Tuesday, March 29, 2022

माझे लेखनकलेतील प्रयोग - पु ल देशपांडे

जगात माणसावर अनेक करुण प्रसंग कोसळतात. विरहाचे प्रसंग, निधनाचे, द्रव्यनाशाचे, बेकारीचे, प्रेमभंगाचे करुण प्रसंगांची यादी हवी तितकी लांबविता येईल. परंतु मी काय विनोद केला हे समजावून सांगणे, हा सर्वात मोठा करुण प्रसंग आहे, असे मला वाटते. तसला प्रसंग आज मी ओढवून घेतला आहे. विनोदी लिखाणात मी काय काय प्रयोग केले, विनोदाच्या कोणकोणत्या तऱ्हा मी वापरल्या, हे माझ्याच लिखाणाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगणे, सुरुवातीला मला वाटले होते तितके सोपे काम नाही, असे या विषयावर विचार करताना वाटू लागले आहे.

माझे लेखनकलेतील प्रयोग हे शब्द उच्चारताना मला गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाची आठवण होते. स्वतःच्या जीवनाकडे इदं न मम अशा अलिप्तपणे पहायची गांधीजींसारखी ज्याची वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याची साधना झाली आहे, त्यानेच आपल्या अंतःकरणाच्या प्रयोगशाळेत दुसऱ्याला डोकावण्य़ाची परवानगी द्यावी. नाही तर क्षणोक्षणी आपली आपण करी स्तुति अशांचा जो वर्ग समर्थांनी सांगितला आहे, त्यात तर आपण शिरत नाही ना, ही भीती सदैव अस्वस्थ करीत राहते. फाजील विनयाच्याही भूमिकेत ढोंग दडून बसलेले आणि स्वतःशी फाजील कठोर होण्याच्याही प्रकारात सूक्ष्म अहंकारपूजा चाललेली चाणाक्ष रसिकाला दिसू शकते. अशा परिस्थितीत माझ्या विनोदी लिखाणावर काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें म्हणून सुटका करून घेणे हा सर्वांत उत्तम मार्ग.

परंतु केवळ एवढ्याच एका कारणासाठी मी माझ्या विनोदी लिखाणासंबंधी त्याचे जे काही चुकून-माकून प्रयोग होऊन गेले असतील त्यासंबंधी बोलायला असमर्थ आहे असे नव्हे. तर ज्या मनाच्या अवस्थेत मी विनोदी लिखाण लिहिले अगर लिहितो ती अवस्था खरोखरीच आपण नवीन प्रयोग करायला बसलो आहोत याची जाणीव ठेवून लिहिणाऱ्या लेखकांची आहे का? मला वाटते, माझी भूमिका तशी नाही. आपण विनोदात नवीन प्रयोग करू या, असा संकल्प सोडून मी कधीही लिहायला बसलो आहे असे मला वाटत नाही. कारण विनोद हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. हा एक माझा स्वभावाचा दोष आहे. मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि ती माझा छळ करू लागते. सुंदर दिवाणखान्यात उत्कृष्ट कोच, तिपाया, फुलदाण्या, पितळी कुंड्यांतले बालतमाल ह्यांच्या राजस मेळाव्यात गौतम बुद्धांचा पुतळा पाहिला की सामान्यतः कोणालाही त्या सौदर्यात भर पडल्याचा भास व्हावा. मला अशाच सुंदर दिवाणखान्याचा त्याग करून गेलेला सिद्धार्थ दिसतो. आणि त्या घराच्या मालकांची गंमत वाटते. तारतम्य सुटलेले दिसते, अनौचित्य दिसते आणि विनोदाचा कली नलाच्या न भिजलेल्या पावलांतून शिरलेल्या कलीसारखा माझ्या डोक्यात शिरतो. माझ्याच का विनोदबुद्धी असलेल्या कोणाच्याही डोक्यात शिरतो. त्यामुळे माझ्याआधीच्या विनोदी लेखकांनी केले नाही ते मी केले काय, असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो की मला निश्र्चित उत्तर सापडत नाही. कोल्हटकर, गडकरी, अत्रे, चिंतामणराव जोशी, शामराव ओक, आणि अत्यंत नम्रतेने त्यांच्यामध्ये अंग चोरून बसलेला मी! ह्या ज्येष्ठ लेखकांनी हाताळला नाही असा विनोदाचा कुठला भाग मी उचलला, या प्रश्र्नाचे उत्तर कुठलाही नाही हे मला द्यावे लागेल.

आधुनिक लघुकथा अगर नवकविता यांचे तसे नाही. कथासूत्र नसलेली कथा हा मराठीतला नवा प्रयोग आहे. अगर अंतरमनाच्या भूलभुलैयामध्ये वाट चुकायला लावणारी नवकविता हा काव्यातला नवा प्रयोग आहे. शेंगेत प्रोफेसर कोंबणारा गंगाधर गाडगीळांच्या मनाचा चाळा यापूर्वी मराठी लघुकथेत नव्हता. संध्याकाळचा चेहरा त्यांनी पहिला आणि लोकांना दाखवला. मर्ढेकरांनी जीवनाचा कोटा उलटा करून पाहिला आणि आतली अस्तराची शिलाई दाखवली. रसिकांनी हे प्रयोग चांगले म्हणावे अगर त्याला नाके मुरडावी. परंतु मराठी भाषेच्या ह्या उपासकांनी साधनेचा नवा योग स्वीकारून त्यात नवे प्रयोग केले यांत शंका नाही. मराठीच्या संसारात त्यामुळे इतर काही आले न आले, तरी वैचित्र्य आले हे खास, साहित्याच्या मंदिरातील विनोदाच्या पोटमाळ्यावर माझ्या प्रतिमेचे जे उंदीर खडखडले ते फारसा काही निराळा पराक्रम करू शकले, असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. त्यामुळे मी फार तर माझ्या विनोदाची वैशिष्ट्ये सांगू शकेन.

गद्य विडंबन हे माझ्या लिखाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असावे. काव्याच्या क्षेत्रात अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनी अलौकिक आघाडी गाठली. गद्य विडंबनांत मी तितका उंच पोहोचलो किंवा नाही कोण जाणे! परंतु मर्मभेद हे जे विडंबनाचे कार्य ते मात्र मी निश्र्चित केले. माझ्या खोगीरभरती आणि नसती उठाठेव ह्या दोन्ही संग्रहात जास्तीत जास्त संख्या असल्या गद्य विडंबनांची आहे. असल्या लेखांचा आढावा घ्यायला लागलो म्हणजे साहित्यक्षेत्रातल्या काही प्रवृत्तीची मी सगळ्यात जास्त विडंबने केली आहे, असे मला दिसते. विद्वत्तेचा जाड भिंगांचा चष्मा नाकावर ठेवून जीवनाकडे पुस्तकांच्या आडून पाहणारी मंडळी मला सतत विषय पुरवीत आली आहेत. विद्वत्ता ही चेष्टा करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु विद्वत्तेचे प्रदर्शन दिसले की माझी लेखणी माझा हात धरून कागदावरून मला ओढीत नेते. आणखी एक रस आणखी एकच प्याला अगर एका विद्वत्तापूर्ण ग्रंथावरील अभिप्राय सहानुभाव संप्रदाय हे लेख असल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करणाऱ्या शैलीची विडंबने आहेत.

खेड्यांतून कुस्त्या ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना आठवत असेल की, पहिलवानांच्या कुस्त्या आटोपल्या की, गल्लीतली पोरे उगीच दंड थोपटून त्या आखाड्यात माकडउड्या मारायला लागतात. साहित्यातदेखील गहनगंभीर विषयावर महामल्लांची युद्धे चालू असताना काही काडीपैलवान आपल्या चष्म्याच्या काड्या सावरीत लेखण्या उडवू लागतात! स्वतःच्या एखाद्या वाक्याचे ठिगळ जोडून दुसऱ्या विद्वानांच्या उताऱ्यांच्या गोधड्या मुद्रणयंत्रावरून वाळत टाकलेल्या दिसल्या की त्यांचा कोट ओढायची सुरसुरी मला अनावर होते. त्यांचा तो गांभीर्याचा आव पाहिला म्हणजे, प्राथमिक शाळेतला पहिली-दुसरीतला पोरगा औरंगजेबाच्या वेषात स्वतःच्या उंचीइतकी दाढी लावून आपल्याच वयाच्या संभाजीला छत्लपती संभाजी लाजे, आम्ही तुम्हांला गिलफदाल कलीत आहोत असे म्हणत, नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतो. त्याची आठवण होते. आणि मग साहित्य आणि साहित्यातले रुसवे-फुगवे, केळवणे आणि मानपानांची मौज वाटू लागते. जातीला जात वैरी म्हणा हवे असले तर, परंतु साहित्यिकांमधील असल्या प्रवृत्तींचे विडंबन हे मी माझ्या लेखणीतले ठळक वैशिष्ट्य समजतो.

अर्थात इथे एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. पुष्कळदा एखाद्या लेखांतून काही व्यक्तींचे तोंडवळे दिसतात. आणि हे विडंबन अमक्या एका लेखकाचे आहे असे म्हणण्यात येते. आणि वा! अमक्या अमक्याची छान खोड मोडलीतअसे सर्टिफिकेट देत काही मंडळी येतात. हा माझ्यावर अन्याय आहे, असे पुष्कळदा मला वाटते. मी आता म्हणालो त्याप्रमाणे विडंबन हे प्रवृत्तीचे आहे, व्यक्तीचे नव्हे. किंबहुना विद्वत्तेचे प्रदर्शन हे कुणी एकच साहित्यिक करतो असे नाही, अनेक करतात. फक्त चित्रकार ज्याप्रमाणे एखादे मॉडेल पुढे ठेवून चित्र काढतो त्याप्रमाणे आधाराला एखाद्या लेखकाची शैली घेऊन विडंबन करणे हे शक्य आहे. परंतु माझ्या लेखात तयार झालेली व्यक्ती ही अनेक व्यक्तींच्या विविध छटा घेऊन निर्माण झालेली तिसरीच व्यक्ती असते. किंबहुना ज्या ठिकाणी माझ्या लेखानंतर हे अमक्यालाच उद्देशून मी लिहिले आहे असे बऱ्याच वाचकांना वाटल्याचे मला कळते त्या ठिकाणी माझ्या विडंबनाचा व्यक्तींच्या पलीकडे जाण्याचा माझा हेतू फसला, असे वाटून मला वाईटही वाटते. कारण शैलीच्या, शब्दयोजनेच्या अगर तंत्राच्या दृष्टीने मी प्रयोग केले आहेत की नाही, हे माझे मलाच अजून नीटसे उमगले नसले तरी कोणत्याही व्यक्तीला नामोहरम करण्याचा हेतू मनात बाळगून मी विनोदी लिखाण केले आहे असे मला मनापासून वाटत नाही.

टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात. साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो. त्यामुळे माझ्या वाचकांचे वर्तुळ फार मर्यादित होते, असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो. धुंडिराज, कामण्णा, पांडुतात्या, चिमणराव, दाजी ह्यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही, असेही म्हणण्यांत येते, ते काही अंशी खरेही आहे. परंतु अशी व्यक्ती जरी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी बटाट्याची चाळ बांधून आणला. ह्या चाळीत माझी जीव रमतो. ही सर्व मंडळी मला आवडतात. सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच्च. मंगेशराव, म्हळसाकांत पोबुर्पेकर, नागूतात्या आढ्ये वगैरे मंडळी ह्या चाळीत राहतात, धडपडतात, रुसतात, रागावतात, पुन्हा एकत्र होतात. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडांत राहणारी ही जनता अमर आहे.

बटाट्याची चाळ मला अनेक विषय पुरवीत आली आहे. मात्र तेथील जीवनातील विसंगती दाखवताना त्यांवरचे माझे प्रेम अजिबात कमी झाले नाही. त्यांची वागण्याची पद्धत त्यांनी बदलली असे मला वाटत नाही. आणि मीच काय परंतु ख्रिस्तापासून गांधीपर्यंत कोणीही सांगून ते ती बदलतील असे मला वाटत नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाशी ती मंडळी रममाण झाली आहेत. तिथले सारे हर्षखेद त्यांना मंजूर आहेत. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडात त्यांना कसलाच अडथळा वाटत नाही. ही परिस्थिती योग्य आहे की अयोग्य, हे ठरविण्याचे काम माझे नाही. किंबहुना जीवनात चांगले आणि वाईट ह्याचे पॅकबंद कप्पे करता येतील. असे मला वाटत नाही. बटाट्याची चाळ आजवर जशी चालत आली तशीच पुढे चालणार, असे मला वाटते. वरपांगी बदल होती पण पिंड कायम! अर्थात ह्या चाळीवरील लेखांत देखील विडंबनकर्त्याचा माझा पिंड दिसून येतो.

विडंबनाला कुण्या विद्वान टीकाकाराने बिनभांडवली धंदा म्हटले आहे. मला ते पटत नाही. जीवनाची चांगली ओळख असल्याखेरीज विडंबन करता येत नाही. शब्दांच्या बुरख्याआड दडलेले पांडित्य शोधायला डोळ्यांत सामर्थ्य लागते. व्यक्तिगत द्वेषाच्या भावनेच्या पलीकडे जावे लागते आणि जीवनातल्या साऱ्या धडपडींवर, साऱ्याच मानवी व्यापारांवर खूप प्रेम असावे लागते. मनात करुणेचा झरा वहावा लागतो, तरच विनोदी लिखाण संभवते. अन्यायाची चीड आली की विनोदाला उपरोध उपहासाची धार येते; परंतु त्यांतून अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या अज्ञानाची कींव नष्ट झाली की विनोदाला निंदेचे स्वरूप येते. मी जर कुठले प्रयोग सतत चालू ठेवला तर हा निंदेचा भाग टाळण्याचा. निंदेतून क्षणिक करमणूक होते, परंतु ;माणूस म्हणून लेखकाची किंमत घसरते आणि ती घसरली की कुठल्याही साहित्यप्रकाराला आणि साहित्यातल्या प्रयोगाला किंमतच उरत नाही. विनोद लिखाणात हा मी एक नवा प्रयोग म्हणत नाही. परंतु कोल्हटकरा-गडकऱ्यांनी विनोदात अनिष्ट प्रवृत्तींचे उपरोध-उपहासाने जे पितळ उघडे केले आणि व्यक्तिनिरपेक्ष असा जो विनोद रूढ केला, तीच परंपरा नव्या काळातल्या तसल्या प्रवृत्तींच्या बाबतीत चालू ठेवण्याचा प्रयोग हीच विनोदी लेखक म्हणून माझी धडपड आहे.

उदाहरणार्थ, कुठल्याही एका विशिष्ट पत्रकाराची चेष्टा करावी या उद्देशाने न लिहिता मजकुरापेक्षा मथळ्यांनाच महत्त्व देणाऱ्या वर्तमानपत्री लिखाणावर मी पत्रकार नावाच एक लेख लिहिला होता. त्यांत वर्तमानपत्री शैलीचे विडंबन करणे हा मुख्य हेतू आहे. उदाहरणार्थ, निळू ह्या बालपत्रकाराने स्वतःच्या मुंजीचे काढलेले निमंत्रण पहाः

वर मथळा ब्रह्मचर्य व्रताची कडकडीत प्रतिज्ञा

येथील सुप्रसिद्ध गृहस्थ (ह्यापेक्षा आमच्या तीर्थरूपांबद्दल आम्हाला काहीच लिहिता येण्यासारखे नव्हते) श्री वासुदेवराव धुंडिराज गायधनी यांचे ख्यातनाम व बालपत्रकार चिरंजीव लंबोदर उर्फ निळू यांनी रविवार दिनांक अमुक अमुक रोज सकाळी आठ वाजता आलग्न ब्रह्मचर्यव्रताची कडकडीत प्रतिज्ञा करायचे ठरविले आहे. सदरहू समारंभात पुण्यामुंबईचे बाल व प्रौढ ब्रह्मचारी जमणार आहेत असे कळते. तरी आपण आपल्या लेकीसुनांसह सदर अपूर्व समारंभास उपस्थित राहावे आणि असल्या कठोर व्रतपालनप्रसंगी बटूस धीर द्यावा.

पत्रिकेवर मारुतीरायाचा एक तीन इंची ब्लॉक टाकायलाही मी कमी केले नाही. कंपॉझिटरने मात्र आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुसरून निष्काळजीपणाने मारुतीच्या ब्लॉकखाली माझे नाव छापले होते. इत्यादी. ह्यात वतर्मानपत्री मथळ्यांचेही विडंबन होते.

वर्गयुद्ध नावाच्या शाळेच्या हस्तलिखित दैनिकाचे काही मथळे पाहाः ;शेवटची परीक्षा हुकली जोशी सर, तुम्ही कुठे जाल? हेडमास्तरांच्या खोलीत रावण ड्रॉइंग मास्तर बाळंतीण झाले परवचाचे पाश तोडा, इत्यादी मथळ्यांची विडंबने काही प्रसिद्ध मथळ्यांवरून सुचली, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

वर्तमानपत्राप्रमाणे काव्याच्या प्रांतातही नवकाव्याचा गाभा समजून न घेता अनेक येरू; नवकवितेशी दंगा करू लागले आणि आपापली काव्ये प्रसिद्ध करू लागले, तेव्हा मला त्याचे व्यवच्छेदक लक्षण हा लेख सुचला आणि चमत्कारिक असे नवसंकेत म्हणजेच नवकाव्य असे समजणाऱ्या बुटइष्टाकिण्या घालून साहेब बनू पाहाणाऱ्या माजी रावबहादुरांसारख्या कविमंडळींना जरा सबुराने घ्या असे सांगायची पाळी आली आहे असे मला वाटते, आणि

गटारांतल्या निळ्या पुराण्या,
जोड जानवी वरती काखा,
तबकडींतल्या मेल्या गाण्या,
शब्द फुटतसे फुटक्या शंखा

अशांसारख्या विडंबनाच्या ओळी मी लिहिल्या.

सामान्यतः विनोदी उपमा देताना ज्या वातावरणातील लेख असेल त्याच ;लायनीतल्या उपमा मी दिल्या आहेत. अंगुस्तान विद्यापीठ या लेखात शिंपी कॉलेजचे प्रिन्सिपॉल ठिगणे भाषण करताना त्यांच्या जीभेवर त्या दिवशी प्रत्यक्ष फाफचे मशीनच नाचत होते किंवा ठिगळ्यांच्या उत्साहाला नव्याने तेल दिलेल्या मशीनसारखा जोर चढला अगर एका शिंप्याने एकजुटीचे महत्त्व सांगताना आपण एकमेकांना असे चिकटून राहू की जसे कपड्याला अस्तर अशी काही उदाहरणे देता येतील.

अर्थात केवळ गद्य विडंबनेच मी लिहिली नाहीत. संगीत चिवडामणी अण्णा वडगावकर, बोलट लखू रिसवूड, प्रा. विश्र्व अश्र्वशब्दे अशी काही विनोदी व्यक्तिचित्रेही लिहिली. इथे देखील अनेक सारख्या चेहऱ्यांच्या मंडळीतून एक नवा चेहरा मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त एक व्यक्ती डोळ्यांपुढे ठेवून यांत्रिक फोटो काढता येईल. स्वतंत्र जिवंत चित्र काढता येणार नाही. आणि ललितसाहित्य हे हुबेहूब चित्र काढणाऱ्या फोटोग्राफीसारखे नाही. केवळ प्रतिकृती म्हणजे साहित्य नव्हे. ती कृती आहे, प्रतिकृती नाही. आणि विनोदी लिखाणही त्याला अपवाद नाही.

माझ्या विनोदी लेखनाची कथा ही अशी आहे. त्यातल्या प्रयोगांचा पत्ता मला नीट लागलेला नाही. वास्तविक हे कार्य माझे आहे, असे मला वाटत नाही. स्वैपाक्याने पदार्थ करावे. आरोग्यशास्त्राशी त्याला काय कर्तव्य आहे? साहित्यात देखील चिजा बनविणारी मंडळी आम्ही. रस पंडितांनी जाणावा. गद्य विडंबनाच्या आणि अन्य विनोदी चिजा बनवणारा एक लहानसा कारागीर म्हणून एवढी मात्र खबरदारी मी घेतो की, हातात धरलेल्यांची गुळगुळीत व्हावी, मात्र जखम अजिबात होऊ नये.

- पु.ल. देशपांडे
लोकसत्ता


0 प्रतिक्रिया: