Friday, April 5, 2019

पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला, अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला, मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा 'पु. ल.' नावाचा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! अशा या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व (क्रमांक एक ते १० एकटेच असेलेले) आणि अष्टपैलू कलावंत पु. ल. देशपांडे यांचे काल (८ नोव्हेंबर २०१८)पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्तानं ज्येष्ठ विनोदी लेखिका मंगला गोडबोले लिखित 'पु. ल. : चांदणे स्मरणाचे' हे चरित्रपर पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
बंगालची समृद्ध संस्कृती, ललितकलांची दीर्घ पार्श्वभूमी, रवींद्रनाथांचा जनमानसावरचा घट्ट पगडा ह्यांचं आकर्षण होतं. तसंच शांतिनिकेतनची निसर्गस्नेही शिक्षणपद्धतीसुद्धा पुलंना मोह घालत होती. 'गप्प बसा' संस्कृतीचा, पुस्तकी पांडित्याचा पुलंचा तिटकारा ठिकठिकाणी व्यक्त झालेला आहे. त्यामुळे शांतिनिकेतनमधलं मुक्तांगण एकदा बघायचंच होतं. शिवाय नकळत्या वयापासून आजोबांकडून टागोरांची महती कानांवर सतत आलेली होती. आजोबांनीही पन्नाशीनंतर बंगाली भाषा शिकण्याचा घाट घालून तिच्यावर उत्तम प्रभुत्व मिळवलेलं होतं. तेव्हा हा ज्येष्ठांचा धडा गिरवायचा होता. वयाच्या पन्नाशीत विद्यार्थिदशा पत्करणं सोपं नव्हतं. पण रवींद्रनाथांसमोर सदैव लीन झालेले आजोबा पक्के स्मरणात असल्यानं पुलंनी हा प्रयोग करून पाहण्याचं ठरवलं. सुनीताबाईंनीही ह्या कल्पनेचं स्वागत केलं. पुलंनी सतत गर्दीनं वेढलेलं राहू नये, एकांतात राहावं, आत्मसंवाद करावा, तो त्यांच्या प्रतिभेला पोषक ठरेल; असं त्यांना मनोमन वाटत होतंच.

आतापर्यंत खरं तर पुलंना प्रवासांचं काहीच नावीन्य राहिलेलं नव्हतं. 'अपूर्वाई', 'पूर्वरंग'च्या संबंधातले दूरदेशीचे प्रवास झाल्यानंतर त्यांच्या पायांवर जसं काही चक्रच पडलं होतं. देशांतर्गत प्रवास म्हणजे कारणपरत्वे दिल्लीच्या वाऱ्या, बहुरूपी खेळ ज्या ज्या गावी असतील, तिथे जाणं-येणं आणि अध्यक्षपदांसाठी, व्याख्यानांसाठी केलेले दौरे, हे अव्याहत सुरू होतंच. याखेरीज व्यक्तिगत हौसेनं केलेली एकदोन परदेशी पर्यटनंसुद्धा खात्यावर होती. पण हे बहुतेक प्रवास हा ना तो गौरव, सन्मान वगैरेंसाठी असत. आता पुलंना गौरवांची तेवढीशी अपूर्वाई उरली नव्हती. मनात एक विचित्रशी कोंडी, खुंटलेपण आलेलं होतं. पुन्हा एकदा एक सर्वसाधारण माणूस होऊन माणसांमध्ये मिसळण्याची ओढ लागली होती. हे कुंठलेपण त्यांनी व्यक्त केलं होतं, ते पत्रकार स्नेही सलील घोष ह्यांच्याजवळ!

ह्याच्या पुष्कळ नंतर म्हणजे ५ एप्रिल १९९०च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या अंकामध्ये सलील घोष ह्यांनी 'बंगालमध्ये पु.ल.' ह्या नावानं जो लेख लिहिला आहे, त्यात पुलंची १९७०ची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला बंगाली शिकायचंय, तू काही व्यवस्था करू शकतोस का बघ, असं सलीलदांना सांगताना पुल म्हणाले होते, ''सलील, तुला ठाऊक आहे? कलावंताच्या मनात काही वेळा कोंडी निर्माण होते. विचित्र अशी निराशा दाटते. म्हणूनच पाहायचे आहे की, बंगाली भाषेचे, साहित्याचे, लोककलांचे ज्ञान करून घेऊन मला काही स्फूर्ती येते का? काही नवीन, अगदी वेगळी जाणीव निर्माण होते का?''

सलीलदांना ह्यातली बोच अचूक समजली. त्यांनी व त्यांच्या पत्नी शार्लट ह्यांनी पुलंसाठी जानेवारी ते मार्च ह्या कालखंडातली मुख्यत: शांतिनिकेतनची व कलकत्त्याची सफर आखली. हा काळ हा बंगाली समाजातला यात्रा, जत्रा, मेळे, पारंपरिक सांस्कृतिक उत्सव ह्यांच्या धामधुमीचा असतो. सुगीचे दिवस असतात. हवा सुखद असते. एकूण जनमानसात उल्हास असतो. लोकजीवनाशी एकरूप होण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. ह्या दृष्टीनं ह्या जोडप्यानं पुलंची शांतिनिकेतनमध्ये राहण्याची सोय केली. आणि इतक्या प्रौढ वयात, वसतिगृहात राहण्यासारखा अनुभव घ्यायला पुल हौसेनं पुढे सरसावले.

'ह्या सगळ्या झुली उतरवून बंगालीचा स्वाध्याय करायला निघालेला एक बटू म्हणून मला बंगालात जायचे होते. या भूमिकेत मला सर्वांत अडचण होती, ती इतक्या वर्षांच्या संस्कारातून घडलेल्या माझ्याविषयीच्या माझ्या स्वत:च्याच प्रतिमेची. ती मला माझ्या हातांनी फोडायची हेाती.' ('व्यंगचित्रे' : पृष्ठ १५ वरून)

अशा शब्दांमध्ये पुलंनी 'वंगचित्रे'मध्येही आपलं तेव्हाचं हृदगत मांडलं आहे. वास्तविक पुलंचं शांतिनिकेतला जाऊन राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. मुलूख परका. भाषा परकी. खाणंपिणं इत्यादी दैनंदिनीच्या गोष्टी परक्या. सत्तरच्या दशकात असल्यानं संपर्कसाधनं, प्रवासाची साधनं संख्येनं कमी आणि जास्त वेळखाऊ. इकडच्या मुंबईपुण्याकडच्या बातम्या कळण्याच्या शक्यता कमी. इथल्या वृत्तपत्रसृष्टीपासून तुटलेपण. ह्यामुळे पुलंना अगदी अप्रिय असणारा एकटेपणा वाट्याला आलेला. शांतिनिकेतनपासून सुमारे मैलभर अंतरावर एक्स्टेन्शन ब्लॉक्स बांधलेले होते. त्यात पुल राहत होते. बोलपूरचा रस्ता जवळ होता. त्यावरून बाजारात, स्टेशनवर जाता येई. पण माणसानं ओढण्याच्या रिक्षा हे एकमेव वाहन सहज मिळे, जे वापरणं पुलंना संकोचाचं वाटे. पुण्या-मुंबईची पत्रं ८-१० दिवस मिळत नसत. सुनीताबाई दरम्यानच्या काळात उरळीकांचनला निसर्गोपचार घ्यायला राहिल्यामुळे त्यांचा संपर्क आणखीच अवघड होई. पुलंचा सगळा दिवस अभ्यासात, वाचनात जाई. पण संध्याकाळी फार एकटेपणा येई. कधी कधी आसपासच्या बंगाली बाबूंचा आळशीपणा, बाबूगिरी बघून चिडचिड होई; तर बंगाली बायकांचं परंपरेखाली पिचलं जाणं त्रासदायक वाटे. बंगालमधली हवा आणि बंगाली माणसांचा स्वभाव 'प्रचंड लहरी' असल्यानं, क्षणाक्षणांत दोघांचे नूर बदलत असल्यानं सुरुवातीला खूपच बिचकायला होई. पावसाची झोंड सुरू झाली, की अनेकदा वीज जाई. त्या अंधाराशी जमवून घेणं अधिकच कष्टप्रद ठरे. तिकडे डास-मच्छर हेही फार असत. वीज गेली की घरातला पंखा बंद, भयंकर उकाडा, डास, बाहेरचा अंधार अशी सार्वत्रिक कोंडी व्हायची. अत्यंत पाणचट दुधाचा मचूळ चहा, आणि मुख्यत्वे भात आणि बटाट्यांचा वापर केलेलं थंडगार जेवण. फळं खाण्याची चाल कमीच. ह्यामुळे तोंडाची चवच गेल्यासारखी वाटे. त्यातल्या त्यात दोन बाबतींमध्ये बंगाल्यांशी गोत्र जुळण्याची शक्यता वाटे. त्यांपैकी पहिली, त्यांचं मत्स्यप्रेम आणि दुसरी, त्यांचा संगीताकडे असणारा कल. अत्यंत रुक्ष वाटणारा बंगाली बाबूही रवींद्रसंगीतानं कसा भारावतो, संवादोत्सुक होतो; हे पाहून पुल मनोमन खूश होतं. तेव्हाच्या शांतिनिकेतन मुक्कामात पुलंचा बऱ्याच बंगाली कुटुंबांशी परिचय झाला. त्यातल्या बहुतेकांना बंगालमधली जात्रागीतं, रवींद्रसंगीत, आधुनिक भावगीतं वगैरे येत असल्याचं पुलंना जाणवलं. काही काळ तिथल्या पारंपरिक ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायला पुल पुरुलिया भागामध्ये तिथल्या आदिवासींची खेडी-पाडे वगैरे बघायला, अनुभवायला गेले होते. तिथल्या सावताळ (इंग्रजीत 'संथाळ') युवतींची अनेक समूहगीतं पुलंना खूप आवडली.

शांतिनिकेतनला गेल्यावर पहिल्या पाच-सहा आठवड्यांमध्ये पुल बंगाली वाचायला शिकले. बंगाली ही पिंडत: संस्कृतप्रचुर भाषा. ६०-७० टक्के तत्सम शब्दांचा भरणा असणारी. बंगालीचं व्याकरण मराठीच्या व्याकरणापेक्षा सोपं. तो-ती-तेचा उपद्रव नसलेलं. त्यामुळेच बंगाली माणूस इंग्रजी बोलतानाही 'ही' आणि 'शी'मध्ये हमखास गोंधळ करणारा. ह्यामुळे आणि पुलंच्या उपजत भाषिक कलामुळे ते सहजपणे बंगाली वाचायला लागले. समोरच्यांचे बंगाली संवाद समजू लागले. रोज सकाळी साडेसहाला उठणं, नंतर ११ वाजेपर्यंत धडे-व्याकरण-गृहपाठ ह्यांच्याशी झटापट करणं आणि नंतर बंगाली साहित्य वाचणं - असा दिनक्रम असे. सुरुवातीला पुलंना एक सर्वसाधारण छापील बंगाली पृष्ठ वाचायला हाताशी शब्दकोश घेऊन १५ ते २० मिनिटं लागत. नंतर हा वेळ कमी कमी होत गेला. बंगाली वर्तमानपत्रं वाचणं दोन महिन्यांमध्ये सर्रास सुरू झालं. त्यामुळे देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या बातम्या कळू लागल्या. पण बंगाली वर्तमानपत्रांमधल्या दंगली, जाळपोळी, लूटमार, मोर्चे ह्या छापाच्या विध्वंसक बातम्या वाचून उद्वेगही यायला लागला. टागोरांची 'घाटेर कथा' म्हणजे नदी घाटाची कथा ही पुलंनी तिथे संपूर्ण वाचलेली पहिली बंगाली कथा. मग मात्र त्यांना अलीबाबाची गुहाच उघडल्यासारखं झालं. गुरुदेवांच्या कथा, कविता, बालसाहित्य वाचण्याचा सपाटाच त्यांनी सुरू केला.

गुरुदेवांच्या साहित्यातून बंगाली समाज-संस्कृती त्यांना परिचयाची झालीच, पण जास्त प्रभाव पडला, तो त्यांनी नोंदवलेल्या निसर्गाच्या नाना लीलांनी. शैशवातल्या कुतूहलानं तरुपल्लवांना खूप बारकाईनं न्याहाळणारे गुरुदेव पुलंना सर्वांत भावले. मराठीतही वृक्षवल्ली अन् वनचरांना सोयरी मानणारा तुकाराम आहेच. पण गुरुदेवांची दृष्टी आणि भक्ती आणखी व्यापक ठरते, जवळजवळ महाकवी कालिदासाच्या तोडीची ठरते, असं पुलंनी पुढे नोंदवलंही आहे.

शांतिनिकेतनच्या ग्रंथालयात जाण्याचा पुलंचा रोजचा रस्ता हा एका आम्रकुंजातून होता. त्यामुळे ऋतुचक्राची रोजची चाल त्यांना सहज बघायला मिळाली. धोधो... झिमझिम-सर-झड अशा सर्व प्रकारचं धारानृत्य जवळून बघता आलं. त्यामुळे ह्या धारानृत्यावरच्या गुरुदेवांच्या अनेक कविता जास्त भिडल्या. वृक्षराजी, तिच्यावर वेगवेगळ्या वेळी येणारी फुलं, आसऱ्याला येणारा पक्षीगण हे बघायला मिळालं. पानगळ, नंतर आलेला आंब्याच्या मोहोराचा घमघमाट, तपोवनातली बदलती रंगसंगती हेही दिसलं.

७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रवींद्रसप्ताह झाला. त्यात एकदा 'What Ravindranath meant to me?' ह्या विषयावर पुलंनी भाषण दिलं. रवींद्रनाथांची पुण्यतिथी झाली, त्या दिवशी वृक्षारोपण महोत्सव झाला. त्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांना केलेलं काव्यमय आवाहन ऐकायला मिळालं. कथांचे पाच खंड, नोटेशनसह तीन हजार गीतं ही गुरुदेवांची अफाट साहित्यनिर्मिती बघून ते खरे 'पुरुषावतार' ठरतात, हे जाणवलं. एवढ्या प्रचंड व्यापातून गुरुदेवांनी आप्तांना आणि छात्रांना हजारो पत्रं लिहावीत, ह्यातून त्यांची संवादोत्सुकता जाणवली. हा सगळा व्यासंग अजून वर्ष-दीडवर्षं जारी राहिला, तर आपण बंगालीमध्ये लिहू शकू, इतपत आत्मविश्वासही आला. पण ते व्यवहारात शक्य नव्हतं, म्हणून चांगला बंगाली वाचक होणं इथवरच पुलंनी उद्दिष्ट ठेवलं आणि गाठलंही

शांतिनिकेतनच्या वास्तव्यात मोकळी हवा, (नाइलाजानं) मित आहार, उत्तम वातावरण आणि परिसरात भरपूर चालणं, यामुळे पुलंची प्रकृती उत्तम राहिली. सलील घोष, त्यांचे बंधू शांतीदा आणि वहिनी ह्यांनी ह्या सर्व काळात पुलंची उत्तम बडदास्त ठेवली. याबद्दल पुल नेहमी कृतज्ञ राहिले.

थोडक्यात सांगायचं तर, कुठेही जाऊ तिथे सामावू, ह्या वृत्तीनुसार पुल शांतीनिकेतनातही रमले, वंगरंगात रंगले. त्या अनुभवांविषयीची एक लेखमाला त्यांनी 'वंगचित्रे' ह्या शीर्षकाखाली १९७१च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीमध्ये लिहिली. पुढे त्या लेखांच्या संकलनाचं 'वंगचित्रे' हे पुस्तक १९७४ मध्ये प्रसिद्ध झालं. आजवर पुलंचं प्रवासवर्णन आणि शि. द. फडणीस ह्यांची व्यंगचित्रं ह्यांची एक सुखद-आनंददायी सांगड मराठी वाचकांच्या खूप परिचयाची झाली होती. तसा केवळ आणि निखळ आनंदाचा प्रत्यय 'वंगचित्रे'नी दिला नाही. समाजचिंतक पुल, अंतर्मुख पुल, भविष्यातल्या उदासीनं घेरलेले पुल अशी त्यांची काहीशी अपरिचित रूपं 'वंगचित्रे'मधून त्यांच्या वाचकांसमोर आली. त्यात त्यांच्या ह्या प्रवासाच्या शेवटीशेवटी बंगालमध्ये राजकीय अस्वस्थता वाढू लागली. नक्षलवाद डोकं वर करू लागला. १९७१च्या पुलंच्या दुसऱ्या बंगालवारीत तर ह्या राजकीय अशांतीमुळे मुक्काम तीन महिन्यांवरून फक्त महिन्यावर आणावा लागला. काहीशा भ्रमनिरासाच्या अवस्थेत पुलंना बंगाल सोडावा लागला. ह्या सगळ्याची कडवट चव थोडीफार डोकावू लागली. हे सगळं जरी खरं असलं, तरी ह्या मुक्कामात पुलंनी बंगाली भाषा चटकन आणि उत्तम प्रकारे आत्मसात केली. उपजत असणारा भाषेकडचा कल आणि नादलयीची समज त्यांना उपयोगी पडली असणार; पण बंगाली बोलणं, वाचणं आणि जरूर तेव्हा बंगाली लिहिणं त्यांना जमू लागलं. पुलंनी बंगाली स्नेह्यांना लिहिलेली बंगाली भाषेमधली पत्रं उपलब्ध आहेत. बंगालीशी अशी हातमिळवणी करताना पुल रवींद्रनाथांच्या अधिकाधिक जवळ जावेत, हे ओघानं आलंच. आजोबा ऋग्वेदींमुळे त्यांच्या मनावर रवींद्रनाथांचा ठसा होता. टागोरांना गीतांजलीबद्दल नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ऋग्वेदींनी त्याचं 'अभंगगीतांजली' हे प्रासादिक भाषांतर केलं होतं. टागोर एकदा मुंबईला आले असताना ऋग्वेदींनी आपल्या 'अभंगगीतांजली'ची प्रत त्यांच्या पायांवर ठेवून त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला होता. त्या वेळी हे दोघे साधारण एकाच वयाचे हेाते! पण वंशपरंपरेनं आलेली ही टागोरभक्ती पुलंच्या बंगालीच्या व्यासंगानं अधिक टोकदार झाली. पुढे पुलंनी १९७७च्या 'महाराष्ट्र टाइम्सच्या वार्षिका'मध्ये रवींद्रनाथांवर दीर्घ लेख लिहिला. विलेपार्ले, पुणं, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर अशा चार ठिकाणी रवींद्रनाथांच्या जीवनकार्यावर व्याख्यानं दिली. काही काळानंतर 'रवींद्रनाथ : तीन व्याख्याने' हे त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं. पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

मंगला गोडबोले
अक्षरनामा


0 प्रतिक्रिया: