फार जुनी नव्हे, जेमतेम वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. एक चालता बोलता पुरूषोत्तम या महाराष्ट्राच्या भूमीवर वावरत होता. थकला होता. भागला होता. विकलांग झाला होता. पार्कीन्सनने विद्ध होऊन शरपंजरी पडला होता. गुडघेदुखीने बेजार झाला होता पण त्याने कुणापुढेही गुडघे टेकवले नव्हते. अगदी राज्यकर्त्यांकडून सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारतानाही मनगटशाहीविरुध्द बोलण्याची धमक तो राखून होता. भले स्वत:चं भाषण स्वत: वाचून दाखवण्याची ताकद त्याच्यात उरली नव्हती तरीही. पण तो होता !! तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याचं नुसतं अस्तित्वच समाजमानाला प्रेरित करत होतं. प्रफुल्लित करत होतं. कुठं तरी ‘बिग ब्रदर इज वाचिंग ची भावना सगळ्यांच्या मनात होती. अभिरुचीची पातळी एका मर्यादेखाली घसरली नव्हती. वागणं आणि बोलणं यात काही किमान सुसंगती होती. विनोदाला बाष्कळपणाचं स्वरुप आलेलं नव्हतं. जात-पात बघून कुणाबद्दलचं मत निश्चित केलं जात नव्हतं. महापुरूषांची जात बघितली जात नव्हती. पंढरीच्या विठोबापेक्षा त्याला ‘सर्दाळू ’ वारकरी अधिक प्रिय होता. वृत्तीने समाजवादी असूनही सनातन भारतीय परंपरेबद्दल त्याला आदर होता. कर्मकांडाचा निषेध आणि भाविकतेप्रती श्रध्दा या दोन्ही मर्यादा त्याने कसोशीने आणि लिलया पाळल्या होत्या. त्याच्या अस्तित्वामुळेच असेल कदाचित पण अध्यात्माची दुकानं एवढी जोरात चालू झाली नव्हती. सनातन भारतीय तत्त्वज्ञान आपल्या पुडीत बाधून, आपलं लेबल लावून विकणारे वाणी गल्लीबोळात बोकाळले नव्हते.
तो एक अफाट आयुष्य जगला. त्याच्या कर्मक्षेत्रांची आणि त्यांच्यात त्याने गाजवलेल्या कर्तृत्वाची नुसती यादी आठवली तरी आम्हाला धाप लागते. एकच माणुस एवढी क्षेत्रे गाजवू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याने अनुवाद केले. विदेशी कलाकृतींना देशीकार लेणी चढवली. परक्या संस्कृतीतल्या माणसांमधलं माणूसपण हेरून त्यांना अस्सल भारतीय रुपडं चढवून पेश केलं. त्याच्या तोंडची भाषाही आमचीच. ‘गुरं राखणाऱ्याच्या हाती दंडुका असायाच पायजी ‘ , अशी रांगडी. त्याने प्रवासवर्णने लिहीली. तपशिलाच्या जंत्रीपेक्षा त्याने स्थलकाल निरपेक्ष मानव्य शोधलं. म्हणूनच जकार्ताचा सूर्यास्त दाखवणारे विधूर मणिभाई, प्रत्येक देशात दत्तक मुलगा असूनही माया-ममता शोधणारा दारुडा इंग्रज बाप, कण्वमुनीसारखा आपल्या विद्यार्थिनीच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला निघालेले जपानी प्राध्यापक तनाष्का – आम्हाला कधी परके वाटलेच नाहीत. ते आमच्या काळजात घर करून बसले. तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढला. आजच्या सारख्या टीआरपी वाढवण्यासाठी चाललेल्या आग्यावेताळ अभिव्यक्तीसाठी नव्हे. खऱ्या मतस्वातंत्र्यासाठी.
तो भ्रष्टाचाराविरुध्द लढला. जे जे अयोग्य वाटलं त्याच्याविरुध्द त्याने आवाज उठवला. करायचं तेव्हा दिलखुलास वैर केलं. इतर वेळी निखळ मैत्री जोपासली. विदुषकाचं बिरुद हौसेने स्वीकारलं. काम झाल्यावर नाटकातल्या पोषाखाइतक्याच सहजतेने ते उतरवूनही टाकलं. आपल्याच सत्कार समारंभाला भाषणाची टेप पाठवणारा कदाचित तो एकटाच महापुरूष असावा. त्याचं कुणाशीच कायमस्वरुपी वैर नव्हतं. तसा त्याचा स्वभावच नव्हता. उलट तो कायम कोणात काय चांगलं आहे, याचाच सतत शोध घेत असायचा. कुणाचं कणाएवढं चांगलं काम तो मणाएवढं करून सांगायचा. त्याने अनेकांचे आवडीने गुण गायले. ती सगळीच माणसं काही मोठी नव्हती. काही तर अगदीच सामान्य होती. स्टुडीओतले हरकामे किंवा आयुष्यात एखादी कुस्ती जिंकणारे पहिलवान वगैरे. पण या सामान्य माणसांना त्यानं मराठी साहित्यात अजरामर करून ठेवले. ही सारी माणसं सर्व जाती-धर्मातली होती. त्याने कौतुक केलं ते गुणांचं. कुठल्यातरी वेडाचं. छांदिष्टपणाचं. व्यवहारी अपूर्णांकत्वाचं. कारण तो स्वत: त्याच जातकुळीतला होता.
खरा समाजवादी अपरिग्रह त्याच्या नसानसात स्वाभाविकपणे भरलेला होता. वागणुकीतही अस्सल देशी रांगडेपण ओसांडत होतं. पंचतारांकित हॉटेलात काटे-चमचे फेकून देऊन देशी पद्धतीने जेवताना त्याला आसुरी आनंद व्हायचा. आपल्या आया-बाया मुलांचे इंग्लिशमधून लाड करताना बघून त्याला वाईट वाटायचे. त्याचं संस्कृतीप्रेम नववर्ष स्वागतयात्रेला भारतीय पोशाखात जाण्यासारखं उसनं नव्हतं. ते रंध्रा-रंध्रातून प्रकटणारे , आतून आलेलं होत. म्हणूनच इंग्लंडच्या नाट्यगृहात, चीन युध्दाच्या वेळी अमेरिकेची मदत मागणाऱ्या पंडित नेहरूंची केलेली नक्कल बघून त्याचं पित्त खवळलं होतं. ‘ दिल्ली मुगलांच्या बापाची आणि परकीय मराठ्यांनी ती लुटली ’, असं सांगणाऱ्या गाईडचं नरडं आवळावं असं त्याला वाटलं होतं. त्याला ज्या ज्या वेळी जे जे करावंसं वाटलं ते ते त्याने मनमुरादपणे केलं, कुठलाही संकोच न बाळगता केलं. त्यानं स्वत:वर कुठलाही शेरा बसू दिला नाही. तसंच कधी तसा शिक्का बसेल म्हणून फिकीरही केली नाही. तमाशा परिषदेचं अध्यक्षपद हौसेने स्वीकारलं. त्याच्या अध्यक्षपदाच्या भाषणात हाती डफ-तुणतुणं घेऊन गाणंही म्हटलं आणि लंडनच्या वनारसे आजींच्या गणपतीसमोर आरती म्हणताना त्याचं समाजवादीपण आडवं आलं नाही. गणपतीची आरती म्हणताना त्याने अंगावर पाल पडल्यासारखे केले नाही. ज्या ज्या क्षेत्रात तो गेला त्यात त्याने उच्च कोटीचे मानदंड प्रस्थापित करून ठेवले. त्या शिखरांकडे दृष्टी ठेवून, त्या दीपस्तंभांच्या दिशेने जरी आम्ही वाटचाल केली तरी तरी आमचं आयुष्य धन्य होऊ शकतं. त्याच्या अंगात असलेले नानाविध आणि अत्युच्च कोटीचे गुण हा जरी एक ‘ जेनेटीक अक्सिडेंट ‘ मानला तरी, त्यातील एखाद्या गुणाची जोपासना करण्यातही आमचं आयुष्य कृतार्थ होऊ शकतं.
त्याच्या जाण्याला आता वीस वर्ष उलटली आहेत. मध्ये एक पिढी जन्माला येऊन, भर तारुण्यात आली आहे. हाती मोबाईल आणि त्यात इंटरनेट असणाऱ्या या पिढीला त्याचे पौष्टीक जीवन, पत्राची वाट पाहण्यातली हुरहुर आणि ‘बिलाचा की दिलाचा तगादा ‘ – यातला विनोद काय कळणार ? त्याच्या जाण्यानंतर झपाट्याने सारे बदलत-बिघडत गेले आहे. विनोदाच्या नावाखाली पांचटपणाला उत आलाय. दूरदर्शनचे ‘ दुर्दशन ‘ होण्याची त्याने व्यक्त केलेली भीती वास्तवात उतरलीये. विनोदी मालिकांचा सुकाळू झालाय पण त्यात दिसतो विनोद करण्याचा विनोदी प्रयत्न. विनोदी पंचेस, शाब्दीक कोट्या, शारीरिक हालचाली-कसरती, रेकार्डेड हसे, बांधून घातलेल्या प्रेक्षकांचे बळजबरीने आणलेलं हसू. धृतराष्ट्राच्या डोळ्याला गागल, भीमाच्या तोंडी नाय-नो-नेव्हर सारखे डायलाग आणि गांधीजी आणि हिटलरला एकाच वेळी रंगमंटावर दाखवायची अफाट कल्पनेची अफाट भरारी. गेला विनोद कुणीकडे तेच कळत नाही. तो गेला आणि जणू निर्भेळ, निर्विष विनोद नष्टच झाला.
त्याच्या माघारी समाजजीवनात अनेक बदल झालेत. त्यातले काही तर भयानक म्हणावेत इतके वाईट आहे. सार्वजनिक जीवनातला कसदारपणा नष्ट होऊन सगळीकडेच उथळपणा, सवंगपणा ऊतू चाललाय. रचनात्मक विधायक कार्याची जागा पेजथ्री कल्चरने घेतलीये. निर्व्याज प्रेमाने मनापासून शुभेच्छा देण्याऐवजी वाढदिवसाचे मेसेज, वाटसअप पोस्टस् जास्त महत्त्वाचे झालेत. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत दिखावूपणाला जोर चढलाय. सश्रध्दपणाची जागा आता देवभोळेपणाने घेतलीये. प्रत्येक गावातच नव्हे तर गल्ली-बोळात नवनवा बाब-बापू उभा राहतोय. कचेरीतलं काम, आपले विहित कर्तव्य करायचे नाही आणि मग मानसिक शांतीच्या शोधात कुठल्यातरी बुवा-बाबा-बापूचं शिष्यत्व पत्करायचं, आपल्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असलेलं डोकं तिथे गहाण ठेवायचं, आपलं स्वत्व त्याला अर्पण करायचं. भ्रष्टाचाराच्या, कामचुकारपणा करून कमावलेल्या पैशतला काही भाग बुवा-बापूच्या चरणी अर्पण करायचा. अपराधीपणाच्या भावनेतून मुक्ती मिळवायची आणि पुन्हा नवीन पापे करायला मोकळे व्हायचे. असा प्रकार सुरू झालाय. पुरूषोत्तमाचा डोळस श्रध्दाळू विवेकवाद लयाला गेलाय.
तिकडे मराठीचिये प्रांती भाषांतरांचा- अनुवादाचा नुसता सुकाळू झालाय. इंग्रजी पुस्तक प्रकाशित होण्याचा अवकाश, इकडे त्याचा मराठी अनुवाद लगेच बाजारात येऊ लागलाय.अनुवाद म्हणजे फक्त कर्ता-कर्म-क्रियापदांची अदलाबदल इवढंच मानलं जातंय. त्यात आमचे देशी वातावरण, ऐतिहासिक-पौराणिक संदर्भ त्यात उमटत नाहीत. इंगर्जी पुस्तकाचं सरळधोपट मराठी रुपांतर तेवढं वाचकाच्या हाती पडतं. ‘ ब्रेड आणायला जाणारा फ्रेंच रामभाऊ ‘ त्याला कुठेच भेटत नाही. वाचक पात्रांपासून मनाने दूरच राहतो. तो कुठेही गलबलत नाही. कासावीस होत नाही. एका तटस्थ मानसिक भूमिकेतून तो ते टीपण वाचतो. माय फेअर लेडीला देशी फुलराणी बनवणार्या पुरूषोत्तमाच्या आणि किंग लिअरचा गणपतराव बेलवलकर करणाऱ्यांच्या देशात हा प्रकार चाललाय, जातीय-धार्मिक-प्रांतिक भेदांनी तर टोक गाठलंय. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायलाही लोक कचरू लागलेत. एखादी गोष्ट कोणी केली, गुन्हेगाराची जात-धर्म कोणता – यावर आमची त्या गोष्टीवरची प्रतिक्रिया ठरू लागली आहे. दुर्दशनवर प्रत्यही राजकीय पोपटांचे परिसंवाद भरतात. जो तो आपापल्या साचेबद्ध विचारसरणीनुसारच मते मांडतो. जो तो आपापल्या कोशातच मग्न आहे.
पुरूषोत्तमाने विनोबांच्या भूदान यज्ञाचं कौतुक केलं आणि आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणाल्याबद्दल त्यांच्यावर यथेच्छ टीकाही केली. त्याच्या दोन्ही भूमिका त्या त्या वेळी आणि संदर्भात प्रामाणिक होत्या. दूरदर्शनवरच्या तज्ज्ञांप्रमाणे दुराग्रही नव्हत्या. या भूमिकांमध्ये काही विसंगती नव्हती. ते स्वत:शी राखलेलं इमान होतं. विद्येचं प्रतिक म्हणून गणपतीचेच चित्र असले पाहीजे हे त्याने ठासून सांगितले आणि तसे ते ठेवणाऱ्या मुस्लिमबहुल मलेशियाचे त्याने कौतुक केले. त्यात त्याचे समाजवादीपण आडवे आले नाही. ‘आजोबांच्या मते सर्वात थोर पुरूष म्हणजे आगरकर, हे त्यांचे मत ऐकून पूर्वी त्यांची कीव वाटायची – आणि आता स्वत:ची वाटते ‘ , हे मान्य करायला त्याला संकोच वाटला नाही.
स्वत:शी असलेला हा प्रामाणिकपणाच आता सार्वजनिक जीवनातून हद्दपार झालाय. पक्षीय अभिनिवेश, राजकीय निष्ठा, त्यातीन मिळणारे भौतिक लाभ, विचारसरणीची बंधनं इतकी तीव्र झालीत की सत्य अंग चोरून वावरतंय.
त्याने अगदी सामान्य माणसांबद्दल लिहिलं. त्यांची कधी जात बघितली नाही. धर्म बघितला नाही. आज आम्ही प्रत्येक संताकडे, महापुरूषाकडे आमच्या जातीय चष्म्यातून बघतोय. प्रत्येक महापुरूषाला आम्ही एकेका जातीच्या चौकटीत बंदिस्त केलंय. आम्ही कोणाकडून टोपी घेतली, कुणाकडून दाढी, सत्याचा आग्रह धरणाऱ्या नंग्या फकिराची चित्रं आम्ही चलनी नोटांवर छापली. त्याला आमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा, चंगळवादी जीवनशैलीचा साक्षीदार बनवलं. पिरांना वर्षासनं लावून देणाऱ्या महापुरूषाची आम्ही दाढी तेवढी घेतली. त्याचे गोडवे गाणाऱा शिवशाहीर दुसऱ्या जातीचा असेल तर आम्ही त्याला डाकू ठरवून मोकळे झालो. इतरांना त्याच्यावर बोलायला बंदी घातली. तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापुरूषांकडून आम्ही स्वदेशीचा आग्रह नव्हे, गोंगाटी गणेशोत्सव तेवढा घेतला.
आम्ही सगळ्यांचेच पुतळे बनवलेत. एकदा जयंती-मयंतीला पुतळ्यांच्या गळ्यात हार घालले की पुढे वर्षभर आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे वागायला, धिंगाणा घालायला मोकळे.
चला, आता पुरूषोत्तमाचाही एक पुतळा बनवू या.
बापुंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. रेकार्डेड हशांवर हसण्यासाठी. अनुवादाचे रतीब घालण्यासाठी. पक्षीय निष्ठांची पोपटपंची करण्यासाठी, नववर्ष स्वागत यात्रेत बॉबकट -नऊवारी नेसून स्कूटरवरून संस्कृतीरक्षण करण्यासाठी. आपल्या कॉन्व्हेंटमधल्या पोरांना – ‘सेंट ग्यानेश्वरा डाईड इन ट्वेल्व्ह हंड्रेड नाईन्टी सिक्स ‘अँड ‘शिवाजी फॉर्मड स्वराज्य विथ हीज मवालीज ‘ शिकवण्यासाठी. पुरूषोत्तमाचा कुठलाच आदर्श प्रत्यक्ष जीवनात न बाणवता त्याचे चार दिवसांचे दिखावू पोशाखी महोत्सव भरवण्यासाठी.
प्रशांत असलेकर –
93220 49083, 9689481154
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Friday, September 24, 2021
चला, अजुन एक पुतळा उभारूया - प्रशांत असलेकर
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
आठवणीतले पु.ल.,
चाहत्यांचे पु.ल.,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 प्रतिक्रिया:
समर्पक आणी पुलं यांचे योग्य वर्णन करणारा लेख.
वाः! अप्रतिम प्रशांत 🙏
-श्रीधर कुलकर्णी
आजच्या काळात पु ल हवे होते
मार्मिक आणि सध्याच्या परिस्थितीशी बरेचसे मिळते जुळते.🙏
सोळा आणे सत्य...छान लिहिलंय...पन असं लिहावं लागलं..आणी वाचकांना आज असं वाचाव लागलं ..ही चिन्ह माणसाच्या माणुस अधोगतीची
सोळा आणे सत्य...छान लिहिलंय...पन असं लिहावं लागलं..आणी वाचकांना आज असं वाचाव लागलं ..ही चिन्ह माणसाच्या माणुस अधोगतीची
समर्पक..👌👌
फार छान !
Post a Comment