Wednesday, June 12, 2013

पु. ल. एक आठवण, किती सारी साठवण! - आरती नाफडे

बारा जून. पु.लं.चा स्मृतिदिन. ज्या व्यक्तिरेखा काळाच्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाहीत त्या अमर आहेत. पु.लं.च्या स्मृती त्यांच्या बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने अमर आहेत. त्यांच्या स्मृतींचे अनेक पदर उलगडताना मुलांच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा स्मरणात राहिला. धड्याचे नाव होते ‘बिनकाट्याचा गुलाब.’ लेखक गंगाधर पानतावणे. दोन महान युगपुरुष पु. ल. देशपांडे व बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाणारे अनेक धागेदोरे यांची सुंदर वीण म्हणजे ‘बिनकाट्याचा गुलाब.’ गंगाधर पानतावणे यांच्या पाठाच्या आधारे आठवण लिहिण्याचा प्रयत्न.
पु. ल. देशपांडे हे नुकतेच बंगालचा प्रवास करून आले होते. शिशिर ऋतूच्या एका रम्य सायंकाळी लेखक गंगाधर पानतावणे, सुनीताताई व पु. ल. पुण्याच्या घरी ‘रूपाली’त बैठकीत गप्पा मारीत बसले होते. गप्पांमध्ये रवींद्रनाथांचा विषय ताजा होता. त्या गप्पांत रवींद्रनाथांचे संगीत, त्यांचे नाटक व शिक्षणदृष्टी तसेच बंगाली भाषेचे वैभव असे विषय रंगत चालले होते.

तेवढ्यात गंगाधर पानतवणे यांचे लक्ष बैठकीतील कुंडीकडे गेले. या कुंडीत बिनकाट्याचा गुलाब होता. त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता होती. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा सांगताना पु. ल. लेखकांना सांगतात-

एकदा सुनीताताई व पु. ल. आनंदवनात मुक्कामाला असताना बाबा आमट्यांबरोबर आनंदवनाचा फेरफटका मारताना अंध मुलांना भेटायला त्यांच्या कक्षात गेले. बाबा आमट्यांच्या आनंदवनातील आंधळ्या मुलांनी गुलाबाची वर्णनं ऐकली होती. पण, गुलाब कसा होता हे त्यांना माहीत नव्हते. एका आंधळ्या मुलाने गुलाबाच्या झाडाला स्पर्श केला, तेव्हा गुलाबाचे काटे बोचून त्याच्या हातातून रक्त आले. ते बघून बाबांचे मन द्रवले व त्यांनी मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब शोधायचे ठरवले. ही गोष्ट जेव्हा पु. लं.ना कळली तेव्हा त्यांचे पण मन मुलांसाठी करुणेने भरून गेले व आनंदवनातील आंधळ्या मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब घ्यायचा म्हणून त्यांनी खूप शोध घेतला. शेवटी तो त्यांना कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मिळाला. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा पु.लं.नी लेखकाला सांगितली. बैठकीतील बिनकाट्याच्या गुलाबाची कुंडी अशी उकल करून लेखकांना कळली.

जीवनावर व जगावर जीव तोडून प्रेम करणारे पु. ल. मुलांना गुलाबाचे काटे बोचू नयेत व प्रेमाने गुलाबाच्या झाडाला गोंजारता यावे, त्या झाडाशी मुलांना मैत्री करता यावी, गुलाबाचे सौंदर्य व कोमलता हाताच्या स्पर्शाने कळावी म्हणून पु.लं.नी बिनकाट्याचा गुलाब शोधला व मुलांसाठी ती कुंडी ते आनंदवनात पाठवणार होते. बिनकाट्याच्या गुलाबाच्या संशोधनापासून तर कुंडी बैठकीत स्थानापन्न होईपर्यंतचा इतिहास सांगताना पु.लं.ची मुद्रा तृप्त व फुललेली होती.

दोन महान व्यक्तिमत्त्वांचा हा मिलाप किती सुखावह. बाबा आमटे यांचा जगावेगळा सेवेचा ध्यास, जीवनाला नवा आयाम, आशय देण्याचा बाबांनी वसा घेतला होता.

तर पु. ल. एक खळखळतं व्यक्तिमत्त्व. सदैव जीवनाच्या प्रेमात अडकलेले, समाजमन नात्यानं बांधण्याचा ध्यास घेतलेले. बाबांच्या सेवेच्या वृक्षाला प्रेमाचा ओलावा देणारे पु. ल. म्हणतात, दुसर्‍याचं अस्तित्व मान्य करणं यात संस्कृतीची सुरुवात आहे. आंधळ्या मुलांना गुलाबावर डोळस प्रेम करता यावं हे बाबांंचं स्वप्न होतं. यासाठी प्रथम त्या मुलाचं अस्तित्व मान्य करून वेदनेशी असणारे माणुसकीचे नाते पु. लं.नी मुलांसाठी जपले.
पु.लं.नी माणसांवर प्रेम व माया केली. लोकांच्या मनाचा वेध घेणं व त्यांच्या मनात आतपर्यंत डोकावणं ही पु.लं.ची शक्ती आहे म्हणूनच मानवी जीवनातली दु:खं बघून व्यथित होणारे बाबा आमटे व काट्याच्या वेदना सहन करणारा मुलगा यांच्या अंतरंगांचा वेध पु.लं.ना सहज घेता आला. काट्याने मुलाला दिलेली वेदना जीवनावर असीम प्रेम करणार्‍यांनाच घायाळ करू शकते. त्यांच्यातील या समान दुव्यामुळे मैत्री फुलत गेली. सुनीताताई व पु. ल. आनंदवनात येऊन राहात व तेथील कार्याचे जवळून अवलोकन करीत. आनंदवनातील कुष्ठरोग्यांची सेवा पाहून ते भारावत. चांगल्या कार्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे, हे त्यांच्या जीवनाचं ब्रिद होतं. गुणग्राहकता हा त्यांचा मूळ पिंड. जिथं उज्ज्वल भविष्याच्या पायवाटा पोहोचतात त्या वाटेचा मागोवा घेत पु.ल. आनंदवनात नेहमीच येत असत व तेथील सुखदु:खात सामील होत.

बिनकाट्याच्या गुलाबाची गोष्ट लहान पण आशय महान. गोष्ट वाचूनही बारा वर्षे होऊन गेली, पण ती आता पुन्हा स्मरली. यालाच परीसस्पर्श म्हणतात. ती गोष्ट पुन्हा उजळून निघते. पु.लं.च्या सर्व साहित्यांच्या बाबतीत हेच सूत्र लागू पडते. जे वारंवार आठवते ते स्मरण व जे स्मृतीला चालना देते तो स्मृतिदिन. पु.लं.ना विनम्र अभिवादन व आदरांजली.

- आरती नाफडे
नागपुर
तरुण भारत, १२ जुन २०१३

2 प्रतिक्रिया:

Swapnil said...

तुमचे मराठी लेख , अनुदिनी किंवा संकेतस्थळ http://marathiblogs.in/ वर जोडा आणि अनेक आकर्षक बक्षिसे जिंका.

Durga Borude said...

वाह!!! अतिशय सुंदर.... खरच ते प्रासंग वाचून अजुनाही मन हलव होता... हॅट्स ऑफ टू बाबा आणि पु.ल.