या बाबतीत प्रसिद्ध लेखक बाळ सामंत यांनी त्यांच्या ‘ मैफल ‘ या पुस्तकात दिलेली आठवण उद्बोधक आहे॰ १९४८-४९ च्या सुमारास गिरगावात केनेडी ब्रिजजवळ चित्रकार दीनानाथ दलाल यांचा स्टुडिओ होता॰ दलाल हे नामवंत चित्रकार, पुस्तकांची वेष्टणे रेखाटण्यात वाकबगार आणि ‘ दीपावली ‘ या मासिकाचे संपादक॰ त्यामुळे त्यांच्याकडे जो वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचा राबता असायचा त्यांत साहित्यिकही असायचे॰ त्यांच्याकडे जमणार्यांत केशवराव भोळे, अनंत काणेकर यांच्यासारख्या ज्येष्ठांपासून पंचविशीतील बाळ सामंत,पु॰ ल॰ देशपांडे यांच्यापर्यंत सर्वजण असायचे॰ एक दिवस एक चेहेर्यावरून भविष्य सांगणारा कानडी ज्योतिषी तेथे आला॰ त्याला कन्नड आणि मोडके तोडके इंग्लिश या भाषा येत होत्या॰ भविष्य म्हटल्यावर कितीही त्यावर विश्वास न ठेवणारा असला तरी तो स्वत:चे वा अन्य माणसाचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतोच॰ थोड्यावेळाने पी॰ एल॰ तेथे आले॰ ते समाजवादी॰ भविष्य वगैरे गोष्टींची चेष्टा करणारे॰ त्यांनी चेहर्यावर कुचेष्टेचे भाव आणून काही शेरेबाजी केली॰ ती कानडी माणसाला अर्थातच कळली नाही॰ शिवाय त्याला पी॰ एल॰ कोण होते हेही ठाऊक नव्हते॰ अर्थात त्यावेळेस पी॰ एल॰, लाडके व्यक्तीमत्व तर सोडाच नामवंतही झालेले नव्हते॰ पण हे अवमानकारक काहीतरी बोलले हे त्या ज्योतिषाने ओळखले॰ त्याने पी॰ एल॰च्या चेहर्याकडे बघितले आणि शांतपणे सांगितले की या माणसाचे लग्न झाल्यावर यांची पत्नी २१ दिवसाच्या आत निधन पावली आहे॰ पी॰ एल॰ हादरले ! कारण गोष्ट खरी होती॰ हे पुस्तक 1984 – 85 च्या सुमारास प्रकाशित झाले आहे॰
नंतर २००० साली मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा नेहरूंचे अभ्यासक डॉ॰ न॰ गो॰ राजूरकर यांच्याकडे गेलो होतो॰ त्यांना राज्यशास्त्राबरोबर ज्या अन्य विषयांत रूची होती त्यात ज्योतिष हा विषय होता॰ त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे॰ त्यांनी मला जर असे काही ज्योतिषाचे खरे अनुभव आले असतील तर सांगण्याची विनंती केली॰ मी हा प्रसंग सांगितला॰ तो त्यांना ठाऊक नव्हता॰ ते म्हणाले की मी या विषयावरच्या व्याख्यानात या गोष्टीचा उल्लेख करेन, पण त्यांना त्याचा पुरावा हवा होता॰ मी या पुस्तकाचे नाव सांगितले॰ ते पुस्तक त्यांना हैदराबादच्या ग्रंथालयात काही मिळाले नाही॰ इकडे मलाही हे पुस्तक मिळेना॰ २००४ च्या डिसेंबरमध्ये म्याजेस्टिक प्रकाशनाच्या अशोक कोठावळे यांच्या मुलीचे लग्न होते॰ त्या लग्नाला बाळ सामंत आले होते॰ त्यावेळेस ते ८२ वर्षांचे होते॰ त्यांना मी भेटलो; आणि या पुस्तकाबद्दल सांगून याची एक प्रत मला विकत हवी आहे, असे सांगितले॰ त्यावेळेस त्यांना स्मृतीभ्रंश झालेला होता॰ त्यांना आपण असे पुस्तक लिहिले आहे हेच आठवेना; त्यामुळे तो प्रसंग आठवणे तर शक्यच नव्हते॰ पण ते म्हणाले की घरी बघतो, आणि प्रत असली तर तुला पाठवतो॰ मी माझे कार्ड त्यांना दिले; आणि पुस्तक व्ही॰ पी॰ ने पाठवावयास सुचवले॰ ती प्रत काही मला आली नाही॰ मात्र, एक दोन महिन्यांनी मी पुण्याला डे॰ जिमखान्यावर सकाळी एका मित्राची वाट बघत होतो॰ तेथेच ‘ उत्कर्ष प्रकाशन ‘ चे ऑफिस आणि दुकान होते॰ त्यांनीच हे पुस्तक प्रकाशित केले आहे॰ त्यांना सहज विचारले तर नुकतीच नवीन आवृत्ती प्रकाशित झालेली होती, त्यामुळे ते पुस्तक मिळाले॰ ते मी विकत घेऊन ताबडतोब समोरं असलेल्या मुख्य पो॰ ऑ॰ मधून न॰ गो॰ रा॰ ना बुक पोस्ट केले॰
पण या पी॰एल॰ च्या प्रसंगाला आणखी एक उपकथानक आहे॰ विनोदी लेखक रमेश मंत्री यानी त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग ‘प्रारंभ‘ या नावाने लिहिला आहे॰ ( नंतर त्यांना अर्धांग वायुचा झटका आल्याने उरलेले दोन भाग त्यांना लिहिताच आले नाहीत ! काय दुर्दैव ना ? ) त्यात एक प्रसंग असा आहे॰ रमेश मंत्री उपवधू झाले आणि त्यांना लग्नासाठी मुली सांगून येऊ लागल्या॰ त्यांना एक अत्यंत सुंदर आणि पदवीधर ( १९५०च्या दशकात पदवीधर मुली अपवादानेच असायच्या॰ ) मुलगी सांगून आली॰ मात्र, मुलीच्या भावाने आणि वडिलांनी मंत्रींची पत्रिका मागितली॰ कारण तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न एका लेखकाशी झाले होते; आणि ती ३ आठवड्यांत निवर्तली होती॰ मंत्रींचे आई – वडील लहानपणीच गेल्यामुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या नातेवाईकांकडे झाले; त्यामुळे पत्रिका वगैरे कुठून असणार ? त्यामुळे मंत्रीनी पत्रिकेबाबत असमर्थता दर्शवताच ते कुटुंबीय back out झाले॰ ‘ प्रारंभ ‘ हे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले; आणि मी त्याच वेळी वाचले होते॰ त्यावेळी तो लेखक कोण हे कुतूहल होते; पण मी त्याचा पाठपुरावा केला नव्हता॰ मात्र, ३-४ वर्षांनी हे पुस्तक मी परत वाचले; आणि मला चटकन सुचले की तो लेखक म्हणजे पी॰ एल॰ ! या बाबतीतले आपले गुरु म्हणजे रवींद्र पिंगे॰ मी त्यांना फोन केला॰ ते पण चक्रावले; पण म्हणाले की तो पी॰ एल॰ नाही॰ मी त्यांना ‘ प्रारंभ ‘ आणि ‘ मैफल ‘ मधली ती पृष्ठे परत वाचण्यास सुचवले; आणि काय आश्चर्य ? दोन तीन दिवसांनी मला पिंगे ‘ आयडियल ‘ मध्ये भेटले तेव्हा म्हणाले की तुझा तर्क अचूक आहे॰ तो पी॰ एल॰च आहे॰
यात रमेश मंत्रींचा मोठेपणा दिसला, तो मला आवडला॰ दुसरा कोणी असता तर ‘ यामुळे पु॰ लंचा साडू होण्याचा माझा योग हुकला ‘,असे लिहून मोकळा झाला असता॰ ( लेखक आनंद यादवना लहानपणी कोल्हापूर जवळच्या एका खेडेगावात एक मंत्री म्हणून मारकुटे मास्तर होते असे त्यांनी ‘ झोंबी ‘ या त्यांच्या आत्मकथनात लिहिले आहे॰ त्यावर रमेश मंत्रींनी ‘ हे मारकुटे मंत्री मास्तर म्हणजे माझे काका ‘ असे कबूल केले आहे ! )॰
मात्र, याच रमेश मंत्रींनी पी॰ एल॰ बाबतची आणखी एक आठवण सांगितली आहे; ती पी॰ एल॰ आणि सुनीताबाईंचा मोठेपणा सांगणारी आहे॰ मात्र ही आठवण बर्याच जणांना ठाऊक नाही॰ मंत्री आणि पी॰ एल॰ एकाच वर्षी एम॰ ए॰ चा अभ्यास करत होते॰ मंत्रींची परिस्थिती खूपच हलाखीची होती॰ कधी कधी त्यांना जेवणाही मिळत नसे॰ एक दिवस पी॰ एल॰ म्हणाले, ‘ रमेश, तू उद्या सकाळपासून माझ्याकडे दिवसभर अभ्यासाला आणि जेवायला ये॰ ‘ मंत्रींना दुहेरी आनंद झाला॰ कारण पी॰ एल॰ बुद्धिमान, तो फायदा; आणि दुपारचे जेवण सुटले ! त्याप्रमाणे ते सकाळी अभ्यासाला गेले॰ तो जोरात चालू झाला॰ सुनीताबाई घरात नव्हत्या॰ बाराचा सुमार आला तरी सुनिताबाईंचा पत्ता नाही॰ जेवणाकडे लक्ष ठेवत अभ्यास चालू ठेवला॰ अखेरीस दोन वाजायला आले, तरी सुनीताबाई आल्या नव्हत्या; तेव्हा मंत्रींच्या लक्षात आले की आज काही आपणास येथे जेवायला मिळणार नाही॰ ते चिडले; पण तो राग न दाखवता ते त्यांच्या खोलीवर निघून गेले॰ नंतर काही दिवस गेले; आणि हे पतीपत्नी मंत्रींना भेटले॰ तेव्हा पी॰ एल॰ म्हणाले की, अरे रमेश, त्या दिवशी तुला जेवायला बोलावले, पण तुला जेवायला न घालता उपाशीच परत पाठवले; म्हणून तू माझ्यावर रागावला असशील॰ पण अरे काय करणार ? सुनीता सकाळपासून रेशनच्या रांगेत उभी होती; पण त्या दिवशी चार वाजले तरी रेशनवर धान्य आलेच नव्हते॰ मग ती तशीच परतली॰ रेशनवर धान्य मिळाले नाही, म्हणून आम्हीही उपाशीच राहिलो; कारण काळ्या बाजारातून धान्य घ्यायचे नाही, अशी एक देशभक्त, सच्चा समाजवादी म्हणून आम्ही शपथ घेतली आहे ना ?
78 लाख रुपये वाटणार्या पी॰ एल॰पेक्षा हे पी॰ एल॰ मला मोठे वाटतात !
प्रकाश चांदे
मूळ स्रोत -> https://maitri2012.wordpress.com/2013/08/16/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a5%b0-%e0%a4%b2%e0%a5%b0-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80/
0 प्रतिक्रिया:
Post a Comment