Thursday, January 31, 2013

जगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक - अरुण खोरे

आचार्य अत्रे यांच्या नंतर विनोदाचा वसा घेऊन मराठी साहित्य संस्कृतीला बहुमिती देणारे पु.ल.देशपांडे यांच्या नावाची मोहिनी मात्र विलक्षण जबरदस्त होती आणि आहेही. ’पुल’ या  आद्दाक्षराने आणि ’भाई’ या संबोधनाने ओळखले जाणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे लेखक तर होतेच; पण ते गीतकार होते, संगीतकार होते, एकपात्री प्रयोगाचे कर्ते होते, अभिनेते होते, उत्कृष्ट नाटककार होते, अनुवादकार होते, चरित्रकार होते; मराठी जनांना आनंदून टाकणारे, चैतन्याची कारंजी फुलवणारे सदाबहार वक्ते होते. याच्याबरोबरच मराठी लेखकांच्या परंपरेतील सामाजिक भानाचे संचित घेऊन पुढे निघालेले ते खरेखुरे समाजचिंतकही होते.
                                              
उदंड लोकप्रियतेने त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्यांनी मराठी साहित्य व प्रकाशन क्षेत्रात अनेक विक्रम नोंदवले. त्यांचे लेखक म्हणून स्मरण करताना हे सारे आठवतेच; पण त्यापेक्षाही जास्त लक्षात येते ते पुलं आणि सुनिताबाई या दोघांनीही या पुस्तकातून, नाट्यप्रयोगातून जे पैसे मिळाले, ते चारही करांनी समाजाला वाटुन टाकले. अगदी बाबा आमटे यांच्या आनंदवनापासून ते पुण्यातील डॉ. सुनंदा व अनिल अवचट यांच्या ’मुक्तांगण’पर्यंत लक्षावधी रुपयांच्या देण्ग्या त्यांनी दिल्या आणि साधेपणाने आपला प्रपंच पार पाडला. आणिबाणीच्या काळात मराठी लेखक-कवी गप्पगार झाले असताना (अपवाद-दुर्गाबाईंचा) त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या डायरीचे त्यांनी भाषांतर केले होते. आणिबाणी उठल्याबरोबर एक लेखक म्हणून जनजागृतीसाठी ते बाहेर पडले. त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी व्हायची. पुण्यातील शनिवारवाडा मैदानावरची १९७७ सालची त्यांची सभा आजही विसरता येत नाही. त्यावेळ्च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लेखक-कार्यकर्त्यांची भूमिका संपली असे सांगून त्यावेळी जाहीर झालेल्या जनता पक्ष विजयी सभेला ते आले नाहित. हा संयम, ही मर्यादा, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृत सभ्यतेचे प्रतिक होती.

महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी ’नामस्मरणाचा रोग’ असा घणघणाती लेख लिहून महापुरूषांच्या कार्याचे अनुसरण केले पाहिजे, असे म्हटले होते, पुण्यातील दलित नाट परिषदेच्या उद्घाटनाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली आणि तेथील वेदनेच्या सुरात सूर मिळाला. नव्या लेखकांना, कवींना त्यांनी फार आस्थेने प्रोत्साहन दिले.

पुलंच्या साहित्याचा, वक्तृत्वाचा आणखी एक पैलू, आंतरभारतीच्या संवेदनेने जोडलेला होता. मराठी साहित्यात त्यांच्यामुळे अन्य भाषांमधील चांगले साहित्य यायला सुरुवात झाली. हेमिंग्वेच्या ’द ओल्ड मॅन ऍण्ड सी’ या कादंबरीचा अनुवाद त्यांच्या लेखणीतून मराठीत आला ‘एका कोळियाने’ या नावाने. पुलंनी बंगाली भाषा शिकली ती थेट रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनाला जाऊनच. त्यावरचे त्यांचे पुस्तकही विलक्षण गाजले. रवींद्रनाथांवरची त्यांची भाषणेही गाजली आणि त्याच्या संकलनाचे नंतर आलेले पुस्तकही. महाराष्ट्रात त्यांच्यामुळे बंगाली साहित्याचे, संगीताचे, चित्रकलेचे विशेष प्रेम रुजले, याच्याच जोडीने कन्नड भाषेतील साहित्य मराठीत आणायचे त्यांनी प्रयत्न केले.

याखेरीज आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील पुलंची कारकिर्द हीही तितक्यात मोठ्या योगदानाची होती. आकाशवाणीवर भाषण कसे करावे; यावरची त्यांची दोन पुस्तके त्या क्षेत्रातील नवोदितांनी व जाणकारांनी वाचायला हवीत.

अरुण खोरे
पुढारी
८ नोव्हेंबर २०११

2 प्रतिक्रिया:

Yashodhan said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

Very Nice....