतांना मी स्वतः जाऊन निमंत्रण दिलेले. तरीही माझ्या मनात धाकधुक.

पण दिलेल्या वेळेला कलादालन रसिकांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेले. उस्ताद सईदउद्दीन डागर, गुरू रोहिणीताई भाटे, आशाताई गाडगीळ, मधुकर पारुंडेकर, दत्तोपंत देशपांडे असे श्रोते भारतीय बैठकीवर बसलेले. बाजूच्या चार भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुआ, किशोरीताई, रविशंकर, विलायात खान, अमजदअली खान, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली.

सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी केलेल्या कौतुकामुळे पुढच्या तीन दिवसात जवळ जवळ तीन हजार रसिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. चित्रकार जि. भी. दीक्षित, पंडित जितेंद्र अभिषेकी, वामनराव देशपांडे, वसंत बापट, राम माटे, जयराम व कीर्ती शिलेदार, चंद्रकांत कामत, अरविंद थत्ते, शरद तळवलकर अशा कलावंतांची उपस्थिती माझी उमेद वाढवणारी होती.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. १६ जून. माझी नजर सतत कलादालनाच्या दाराकडे जात होती. मी एका व्यक्तीची आतुरतेनी वाट पाहत होतो. मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण केलेले. त्यावर त्यांनी येण्याचे आश्वासनही दिलेले. ते येतील? मनात द्वंद्व चाललेलं. एक मन सांगत होतं की ते किती मोठे आहेत, कितीतरी आमंत्रणे त्यांना रोजच येत असणार, अशा किती ठिकाणी ते उपस्थित राहणार? लगेच दुसरं मन म्हणे त्यांनी कबूल केलयं म्हणजे ते नक्की येतील.

वेळ तर निघून चाललेली. साडे चार वाजले. मी चहा पिण्यासाठी खालच्या कँटिनमध्ये गेलो. पुढ्यात चहा आला. एक–दोन घोट घेतोय तोवर माझा मित्र प्रमोद पळत पळत आला व म्हणाला- “ लवकर चल. वर कलादालनात पु. ल. देशपांडे व त्यांचे एक मित्र आलेत. ते तुझी चौकशी करताहेत.”

दुसऱ्या मनाचा कल बरोबर ठरल्याच्या आनंदात मी हातातला कप तसाच ठेवला. धावलो. प्रदर्शनातील मधल्या पॅनेलपाशी दोघेही तन्मय होऊन फोटो पाहत होते. मी हळूच जाऊन शेजारी उभा राहिलो. ते आल्याने स्वाभाविकच त्यांच्या आजूबाजूला गर्दी झाली होती. थोड्या वेळाने पु.लं चे माझ्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले – “अरे तुलाच शोधतोय, कुठे होतास? हे माझे मित्र नंदा नारळकर.” मी दोघांनाही नमस्कार केला. माझा विश्वास बसत नव्हता. पण समोर साक्षात अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व त्यांच्या एका जीवलग मित्रासोबत. आणि ते दोघेही माझ्या कामाचं ते तोंड भरून कौतुक करीत होते. मग पुढील जवळजवळ एक तास सर्व प्रकाशचित्रे बारकाईने पाहताना.... त्यांची उपस्थिती असलेल्या मैफिलींबद्दलच्या आठवणी जागवण्यात गेला. प्रदर्शन पाहून झाल्यावर पु लं नी अभिप्राय लिहिला – “ या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला हा अभिप्राय माझ्यासाठी जगातील सर्वात मोठे ‘अॅवॉर्ड’ होते.

मग पु लं नी चौकशी केली की इतके सगळे प्रिंट्स करण्यासाठी व प्रदर्शनासाठी खर्च किती आला व तो कोणी केला? हा सर्व खर्च मी केला आहे हे कळल्यावर ते म्हणाले – “ एक काम कर. आम्ही एन. सी. पी. ए. मध्ये या सर्व कलाकारांचे ध्वनीमुद्रण जतन करतोय. त्या संग्रहासाठी अल्बमचे कव्हर म्हणून या प्रत्येक कलाकाराच्या फोटोची एक एक प्रत आम्हाला दे. त्यासाठी किती खर्च येईल त्याचे एक पत्र मला दे. मी पुढच्या आठवड्यात चार-पाच दिवस तेथे आहे. नंतर प्रिंट्स दे.” किती सहज बोलून गेले ते. पण माझ्या सारख्याला ती एक फार मोठी संधी होती. एका मोठ्या अभिप्रायाच्या बरोबरीने मिळालेली आश्वासक संधी. प्रदर्शनासाठी घेतलेल्या कष्टांचे सार्थकच जणू!

*कट टू* – पुढच्याच आठवड्यात शनिवारी मी व मित्र प्रमोद देशपांडे पहाटेच्या सिंहगड एक्स्प्रेसने निघून मुंबईच्या व्ही टी ला पोहोचलेलो. पहाटे उठल्याने व प्रवासात झोपल्याने आमचे पुरेसे अवतार झालेले. खांद्याला शबनम त्यात (प्रिंट्सच्या खर्चाचे पत्र) व पायात स्लीपर्स असा वेश. व्ही टी वरून बसने थेट एन. सी. पी. ए.! त्यावेळी एन. सी. पी. ए.च्या समोर आज उभी असलेली गगनचुंबी इमारत नव्हती. एन. सी. पी. ए.च्या समोर थेट समुद्राचा अप्रतिम नजारा. समुद्राच्या बाजूकडून चालत चालत आम्ही टाटा थिएटरच्या बाजूने एका गेटमधून आत शिरलो.. आमचा एकूण अवतार बघून लगेचच तेथील गुरख्याने आम्हाला हटकले. “ ऐ किधर जाते हो ? क्या काम है ?” या त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिले की “ हमें पु ल देशपांडे साहब ने बुलाया है ।” माझ्या या उत्तरावर गुरख्याने आम्हाला एक कडक सॅल्युट ठोकला. त्याने आम्हाला त्याच्या मागे येण्याची खूण केली. नुसत्या पु लं च्या नावाचा हा परिणाम! आम्हाला घेऊन तो गेस्ट हाउसच्या दिशेनी निघाला. दारावरची बेल त्यानेच वाजवली. कोणी नोकराने दरवाजा उघडला. मग “पुण्याहून कोणीतरी आलयं” चा निरोप आत गेला.

आम्ही तसेच उभे. पाच मिनिटातच पिस्ता कलरचा झब्बा व पायजमा परिधान केलेले पु. ल. आतून बाहेर आले. आम्हाला पाहताच त्यांनी बसण्याची खूण केली. त्या नोकराला पाणी व चहा आणण्यास सांगितले. त्याचे नाव बहुदा लक्ष्मण. कसे आलात वैगेरे चौकशी केल्यावर पु लं नी मला विचारले “ या आधी एन. सी. पी. ए. मध्ये आला आहेस का ?” मी मानेनेच नाही सांगितले.

त्यांच्या मनांत काही विचार आले असावेत. येणारा तासभराचा वेळ आमच्या दोघांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा असणार आहे याची आम्हाला कणभरानेही कल्पना आली नाही. इतक्यात चहा आला. तिघांनेही चहा घेतला. मी आणलेले पत्र पु लं च्या हातात दिले. त्यांनी त्याच्यावरून एक नजर टाकली व ठीक आहे असे म्हणाले. मान वळवत त्यांनी परत हाक मारली – “ लक्ष्मण, लायब्ररी व आर्ट गॅलरीच्या किल्ल्या घेऊन जा. व दोन्ही उघडून ठेव.”

प्रिंट्स किती दिवसात तयार होऊ शकतात वैगेरे चौकशी करून दहा मिनिटांनी पु ल आम्हाला म्हणाले – “चला”. आम्ही उठलो. त्यांच्या मागे मागे जात आम्ही पोहोचलो होतो एन. सी. पी. ए.च्या सुसज्ज अशा लायब्ररीत. वर्ग व विषय निहाय ठेवलेली पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे सर्व काही, सांस्कृतिक तपशिलांचा खजिनाच. त्यादिवशी सुट्टी असल्याने तेथे कोणीच नव्हते. पु लं नी आम्हाला तो म्युझिक सेक्शन दाखवला ज्यासाठी त्यांनी मला प्रिंट्स देण्यास सांगितले होते. लायब्ररी मधून निघून आम्ही पिरामल आर्ट गॅलरीत पोहोचलो. पूर्ण वातानुकुलीत अशी गॅलरी. तेथे आधीच्या प्रदर्शनाचे काही प्रिंट्स ठेवलेले होते. अप्रतिम डिस्प्ले बोर्ड्स, डिस्प्ले केलेल्या प्रिंट्ससाठी असलेली समर्पक प्रकाशयोजना पाहून मी थक्क झालो होतो.

“ येथे सर्व प्रदर्शने निमंत्रणावरून होतात.” पु ल म्हणाले. आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून त्यांनी खुलासा केला की –“ फोटोग्राफर्स कोणत्याही थीमवर काम करून त्याचा पोर्टफोलिओ येथे पाठवतात. येथील तज्ञ ते पोर्टफोलिओ पाहून कोणाच्या कामाला गॅलरी उपलब्ध करून द्यायची ते निवडतात. फोटोग्राफरने फक्त प्रिंट्स द्यायच्या. बाकी सर्व सोपस्कार येथील स्टाफ करतो. सर्व खर्च एन. सी. पी. ए. मार्फत केला जातो. थीमवर अवलंबून किती दिवस गॅलरी द्यायची हेही पाहिले जाते.” आमच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. (माझ्या प्रदर्शनात खर्च कोणी केलायं असे पु लं नी का विचारले याचा मला उलगडा झाला)

तेथून आम्ही मधल्याच एका बऱ्यापैकी मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो. एका बाजूस छतापासून जमिनीपर्यंत मखमली पडदा होता. त्याच्या पुढ्यात एक भला मोठा ऑर्गन ठेवलेला होता. पु लं नी सांगितले “ ही नुकतीच झालेली अॅडिशन आहे. ” कोण्या एका पारशी गृहस्थाने तो ऑर्गन भेट म्हणून दिला होता. जिन्याने उतरून आम्ही ‘रंगोली’ नावाच्या रेस्तराँपाशी पोहोचलो. समोर चौरसाकार उतरत जाणाऱ्या पायऱ्या व हिरवळ. रेस्तराँच्या आतून व बाहेरून दिसणारे दृश्य एकदम मनमोहक. डाव्या बाजूला एक्स्प्रिमेंटल थिएटर.

बोलत बोलत आम्ही टाटा थिएटरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो. पूर्वेकडे चढत जाणाऱ्या पायऱ्या चढून थिएटरच्या आत गेलो. अर्धगोलाकृती स्टेज, तशीच अर्धगोलाकृती, १०१० प्रेक्षक आरामदायकरित्या बसण्याची व्यवस्था, प्रत्येक आसनावर उत्तम ऐकू येईल अशी ध्वनीयंत्रणा, अद्ययावत प्रकाशयोजना हे सर्व पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बाहेरच्या लॉबीत आलो. समोर परत एकदा समुद्राचा नजारा. पु लं नी सांगितले की “ फिलीप जॉन्सन नावाच्या आर्किटेक्टने हे सर्व डिझाईन केले आहे.”

जे आर डी टाटा व डॉ. जमशेद भाभा यांनी पाहिलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आणायला असाच वास्तू-विशारद हवा.

या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट घेतलेली व तेव्हा ऑनररी डायरेक्टर असलेली, मराठी सारस्वतांचा कप्तान असलेली, लेखन, नाट्य, सिनेमा, संगीत, अभिनय या प्रत्येक कलेत आपला अमिट ठसा उमटवलेली व अवघ्या महाराष्ट्राची लाडकी असलेली पु ल देशपांडे ही असामी आपला बहुमोल वेळ खर्च करून आम्हाला तो ३२००० स्क्वेअर मीटर पसरलेला आसमंत दाखवत होती. आमच्या आयुष्यात यापेक्षा अजून भाग्याची घटना काय असू शकेल?

पु लं च्या दातृत्वाने समृद्ध झालेल्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. त्यांच्या परीसस्पर्शाने सोनं झालेली अनेक आयुष्य आजही आहेत. व्यवसायाखेरीज मी निवडलेल्या माझ्या भारतीय अभिजात संगीतातील कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्याच्या छंदाला सुरुवातीच्या काळातच त्यांचा परीसस्पर्श व्हावा हे माझे अहोभाग्य!

*आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.*

आदरणीय भाई,
तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला हा संदेश फक्त जीवनाकडे बघण्याची दृष्टीच देतो असं नाही तर तो माझ्यासारख्या अनेकांचा प्रेरणास्त्रोतच आहे. माझ्या गळ्यात जोपर्यंत कॅमेरा आहे तो पर्यंत माझा हा छंद मी जाणीवपूर्वक जोपासेन, वाढवेन. माझी अशी प्रामाणिक धारणा आहे की तीच तुम्हाला तुमच्या या जन्मशताब्दी वर्षात खरी आदरांजली ठरेल!

सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
१२ जून २०१८

Tuesday, June 12, 2018

पुलंचे बहुरुपी खेळ - आरती नाफडे

पु.ल. आपल्यातून गेलेत त्याला आता दीड तप झालं. २०१९ हे पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे.
१२ जून पुलंचा स्मृतिदिन. काळ कितीही लोटला तरी स्मृती जागृत ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात व अभिनय कौशल्यात आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण बोटावर मोजण्याइतकेच पण ते भरभरून कसे जगायचे हे शिकवणारे पु.ल. सर्वसामान्य आहेत.

पुलंचं बहुजिनसी व्यक्तिमत्त्व होतं. कलागुण, अभिनय, वाकचातुर्य ही नैसर्गिक वैशिष्ट्यं त्यांना जन्माबरोबरच प्राप्त झाली व प्रसंगानुरूप ती प्रत्ययास येत गेली. पुलंची वयाच्या दहाव्या वर्षी मौंज झाली. ज्या भटजींनी मौंज लावली त्यांच्या समोर मौंज कशी लावली याची हुबेहूब नक्कल केली. पुलंचा वन मॅन शो कुटुंबातच कौतुकाचा विषय होता. बालपणी आजोळी कारवारमधील सदाशिवगडला मुक्कामी गेले असता चादरीचा सरकता पडदा लावून व एक पैसा तिकीट ठेवून नकला, गोष्टी, गाणी, पेटीवादन असा व्हेरायटी एन्टरटेन्मेंट प्रोग्राम करून पाच-सहा आणे उत्पन्न मिळवल्याची आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे.

आपल्या समोरील गर्दीतील माणसांना हसवणं, त्यांच्या मनावर अधिराज्य करणं व हे सर्व आपणास साधू शकतं हा दुर्दम्य विश्वास ही यशाची पहिली पायरी त्यांनी लहान वयातच जिंकली. पुढे याच आत्मविश्वासाचं विकसित रूप म्हणजे पुलंचे बहुरूपी खेळ. १९६१ मध्ये ‘बटाट्याची चाळ’चा पहिला जाहीर प्रयोग त्यांनी मुंबईत केला. पुलं रंगमंचावर एकटे उभे राहून एक मफलर एवढीच सामग्री हाताशी घेऊन आपल्या बोलण्यानं अभिनयानं, गाण्यानं लोकांना तीन तास सतत हसवत असत.

१६ सप्टेंबर १९६२ ला ‘वाऱ्यावरची वरात’ या बहुरूपी खेळाचा पहिला प्रयोग त्यांनी अनेक होतकरू, हौशी व हरहुन्नरी नटमंडळींना घेऊन सादर केला. नाटकाच्या पूर्वार्धात पाच सुटे विनोदी प्रसंग आणि उत्तरार्धात ‘एका रविवारची कहाणी’ असणारी ही रम्य वरावरात दहा-बारा वर्ष मराठी माणसांची गर्दी खेचत होती. १६ फेब्रुवारी १९६४ रोजी पुलंनी ‘असा मी असामी’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा बहुरूपी खेळ सुरू केला. धोंडो भिकाजी कडमडेकर हा मध्यमवर्गीय चाकरमानी माणूस तुळशी वृंदावनापासून कॅक्टसपर्यंतचा आपला प्रवास कसा करतो याचं रसभरीत वर्णन आहे. थोडक्यात जुन्या पिढीचा माणूस नवयुगाला कसं तोंड देतो हे फार विनोदी पद्धतीने दाखवलेलं होतं. यानंतर ‘ववटवट’ व ‘हसवणूक’ हे खेळ याच धर्तीवर पुढे आले.

पुलंचे बहुरूपी धाटणीचे हे पाच खेळ बघण्यासाठी प्रेक्षक खूप गर्दी करीत असत. ते सोनेरी दिवस महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही. नाट्यगृहाबाहेर पाटी असे एएका व्यक्तीला चारच तिकिटे मिळतील. काही वेळा जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रयोग हाऊसफुल्ल होई. भली मोठी रांग, फ्री पासेसला मनाई, लहान मुलांना प्रवेश नाही. सुनीताबार्इंचा नियम फार कडक असे. खेळातील कलावंत रांगेत उभे राहून घरच्यांसाठी तिकिटे काढीत.

या खेळांना विशिष्ट साहित्यिक वा वाङ्‌मयीन चौकट नव्हती. विनोदी प्रसंगांची मालिका आणि तिला संगीताची जोड असं लोभसवाणं स्वरूप असे. या प्रयोगांनी मराठी रंगभूीची नाटकाची रूढ बंदिस्त चौकट खुली केली. नाटकातील मुक्तपणा, प्रसन्नपणा, सुखद वातावरण प्रेक्षकाला भावत असे. तीन घटका हसण्यासाठी प्रेक्षक सगळे त्रास निमूटपणे सहन करीत असत.

पुलंच्या बहुरूपी खेळाचे वैशिष्ट्य हे होते की, खेळ यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ते नव्या खेळाची रचना व पूर्वतयारी सुरू करत. एकाच वेळी ‘चाळ,’ ‘वरात’ आणि ‘असामि’ हे दमदार खेळ यशस्वीपणे चालू असण्याचा कालखंड महाराष्ट्राने अनुभवला व टिपला आहे.

लेखन, दिग्दर्शन, मुख्य भूमिका, गाणं, वाद्यवादन, संयोजन अशा सगळयाच भूमिकांना न्याय देणं व त्या पूर्ण ताकदीने पेलणं हे काम काही साधं नाही. अवघडच पण पुलंनी ते सर्व उचलून धरलं याचा साक्षीदार महाराष्ट्रातील जनता आहे.

त्यांचे हे बहुरूपी खेळ म्हणजे हास्याची कारंजी, हास्याची लयलूट. त्यांच्या प्रतिभेला व अभूतपूर्व नवनिर्मितीशील आविष्काराला त्रिवार वंदन. माणूस यशाच्या शिखरावर असताना समोरच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करत असतानाच उंच सिंहासनावरून पायउतार होणं व यशाच्या शिखरावरचे खेळ स्वेच्छेने बंद करणं हे फार अवघड काम पुलंनी केलं.शरीर पूर्वीइतकं साथ देईना. त्यातील चपळता कमी होऊन थकवा जाणवू लागताच पुलंनी आपले सर्व बहुरूपी खेळ १९७४ पासून बंद केले. फार मोठा निर्णय पण सहजतेने अमलात आणला

पुलंनी जीवनात काहीच अवघड ठेवलं नाही. सगळंच सहज व सरळ करत गेले. अवघा महाराष्ट्र व मराठी माणूस हळहळला.

पुलंनी आपल्या ‘अनामिका' या संस्थेच्या परिचय पत्रिकेमध्ये लिहिलं होतं, ‘सदभिरूची न सोडता समोरच्या प्रेक्षकांपुढे हसू आणि आसूचे खेळ करून दाखवणे, त्यांची करमणूक करणे एवढाच नम्र भाव मनाशी बाळगून अनामिकेचे कलावंत उभे आहेत. गर्दी खेचायला सदभिरूचीच्या मर्यादा सोडण्याची काहीही आवश्यकता नाही हे आमच्या कार्यक्रमांना झालेल्या गर्दीने सिद्ध केले आहे. शेवटी मागणे एकच-सेवा करावया लावा देवा हा योग्य चाकर.

हा चाकर मधली काही दशकं रसिकांच्या मनावर किती मोहिनी टाकून होता. रसिकांच्या भावविश्वाचा सम्राट बनला हा इतिहास सर्वश्रुत आहे.

पुलंच्या बहुरूपी ढगांच्या पाच खेळांनी पुढच्या अनेक पिढ्यांना शिकण्यासारख्या अनमोल गोष्टी सांगितल्या आहेत. पुलंच्या प्रत्येक खेळामागे फार मोठी साधना, तप व कष्ट होते. खेळातील भूमिका वठवताना पाठांतराचा संस्कार कायम जपला पाहिजे या बाबतीत ते फार आग्रही होते. पाठांतर उत्तमच हवं. एकही शब्द इकडे तिकडे करून चालणार नाही. ते नेहमी म्हणत, ‘‘पाठांतराशिवाय प्रयोगाला उभं राहणं म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखं आहे." प्रत्येक प्रयोग आखीव रेखीव असावा यासाठी जातीने लक्ष घालत व झटत. ‘‘मला शंभरावा प्रयोगही पहिलाच वाटायचा" असं म्हणत असत व तशी उत्कटता दर प्रयोगात बाळगत. नाटकाच्या प्रयोगातील सच्चाई, खरेपणा व वास्तव जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. 'वाऱ्यावरची वरात'मध्ये मालतीने हातावर मेंदी काढली असल्याने नवऱ्याला रिसिव्हर आपल्या कानाशी धरायला लावते. या दृश्यात प्रत्येक वेळी खरी मेंदी लावावी मग प्रत्येक प्रयोगात एक शर्ट रंग लागून वाया गेला तरी चालेल, अशा मताचे पुलं होते.

पुलंच्या अंगी नाना कला होत्या व कुठली कला कुठे चपखल बसेल, चांगला परिणाम दाखवेल याचं झान त्यांना फार उत्तम होतं म्हणून प्रत्येक प्रसंग रंगत असे. कार्यक्रमात तांत्रिक बिघाडाने टेप बंद पडला तर वाचनाने सांधा जोडता यावा यासाठी निवेदनाची छापील प्रत हातात घेऊन सुनीताबाई मायक्रोफोनजवळ उभ्या असत. ‘बटाट्याची चाळङ्क या प्रयोगात सुरुवातीचं निवेदन टेप केलं होतं. एकदाच अशी अडचण आली तेव्हा टेप कुठं थांबली आणि प्रत्यक्ष वाचन कुठे सुरू झाले हे लोकांना कळलंही नाही. संभाव्य अडथळे व त्यासाठी दूरदृष्टीने केलेली उपाययोजना खूप काही शिकवून जाते. पुलंचा जीवनपट व त्यातील चढता आलेख बघितला तर माणूस आपल्या जीवनात कशी रंगीबेरंगी बाग फुलवू शकतो, त्यातील फुलांनी समाजजीवन पण कसं आनंदित व सुसह्य करू शकतो व फुलांचा सुवास जीवनानंतरही पसरत जातो व इतरांना आल्हाददायी ठरू शकतो. पुलंचं जीवन याचं साक्षात प्रमाण आहे.

पुलं म्हणतात, ‘‘मला रोज व्यंगचित्राच्या कल्पना सुचत. कारण माझी व्यंगचित्रकार होण्याची इच्छा होती. ती मी रंगमचांवर पूर्ण करून घेतली. बहुरूपी खेळ म्हणजे स्वत:च्या शरीरातून उभे केलेली व्यंग्यहास्यचित्रंच." पुलंनी व्यक्त केलेले व्यंगहास्यचित्रांचं मनोगत मराठी रंगभूीला कदापि विसरता येणार नाही.

आरती नाफडे
तरुण भारत (नागपुर)
१० जून २०१८

Wednesday, May 9, 2018

अंत:करणातील वीणेचा अखंड झणकार

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या आत्मचरित्राला महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली होती. या प्रस्तावनेत पु.लं.नी अरुण दाते यांच्या संदर्भातील केलेले लिखाण किती सार्थ होते, हे प्रत्येक शब्दातून प्रतित होते. 
‘शतदा प्रेम करावे’ ही अरुण दातेंनी एखाद्या खासगी मैफिलीत सहजपणाने चार गाणी म्हणावी, इतक्या सहजतेने आपल्या जीवनयात्रेची सांगितलेली कहाणी आहे. उर्दू भाषेत दास्ताँ म्हणतात, तशी ही कहाणी. त्या सांगण्याला कुठेही औपचारिकपणाचा स्पर्श नाही. मित्रमंडळींच्या सहवासात कसलेही दडपण येऊ न देता गाण्याचे उपजत देणे लाभलेल्या या गायकाने गाता गाता त्याच सहजतेने आपल्या आयुष्यातल्या मनात घर करून बसलेल्या आनंदाच्या क्षणांची माळ गुंफावी, तशा या आठवणी गुंफल्या आहेत. गाण्याच्या परिभाषेत सांगायचे, म्हणजे ही एक लयीशी खेळत चाललेली बोलबाट आहे. आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या, घडलेल्या प्रसंगांच्या, आपल्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या, स्मरणचित्रांचा हा एक सुंदर पट आहे. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात तो रमला, अनुभवांचे वादी-संवादी आणि विसंवादी-त्याला जे दर्शन घडले, जिथे त्याला कलावंताची उपेक्षा म्हणजे काय, प्रचंड प्रमाणातली प्रशंसेची दाद म्हणजे काय, या साऱ्या गोष्टींची इथे स्नेहभावनेने नोंद करून ठेवली आहे. जीवनात कटू अनुभव येणे स्वाभाविक असते; पण स्मृतीची ही चित्रे रंगवताना त्या निर्मितीचा कुणाच्या डोळ्यांवर आघात होणार नाही, याची त्याने काळजी घेतली. मैफिलीत कुठे बदसूर उमटू दिला नाही. कथनाला कुठे कृत्रिमतेचा स्पर्श घडू दिला नाही. एक तर स्वरलोभी रसिकांच्या मैफिलीत कृत्रिमतेला वावच नसतो. गाणे जितके सहज, तितकीच त्या गाण्याला मिळणारी सहज-उत्स्फूर्त दाद. मनात वाटलेला आनंद व्यक्त कसा करावा, असल्या विचाराशी घुटमळायला असल्या मैफिलीत सवडच नसते. गाण्याचा आनंद ऐकणाºयाला दिला केव्हा, याची तो देणाºयालाही पूर्वकल्पना नसते; आणि सुरांचा तो मधुर वेदना देणारा तीर नेमका लक्ष्यवेध करून गेला केव्हा, याचा ती दुर्मीळ जखम झालेल्या रसिकालाही पत्ता नसतो. असली मोलाची दाद लाभल्याचे भाग्य कलेच्या क्षेत्रात जगलेल्या सगळ्यांच्याच वाट्याला येते असे नाही. गाणाºयाला तर असली दाद मिळवून देणारी सुरांची लड कशी स्फुरते, याचे रहस्यही उमगलेले नसते. ती दाद कुणी विचारपूर्वक दिलेली असते, असेही नाही. ती दिली गेल्याचे, दाद प्रकट झाल्यानंतर जाणवते. ते नर्गिसचं फूल, तो बागेत बड्या मुश्किलीनं पैदा झालेला नजरदार दीदावर, नेमकं त्या फुलावर त्याचं ते ज्ञात्याचं पाहणं हा सारा योग जुळून यावा लागतो. त्या क्षणाच्या अकल्पितपणाचं कोडंच आहे. आज आपलं गाणं नेहमीपेक्षा अधिक का जमलं, याचं नेमकं कारण गायकालाही उमजलेलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेक वेळा गाताना एखाद्या जागेवर साºया मैफिलीतला प्रत्येक श्रोता दाद देण्याचं कुठलंही पूर्वनियोजन नसताना सामुदायिक दाद कशी देऊन जातो, तेही न सुटलेलं गूढ आहे. या सगळ्या कोड्यात आणखी एक भर म्हणजे केवळ उपचार म्हणून दिलेली दाद कोणती आणि उत्स्फूर्तपणानं गेलेली दाद कुठली, याची अनुभवी आणि रसिल्या तबियतीच्या गायकाला चांगली जाण असते, प्रतिसादाचा सच्चेपणा त्याला चांगला ओळखता येतो. अशी शंभर टक्के सच्चेपणानं दिलेली दाद चांगल्या कलावंतांना वर्षानुवर्षे लाभली. मैफिलीत ज्याची हजेरी म्हणजेच मैफिलीच्या यशाची आगाऊ पावती, अशी भावना ज्यांच्यामुळे कलावंतांना निर्माण होत आली, त्या रसिकाग्रणी रामूभय्या दात्यांचा अरुण हा मुलगा. त्यांनीच वाढीला लावलेल्या संगीत, नाटक, साहित्य, नृत्य, रंगरेषा यांसारख्या माणसाचं जीवन सार्थ करणाºया वातावरणात अरुण वाढला.

‘माझे जीवन गाणे’ हे केवळ एका गाणाºयानंच नव्हे, तर सगळ्या कुटुंबानं मंत्रजागरासारखं म्हणावं, असं हे इंदौरचं दात्यांचं खानदान. जीवनातला प्रत्येक क्षण सुरेल व्हावा, हा ध्यास घेऊन वाढणारी ही मंडळी केवळ कुटुंबीयांपुरतं हे सूर-लयीचं नातं जुळावं, एवढ्यापुरता हा ध्यास मर्यादित नव्हता. तो आसपासच्या चारचौघांत वाटून द्यावा, त्यांची जीवनं सुखी करावी, ही त्यांच्या मनाला ओढ होती. त्यासाठी आपलं घर स्वरोपासनेचं मंदिर व्हावं, सुरांचा हा दैवी प्रसाद त्यांनाही सुरांनी कान पवित्र करणारा व्हावा, ही या दाते कुटुंबीयांची मनोमन इच्छा होती. घरातल्या दिवाणखान्यातली मैफील संपली, तरी अंत:करणातली वीणा अखंड झणकारतच राहिलेली असायची. ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे’ ही ज्या घरातल्या अबालवृद्धांची वृत्ती होती, असल्या कुटुंबात अरुण लहानाचा मोठा झाला. त्या मैफिलीतल्या चिमुकल्या श्रोत्याच्या भूमिकेत तो केव्हा शिरला आणि यशाची एक एक पायरी चढत आज भावगीत-गायनाच्या क्षेत्रात लोकप्रियतेचं शिखर त्यानं केव्हा गाठलं, ते त्यालाही कळलं नाही. तो गात राहिला. ऐकणाºयांची संख्या वाढत राहिली. मात्र हा सगळा प्रवास काही मऊ मऊ गालिच्यांवरून झाला नाही. वाटेत काटेही रुतले. कुठल्याशा आर्थिक उलाढालीत वडिलांना फार मोठी खोट आली. प्रसादतुल्य वाडा विकावा लागला; पण हा आर्थिक फटका सूर-लयीचा आणि त्यातून लाभणारा दैवी श्रीमंतीचा आनंद हिरावून घेऊ शकला नाही. तंबोºयातून उमटणारे षड्ज-पंचम कुणीही हिसकावून घेऊ शकले नाहीत. तीन खोल्यांच्या नव्या बिºहाडात स्वयंपाकघर मांडून होण्याआधी समोरच्या छोट्याशा खोलीत बिछायत पसरली गेली. तंबोरे सुरांचं गुंजन करायला लागले. तीन-साडेतीन खोल्यांचा तो ब्लॉक तिथं स्वरमहाल उभा राहिला. पूर्वापार चालत आलेल्या कलावंतांचा राबता तसाच चालू राहिला. त्या काळी राजे होळकर सरकार असले, तरी रामूभय्या दाते नावाचा हा रसिकाग्रणी इंदौरातल्या सुरांच्या दुनियेतला अनभिषिक्त बादशहा होता. राजवाड्यावर खास आमंत्रणामुळे आलेले गायक-गायिका, वादक-नर्तक वाड्यावर मुजºयाला जाण्याआधी रामूभय्यांच्या कुटिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन जायचे. रामूभय्यांसारख्या, जाणत्या रसिकाकडून लाभणारी दाद दरबारातून मिळणाºया बिदागीच्या दसपट मोठी त्यांना वाटायची.

आपल्या कुटुंबातल्या त्या स्वरमयी वातावणाचं या कहाणीत फार सुरेख वर्णन केलं आहे. ही कथा वाचताना प्रकर्षानं जाणवतं, ते म्हणजे अरुणच्या गाण्याप्रमाणं लिहिण्यातलं माधुर्य. माधुर्य हा तर अरुणच्या गाण्याचाच नव्हे, तर स्वभावाचा गुण आहे. या कथनात अरुणनं कुठंही चुकूनसुद्धा तक्रारीचा कठोर सूर उमटू दिला नाही. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा वृत्तीतच तो रमला. ही स्थानं त्याला भावकवितेत सापडली. गझलेच्या दुनियेतून तो मराठी गीतांच्या प्रदेशात आला. येताना त्यानं गझलेच्या रचनेतली भाववृत्ती जोपासली. त्या वृत्तीतली ताकद हेरली. भावनाप्रधान आणि भावबंबाळ यातला फरक ध्यानात घेतला. रसिकांच्या मनात त्याच्या गीतांनी स्थान मिळविलं. गायक म्हणून त्याला उदंड यश मिळालं. म्हणून जगाला तुच्छ मानून कलावंताची मिजास मिरविण्याचा हव्यास बाळगला नाही. जुन्या आणि समकालीन कलावंतांच्या गुणांचं मन:पूर्वक कौतुक केलं.
                       
अरुण हा उत्तम गीतगायक आहे. आपल्या गीतगायनाच्या यशात कवी, संगीत-दिग्दर्शक, गुरुजन त्यांचा वाटा तो फार महत्त्वाचा मानतो. यशाचं संपूर्ण धनीपण स्वत:कडं घेतलं नाही. आपल्याला चांगले कवी व त्यांच्या चांगल्या कविता मिळाल्या, त्यांना चाली लावणारे प्रतिभावान संगीत-दिग्दर्शक मिळाले, महावीरजींसारख्या या हृदयातून त्या हृदयात नेणारा असामान्य प्रतिभेचा गुरू मिळाला, हे त्यानं आपलं भाग्य मानलं. त्याच्या कहाणीतलं मोठेपण त्याच्या या विनम्र व कृतज्ञ भावनेत आहे. होतकरू कलावंतांचा उत्साह वाढवणारी अशी ही कथा आहे. अरुणची ही जीवनावरची मधुराभक्ती श्रोत्यांना आनंद देऊन गेलेली आहे. आजही जात नाही. भावी काळात लाभणाºया या पुस्तकाच्या वाचकांंचीही त्याला अशीच दाद मिळेल, याची मला खात्री आहे.

- पु.ल. देशपांडे

साभार-
पुस्तक : शतदा प्रेम करावे
लेखक : अरुण दाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस
लोकमत ७ मे २०१८

Friday, March 9, 2018

व्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे

सारांष - पु. ल. देशपांडे (जन्म 8 नोव्हेंबर, 1919 आणि मृत्यु 12 जून, 2000) ह्यांनी व्यक्तिचित्रणे, प्रवास वर्णने, नाटक, विडंबन इत्यादी विविध वाड्.मय प्रकार हाताळलेले आहेत वाड्.मयाच्या विविध अशा क्षेत्रात सहजपणे संचार करून पु. ल. देशपांडेनी उल्लेखनीय वाड्.मयनिर्मिती केलेली आहे. त्यांना सन 1966 साली ’पद्मश्री’ आणि सन ’1990’ साली ’पद्मभुषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. सन 1974 साली इचलकरंजी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पु. ल. च्या ‘नसती उठाठेव’ (1952), ’बटाट्यााची चाळ’ (1958), ‘गोळाबेरीज’ (1960) या संग्रहातील विनोदी लेखनामुळे, ‘व्यक्ति अणि वल्ली’ (1962) या व्यक्तिचित्रांमुळे आणि ‘अपूर्वाई’ (1960) व ‘पूर्वरंग’ (1963) या त्यांच्या
प्रवासवर्णनामुळे मराठी माणसांच्या अनेक पिढ्यांच्या मनात घर केलेले आहे.

प्रास्ताविक- ‘व्यक्ति आणि वल्ली’ हे पु. ल. देशपांड्यांचे अतिशय गाजलेले व्यक्तिचित्रसंग्रहाचे पुस्तक आहे. या पुस्तकाला सन 1965 साली साहित्य अकादमीचा सन्माननीय पुरस्कारही लाभलेला आहे. ‘व्यक्ति आणि वल्ली’ (1962) हा त्यांचा ललित व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजमितीस मराठी साहित्यामध्ये प्रकाशित झालेल्या व्यक्तिचित्रात्मक संग्रहापेक्षा हा संग्रह सर्वस्वी आगळा-वेगळा आणि गुणवत्तेच्या दृष्टीनेही सरस असा आहे. या पुस्तकात एकूण 20 लेख समाविष्ट आहेत. सन 1943 साली ‘अभिरुची’ मधून पु. ल. देशपांडे या नावाने आण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रकाशित झाले. त्यानंतरच्या अशा 18 व्यक्तिचित्रांची पहिली आवृत्ती सन 1962 साली प्रसिद्ध झाली. पाचव्या आवृत्तीत ‘तो’ आणि ‘हंड्रेडपर्सेंट पेस्तनकाका’ या दोन व्यक्तिचित्रांचा समावेश होऊन या संग्रहाच्या आजमितीस तेहतीस आवृत्या निघालेल्या आहेत.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि वल्ली’ या संग्रहात काल्पनिक व्यक्तिचित्रांचे नमुन आढळतात. ही व्यक्तिचित्रे काल्पनिक असली तरी रोजच्या जीवनात थोड्याफार फरकाने कुठे ना कुठे तरी भेटणारी आहेत. चितळे मास्तर, अंतू बर्वा, नारायण इत्यादी व्यक्तिरेखा अस्तंगत होत चाललेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. आणि माणूसपण जपणारी, मूल्यांची बुज राखणारी, ध्येयापोटी मायेपोटी निःस्वार्थपणे राबणारी, प्रतिकुल परिस्थितीतही जगण्याचा आनंद घेणारी, कलेवर वाड्.मयावर भाबडे प्रेम करणारी, चालती - बोलती जिवंत माणसे विविध मानवी प्रवृत्तीचें नमुनेच आहेत. यातील व्यक्तिरेखा विलक्षण समरसतेने रेखाटल्या गेल्या आहेत. त्यात कल्पित आणि वास्तव यांचा मेळ घालून साधलेली नवनिर्मिती लालित्यपूर्ण आहे. या व्यक्तिचित्रसंग्रहातील कल्पकता, भावपूर्णता आणि सांस्कृतिक संदर्भसंपन्नता या बाबीही महत्त्वपूर्ण आहे. पु. ल. देशपांड्यांचे नाट्यपूर्ण निवेदन, खुमासदार, गहिर्‍या रंगाचा विनोद आणि बहुढंगी शैली यामुळे या व्यक्तिचित्रांची अमिट छाप महाराष्ट्रीय रसिकांवर उमटलेली आहे.

‘नारायण’ हा पु. ल. देशपांडे यांचा व्यक्तिचित्रात्मक पहिला लेख आहे. सार्वजनिक कार्यात निःस्वार्थपणे सहकार्य करणार्‍या, लग्नकार्यात हजार अवधाने सांभाळणारा आणि लग्नाच्या खरेदीपासून ते वरातीपर्यंत बिनचुक काम करीत रहाणारा नारायण, त्याच्या अनेक लकबींसह पु. ल.देशपांडे यांनी चित्रित केलेला आहे. सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणी बोलावो अथवा न बोलावो, धावत जाऊन पडेल ते काम करावे अशी इच्छा बाळगणार्‍या नारायणाचे शब्दचित्र पु. ल. नी अतिशय जिव्हाळ्याने रेखाटलेले आहे. कुणाच्याही इथे मंगलकार्य निघो,साखरपुड्यापासून वरातीपर्यंत सारे काही यथासांगपणे निभावून नेण्याची जबाबदारी आपणावरच सोपविली आहे. अशा श्रद्धेने तो लग्नमंडपात वावरत असतो. ‘नारायण’ हा एक सार्वजनिक नमुना असून असा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो. ‘हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात.’ ‘मळकट धोतर - डोक्याला ब्राऊन टोपी’ अशा शब्दांत नारायणाचे बाह्यरूप लेखकांने रेखाटलेले आहे. अशी ही नारायणाची भाबडी, कष्टाळू, सरळ मनाची व्यक्तिरेखा उभी करून पु. लं. नी व्यक्तिचित्रणाचा उत्कृष्ट नमुना वाचकांसमोर ठेवला आहे.

‘हरितात्या’ ही या व्यक्तिचित्रसंग्रहातील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. इतिहासाशी संपूर्णतः समरस झालेल्या आणि मनाने सदैव भुतकाळत वावरणार्‍या शिवबा, रामदास, जनकोजी शिंदे, शेलारमामा, तानाजी यांच्या गोष्टी लहान मुलांना सांगून त्यांचे आदर्श कोवळ्या मनावर ठसविणार्‍याएका ध्येयवेड्याा म्हातार्‍यांचे हे शब्दचित्र आहे. काही नाटककारांनी अथवा साहित्यिकांनी इतिहासकारांना अन् इतिहास संशोधकांना अर्धवटांच्या कोटीत ढकलून त्यांची निष्ठा हास्यास्पद करून सोडण्याचा आणि आपल्या उथळ विनोदबुद्धीचे प्रदर्शन करण्याचा बालीश प्रयत्न केलेला आहे. तसला मोह हरितात्यांचे वर्णन करताना पु. ल. नी होऊ दिलेला नाही. ‘नामू परीट’ ही अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी लाभलेली व्यक्तिरेखा आहे. दुसर्‍यांचे कपडे धुवायला आणल्यावर स्वतःच काही दिवस ते कपडे वापरण्यात त्याला काहीच दिक्कत वाटत नाही. चोरीची सायकल खरेदी केल्याचे सांगताना तो अजिबात कचरत नाही. अमुक ठिकाणच्या हातभट्टीची आपणही झोकत असतो. हे राजरोसपणे कबुल करताना त्याच्या चर्येवर शरमिंधेपणाचा भाव उमटत नाही. असा हा निःसंग, बेडर मनाचा नामू परीट वाचकांसमोर उभा करताना पुलं.नी त्याच्या व्यक्तित्वाचे काही विलोभनीय विशेषही जिव्हाळ्याने टिपलेले आहेत. ”सदैव कपड्याांच्या जगात वावरणारा इतका नागवा माणूस माझ्या पाहण्यात नाही.” असे नामूबद्दलचे आपले मत जाहीर करता करताच ते त्याच्यातल्या माणुसकीचे कणही कौशल्याने टिपतात. ‘बबडू’ ची व्यक्तिरेखाही जवळपास याच जातीची आहे. नामू परिटचा स्वभाव इरसाल खरा पण त्याचा धंदा शहाजोगपणाचा आहे. परंतु ‘बबडु’ च्या मनाची ठेवण जशी बेछूट तसा त्याचा धंदाही फटिंगपणाला साजेसाच आहे. खिसेकापण्याच्या अन् हातभट्टीच्या धंद्यावर गबर होण्यात त्याला कसलीच तमा वाटत नाही. पण काळ्याकभिन्न कातळातही कुठेतरी ओलावा पाझरत असावा तसा त्याच्या वृत्तीत चांगुलपणाचा बारीक पाझर झिरपत असतो.

‘सखाराम गटणे’ म्हणजे नामू परीट किंवा बबडू बत्तीवाला याच्या अगदी उलट टोकाला गेलेली व्यक्तिरेखा आहे. वयाची तिशी न ओलांडलेला हा पोरसवदा तरुण कमालीचा पापभीरू विनयशील आणि  आज्ञाधारकवृत्तीचा असतो. थोरा-मोठ्याांचे अनुकरण करण्याचा आणि त्यांचा उपदेश शिरोधार्य मानण्याचा त्याला एकमेव आवडता छंद असतो. जन्मभर अविवाहित राहण्याच्या आपल्या प्रतिज्ञेच्या आड आपले वडिल येत आहेत हे पाहून सखारामने लेखकाच्या मध्यस्थीने त्यांचे मन वळवून पहाण्याचा विचार केला. परंतु साक्षीदाराने आयत्या वेळी विरुद्ध बाजुचीच कड घेतलेली पाहून वादीची जशी अवस्था होते. तसाच काही अनुभव सखारामलाही येतो. वडिलांची प्रबळ इच्छा म्हणून म्हणा अथवा नियतीचा तसा संकेत होता म्हणून म्हणा, गटणेचे पाय जमिनीला लागले. तो माणसात येऊन त्याच्या डोळ्यांवरली अवास्तव ध्येयवादाची नशा खाडकन उतरून चार-चौघांनसारखा बोलू-चालू लागतो. सखाराम गटणे मार्गी लागल्याचे लेखकालाही समाधान झालेले असते.

‘नंदा प्रधान’ ही व्यक्तिरेखा प्रस्तुत संग्रहातल्या सर्व व्यक्तिरेखांपेक्षा सर्वस्वी अगदी भिन्न आहे. ही व्यक्तिरेखा वाचताना कोणताही संवेदनशील वाचक डोळ्यात साठलेले अश्रू पुसल्याशिवाय पुढे वाचूच शकत नाही. ‘नंदा प्रधान’ च्या आयुष्यातील काही हळूवार क्षण पु. लं. नी तितक्याच हलक्या हाताने आणि कमालीच्या कलात्मक संयमाने चित्रित केलेले आहेत. ‘बोलट’ या लेखात एका दुर्देवी नटाची शोकांतिका पु. ल. नी रेखाटलेली आहे सहृदयता आणि उपरोध यांच्या मनोहर मिलापामुळे सदर शोकांतिका विशेष वाचनीय बनलेली आहे. जुन्या काळातील अनेक महत्त्वकांक्षी नटांचा प्रतिनिधी वाटावा असा हा जनार्दन नारो शिंगणापूर पु. लं. नी मोठ्या कौशल्याने आपणापुढे उभा केलेला आहे. जुन्या काळातील नटांचा भाबडेपणा, अशिक्षितपणा, व्यसनाधिनता, रंगेलवृत्ती वगैरे सार्‍या गुणावगुणांचे यथार्थ दर्शन नारोच्या रूपाने आपणाला घडत रहाते. हे दर्शन घडविताना लेखकाने उपहास-उपरोधाच्या अनेक छटा वापरून त्याची वेधकता वाढविलेली आहे. ‘भय्या नागपूरकर’ याचा तोंडवळा ’तुज आहे तुज पाशी’ मधल्या थेट काकाजींच्या चेहÚयाशी मिळता जुळता आहे. दारूच्या नशेत आकंठ बुडूनही तो माणुसकीला पारखा झालेला नसतो. त्याच्या कपाटात दारूच्या बाटल्या आणि रेसची पुस्तकेही असतात. त्याच्या घरात गांधीजींचा छोटासा पुतळा आणि नेहरूंचे ग्रंथही असतात.

‘नाथा कामत’ हे प्रणयाने पेटलेल्या आणि धुंद झालेल्या एका कलंदर युवकाचे व्यक्तिचित्र आहे. त्याला सुंदर-सुंदर पोरींच्या प्रेमात पडण्याची सवय जडलेली आहे. लावण्यवतींच्या मादक कटाक्षानी विरुद्ध होण्यासाठीच जणु विधात्याने त्याला ‘हृदय’ नावाची वस्तू बहाल केलेली आहे. नाथा कामताचे समस्त स्त्री वर्गाविषयीचे आकर्षण पण लंपटतेचा संपूर्ण अभाव ही मानवी मनाची विसंगती पु. ल. नी अचूकपणे टिपलेली आहे पार्ल्यातल्या एकुण एक कुमारिकेचे नाव अन् घर नंबर तोंडपाठ असलेला, त्यांच्या सौंदर्याचा तपशिल बिनचुकपणे वर्णन करून सांगणारा हा नाथा कामात अनेक पोरींच्या प्रेमात पडला आणि पुनः पुन्हा सावरलेला आहेप्रेमभंगानंतर नाथा कामत एके दिवशी अचानकपणे बोहल्यावर चढून मार्गी लागतो. प्रणयाच्या पार्श्वभूमीवर ही व्यक्तिरेखा रेखाटताना पु.ल. नी प्रणयातील विशुद्धदृष्टी त्याला बहाल केलेली आहे. ‘दोन वस्ताद’ या लेखात पुलं. नी तबलजी आणि पहिलवान या दोघांच्या गताआयुष्यातील दोन अविस्मरणीय घटना त्यांच्या तोंडून वदवता - वदवता सध्या ते जगत असलेल्या हलाखीच्या जीवनाचे चित्र रेखाटलेले आहे. पु. लं. नी दोन भिन्न क्षेत्रांतल्या पुरुषसिंहाविषयी वाचकाच्या मनात आदराबरोबरच असीम करुणाही उत्पन्न केलेली आहे

गजा खोत, अण्णा वडगावकर, परोपकारी गंपू, चितळे मास्तर, लखू रिसबूड, बापू काने, तो, अंन्तू बर्वा,हंड्रेरडपर्सेंट पेस्तनकाका ही या व्यक्तिचित्रसंग्रहातील व्यक्तीचित्रेही आपापल्या परीने वैशिष्ट्यापूर्ण ठरलेली आहेत. यातील कोणी सरळ स्वभावामुळे, कोणी भाबडेपणाने, कुणी परोपकारी वृत्तीमुळे तर कुणी इरसाळ खवचटपणामुळे वाचकांच्या मनात सदैव अधिराज्य गाजवतात. ’अन्तू बर्वा’ म्हणजे कोकणच्या मायाळूपणाचा आणि इरसालपणाचा पुरेपुर अर्क उतरलेली व्यक्ती याचा चरितार्थ कोकणच्या वयस्कांप्रमाणेच मनिऑर्डरवरच चालतो. अन्तू बर्व्याची भाषा ही अतिशय वेगळी, कायम तिरकस जाणारी आणि मिष्किलपणे भरलेली आहे. साधेचहात दूध कमी आहे हे सुद्धा हा माणूस सरळ न सांगता ‘रत्नार्गीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभन काय रे झंप्या’ असे म्हणून तो फुकटचा चहा ढोसत असतो. ‘अण्णू गोंगट्याा होणे’, ’तर्जनी नाशिका न्याय’, ’बीबीसीआय’ ला आय.पी.चा डबा जोडणे हे अंतू बर्व्याचे काही वाक्यप्रचार खूपच प्रसिद्ध आहेत. या अंतू बर्व्याची ही दीनवाणी पण मिष्किलमूर्ती अंतःर्बाह्य आणि सुखद आणि चित्रमय पद्धतीने पु. ल. नी विलक्षण प्रत्ययकारीपणे रेखाटलेली आहे कोणत्याही विषयावर आपल्या मताची पिंक टाकल्याशिवाय या माणसाला स्वस्थ बसवत नाही. ‘चितळे मास्तर’ या लेखात या व्यक्तिरेखेच्या निमिताने त्या क्षेत्रातील बारकावे नेमकेपणाने लेखकांनी टिपलेले आहेत.

‘लखू रिसबूड’ हा लेख तर ’पुरुषराज अळूरपांडे’ शैलीचाच अस्सल नमुना आहे. बुद्धिजीवी
म्हणविणार्‍या वर्गाचा साहित्यात क्रांती करून सोडण्याची ऊठसुट प्रतिज्ञा करणाÚया अहमन्य, अप्रामाणिक ,वाचीवीरांचा प्रातिनिधिक नमुना म्हणून करतात. नामू परीट ‘वाईट होणे’ या अर्थी ‘फॉग होणे’ असा शब्दप्रयोग करतो. अंतू बर्वा याचा ‘पडणे’ या अर्थीचा नवा वाक्प्रचार आहे. - ‘‘अण्णू गोगट्या होणे केवळ शब्दप्रयोगच नव्हे तर प्रत्येकाच्या बोलण्याच्या शैलीचे वैशिष्ट्यही यात लक्षात घेतलेले आहे. परोपकारी गंपू कायम प्रश्नालंकारयुक्त शैलीत बोलतो. बापू काणे प्रत्येक गायिकेचा ‘इन’ प्रत्ययान्त उल्लेख करतो. नामू परीट व नंदा प्रधान यांची संभाषणशैली तुटक आहे.

‘व्यक्ति आणि वल्ली’ मध्ये प्रचलित वाक्प्रचारांचा वापरही मुबलक प्रमाणात नि तरीही सहजपणे झालेला आढळतो. व्यक्तिरेखांच्या दैनंदिन जीवनातील भाषेशी जवळिक साधलेली आहे. पु. ल. यांच्या लेखनात भाषेचे तल्लख असे भान जागोजाग पहावयास मिळते. त्यामध्ये कोट्या, शब्दनिष्ठ विनोद, विरुद्ध अर्थी शब्दांचा खुबीदार वापर यांना अर्थातच अग्रक्रम मिळालेला आहे. यातील अनेक व्यक्तिरेखा साहित्य नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलाक्षेत्रांशी संबंधित आहे. बापू काणे ही सामाजिक संस्थांमध्ये वावर असलेली व्यक्ती आहे. तत्कालीन सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनाचे सांस्कृतिक अंगाने केलेले चित्रणही त्यात समाविष्ट आहे.

पु.लं. च्या ’व्यक्ति आणि वल्ली’ ची सर्व समावेशकता आणि त्रिकालाबाधिता ही नजरेत भरणारी दोन वैशिष्ट्ये आहेत. या संग्रहाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती वा क्षेत्राचे, भोवतालच्या परिस्थितीचे पुलं.नी केलेली अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि चित्रण हे आहे. या संग्रहाच्या नावाप्रमाणेच यातील प्रत्येक व्यक्तींमध्ये एक एक वल्ली दडलेली आहे. यातील बहुतेक व्यक्तिचित्रे हे प्रातिनिधिक स्वरूपाचे नमुने सादर करतात. व्यक्तिचित्र लेखनातील आत्यंतिक सहजता हे या संग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये कृत्रिमता अथवा ओढाताण यांचा लवलेश अजिबात सापडत नाही. वातावरण, काळ वेळ, यानुसार बदलणारी व अत्यंत परिणाम साधणारी भाषा ही ‘व्यक्ति आणि वल्ली’ ने दिलेला मराठी वाड्.मयाचा एक अलंकार आहे असे म्हटल्यास अतिश्योक्ती होणार नाही. या व्यक्तिचित्रणात पु. लं. च्या विनोदबुद्धीचा प्रत्यय तर जागोजाग येतोच पण त्याचबरोबर वर्ण्य व्यक्तीकडे पाहण्याचा त्यांचा जिव्हाळ््याचा दृष्टिकोन, मानवी स्वभावातील विविधता अन् वैचित्र यांचे दर्शन घडविणारी त्यांची सुक्ष्म निरीक्षण शक्ती, वर्णनशैलीतील मार्मिकता वगैरे गुणांचाही प्रत्यय येतच राहतो. सर्वच व्यक्तिचित्रे ही नितांत सुंदर आणि वाचनीय बनलेली आहेत. पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात कोणता पदार्थ चांगला आहे हे सांगणे जसे कठीण आहे तशीच स्थिती इथेही झालेली आहे. व्यक्ती साक्षात साकार करण्याचे सर्व गुणधर्म समाविष्ट असणाÚया व्यक्तिचित्रणामधून भावनेचा ओलावा, अंतर्यामीचा जिव्हाळा आणि कारूण्याची झालर यांचा जो संगम ’व्यक्ति आणि वल्ली’ मध्ये पहावयास मिळतो. तो केवळ अभुतपूर्व आहे. समतोल लेखनपद्धतीमुळे ही सर्वच व्यक्तिचित्रे सरस ठरलेली आहेत.

‘ते चौकोनी कुटुंब’ मधील संसाराला छापील ग्रंथांची अवकळा आणू पहाणारे मालतीबाई-माधवराव हे दांपत्यही वाचकांच्या मनोरंजनाचा विषय बनतात. नारायण, हरितात्या, अंन्तू बर्वा, चितळे मास्तर, बापू काणे, परोपकारी गंपू या सर्व व्यक्तिरेखा त्या काळच्या कनिष्ठ मध्यमवर्गियांतील आहेत. पण तरीही त्यांचे भाषेचे वळण वेगवेगळे राखण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. अंतू बर्वा आपल्या बोलण्यात प्रादेशिक असा सानुनासिक कोंकणी ढंग आणि स्वभावभूत तिरकसपणाचा ढंग कायम राखतो. एकप्रकारे खास वल्लीपणा आणि आनुषंगिकरीत्या आलेला प्रादेशिकपणा यांची सांगड घातली जाते. उदाहरणार्थ- ”परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजग!” (पृ.222) अशी ‘फुरशासारखी गिरकी’ घेऊन येणारी त्याची भाषा खास त्याची आहे. परोपकारी गंपू, प्रा. अण्णा वडगावकर, भैय्या नागपूरकर, ज्योतिबा वस्ताद या व्यक्तिरेखांचा निमित्ताने लेखकाने तर्‍हे तर्‍हेच्या भाषिक वैशिष्ट्याांचे बारकाईने चित्रण केलेले आहे. या सर्वांपेक्षाही अगदी वेगळी सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तिरेखा आपापल्या भाषिक अवकाशासह साकारतात. सिनेव्यवसायात वावरल्यामुळे इंग्रजी शब्द वापरण्याची सवय जडलेला हा नामू ’पिच्चर’ ’ड्वायलाक’ असे उच्चार करून इंग्रजी शब्द पार ग्रामीण ठशाचे करून टाकतो. त्याची ‘न’ चा ‘ण’ आणि ‘ण’ चा ‘न’ (उदाहरणार्थ - ‘मॅणिजर,’ ‘अन्नासाहेब’) करण्याची लकब त्याच्या बोलीचा ठसका दाखवून देतात. बबडू ही तर एक प्रकारे अधःस्तरातील - गुन्हेगारी वर्तुळातील व्यक्तिरेखा आहे. त्याच्या भाषेचा वेगळा बाजही लेखकाने चांगला पकडला आहे. उदाहरणार्थ-”कोर्टात बुराक पाडायचे पैशे आपले-वर मह्यन्याच्या एका तारखेला पगार-साली चाळीस पोर पोसत होती.” (पृ.214) लेखकाच्या भाषेत एकप्रकारचा भरघोसपणा आहे.
या व्यक्तिरेखा साकारताना लेखक कथनशैली एकच वापरत नाही. त्यात तृतीयपुरुषी निवेदनापेक्षा संवादाला अधिक स्थान मिळालेले आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्रांमध्ये कथात्मता आणि नाट्यात्मताही आलेली आहे केवळ ‘संवाद’ तंत्र वापरून येथे नाट्यात्मता आलेली नाही. तर एकाच सुरात दोन वेगवेगळ्या पातळ्यांचे चित्रण करणारी शैली योजल्यामुळेही नाट्य निर्माण झाले आहे. उदाहरणार्थ - नामू, कपडे बाजूला ठेव, लॅबोरेटरीतला गणपत तो - यक डोळा काचेचा असल्यला, पायजम्याला नाडी नाही, बघून घ्या. (पृ.38) पु. लं. यांच्या भाषेतील नाट्याात्मता त्यातील ’उच्चारनिष्ठते’ मुळेही निर्माण झालेली आहे. पु. लं. हे विशिष्ट व्यक्तीच्या तोंडचे उद्गार अचूक टिपून एकप्रकारे त्या शब्दांना वाचिक अभिनयाचे मूल्य जोडून देतात पु.लं.च्या ’व्यक्ति आणि वल्ली’ या व्यक्तिचित्र संग्रहामुळे साहित्याच्या कक्षा निश्चितच विस्तारतेल्या आहेत

लेखक - प्रा. गणपत हराळे
साहाय्यक प्राध्यापक,
गणपतराव आरवाडे वाणिज्य महाविद्यालय, सांगली.