Saturday, April 30, 2022

निर्भयता ही कलात्मक सर्जनाची शक्ती

पु. ल. देशपांडे यांनी साहित्य समारंभात केलेल्या भाषणाचा सौ. मीना मराठे यांनी केलेला अनुवाद

मी गेली वीस वर्ष या लेखनाच्या धंद्यात आहे, आणि तरी अजूनही माझं लेखनावर प्रेम आहे. तसं प्रेम माझ्या प्रकाशकांचंही आहे. ते बहुधा माझी पुस्तकं चांगल्या प्रकारे खपतात म्हणून असावं. परंतु त्यामुळे माझे टीकाकार मला लोकप्रिय लेखक म्हणून निकालात काढतात. मी त्यांना दोष देत नाही. मीही त्यांना 'टीकाकार' म्हणतो आणि निकालात काढून टाकतो.

माझा धंदा हसवण्याचा असला, तरी तो दिसतो तेवढा सोपा नाही. त्याचं कारण एकतर अलीकडे जो तो हळवा बनलेला - मग तो भांडवलदार असो, धर्ममार्तंड असो, वा बापडा शाळामास्तर असो. त्यात आणि युनियनची ताकद त्यांच्यामागे. अशा परीस्थितीत कोणाच्या पायावर केव्हा चटकन पाय पडेल आणि केव्हा कोणती निषेधसभा भरवली जाईल, याचा काही नियमच उरलेला नाही. कम्पॉझिटर्सबद्दल बोलत असताना 'प्रुफे ही कधीच फुलप्रुफ नसतात असं मी बोलून गेलो मात्र, लागलीच कम्पॉझिटर्सची निषेधाची सभा! खरं पाहता त्यांनी हा विनोद भिकार आहे, श्लेष रटाळ आहे, असं म्हणायला हवं होतं. परंतु त्यांनी निषेधाचा एक छापील ठराव पाठवला. “आपण आमचा व्यावसायिक प्राइड दुखावला आहे' असं त्यांनी त्यात लिहिलं होतं. परंतु त्यातही पुन्हा इमानानं छपाईची चूक करून त्यांनी व्यावसायिक प्राइडला व्यावसाइक ब्राइड केलं. आणि तेव्हापासून कम्पॉझिटर्सबरोबर माझी पत्नीही माझ्याकडे संशयानं पाहू लागली.

माझे आजोबा लेखक होते. त्यांनी हिंदू सणांचा इतिहास लिहिला आणि टागोरांच्या गीतांजलीचं भाषांतर केलं. माझे वडील कारकुनी आणि कागद

विकण्याचा धंदा करीत. त्यांनी कोरे कागद विकण्याचा अधिक प्रामाणिक धंदा केला, मी छापलेले कागद विकतो. मी वकील व्हावं, ही वडिलांची इच्छा - तसा मी वकिलीची परीक्षा पास झालो आहे - परंतु वकील होण्याबरोबरच मी गवई व्हावं अशीही त्यांची इच्छा होती. बहुधा वकिलीचा धंदा मला जमणार नाही, तेव्हा पोटापाण्यासाठी तरी मी गवई व्हावं; असंही त्यांना वाटलं असेल. आता पाहा, माझ्या आजोबांना मी लेखक व्हायला हवा होतो, वडिलांना मला गवई करायची इच्छा होती, आणि मला नट व्हायचं होतं. सध्या मी माझ्या पित्याची, पितामहांची आणि माझी स्वत:ची; अशा सर्वांच्या इच्छा पुऱ्या करण्यात गुंतलो आहे. नट, वकील, लेखक, गवयी एकदम होण्यात तशी गंमत आहे.

परंतु त्याहून गंमत अशी की - गवई मला लेखक मानतात, लेखक माझ्या गाण्याच्या ज्ञानाचं कौतुक करतात, आणि सहकारी नटमंडळी माझ्याकडून कायद्याचा सल्ला घेतात - हे व्याप मला पुरून उरतात.

कलेला कुरूपतेचं वावडं
मला विनोदकार म्हटलेलं आवडत नाही, मी विनोदाचा कारखाना उघडलेला नाही. मला जसं लिहायला आवडतं, तसं मी लिहितो. वाचक हसले म्हणजे मला आनंद होतो. परंतु त्यांना विनोदातील कारुण्याचं दर्शन घडतं, तेव्हा मला खरं समाधान मिळतं. विनोदाचा उपयोग मी अनेकदा शस्त्रासारखा केला आहे. परंतु कमरपट्ट्याखाली न मारण्याची दक्षता मी घेतो - आता हे कमरपट्टेच काही लोक फार वर बांधतात, त्याला माझा नाइलाज आहे. जो विनोद दुखावतो, तो कुरूप असतो. कलेला कुरूपतेचं कौतुक असू नये...

माझा वाड्मयीन प्रवास सुखाचा झाला आहे, कारण मी कधी सक्तीनं लिहिलं नाही. खेरीज आधुनिक कथेतील प्रवाहांवर जिथं चर्चा होते, बदलत्या समाजातील आजच्या लेखकाचं स्थान वगैरे विषयांवर जिथं पेपर्स वाचले जातात, असले वाड्मयीन परिसंवाद मी टाळत आलो आहे. दिवसाचे चोवीस तास मला लेखकाच्या भूमिकेत राहायला आवडत नाही. मी लिहायला बसतो, तेव्हा मी लेखक असतो, स्टेजवर मी नट असतो आणि बसच्या लांब क्यूमध्ये उभा असलो म्हणजे मी इतर प्रवाशांबरोबर बस कंपनीला जोरजोरात नावं ठेवीत असतो. म्हणूनच परिसंवादाचे धूर्त व्यवस्थापक विद्वानांच्या मेळाव्यात भाग

घेण्यासाठी मला कधी बोलावत नाहीत आणि भारतीय किंवा कोणत्याही वाड्मयातील प्रवाह माहीत नसल्यानं मीही त्यांना चुकवून, त्या विद्वत्तेच्या जंजाळात अडकण्याऐवजी एखाद्या थिएटरमध्ये संगीतज्ञांच्या संगतीत रंगून जाणं, किंवा माझ्या आवडत्या पानांच्या दुकानासमोर वेळ घालवणं मी पसंत करतो. आपण तरुण आहोत असं तिथं मला वाटतं...

लेखकाचं स्वातंत्र्य
लेखकाच्या स्वांतत्र्याविषयी अलीकडे बरीच चर्चा चाललेली आहे. निर्मितिक्षम असा लेखक मला पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यासारखा वाटतो. पाण्यातून जन्म घेऊन, आणि अधिकांश पाण्यात राहूनही तो जसा जरासा पाण्याच्या पातळीवर राहतो, तसाच समाजातून निर्माण झालेला सर्जजशील लेखक समाजातच मरतो, परंतु कलावंत म्हणून समाजाहून जरा उंचीवर जगतो. त्या बर्फाच्या खड्याचं अस्तित्व जसं पाण्यावर अवलंबून असतं, तसं त्या लेखकाचंही अस्तित्व समाजावरच पोसलेलं असतं, परंतु नीट निरखता यावं यासाठी जरा उंचीवर जगणं त्याला भाग असतं. लेखकाचं एवढं किमान स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. जर त्याचं मस्तक उन्नत नसेल, तर त्याच्या निर्भय मनाचा, निर्भय वृत्तीचा साक्षात्कार अशक्य आहे आणि ही निर्भयता तर कलात्मक सर्जनाची मोठीच शक्ती आहे. समाजात रमणारा, त्यावर प्रेम करणारा लेखक या स्वातंत्र्याचा दुरुपयोग कधीही करणार नाही. मात्र ही विनीत वृत्तीची ओढ आंतरिक असायला हवी. याच वातावरणात लेखकाला आपल्या निष्ठांशी इमान राखता येईल. आपल्या निष्ठांना मानावं, इतरांना मानू द्यावं हा मला जाणवलेला लोकशाहीचा अर्थ आहे. केवळ तंत्रांच्या कोड्याचं अमानवी असमर्थनीय अशा निर्मितीचं प्रेम मला नाही. स्पेडला स्पेड म्हणा, असं जॉ पॉल सार्त्र यांनी म्हटलं आहे. शब्द जर दुबळे झाले, तर त्यांना ताकद देण्याचं आमचं काम आहे. जे दुर्बोध आहे, त्याचा भरवसा मला वाटत नाही. सर्व प्रकारच्या औद्धत्याचं ते मूळ आहे, असं मला वाटतं.

म्हणूनच टीकाकार जेव्हा मला लोकप्रिय लेखक म्हणतात, तेव्हा त्यातील कुचेष्टेच्या सुराकडे मी दुर्लक्ष करत आलो आहे. उलट माझे वाचक मला समजू शकतात, याचा मला अभिमान आहे. त्यांनी मला समजावं हीच माझी इच्छा आहे. मी त्यांच्यासाठी लिहितो, पण त्यांच्या खुशामतीसाठी लिहीत नाही. तुम्ही लिहिता म्हणजे काय करता, तर जो तुमच्याशी मनःसंवाद साधू शकेल, तुमच्याबरोबर हसू शकेल, रडू शकेल अशा वाचकांच्या शोधात तुम्ही असता. जे-जे विरूप आहे, विकृत आहे, ज्यातून विफलतेची भावना निर्माण होत आहे, त्याविरुद्ध मी आवाज उठवत आलो आहे. ढोंगीपणाविरुद्ध, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या शाब्दिक शिष्टपणाविरुद्ध आणि 'इतरांशी आम्हांला काय कर्तव्य' या भूमिकेविरुद्ध मी नेहमीच शस्त्र उसपले आहे. हे शस्त्र आपोआपच माझ्या हाती आलं.

मी हसतो, मलाच हसतो. माझे वाचकप्रेक्षकही मग मला हसतात आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, आपण स्वतःलाच हसत आहोत. समाजाच्या एकूण तब्येतीस ते बरं असतं. माझ्या लेखनातून एवढंच हाती लागावं, ही अपेक्षा. नेपोलियननी जोसेफाइनला म्हटलं, “मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु मला तुझ्यावर याहून शतपटीने प्रेम करायचं आहे''- मलाही म्हणावंसं वाटतं, “मी साहित्यावर प्रेम करतो, परंतु मला साहित्यावर अजून शतपटीनं प्रेम करायचं आहे!

पुस्तक - गाठोडं

0 प्रतिक्रिया: