Monday, June 12, 2017

स्मरण - आरती नाफडे

१२ जून २०००. आपल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. समाजाचा विवेक जागृत ठेवणारा आपला सांस्कृतिक नेता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तुमचे आमचे पुलं आपल्याला सोडून गेले. काळ फार बलवान असतो असे म्हणतात. पण, पुलंच्या बाबतीत त्याचे गणित नक्कीच चुकले. कारण पुलं काळाच्या पडद्याआड वगैरे असं काहीच होणार नाही. दरवर्षी १२ जून आली की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एखादा तरी पैलू मनाला भावलेला सूर मारून वरती येतो व मनाला घेरून टाकतो.

पुलंनी माणसावर, समाजावर अतोनात प्रेम केले. ते जसे आपल्या लिखाणाशी समरस होत असत तसेच ते माणसांशी व समाजाशी समरसत होत. समरस होणे याचा अर्थच एकरूप होणे असा आहे आणि म्हणूनच महत्त्वाच्या सामाजिक घटनांशी पुलंचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आलेला आहेच व तो कायम जडला व घडला आहे.

विलेपार्ले म्युझिक सर्कलची घडण, बालगंधर्व रंगमंदिर बांधण्याची प्रेरणा, त्याचा आठवडाभर चाललेला उद्घाटन सोहळा, आकाशवाणीवर बालगंधर्वाची पहिली पुण्यतिथी सादर करणं, १९५३ मध्ये संगीत नाटक अकादमीची स्थापना व विकास, १९६६ पासून मुंबईमध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌सची उभारणी अशा अनेक पातळ्यांवर पुलंनी समाजाच्या उत्कर्षात स्वत:ला झोकून दिलं.

आपले विस्तारित मोठे कुटुंब म्हणजे समाज. त्या समाजाशी समरसता साधताना कर्ता व कर्म भिन्न नसतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू. आंतरिक कळकळ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पुलंचे समाजाशी असे आगळेवेगळे नाते होते. समाजात कुठे आवश्यकता आहे हे हेरून आपला मदतीचा हात तत्परतेने समोर करणारे, तन, मन व धनाने समर्पित होणारे पुलं बघताना, समाजाला त्यांच्या कार्यातून मिळणारा आनंद, दिलासा, विसावा व समाधान बघितले की, एका समाजाशी नैसर्गिकपणे समरस होणार्‍या योग्याची गोष्ट आठवते. आपल्या कर्मात अगदी चोख, प्रामाणिक व सदाचारी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा एक योगी असतो. आपल्या आदर्श आचरणाने तो समाजप्रिय असतो. त्याचा सहवास सर्वांना सुखावह वाटत असे. त्यांच्या सद्वर्तनाने भगवंत खुश होऊन आपल्या देवदूताला पाठवतात. देवदूत त्यांना वर मागण्याची विनंती करतात. पण, आपल्या कर्मावर श्रद्धा असणारे योगी वर मागण्यास तयार नसतात. देवदूताचा फारच आग्रह असतो. तेव्हा योगी म्हणतात, ‘भगवंताची सतत कृपा असावी.’ देवदूत म्हणतो, ‘ती तर आहेच. विशेष मागा.’ योगी म्हणतात, ‘ठीक आहे माझ्याकडून माझ्या न कळत सर्वांचे भले होऊ दे.’ भगवंत योग्याच्या सावलीत एक अद्भुत सामर्थ्य भरतात. योगी चालताना सावली पडली की, तेथील दु:खी चेहरे आनंदित होत, वातावरण व निसर्ग प्रसन्न होई. योगी पुढे चालत राही सावली समाजाला सुखावत राही.

तेच सामर्थ्य भगवंताने पुलंच्या साहित्यात व कर्मात भरले आहे. पुलं जेथे जातील तेथे आनंद निर्माण करीत. कुठल्याही मोठ्या पदाचा विचारही मनात न आणता समाजातील गुणी व्यक्तींना त्यांनी लाभ मिळवून दिला. इंदुबाला एक बंगाली संगीत अभिनेत्री अत्यंत हलाखीत उत्तरायुष्य कंठत होती. पुलंनी आपलं स्थान वापरून तिला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळवून दिला. तर १९६१ सालापासून बालगंधर्वांना मासिक मानधन महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा करून मिळवून दिलं. उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिलं. बाबा आमट्यांच्या आनंदवनाचं कार्य त्यांच्या ध्यासाचा विषय होता. कार्यकर्त्यांची फळी उभारून त्यांचे वार्षिक मेळावे आयोजित करणे, देशपरदेशातल्या नामवंतांच लक्ष आनंदवन कार्याकडे वेधणे असे भरीव सामाजिक कार्य पुलंनी आपला वेळ, प्रतिभा, संकल्पना राबवून समाजासाठी केले.

एवढे करून ते थांबले नाहीत, तर अशा अनेक कार्यांच्या उभारणीसाठी लागणारा भांडवली पैसा पु.लं. देशपांडे प्रतिष्ठानने पुरवलेला आहे. १९६५ साली स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानला स्वत:चं स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, शिपाई असा कोणताही फाफट पसारा नव्हता. योग्य त्या दानेच्छु संस्था शोधणं, त्यांच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून पत्रव्यवहार करणं व संस्थेची नेमकी गरज ओळखून ती पूर्ण करणं हे काम पुलं व सुनीताबाई आपल्या विश्‍वस्त मंडळींना बरोबर घेऊन पूर्ण करत.

पुलंचे अचाट कर्तृत्व व अफाट दातृत्व संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे व त्यांच्याकडून कधी गाजावाजा नाही. गुप्तदान मोलाचं काम करणार्‍या संस्थांना दिलं. संस्थांचा उत्कर्ष केला. एकदा देणगी दिल्यावर संस्थेशी फारसा संपर्कही ठेवला जात नसे. हेतू हा की देणगीचे दडपण संस्थाचालकांना जाणवू नये. सांस्कृतिक विचारधारेचा विकास व्हायला मुक्त वातावरण हवं यावर पुलंचा विश्‍वास होता. पैशासाठी काम खोळंबू नये हा कटाक्ष होता. तळकोकणात काही शाळांमध्ये पेज योजना राबवली. दारिद्र्य व उपासमार असणार्‍या भागात मुलांची शाळेतील हजेरी कमी होते. अशा ठिकाणी वर्षभर शाळा भरताच तांदळाची पेज पोटभर द्यायची अशी योजना होती. ३० टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर पटावरची संख्या वाढली. मुलांची बौद्धिक पातळी पण वाढते असा निष्कर्ष निघाला.
‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. त्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुलं म्हणाले, ‘‘ज्या दिवशी देशात एकही गर्दचा व्यसनी राहणार नाही, त्या दिवसापर्यंत मुक्तांगण चालूच राहील आणि या केंद्राला पैसा कधीही कमी पडू दिला जाणार नाही. असा भक्कम आधार दानत, अशी निरपेक्षता आणि देताना बडेजाव नाही, कोणालाही ओशाळवाणं न करण्याचा मनाचा मोठेपणा खरोखरच दुर्मिळ आहे.

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी’
हे तुकोबाचे वचन पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानचे बोधवाक्य आहे. सामाजिक बांधिलकीचे ब्रीद म्हणून बोधवाक्य वापरणार्‍या पुलंचे वर्णन रामदासस्वामींच्या दासबोधातील विरक्त लक्षणात ‘उदास असलेला जगमित्र’शी मिळतेजुळते आहे.

लोकप्रिय माणूस हा सर्वांचा म्हणजे सार्वजनिक असतो. त्याचं दु:ख व आनंद हा पण सार्वजनिक होतो. पुलंनी माणसाला फक्त हसायलाच नाही शिकवलं तर दु:खितांकडे बघून डोळे पुसायलाही शिकवलं व तेही आपल्या कार्यातून. नुसतं अर्थसाहाय्य करून भागत नाही तर, जगण्याला अर्थ द्यायला शिकवलं. माणुसकीचा वस्तुपाठ स्वत:च्या जगण्याने घालून दिला.

पुलंच्या सामाजिक समरसतेची मुळं खूप मागे जातात. सर्वसाधारण परिस्थितीतल्या पण कलासक्त, अगत्यशील घरामध्ये पुलं वाढले, जोपासले, पार्ल्यात बालपण गेलं ते ज्येष्ठांची भाषणं ऐकत, ध्येयवादाचे संस्कार घेत. शाळेतील शिक्षक, सेवादलाचा संपर्क, फर्ग्युसनमध्ये प्राध्यापकांचा ठसा, महायुद्धपूर्व जीवनाचा अनुभव, गांधीवादी विचारांचा मागोवा अशा अनेक परिणामांमुळे पुलं तरुण वयातच समाजोन्मुख झाले. व्यक्तिगत प्रगती साधताना माणसानं समाजहित जोपासलं पाहिजे हा फार मोलाचा विचार पुलंच्या जीवनातून प्रकर्षाने पुढे येतो.
स्वकर्तृत्वाने व उत्तम कलाव्यवहाराने जोडलेलं धन पुलंनी उदास विचाराने व्यतीत केले. ‘मला या जीवन वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते’ असं म्हणणार्‍या पुलंनी जीवनाचा खरा अर्थ पुढच्या कित्येक पिढ्यांना उकलून दाखवला. आपल्याला मिळणार्‍या धनाचा काही भाग तरी सामाजिक संस्थांना देणगी रूपात द्यावा व सामाजिक बांधिलकीची जाणीव, विवेक मनात जागृत ठेवावा हा मोलाचा अनमोल विचार आपण त्यांच्या सामाजिक समरसतेतून घ्यायला हवा.
– आरती नाफडे
तरूण भारत (नागपुर)
११ जून २०१७

0 प्रतिक्रिया: