Friday, November 10, 2017

या महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा !!

आज आपल्या लाडक्या पुलंचा जन्मदिवस.जरी ते आज आपल्यांत नसले तरी त्यांची कमी कधीच जाणवली नाही.कारण त्यांनी आपल्याला इतकं काही देऊन ठेवलंय की ते जन्मभर पुरेल.माझा आयुष्याकड़े पाहण्याच्या दृष्टिकोन फक्त आणि फक्त पुलंमुळेच बदलला.कारण त्यांनी अशी एक अनमोल गोष्ट मला शिकवली ती म्हणजे 'हसणं'. मनुष्याला मिळालेली 'हसू'ही एक दैवी देणगी आहे.माणूस हा एकमेव सजीव आहे की जो हसू शकतो.आणि ही देणगी आपल्याकडे असून सुद्धा आपण तिचा वापर करत नसू तर त्या जगण्याला काय अर्थ नाही.

पुलं एका भाषणात म्हणाले होते की,"महाराष्ट्राने तीन व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं.ही महाराष्ट्राची सांस्कृतिक दैवतं आहेत असं म्हटलं तरी चालेल.एक म्हणजे शिवाजी महाराज,दूसरे लोकमान्य टिळक आणि तीसरे बालगंधर्व.तीन वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं आहेत.अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळू शकते.परंतु विभूतिमत्व मिळणं फार कठिण आहे.व्यक्तिमत्व मिळू शकतं पण विभूतिमत्व मिळत नाही.आणि ते का मिळतं कुणाला कळत नाही.कारण असे काही चमत्कार असतात की ज्याच्याबद्दल शवविच्छेदन करताच येत नाही.कारण त्या गोष्टीचं शवच होत नाही.त्या जीवंतच असतात." 

मी म्हणेन की,महाराष्ट्राने चार व्यक्तिंवर जीवापाड प्रेम केलं.आणि चौथी व्यक्ती म्हणजे पुलं देशपांडे.
पुलंचं साठ-सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेलं साहित्य आजही तितकच ताजं वाटतं.हीच त्यांच्या लिखाणातली खरी गंमत आहे.हे लिखाण अमर आहे यात काय शंकाच नाही.त्यांनी लिखाणातून उभ्या केलेल्या व्यक्ती या कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसतच असतात.उदाहरणार्थ रत्नागिरीत गेलो तर अंतुबरवा,झंप्या दामले,उस्मानशेठ,मधु मलुष्टे अशा व्यक्तिंची भेट होतेच.सिंधुदुर्गात गेलो की काशीनाथ नाडकर्णी,गोव्यातला ऑगस्टिन फर्टाडो किंवा मग बेळगांवातले 'रावसाहेब' हे भेटतात.पुण्याला गेलो तर हरितात्या,नारायण,चितळे मास्तर,सखाराम गटणे ही मंडळी भेटतात.मुंबईतले सोकाजीनाना त्रिलोकेकर,बाबुकाका खरे,कायकिणी गोपाळराव,नानू सरंजामे,प्रोफेसर ठीगळे,मुख्याध्यापिका सरोज खरे(आपली),जनोबा रेगे,द्वारकानाथ गुप्ते असे असंख्य नमूने भेटतात.एखादा पारशी दिसला तर पेस्तनकाकांचा भास होतो.
पुलं जरी आज आपल्यांत नसले तरी त्यांनी कल्पनेच्या रुपात घडविलेल्या या व्यक्ती आजही जिवंत आहेत.आणि त्यांचा पावलोपावली आपल्याला प्रत्यय येतो आणि आपसूकच हसू पण येतं.या व्यक्ती जशा अमर आहेत तसेच पुलंचे विचार पण अमर आहेत.पुलंचे शब्द हे जितके खोखो हसवतात तितकेच कधी कधी हसता हसता डोळ्यात पाणी देखील आणतात.ते सत्य अगदी सहजतेने लिहित.त्यावर त्यांना कसलीही बंधनं आली नाहीत.
पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुलंच्या साहित्यावरुन 'पुलं देशपांडे नावाचे कोणीतरी होते, एवढं पुराव्याने शाबित करण्यापलीकडे या साहित्यात दुसरं काही नाही'.पेस्टनकाकांच्या भाषेत,"तुम्हाला सांगते,ते वैकुण्ठ मध्ये असेल हा,सिटिंग नेक्स्ट टू गॉड.आय टेल यू"

असो, पुलंबद्दल बोलायला सुरुवात झाली की ते संपतचं नाही.पण आज त्यांच्या जन्मदिवसामुळे त्यांच्याबद्दल लिहावसं वाटलं.तर अशा या महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा..


1 प्रतिक्रिया:

Manish and Friends.. said...

मनोज साहेब, दीपक साहेब,
शिवाजी महाराज, टिळक आणि बालगंधर्व यांच्या सोबत पु. लं. ची तुलना ज...रा चुकीची आहे. मी स्वतः पु. लं. चा चाहता आहे आणि मलाही ते आवडेल पण ... जसे आपल्या कडे साडे तीन मुहूर्त आहेत तसेच सडे तीन दैवत असले तर ? हे मला जास्त संयुक्तिक वाटते. (कुणाचाही अनादर ना करता).

एक पु. लं. प्रेमी,
मनिष नेहेते