Monday, June 28, 2021

नव वर्ष कुणाचं - पु. ल. देशपांडे

हा लेख मराठीत टंकून आपल्या ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री सतीश बेलवलकर ह्यांचे मनापासून अनेक धन्यवाद.

हेम्लेटला प्रश्न पडला होता जगावं की मरावं? मला वाटत, खरा प्रश्न जगावं की मरावं नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न घेऊ देता त्यालता ताजेपणा टिकवून कसा जगावे हा आहे. प्रश्न आहे तो जगण्यातला उत्साह टिकवण्याचा. तसा आमच्या चाळीतल्या गुत्तींकर काकांनाही आहे. पण तो दुसऱ्याचा उत्साह नाहीसा करावयाचा. गुत्तीकर म्हणजे चालते बोलते विरजण आहे पण हा उत्साह नाशकांचा वंशज जुना असावा. माझा अंदाज आहे की कवी मोरोपंतांना बारामतीत असेच कुणीतरी गुत्तीकर भेटले असतील. पंतानी सहज त्यांना नवीन घर बांधायचा विचारात आहे. सांगितले असेल लगेच विरजनपटु ।। कशाला घर नी बिरं बांधताय पंत।। उगीचचं घुशींची धन असं म्हणून मोरोपंताचा मोरु केला असेल पंत भराभरा घरी आले असतील आणि दौतीत लेखणी बुडवून त्यांनी “का न सदन बांधावे" की पुढे त्यात बिळे करतील घुसं?" हा सवाल कागदावर उतरुन आर्येल बंदिस्त करुन टाकला असेल.
गुत्तीकरांन सारखे हे उत्साह नाशक उपदेशक गुरु खड्या सारखे वगळावे. त्यासाठी गुरुला प्रसन्न करणाऱ्या खड्याऐवजी गुरुची पीज टाळणारा खडा मिळाल्यास पहावा सतत इतरांच्या उत्साहावर विरजण टाकणाऱ्या अशा मंडळींना टाळणे हे डासांना टाळण्याहून अवघड. पण असल्या अनिष्ट गुरुला आडवे करणारे गुरु महाराज अचानक मला आमच्या चाळीतच भेटले. समोरचे एम. एस. कुलकर्णी, कुठल्याही चाळीत आढळतात तसे चार कुळकर्णा यातील हे कुळकर्णी असे मी मानीत होतो. गादीवाले गोरे आणि मंडळीत गोऱ्याचे हिशोब ठेवण्याची कारकुनी करतात गोऱ्यांच्या इंग्रजीतल्या प्रभुत्वामुळे एम.एम. हा त्याच्या नावातल्या अद्य अक्षरांचा यं. यं. झाला आहे. चाळीतील सगळी माणस त्यांना यं यं. च म्हणतात. मुलंही यं. यं. काकाच म्हणतात ते स्वतः टेलीफोन वरुन पण यं. यं. असाच उल्लेख करतात सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही पहा चेहऱ्यावर “महाराष्ट्र राज्य लॉटरीचा कलका फल आजच" मिळाल्याचा आनन्द ओसंडत असतो. एकदा असेच खुशीत दिसले. मी काहीतरी बोलायच म्हणून म्हटलं "काय यं यं खुशीत दिसतात?" ।

- वेट म्हणत त्यांनी एखाद्या सराफाने मखमली पेटीतला दागिणा उचलून धरावा अशा ऐटीत पिशवीतून तट्ट भरलेली मटारची शेंग काढली आणि म्हणाले “लुक ऍट हर - व्हाट ऐं शेंग/कशी आहे?" शेंगेला मराठी प्रमाणे इंग्रजीतही स्त्रीलिंगी करुन यं यं नी मला खुशीचे कारण दाखवले जग जिंकायला निघालयाचा उत्साहात यं यं बाजारात भाजी आणायला जातात. बसच्या क्यमुध्ये देखील सदैव सैनिकापुढे पुढेच जायचे म्हणायला उभे राहिल्याच्या ऐटीत उभे असतात. हे कुटूंब सगळे सण उत्साहात साजरे करतात आमच्या चाळीतच कशाला ऐकूण सगळीकडेच सण साजरे करणे हे आता मागसले पणा लक्षण मानल जायला लागलंय पण कुळकर्णीच्या खिडकीत पाडव्याला न चुकता गुडी उभी राहते - दिवाळीला आकाश कंदील लटकतोच पण नाताळात देखील ताऱ्यांच्या आकाराचा आकाश कंदील "हॅपी न्यु ईअर" करत झळकत असतो रमजान ईदच्या दिवशी पण कुळकर्णीबाई खीर

आणि (भोपळ्याचा) कोर्मा करीत असतील. गणपती बाप्पातर हवेतच. यं यं अति उत्साहाने ती मूर्ति लाल पाटावरुन आणताता. एखाद दोन बाळ कुलकर्णी पुढे झांजा ही वाजवत असतात. वाढत्या किंमतीमुळे मुर्ती आकाराने आखडत गेली. तरी उत्साहाला

आहोटी नाहीच यंयंची कौटुंबिक बांधिलकी भलती भक्कम आहे.

आपल्या गणपती मागून प्रचंड जन समुदाय येतोच अश्या थाटात मुर्ति आणतात आणि मनात आणील तर आपला गणपती मंडईच्या महाकाय गणपतीला सोंडेवर घेईल अश्या ऐटीत लकडीपुलाचा घनदाट गर्दीतून स्वतःच्या आणि आळीतल्या इतर शिशुप्रजेसह वाट काढीत विसर्जनाला नेतात यांच्याशी बोलतांना आजवर मी कुठलीही वस्तू महाग झाल्याची तक्रार ऐकली नाही. सगळ्या हौशी मासिक बजेटात कसे बसवतात देव जाणे, गादीवाले गोरे आणि मंडळीत त्यांना अवांतर प्राप्ती आहे असेही नाही. फारतर अंथरुण पाहू. पाय पसरण्याचा धडा त्यांना त्या गाद्यानी दिला असावा. आजूबाजूची दुकाने सनमायका, ट्युबलाईट, आरसे, पंखे वगैरे अलंकरांनी सजीली तरी गादीवाल्या गोऱ्यांचे दुकान आद्य संस्थापक दे. भ नारोपंत गोरे त्यांनी त्रेतायुगात. जेव्हा केव्हा थाटले होते तसेच त्यांचा मागून गादीवर आलेल्या त्यांच्या वारसांनी ठेवले आहे. त्या लखलखत्या आधुनिक बाजार पेठेत, तुरुंगाच्या गजाआड पालथी मांडी घालून चरख्यावर सूत काढणाराचा महात्मा मोहनदास करमचंद गांधींचा शिळाप्रेसवर छापलेल्या रंगीत फोटो असलेले हे एकमेव कळाणहीन दुकान - शेजारच्या दुकानात डिम्पल, टीना मुनीम, शैरान अशी बुचकळ्यात टाकणारी नावे धारण करण्याऱ्या (आणि त्या खेरिज इतर फारसे काही धारण न करणाऱ्या) सौदर्यवतींची रंगबिरंगी चित्र लटकली आहेत आणि गादीवाल्या दुकानांच्या भिंतीवर मात्र ते एक मो. क. गांधी आणि बाकी फक्त पोपडे आहेत. असल्या वातावरणात राहून ही यं यं चा उत्साह गादीतून कापूस उसवावा तसा उसवत असतो. त्या उत्साहाला विरजण लावणे गुत्तीकरालाही जमले नाही. गेल्या गणेश चतुर्थीची गोष्ट यं यं गणपतीची मूर्ती आणतांना मांजर आडवे यावे तसे गुत्तीकर आडवे आले मी वरच्या बालकनीत आलों खाली पाहातो तर यं यं आणि गुत्तीकर ह्यांचे जोरदार सवाल जबाब चाललेले सवयीप्रमाणे गुत्तीकरांनी आपल्या उत्साह नाशक शब्दाचे विरजण यं यं वर फेकले असणार पण यं यं आपल्या वाणीने प्रती पक्षाला कापूस पींजल्यासारखा पिंजू शकतो हे मला त्या दिवशी कळले.

तेथे गुत्तीकरांना फैलावर घ्यायच्या थाटात म्हणत होता “ गणपती कशाला आणायचा हा काय प्रश्न आहे" कमाल आहे गणपती नाही आणायचा तर आरत्या कुणापुढे म्हणायच्या?

“कशाला म्हणायला हव्या आहे आरत्या" गुत्तीकर बोलले “मग रचणाऱ्यांनी त्या रचल्या कशाला गादीखाली ठेवायला (मला वाटल गादीखालीच म्हणाले) ।

“अहो पण आरत्या ओरडून आणि झांजा बडवून आळीत गलका माजवण्यात काय अर्थ आहे" भलें आरतीला गलका म्हणतात. मनुष्य आहे तिथे आरडा ओरड आहेच. चोवीस तास शांतता तर घर काय आणि स्मशान काय सेम टू सेम

“पण मि कुळकर्णी हा सगळा पैशाचा अपव्यय आहे गुत्तीकर" गणपती आणणे पाडव्याची गुढी उभारणे, दिवाळीला पणत्या लावणे दसऱ्याला आपट्याची पाने आणणे हा जर पैश्याचा

अपव्यय असेल तर चांगला व्यय कुठला? डॉक्टरांची बिल भरण्याकरता पैसा साठवणे हा?

“नाही-नाही मूर्त्या विकत घेण्यात पैशे साठवा. त्या दीड दिवसानंतर पाण्यात बुडवा. पुढल्या वर्षी नवी मूर्ती नवा खर्च. पुन्हा पैशे पाण्यात. मला वाटले इथे यं यं तडकणार, पण अगदी अलट तो म्हणाला “आय ऐम सॉरी फॉर यू" ह्या इंग्लीश वाक्याचा अजून परिणाम व्हावा म्हणून यं यं नी त्याला अनुष्टुभाची चाल लावली असावी.

“गुत्तीकर साहेब पैसा ही वस्तू पाण्यात कधी जात नाही फक्त खिसेपालट होतो. आपल्या हातातली साधी दोन रूपयाची नोट आपल्या खिशात येण्याआधी किती खिशातून हिंडून आली असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अहो, लक्ष चौऱ्यांशी फेरा माणसा सारखा नाण्याला सुद्धा असतो. मनात आश्चर्य युक्त आदर किंवा आदरयुक्त आश्चर्य यातलं काहीतरी दाटायला लागल होतं. हे म्हणजे आपल्या दारी पहाटे रोजच वर्तमान पत्र टाकणाऱ्या इसमाने "आजचा

अग्रलेख मी लिहिलाय जरा वाचून तूमचे मत सांगा - म्हटले तर आपले जो होईल तस माझं झालं होतं.

अहो पैशाचा कसला हिशोब करता? नुसती गणपतीची मूर्ति आणायला आपला बाप निघालाय म्हणतांना पोरांचे चेहरे किती फुलतात, ते कधी पाहलय तूम्ही? हातात नवा आकाश कंदील घेतलेले पोर आनंदानी कसे उजळून येतं पाहिलय तूम्ही? एवढच कशाला यतेचे नवीन पुस्तक, नवी छत्री पोरांना मिळाल्यावर ते पोरं कश्या उड्या मारतात ते तुम्ही पाहिलय. नव्या पस्तकाचा वास तूम्ही घेतलाय का? अहो नवे ह्या शब्दातच जादू आहे. आमच्या दुकानात जूनी गादी फाडून त्यातला कापूस पिंजून आम्ही नवी गादी बनवून गि-हाईकाला देतो त्यावेळेला नव्या गादीचा नवा गब्दुलपणा आम्हाला गि-हाईकांच्या चेहऱ्यावर दिसतो.

प्राण प्रतिष्ठा, आरत्या, देवे वगैरेह षोडशोपचार होण्या आधीच हातातल्या विधादात्या गणपतीची एवढी पॉवर यं यं मधे शिरलेली पाहून मी थक्कच झालो. त्यांचे बोलणे काही तर्काला धरून होते असे नाही. पण त्या मागच्या तळमळी मुळे तर्क वगैरे दुय्यम होते. शेवटी समारोपाच्या सुरात यंयं म्हणाले “ ते जाऊ दे गुत्तीकर संध्याकाळी आरतीला या? यंदा उकडीचा मोदकाचा प्रसाद सर्वांना वाटणार आहे, आम्ही. कशाला म्हणून नाही विचारलत? गुत्तीकरांच्या डोक्यात इतके सारे उकडीचे मोदक किती पैशे निष्कारण वाया गेले. पहिल्यांदा आले असणार.

मग यंयं म्हणाला आमच्या लग्नाला यंदा १५ वर्षे पूर्ण झाली कशी गेली कळली नाही. अहो काल बोहोल्यावरून उतरंल्यासारखो वाटतय. इथं पोर खांद्यापर्यत उंच झाली तरी.

इथे मात्र कालच्या सारखा आज वाटणार खुद्द यंयं मला नवाच वाटायला लागला तोच-तोच वाटणारा कुळकर्णी रोज पाहत होतो, नव्हें, पाहुनही त्याला काय पाहायचे म्हणून पाहतही नव्हतो आता लक्षात आलं कि नवं पाहाव नवं शोधाव हा उत्साह नाहीसा करणारे अनेक अदृश्य गुत्तीकर आपल्या मनात नकळत मुक्कामाला आलेले असतात. एखाद्या यंयंला मात्र रोजचा दिवस नवा करून जगायचं रहस्य सापडलेला असतं ते नवं त्यांच्या गादीवाल्या गोरांच्या गिराहीकात दिसत, मटारीच्या शेंगेत दिसत, इतकच काय पण १५ वर्षापूर्वी जिच्याशी लग्न लागलं ती बायकों सुद्धा बोहोल्यावरून उतरतांना जशी दिसली होती तशीच दिसते. यंयंची धडपड "शेवटला दिस गोड व्हावा" ही नाही तर रोजचा दिवस नवा व्हावा ही आहे असा रोजचा दिवस नवा करुन जगायचा मंत्र सापडलेला 'गुरू' वर्षानवर्ष आमच्या गल्लीत घरा समोर राहातो. याचा मला पता नव्हता. रोजचा दिवस नवा करत जगायची विद्या ज्यांना साधली आहे त्यांच्या पंचागाची तिथी पाडव्याचीच म्हणायला हवी. नवे वर्ष हे त्यांचे “मागी पानावरून पुढे चालू' करीत जगणाऱ्यांची नव्हें. असा रोजचा दिवस नवा करून जगणाऱ्याच्या दारापुढे वर्षभर एक अदृश्य गुढी उभारलेली असते. यंयंच्या दारातली ती गुढी आता मला दिसायला लागली आहे. थैक्यू यं यं

(जराजिर्ण कागदावरून पुनर्लेखन सौ. शैला बेलवलकर, नागपूर)
(कालनिर्णय जानेवारी १९८८)

Wednesday, June 16, 2021

आनंदयात्री ! - समीर जावळे

'एखाद्या माणसाची आणि आपली व्हेवलेंथ का जमावी? आणि एखाद्या माणसाची का जमू नये? याला काही उत्तर नाही..' 'पंधरा पंधरा- वीस वीस वर्षांचा परिचय असतो.. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापुढे आपलं नातं जात नाही. काही माणसं क्षणभरात जन्मजन्मांतरीचा दुवा साधून जातात.' बरोबर ही वाक्य लिहिली आहेत ती पु. ल. देशपांडे नावाच्या अवलियानेच. कारण ते होतेच तसे. रावसाहेब या म्हणजेच बेळगावच्या कृष्णराव हरिहर यांची कथा सांगत असताना पु.लंनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. व्यक्ती चित्रण ही तर त्यांची खासियत. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच खास आहे. आज आपल्या लाडक्या पु.लंना आपला निरोप घेऊन 21 वर्षे झाली. आज त्यांचा एकविसावा स्मृतीदिन.
फोटो

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, कोट्यधीश पु.लं, ही आणि अशी अनेक विशेषणं लागलेला माणूस आपल्याला त्याच्या नावापुढे लागलेलं एक विशेषण नकोसं वाटणाराच राहिला आहे. ते विशेषण म्हणजे कैलासवासी पु.ल. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. ज्या माणसाने निखळ हसायला शिकवलं तो माणूस आपल्या डोळ्यात आसवं ठेवून आजपासून एकवीस वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात आसवं ठेवून निघून गेला. अगदी काल घडल्यासारखाच हा प्रसंग आहे असंच वाटतं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरात आपल्या घरातला एखादा माणूस गेला अशी जी भावना निर्माण होते ती निर्माण होणं म्हणजे पु.ल. देशपांडे.

हरितात्या या त्यांच्या कथेत ते सांगतात की हरितात्यांनी आम्हाला कधी पैशांचा खाऊ दिला नाही. पण वेळप्रसंगी मुठी वळतील तो आत्मविश्वास, ते धैर्य हे त्यांनी न मागता आम्हाला दिलं. अगदी तसंच आहे पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्रातल्या मागच्या पिढ्या विसरलेल्या नाहीतच. तशा पुढच्या कैक पिढ्या विसरणार नाहीत. याचं कारण आहे ते म्हणजे त्यांची खास शैली आणि अफलातून विनोद बुद्धी. 'स्टँड अप कॉमेडी' हा प्रकार काय असतो? ते ठाऊक नसतानाही कथाकथन करून तो इतक्या वर्षांपूर्वी म्हणजेच 60 च्या दशकात करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. नुसतं धाडस दाखवलं नाही तर तो प्रकार रूजवला आहे. एक मोठा पोडियम, त्यावर लावलेला माईक, शेजारी भरून ठेवलेलं पाणी आणि हातात पुस्तक घेऊन पुलं त्यांची कथा फक्त वाचून दाखवत नसत तर ती जिवंत करत.

व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुझपाशी, खोगीरभरती, अंमलदार, ती फुलराणी, तुका म्हणे आता, गुण गाईन आवडी, खिल्ली, चार शब्द, गणगोत, पुरचुंडी, बटाट्याची चाळ, हसवणूक अशा कितीतरी पुस्तकांची नावं घेता येतील जी त्यांनी लिहिली आहेत आणि ती आजही लोकांच्या स्मरणात आहेत. असं म्हणतात की प्रत्येक लेखकाचा एक काळ असतो.. तो काळ सरला की त्या लेखकाला लोक विसरतात. पुलंच्या बाबतीत मात्र ते झालेलं नाही. त्यांच्या पुस्तकांमधून, कथांमधून, सीडीजमधून ते आपल्या मनामनातून जिवंत आहेतच.

मी वयाच्या दहाव्या वर्षापासून पु.ल. देशपांडे ऐकतोय, वाचतो आहे. मला व्यवस्थित आठवतंय की मी पहिली ऐकलेली कथा म्हैस ही होती. एका म्हशीचा बसखाली येऊन अपघात होतो आणि त्यानंतर पु.ल. फक्त आपल्या शब्दांमधून आणि अफाट निरीक्षण शक्तीतून आपल्या पुढे अख्खी बस आणि अख्खं गाव उभं करतात. एस.टी.तला कंडक्टर, ड्रायव्हर, मास्तर, सुबक ठेंगणी, मधु मालुष्टे, उस्मानशेठ, झंप्या दामले, बबूनाना, मास्तर अशी कितीतरी पात्र त्यांनी आपल्या लेखनातून उभी केली त्यांना आवाज देऊन जिवंत केली. एवढंच नाही तर म्हशीचा मालक धर्मा मांडवकर, ऑर्डरली, पुढारी बाबासाहेब मोरे, इन्सपेक्टर अशी सगळी पात्रंही त्यांनी जिवंत करून दाखवली आणि आपल्याला खळाळून हसवलं आहे. 'अरे अर्जूनाना कशाला धाडलंस? कंडम माणूस.. तो फोलिसासंगती कवड्या खेलत बसल..' 'बरा त बरा हे आडली साहेब होते यांनाच घेऊन आलो..' ए डायवर कोन ए.. ? 'हं हं.. मी बाबासाहेब मोरे' हे आणि असे सगळे संवाद तोंडपाठ आहेत.
फोटो
जी गोष्ट म्हैस या कथेची तीच तुम्हाला कोण व्हायचं आहे? पुणेकर, नागपूरकर? का मुंबईकर ? या कथेची. 'तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी ही तीनच खास स्थळं नागपूर, पुणे आणि मुंबई या पहिल्या वाक्यातूनच ते आपल्याला खिशात टाकतात.' 'तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का? जरूर व्हा तूर्त सल्ला एकच पुन्हा विचार करा..' पुण्यात दुपारी खणखणारा टेलिफोन आणि त्याबद्दल केलेलं वर्णनही आपल्या खो-खो हसवतं. 'हॅलो, हॅलो असं फोन आल्यावर म्हणायचं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालाही जर पैसे लागले असते तर आणि दुपारच्या झोपेतून उठवल्यावर आवाजात जो काही नैसर्गिक तुसडेपणा आणून कोण ए असं वस् कन ओरडायचं' हे वाक्य ऐकलं की आपल्याला जे काही हसू येतं त्याला तोड नाही..

सखाराम गटणे, नामू परिट, हरितात्या, पेस्तनकाका, दामले मास्तर ही सगळी पात्रं अक्षरशः ते जगले आहेत असंच आपल्याला त्यांच्या कथा ऐकताना वाटत राहतं. जसं ते हरितात्यांच्या कथेत म्हणतात 'कुठलाही ऐतिहासिक प्रसंग घडला की हरितात्या नेमके तिथे कसे हजर होते? हा प्रश्न आम्हाला पडायचा आणि मग पुढे जाऊन लक्षात आलं की इतिहास नावाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हरितात्या. शाळेतला इतिहास आम्हाला कधीच आवडला नाही कारण त्यात सन होते. हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टी आवडल्या कारण ते आपली शिवाजी महाराज, बाजीप्रभू यांची भेट घडवून आणायचे' अगदी असंच पुलंच्या लेखणीचं स्वरूप होतं. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांची ते आपल्या लिखाणातून आणि बोलण्यातून भेट घडवून आणायचे. त्यामुळेच ती पात्रं आपल्या डोळ्यासमोर उभी रहायची.
फोटो
असं म्हणतात की एखाद्याला रडवणं खूप सोपं असतं.. भावनिक प्रसंग, हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग लिहिले की रडू येतं. कारण वाचन केल्यानंतर माणूस त्यात गुंतत जातो त्या भावनेशी एकरूप होतो आणि त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहतात. पण खरं कसब पणाला लागतं ते हसवण्यात. एखाद्या माणसाला हसवणं ही किमयाच आहे. ती पुलंनी साधली होती. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि सूक्ष्म निरीक्षणातून.

पुलं फक्त कथा, कादंबऱ्या, नाटकं या निवडक साहित्यकृतींमध्येच अडकून राहिले नाहीत. त्यांनी वाऱ्यावरची वरात सारखं लोकनाट्य लिहिलं. 'ती फुलराणी आणि त्यातला तो संवाद आठवा.. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा.' भक्ती बर्वे, अमृता सुभाष, हेमांगी कवी इथवर अनेक अभिनेत्रींनी ती फुलराणी साकारली. त्यांना ती हवी हवीशी वाटली म्हणूनच.

नवरा बायको, गोकुळचा राजा, घरधनी, देवबाप्पा, संदेश, अंमलदार या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा, कथा, संवाद लिहिले, तसंच जवळपास वीस-बावीस सिनेमांसाठीही काम केलं. गुळाचा गणपती हा त्यांचा सिनेमा म्हणजे सबकुछ पु.ल. असाच होता.

गणगोत हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींवर होतं. रावसाहेब ही कथा याच पुस्तकातली आहे. रावसाहेबांचं वर्णन करतानाही पु.लंनी रावसाहेबांची शिव्या देण्याची शैली, दणकट माणुसकी, पु.लंनी बेळगाव सोडलं तेव्हा हळवे झालेले रावसाहेब हे सगळं ज्या पद्धतीने उभं केलंय त्याला खरोखर तोड नाही. कृष्णराव हरिह कोण होते? हे आपल्याला माहितही नसतं पण पुलं त्यांची भेट घडवून आणतात. एखादा माणूस वरून जरी कठोर वाटत असला तरीही आतून किती मृदू असतो अशा वेगळ्या प्रकारचं व्यक्तीचित्रण लक्षात राहण्यासारखं.

जी बाब खऱ्याखुऱ्या व्यक्तीरेखांची तीच बाब व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांमधल्या पात्रांचीही. अंतू बर्वा आठवा.. 'कुठे बोलू नका हो दारचा हापूस ही गेली तेव्हापासून मोहरला नाही हो..' काय अंतूशेठ रत्नागिरी झकपक झाली हो तुमची.. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो काळोख आहे तो बरा आहे. गळकी कौलं आणि पोपडे उडालेल्या भिंती हे पाहायला वीज कशाला हवी?' हे सांगणाऱ्या अंतूची आर्तता. त्याच अंतूची अंतूशेठ म्हणून नक्कल करणारे मित्र हे सगळं त्यांनी ताकदीने उभं केलंय. एका लेखणीच्या जोरावर इतक्या पात्रांना जन्म द्यायचा आणि शिवाय ती सगळी आपल्या वर्णनातून जिवंत करायची हे काम नक्कीच खायचं काम नाही. ही किमया फक्त पुलंच साधू शकतात.
फोटो
बरं गंमत म्हणजे व्यक्तीचित्रणं आणि प्रवासवर्णनं तर त्यांनी केलीच.. पण प्राण्यांची निरीक्षणं? तीपण कसली अफलातून केली आहेत. पाळीव प्राणी ऐकताना.. आपण दंग होऊन जातो. 'पारव्यांचं घुमणं हे मला बऱ्याचदा मुंबईतल्या पारशी लोकांशी मिळतंजुळतं वाटतं आणि काही बाबतीत वागणं सुद्धा'. 'डांबिस हा शब्द मी जेव्हा पहिल्यांदा ऐकला तेव्हा इंग्रजीत बोक्याला डांबिस म्हणत असावेत असं वाटलं पण असा काही शब्द नाही बोक्यालाही कॅटच म्हणतात हे कळल्यावर मला त्या भाषेची किव आली.' 'एक मोठी लोणच्याची बरणी आणि चार कप-बशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला असं म्हणताच पटकन कावळा शिवला पिंडाला.' 'कावळा शिवत नाही यावर त्याची चूक नाही हो एकेकाची वेळ असते.' 'एका माणसाने माकडही पाळलं होतं पण दोघांचा आचरटपणा इतका वाढला की कुणा-कुणाला पाळलं आहे तेच शेवटपर्यंत कळलं नाही.' ही आणि अशी वाक्य ऐकून आपण पोट धरून हसतोच शिवाय त्यांनी केलेलं प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं वर्णनही आपल्याला पटतं.

पुलंनी महाराष्ट्राला काय दिलं असं जर कुणी विचारलं तर निखळ हसू हे उत्तर अगदी समर्पक ठरेल यात कुणाच्याही मनात शंका नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी आनंदयात्री आहे. जगण्यातला आनंद त्यांनी कायम शोधला. फक्त शोधलाच नाही तर तो आपल्या लिखाणातून, नाटकांमधून, कलेतून, गाण्यांमधून, संगीतातून वाटलाही. खळाळून निखळ हसवणारा हा माणूस अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. मात्र या अवलियाने आपल्या विचारांचा, लेखनाचा, कथांचा अमूल्य असा ठेवा आपल्या सगळ्यांसाठी ठेवला आहे. त्यामुळे आनंदयात्री जातानाही मागे आनंद ठेवून गेला आहे..अनंतकाळासाठी!

समीर जावळे
मुंबई तक
१२ जून २०२१

पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा... - शंकर फेणाणी

जेष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे मित्रवर्य श्री शंकर फेणाणी यांनी 'लोकप्रभा'साठी कथित केलेल्या आठवणी 

गेले काही दिवस पुलंविषयी बरंच काही छापून आलं, बोललं गेलं, दूरदर्शनवरही दाखवलं गेलं. आज मी आपणास 'पुलं आणि माझे वैयक्तिक संबंध याविषयी चार शब्द सांगणार आहे.

प्रत्यक्ष मुद्यावर येण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

पुलंचे आजोबा, श्री. वामन मंगेश दुभाषी यांच्या कुटुंबियांची कारवारला एक चाळ होती. त्यात आम्ही लहानपणापासून भाडेकरू म्हणून रहात होतो. १९४० साली मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मी व माझी थोरली बहीण मुक्ता, दोघे प्रथम मुंबईला आलो. त्यावेळी कारवारला मॅट्रिकचे सेंटर नव्हते. आल्या आल्या, वडिलांच्या सांगण्यावरून वामनरावांना भेटण्यासाठी आम्ही दोघे पार्ल्याला त्यांच्या राहत्या घरी गेलो असताना त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'ची त्यांनी, मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाची एक प्रत आम्हाला बहाल केली. वामनराव खरोखर विद्वान असून, संस्कृत पंडित होते. तसेच उत्तम चित्रकारही होते. त्यांनी घरातल्या भिंतींवर रामायण, महाभारतातील काही प्रसंग उत्तम तर्‍हेने चितारले होते. त्यावेळी मी अवघा १७ वर्षाचा होतो व पुलं माझ्याहून फक्त दोन वर्षानी मोठे. तरीही तोवेळपर्यंत माझा व पुलंचा परिचय मुळीच नव्हता.

पुढे १९४२ मध्ये मी वांद्र्याला राहायला गेलो. तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला आणि मी सेवादल सैनिक म्हणून सेवादलात दाखल झालो. इथंच प्रथम पुलंची ओळख झाली व हळूहळू स्नेहात रूपांतर झालं.

१९४२ च्या चळवळीत सेवादलातर्फे, जनजागृतीसाठी म्हणून त्यावेळी पुलंनी 'पुढारी पाहिजे' नावाचा वग लिहिला. सुदैवाने त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. तमाशाच्या तालमी पुलंच्या राहत्या घरी पार्ल्याला होत असत. ते राष्ट्रप्रेमाने भारावलेले दिवस होते. रात्रौ १२-१२ वाजेपर्यंत तालमी चालत. पुलंच्या दिग्दर्शनाखाली आमची चांगलीच तयारी झाली व लवकरच आम्ही सेवादलातर्फे महाराष्ट्राचा दौरा यशस्वी केला. त्यातील एका शेतक-याचा रोल माझ्या वाट्याला आला होता. माझ्या नावावरून 'पुलं'नी त्यात एक गाणे रचले होते. त्याची सुरुवात अशी होती,

"शंकरभटा, लवकर उठा,
जागा झाला शेतकरी
,"
वगैरे... हा तमाशा साऱ्या महाराष्ट्रात अत्यंत गाजला.

त्याच सुमारास, नामवंत समाजवादी पुढारी ना. ग. गोरे, S.M. ऊर्फ अण्णा जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्यासारख्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांचा पुलंना आशीर्वाद लाभला व त्यातूनच अशा थोर मंडळींची ओळख होण्याचे सद्भाग्य आम्हालाही लाभले.

पुढे १९४९ च्या जून महिन्यामध्ये मी माहीमला 'सारस्वत कॉलनीत' राहायला आलो. योगायोगानं पुलंची थोरली बहीण वत्सला पंडित सारस्वत कॉलनीत राहायला आल्या. मी ४ थ्या मजल्यावर व पंडित कुटुंब ५व्या मजल्यावर. पुलंचं अधूनमधून बहिणीकडे येणंजाणं असायचं व अशावेळी आम्ही पुलंना आमच्याकडेही बोलवत असू. माझी धाकटी मुलगी पद्मजा त्यावेळी ४-५ वर्षाची होती. तिचा आवाज चांगला असल्यामुळे वत्सलाताई तिच्याकडून गाणी म्हणून घेत असत व तिचे कौतुक करीत. जा पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई मुलीकडे आल्या म्हणजे आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसत. त्याही पद्मजाकडून गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. तसंच माझी थोरली मुलगी उषा हिला मी वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहून दिलेले, "आम्ही विद्यार्थी म्हणजे समाजाचे आरसे" वगैरेंसारखे विविध विषयावरचे लेख, पुलंच्या आई, "मी भाईला हे वाचून दाखवते", असे म्हणून कौतुकाने घरी घेऊन जात. आणि दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक घेऊन येणाऱ्या उषाला बक्षिसानिमित्त भरपूर पुस्तके देऊन कोडकौतुक करीत. दुसऱ्याचे मनापासून कौतुक करण्याचा हा वारसा पुलंना आईकडूनच मिळाला असावा.

पुढे १९७४ मध्ये मी माहीमच्याच 'अव्हॉन अपार्टमेंट्स मध्ये राहायला आलो. इथे आल्यावर माझ्या नव्या घरी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनीही आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. त्यावेळी ते एन.सी.पी.ए.'चे डायरेक्टर इनचार्ज होते. त्यांचे जवळचे नातेवाईक अत्यंत सिरीयस असल्याने अर्ध्या तासाहून अधिक वेळ ते आम्हाला देऊ शकणार नाहीत या पूर्वअटीवर ते आले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बजावलं की, "अर्धा तास झाल्याबरोबर बोलवायला यावं. अर्धा तास होताच ड्रायव्हर आला. पण पुलं पूर्णपणे रमले होते. त्यांनी त्याला अजून एका तासाने यायला सांगितलं, पद्मजाकडून २ गाणी म्हणून घेतली. पंडित अभिषेकींचं, 'शब्दावाचून कळले सारे' आणि आणखी एक गीत तिने गायलं. ही ऐकून पुलं खूप खूष झाले. ते म्हणाले, "ही मुलगी पुढे मोठ्ठी गायिका होईल." पंचवीस वर्षापूर्वीचे भाईंचे हे भाकीत किती खरे झाले हे पाहून पुलं हे एक उत्तम द्रष्टे होते असे म्हणता येईल. तिचं गाणं ऐकून त्यांनी लगेच फर्माईश केली, "पेटी काढा'. पेटीवर मस्तपैकी बालगंधर्वांची दोन नाट्यगीते व दोन राग वाजवून त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बोटातील जादू अवर्णनीय अशी होती.

हॉस्पिटलमधून निरोप आल्याने आता मात्र जाणे भाग होते. तब्बल दीड तास कसा निघून गेला कळलंच नाही. पुढे त्यांनी रागदारी संगीत पेश करण्यासाठी NCPA वर पद्मजाला संधी दिली. प्रयोग छानच रंगला.

कालांतराने पुलं पुण्याला स्थाईक झाले आणि माझा फारसा संपर्क राहिला नाही. तरीदेखील पद्मजा ज्या ज्या वेळी पुण्याला जात असे तेव्हा पुलंना भेटल्याशिवाय रहात नसे. तेव्हाही ते आणि सुनीताबाई तिच्याकडून दोन-चार गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. माझ्या कुटुंबाचीही चौकशी करीत. त्यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांच्या मातोश्रींप्रमाणे ते सुद्धा आम्हां सर्वांशी कारवारी कोकणीत बोलत.

असा हा- विनोद सम्राट, हास्य रसाचे गिरसप्पा, कवी, लेखक, गायक, नट, चित्रपट निर्माता, दानशूर, बहुरुपी आनंदयात्री आम्हाला कायमचा सोडून गेला आहे. मागे उरली आहे अपेक्षा- समस्त मराठी आठ कोटी बांधवांची त्यांच्याच कवितेच्या ओळी उद्धृत करून मी म्हणतो -

"पाखरा, त्यजुनिया, प्रेमळ शीतल छाया,
भेटूनि ये गगनाला,
बघुनि ये देव लोक सारा
विश्व अपार, हृदयी संचित घेऊनि
परतूनी ये घरा
परतूनी ये घरा..."


हे पुरुषोत्तमा, पुन्हा जन्म घेऊन येशील ना?...

शंकर फेणाणी
(21 जुलै 2000)

Friday, June 11, 2021

पुलंच्या सानिध्यात कोरोना काळात - आरती नाफडे

12 जून 2000 रोजी पु.लं. च्या आनंदयात्रेची सांगता झाली. पु.लं. चे शताब्दी वर्ष उत्साहात पार पडले. त्यालाही दोन वर्षाच्या वरचा काळ लोटला. पण मनाच्या खोल डोहात 'आनंदयात्री' स्थिर आहे.

परचुरे प्रकाशन मंदिर यांनी 'आनंदयात्री' हे पुस्तक 12 जुलै 2000 रोजी प्रकाशित केले. अप्पा परचुरे यांनी या पुस्तकातील लेखांचे संकलन केले. समग्र पु. ल. दर्शन वाचकाला लेखांच्या माध्यमातून झाले. कारण प्रत्येक लेख म्हणजे पु. लं. यांच्या बहुगुणाचा, व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या जीवनाचा आरसा आहे. आरशातलं प्रतिबिंब हे सजीव, तरतरीत, खर बोलणार व मनावर ठसणार आहे.

पु. लं. वरील लेख, भाषण, साहित्य वाचतांना त्यांच्या विनोदा मागील विचारवंत प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. विनोदी लेखनाबद्दल आचार्य अत्र्यांनी फार मार्मिक वाक्य लिहून ठेवलं आहे. "आपल्याला हसविणारा विनोदी लेखक हा वेडा वाकड्या आणि वात्रट शब्दांच्या कोलांट्या उड्या मारणारा कोणीतरी उथळ आणि मूर्ख विदूषक नसून तो मानवजातीचा सर्वात मोठा उपकारकर्ता आहे.

मानवजातीला अशा उपकारकर्ता ची सध्याच्या परिस्थितीत नितांत आवश्यकता आहे. कोविड-19 च भूत आपल्याला कोलांट्या उड्या मारायला लावतं आहे. क्षणात हसू तर क्षणात रडू अशी तारेवरची कसरत सुरू आहे. आपलं स्वास्थ्य व हास्य हिरावून घेणाऱ्या या भुताला वठणीवर आणण्यासाठी भल्याभल्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना त्यात यश मिळो. पण आपल्या स्वतःला सांभाळण्याची आपली पण जबाबदारी आहे ना? कोरोनाच्या दडपणाखाली वावरतांना माणसाची मन:शक्ती अपुरी पडू लागली आहे. रोजच्या जगण्यातला आनंद, संवादातील हास्य, मोकळेपणा माणसातील सहवास या सगळ्याला तो पारखा होत चालला आहे. साधा हसला तरी कळत नाही समोर राक्षसी मास्क उभा आहे ना आपले कान पकडून. मग ते सात मजली हास्य तर दूरच राहिलं. मग गालातल्या गालात हसायचा आहे का? मनात हास्याची कारंजी उडवायची आहेत का? तर काढा बटाट्याची चाळ आणि घ्या वाचायला. मनाची मरगळ जाईल. आजूबाजूचे गंभीर वातावरण दिलखुलास करण्यासाठी पु. लं. सारखा उपकारकर्ता आपणास लाभला आहे. बटाट्याची चाळ हे हास्य नाट्य आपल्या जवळ असताना काय भीती आहे आपल्या जीवाला.

'गणगोत', 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकाची पानं उघडल्यावर भाई आपल्यासमवेत आहेत हा दिलासा मिळतो. ते आता नाहीत असं म्हणण्याची कोणी हिंमत करणार नाही. ह्या कोरोनाच्या एकाकी काळात आपल्या सोबत कोणी आहे हा विचार फार बोलका वाटतो.

आपल्या जीवनातली समृद्धी फार अनमोल आहे. तुम्हाला मन रमवण्यासाठी संगीत फार मोलाचं कार्य करतं. तुमचा मूड बदलवतो. वाचन करून कंटाळा आला का मग आता श्रवणाच काम करा. आपले भाई इथे पण आपल्या मदतीला हजर आहेत. साहित्यिक असून संगीतात मनमुराद डुबलेले त्यांचे व्यक्तिमत्व अनाकलनीय आहे. पु.लं. चे हार्मोनियम वादन ऐकणे हा फार आगळा वेगळा आनंद आहे.

माणसाला मन रमवण्यासाठी सतत वेगवेगळे विषय लागतात. संगीताचा आनंद घेऊन झाला पुढे काय? एवढा मोठा हा काळ घरातच कसा काढायचा? कोरोना तर घरातच थांबायला लावतो आहे. चला तर मग आता पु.लं. ची नाटकं बघूया. पु.लं. नी जवळपास सोळा नाटकं लिहिली पण त्यांच्या एका नाटकाने अगदी अल्पावधीतच जिंकले. त्या नाटकाला उदंड यश मिळाले. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील ते नाटक म्हणजे "तुझं आहे तुजपाशी" विनोदाने खच्चून भरलेलं नाटक पण प्रेक्षक अंतर्मुख होत असे. "ती फुलराणी" मनाचा वेध घेते. अशी नाटकं बघताना आपले तीन चार तास जातात पण जे साहित्य नंतर ही मनाला धक्के देतच रहात त्यांचं आयुष्य उदंड असत. म्हणूनच पु. लं. च्या विनोदी साहित्यावरील ध्वनिफीत ऐकण्याचा मनमुराद आनंद आपण घेऊ शकतो. व हास्य विनोदाचे तुषार आपल्याला सुखवीत असतात. नियमित प्रवास करणारे सहलींना जाणारे देश-विदेश चा फेरफटका मारणारे आता कोरोना काळात घरात बसून उबगले आहेत. जरा भटकंती करून येऊ म्हटलं तर बाहेर दांडा घेऊन आपले मामा उभे असतात व त्यांची अवज्ञा म्हणजे दांड्याला आमंत्रण. आता घरी स्वप्नरंजनात रंगून जगाचा फेरफटका मारायचा आहे तर बघा पु.लं. ची पुस्तक साद घालतात. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा अशा प्रवासवर्णनातून ते आपल्याशी संवाद साधतात. निसर्ग व माणूस वाचायला लागतो आपण त्यांच्या वाचनातून. अरुणा ढेरे म्हणतात पु.लं.चं लेखन वाचताना माणसाला आपल्या रक्ताचा लाल रंग वाढल्या सारखा वाटतो. चार-दोन रक्तपेशी नव्याने निर्माण झाल्या आहेत असे वाटते. आता कोरोना काळात हेच तर आपल्याला अपेक्षित आहे. प्राणवायू विनोदी वाचनातून मिळतो का? याचा अनुभव खरच घेऊन बघायलाच हवा अगदी प्रत्येकाने.

आपल्या जीवनाचा असा एकही पैलू नाही जिथे पु.लं. स्पर्श नाही. आता बघा कोरोना काळात 'घर हे ची माझं विश्व म्हणत' आपला सगळ्यात आवडता विषय व पैलू म्हणजे खाद्यपदार्थ. या काळात खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल. खाद्यपदार्थांची एक साखळीच रोज नव्याने घरोघरी पोहोचत होती. त्यात नवीन पदार्थांबरोबर जुन्यांना पण उजाळा मिळत होता. गृहिणींचे कौशल्य अगदी पणाला लागत होते. आधी पोटोबा. . . रिकामा वेळ सत्कारणी लागायला पाहिजेच ना. मग आमचे भाई 'माझे खाद्यजीवन' मधुन डोकावतात. भाई सांगतात अहो चिवडा सोलापूर पेक्षा कोल्हापूरचाच व तो पण छत्रे यांचा. भाई सांगतात "चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या 'रम' ला जी साथ दिली, ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली". भाईंनी लिहिलेलं हे वाचल्यावर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरले. त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हाताने चिवडा केला व त्याचा डब्बा पु.लं. ना पाठवताना एक आठवण सांगितली. यापूर्वी फक्त एकदाच असा चिवड्याचा डबा पाठवला होता लोकमान्य टिळकांना. लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा. भारताच्या सीमेवर भयानक थंडीत जीवाला वैतागलेला सैनिक कागद जाळताना अचानक 'माझे खाद्यजीवन' हा लेख हाती पडला व हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे असा निर्धार करून उठला. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले असे त्याने पत्र लिहून कळवले. जगण्याची उमेद वाढविणारे साहित्य या कठीण काळात परिस्थिती माणसाला नवजीवन देऊन जाईल हे मात्र खरंच. पु.लं. चे विनोद एकमेकात सांगणं व त्यावर हशा पिकवणं हे कुटुंबातील सदस्य खेळाचे स्वरूपात घेऊ शकतात. पु.लं. चे विनोद सांगायला सोपे असतात. त्यांचा प्रसार फार होतो. त्यांच्या अफाट लोकप्रियतेचा हा एक पैलू आहे.

कोरोना काळातील आपला उपकारकर्ता त्याच्या गुणसंपदेसह आपल्यासमवेत आहे. त्यांच्यातील आणखी एक दैदिप्यमान गुण बघू व आत्ताच्या घटकेला त्याचं महत्त्व जाणून घेऊ. सामाजिक कार्यात मोठमोठ्या देणग्या देऊन समाजाचे ऋण मान्य करणारा त्यांच्यासारखा लेखक आपल्यातीलच आहे. पु.लं.नी लिखाणातून व एक पात्री कार्यक्रमातून मिळालेल्या उत्पन्नातून अक्षरशा लाखो रुपये सामाजिक कार्याला वाटले.

कोरोनाच्या महामारी ने वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय जीवन फारच विस्कळीत झाले आहे. बाल, तरुण व वृद्ध सर्वांची आयुष्य पणाला लागली आहेत. त्यामुळे नव्या सामाजिक प्रश्नांना व आव्हानांना समोर जाऊन त्यांचे निराकरण करावे लागणार आहे. अशा वेळेस पु.लं. च्या दानशूरतेचा आदर्श एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. .आपल्या जवळ जो पैसा आहे त्यातूनच आपल्या कुवतीप्रमाणे दान करून सामाजिक बांधिलकी जोपासणे ही खरी निष्ठा व समर्पण आहे.

'आधी केले मग सांगितले' या उक्तीचा मतितार्थ लक्षात घेतला तर आता पुढील पिढ्यांसाठी आपले भाई फार मोठा व बोलका आदर्श आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.


आरती नाफडे
नागपूर  
भ्रमणध्वनी - ९०९६७२६७४९