Friday, September 6, 2013

शिक्षकांनीच घडवलं...

पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या शिक्षकांनी घडवलं. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेतच ते शिकले. स्वदेश आणि स्वदेशीवरचं प्रेम यासह अनेक गोष्टी ते या शाळेत शिकले. ते त्यांच्याकडूनच ऐकणं जास्त मनोरंजक होईल.

मी शाळेत होतो, तेव्हा वर्गात २५-२६ मुलं असायची. ही ५०-५५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ग इतका लहान असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक ओळखत असत. या मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे? तो कुठे राहतो? त्याचे मित्र कोण? वगैरे... शाळांना राष्ट्रीय शाळा म्हणत. सरकारी शाळांच्या मानाने इथे शिक्षकांना पगारही कमी मिळायचा. ध्येयवादी शिक्षक अशा राष्ट्रीय शाळांत येत असत. मुलांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, चैन, पोषाखीपणा, ऐषआराम ही वृत्ती मुलांमध्ये नसावी, यासाठी शाळेमध्ये स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं जायचं. थोर देशभक्तांची चरित्रं सांगितली जायची. उत्तम व्याख्यानं व्हायची. मुलांचं शारीरिक- मानसिक बळ वाढावं, यासाठी निरनिराळे कार्यक्रम चालू असायचे. असल्या वातावरणात अमुक एकाच शिक्षकाने मला घडवलं किंवा परिणाम केला, असं म्हणणं बरोबर होणार नाही. तरीसुद्धा काही शिक्षक विशेष आठवतात.

माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.

आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.

पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
५/९/२०१३

0 प्रतिक्रिया: