Saturday, October 24, 2020

या 'पुरुषोत्तमाने' आम्हाला हसवले.

मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ते घर वाचन - साहित्य - नाटक संगीत - आध्यात्म या साऱ्याचे संस्कार आणि आवड जोपासणारे होते. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची पूजाअर्चा नेहमीच साग्रसंगीत चालत असे. उपास , व्रतवैकल्य आमच्या घरात नेहमीच यथासांग पार पाडली जायची. दोन खणांचे घर असूनही घरात प्रसन्न , शांत , आनंदी वातावरण नांदत असे. माझ्या वडिलांना आध्यात्मिक साहित्य वाचनाची खूप आवड होती. पुढे यामध्ये मराठी , इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य , चरित्र , आत्मचरित्र , कथा , कादंबऱ्या यांची भर पडत गेली. पण लहानपणी मला मात्र इंद्रजाल कॉमिक्स वाचायला खूप आवडायचं. वडिलांनी माझ्या या वाचनाला कधीच हरकत घेतली नाही. उलट दर महिन्याला मला ते आणून द्यायचे. त्यावेळी वडिलांच्या कपाटात पाच सहाशे पुस्तकांचा संग्रह होता. (जो पुढे दिड हजारावर गेला) हळुहळु मलाच या कॉमिक्स वाचनाचा कंटाळा येऊ लागला आणि मी वडिलांकडे कुतूहलाने वाचायला एखाद्या पुस्तकाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी माझ्या हातात पाहिलं पुस्तक ठेवलं ते म्हणजे पुलं चं "व्यक्ती आणि वल्ली". मी सहज पुस्तक उघडलं आणि पहिली व्यक्तिरेखा वाचायला घेतली. ....अचानक आईने मोठ्याने मारलेली हाक ऐकू आली. म्हट्लं "काय ग ! कशाला ओरडतेयस?". तर म्हणाली , "काय वाचतोयस एव्हढं ? दोन अडीच तास झाले. जेवायचं नाहीय का ?"
पुलं च्या साहित्याचा माझ्यावर झालेला हा पहिला परिणाम. आणि पुढे हा परिणाम वाढतच गेला. वडिलांचा व्यासंगही वाढतच होता. पुस्तकाचं कपाट आता अपुरं पडत होतं त्यामुळे कपाटावर पुस्तकं ठेवावी लागत होती. अनेक लेखकांची पुस्तकं संग्रहात सामील होऊ लागली होती. त्यामुळे जे आवडेल ते पुस्तक वाचायला घ्यायचं. साहित्याची मेजवानीच म्हणा ना . आणि बरं का ! हे वाचनवेड एकदा लागलं ना की आपण सगळ्यांपासून अलिप्त होऊन एका वेगळ्याच दुनियेत रंगून जातो. अनेक उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली , परंतु पुलं च्या साहित्यातून जे मिळालं त्याचं गारूड अगदी आजही तसच आहे. त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. 

वाचनाची आवड नसलेल्या एखाद्याला किंवा वाचनाची सुरवात करणाऱ्या कुणाला जर वाचनाकडे वळावं असं वाटतं , तर त्याने श्रीगणेशा पुलं च्या साहित्याने करावा असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. आता का ? म्हणाल , तर जसं एखाद्याला संगीत शिकण्याची इच्छा असेल आणि त्याला एकदम शास्त्रीय संगीतातील राग , आरोह अवरोह , मात्रा , ताना , पलटे याबद्दल सांगायला सुरवात केली तर तो धास्ती घेऊन , हे काही आपल्याला जमणारं नाही असं वाटून संगीतापासूनच दुरावला जाईल. याउलट त्याने जर सुंदर सोपी बालगीतं , भावगीतं , भक्तीगीतं आधी ऐकायला आणि म्हणायला सुरवात केली तर त्याचा विचार सकारात्मक होऊन "अरे हे आपल्याला जमू शकतं" या भावनेतून तो संगीताकडे ओढला जाईल. तसच साहित्याचं आहे. कुणी जर सुरवातीलाच एकदम थोरामोठ्यांची चरित्र , न पेलणाऱ्या जड भाषेत लिहिलेली पुस्तकं , तत्वज्ञान सांगणारी पुस्तकं वाचायला घेतली तर संभ्रमित होऊन आणि कंटाळून तो साहित्यापासून आणि पर्यायाने वाचन संस्कृती पासूनच दूर जाईल.

आता पुलं च्या साहित्यापासून सुरवात का करावी तर त्यामध्ये हास्यानंद तर आहेच पण त्याबरोबरच एक निरागस सौंदर्य आहे. सोपी भाषा आहे. हेवेदावे , इर्षा , चढाओढ त्यामध्ये कुठेच नाहीत. छान , निखळ आणि आपले वाटणारे , आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे जाणवणारे सुंदर अनुभव व्यक्तिरुप घेऊन आपल्यासमोर येतात. वाचताना मध्येच उत्स्फूर्तपणे खळखळून हसवतात आणि जेव्हा जेव्हा ते मनात उभे राहतात तेव्हाही हास्याचा तोच अनुभव देऊन जातात. आपण अगदी कोणत्याही मनस्थितीत असलो तरीही. पुलंच्या साहित्यात निर्मळ विनोद भेटतो. तो कुणालाही बोचत नाही अथवा ओरबाडतही नाही. खुदकन मात्र हसवतो. वाचकांना आपल्या साहित्यातून ते असा आनंद देऊन जातात कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तसाच असतो. मग ते शास्त्रीय संगीत असो , लावणी असो किंवा लोकसंगीत असो , खाद्य वर्णन असो किंवा प्रवास वर्णन असो. त्यांच्या लंडन प्रवासात एकदा सायंकाळी ते फिरायला बाहेर पडलेले असताना त्यांनी पाहिलं की जागोजागी प्रणयाच्या बहराने लंडन फुलले होते. त्या प्रेमी युगुलांना बाहेरच्या जगाची शुद्ध नव्हती. ते आपल्या जगात धुंद होते. अशा प्रकारचं ते वर्णन आहे. त्या जागी आपण काय म्हट्लं असतं "शी ! लाज नाही , काही नाही. काय हे रस्त्यात". कोणत्याही गोष्टीकडे पहाताना सौंदर्य दृष्टी जागी ठेवली की असे विचार मनात येत नाहीत. आपला प्रॉब्लेम काय असतो कुणास ठाऊक. म्हणजे मनातून ते आवडलेलं असतं पण आपण असं काही करु शकत नाही याचं वैषम्य वाटत असतं की उगीच आणलेला सोवळेपणाचा आव असतो की दिसलेल्या कोणत्याही गोष्टीवर मतप्रदर्शन केलंच पाहिजे या भूमिकेतून बोलत असतो हे आपल्यालाच कळत नसतं. पुलंच्या या सौंदर्य दृष्टीतूनच तुझे आहे तुजपाशी नाटकातलं काकाजी हे पात्र साकार झालं असावं. आचार्य आणि काकाजी ही दोन टोकाची पात्र या नाटकात पुलंनी आपल्या शब्द श्रीमंतीने अप्रतिम रंगवलीयत. 

पुलं च्या प्रवास वर्णनातही माहिती देण्याचा अट्टाहास आणि कोरडेपणा जाणवत नाही तर आपला हात हातात घेऊन हसत खेळत स्वतःबरोबर ते आपल्याला अलवार सफर घडवून आणतात. पुलं चं साहित्य आपल्या मनाला भावतं याचं दुसरं एक कारण म्हणजे सोपी , सुंदर आपलीशी वाटणारी भाषा. उगाच जडबंबाळ शब्दांचा अजिबात न केलेला वापर आणि वाचकांना लिखाणातून काहीतरी शिकवत राहण्याचा न दिसणारा दृष्टिकोन. त्यांच्या वाऱ्यावरची वरात या नाटकातील सुरवातीच्या स्वगतामध्ये ते म्हणतात "आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे , म्हणजे हसून सोडून देण्याचा आहे. त्यामध्ये साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याचा कृपया प्रयत्न करू नका." इतका छान , सुंदर आणि स्वच्छ दृष्टिकोन घेऊन हा लेखक आपल्यापुढे येतो , आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बनून जातो.

एखाद्या कलाकृतीचं , नव्या कलाकारांचं कौतुक करताना हातचं राखून न ठेवता करणं , मनापासून दाद देत त्यांचा उत्साह वाढवणं हे त्यांनी आयुष्यभर केलं. आपल्या क्षेत्रात महान कामगिरी केलेल्या अनेक व्यक्तीच्या सत्कार प्रसंगी त्यांनी केलेली भाषणं ही अगदी आजही मनसोक्त आनंद देऊन जातात , कारण ती कौतुक आणि मिश्किल कोट्यानी सजलेली असतात. स्वतःवर विनोद करताना आपली प्रतिष्ठा त्यांच्या कुठेही आड येतं नाही , आणि स्वतःला विदूषक म्हणवून घेताना त्यांना जराही कमीपणा वाटत नाही.

आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचविणारा हा लेखक एकाचवेळी आपल्याला पोट धरून हसवतोही आणि हसवता हसवता हळूच डोळ्यांना पाणावतोही.

टेलिव्हिजन वरील एका विनोदी कार्यक्रमात एका गुंड झालेल्या पात्राच्या तोंडी पुलं बद्दल नेमकं वर्णन आलं होतं. तो म्हणतो "या महाराष्ट्रात एक फार मोठा भाई होऊन गेला. त्यांच्या विनोदाची दहशत आज तो अनंतात विलीन होऊन वीस वर्ष लोटली तरी तशीच कायम आहे. अजूनही ती दहशत कुणी मिटवू शकलेला नाही." त्याचं साहित्य वाचताना आजही वाचक मनमुराद हसतात , कारण त्यामध्ये कधीही न संपणारा जिवंत ताजेपणा आहे. आणि त्या दरवळत रहाणाऱ्या लिखाणातून पुलं आजही आपल्या मनात जिवंत आहेत आणि पुढची कित्येक वर्ष ते तसेच रहाणार आहेत.
लेखक , नाटककार , कथाकार , पटकथाकार , दिग्दर्शक , संगीतकार , अभिनेता , ओजस्वी वक्ता , गायक , संगीतप्रेमी , संवादिनी वादक , सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती , या सगळ्यात मनापासून रमणारा , आस्वाद घेणारा एक रसिक आणि प्रत्येक मराठी माणसाला आपलं वाटणारं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व ,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल. उर्फ आपले भाई.

- प्रसाद कुळकर्णी

Wednesday, October 7, 2020

पु.लं कडे नोकरी

आजोबांना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तेव्हा मी तेरा-चौदा वर्षाचा होतो. हॉस्पिटलमध्ये आजोबांना भेटायला आई घेऊन गेली, तेव्हा तिने मला शेजारची रूपाली बिल्डिंग दाखवली.

म्हणाली"हे बघ, इथे पु.ल.देशपांडे राहतात."

नशीब ही असं होतं की आजोबांच्या खोली मधून पु . लं. चा फ्लॅट दिसायचा. रूममध्ये आजोबांची तब्येतीची काळजी करता करता सारखं लक्ष खिडकीतून पलीकडे जायचं. पु.ल. दिसतील का असं सारखं वाटायचं. आपण कधी तिथे जाऊ आणि पु लं. शी गप्पा मारू असा विचार सारखा यायचा .

नंतर काही वर्षांनी एकदा धीर करून रुपाली मध्ये गेलोच. पु . लं च्या घराची बेल वाजवली, दार उघडण्याची वाट बघताना हृदयात इतकं धडधडत होतं, अजून आठवतं. सुनीताबाईंनी दरवाजा उघडला.

"काय हवंय "असं विचारलं.

"पु. ल. आहेत का? त्यांना भेटायचं होतं. "

"नाही भाई बाहेर गेला आहे."

"बर."

मी घरी परत.

असं दोन-तीनदा झालं.

आणि मग कोणे एके दिवशी, मी त्यांच्या घराची बेल वाजवली आणि चक्क पुलंनी दार उघडलं.

"काय रे काय हवे आहे?."

"काही नाही. तुम्हाला भेटायचं होतं. येऊ का आत?"

"हो, ये की ,मी रिकामाच आहे."

इतक्या सहजपणे म्हणाले, की मला खरच वाटेना. माझ्या एक्साइटमेंट चा तो परमोच्च बिंदू होता. आत गेल्यावर असा उजवीकडे हॉल होता. तिथे दोन सोफे होते. काळ्या रंगाचे. समोरासमोर.

मला म्हणाले ,"बस. बोल काय काम आहे तुझं."

पाच सेकंद मला काही बोलताच आलं नाही. मनात ठरवून ठेवलेली,रचून ठेवलेली ,सगळी वाक्यं गायब झाली होती.

मी एकदम म्हणालो, "पु. ल. , मला तुमच्याकडे नोकरी करायची आहे."

हे वाक्य माझ्या तोंडून येताच पु. ल. इतके खळखळून हसले.

एकदम म्हणाले, "सुनिता, अगं बघ हा काय म्हणतोय."

मग सुनीताबाई आतून आल्या.

"अगं हा बघ, हा स्वप्नील कुंभोजकर. आपल्याकडे याला नोकरी करायची आहे."

त्यांना पण हसू आलं आणि त्या पु लं शेजारी सोफ्यावर बसल्या. मी सतरा अठरा वर्षाचा मुलगा त्यांना काय म्हणतोय हे लक्षात आल्यावर त्या दोघांनाही कमालीची उत्सुकता आणि गंमत वाटत होती.

“अरे तुझं नाव काय? काय शिकतोस ? नोकरी कशाला करायची आहे?”

मला ही जरा धीर आला.

मी म्हणलं कसली ही नोकरी द्या. मी कार चालवू शकतो, तुमची 118 NE मला अतिशय आवडते. प्रेमाने चालवेन. बँकेत चेक भरेन, घरी भाजी आणून देईन, दुकानातून किराणामाल आणून देईन, तुमची पत्रं sort करेन, आलेल्या पाहुण्यांना पाणी देईन, वहिनींना घरकामात मदत करेन, काहीही सांगा. जास्ती जास्त तुमच्या बरोबर राहता येईल, तुमचा सहवास लाभेल, असं काहीही काम सांगा . पगार नाही दिलात तरी चालेल.

हे ऐकल्यावर त्या दोघांची हसून हसून पुरेवाट झाली.

मग त्यांनी माझी रीतसर मुलाखत घेतली (job interview !!).

"घरी कोण कोण असतं? काय करतात आई वडील ?"

"आई LIC मध्ये आहे आणि वडील बँकेत काम करतात."

"तरीच. म्हणून हे सगळं सुचतंय. अभ्यास वगैरे करतोस का?"

"आता तुम्ही मला आई बाबां-सारखेच प्रश्न विचारताय."

त्यावर आम्ही तिघेही खळखळून हसलो. मग त्यांनी मला extra curricular activities बद्दल विचारलं. मी धाड धाड धाड सगळं सांगून टाकलं. तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत. शास्त्रीय संगीत ऐकतो. बालगंधर्व आवडतात. वसंतराव देशपांडे जीव की प्राण आहेत. मल्लिकार्जुन मन्सूर यांचं खूप गाणं ऐकलंय. वगैरे वगैरे.

अचानक पु. ल. जुन्या नाटकांबद्दल बोलायला लागले.

बालगंधर्व, खाडिलकर यांची नाटकं याबद्दल भरभरून बोलले. मग म्हणाले हे सगळं तुला माहिती आहे का. म्हणलं खरं सांगू का,एवढ माहिती नाहीये पण तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी धन्य झालो आहे.

मग सुनीताबाईंनी एकदम विचारलं " किती वेळा बेल वाजून गेलास परत?"

आता मी हसलो आणि हाताने"चार" असा आकडा दाखवला.

"आज तुझं नशीब उत्तम आहे. माझ्या ऐवजी भाई ने दरवाजा उघडला."

"लिम्का पिशील का?"

त्या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा soft drink प्यायलो. कारण एकच. अजून थोडा वेळ तिथे घालवता येईल आणि त्या दोघांची भरपूर गप्पा मारता येतील !!

मग मी माझं सगळं ज्ञान-अज्ञान त्यांच्यासमोर मोकळं करून टाकलं. जवळपास तास-दीड तास आम्ही गप्पा मारत होतो.

मी भाईंना कुमार गंधर्व यांची मैफिल आपण दोघांनीच कशी ऐकली होती त्याची पण आठवण करून दिली.

माझं सगळं बोलणं ऐकून, खरंतर बडबड ऐकून, या दोघांची चांगलीच करमणूक होत होती.

मग वहिनी म्हणाल्या "घरचे थांबलेत का जेवायला?"

" वाहिनी, कळलं मला, आता मी निघतो."

आणि मग माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर, दीड तास, त्या आठवणी बरोबर घेऊन हवेत तरंगत मी घरी गेलो.

घरच्यांनी कोपरापासून नमस्कार केला मला.

माझ्यासाठी तो दिवस अतिशय अविस्मरणीय ठरला. जोशी हॉस्पिटल मध्ये मनात ठेवलेली इच्छा इतक्या सुंदर रित्या पूर्ण होईल असं कधी वाटलं नव्हतं. पु. ल .आणि सुनीतावाहिनी यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा, टिंगल टवाळी, गंमत जंमत - आयुष्याचं सोनं झालं माझ्या.

त्यांच्याच एका लेखात John Carlisle बद्दल त्यांनी लिहिलं होतं, तसा साधा मोठा सोफा, त्यावर मी बसलोय, समोर साक्षात पु. ल . आणि सुनीता वहिनी दोघेही बसले आहेत, आणि माझ्याशी गप्पा मारत आहेत, हे चित्र मी कधीच विसरू शकणार नाही.

दोघेही इतके मोठे, इतके बिझी, परंतु माझ्यासारख्या, अतिसामान्य तरुण मुलाबरोबर इतक्या खेळीमेळीने मनमोकळेपणे गप्पा मारत होते, जणू काही त्यांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे, दोस्ती आहे. मी माझा अज्ञाना चाshow करणारा अति उत्साही मुलगा, आणि ते दोघेही इतके प्रतिभावान , इतके मोठे, पण त्यांनी मला हे जाणवून सुद्धा दिलं नाही, आणि नोकरीही दिली नाही !!

पण माझ्यासाठी एक सुंदर आनंदाचा ठेवा मागे ठेवून गेले.

- स्वप्नील कुंभोजकर