Friday, November 9, 2018

अमृतानंदाचा वारकरी - जयंत साळगावकर

पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख पु.ल. प्रेम ब्लॉगसाठी पाठवल्याबद्दल श्री. अक्षय देसाई ह्यांचे खुप आभार.


पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही
                         
येत्या ८ नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’.. साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, दिग्दर्शक, संगीतकार, बहुरूपी नट, वक्ते अशा नाना रूपांत आलम दुनियेस ज्ञात असलेल्या पु. ल. देशपांडे नामक खेळियाचं जन्मशताब्दी वर्ष सुरूहोत आहे. त्यानिमित्ताने पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख आम्ही पुन:प्रसिद्ध करीत आहोत.

पंचवीसेक वर्ष झाली असतील. कुमार गंधर्वाचा ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम रवींद्र नाटय़मंदिरात होता. त्याची तिकिटे मी खूप आधीच काढून ठेवली होती. पण ऐनवेळी काही कारणामुळे मला त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मुलांना पाठविले. कार्यक्रम संपवून मुले घरी आली. त्यावेळी दहा-बारा वर्षांच्या असलेल्या मोठय़ा मुलाचे डोळे आनंदाने चमकत होते. तो आनंदातिशयाने मला सांगू लागला.. ‘‘आज मी पु. लं.ना हात लावला.’’ मला अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्याने स्पष्टीकरण केले. त्या कार्यक्रमात पु. लं. पहिल्या रांगेत बसले होते आणि मुले दुसऱ्या रांगेत! मध्येच केव्हातरी त्याने पु. लं.ना हात लावला होता आणि आपण एव्हरेस्टच जिंकले अशा थाटात तो ते मला सांगत होता. पु. लं.च्या आणि माझ्या ऋणानुबंधांची त्याला कल्पना नव्हती. पण शाळेत आणि इतरत्र पु. लं.बद्दल बरंच काही ऐकलेलं. हा नावाचा पुरुषोत्तम खरोखरीच ‘पुरुषोत्तम’ आहे हे त्याला समजले असणार आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष पु. लं.ना हात लावला ही फार मोठी बहादुरी झाली, अशा आनंदाने चिरंजीव वावरत होते.

त्यानंतर आठवडय़ानंतर पु. लं.च्या एकपात्री ‘बटाटय़ाच्या चाळी’चा प्रयोग होता. त्या कार्यक्रमाची तिकिटे मी काढली आणि मोठय़ा मुलाला बरोबर घेऊन गेलो. मध्यंतरात पु. लं.ना भेटण्यासाठी रंगपटात जाऊ लागलो तर सुनीताबाईंनी अडवले. म्हणाल्या, ‘‘मध्यंतरात भाई कोणाला भेटत नाहीत.’’ पण बाईंचा रोष पत्करून मी आत गेलो आणि पु. लं.ना भेटलो. ते माझ्याशी अतिशय मोकळेपणाने आणि प्रेमाने बोलले. मी त्यांना ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या कार्यक्रमात तुम्हाला हात लावल्याबद्दल मुलाला कसा ब्रह्मानंद झाला ते सांगितलं. पु. लं. हसले आणि त्यांनी मुलाचा गालगुच्चा घेतला. त्या क्षणी आमच्या चिरंजीवांना अस्मान ठेंगणे झाले.

पु. लं.चा निरोप घेऊन मी निघालो तेव्हा तो म्हणाला, ‘‘एवढय़ा मोठय़ा माणसाशी तुमची ओळख आहे?’’ त्यावेळी पिताजींबद्दल त्याच्या डोळ्यात जो आदराचा भाव चमकून गेला, तसा तो त्यानंतर कधीच दिसला नाही.

आपला माणूस!


जवळपास महाराष्ट्रातल्या गेल्या तीन पिढय़ा पु. लं.बद्दल हा असा आदर आणि सन्मान मनात बाळगून आहेत. पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही, तो चारचौघांशी मिळून-मिसळून वागणारा, इतरांच्या मनात स्वत:विषयी आपुलकी निर्माण करणारा असा असावा लागतो. तात्यासाहेब शिरवाडकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले त्या दिवशी गोदावरीला पूर यावा तसा आनंदाचा महापूर नाशिककरांच्या उत्साहाला आला होता. नाशकातील दुकानात एक पेढय़ाचा तुकडा किंवा फुलवाल्याकडे एक फुलाची पाकळी शिल्लक राहिली नव्हती. तात्यासाहेबांच्या अंगणात जी चाहत्यांची दाटी झाली होती त्यात काही अंगठेबहाद्दरही होते. त्यांनी तात्यासाहेबांचे लेखन वाचलेही नसेल; त्यांना फक्त आपले तात्या मोठय़ा गौरवाला पात्र झाले एवढेच समजत होते आणि त्यामुळे ‘तात्यांचा गौरव तो आपला गौरव’ अशीच प्रत्येकाची भावना होती. पु. लं.च्या बाबतीतही त्यांच्या चाहत्यांची दृष्टी अशीच आहे. पु. लं. कोणाही परिचित व्यक्तीशी बोलताना त्याची इतक्या आपुलकीने आणि जवळिकीने चौकशी करतात, की हा एवढा मोठा माणूस आपला आहे, आपल्या जवळचा आहे, या भावनेने समोरचा माणूस सुखावतो. पु. लं. आपलेच आहेत असे वाटणाऱ्यांपैकी मी एक.

आजकाल बसच्या रांगेत अर्धा तास कुणी जवळजवळ उभे राहिले तरी तेवढय़ा बळावर आपली दाट मैत्री असल्याचा उल्लेख करण्याचा शिरस्ता आहे. इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये तीन तास शेजारी बसले की झालेच ‘परममित्र!’ मैत्रीच्या नात्याचे इतके ‘लोकशाहीकरण’ झालेल्या आजकालच्या दिवसांत मी पु. लं.ना मित्र म्हणताना कचरेन. कारण माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध या असल्या मैत्रीच्या खूप पलीकडचे आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा मला नेहमीच एक आधार वाटत आलेला आहे. अडचणीच्या वेळी त्यांनी मला धीर दिला आहे, आधार दिला आहे. त्यांनी सहज म्हणून उच्चारलेल्या शुभेच्छा माझ्याबाबतीत वरदान ठरल्या आहेत.

पु. लं.चा आणि माझा तसा परिचय १९५२-५३ चा. ‘लोकसत्ता’कार ह. रा. महाजनींबरोबर मी पुण्याला गेलो होतो. तिथे महाजनींबरोबर डेक्कन जिमखान्यावर फिरत असताना आठ-दहा तरुणांचा घोळका समोरून आला. त्यातल्या चष्मा लावलेल्या, पांढरा शर्ट काळ्या पॅन्टमध्ये खोचलेल्या एका तरुणाने महाजनींची काहीतरी फिरकी घेतली. महाजनी रस्त्यावरच संतापले. थोडे पुढे गेल्यावर मी महाजनींना विचारले. ‘‘कोण होता तो?’’ महाजनी म्हणाले, ‘‘पु. ल. देशपांडे.’’ हे नाव मी ऐकून होतो, लिखाण थोडेफार वाचले होते, पण प्रत्यक्ष दृष्टिभेट झाली तेव्हा मी ‘लोकसत्ता’त राशिभविष्य लिहीत होतो. पु. लं. म्हणाले, ‘‘म्हापणकरासारखे लिहू नकोस, साळगावकरासारखे लिही.’’ म्हणजे नक्कल करू नका. स्वत:चा वेगळा ठसा ठेवा, असे त्यांना सांगायचे होते.

पुढे पु. लं. मुंबईत वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहू लागले. कारणपरत्वे त्यांच्या घरी माझे येणे-जाणे वाढू लागले. दि. वि. गोखले यांनी लिहिलेल्या आणि मी प्रकाशित केलेल्या ‘माओचे लष्करी आव्हान’च्या माहितीपूर्ण आणि वजनदार पुस्तकाला पु. लं.नी फार सुंदर प्रस्तावना लिहिली.

पु. लं.ना ‘सुपारी’

‘कालनिर्णय’ सुरू झाल्यानंतर त्यात पु. लं.नी लिहावे असे वाटले. त्या काळात दिनदर्शिकेत लेख लिहिणे ही नवीच गोष्ट होती. पु. लं.ना समक्ष भेटूनच लेख लिहिण्याची विनंती करावी म्हणून मी त्यांना पुण्याला फोन लावला आणि भेटायला येत असल्याचे सांगितले. पु. लं. म्हणाले, ‘‘मी पुढल्या आठवडय़ात मुंबईत येतो आहे, तेव्हा भेटू.’’ त्यावर ‘‘मला तुम्हाला पुण्यातच भेटावयाचे आहे. एक सुपारी द्यायची आहे..’’ असे मी सांगितले.

‘‘मुंबईवाल्याची सुपारी म्हणजे मला धास्ती वाटते,’’ असे पु. लं. म्हणाले. तेव्हा मी ‘‘मग सुपारीऐवजी नारळ घेऊन येतो,’’ असे उत्तर देऊन खरोखरीच नारळ, केळी, हार असे सर्व साहित्य घेऊन पु. लं.च्या पुण्याच्या घरी गेलो. त्यांना लेख लिहिण्याबद्दल विनंती केली. पु. लं.नी विषयाची चर्चा केली आणि लिहिण्याचे मान्य केले. त्यावर सुनीताबाई मला म्हणाला, ‘‘हा ‘होय’ म्हणाला असला तरी जमेलच असे गृहीत धरून चालू नका. त्याच्यामागे व्याप खूप आहेत.’’ लेख मिळणार नाही अशा समजुतीने मी परत आलो. पण आठ दिवसांत पु. लं.चा उत्तम लेख घेऊन मधू गानू मुंबईला आले आणि त्यानंतर गेली कित्येक वर्षे पु. लं. नियमितपणे ‘कालनिर्णय’मध्ये लिहीत आले.

घरगुती पु. लं.

पु. लं. एन. सी. पी. ए.त आले आणि आमच्या गाठीभेटी वारंवार होऊ लागल्या. पु. लं. संगीतात किंवा साहित्यात रस घेताना जसे आनंदित होतात तसा भोजनाचा आस्वादही चोखंदळपणे घेतात. उत्तम जेवणाची त्यांना आवड आहे. आमच्या घरी ते जेवायला असले की सगळ्या घरातच आनंदाचे गुलाबपाणी शिंपडलेले असते. माझी बायको स्वत: मन लावून स्वयंपाक करते. पु. लं.चे बोलणे ऐकण्यासाठी मुले, सुना सगळेच उत्सुक असतात आणि नातवंडे भाईकाकांना ‘गोष्ट सांगा..’ असा आग्रह करतात. माझ्या बायकोच्या पाककौशल्याची स्तुती करणारे एक पत्र पु. लं.नी पाठवले ते पत्र आमच्या सौं.च्या दृष्टीने विजयपत्रच झाले. ते पत्र आल्यापासून ‘आमटीत मीठ कमी पडले’ किंवा ‘एखादा पदार्थ बिघडला’ असे म्हणण्याची सोय उरलेली नाही. ‘पु. ल. देशपांडे यांनी माझ्या स्वयंपाकाची स्तुती केली आहे. त्यांच्या शिफारशीपुढे तुमच्या मताची काय किंमत?’ अशा विजयी दृष्टीने आमचे कुटुंब आमच्याकडे पाहते. कोणी पाहुणा आला तर त्या पत्राची झेरॉक्स प्रत त्याला आवर्जून दाखविली जाते. पु. लं.कडून मिळणारी शाबासकी हे ईहलोकीचे एक वरदानच आहे.

पुलंचा वरदहस्त

मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाला पु. लं.च्या प्रशंसेचा लाभ झाला आणि ते नाटक सबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. बाबा आमटेंच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष प्रथम वेधले गेले ते पु. लं.च्यामुळे. अनेक दलित साहित्यिकांना, किंबहुना एकूणच दलित साहित्याला प्रारंभीच्या काळात पु. लं.नी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले. पु. लं.कडून शाबासकी मिळावी, त्यांनी आपले कौतुक करावे असे प्रत्येक लेखकाला, कलावंताला मनापासून वाटत असते. आणि अगदी नवोदित लेखकाशीसुद्धा पु. लं. इतके आस्थेने आणि आपुलकीने बोलतात, की त्यांचा हुरूप निश्चितपणे वाढतो.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी जयवंत दळवींनी पु. लं.ना. ‘पुलस्वामी’ आणि सुनीताबाईंना ‘पुलस्वामिनी’ अशी बिरुदे बहाल केली. वेगवेगळे पीठाधीश, शंकराचार्य अशांचा उल्लेख नावाने न करता ‘श्रीचरण’ म्हणून करण्याची प्रथा आहे. पु. लं.ना फोन केल्यावर मी ‘श्रीचरणांचा विजय असो..’ असे गमतीने म्हणतो. पु. लं. केव्हातरी ‘वत्सा, तुजप्रद कल्याण असो..’ असा जुन्या नाटकातल्या ऋषीमुनींसारखा आशीर्वाद देतात. मन नाराज असते तेव्हा किंवा समोरच्या अडचणी पार करताना हैराण झालो असताना पु. लं.ची पुस्तके वाचणे हा एक ‘अक्सीर इलाज आहे असा माझा प्रदीर्घकाळचा अनुभव आहे. माझ्यापुरते म्हणाल तर ‘खोगीरभरती’ हे माझ्या अधिक आवडीचे पुस्तक.

एक वेगळे रूप

खरे म्हणजे धर्मशास्त्र आणि ज्योतिष हे माझ्या व्यासंगाचे आणि आवडीचे विषय. पु. लं. तसे रूढ अर्थाने धार्मिक नाहीत आणि ज्योतिषावर त्यांचा विश्वास नाही. तरीही त्यांच्या माझ्यातला जिव्हाळा वाढत गेला हे खरे आहे. आम्ही तासन् तास बोलत बसलो तरी त्यात ज्योतिषाविषयी एक अवाक्षर येत नाही. एकदाच मला पु. लं.नी एका विदुषीच्या विषयात विचारले होते, ‘तिच्या कुंडलीत बाराही घरांत शनीच आहे का हो?’ भविष्याची आणि भविष्य सांगणाऱ्यांची पु. लं.एवढी चेष्टा कोणीच केली नसेल. असे असले तरी पु. लं.ना ज्योतिषाची प्राथमिक माहिती तर आहेच, पण काही बारकावेही माहीत आहेत, हे त्यांच्या लिखाणातून समजून येते. पु. लं. धार्मिक नसले तरी काही विशिष्ट धार्मिक परंपरांचा त्यांना आदर आहे. ते श्रीलंकेत गेले असताना तिथल्या बुद्ध मंदिरात गेले. ‘कोलंबोतल्या बुद्ध मंदिरातली ती प्रचंड मूर्ती पाहून मस्तक नमते. तिथे मुंडी दाबायला पुजारी, बडवा कोणी लागत नाही,’ असा शालजोडीतला टोला त्यांनी दिला आहे. त्या बुद्ध मंदिरात मूर्तीच्या पायाशी पु. लं.ना साल नावाचे एक सुवासिक फूल दिसले. पुढे चार महिने पु. लं.ना तो वास प्रत्येक बुद्ध मंदिर पाहताना येत होता. पु. लं.ची प्रवासवर्णने वाचताना शब्दाशब्दातून त्यांची रसिकता व्यक्त होत असते आणि आपण त्यांच्यासोबत त्या, त्या देशात हिंडत आहोत असे वाटत राहते.

पु. लं. रूढ अर्थाने धर्मपंडित नाहीत, पण ‘जाखाईजोखाईतून ज्ञानेश्वरांसारख्यांनी अडाणी जनतेला हितोपदेशाकडे नेण्याचे कार्य जसे केले, तसे कार्य करणाऱ्या बंडखोर संतांची परंपरा निर्माण झाल्याखेरीज धर्माचे खरे स्वरूप सामान्यांना कळत नाही,’ असे धर्मविचाराचे सार सांगणारे वाक्य ते सहज लिहून जातात. पु. लं. हे गणेशाचे भक्त नसले तरी इंडोनेशियाच्या प्रवासवर्णनात ‘श्रीगजाननाची मूर्ती मला अतिशय आवडते. किंबहुना गणपतीवर लहानपणापासून मी अतिशय प्रसन्न आहे. आमच्यासारख्या स्थूलप्रकृती बैठय़ा माणसाची ही एकमेव इष्टदेवता. शिवाय लेखनकामासाठी हा आम्हाला जोडणारा दुवा आहेच..’ असे मिश्कील गणेशवर्णन आहे. पु. लं.च्या लिखाणात आढळणारा एक विशेष असा की, आपल्या जगभरच्या प्रवासातून त्यांनी उघडय़ा डोळ्यांनी सगळ्या गोष्टी नीट निरखल्या आहेत. ठिकठिकाणचे लोक जगतात कसे? वागतात कसे? त्याबरोबरच त्यांचे समाजजीवन कसे आहे? ते लक्षपूर्वक टिपले आहे. त्यामुळे विविध आचार-धर्माच्या चालीरीतींतील साम्य आणि विरोध ते सहज जाता जाता सांगून जातात. सांगताना त्यांच्या खास शैलीतली फटकेबाजी असतेच.

पूर्वी एन. सी. पी. ए.च्या गेस्ट हाऊसमध्ये जेवणाची सोय नव्हती. एके दिवशी पु. लं.चा मर्ढेकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम होता. दुपारचे जेवण आमच्या घरून गेले. ऐनवेळी कोणी पाहुणा आला तर गैरसोय नको म्हणून जेवण थोडे अधिक पाठविले होते. डबा पाहिल्यावर पु. लं. लगेच म्हणाले, ‘‘इतके जेवल्यावर मर्ढेकर कुठले? नुसता ढेकरच!’’

हजरजबाबी पुलं

पं. भीमसेन जोशी हे सवाई गंधर्वाचे शिष्य! पंडितजी नेहमी देशविदेशात विमानाने फिरतात म्हणून पु. ल. त्यांना ‘हवाई गंधर्व’ म्हणत. मुंबईचे एक धनाढय़ गृहस्थ देणगी दिल्यावर आपल्या नावाचा फार आग्रह धरतात. पु. लं.चे म्हणणे : त्यांनी लग्न करतानाही बायकोला ‘माझे नाव लावशील तरच माळ घालतो’ असे सांगितले असणार.

पु. लं.च्या निरीक्षणशक्तीची झलक त्यांच्या व्यक्तिचित्रणांत हमखास आढळते. ‘अहो, कसला गांधी? जगभर गेला, पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमके ठाऊक.. इथे त्याच्या पंच्याचं कौतुक नाही नि दांडीचंही नाही. आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्याहीपेक्षा उघडे! सुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही. तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं. इथे निम्मं कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हास कसले?’ यात रत्नागिरीच्या माणसाच्या स्वभावाचीच नव्हे, तर भाषेचीही वैशिष्टय़े पुरेपूर उतरली आहेत. पुलं महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या बोलीभाषा सहजपणे त्या- त्या ढंगात बोलू शकतात. पु. लं. आणि ग. दि. माडगूळकर एकमेकांशी या रत्नांग्रीच्या खास मराठीत बोलत असत. या बोलीभाषांच्या ज्ञानाचा त्यांनी ‘ती फुलराणी’च्या प्रारंभीच्या प्रवेशात फार उत्तम उपयोग करून घेतला आहे. विनोदी लेखक, नाटककार, प्रसिद्धी न करता लाखो रुपयांच्या देणग्या देणारा दाता, श्रेष्ठ वक्ता, संगीतकार, नट, दिग्दर्शक इत्यादी विविध गुणांनी पु. लं. महाराष्ट्रात अजोड लोकप्रियता गाठीशी बांधून असले तरी बालपणी झालेल्या ऋग्वेदींच्या संस्कारांमुळे असेल कदाचित, पण मनाने पु. लं. तत्त्वचिंतक आहेत. त्यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक घ्या, ‘बटाटय़ाच्या चाळी’तील स्वगत पाहा किंवा कोणताही विनोदी लेख घ्या; मार्मिक आणि प्रसन्न विनोदात वाचकाला हसून ठेवीत असतानाच ते त्याला चटकन् अंतर्मुख करतात. माणसांच्या सहवासाची मनस्वी आवड असलेल्या या सरस्वती पुत्रोत्तमाला वारकऱ्यांच्या दिंडीशी आपल्या जीवनवारीचे नाते जोडावेसे वाटते. हे नाते सांगताना ते म्हणतात, ‘पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह अधिक असतो. म्हणून तर खरे वारकरी एकमेकांना उरापोटी भेटत शेकडो मैलांची वाट तुडवीत जातात. नुसत्या विठ्ठलाचे दर्शन मोटारीतून जाऊन-येऊन मिळते.. पण मग ती वारी नव्हे. मी पूर्वेची वारी केली. ती जीवनाच्या वाटा निरनिराळ्या नादात चालणाऱ्या देशोदेशींच्या अनोळखी वारकऱ्यांना भेटावे म्हणून. आणि आनंद हाच, की माझिया जातीचे मला खूप खूप लोक भेटले.’

असे आनंद देणारे आणि घेणारे जीवनयात्री त्यांना नेहमीच भेटत राहोत. त्यांच्या संगती वाटचाल करण्याचे बळ आणि अनुकूलता त्यांना निरंतर लाभो, एवढीच प्रार्थना. 

-- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

1 प्रतिक्रिया:

Sunita Deshpande said...

अतिशय सुंदर लेख