Saturday, June 18, 2022

माझे वडील माझे चांगले मित्र म्हणूनच मला आठवतात.

वडील माणसांविषयी लहानांना सर्वात अधिक प्रेम वाटते ते त्यांना ह्या वडिलांनी दिलेल्या आनंददायक आठवणींमुळे. मुलांच्या नैसर्गिक आवडीची जोपासना करणाऱ्या बापाविषयी मनात विलक्षण प्रेम असते. अशा वडिलांची आठवण वृद्धापकाळीदेखील डोळ्यांत पाणी आणते.

मी ह्या बाबतीत स्वत:ला खरोखरीच भाग्यवान समजतो. लहानपणापासून मला संगीताची वाचनाची आणि नाटकाची आवड होती. परीक्षा तोंडावर आली असतानादेखील मी शाळकरी वयात गाण्याच्या बैठकींना जात असे. वडिलांना चोरून जावे लागले नाही. चांगले गाणे ऐकून मी अधिक आनंदित होऊन येईन याची वडिलांना खात्री होती. रात्री बुवा काय गायले ते येऊन मी वडिलांना सांगत असे. त्यावर आमचे बोलणे व्हायचे. गावात मंजीखां, मास्टर कृष्णराव, संवा्ईगंधर्व, वझेबुवा ह्यांच्यासारख्यांचे गाणे असताना रात्री मन अभ्यासाच्या पुस्तकात रमणार नाही आणि न रमलेल्या मनाने अभ्यास होत नसतो, हे त्यांना पक्के ठाऊक होते. मला पोहायला शिकायचेय म्हटल्यावर त्यांनी मला स्वत: विहिरीत ढकलून मागून उडी मारली होती. अशा डायरेक्ट मेथडने मी पोहायला शिकलो. मला माझे वडील आठवतात ते जीवनात चांगले साहित्य, संगीत, नाट्य अशा गोष्टींची गोडी लावणारे मित्र म्हणून, आमचे साधे, बेताच्या कारकुनी उत्पन्नात जगणारे कुटुंब. पण रोज संध्याकाळी मित्रमंडळींचा गपांचा अड्डा जमावा तसा आम्हा भावंडांचा, आईवडील, मामा, आजोबा, आजी यांचा अड्डा जमायचा. गाणे-बजावणे व्हायचे, चर्चा व्हायच्या, 'कविता-कथांचे वाचन व्हायचे. वडील मंडळींचा धाकदपटशा, मुलांची मारहाण वगैरे प्रकार मला आठवतच नाहीत.
पुलंचे वडील श्री लक्ष्मण त्र्यंब्यक देशपांडे 
माझे आजोबादेखील माझ्या पेटीतल्या सर्व सुरांशी फटकून असणाऱ्या स्वत:च्या स्वतंत्र सुरात तुकोबाचा अभंग किंवा पंतांच्या आर्या ऐकवत. मामा मा. दीनानाथ आपलाच शागीर्द आहे अशा थाटात 'परवशंतापाश दैवें', चंद्रिका ही जणूं' वगैरे ठेवून देत. ह्या वातावरणात पैशाच्या श्रोमंतीतून मिळणाऱ्या गोष्टींची आम्हां मुलांना कधी आठवणच झाली नाही. मी आयुष्यातली पहिली चप्पल मॅट्रिकच्या वर्गात गेल्यावर घेतली होती आणि चामड्याची पहिली बुटाची जोडी वयाच्या चाळिशीला आल्यावर, विलायतेला जायला निघालो तेव्हा विकत घेतली होती. त्या जोडीला अजूनही नवा जोडीदार भेटलेला नाही. माझ्या वर्गात तर चप्पल घालून शाळेत येणारी मुले पायाच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. अनवाणीपणाचे दुःखच नव्हते. आम्हाला आनंद पुरवण्याचे काम घरातल्या म्हाताऱ्या मंडळींचे होते. आणि ज्या ज्या कुटुंबातली वृद्ध माणसे हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करत असतात. मला पी. वाय. सी. जिमखान्याच्या दगडी कुंपणापाशी भरदुपारी छत्री घेऊन नातवाची क्रिकेट मॅच पाहायला उभे असलेले आजोबा त्या खेळापेक्षाही अधिक प्रेक्षणीय वाटतात.

पु. ल. देशपांडे
(छान पिकत जाणारे म्हातारपण - एक शुन्य मी)

संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर मिळेल
-> एक शून्य मी



0 प्रतिक्रिया: