Monday, November 22, 2010

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र

पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.

त्याचंच हे उत्तर -


१० जुलै १९५७,
प्रिय चंदू


रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का?

वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.

तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.

पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?

तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.

तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.

तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.

तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.

तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

.

कळावे,

.

भाई.
---
मुळ स्त्रोत -- http://singletab.com/?p=1068

Friday, November 19, 2010

आमचा सुसंस्कृत मित्र - डॉ. लता काटदरे

स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र आम्हाला लाभला. स्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्या मैत्रीची याद तीव्र होतेय...

आता साठीच्या उंबरठ्यावरून माझ्या गतायुष्याकडे पाहू जाते तेव्हा वाटतं, देवाने अनेक गोष्टींबाबत माझ्या पदरात अवास्तव झुकतं माप टाकलंय. आयुष्यात मला अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या हे त्यातलंच एक. कुणालाही हेवा वाटावा अशी ही आमची मित्रसंपदा. या सार्‍यांनी इथवर निरलसपणे सोबत केली. माझ्यावर खूप प्रेम केलं आणि वेळोवेळी माझं वाजवीपेक्षा कांकणभर जास्तच कौतुकही केलं. अशा या गोतावळ्यात स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं आमच्यातलं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र या वाटचालीत आमच्या सोबतीला होता, त्याचं नाव होतं पु. ल. देशपांडे.

पुलंच्या साठीनिमित्त अगोदरच्याच रविवारी सर्व मराठी वृत्तपत्रांनी भरभरून पुरवण्या पुलंचं अभीष्टचिंतन करण्यासाठी काढल्या होत्या. सकाळी उठून त्या वाचल्यावर वाटलं, या पुलंना जाऊन प्रत्यक्ष भेटावंच आता. लगेचच सलील घोषला उतावळेपणानं फोन करून सांगितलं, तर तो म्हणाला, ‘चला आताच जाऊ.‘ वेड्यासारखे आम्ही दोघं (मी व माझे पती), सलील आणि त्याची पत्नी शार्लट असे निघोला आणि भर दुपारी पुलंच्या घरी जाऊन थडकलो. पुल आणि सुनीताबाईंनी प्रेमानं आमचं आगतस्वागत केलं. मग दुपारभर सलील हुकूम सोडत होता आणि पुल ते ते करत होते. सलील म्हणाला, या दोघांबरोबर तुमचा फोटो काढतो. लगेच पुलंनी आमच्यासोबत फोटो काढू दिला. त्यानंतर सलील म्हणाला, ‘ही दोघं तुझी चाहतेमंडळी आहेत. त्यांनी तुझं सारं लेखन वाचलंय. तर त्यांना आता नवीन काही वाचून दाखव.‘ रविवार दुपारच्या भरपेट जेवणानंतरचा वामकुक्षीचा अधिकार आपल्याच घरात आगंतुकपणे येऊन आपल्याला नाकारणार्‍या या मित्रावर न रागावता, उलट त्याचा मान राखत पुलंनी शेजारच्या टेबलावरचा मौजेचा दिवाळी अंक उचलला आणि त्यातला बेगम अख्तरवरचा ताजा, ताजा लांबलचक लेख अगदी आनंदानं खास पुलशैलीत आम्हाला वाचून दाखवला. पुलंशी झालेल्या या पहिल्याच भेटीत पुल आणि सलीलमधल्या मैत्रीचं दर्शन आणि ते मैत्र जपणार्‍या पुलंचं एक देखणं सुसंस्कृतपण मला अगदी दिपवून गेलं.

घरी परतल्यावर मी पुलंना पत्र लिहिलं, ‘इतकी वर्षं माझ्या मनात आदरापोटी मी बहाल केलेल्या एका उच्चासनावर तुम्ही विराजमान झालेले होतात. पण प्रत्यक्ष भेटीत मात्र तुमच्यातला मित्रच मला खूप भावला. तुमच्याशी मैत्री जुळावी असं खूप वाटतंय, पण त्याच वेळी तुमच्या आणि आम्हा दोघांच्या बुद्धीतलं अंतर ठाऊक असल्याने ते अशक्य आहे, हेही ध्यानात येतंय.‘ या पत्राला अगदी उलटटपाली उत्तर आलं की, ‘मी वयानं जरी खूप वडीलधारा असलो, तरी या बाबतीत मी रवींद्रनाथांसारखंच म्हणेन की, मी सर्वांच्याच समवयस्क आहे, मग माझ्या केसांनी कितीही रूपेरीपणा का धारण केलेला असेना. आता बुद्धीबद्दल म्हणायचं तर बुद्धी ही सापेक्ष गोष्ट आहे. तुम्हाला वैद्यकात असलेली बुद्धी माझ्यापाशी कुठं आहे?‘
स्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला हा मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच.

वास्तविक तो काळ आमच्या कौटुंबिक जीवनात कसोटीचाच होता. अचानक आम्हा दोघांच्या तब्येती पार ढासळल्या होत्या. ज्या आप्तेष्टांवर आजवर तनमनधनाची पर्वा न करता प्रेम केलं होतं, त्यांनी सोयिस्करपणे काढता पाय घेतला होता. मुलं वाढवताना तेव्हा आम्हाला एक विचित्र एकाकीपण जाणवत होतं. त्याबाबतीत काहीच आम्ही कधी शब्दात पुलंना सांगितलं नव्हतं. पण त्यांच्यातला स्नेही हे सारं जणू ओळखूनच वागत राहिला. माझ्या पत्रांना प्रेमानं उत्तर पाठवत राहिला. पुण्याहून येताना दरवेळी सुनीताबाई कॅम्पातले खोबर्‍याचे मशरूम्स माझ्या लेकीसाठी हमखास आणायच्या, तशी उस्तवारी पुलंनी कधी केली नाही. कदाचित सुनीताबाई ते सारं तितक्याच मायेने आणि अगत्याने करत असल्याने पुलंना तशी तसदी घ्यावीशी वाटली नसेल. पण अशा देवाणघेवाणीपलीकडचा स्नेह ते जाणीवपूर्वक जपताना दिसायचे. मुलांना काय दाखवावं, त्यांनी काय ऐकावं, हे तर ते आम्हाला सांगतच, पण मुलांना वाढवण्यासाठी आम्हीही सतत वाढत राहाणं आवश्यक आहे, त्यासाठी आमचे छंद जोपासणं आवश्यक आहे, म्हणून आम्हालाही सतत काही ना काही ते सुचवत राहिले. आज विचार करू लागले तर वाटतं की, आज आम्ही चौघंही ज्या विविध गोष्टीत रमतो, त्यातली आमची पहिली काही पावलं पुलंनी आम्हाला सोबत दिल्यानंच त्या त्या मार्गावर पडली होती.

एकदा आम्ही आनंदवनात गेलो असताना विकासने बाबांना पुलंनी पाठवलेल्या पत्रांची फाईल दाखविली. ती पाहिल्यावर माझ्या जेमतेम पहिलीतल्या लेकाने पुलंना पत्र पाठवण्याचा सपाटा लावला. त्यातल्या प्रत्येक पत्राला उलटटपाली त्याच्या वयाला साजेल, समजेल अशा भाषेत उत्तरं येत गेलेली पाहून मी अगदी संकोचून गेले. पुलंना फोन केला आणि म्हटलं, ‘हा त्याचा एक पोरखेळ आहे, त्यासाठी तुम्ही एवढी तसदी नका घेऊ.‘ त्यावर ते म्हणाले, ‘अगं लहान मूल असं काही जेव्हा करत राहातं नं, तेव्हा त्याला मनातूनच ते करावंसं वाटत असतं म्हणून. मग त्याला तसाच प्रतिसाद देण्यात मोठ्यांना त्रास कसा वाटेल?‘ मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलांची कोवळी मनं जपली पाहिजेत, वगैरे भाषणबाजी आपण नेहमी ऐकतो, पण प्रत्यक्षात त्या मुलांशी प्रेमानं वागताना स्वतः तोशीस घेणारे किती जण असतात?
पुढे मुलं मोठी होतानाच पु.ल. एन.सी.पी.ए.त डायरेक्टर म्हणून आले. तिथं खरं तर डायरेक्टरसाठी खास बंगला आहे. पण तो नाकारून एन.सी.पी.ए.च्या गेस्ट हाऊसमध्येच ते राहायचे. सपाटून काम करायचे. त्यांचा समवयस्क मित्रपरिवारही मुंबईत भरपूर होता. पण तरीही आवर्जून ते आमच्यासाठी आणि विशेषतः मुलांसाठी वेळ काढत राहायचे. मुलांनी एन.सी.पी.ए.त होणारा केलूचरण महापात्रांच्या नृत्याचा कार्यक्रम पाहावा, मार्सेल मार्सेचा मुखवटे आणि चेहर्‍यांचा मूक प्रयोग पाहावा, म्हणून व्यवस्था करत राहिले. जे कार्यक्रम तिकिटं लावून केले जात, त्या कार्यक्रमांचे फुकट पास न घेता स्वखर्चानं आमची तिकिटं ते आठवणीनं काढून ठेवायचे. मुलांसमवेत आम्हाला एका तमाशा परिषदेच्या कार्यक्रमाला घेऊन गेल्यावर यमुनाबाई वाईकरांसारख्या कलावंताच्या कर्तृत्वाची ओळख मुलांना शेजारी बसवून कार्यक्रमभर ते करून देत होते.

तळागाळातून जाग येत गेलेल्या नवोदित कवी-लेखकांबद्दल त्यांना खूप कौतुक वाटायचं. त्यांच्याबद्दलची आपुलकी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून प्रत्ययाला यायची. एकदा सकाळी त्यांच्या घरी गेलो असता ते म्हणाले, ‘‘बरं झालं, आता यायचं केलंत ते. टीव्हीवर आता महानोरांच्या कवितांचा कार्यक्रम आहे. महानोर पळसखेडचे शेतकरी आहेत. पण फार छान कविता लिहितात.‘‘ त्यावर अवघडून आम्ही म्हणालो, ‘‘आम्ही थोड्या वेळानं येऊ. मुलं काही तुम्हाला नीटपणे कार्यक्रम पाहू देणार नाहीत.‘‘ त्यावर पु.ल. म्हणाले, ‘‘मुलांना आवडणार गं कार्यक्रम. मुलं आपल्यासारखी थोडीच शांतपणे पाहणार कार्यक्रम!‘‘ आम्ही निरुत्तर होऊन कार्यक्रम पाहायला बसलो. कार्यक्रमभर माझा मुलगा सोफ्यावर निजून दोन्ही पाय सोफ्याच्या पाठीवर टाकून उलटा पडून कार्यक्रम पाहत होता, पण पुलंनी त्याबाबत आम्हाला अवघड वाटू दिलं नाही. मुलांचं वेडं बालपण त्यांनी सहज स्वीकारलं होतं.

आमची मुलं नेहमी ‘सुनीताबाईंकडे जाऊ‘ असंच म्हणायची. सुनीताबाई त्यांना खरवस, द्राक्षं, सोललेले डाळिंबाचे दाणे आयतेच देत, त्यामुळे त्यांना सुनीताबाईंचं प्रेम समजायचं. त्या त्यांना खूप आवडायच्या. त्या तुलनेत पुलंचं मोठेपण न जाणवल्यानं मुलं पुलंशी फारशी बोलत नसत. पुलंच्या ते ध्यानात येत नसे असे नाही, पण त्यांनी कधीही मुलांना आपला मोठेपणा पटवून द्यायचा प्रयत्न केला नाही. उलट तुम्हीच मोठ्ठे आणि खास, असंच मुलांना वागवत ते वावरायचे. एकदा जेवण झाल्यावर ते म्हणाले, ‘चला, आता मी तुमचा सगळ्यांचा फोटो काढतो.‘ मग सोफ्यावर सुनीताबाई, आम्ही दोघं आणि मुलं असे सारे दाटीवाटीनं बसलो आणि पुलंची फोटोग्राफी सुरू झाली. पुढच्या दीड-दोन मिनिटांत त्यांनी अशी काही धांदल केली, की वाटावं हा कॅमेरा फार गुंतागुंतीचा असावा आणि ते बहुधा तो प्रथमच हाताळत असावेत. फोटो झाल्यावर आम्ही म्हटलं, ‘काय पण मज्जा आली नाही?‘ त्यावर पुलं म्हणाले, ‘हा कॅमेरा इतका ऑटोमॅटिक आहे की फोटो काढणार्‍याला काहीही कौशल्य अंगी असण्याची गरज नाही. एवढंच कशाला वर आणखी फोटोवर तो काढल्याची तारीखदेखील तोच टाकतो. माझी आपली मुलांसाठी ही थोडी गंमत.‘ असं म्हणणार्‍या पुलंनी प्रत्यक्ष फोटो आल्यावर मात्र प्रत्येक फोटोमागे आमची नावं लिहून खाली लिहिलं, फोटोग्राफर- आणि पुढे पु. लं. देशपांडे अशी लपेटदार सहीदेखील केली. अलीकडे एकदा तो फोटो पाहताना मुलांना ती थट्टामस्करी आठवली आणि माझी लेक म्हणाली, ‘‘पुल भलतेच ग्रेट! तेच करू जाणेत असली थट्टा!‘‘ बालपणातल्या आठवणीतल्या त्या पोरखेळामागलं पुलंचं असं हे वेगळेच मोठेपण मुलांपुढे कालांतरानं हळूहळू उलगडत गेलं.

सारं काही आलबेल असताना एक मान्यवर व्यक्ती म्हणून समाजात वागता, वावरताना बहुतेक सारे अगदी काटेकोरपणे अपेक्षित शिष्टाचार पाळताना दिसतात. पण व्यक्तिगत जीवनात नियतीनं पदरात टाकलेल्या एखाद्या थोट्याशा विपरीत दानाचा स्वीकार करतानाही त्यांचा तो मुखवटा अलगदपणे गळून पडताना दिसतो. पार्किन्सोनिझमसारखा आजार दत्त म्हणून पुढे उभा पाहिल्यावर पुल अजिबात विचलीत झालेले दिसले नाहीत. त्या आजाराची वाटचाल आणि हुकमत नुकतीच आपल्या बहिणीच्या त्या आजारात पुलंनी जवळून पाहिली होती. तोच आजार स्वतःला झालाय हे समजताच एखाद्याची घाबरगुंडी उडाली असती, चिडचिड वा उद्वेग दिसत राहिला असता, हे सारं माझ्याच वाट्याला का, असा प्रश्न उमटणंही स्वाभाविक झालं असतं. पण शेवटपर्यंत पुलंनी या आजाराचा स्वीकार त्यांना मिळालेल्या अनेक मानसन्मानांइतकाच सहजतेनं केला. ‘आलिया भोगासी असावे सादर‘ यातला ‘सादर‘ शब्दाचा अर्थ मला त्यांच्या आजारात नेमका ध्यानात आला. आजाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पुस्तकं हातात धरून वाचणं जमेना, हिंडणं- फिरणंही होईना, त्या दरम्यान एका भेटीत मी विचारलं की, मग तुम्ही वेळ कसा घालवता हो? ते म्हणाले, ‘‘गाणं ऐकतो. वॉकमनवर ऐकायला मजा येते. पण तेही जिकीरीचं वाटलं तर रेडिओ ऐकतो. अग तुला सांगतो, काल सकाळी लहान मुलांसाठी असलेला कार्यक्रम ऐकत पडलो होतो. त्यात एक गाणं लागलं. ऐकताना वाटलं हे सूर, ही चाल खूप ओळखीची आहे. म्हणून मग गाणं संपल्यावर लक्ष देऊन संगीत दिग्दर्शकाचं नाव ऐकलं, तर ती मधूची चाल होती. आपल्या मधू गोळवलकरची ग. मग मी दुपारी त्याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होतं त्यात ते गाणं पुन्हा एकदा ऐकलं. किती बरं वाटलं सांगू मधूचं गाणं ऐकून!‘‘

पुढे त्या आजारावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुलंचं अमेरिकेला जायचं ठरलं. तत्पूर्वी ते एन.सी.पी.ए.त आले होते. तिथं त्यांना भेटायला आम्ही, मंगेश पाडगावकर, श्री. पु. भागवत असे सारे गेलो होतो. एव्हाना पार्किन्सोनिझमची पकड घट्ट झालेली दिसत होती. चार पावलं सरळ चालतानाही त्यांना अवघड झालं होतं. सुनीताबाईंनी उपचारासंबंधी, त्याच्या यशापयशाबाबत सारं काही तपशीलवार सांगितल्यावर सारेच क्षणभर निमूट झाले. ते पाहून पुल लगेच म्हणाले, ‘‘मला मात्र भीती वगैरे वाटतच नाही. तुला आठवतं मंगेश? आपण आकाशवाणीच्या नोकरीत असताना आपली नोकरी जाणार अशी आवई उठली होती. तेव्हा तू म्हणाला होतास, ‘आपलं कसं रे होणार?‘ त्यावेळी मी तुला म्हटलं होतं, ‘आपल्याला बुवा कसलीच चिंता नाही. गळ्यात बाजाची पेटी अडकवून गाणी गात फिरेन आणि आमच्यापुरता आरामात कमवेन.‘ इतक्या विपरीत अवस्थेतली जीवनाबाबतची निवांतता पाहून वाटलं, ऊप जज्दऊ त्दन्‌ ैप्ग्त प त्ग्न्‌ असं रवींद्रनाथांच्या बाबतीत कुणीसं म्हटलंय, तेच पुलंबाबतही म्हणता येईल.

त्या आजारात पुढे पुढे तर दाढी करणं जमेना म्हणून ती वाढलेली दाढी, कपडे बदलणं सोपं जावं म्हणून पायजम्याऐवजी अर्धी चड्डी घातलेली, असेच ते दिवसभर घरात वावरत. अशावेळी कुणीही भेटायला आलं तरी आनंदानं ते त्याला भेटत. स्वतःचा फोटोही काढू देत. स्वतःच्या प्रतिमेची काळजी अशी त्यांना कधी वाटलीच नाही. ती माणसांच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या अंतर्यामीच्या सुसंस्कृतपणाशी निगडित असते, हे त्यांना उमगलेलं होतं.

एकदा पत्रात त्यांनी लिहिलं होतं, ‘‘खूप वर्षांपूर्वी गोपाळकृष्ण भोबेंनी तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तू या आयुष्याबद्दल काय म्हणशील असं विचारलं होतं. त्यावेळी मी सांगितलं होतं की, निघून नरजातीला रमविण्यात गेले वय, असंच मी म्हणेन. माझ्या रमवण्यामुळे जे रमले ते माझे. जे रमले नाहीत त्यांच्याविषयी मला रागलोभ नाही. ते रमले नाहीत एवढंच काय ते खरं!‘‘
जीवनाकडे असं साक्षीभावनेनं मला कधी पाहता येईल?

- डॉ. लता काटदरे
लोकसत्ता
१२ जून २००४

Friday, November 12, 2010

आठवणीतील गदिमा - पु.ल.

पुण्याला 'बालगंधर्व' थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, "स्वामी, चार ओळी हव्या आहेत ....बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी".मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,"असा बालगंधर्व आता न होणे." तेवढय़ात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते. त्या श्लोकाला चाल लावायची होती.
उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यांत माडगूळकरांचे "असे आमुचे पुणे" होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले.रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या 'नारायण श्रीपाद राजहंस' आणि 'स्वयंवरातली रुक्मिणी' अशी दोन दर्शने घडवणार्‍या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !. प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या 'रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्' ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते.
गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी....

डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते: रात्रीचे चित्रीकरण आटपून चालत आम्ही दोघे घरी येत होतो. पहाट होत होती,रस्त्यातले म्युनिसिपालटीचे दिवे मालवले.
त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उदगारले,
"विझले रत्नदीप नगरात !"
"आता जागे व्हा यदुनाथ"
गीत भावनेच्या तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतातून आढळतात.शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही. अशी शेकडो गीते त्यांनी रचली. चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या 'आर्डरी' ही विचित्र असायच्या. 'आर्डरी' हा त्यांचाच शब्द. कधीकधी चाल सुचलेली असायची.
"स्वामी,असं वळण हवं."
"फूल्देस्पांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहावे".

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मग मधुकर कुळकर्ण्याला "पेटीस्वारी",राम गबालेला "रॅम् ग्याबल", वामनराव कुळकर्ण्यांना "रावराव"...कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे. चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई. मग त्या तालावर झुलायला सुरुवात. बैठकीवर उगीचच लोळपाटणे. पोटाशी गिरदी धरुन त्याच्यावर चिमटय़ात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढय़ात ठेवून कातरायला सुरवात.मग अडकित्याची चिपळी करुन ताल ...नाना तर्‍हा .एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे, की नुसताच पोरकटपणा चाललाय !. एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे.त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे टाकून शैशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे. ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते. प्रापंचिक जबाबदाय्रा फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते, त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय,ते आता कोणी सांगावे ?..

गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात. माडगूळकरांना गडकर्‍यांविषयी अतोनात प्रेम. आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकर्‍यांच्या कवितांचेच नव्हे, तर नाटकांतील उतार्‍यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा. हरिभाऊ आपटे,नाथमाधव,गडकरी ,बालकवी, केशवसुत, फडके, खांडेकर,अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांचे मार्ग पुसैतु आम्ही ह्या साहित्याच्या प्रांतात आलो. मी मुंबंईत वाढलो आणि माडगूळकर माडगुळ्यात वाढले,तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते. गडकर्‍यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म. माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे, बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते.

"त्या तिथे, पलिकडे,तिकडे,माझिया प्रियेचे झोपडे" ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो, "महाकवी, तुम्ही लकी !" (माडगूळकर मात्र स्वताला 'महाकाय कवी' म्हणत.) तुमच्या प्रियेच्या झोपडय़ाकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो त्या वातावरणात वळणावर जळाऊ लाकडांची वखार !
"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. Song has longest life अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढय़ानुपिढय़ा बांधून ठेवते एवढेच कशाला ?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?.

माडगूळकरांचे चिरंजीवित्व गाण्यांनी सिध्द झाले आहे, व्यक्तिश: मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे माझ्या पंचविशीपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते. आम्ही काम केलेला एखादा जुना चित्रपटच पाहण्यासारखे.त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती. कवितेच्या त्या जिवंत झर्‍यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरुन प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती. प्राणांन्तिक संकटातून ते वाचले होते. इडापीडा टळली असा भाबडय़ा मनाला धीर होता.आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची Exit ची लाल अक्षरे पेटावी, आणि "म्हणजे ?,एवढय़ात संपला चित्रपट ?",असे म्हणता म्हणता 'समाप्त' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?. मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते, "मित्रा, अशी मैफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे.आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?.
- पु.ल. देशपांडे
-----------------------------
सुमित्र माडगूळकर
www.gadima.com

Wednesday, November 10, 2010

पु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत

प्रिय सुधीर बेडेकर,

प्रश्नपत्रिका मिळाली. मी तुम्हाला पेपर सोपा काढा अशी विनंती केली होती. तुम्ही वरपांगी सोपे वाटणारे प्रश्न काढून पुन्हा एकदा मला माझ्याचकडे बारकाईनं पाहायला लावलं आहे. हे काम अवघड आहे. तरीही पेपर सोडवण्याचा प्रयत्न करतो.


प्रश्न १ : 'तीन पैशाचा तमाशा' हे पुस्तक आपण 'मराठी तमाशाला नवचैतन्य देणाऱ्या अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर गव्हाणकर या दिवंगत लोककलावंतांना' अर्पण केलं आहे. ह्या क्षेत्रातील तिघांच्या कामगिरीविषयी आपल्याला काय वाटतं? त्यांनी तमाशाला 'नवचैतन्य' आणलं असं आपण म्हणता ते नेमकं कोणत्या अर्थानं?

:
अण्णाभाऊ, अमर शेख आणि गव्हाणकर ह्यांनी केलेले तमाशे पाहण्यापूर्वी मी काही जुन्या पद्धतीचे तमाशे पहिले होते. त्यातला सोंगाड्याचा हजरजबाबीपणा मला फार आवडला, तरी त्या विनोदातून पुन्हापुन्हा डोकावणारा ओंगळपणा नकोसा वाटे. चावट विनोदाला माझा विरोध नव्हता. पण फिरून फिरून संभोगक्रियेशी येऊन पोचणाऱ्या विनोदाचा कंटाळा यायचा. मी सुरुवातीला पाहिलेल्या तमाशांतील गायनही बेतासबेत होते. कौसल्याबाई, राधाबाई बुधगावकर, यमुनाबाई विकार, हिराबाई ओसरीकर यांची गाणी मी त्यानंतर ऐकली. उत्तम लावणी ऐकली ती सुंदरबाईंची तबकड्यावर गायलेली. ठुमरी,-दादरे-कजरी ह्या संगीतातल्या अभिजात कुळातील हि लावणी होती. त्या गाण्याचं मोठेपण मला कळत होतं. त्यामुळं सामान्य दर्जाची संगीतबारी आणि त्यानंतरचं 'छेलबटाऊ मोहना' वगैरे त्या काळातील वग पाहताना मला तमाशात याहून अधिक शक्ती आहे असं वाटलं नव्हतं. त्या सामर्थ्याचा मला जो पहिला साक्षात्कार झाला तो अण्णाभाऊ-अमर-गव्हाणकर यांचा तमाशा पाहिल्यावर.

मुंबईत मला सत्यशोधकी तमाशे पाहायला मिळाले नाहीत.पण अण्णाभाऊंनी तमाशाला आलेली मरगळ घालवून त्यात एक नवा आशय प्रभावीपणानं कसा आणता येतो हे दाखवलं त्यांच्या आधीच्या काळात असा वर्तमानाशी निगडीत असणारा आशय इतर कुणी आणला तर तो माझ्या पाहण्यात नव्हता. अण्णाभाऊंच्या तमाशात विनोदाची लयलूट होती, पण ओंगळपणाचा स्पर्श नव्हता. सगळे कलावंत आपापल्या कलेत तरबेज होते. माझ्यावर किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, गडकरी यांच्या रंगभूमीचा खूप संस्कार होता. पण अण्णाभाऊंच्या तमाशानं मला मुक्ततेचा एक निराळा साक्षात्कार झाला. मला अभिप्रेत असलेल्या नवचैतन्यात आशयाइतकंच अभिव्यक्तीत आढळलेलं चैतन्य आहे. त्यातून स्फूर्ती घेऊन मी 'शंकर सावकाराचा वग' लिहिला. त्यात स्वतः काम केलं. पार्ल्यातल्या पुराणमतवादी मंडळीनी मी पुन्हा सत्यशोधकी तमाशे सुरु करून ब्राह्मण-अब्राम्हण भांडणं सुरु करत असल्याचा माझ्यावर आरोपही केला. हि सुमारे अडतीस-एकोणचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. त्यातल्या सावकाराला उद्देशून लिहिलेल्या, 'शंकरभटा लवकर उठा-जागा झाला शेतकरी' ह्या गाण्यानं भटमंडळींना राग आला होता.


प्रश्न २ : एक भूमिका अशी आहे कि, या मंडळींचं लोकनाट्य हे विशिष्ट तात्कालिक प्रचार करणारं 'ऎजिट प्रॉप' पद्धतीचं होतं. अशा प्रचाराऐवजी समाजाविषयी व वर्गीय संघर्षाविषयी मुलभूत प्रबोधन हे उद्दिष्ट ठेवणाऱ्या [ब्रेष्ट सारख्यांच्या] नाटकामध्ये लोककलाप्रकारांचा जसा उपयोग करून घेतला जात असतो, त्यांना नवचैतन्य आणून दिलं जात असतं, तसं ह्या तिघांच्या कलेमध्ये होऊ शकलं नाही याबद्दल आपल्याला काय वाटते?


: मला कलेचा उपयोग तात्कालिक प्रचारासाठी कोणी केला तर त्यात गैर असं काही आहे असं वाटत नाही. मात्र हा प्रचार करणाऱ्या कलावंताचा त्या प्रचारात मांडलेल्या विचारांवर विश्वास हवा. आपल्या आवडत्या विचारांच्या प्रसारासाठी कलेचा वापर करण्याची प्रवृत्ती हि मानवी इतिहासात सदैव चालत आलेली आहे. कित्येकदा तात्कालिक प्रचारासाठी म्हणून लिहिलेले गीत किंवा नाटक हे कलादृष्ट्या परिस्थिती पालटल्यानंतरही बदलत्या समाजाचा ठाव घेताना आढळतं. हा प्रश्न निर्मितीक्षम कलावंताच्या प्रतिभेचा आहे. तात्कालिक प्रचाराचं स्वरूप थोडंसं दैनिक वर्तमानपत्रातील लेखनासारखं असतं. पण प्रासंगिक कारणानं स्फुरलेला एखादा अग्रलेख तत्कालीकाच्या पलीकडे जाणारही असू शकतो. ब्रेष्ट हा कलावंत होता, त्याचप्रमाण तत्वचिंतक होता. त्यामुळं सामाजिक व्याधीच्या मुळाशी तो जाऊ शकला. अण्णाभाऊ किंवा अमर शेख-गव्हाणकर त्याच्याइतके खोल जाऊ शकले नसतील. पण मराठी रंगभूमीच्या संदर्भात त्यांची कामगिरी फार मोलाची आहे. 'कलापथक' हे लोकशिक्षणाचं माध्यम आहे, हा विचार सत्यशोधक चळवळीच्या काळात आला असला, तरी कालांतरान त्या चळवळीला केवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचं स्वरूप आलं होतं. हि सारी समाजिक विषमता ज्या परिस्थितीतून उद्भवली तिच्याकडे लक्ष वेधलं जात नव्हतं. ते दर्शन ब्रेष्टाइतक्या परिणामकारक रीतीनं नसलं तरी त्या परिस्थीची एक परिणामकारक झलक अण्णाभाऊंच्या तमाशातून दिसली.

तमाशा आणि तत्सम प्रयोग्प्रधान लोककलांतून सामाजिक जागृती करण्याचा अधिक व्यापक प्रमाणातला प्रयत्न महाराष्ट्रात अण्णाभाऊ वगैरेंच्या तमाशातून आणि इतर भारतीय प्रांतात 'इप्टा' मुळंच झाला. किंबहुना, आपल्या देशातील लोकगीतं, लोकनृत्यं ह्यासारख्या कलाप्रकारांचं पुनरुज्जीवन आणि त्यांच्यातल्या कलासामार्थ्याचा प्रत्यय 'इप्टा' मधल्या कलावंतानीच प्रथम त्या कलाप्रकारांपासून दूर जात चाललेल्या भारतीयांना आणून दिला. रविशंकर, अकबरअली यांच्यासारखे वादक, शांतीवर्धनसारखा नृत्यपटू, शंभू-तृप्ती मित्र यांच्यासारखे अभिनयपटू, हे इप्टाच्या रंगमंचावरून देशभर गाजले. अमर शेख, निर्मलेंदू चौधरी यांच्यासारख्यांनी लोकसंगीताचं प्रभावी गायन सुरु केलं. एका लोकाभिमुख आणि अव्वल दर्जाच्या सांस्कृतिक चळवळीनं हे नवचैतन्य निर्माण झालं. आणि हे कलावंत काही नुसतेच हौशी नव्हते त्यांनी मोठ्या तळमळीनं आणि परिश्रमपूर्वक कलासाधना केली होती.

प्रश्न ३ : आपण स्वतः 'वटवट' व 'वाऱ्यावरची वरात' या मुक्तनाट्यांमध्ये तमाशा ह्या लोककलाप्रकाराचा वापर केलेला आहे. असं उपयोग करावासा आपल्याला का वाटला? त्या अनुभूतीविषयी आपण कांही सांगू शकाल का?

:
ह्या दोन कार्यक्रमांची जडणघडण रंगीत-संगीतबारी आणि वाग अशीच आहे. आपल्या प्रश्नात आपण ह्याला 'मुक्तनाट्य' म्हंटलं आहे ते बरोबर आहे. आपल्याकडे 'तमाशा' म्हटला कि तो ग्रामीण बोलीतच केला पाहिजे अशी काहीतरी कल्पना आहे. तमाशाचे तमाशेपण त्यातल्या मुक्ततेत आहे. स्थल-काल इत्यादींच्या मर्यादांचं उल्लंघन करण्याच्या सामर्थ्यात आहे. त्यात श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद करता येतो. आणि तो संपवून पुन्हा 'वगा'तलं पात्र होऊन ट्या कथेच्या ओघात मिसळता येतं. 'वाऱ्यावरची वरात' आणि 'वटवट' करताना असं हा मुक्ततेचा आनंद मिळत असे. समोरच्या प्रेक्षकांना जणू काय आपण पाहिलंच नाही अशा रीतीनं रंगभूमीवर वावरायचं दडपण मनावर नसल्यामुळे, प्रेक्षक आणि कलावंत ह्या दोघांत कसलीही कृत्रिम भिंत नव्हती. ज्या रीतीनं हे कार्यक्रम मी रचले होते त्याला अशा प्रकारच्या अकृत्रिमतेची अत्यंत आवश्यकता होती. ती मला लोकनाट्यातंच मिळू शकत होती.

प्रश्न ४ :
आता पुढचे तिन्ही प्रश्न आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जाब विचारणारे आहेत! आरोप एक : आपण मध्यमवर्गीय कलावंत आहात. एकतर आपल्या नाटकांचं व साहित्याचंदेखील मुख्य विषयक्षेत्र मध्यमवर्गीय जीवन, त्यातील सुखदु:खं, विसंगती व व्यंग हेच असलेलं दिसतं. मग 'तुझं आहे तुजपाशी' सारखं नाटक असो, 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोग असोत, वा ' 'वटवट', 'वरात' हि मुक्तनाट्य असोत. फक्त 'फुलराणी', 'तमाशा' यांसारख्या आधारित नाटकांमधेच आपण दुसऱ्या एका वर्गाचं जीवन रंगवायला घेता. हे म्हणणं आपल्याला मान्य नाही का? या मागची आपली भूमिका कोणती?

: मी माझ्या आयुष्यात मला ज्या अनुभवांविषयी लिहावंसं वाटलं त्यांच्यावर लिहिलं. मी कारकुनी पेशा असलेल्या वातावरणात जन्माला आलो आणि वाढलो. त्यासंबंधी मी लिहिलं. ह्यात मी काही गुन्हा वगैरे केला असं मला वाटत नाही. उलट, टूम म्हणून मला ज्ञात नसलेल्या कामगारजीवनावर लिहिण्याचा आव आणून आपण पुरोगामी असल्याची शेखी मिरवणं हा गुन्हा ठरला असता. मला अण्णाभाऊंची किंवा नारायण सुर्वे, बागूल यांची अनुभूती खरी वाटते. पेडर रोड, मलबार हिलवाले गांधीवादी आणि मार्क्सवादी आणि सी. सी. आय., विलिंग्दन क्लबातल्या पार्ट्या झोडून भगवानश्री किंवा सत्यसाईबाबांच्या दर्शनाला जाणारे अध्यात्मवादी मला सारखेच वाटतात. मी माझ्या लिखाणातून समाजविघातक प्रवृत्तींना किंवा आंधळ्या धर्मश्रद्धेला उत्तेजन देणारं काही लिहिलेलं नाही. माझं पहिलं नाटक 'तुका म्हणे आता' हे नवे विचार सत्ताधा-यांना दडपता येत नाहीत-अभंग गंगेत बुडवले तरी लोकगंगेतून वर येतात ह्याच विषयावर आहे. कारकून वर्ग हा तर माझ्या थट्टेचा विषय आहे. सतत तडजोडी करत जगणारी, टीचभर उंचीच्या महत्वाकांक्षा घेऊन जगणारी, 'अब्रू' नामक गोष्टीबद्दल त्यांच्या ज्या काही कल्पना असतात त्यांना जपणारी, सुबकतेला सौंदर्य मानणारी, असली जी काही माणसं मी पहिली तीच माझ्या लेखनातून इ उभी करून त्यांची थट्टा केली आहे. हे लोक काही मी समाजापुढ आदर्श म्हणून उभे केले नाहीत. त्यांच्याशी माझं वैरही नाही. मला वर्गवारीनं माणसं पाहता येत नाहीत.

'फुलराणी' किंवा 'तीन पैशाचा तमाशा' तली माणसंदेखील मला मानसं म्हणूनच महत्वाची वाटतात. माणसांचे उच्चवर्ग, मध्यमवर्ग वगैरे वर्ग पडून त्यांच्यासंबंधीचा जथाबंद विचार करून ललितकृती निर्माण करणं मला जमलं नाही. शोषणाची संधी मिळाली कि प्रत्येकजण शोषक होतो असं मला वाटतं. शोषक आणि शोषित ह्या शब्दांना फक्त ठराविकच संदर्भ आहेत, आणि ते ठराविक आर्थिक उत्पन्नगटांना ठराविकच पद्धतीनं लागू पडतात, असं मला वाटत नाही. मानवी जीवनाचं हे असलं अतिसुलभीकरण मला मान्य नाही. म्हणून आता मी अमुक एका वर्गाचं जीवन रंगवायला बसतो, असले संकल्प सोडून लेखन करायला बसत नाही.

प्रश्न ५ : आपला दृष्टीकोनदेखील मध्यमवर्गीय आहे. हे उदाहरणार्थ आपल्या चार्ली चॅप्लिनच्या विनोदाशी तुलना केली तर दिसतं. मध्यमवर्गीय जीवनातील विसंगती व व्यंग यांची फजिती करून आपण लोकांना हसवताहसवतच ठेवता, खूष करता! उलट, चॅप्लिन आपल्याला हसवतानाच मुळापासून हद्रवतो, कष्टी करतो, विचार करायला लावतो. त्याचा मानवतावाद जी व्यापकता व खोली गाठतो, तिचे कारण तो मध्यमवर्गीय दृष्टीकोनाच्या पलीकडे जाऊ शकला. आपला दृष्टीकोन मध्यमवर्गीयच राहिला. हे आपल्याला मान्य आहे का? कि 'बटाट्याच्या चाळी' विषयी बोलताना आपण मानवी जीवनाविषयी महत्वाचं काही बोलत आहात, असा आपला दावा आहे?

: आपल्या प्रश्नाचं उत्तर शेवटल्या प्रश्नापासून देण्याचा प्रयत्न करतो. मानवी जीवनाविषयी महत्वाचं असं मी काही मांडलं असा माझा तर दावा नाहीच, पण तसला दावा कोणीही करू नये. मानवी जीवन हा नित्य नूतनरूप धारण करणारा एक अनाकलनीय चमत्कार आहे. त्याला कुठल्याही ठोकळेबाज साच्यात बसवून मोकळं होता येत नाही. माझा दृष्टीकोन 'मध्यमवर्गीय' आहे असं जेंव्हा तुम्ही म्हणता त्या वेळी तुम्ही मला कुठल्या साच्यात बसवू इच्छिता ते मला कळत नाही. मी कारकुनी पेशानं जगणाऱ्या कुटुंबात वाढलो. हिंदुधर्मात ज्याला उच्च जाती असं खोट्या अहंकारानं म्हणतात तसल्या जातीत माझा जन्म होऊन शाळकरी वयात त्या जातीचे थोडेफार संस्कार झाले. ती नाती मी केंव्हाच तोडली आहेत. देवपूजा, धार्मिक संस्कार, श्राद्धपक्ष वगैरे कर्मकांडाशी माझा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात संबंध आला नाही त्यामुळं बऱ्यावाईटाला धार्मिक किंवा रूढीनं ठरवलेल्या तराजूत मी कधीच तोललं नाही. तरीही मी तुमच्या दृष्टीनं मध्यमवर्गीयच असलो तर मग त्याला माझाही इलाज नाही. माझ्या लेखनात शहरात कारकुनी पेशानं जगणाऱ्या लोकांविषयीचेच उल्लेख अधिक असल्यामुळं मला आपण मध्यमवर्गीय म्हणत असाल, तर इसापनीतीला 'पशुवर्गीय' साहित्य म्हणायला हरकत नाही.

चॅप्लीनबद्दल तुम्ही जे काही म्हटलं आहे त्यात गैर असंही काही नाही आणि नवीन असंही काही नाही. माझ्या विनोदाची चॅप्लीनच्या विनोदाशी तुलना करण्याची कल्पनादेखील मला हास्यास्पद वाटते. मात्र चॅप्लीन मुळापासून हादरवतो तो कुणाला? सर्व प्रेक्षकांना नव्हे. चॅप्लीनच्या ट्रॅम्पला नुसतंच 'गरीब बिचारा' म्हणून पुन्हा स्वतःच्या दैनंदिन जीवनात पूर्ववत रमणारी मंडळी, तुम्ही पाहिला तसा संपूर्ण चॅप्लीन पहात नसतात. त्यांच्या दृष्टीनं तो एक जाम हसवणारा विदुषकच! खुद्द चॅप्लीनही माणसांचा असा वर्गवारीनं विचार करत नसावा. गेल्या महायुद्धात इंग्लंड-अमेरिकेबरोबर जेंव्हा रशिया मित्रपक्ष म्हणून उभा राहिला. त्या वेळी केलेल्या एका भाषणात तो म्हणतो, "मी एक माणूस प्राणी आहे. आणि माणसांच्या प्रतिक्रिया काय होतात ते मला कळतं असं मला वाटतं. कम्युनिस्ट इतर कोणाहीपेक्षा वेगळे नसतात; जर त्यांनी आपला हात वा पाय गमावला तर आपल्या सगळ्यांना होतात तशाच यातना त्यांना होतात. आणि आपण सगळे मरतो तसेच ते मरतात. आणि एखादी कम्युनिस्ट आई इतर कोणत्याही आईसारखीच असते. तिचे पुत्र आता परत येणार नाहीत अशी दु:खद बातमी कळाल्यानंतर ती इतर आयांसारखीच रडते, हे समजण्यासाठी कम्युनिस्ट असण्याची गरज नाही. मी फक्त माणूस असलो तर मला हे कळतं."

हा चॅप्लीन मला सदैव एकमेवाद्वितीयम वाटत आलेला आहे. क्षणभराच्या तुलणेसाठीही त्याचं आणि माझं नाव एकत्र आणणं मला पटणार नाही. मीही थोडीफार विदुषकगिरी केली असेल. मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यात एखादा अश्रूही उभा राहीला असेल. पण चॅप्लीनपासून मी शेकडो मैल दूर आहे याची मला पुरती जाणीव आहे. हे म्हणजे लेनिन आणि डांगे यांची तुलना करण्यासारखं झालं. म्हणून मला वाटतं, कि ललितसाहित्याची निर्मिती ही विशिष्ट पंथाचा प्रचार करणं एवढ्या एकाच हेतूनं होत नसून सतत वर्तमानाचं भान ठेऊन निर्मितीक्षम साहित्यिक जसा जसा बदलत किंवा घडत जातो तशी तशी होत असते.

प्रश्न ६ : आणखी एक उदाहरण घ्या. 'व्यक्ती आणि वल्ली' मधला बबडू हाच अंकुश नागावकरच्या रुपानं येतो. घोसाळकर मास्तर पटवर्धन होतात, आणि 'व्यक्ती आणि वल्ली'त बबडूचा मित्र असणाऱ्या मध्यमवर्गीय लेखकाच्या डोळ्यानं आता अंकुशकडे प्रेक्षकांनी पाहावं असंही गृहीत असतं, म्हणजे ब्रेष्टचा मॅकहिथ व आपला अंकुश यातला फरक असं पडतो कि, अंकुशमध्ये एक मध्यमवर्गीयपणा, शालेय कोवळ्या जीवनाबद्दल व विद्वान मास्तरांबद्दल 'नॉस्टाल्जीया' राहतो. आणि मॅकहिथनं प्रेक्षकाला जसं डिवचलं व विचार करायला लावलं असतं तसं न होता अंकुश प्रेक्षकाच्या आवाक्यात व्यवस्थित बसतो.
हे एक उदाहरण घेतलं. आपला मध्यमवर्गीय दृष्टीकोन ब्रेष्ट्च्या नाटकाचं रूपांतर करताना त्याचं नाटक पार नष्ट करून टाकण्याला कसा कारणीभूत होतो हे दावण्यासाठी दिलेलं.
अंकुशमध्ये मॅकहिथ मुळीच उरत नाही व आपल्या नाटकात ब्रेष्ट उरत नाही, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे?


: 'तीन पैशाचा तमाशा' हि एक माझ्या साऱ्या संस्कारातून आणि कलानिर्मितीला आवश्यक असणार्या बुद्धीतून घडलेला 'मी' आणि त्या 'मी' ला समजलेला ब्रेश्ट ह्या मिश्रणातून तयार झालेली निर्मिती आहे. त्या मिश्रणातून मुळचा संपूर्ण ब्रेश्ट आणि संपूर्ण पु.ल.देशपांडे हे दोघेही कदाचित उरले नसतील, असं होणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं. ज्यांना अस्सल 'ब्रेश्ट'च कळायला हवा असेल त्यांनी तो मूळ जर्मन भाषेतून वाचायला हवा. एवढंच नव्हे, तर 'बर्लिनेर आन्साब्ल' च्या कलावंतानी केलेले ब्रेष्ट्चेच प्रयोग पाहायला हवेत. कारण ब्रेश्टमधला मला आकर्षून घेणारा ब्रेश्ट आणि मूळ ब्रेश्ट ह्यात समजुतीचे अनेक घोटाळे होणं शक्य आहे. ब्रेश्टची इंग्रजीतून झालेली भाषांतरं वाचतानादेखील एकाच नाटकाच्या दोन निरनिराळ्या लेखकांनी केलेल्या भाषांतरात फरक आढळतो. [मोलीयरच्या नाटकांचंसुद्धा दर चार वर्षांनी नवीन भाषांतर येत असतं.] आणि इथे तर मी मराठी प्रेक्षकांशी संवाद साधायला रुपांतर केलं आहे.त्यामुळं त्यात माझी जडणघडण, मराठी प्रेक्षक यासंबधीची माझी कल्पना अशा अनेक गोष्टी येतात. त्यामुळं अंकुशमध्ये मॅकहीथ उरत नाही, आणि माझ्या नाटकात ब्रेश्ट उरत नाही, असं आपणास वाटलं तर त्यात नवल नाही.

ब्रेश्ट वगैरे काहीही ठावूक नसणाऱ्या मराठी वाटचाल किंवा प्रेक्षकाला 'तीन पैशाचा तमाशा' पाहून त्याचं त्यातल्या पत्र आणि प्रसंगाशी काही नातं जुळतं का? माणूस जगतो कशावरी? सारखे किंवा 'आता पैशात्मके देणे' सारखं गाणं त्याला थोडंफार अस्वस्थ करतं का?-हे पाहायला हवं. महाभारतातली शकुंतला, कालीदाची शकुंतला, अण्णा किर्लोस्करांची शकुंतला आणि व्ही. शांताराम ह्यांच्या सिनेमातली शकुंतला हि जशी एकाच शकुंतलेची अनेक रूपं, तशी 'थ्री पेनी ऑपेरा' ची निरनिराळी रूपांतरं झाली तर त्यात त्या त्या लेखकाच्या संस्कारातून हा 'मॅकी' कसाकसा अवतरतो हे पाहणं मजेचं होईल. मला समजलेला 'मॅकी' हाच खरा 'मॅकी' असं मात्र माझा खरोखरीच दावा नाही. जाता जाता मला आपण केलेल्या 'नॉस्टोल्जीया' च्या उल्लेखाविषयी एकच म्हणावसं वाटतं की, 'पूर्वीची मजा आता राहिली नाही' हे उद्गार समाजातल्या निरनिराळ्या थरांतल्या माणसांकडून ऐकू येतात. तो एक मानवी स्वभावातलाच फारसा अर्थ नसलेला भाग आहे. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे उगीचच वाटत असतं. मुंबईतल्या गिरणीतला मजूरदेखील कोकणातल्या खेड्यातल्या शाळेपुढून जाताना क्षणभर तिथं थबकत नसेलच असं नाही. तेंव्हा एखाद्या अट्टल गुन्हेगारानंदेखील 'नोस्टेलजिक' मूडमध्ये जाणं म्हणजे त्याला मध्यमवर्गात ढकलणं नव्हे.


प्रश्न ७ :
शेवटी एक वेगळाच प्रश्न : आणीबाणीविरोधी लढ्याच्या समाप्तीनंतर आपण जाहीर केलंत, युद्ध संपले आहे, सैनिकाचा गणवेश उतरवून मी पुन्हा एकवार विदूषकाचे कपडे चढवत आहे. किंवा अशाच अर्थाचं काहीतरी. पण हेसुद्धा आपण फारसं पाळलेलं दिसत नाही. साधारणत: डाव्या आणि दलित मंडळींकडे आपली सहानुभूती थोडीफार दिसते. अगदी गणवेश नाही, पण कल आहे, असं वाटतं. म्हणून खालचा प्रश्न विचारावासा वाटतो. प्रश्न हा आहे, कि साहित्याच्या, रंगभूमीच्या क्षेत्रातही एक सततचं युध्द सूक्ष्म तऱ्हेने खेळलं जात असतं, असं आपल्याला मान्य नाही का? या युद्धात वेगळ्या प्रकारे, प्रचारी पद्धतीनं नव्हे तर कलावंत म्हणून बाजू निवडावी लागते, असं आपण मानता कि नाही? उदाहरणार्थ : मानवी जीवनाविषयी संकुचित, आत्ममग्न, मध्यमवर्गीय जाणीव असणारा दृष्टीकोन विरुध्द सगळ्या दडपलेल्या व पिळलेल्या, मानुषता गमावलेल्या व मनुष्यत्वाकडे जाण्याची धडपड करणाऱ्या माणसांविषयी व्यापक, ऐतिहासिक व कणखर जाणीव असणारा दृष्टीकोन, यांत असा संघर्ष चालू नाही काय? या संघर्षाबाबत आपली भूमिका काय?

: साहित्याच्या आणि रंगभूमिच्याच कशाला? साऱ्या जीवनाच्या क्षेत्रात सतत नाना तऱ्हेचे संघर्ष आणि समन्वयाचं चक्र चालूच असतं. त्यातून कुणाचीच सुटका नाही . मी इहवादी असल्यामुळं ह्या संघर्षाशी माणसानंच मुकाबला करायचा आहे असं मी मानतो. आणीबाणीनंतर जी निवडणूक झाली तिला 'युध्द' हा शब्द मी मर्यादित अर्थानं वापरला होता. एक वंशपरंपरेनं चालणारी आणि हुकुमशाही मानणारी राजवट येण्याचा संभव होता. त्याविरुध्द लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकानं उभं राहण्याची आवश्यकता होती. इंदिरा गांधीचा त्या निवडणुकीत पराजय झाला तर देवदूतांचं राज्य सुरु होईल, अशा प्रकारचा भाबडा प्रचार मी, इंदिराविरोधी उमेदवारांना मतं मिळवण्याच्या मोहानं केला नव्हता. निवडणुकीनंतर पुण्यात एका विजयोत्सवाची सभा झाली. त्यात मी सहभागी झालो नाही. मी पुन्हा माझ्या नित्यकर्मात गुंतलो. त्या वेळी मी पुन्हा विदूषकाचे कपडे चढवत आहे हा उल्लेख त्या काळी इंदिराबाईंच्या पक्षात असलेल्या श्री. यशवंतराव चव्हाणांनी 'विदुषकाला राजकारण काय कळतं?' अशा रीतीने माझ्यासंबंधी काढलेल्या उद्गाराच्या संदर्भात होते. त्या परिहासविजाल्पिताला इतक्या परमार्थानं घेण्याचं कारण नाही.

विचारांच्या बाबतीत चिपळूणकर-परंपरेपेक्षा माझ्यावर फुले-परंपरेचा प्रभाव अधिक आहे. फुल्यांनी सुरु केलेल्या प्रबोधनाला दलित साहित्याच्या रूपानं आता फळं धरली आहेत. कलात्मक विदग्धतेचा फक्त नागरी वातावरणातच राहणाऱ्या लेखकांच्या साहित्यातून होतो ह्या आत्मप्रसन्न वृत्तीला ह्या साहित्यानं जोरदार धक्का दिला आहे. तो धक्का केवळ भाषेत ग्रामीण बोली म्हणून किंवा शिव्यागाळी आणि कामविषयक अभिलाषेचा उल्लेख अधिक स्पष्ट शब्दांत करून देण्यापुरता मर्यादित नव्हता. आपल्या न्याय अन्याय, मंगल अमंगल, शुभ अशुभ, पवित्र अपवित्र ह्या साऱ्या कल्पनानांच धक्का होता. ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाकडे पुन्हा एकदा नीटपणानं ह्या साहित्यानं पाहायला लावलं. अन्यायाविरुद्ध झुंज देणार्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनं आपण सहाय्यभूत व्हायला हवं हा विचार मनात रुजला. त्यासाठी प्रचारी साहित्य जर मला लिहिता आलं तर ते लिहिण्यातही मला वावगं वाटणार नाही. 'तात्कालिक' हे केवळ कमी टिकणारं म्हणून ते मला की महत्वाचं वाटत नाही. व्यापक, कणखर, ऐतिहासिक वगैरेचा अर्थ मी लावत बसू इच्छित नाही, पण पूर्व दिव्याचे पोवाडे गात बसण्यापेक्षा प्राप्त काळातील अन्याय नाहीसे व्हावेत म्हणून जे आपली लेखणी, वाणी, किंवा इतर कला कारणी लावतात ते लोक मला जवळचे वाटतात. हे अन्याय कविता आणि कथा लिहून दूर होत नाहीत हेही मी जाणतो. पण साहित्यकलेला असल्या अन्यायांची जाणीव करून देण्याचं कार्यही करावं लागतं. जगातल्या थोर साहित्यिकांनी हे कार्य केलेलं आहे.

रवीन्द्रनाथांनी वंगभंगाच्या चळवळीसाठी गीतं लिहिली. सामाजिक संघर्षात साहित्यिक, कलावंत ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूला उभं राहत आलेले आहेत. अशी बाजू निवडावीच लागते. काही झालं तरी मी बदलणारच नाही असं म्हणून भागत नाही. मानवी समाजातल्या अनेक प्रथा कालबाह्य होत असतात. आधुनिक जगात पोथीनिष्ठ आणि कर्मकांडात गुंतलेली धर्मकल्पनाच काय पण राजकीय पोठीनिष्ठादेखील कालबाह्य आहे असं मला वाटतं. इतकंच नव्हे तर विज्ञानाने साऱ्या मानवजातीला या ना त्या कारणानं एकमेकांवर इतकं अवलंबून ठेवलं आहे कि, 'राष्ट्रीयत्व' हि कल्पनासुद्धा कालबाह्य होत आहे. तेंव्हा 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' म्हणून वर्तमानावर नजर पक्की रोखून जगायला हवं. उगीचच परंपरेच्या नावाखाली आधुनिक जीवनात ज्यांचे संदर्भ सुटले आहेत अशा रूढीना चिकटून राहण्यात अर्थ नाही. अनावश्यकता हि नीसार्गालाच मान्य नसते हे मी स्वतः मानत असल्यामुळे, मी आजवर जे लिहिलं आहे त्यातलं ह्या नियमाप्रमाणे जे काही मरणालागुनी जाईल ते तसं जाण्याच्या लायकीचं होतं, असं मी मानीन.

पुरचुंडी मधून
संकलक:प्रवीण कुलकर्णी
मुळ स्त्रोत- http://pkquiettime.blogspot.com/2010/03/blog-post_08.html

Monday, November 8, 2010

पुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर

१९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि शेवटी दुष्काळाच्या छायेतुन महाराष्ट्र सुटल्यानंतर जून १९७३ साली संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आणिबाणीच्या जवळ देश चालला होता. पण तारणहार इंदिराजींवर १९७१च्या युद्धातील विजयाचा मद अजून होता. ‘गरिबी हटाव’ची सिंहगर्जना चालणार होती ती पुढे, पण याही परिस्थितीत अवर्षणग्रस्त महाराष्ट्र पावसामुळे सुखावला होता.

त्याकाळात दिवाळीत स्वत: तयार केलेली, छापलेली, कलात्मक नाविन्यपुर्ण अशी ग्रिटींग कार्डस्‌ सर्वजण प्रेमाने पाठवीत. परवडले न परवडली तरी! तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते! आणि महाग!

आम्ही आमच्या ‘कैलास जीवन’ या आयुर्वैदीय औषधीच्या कंपनीची काही हजार ग्रिटिंग कार्डस्‌ छापली त्यावर मजकूर होता ‘धनांधकारेषु इव दीपदर्शनम्‌!’ (मॄच्छकटिक)

मला व्यापाराबरोबर सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्ती, संगीत, नाटक, शिल्प, साहित्य या विषयी थोडी अधिकच ओढ होती. गो. नी दांडेकरांशी चांगला परिचय सौ. वीणा देव (गो.नी. दांडेकरांची कन्या) मुळे झाला होता. (विणा आणि मी कॉलेज ते विद्यापीठापर्यंत एका वर्गात शिकलेले) मी अनेक साहित्यिक, कलाकार यांना हे ग्रिटिंग कार्ड पाठविले. कुमारजींना तसेच पु.लं. ना सुद्धा!

आणि आश्चर्य मला पु.लं. चे पत्र मिळाले. मी तुमच्या कैलास जीवनचा चाहता आहे. तुम्ही पाठविलेले ग्रीटिंग कार्ड सुद्धा अतिशय कालयोग्य आहे. कधीतरी भेटा.

मग काय! आनंद! गगन ठेंगणे अशीच अवस्था झाली पु.लं.शी सबंध आला आणि वाढत गेला. त्यांच्या जवळ जाण्याचा योगही येऊ लागला.

त्यानंतर आता पु.लं.च्या विषयी लिहिण्याबाबत आपले पत्र आले व लिहिण्याबाबत विचार करु लागलो आणि असे लक्षात आले की, पु.लं.च्या विषयी लिहिणे ही अवघड गोष्ट आहे.

त्यातही मी त्यांच्याविषयी आपल्याला काही लिहावे, बोलावे लागेल या (दूर) दॄष्टीने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही. किंवा लिहून काढण्याचा माझा स्वभावही (हात ही) नाही. पण जसजसा मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो त्यांच्या बरोबर तासनतास घालवू लागलो, हिंडू फिरू लागलो किंवा लांबून त्यांना पाहू लागलो तसे तसे ते मला जास्तीत जास्त मोठे दिसू लागले. त्यांचे मोठेपण कळू लागले. कसे भेटत, भेटत, भेटी घेत, भेटी देत (भेटी टाळत) या सर्वांचा छान अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.

ऎके दिवशी ’रुपाली’मध्ये संध्याकाळी त्यांनी मला बोलावले होते, म्हणून गेलो. तर सात-आठ मुले, मुली त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या भोवती गोळा झाल्या होत्या. मी आत शिरलो, मला म्हणाले ’बैस ऎक. बोलू नकोस.’ मी गप्प. काय चालले आहे ते पाहत होतो. ऎकत होतो. एक एक नवोदित कवी आपापली एक एक कविता या कवी (स) हृदयाचा दोघांना ऎकवत होता. पहिली फेरी केव्हाच झाली होती. ही त्यापुढची कितवी फेरी माहित नाही. पण कवी उत्साहात कविता म्हणत होते आणि पु.ल. व सौ. सुनीताबाई ऎकुन त्यावर आपले मत प्रदर्शित करीत होते. आनंदी होऊन वाहवा पण देत होते. कधी मिश्किलही होते. मी पोहचल्यानंतरही हा कार्यक्रम दोन तास चालला होता. शेवटी एका नवकवीने आयुष्यावर बोलण्यास सुरुवात केल्यावर मध्येच थांबवून कार्य सिद्धी झाली. मुले गेली.

मला म्हणाले अरे बरीच पत्रे येतात. कविता ऎकवितो म्हणतात. नाराज करण्यापेक्षा ही युक्ती शोधुन काढली. एकाच वेळी सर्वांना बोलवुन ५/६ तास त्यांचे म्हणणे ऎकुन घेतले. आणि सुटका आणि ससेमिरा थांबवून टाकला. (का मागे लावून घेतलो?).

एकदा असाच रात्री उशीरा ‘रुपाली‘ मधून बाहेर पडलो. जोशी हॉस्पिटलमुळे स्कूटर, मोटारींची फार करीत माणसांनी भरलेली एक टेंपोट्रॅक्स ‘पु.ल. कुठे राहतात‘ चौकशी करत येत होती. मी पाहिले. जरा बावरलो. २०/२५ जण लातुर भागातून आले होते. रात्री १० चा सुमार होता. म्हटले चटदिशी पु.लं.च्या घरी जाऊन बेल दाबली. सुनीताबाईंशी बोललो. खाली येऊन त्यातल्या म्होरक्याशी बोललो. म्हणाले, ‘आमचे काम काही नाही, फक्त दर्शन घ्यायचे आहे. पायावर डोके टेकू आणि पाच मिनिटात पुढे लातूरकडे जाऊ.‘ हे सुनीताबाईंना सांगितले. पु.ल. खुर्चीवर बसले. एक एक पु.ल.प्रेमी पायावर डोके ठेवून बाहेर पडत होता. लेखकांच्या दर्शन वारीतील हे वारकरी दर्शन घेऊन आनंदून परत जाताना सुनीताबाई सुद्धा गहिवरल्या.

‘रुपाली‘मधलीच गोष्ट आहे. पु.ल. आणि कुमारजींचे नाते फारच निराळे होते. १९८५ च्या सुमारास कुमारजी पुण्यात असतान मला म्हणाले, ‘भाईकडे जाऊन येऊ‘. रात्री ८ च्या सुमारास प्रा. चिरमुलेंच्या घरून आम्ही निघालो. कुमारजी अचानक घरी आल्याचे पाहून सुनीताबाईंनी त्यांचे स्वागत केले. खुप गप्पा रंगल्या. पु.ल. जरा चुळबुळत बोलत होते. त्यांनी पटदीशी एक फोन केला आणि कुमारांना म्हणाले आपण बोलतोय ते ऎकायला दिनेश येतोय. आत्ताच मामाकडे गेला आहे. येईलच. दिनेश आला. खरोखरीच काही मिनीटात. त्याला जरा ताप होता. पण त्याला काहीतरी कुमारजींच्या तोंडुन ऎकायचे होते. तो पु.लं.शी त्याच दिवशी बोलला होता आणि अचानक कुमारजी आले होते. पु.लंनी दिनेशसाठी ‘म्हारा ओळगीया‘ गाण्याची विनंती केली. आपल्या पानाचा डबा काढून त्यावर ठेका दाखवत कुमारजींनी सहज स्वरात हे भजन असे गायले की आम्ही सारेच हरखून गेलो.

पु.लं.च्या विषयी किती सांगता येईल. मल्लिकार्जुन मन्सुरांच्या शेवटच्या काळात एक दिवस पूर्ण दिवस धारवाडमध्ये मन्सुरांच्या बरोबर आम्ही होतो. पु.ल. सुनीताबाई आणि मन्सूर हळूहळू जुन्या गाण्यात, आठवणीत रममाण झाले होते. मन्सुरांना मधुनच सिगरेट पु.ल. शिलगावून देत होते. मी पुण्यात आल्यावर त्यांना विचारले आता कधी कधी सिगरेट ओढावीशी असे वाटते का? त्यांनी सिगरेट सोडून अनेक वर्षे झाली होती. तिच्याकडे मी परत आकॄष्ट झालो नाही असे त्यांनी सांगितले, मनमोकळेपणानी!

त्यांच्या आणि वसंतराव, ज्योत्सनाबाई, कुमारजी, भीमसेन, मुकुल, श्री. पु. भागवत किती तरी जणांच्या संवादाची याद येते, आणि ‘अवस्था‘ लागते! आणि कुमारांची बंदिश प्रत्यक्ष अनुभुतीस येते ‘नयना भरायोरी‘.

(जिवनज्योत दिवाळी अंक २००९ मधून साभार)