भाईकाका (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पुलं) हे एक अजब रसायन होतं. काही लोक दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात, त्यातलेच ते एक. हजरजबाबीपणा, तल्लख विनोदबुद्धी, मनमोकळा स्वभाव. वसंत बापट नेहमीच म्हणत, ‘भाईने अनेक क्षेत्रांत स्वैर संचार केला. संगीत, नाटक, लिखाण, समाजाबद्दल जाणीव, चित्रपटसृष्टी, पण कुठेही ‘गुळाचा गणपती’ होऊन बसले नाहीत. मात्र रसिकांच्या हृदयातली जागा त्यांनी कधीही सोडली नाही. त्यामुळेच ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व झाले.’ भाईकाका घरात एक व बाहेर एक असे कधीच वागले नाहीत. घरातही त्यांची थट्टामस्करी, विनोद सतत चालूच असायचे. एखादं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर 'भाईकाका आंघोळ झाली?' उत्तर कधीही सरळ नाही. 'वाटत नाही? वास येतोय?' शेवटी व्हीलचेअरवर असतानाही गप्पांना बसत आणि बाथरूमला जायला निघाले की, ‘प्रवास झेपला तर येतो परत गप्पांना’ असं म्हणत हसत हसत जात. घरातही ते तेवढेच रमलेले असायचे. आमच्या घरातली सर्व मुलांची नावं भाईकाकांनी ठेवली आहेत. माझं जयंत, माझा धाकटा भाऊ हेमंत, बहीण मंगल, तसंच रमाकांतकाकाच्या तिन्ही मुलांची नावं विभावरी, राजेंद्र, मिलिंद ही सर्व त्यांनीच ठेवलेली. एवढंच काय, मला मुलगी झाली हे ज्यावेळी त्यांना मी फोन करून सांगितलं, त्यावेळी ‘‘जयंत हिचं नाव चंदा ठेव हं!’’ असं बजावलं होतं. घरातल्या सर्व मुलांचं त्यांना कौतुक होतं.
सुरुवातीला भाईकाका ग्रँटरोडला मॉडेल हाऊस येथे चौबळांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचे. नंतर ते वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. मधूनमधून पार्ल्याचे दत्ता पाखाडे मला व आजीला सकाळी कामावर जाताना त्यांच्या गाडीतून भाईकाकांकडे सोडत व संध्याकाळी परत घेऊन येत. तो पूर्ण दिवस भाईकाका-काकीच्या सहवासात, छान छान गोष्टी ऐकण्यात जाई. त्या काळात घरात मोटार असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जाई. माझे वडीलही तेव्हा ‘फ्रेंच मोटर कार’ कंपनीत होते. त्यामुळे माझ्या बालबुद्धीला मोटार हे एकमेव श्रीमंतीचं माप वाटे. एकदा अचानक माझ्या लक्षात आलं की, भाईकाकांकडे मोटार नाही. मला तो त्यांचा कमीपणा वाटून त्यांना मी तसं विचारलंही. त्यावर त्यांनी मला खाली आणलं आणि टॅक्सीला हात केला. मला तिच्यातून छानपैकी फिरवून आणल्यावर उतरताना मला सांगितलं, ‘तुला जितक्या काळ्या-पिवळ्या गाड्या दिसतायत ना, त्या सगळ्या माझ्याच आहेत.’ त्यांना थांबवून माझं नाव सांग. तुला पाहिजे तिथे त्या नेतील. ह्या सांगण्यावर मात्र त्यांनी काकीकडून व आजीकडून लाडिक दमही खाल्ला. ‘काय रे भाई, काहीतरी शिकवू नको त्याला.’ पण, पुढे भविष्यात मीही तोच धंदा स्वीकारला व स्वतःची कार हायरिंग कंपनी काढली.
भाईकाका मला म्हणत, ‘अरे जयंत, आपण दोघांनीच आपल्या घराण्यात धंदा केला, मी हसवण्याचा आणि तू फसवण्याचा.’ माझा फसवण्याचा का, तर मी टूरिस्ट टॅक्सीवाला म्हणून आणि शेवटी टॅक्सीवाला हा फसवणारा म्हणून प्रसिद्ध असतो ना!
भाईकाकांनी घरचा गणपती कधी चुकवला नाही. खरंतर त्यांचा व काकीचा देवावर विश्वास नव्हता. तरीही ते १९७४ सालापर्यंत दरवर्षी गणपतीला पार्ल्याला येत. आमच्यासाठी ती एक पर्वणी असायची. ते येणार म्हटल्यावर त्यांचे सर्व जुने मित्र त्यांना भेटायला येत. त्यांचे एक जुने मित्र श्री. साठे (भाईकाका त्यांना बन्या म्हणत) हे दरवर्षी चेंबूरहून येत. ते येईपर्यंत आरती होत नसे. किंबहुना ही सर्व मैफल जमली की काकी किंवा माझी आई सतत माझ्या वडिलांना पूजा आटोपून घ्यायची सूचना देत. परंतु भाईकाकांची मैफल रंगात आली की ते म्हणत, ‘सुनीता, थांब थोडा वेळ. गणपती कुठे जाणार नाही. तो आमच्या गप्पांत सामील झालाय.' असं म्हणत आरती व जेवण होईपर्यंत संध्याकाळी दर्शनाला येणारी मंडळी येऊ लागत. त्यांची वाहवा मिळवण्यासाठी आम्ही मुले जीव तोडून आरास करीत असू. मी लहानपणी ढोलकी व तबला वाजवीत असे व माझा भाऊ हेमंत झांज. त्याचा एक सुरेख पाठ असे. पुढे १९७४ साली माझी आई कॅन्सरने वारली आणि भाईकाकांनी गणपतीला येणं बंद केलं. ती आजारी असताना शेवटी शेवटी भाईकाका रोज येत आणि निरनिराळे विषय काढून असे रंगवत की तात्पुरता आम्हांला आमच्या दुःखाचा विसर पडत असे.
प्रिमियर पद्मिनी
१९७५ सालची गोष्ट... मी त्यावेळी ‘बॉम्बे सायकल ॲण्ड मोटर एजन्सी’मध्ये कामाला होतो. भाईकाकांनी त्यावेळी फियाट गाडी घ्यायचं ठरवलं. भाईकाका गाडी घेत आहेत ही गोष्ट कंपनीत मालक लालचंद शेटजींपर्यंत गेली व त्यांनीही फॅक्टरीत, ‘व्हीआयपी गाडी करून द्या’ असं फर्मान काढलं.
गाडीची डीलिव्हरी घ्यायला मी आणि भाईकाका जाणार होतो. मी गाडी घ्यायच्या आधी चेक करतो असं सांगितल्यावर, माझे वडील जे स्वतःही त्याच कंपनीत कामाला होते, मला रागावले. म्हणाले, ‘अरे सर्वजण व्हीआयपी गाडी तयार करत आहेत. तू गुपचूप जाऊन डिलिव्हरी घे.' ठरल्याप्रमाणे मी आणि भाईकाका शोरूमला गेलो. त्यांनी भाईकाकांसाठी छोटा समारंभ ठेवला होता, तो आटपून आम्ही दोघंही आजीला गाडी दाखवायला पार्ल्याला निघालो.
पेडर रोडवरून खाली उतरताना गाडी टणाटण उडत होती. मी हाजी अलीला पेट्रोल पंपावर चाकातली हवा चेक केली तर काय, प्रत्येक चाकात दुप्पट हवा होती (व्हीआयपी गाडी). जरा पुढे जातो तर लक्षात आलं की, दरवाजाला आतून एक हँडलच नाही. घरी येऊन कंपनीला फोन केला. सायनला एक इंजिनीयर हँडल घेऊन उभा राहिला होता व तोच पुण्यापर्यंत आमच्याबरोबर येणार होता.
गाडी चेंबूर सोडून नव्या मुंबईच्या कोकण- भवनच्या चढावर त्रास देऊ लागली. पुढे हळूहळू आम्ही खोपोली गाठली. चहा घेऊन ऐतिहासिक खंडाळा घाट चढायला सुरुवात केली. दोन-तीन वळणं घेऊन गाडी गरम होऊन बंद पडली, थंड झाल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. थंड होईपर्यंत भाईकाकांनी एक अप्रतिम विनोदी लेख लिहिला. त्या तापलेल्या आणि बंद पडलेल्या गाडीची तुलना त्यांनी भडकलेल्या बायकोबरोबर केली होती. लेखाचं नावं होतं, ‘माझी पद्मिनी जेव्हा रुसते’! पुण्याला पोहोचताच त्यांनी लालचंद शेटजींना फोन करून रविवारच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधला लेख वाचायला सांगितला. परंतु दुसऱ्या दिवशी कंपनीची माणसं येऊन गाडी घेऊन गेली व सर्व ठीकठाक करून लगेच आणून दिली. त्यामुळे भाईकाकांनी तो लेख प्रसिद्ध केला नाही. पुढे तीच ऐतिहासिक गाडी त्यांनी मला आठवण म्हणून दिली.
एनसीपीए
साधारण १९८० च्या सुमारास भाईकाकांनी एनसीपीएच्या (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस्) मराठी सांस्कृतिक विभागाची, संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. जोडीला दुर्गाबाई भागवत व अशोक रानडे यांसारखी प्रतिभावान माणसंही होती. त्या काळात ह्या सर्व मंडळींनी मराठी रसिकांना अनेक सुंदर कार्यक्रम दिले. महिन्यातून साधारण ४ ते ५ दिवस ते एनसीपीएमध्ये राहत. त्यांची राहण्याची सोय एनसीपीएने फार छान केली होती. त्याच आवारात ‘रंगोली’ नावाचं एक चांगलं रेस्टॉरंट होतं. तिथे त्यांची, तसंच भेटायला येणाऱ्या पाहुण्याची जेवणाखाणाची सोय होती. भाईकाका तसे उत्तम खवय्येही होते. कुठलाही पदार्थ चवीने खात व आवडल्यावर तोंडभरून स्तुती करत. पण ‘रंगोली’त पदार्थांच्या किंमती जास्त आहेत म्हणून ते त्यांच्या ॲटेंडंटला त्यांच्यासाठी डाळभात लावायला सांगत. मिळतंय म्हणून त्याचा फायदा घ्यायचा, असं काकी व भाईकाकांनी कधीच केलं नाही. पार्ल्याच्या आमच्या घरी मात्र दीपाच्या हातचं जेवायला हक्काने येत. दीपा मालवणी किंवा कारवारी जेवण चांगलं करायची (म्हणजे आत्ताही करते). चायनीजही चवदार करायची. भाईकाका मुद्दामहून वेळ काढून जेवायला येत आणि बरोबर मित्रांनाही घेऊन येत. गोंविदराव तळवलकर, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा अनेक दिग्गजांचे पाय आमच्या घराला लागले. साधुसंत येती घरा, असा तो काळ होता.
भाईकाकांचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धी ही घरातही तेवढीच तल्लख असायची. नवरा- बायकोच्या कामाच्या वाटण्या हा काकींचा अगदी कळकळीचा विषय होता. त्यांचं ठाम मत होतं की बायका सगळी पुरुषांची कामं करतात, पण पुरुष कधीही बायकांची कामं करत नाहीत. एकदा भाईकाका म्हणाले, ‘‘सुनीता, हे तुझं काही खरं नाही हां... बालगंधर्वांनी पुरुष असून जन्मभर बायकांची कामं केली!’’
काकींचा आवाज मोठ्ठा आणि खणखणीत होता. त्यावरून भाईकाका नेहमी त्यांना चिडवत. एकदा ते खोलीत शिरले, तेव्हा काकी फोनवर बोलत होत्या. जरा चिडून बोलत असल्याने मोठा वाटतं होता आवाज. फोन संपल्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘फोनवर बोलत होतीस ती, पुण्यातच की पुण्याबाहेर?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे पुण्यातलेच एक संपादक.’’ त्यावर भाईकाका म्हणाले, ‘‘अगं मग फोनची तरी गरज काय आहे? नुसती त्या दिशेला तोंड करून बोललीस तरी ऐकू येईल त्यांना.’’
भाईकाकांच्या हजरजबाबीपणाचं आणखी एक उदाहरण - दादरच्या किंग जॉर्ज शाळेत भाईकाकांची मुलाखत चालली होती. राजकारणी, साहित्यिक, अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधीर गाडगीळ मुलाखत घेत होते. खच्चून गर्दी. सुधीरनी एक प्रश्न पटकन विचारला- भाई, तुम्ही अनेक क्षेत्रांत संचार केलात, नाव कमवलंत, पण राजकारणात गेला नाहीत, ते का?’’ एका क्षणात भाईंनी उत्तर दिलं, ‘‘माझ्यात एक दोष आहे म्हणून मी राजकारणात गेलो नाही!’’ साहजिकच दुसरा प्रश्न ताबडतोब आला, ‘‘दोष म्हणालात तो कोणता?’’ हसत हसत भाई म्हणाले, ‘‘मी जे सकाळी बोलतो ते मला संध्याकाळी आठवतं!’’ लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या. फक्त एकटे पंतप्रधान श्री. नरसिंह राव उभे राहिले आणि कोपरापासून नमस्कार केला.
भाईकाका आणि काकींचे ड्रायव्हिंगचे किस्से ऐकण्यासारखे आहेत. भाईकाकांनी आयुष्यात कधी ड्रायव्हिंग केलं नाही. कायम काकी ड्रायव्हर. भाईकाका भित्र्या मनाचे, तर काकी अगदी उलट! भाईकाकांना गाडीची काच खाली करायची असली की अनेकदा दारच उघडायचे. हँडल्सचा गोंधळ आणि काय! त्यामुळेच गाडी रस्त्यावर आली की भाईकाकांची सुरुवात होई... सुनीता कुत्रा येतोय. मग त्या म्हणत- तो मलापण दिसतोय.
एकदा कोल्हापुरात गावातल्या शाळेत कार्यक्रम होता. ह्यांची गाडी शाळेच्या पटांगणात शिरली, तेव्हा मुलं लगोरी, गोट्यांसारखे खेळ खेळत होती. ती आरडाओरडा करत पळू लागली. ‘धावा धावा. बाई गाडी चालवतिया!’ म्हणून इतरांना सावध करू लागली. इतक्यात एका मोठ्या आणि शहाण्या मुलानं ओरडून सर्वांना सांगितलं की, ‘आरं नगा घाबरू शिकिविनारा बाप्या बाजूला बसलेला हाय.’ शिकिवनाऱ्या बाप्याची कॉलर एकदम टाईट.
आमचं १९३२ साली बांधलेलं बैठं घर पाडून तिथे इमारत उभारायची असं ठरलं आणि १९८३ च्या मध्यावर कामाला सुरुवात झाली. प्रत्येक स्लॅब घालण्याच्या वेळी म्युनिसिपालिटीचे चीफ इंजिनियर जातीने हजर असत व इतर वेळीही येऊन काम तपासत. कामगार लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने त्यांना सांगितलं की, ही पुलंची वास्तू आहे आणि ते स्वतः इथे राहायला येणार आहेत. मराठी माणूस कितीही कमी शिकलेला असला तरी त्याला पुलं माहीत असतातच. इमारत पूर्ण झाली आणि कॉन्ट्रक्टर कांबळेंनी एक दिवस आम्हाला सांगितलं की, सर्व कामगारांना पुलंना भेटायची, निदान बघायची इच्छा आहे. वेळ, दिवस ठरला. सर्वजण वेळेच्या आधीच येऊन उभे होते. भाईकाका बरोबर ठरल्या वेळी आले. सर्वांना प्रेमाने भेटले. प्रत्येकाची नावा-गावासकट चौकशी केली. तीही प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून. आयुष्यभर पुरला असेल नाही तो स्पर्श त्यांना! कर्मधर्मसंयोगाने आमच्या बिल्डरचं नाव लक्ष्मीकांत ठाकूर होतं. भाईकाका त्याला मस्करीने नेहमी म्हणायचे ‘‘सुनीताच्या अनेक प्रश्नांचा धबधबा तुमच्यावर पडला नाही, कारण तिचं देखील माहेरचं नाव ठाकूर होतं.’’ आमचं काम पूर्ण केल्यानंतर ठाकूरांनाआजूबाजूच्या पाच-सहा इमारतींची कामं मिळाली. भाईकाका त्यांना नेहमी मस्करीने म्हणायचे, ‘‘आता आमच्या विभागाला ‘ठाकुर्ली’ नाव द्यायला काहीच हरकत नाही!’’
माझा मुलगा निखिल फिल्म इन्स्टिट्यूटला कॅमेराच्या शिक्षणासाठी जायला धडपडत होता. भाईकाकांची मनापासून इच्छा होती की, त्यानं फिल्मलाइनीत जाऊ नये. तसं त्यांनी त्याला फोनवरून समजावण्याचा प्रयत्नही केला. शेवटी त्यांनी आम्हाला पुण्याला बोलावलं व त्यांचे मित्र सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गबाले यांनाही बोलावून घेतलं. त्या दोघांनी मिळून निखिलचं बौद्धिक तर घेतलंच, पण भाईकाकांनी काही मजेशीर गोष्ट सांगितल्या सुरुवातीच्या काळात त्या दोघांना एक चित्रपट मिळाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘दत्तगुरू’. त्याचा फायनान्सर एक मारवाडी माणूस होता. भाईकाका पटकथा-लेखक होते व दिग्दर्शक राम गबाले. चित्रीकरणाच्या वेळी त्यांना अनेक अडचणी येत होत्या. दत्तमहाराज म्हटले की एक गाय व तीन कुत्रे सोबत असायलाच हवेत. पण शूटिंगच्या वेळेला ‘लाइटस’ सुरू झाल्यावर कुत्रे घाबरून दत्तमहाराजांबरोबर राहत नसत. ते पळून जात. प्रोड्यूसर-फायनान्सरने कुत्रे दत्तमहाराजांबरोबर असल्याशिवाय पुढील पैसे देणार नाही, असं निक्षून सांगितलं. भाईकाकांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी शूटिंगच्या वेळेला तिन्ही कुत्र्यांना उपाशी ठेवलं व नंतर शूटिंगच्या वेळी दत्तमहाराजांच्या कमंडलूत मटणाचे तुकडे ठेवले. त्यामुळे पूर्ण चित्रपट, महाराज आणि कुत्रे वेगळे झाले नाहीत. सांगायचं तात्पर्य की, सीनेसृष्टीकडे बघणाऱ्या लोकांना जे दिसतं तसं कधीच नसतं. हेच त्या दोघांना निखिलला समजावून सांगायचं होतं.
गोवा ट्रिप
१९९४ साली भाईकाकांना पार्किन्सनची सुरुवात झाली होती. त्याच वेळी त्यांना गोवा कला अकादमीचा, ‘महादेवशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर झाला होता. सीताकांत लाड अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांनी खूपच गळ घातली. डॉक्टरांचं म्हणणं होतं की, भाईंची इच्छा असेल तर गोव्यातल्या त्यांच्या मित्रमंडळींना भेटून यायची ही शेवटचीच वेळ असेल. तोवर ते चांगले हिंडत-फिरत होते. पार्किन्सन कधी आपला विळखा घट्ट करेल याचा नेम नव्हता. काकीने विचारपूर्वक गोव्याची ट्रिप आखली. त्याच दरम्यान मी गोव्यात मंगेशीला घर बांधलं होतं. भाईकाकांनी मला फोन केला, आपण गोव्यात जाऊया, आपल्या गोव्याच्या घरातच राहू असं ठरलं. आमच्या बरोबर डॉ. ठाकूर, प्रफुल्ला डहाणूकर, विद्याधर निमकर, मालतीबाई आडारकर अशी भाईकाकांची खास मंडळी गोव्याला निघाली.
आमचा पहिला मुक्काम कोल्हापूरला होता. तिथे भाईकाकांना अनेकजण येऊन भेटत होते. कोल्हापूरच्याच एका नामांकित डॉक्टरांनी त्या रात्री मेजवानी दिली होती. कोल्हापुरातली काही मान्यवर मंडळीही बोलावली होती. डॉक्टरांच्या पत्नी हौशी गायिका होत्या. त्यांनी त्या छोटेखानी समारंभात भाईकाकांना एक विनंती केली की, मी लताबाईंची काही लोकप्रिय गाणी म्हणून त्यांची एक कॅसेट तयार केली आहे. भाई तुम्ही कृपा करून तिचे उद्घाटन करा. भाईकाका कधी कुणाला दुखवत नसत, पण त्या दिवशी मात्र त्यांनी ‘नाही’ असं ठामपणे सांगितलं.
दुसऱ्या दिवशी तिथून बाहेर पडताना मी सहज त्यांना विचारलं की, ‘‘भाईकाका मोजून २०-२५ माणसं होती. का ठामपणे नाही म्हणून सांगितलंत?’’ भाईकाका म्हणाले, ‘‘खुळा का रे तू? अरे लताचा जिथे सूर जातो तिथे हिची नजरही जाणार नाही रे!’’ गोव्यातही अनेक चाहते होते. माझा एक मित्र श्री. अनुप प्रियोळकर हा तर भाईकाका गोव्यात येणार ह्या कल्पनेनेच वेडा झाला होता. त्याने मला येऊन, ‘तुम्ही इथे असेपर्यंत जेवण माझ्या घरून येणार’ असंच सांगितलं. मीही ताबडतोब होकार दिला. पहिल्या दिवशी दुपारी माशाचं सुंदर जेवण घेऊन आला. त्यात त्याने ‘नाचणीचे सत्व’ आणलं होतं. पुडिंगसारखं असतं ते. गोव्याची स्पेशालिटी. खरंच सुरेख झालं होतं. भाईकाकांनी त्या पदार्थांची स्तुती केली. झालं. रात्रीच्याही जेवणात त्याने तेच नाचणीचे सत्व करून आणले. दुसऱ्या दिवशीही तेच. नंतर जाताना त्याने भाईकाकांना घरी येण्याची विनंती केली आणि भाईकाकांनी ती स्वीकारलीही. आम्ही घरी पोहोचल्यावर त्यानं नाचणीचं सत्व ठेवलं. ते पाहून भाईकाका माझ्याकडे पाहत म्हाणाले, ‘‘जयंता, तुझा मित्र माझी सत्वपरीक्षाच पाहतोय रे!’’
अमेरिका वारी
पर्किन्सनच्या विकाराने विळखा घट्ट केला होता. महाराष्ट्रातील असंख्य डॉक्टर मित्रांनी त्यांच्यासाठी अभ्यास सुरू केला होता. कोल्हापूरच्या डॉ. वझे ह्यांनी अमेरिकेत एक डॉक्टर अशा रोगावर ऑपरेशन करतो, अशी माहिती मिळवली. काकीचा त्यावर अभ्यास सुरू झाला. त्याच्याकडून काही व्हिडिओ पाठवले गेले की, पेशंट थरथरत आत जातोय व ऑपरेशन झाल्यावर ठणठणीत चालत बाहेर येतो. पुण्यात काही डॉक्टरांबरोबर बसून ते पाहिले गेले व ऑपरेशनला जाण्याची तयारी सुरू झाली. लांबचा पल्ला असल्यामुळे डॉ. लोकरे बरोबर जाणार होते. भाईकाका अमेरिकेला उपचारांसाठी जाणार ही बातमी सर्व पेपरांत आली. जाण्याच्या दिवशी पार्ल्याच्या घरी लवकर आले. विश्रांती घेतली व रात्री विमानतळावर जायला निघाले. मी आणि दीपाही सोडायला एअरपोर्टवर गेलो. त्यांचे अनेक चाहते विमानतळावर आले होते. त्यात माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बामही होते. त्यांना व्हीआयपी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं. पत्रकार मंडळीही तिथे हजर होती. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. एकाने विचारलं, ‘‘भाई, बरे होऊन आल्यावर बटाट्याच्या चाळीचा प्रोग्रॅम करा!’’ तर दुसऱ्याने विचारलं, ‘‘आल्यानंतर काय करायचं ठरवलं आहे?’’ भाई पटकन म्हणाले, ‘‘बरा होऊन आल्यावर कुस्त्यांचा फड लावतो की नाही ते बघा!’’
७० वा वाढदिवस
भाईकाकांचा ७० वा वाढदिवस आम्ही सर्व कुटुंबियांनी पार्ल्याच्या गोमंतक हॉलमध्ये थाटात साजरा केला. त्यांची मोठी बहीण वच्छीताई पंडित, धाकटी बहीण मीरा दाभोळकर, माझे वडील उमाकांत, धाकटे काका रमाकांत व आम्ही सर्व पुतणे, भाचे कंपनी. पन्नासेक मंडळी जमली होती. प्रत्येकजण मधल्या काळात विशेष काय घडलं किंवा काय पाहिलं ते भाईकाकांना सांगण्यात दंग होता.
माझ्या मुलीला, म्हणजे नेहाला विनोद सांगण्याची खूप आवड आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे ती भाईकाकांना म्हणजे तिच्या भाईआजोबांनाच जोक्स सांगायला बसायची. तेही मनापासून दाद देत. त्या दिवशी सर्व जमलेले असताना तिला काय लहर आली कोण जाणे, तिनेभाईकाकांना सांगितलं ‘‘भाईआजोबा, मी तुम्हाला एक कोडं घालते. त्याचं उत्तर द्या!’’ भाईकाका हसत म्हणाले, ‘‘घाल बघू!’’ तिने सुरुवात केली की, ‘‘शिवाजी महाराजांनी अनेक गड सर केले, पण त्यांना एक गड सर करता आला नाही, तो कोणता?’’ झालं... भाईकाकांनी उगाच डोकं खाजवल्यासारखं केलं आणि हरलो म्हणून सांगून टाकलं. नेहानेही विजयी मुद्रेने सांगितल, ‘‘कलिंगड!’’ खरंतर जोक संपला होता. परंतु भाईकाका क्षणाचाही वेळ वाया न घालवता नेहालाम्हणाले, ‘‘आता मी तुला कोडं घालतो त्याचं उत्तर तू दे! महाराजांच्या वेळी एक गड नव्हता, तो आत्ता आहे, तो कोणता?’’ नेहानेच काय, सर्वांनी डोकी खाजवली. तेव्हा भाईकाकांनी हसत-हसत सांगितलं, ‘‘भानगड!’’ नंतर नेहमीप्रमाणेच गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला. माझा आतेभाऊ प्रकाश पंडितला मामानं गायला सांगितलं. स्वतः पेटीवर बसले. त्याने, ‘‘मामा काय गाऊ?’’ म्हणून विचारले. भाईकाका मिश्किलपणे म्हणाले, ‘‘अरे, ते गाणं म्हण ना लंगोटावरचं!’’ प्रकाश पंडितही त्याचाच भाचा. त्याने लगेच ‘‘देहाची तिजोरी ...... भक्तिचाच ठेवा’’ हे गाण सुरू केलं.
संचेती हॉस्पिटल
एकदा घरीच उठायचा प्रयत्न करत असता भाईकाका पडले. संचेती हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मी व दीपा दोघंही भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी ते बरे झाले होते. पण काकीच्या म्हणण्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये देखभाल चांगली होते, तेव्हा दोन दिवस जास्त राहिले तरी चालेल. पूर्ण बरा होऊनच तो घरी येईल. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्पेशल रूम असली तरीही इतर रोग्यांमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर त्यांना घरी नेलेले बरे. मधू गानूकाकाही तिथेच होते. आम्ही पोहोचताच घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. गानूकाका ॲम्ब्युलन्स आणायला गेले. मी व दीपा काकांबरोबर गप्पा मारत होतो. भाईकाका हॉस्पिटलला कंटाळले होते. शांतपणे पडून होते. इतक्यात दोन-तीन तरुण डॉक्टर मुली तिथून जात होत्या. भाईकाकांना पाहताच त्या एकदम जवळजवळ किंचाळल्याच ‘अय्या पुलं!’ आणि त्या अवस्थेतही सही मागू लागल्या. जमेल तेवढ्या संयमाने भाईकाका त्यांना हसत म्हणाले, ‘‘आधी इथून सहीसलामत घरी जातो व मग तुम्हाला हव्या तेवढ्या सह्या देतो.’’
भाईकाकांनी बिछाना धरला होता. त्यांना कुठे हलता-फिरता येत नव्हतं. त्याच सुमारास काकीला
छातीत दुखायला लागलं. ब्लडप्रेशर स्थिर राहत नव्हतं. संपूर्ण चेकअप करायला त्यांना दोन दिवस डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आम्ही दोघंही त्यांना बघायला गेलो. तोपर्यंत सर्व गोष्ट स्थिरावल्या होत्या. आम्ही जाताच तिने डॉक्टरांना सांगितलं, ‘‘माझा पुतण्या व त्याची बायको आली आहे. तुमची हरकत नसेल, तर मी त्यांच्याबरोबर घरी जाते!’’ डॉक्टरांनीही ‘जा’ म्हणून सांगितलं.
काकीला घेऊन आम्ही दोघंही ‘मालती- माधव’मध्ये आलो. दारापर्यंत दारापर्यंत काकी पटापट वर
आली, पण घरात गेल्यावर ती हळूच भाईकाकांच्या खोलीजवळ आली व आत न जाता तिने
दरवाजाच्या मागून डोकावलं. भाईकाका समोरच्या खिडकीतून शून्यात बघत होते. तिने हळूच आत डोकावून भाईकाकांना विचारलं, ‘‘काय हो पुलं कसे आहात?’’ खिन्न स्वरात भाईकाकांनी उत्तर दिलं, ‘‘आहोत अजून!’’ आजही ह्या प्रसंगाची आठवण येते आणि मन व्याकूळ होतं.
९ जून २००० ची सकाळ.
काकीचा अचानक फोन आला. तिने मला व तिचा भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांना तातडीने पुण्याला बोलावलं. भाईकाकांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यांना फारसं कळत नव्हतं. मधूनमधून फक्त डोळे उघडत होते. डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांनाबोलावून घेतलं, ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि हॉस्पिटलसमोर प्रचंड गर्दी झाली. प्रत्येक पुलंप्रेमी आपल्यापरीने देवाकडे त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत आपल्या घरचंच कोणी आजारी असल्याची काळजी होती. ह्या सर्व मंडळींत सर्व थरातील माणसं होती. भाईकाकांचा उल्लेख ‘आपले पुलं’ किंवा ‘आपले भाई’ असा होत होता. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘इतरांनी आपलं म्हणणं’ हा एक फार मोठा किताब. त्यांनी तो आपल्या कर्तृत्वानं मिळवला होता. खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व होते, ते दिसत होतं. आम्ही सर्व दिनेशची वाट पाहत होतो. तो अमेरिकेहून निघाला होता. ते ३ दिवस मी व काकी हॉस्पिटलात त्यांच्या बाजूलाच होतो. चौथा दिवस काळदिन ठरला आणि एका महापुरुषाचा अंत मी अगदी जवळून बघितला. काकी चोवीस तास भाईकाकांजवळच बसून होती. तिच्या बाजूला मीही. मी तिला सांगितलं की, तू घरी जाऊन थोडा वेळ आराम कर. मी इथे आहे ना. तू काळजी करू नकोस. त्याही परिस्थितीत तिने दिलेल्या उत्तराने मी अवाकच झालो. ती म्हणाली, ‘‘भाईला जी औषध दिली गेली आहेत, त्यामुळे जर काही वैज्ञानिक चमत्कार झाला आणि त्यानं डोळे उघडले आणि मी समोर नाही हे त्याच्या लक्षात आलं तर तो आणिक कावराबावरा होईल.
त्या दोघांचं भावनिक नातं फार वेगळं होतं. त्यांच्या मृत्यूने अनेकांची झालेली वेडी अवस्था मी पाहिली. आमचा काका खऱ्या अर्थाने ‘पुरुषोत्तम’ होता, हे त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध झालं होतं. खरंतर त्यांचा फक्त देहच पंचत्वात विलीन झाला. आजही ते प्रत्येक मराठी घरात पुस्तकांच्या, कॅसेटच्या रूपाने आहेत. त्यांचे अनेक विनोद, असंख्य कोट्या यांच्या शिदोरीवर आपलं प्रत्येकाचं उर्वरित आयुष्य निश्चितच आनंदात हसत जाईल. माझा मुलगा निखिल ह्याला भाईआजोबांचे ‘असा मी असामी’, ‘बटाट्याची चाळ’ इत्यादी साहित्य तोंडपाठ आहे. पावलोपावली तो मास्टर शंकर, अंतू बर्वा, चितळे मास्तर ह्यांच्या आठवणी काढून हसत असतो. मनोमन त्यांच्याशी बोलत असतो. माझी आजी तर नेहमी म्हणायची की, मन सैरभैर झालं की मी भाईचं कोणतंही पुस्तक उघडते व वाचायला सुरुवात करते. मन शांत होऊन कधी हसू लागतं कळतही नाही.....!
लेखक - जयंत देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स, दिवाळी २०१८ मधून साभार
संग्रह - असा असामी पुलं देशपांडे जन्मशताब्दी गौरवग्रंथ
5 प्रतिक्रिया:
खुप सुंदर लेख...पुल बद्दल किती ही वाचलं तरीही पोट भरत नाही..
Jayantrao junya adhavaninna ujala diliat. khup khup dhyannawad. Farach sunder.//////
वाचता वाचता डोळ्यांच्या कडा ओळवल्या.
वाचता वाचता डोळ्यांच्या कडा ओळवल्या.
लेख वाचून संपला पण डोळ्यातले पाणी संपले नाही. मला पुलंनी जी जीवनदृष्टी दिली त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी आहे.
Post a Comment