आज पुलंही नाहीत आणि प्रमोद नवलकरही... पण नवलकर नावाच्या भटक्याने त्यांच्या ' झपाटलेल्या लेखणी ' ने केलेले हे ' पुल ' वर्णन..
मराठी माणसाच्या मनात पु.ल. देशपांडेंच्या एवढ्या आठवणी आहेत की त्या कदापि पुसल्या जाणार नाहीत. पु.लं.नी माणसाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्श केला नाही तर ते उराशी बाळगून त्याला आंजारलं , गोंजारलं. म्हणून महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना बंधुप्रेम देणारे ' भाई ' लाभले. जो त्यांच्या सहवासात आला तो त्यांच्या सावलीत सुखावला. ज्यांना त्यांचा सहवास लाभला नाही त्यांनी केवळ त्यांची आठवण काढून भरभरून आनंद घेतला असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्या संशोधकांची डोकेदुखी ठरणार आहे. हा माणूस कोणत्या रसायनाने घडवला गेला होता याचा शोध घेणं वैज्ञानिकांना अवघड जाणार आहे. माझ्याही मनात भाईंच्याविषयी मोजक्याच पण हृदयाला भिडणा-या आठवणी खोलवर रुजून बसल्या आहेत.
भाईंना गेल्याला वर्षं उलटली तरी त्या काल-परवाच्या वाटतात आणि भाई गेले यावर विश्वास बसत नाही. त्या सा-या आठवणी माझा पाठलाग करत आहेत. प्रयत्न करूनही पिच्छा सोडायला तयार नाहीत. जेव्हा प्रभादेवीच्या रवींद थिएटरच्या परिसरात महाराष्ट्र कला अकादमी उभी करण्याचं ठरलं तेव्हा मी सांस्कृतिक मंत्री होतो. माझ्याच कारकीर्दीत अकादमीचा पाया घातला गेला. माझी खात्री होती की एकदा सुरुवात झाल्यावर ते थांबणार नाही. कुठूनही पैसे येतील आणि दिल्लीच्या अल्काझी अकादमीप्रमाणे महाराष्ट्राची भव्य वैभववास्तू उभी राहील. आणि खरोखरच तसं घडलं. त्या वेळी त्या अकादमीला नाव देण्याचा विचारच कोणाच्या डोक्यात नव्हता. कारण तिला शोभून दिसेल अशा हिमालयीन उंचीची व्यक्तीच डोळ्यासमोर नव्हती. त्यानंतर कधीही पुण्याला गेल्यावर भाई अकादमीच्या प्रगतीची चौकशी करत. मी त्यांना म्हणायचो , ' भाई , काळजी करू नका. या अकादमीत छबिलदासपासून कालिदासपर्यंत आणि पिला हाऊसपासून ऑपेरा हाऊसपर्यंत सर्व अंतर्भूत असेल. ' मनात एकदा असा अस्पष्ट विचार आला की अकादमी झाल्यावर त्यांची तब्येत चांगली नसतानाही त्याच अवस्थेत त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं. मनोहरना मी तसं बोलूनही ठेवलं होतं. काळाच्या घड्या कलानिकेतनमधल्या साडीसारख्या उलटत गेल्या. युतीची सत्ता गेली. सहा महिन्यांनंतर निवडणूक झाली आणि आघाडीची सत्ता आली. केवळ अकादमीचे काम अपुरे राहिले म्हणून खंत वाटली. पण निराश झालो नाही. महाराष्ट्रात कोणाचीही सत्ता आली तरी मराठी माणसाचीच असणार हा आत्मविश्वास निदान आजपर्यंत तरी ' च्यवनप्राश ' न घेता मला वाटत आहे. त्यामुळे अकादमीचं काम थांबलं नाही. माझ्याजागी आलेले सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे , शशी प्रभू आणि अवसेर्करांनी ते जिद्दीने पुरं केलं. पूर्वी येता-जाता मी अकादमीत जाऊन तिथल्या प्रगतीचा आढावा घेत होतो. त्यानंतर मात्र त्या रस्त्यावर गाडी उभी करून मोठ्या अभिमानाने पूर्णत्वाला जाणाऱ्या अकादमीकडे पाहत आलो.
आठ नोव्हेंबर रोजी भाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्याची छायाचित्रं आणि वृत्तान्त सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. ते सर्व पाहिल्यावर मनात प्रचंड कालवाकालव झाली. त्या छायाचित्रात भाईंच्या पुतळ्यासमोर सांस्कृतिक मंत्री मोरे आणि नगरपाल किरण शांताराम ' हसतमुखा'ने उभे आहेत. भाईंनी सर्वांना जरी आयुष्यभर हसवलं तरी त्या पुतळ्याकडे पाहून मात्र चटकन गहिवरून आलं. शिल्पकार राजन यावलकर यांनी एक शिल्प म्हणून तो पुतळा बराच हुबेहूब बनवला आहे. तरीही भाई म्हटले की ' या बसा ' म्हणणार , चहा-चिवडा देणार , भावाप्रमाणे क्षेमकुशल विचारणार , एखादी कोटी करणार , हसणार , हसवणार , त्यांच्या डोळ्यांतून , मुखातून , शब्दांचे झरे वाहणार , ते भाई आज एखाद्या दगडासारखे कोणतीही हालचाल न करता निश्चल उभे राहिलेले पाहणे कोणत्याही सुहृदय माणसाला पाणावलेल्या डोळ्याशिवाय पाहण शक्य नाही. पण तरीही यावलकर म्हणाले , ' तो पुतळा घडवताना मला एवढा अत्यानंद झाला की तसा आनंद आयुष्यात कधी झाला नव्हता. '
त्यांनी कदाचित भाईंच्या स्वभावाच्या रंगाची पेटी पाहिली नसेल. त्यांचा अखेरचा काळ शारीरिक दुर्बलतेत गेला. पण त्या व्याधीची जाणीव त्यांनी कधी भेटणाऱ्यालाच नव्हे तर त्या व्हील चेअरलाही जाणवू दिली नाही. स्वभावाशी तडजोड केली नाही. विनोदाशी फारकत घेतली नाही आणि मायेची शाल कधी खांद्यावरून ढासळू दिली नाही. याच अवस्थेत मी त्यांना ' महाराष्ट्र भूषण ' स्वीकारण्याची विनंती केली तेव्हा त्यांना गहिवरून आलं. त्या प्रकृतीत समारंभाला जाणं शक्य नसल्याने सुनितावहिनी राजी नव्हत्या. पण भाईंचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी होकार दिला. त्यातून थोडा वाद निर्माण झाला तरी त्यानंतर भाईंच्याकडे गेल्यावर त्या वादाची कधीही सावली दिसली नाही.
एकदा तर माझा हट्ट पुरवण्यासाठी भाई व्हील चेअरवरून तळमजल्यावर आले आणि एका समारंभाचं उद्घाटन केलं. त्या वेळी धर्मेंदच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. भाईंच्या पायाला मिठी मारून त्याने फोटो काढून घेतला होता. भाईंना कोणाला नकार देणं जमलं नाही. महिनाभर ते परदेश दौ-यावर होते. तिथेच पत्र पाठवून मी त्यांना माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. दौ-यावरून परतल्यावर त्यांनी काही तासांतच जी प्रस्तावना लिहून काढली तो माझ्या जीवनातला फार मोठा ठेवा आहे. भाईंची एकच इच्छा अपुरी राहिली. त्यांना वेशांतर करून माझ्याबरोबर मध्यरात्री मुंबई पाहायची होती. आजारपण आलं आणि ते राहून गेलं. भाई पुन्हापुन्हा ती आठवण द्यायचे. असे आमच्या श्वासाशी एकरूप झालेले भाई निर्जीव पुतळ्याच्या रूपात पाहवत नाहीत. कारण आठवणी ताज्या आहेत. मृत्यूनंतर किमान शंभर वर्षं तरी थोरामोठ्यांचे पुतळे उभे करू नयेत. ज्या हातांच्या बोटांतून पेटीतले स्वर उमटायचे आणि दानपत्रांची उधळपट्टी व्हायची ते हात आज निश्चेष्ट होऊन पुतळ्याच्या मागे लपलेले पाहून डोळ्यांच्या कडा पाणावतात. भाई गेले , सबनीस गेले , शांताबाई गेल्या , दुर्गाबाई गेल्या , त्यांच्याबरोबर विसाव्या शतकाचे डोळेही मिटले. आता फक्त दिसतील त्यांचे पुतळे आणि रांगोळ्या.
महाराष्ट्र टाईम्स
१२ जुन २००८
0 प्रतिक्रिया:
Post a Comment