'विश्रब्ध शारदा' खंड २ (१९७५) या पुस्तकाची प्रस्तावना दीर्घ आहे. दिग्गजांनी कधीकाळी लिहिलेली पत्रे हा या पुस्तकाचा गाभा आहे. या प्रस्तावनेतून पुलंनी बालगंधर्वांच्या काळातील जगण्याचे संदर्भ खूप सुंदर पद्धतीने विशद केले आहेत. बालगंधर्वांचा हट्टीपणा, त्यांचे गोहरबाईंशी असलेले संबंध, त्यांचे दारिद्र्य, म्हातारपणी झालेली त्यांची अवहेलना, शून्य व्यवहारज्ञान असल्याने त्यांची झालेली दुरवस्था आणि मानहानी, मनमानी कारभारामुळे झालेली त्यांच्या परिवाराची फरफट असे बरेच पैलू या प्रस्तावनेत येतात. कितीही महान असले तरी एकूणच बालगंधर्व हे एक बेजबाबदार व्यक्तिमत्व होते हे वाचकांच्या लक्षात येते. त्याकाळचे संगीत आणि एकूण संगीतविषयक सामाजिक दृष्टी यावरदेखील पुलं प्रकाश टाकतात.
'माणूसनामा' या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीलिखित पुस्तकाची (१९८५) प्रस्तावना नुसतीच कठोर नाही तर आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. या पुस्तकात लेखक भारतीय जीवनपद्धतीवर आणि अध्यात्मावर चिंतन करतांना खूप उपयुक्त असे महत्वाचे सल्ले देतात. या प्रस्तावनेत पुलंनी आपल्या संतपरंपरेवर, अध्यात्मावर, आणि एकूणच सामाजिक उदासीनतेवर परखड भाष्य केले आहे. तुकारामांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना 'रांडापोरे' म्हटले, तुलसीदास नारीला 'ताडन की अधिकारी' म्हणतो हे कुठल्याप्रकारचे अध्यात्म आहे असा खडा सवाल पुलं करतात. आपली पत्नी आणि कोवळी मुले भुकेने तडफडत असतांना त्यांची भूक मिटवणे तर दूरच राहिले वर त्यांना 'रांडापोरे' म्हणून संबोधणे हे कुठल्या अध्यात्मात बसते असा सवाल केल्यावर आपण निरुत्तर होतो. लाखोंच्या संख्येने वारीला आणि तीर्थक्षेत्रांना जाणारी जनता असणार्या देशात इतका अन्याय, दारिद्र्य कसे हा प्रश्न अस्वस्थ करून जातो. मंदिरे, मस्जिदी, चर्चेस यापेक्षा आपल्याला शाळा, इस्पितळे यांची जास्त गरज आहे असे पुलं म्हणतात ते पटते. लेखक पुस्तकात म्हणतात 'आपले अध्यात्म हे जन्माविषयीच्या अज्ञानातून आणि मृत्यूविषयीच्या भितीतून उगम पावले आहे.' - थोडा विचार करता हे पटते.
'माओचे लष्करी आव्हान' (१९६३) हे दि. वि. गोखलेलिखित पुस्तक वाचायलाच हवे असे असावे. १९६२ च्या चीन युद्धात आपण कसा सपाटून मार खाल्ला, नेहरूंचा फाजील आत्मविश्वास आणि गाफीलपणा आपल्याला कसा नडला हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे. चीनने हल्ला केला तेव्हा पुलं अमेरिकेत होते. त्याकाळी तिथे जॅक पार नावाचा लोकप्रिय नट होता. त्याने भारताची खिल्ली तर उडवलीच परंतु नेहरुंच्या पंतप्रधानपदाची जी लक्तरे त्याने तिथे टांगली ती बघून पुलं खूप दु:खी झाले. लहान मुलाचा आवाज काढून नेहरू कसे अमेरिकेच्या अध्यक्षाकडे मदतीची भिक मागायला आले हे त्या नटाने साभिनय करून दाखवले. भारतीय जवान किड्या-मुंगीसारखे मरत असतांना अमेरिका मनमुराद हसत होती. नेहरूंनी आपली दुर्बलता तत्वांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि फसले. तिथेच एक कृष्णवर्णीय बुट-पॉलीशवाला पुलंची आणि भारताची खिल्ली उडवतो. तो म्हणतो - भारतावर मुघलांनी राज्य केले, मग ब्रिटिशांनी केले आणि आता चीनी भारताला गुलाम बनवायला येत आहेत. भारतीय लोक स्वातंत्र्याच्या खरोखर लायकीचे आहेत का? ही प्रस्तावना वाचून संताप आल्याशिवाय राहत नाही.
'करुणेचा कलाम' (१९८४) या बाबा आमटेंच्या कवितासंग्रहाला दिलेली प्रस्तावना नुसतीच वाचनीय नाही तर त्यातून बाबा आमटेंनी त्यांचे आयुष्य दु:खी, कष्टी रोग्यांसाठी कसे सहजतेने उधळून दिले हे व्यवस्थित कळते. बाबा आमटे इंग्रजीत कविता करत असत ही नवीन माहिती या प्रस्तावनेतून मिळते. येशू ख्रिस्तावर त्यांची अपार श्रद्धा होती ही माहिती आपली उत्सुकता चाळवते.
'अस्मिता महाराष्ट्राची' (१९७१) या डॉ. भीमराव कुळकर्णीलिखित पुस्तकाची प्रस्तावना मराठी मनोवृत्तीवर कोरडे ओढते. महाराष्ट्रात उद्योग-धंदे, व्यापार-उदीम असूनदेखील महाराष्ट्रात राहणारी मराठी जनता या भरभराटीपासून दूर का असा सवाल पुलं आपल्या प्रस्तावनेतून विचारतात. शिवाजीमहाराज, टिळक, फुले, आगरकर वगैरे वंदनीय माणसे आहेत पण आपण फक्त त्यांचा जप करत राहिलो तर खोट्या अहंकाराने आंधळे होऊ असे स्पष्ट प्रतिपादन करतात. शिवाजीमहाराजांना अठराव्या शतकात डचांनी स्थापन केलेला एक छापखाना राजापूरजवळ सापडला होता. ते तंत्र आपल्या इथे प्रसिद्ध झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा असू शकला असता. दुर्दैवाने छापखाना चालवू शकणारे कुशल कामगार आपल्याकडे नव्हते. शेवटी महाराजांनी तो छापखाना एका गुजराती व्यापार्याला विकून टाकला. मराठी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ही प्रस्तावना आहे.
'झोंबी' (१९८७ - आनंद यादव) या कादंबरीवरील प्रस्तावना वाचूनच माझ्या अंगावर शहारे आले. हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. ही प्रस्तावना वाचून हे पुस्तक वाचायचेच असे ठरवले आहे. भयानक दारिद्र्यात आयुष्याची कशी वाताहत होते आणि कर्ता पुरुष बेजबाबदार, रानटी, दारुडा असल्यावर स्त्रियांच्या आयुष्याची कशी फरफट होते याचे हृदयस्पर्शी वर्णन या प्रस्तावनेत आहे. डॉ. आनंद यादव अशा विपरित परिस्थितीतून झेप घेऊन समाजात मानाचे स्थान मिळवतात याचे कौतुक या प्रस्तावनेतून ओसंडून वाहते.
'गदिमा - साहित्य नवनीत' (१९६९) या पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनच गदिमांच्या अफाट प्रतिभेची आणि बेफाम उंचीची आपल्याला कल्पना येते. अनेक गीते, कविता, बालगीते, लावण्या, पटकथा, गीतरामायण, गीतगोपाल, गीतसुभद्रा, लघुकथा लिहून वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी जगाचा निरोप घेणारे पद्मश्री माडगुळकर एक महान प्रतिभावंत होते हे या प्रस्तावनेतून पुलं अधोरेखित करतात.
या व्यतिरिक्त 'रंग माझा वेगळा' (सुरेश भट), 'संगीतातील घराणी' (ना. र. मारुलकर), 'एक अविस्मरणीय मामा' (गंगाधर महांबरे), 'अवतीभवती' (वसंत एकबोटे), 'थोर संगीतकार' (प्रा. बी. आर. देवधर), 'मी कोण?' (राजाराम पैंगीणकर - मी नायकिणीचा मुलगा असे जगजाहीर करणारा लेखक), 'अशी ही बिकट वाट' (वि. स. माडीवाले), 'मातीची चूल' (आनंद साधले), 'मनाचिये गुंफी' (प्रकाश साठ्ये), 'प्रतिमा - रूप आणि रंग' (के. नारायण काळे) या पुस्तकांच्या प्रस्तावनादेखील अतिशय उद्बोधक, वाचनीय, उत्कंठावर्धक, आणि दर्जेदार आहेत.
चांगले, सकस, विचार करायला प्रवृत्त करणारे, मन गुंतवून ठेवणारे असे काही दर्जेदार वाचावयाचे असल्यास 'चार शब्द' हे पुस्तक आपल्याला तो आनंद खचितच देईल यात शंका नाही. नुसते इतकेच नाही तर आपली दृष्टी स्वच्छ करणारे, विचार नितळ करणारे, आणि आपल्या कृतीमध्ये चांगला विचार ओतण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारे असे हे पुस्तक आहे.
लेखक - समीरसूर
हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment