Monday, November 25, 2019

पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी?'

प्रिय वामन इंगळे,

तुमच्या पत्रांना या पूर्वी उत्तर पाठवायचं राहून गेले याबद्दल मीच तुमची क्षमा मागायला हवी. माझ्या भूमिकेला तुम्ही जाहीर विरोध केल्याचे तुमचे १३/७/७९ चे पत्र येईपर्यंत मला ठाऊक नव्हते.आणि माझ्या मताला कुणी विरोध केला तर कुणालाही वाईट वाटेल किंवा राग येईल,तितकाच मला येतो. त्याबद्दल मनात राग धरून अबोला वगैरे धरणे माझ्या स्वभावात नाही याबद्दल खात्री बाळगा, अशी तुम्हाला मनापासून विंनती करतो.

आता जुन्या गोष्टींच्या प्रेमाविषयी.सुरवातीलाच मी तुम्हाला सांगतो,की कुठलीही गोष्ट केवळ जुनी म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम नाही. धर्म आणि जात किंवा देव आणि देउळ यांच्याशी मी माझे नाते फार पूर्वीच तोडले आहे. माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी(आता मी साठीत आलोय.) माझे वडील वारले. त्यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन, श्राद्धपक्ष यांतील मी काहीही केलेले नाही. जवळजवळ पंधरा एक वर्षे ‘अनामिका’ या आमच्या संस्थेतर्फे ‘बटाट्याची चाळ’,’वाऱ्यावरची व्रत’वगैरे नाट्यप्रयोग आम्ही केले. त्यात चुकुनही रंगभूमीची पूजा, नारळ फोडणे वगैरे केले नाही.असे असूनही जुन्यातले मला काय चांगले वाटले, त्याबद्दल मी लिहिले असेल.

समजा, एखाद्या देवळावरून जाताना आत भजन चालले असेल आणि मृदुंग वाजवणारा मस्त साथ करीत असेल तर तुम्ही थबकणार नाही का? त्या तालक्रियतेतल्या करामतींची स्मृती तुमच्या मनावर रेंगाळणार नाही का? माझ्या लहानपणी मी जे गाणे ऐकले त्याचा आनंद माझ्या मनात घर करून बसलेला आहे. याचा अर्थ मी नव्या संगीताला – ते केवळ नवे आहे म्हणून कुठे नाव ठेवले आहे का? सुर्व्यांच्या कविता मला आवडली म्हणून बालकवींची ‘फुलराणी’ नावडलीचं पाहिजे असे कुठे आहे? आणि कृत्रिमपणाने किंवा हट्टाने तो आवडलेला अनुभव आपण नाकारायचा का?

माणसांचे गट करणारा धर्म किंवा सत्तेतील राजकीय पक्ष ही कल्पना मला मानवत नाही. ज्या क्षणी मला लिहावसे वाटले ते माझ्या स्वभावाला धरून मी लिहिले. त्यात विसंगतीचे मीच अनेक उदाहरणे दाखवू शकेन. याचे कारण नवे संस्कार हे तत्पूर्वीच्या संस्करण पुष्कळदा उध्वस्त करीत असतात, तर काही टिकवीत असतात. आणि मी कुठल्याही एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच झेंडा घेऊन निघालो नसल्यामुळे मला हट्टाग्रहाने काही पटवून देण्याची आवश्यकताचं वाटत नाही. मुख्यतः मी ज्याला सर्वसाधारणपणाने विनोदी लेखन म्हटले जाते असेच लिहिले आहे. त्यामुळे मला जिथे विसंगती वाटली त्यावेळीचं मला लेखनाची प्रेरणा झाली. विसंगती जुन्यातही आहेच आणि नव्यातही असू शकते.

मी अशा कालखंडात वाढलो, की ज्यावेळी गरीब, उपेक्षित यांच्याविषयीची भूतदया हा माणुसकीचा सर्वात मोठा अविष्कार मानला जात होता. आज तो संदर्भ बदललेला आहे, इथे कुणीही कुणावर उपकार करीत नसतो, या विचारला महत्त्व आले आहे. माणुसकीने वागवले गेलेच पाहिजे,हा हक्क झाला. त्या हक्काची कुणी पायमल्ली करीत असेल तर तो कायदेशीर गुन्हा झाला.

आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचा अर्थ चातुर्वर्ण्यावर आधारलेले न्याय आणि कायदा याविषयीचे जुने तत्वज्ञान जाळले. त्यातून त्यांनी केवळ दलितांच्याचं नव्हे, समाजात डोळे उघडे ठेवू इच्छीणाऱ्या सर्वांच्यातच परिवर्तन घडवून आणले. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय संस्कारात जगणाऱ्याच्या हे उशिरा लक्षात आले असेल. ते आणून देण्यात दलित साहित्यिकांचा फार मोठा वाटा आहे. तेव्हा जुन्याकालचे सारेच काही सुंदर होते, जुने ते सोने म्हणणे निराळे आणि माझ्या बालपणी किंवा तरूणपणी जे सौंदर्याचे, आनंदाचे संस्कार माझ्या मनावर झाले त्याचे स्मरण होणे , यांत फरक आहे.

तुम्ही तबला वाजवता. मी वयाच्या नाना प्रकारच्या अवस्थेत अहमदखान थिरकव्वांचा तबला ऐकलेला आहे. माझा व त्यांचा शेवटी शेवटी परिचयही झाला होता. मध्यंतरीच्या काळात मी अनेक चांगले तबलजी ऐकले पण तबल्याचे बऱ्याच समजदारीने अनुभव घेत जाऊन सुद्धा मला अजूनही थिरकव्वासाहेबांचे अदिव्तीयत्व विसरता येत नाही. नव्या तबलीयांत झाकीर हुसेन हा माझा आवडता तबलजी आहे. समजा, तालाच्या संदर्भात थिरकव्वांच्या मैफिलीचा उल्लेख केला, तर ती जुन्यात रमण्याची आवड, एवढाच त्याचा अर्थ होईल का?

जुने पूल जाळणे हे म्हणायला ठीक असते .ते संपूर्णपणे जाळता येत नसतात. एवढेच नव्हे तर सगळ्याच जुन्या पुलांवरचा प्रवास हा ‘समाजविरोधी’ या सदरात जमा होणारा नसतो.


त्यामुळे माझे सगळे लेखनच चुकले असे म्हणायचे मला यत्किंचीतही गरज वाटत नाही. उगीच स्वतःला मार्क्सवादी म्हणवून घेत राहण म्हणजे आपण प्रगतीशील आहोत म्हणून सिद्ध करणे नव्हे. साहित्यातून प्रगट होणाऱ्या किंवा याचक या नात्याने अनुभवास येणाऱ्या अनुभूतींना असे एकाच मापात मोजता येत नाही असे मला वाटते.

गीतेतला चातुर्वर्ण्य मला अजिबात मान्य नाही. जन्मसिद्ध, श्रेष्ठ-कनिष्ठत्व याला काडी इतकाही अर्थ नाही. या अनिष्ठ आणि पुष्कळदा अमानुष अशा विचारांचा मी पाठपुरावा केल्याचे एकही उदाहरण माझ्या लेखनात सापडणार नाही. हे तर ज्याला वैचारिक असे म्हणतात ते लेखनही मी फार केलेले नाही आणि जे केले आहे, त्यात जुन्या समाजपद्धतीचा कोठेही पुरस्कार केला नाही. मला कधी देवाची करुणा भाकत बसावे असे वाटले नाही. मात्र, दुसरा कोणी देवापुढे हात जोडून उभा असला तर त्याला तिथून ढकलूनही मी देऊ शकलो नाही.

भव्य मंदिरे किंवा युरोपातील प्रचंड कॅथड्रिलस पाहताना मी त्यातल्या शिल्पकलेने थक्क झालो आहे. संगीतातही मी जुने नवे मानत नाही. माझ्या सुदैवाने मला पाश्चात्य पॉप पासून बाख-बेथोव्हेन यांच्या सिफंनीज ऐकायचा योग आला. आणि खेड्यातल्या लोकगीतांपासून ते मंजिखांसाहेब किंवा आजच्या काळातले मल्लिकार्जुन, कुमार वगैरेही मी भान हरपून ऐकतो. लताही माझी आवडती गायिका आहे तिच्या सुरांचा मी चाहता आहे. सैगलच्या आवाजा इतकी बालगंधर्वांची ललकारी मला स्तिमित करते. यांच्या सुरांतली निराळी जादू जुन्या रेकॉर्ड्स ऐकतानाही मला हरवून जाते.

तुम्हाला कल्पना नसेल , सुर्वे यांची कविता मी प्रथम जेव्हा वाचली, त्याकाळात सुर्वेंच नाव साहित्यप्रांतात देखील कोणाला ठाऊक नव्हते. अशा वेळी मी होऊन त्यांची ओळख करून घेतली. केशवसुतानंतर एका निराळ्या वातावरणात रमलेली कविता पुन्हा नव्या जोमाने वर आली, असे मला सुर्वे किंवा वामन निंबाळकर, यशवंत मनोहर यांच्या सारख्यांच्या कविता वाचताना मला वाटले.

ढसाळांच्या ‘एक तीळ सगळ्यांनी रगडून खावा’ यांसारख्या ओळी तर मी माझ्या साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणात उद्धृत केल्या आहेत. याचा अर्थ पाडगावकर किंवा सुरेश भटांची गझल मी नाकारली पाहिजे असा होत नाही. यातला साहित्यनिर्मिती साठीचा अमुकच मूड खरा, हे मला मान्य नाही. अध्यापनाच्या कार्यासाठी आवश्यक असलेलीही वर्गवारी माझ्या साहित्यनिर्मितीच्या किंवा आस्वादाच्या आड येत नाही.

तुम्ही गाण्यातले आहात म्हणून गाण्यातले उदाहरणे देतो. रात्रभर मन्सूरांचे ख्याल गायन ऐकून आल्यावर सकाळी उठून कुठून तरी बेगम अख्तरचा ठुमरीतला तुकडा शेजारच्या रेडियोवरून कानावर ऐकला तर तोही मला सुखावून जातो. तेव्हा माझी कशातूनही सुटका बिटका करून घ्यायची नाही. माझ्या या वृत्तीबद्दल मला कोण पुरोगामी म्हणता की कोण परंपरावादी म्हणतो याची चिंता मी का करू?

जे मी लिहिले ते वाचकांपुढे आहे. त्यातून ज्याला जो अर्थ काढायचं आहे त्याने तो अर्थ काढावा. तो काढण्याचा त्याला तो हक्क आहे. याची जी काही फुटपट्टी असेल, तिनेच माझी उंची किंवा बुटकेपणा मोजण्याचा त्याला हक्क आहे. त्याचा हा हक्क मी मानतो. कारण मला जे ज्या वेळी योग्य वाटेल ते लिहिण्याचा माझा हक्क मी मानतो, म्हणून. जग अफाट आहे. जीवनाचे सारे तत्वज्ञान एकाच पोथीत साठवले आहे असेही माणू नये. मग ती दासबोधाची पोथी असो किंवा दासकापितलाची! इथे जुने नवे वगैरे प्रश्न येतच नाहीत. कुठल्या संदर्भात कुठले मत प्रगट झाले आहे ते पहा.

एक उदाहरण देतो. मला मुंज हा प्रकार मान्य नाही. पण समजा, एखाद्या मुलाची मुंज लागत असताना भटजींचे धोतर होमात पडून तो पेटायला लागला आणि ते होरपळून मेले, या घटनेचे मला दुःख झाले तर मुंज लावणाऱ्या प्रतिगामी भटजीच्या मरणाचे दुःख झाले म्हणून माझी मते बुरसटलेली आहेत असे जर कोणी म्हणायला लागला तर त्याला मूर्ख या शिवाय दुसरे काहीच म्हणणार नाही.

जी.ए.सारख्यांची एखादी गोष्ट वाचली की आपले क्षण सत्कारणी लावणाऱ्या या कलावंताना आदराने नमस्कार करावासा वाटतो. काय नवे म्हणावे, काय जुने म्हणावे मनाला रेंगाळावेसे वाटते तिथे रेंगाळावे. त्याक्षणाशी मनाचे अद्वैत साधले जाते. तो भोग काय वाचा मनाने घेतला जातो. कधी तरी शब्दातून त्याला रूप येते.बस एवढेच !

आपुलकीने लिहिलेत म्हणून हे तुमच्यासाठी उत्तर. एरव्ही ज्यांना मला जुन्यात रमणारा म्हणायचे असेल प्रतिगामी म्हणायचे असेल त्यांचे तोंड किंवा हात धरायला मी जाणार नाही पण ज्या अनुभवांनी मला प्रभावित केले त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही.

असो. पत्र खूप लांबले. माझे मन दुखावल्याची भावना मनात ठेवू नका. माझ्या ज्या कुठल्या भूमिकेचा तुम्हाला जाहीर निषेध करावसा वाटत असेल तो अवश्य करा. कोणाच्याही विचारस्वातंत्र्याच्या आड येणे मला योग्य वाटत नाही. मात्र, विचार स्वातंत्र्य याचा अर्थ कुठल्या ऐकीव माहितीवर विसंबून राळ उडवण्याचे स्वांतत्र्य नव्हे. पुराव्या खेरीज आरोप करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. तुम्हालाही हे मान्य असावे.

तुमचा

पु.ल.देशपांडे
१७/०७/१९७९ 

मुळ स्रोत -->
http://www.bolbhidu.com/pl-deshpande-progressive-or-conservative/

पु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व - डॉ. श्रीकांत नरुले


पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले. त्यांनी विनोदाचे एक स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. लोकांना खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायलाही शिकविले…

‘हसून दु:ख सोसल्यास सुसह्य होते’, असे विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांचे तत्त्वज्ञान होते. विनोदाची खेळकर उत्स्फूर्त वृत्ती, मिस्कीलपणा हे सारे गुण त्यांच्याकडे जन्मजात होते. त्यांच्या आजीची परंपरा त्यांनी स्वीकारून आपला मिस्कीलपणा अधिकच गडद केला. एकदा आजीला नातू म्हणाला, ‘आजी माझे हे मित्र पैलवान आहेत’, आजी म्हणाली, ‘बरे झाले, सकाळपासून मी वाट पाहत होते, हे कोळशाचे पोते आत आणायचे होते.’ पुलंची व्याख्याने व एकूण विनोदी वाङ्‌मय हे आजीच्या शैलीप्रमाणेच आहे. त्यांचा उपहासगर्भ विनोद आपणाला तेच सांगतो.
बटाट्याच्या चाळीत सारे मध्यमवर्गीयच राहतात. येथे भरपूर भांडणे आहेत, पण त्या सार्‍यांमध्ये आत्मीयतेचे धागेही आहेत. इथल्या संवाद विसंवादावरच ‘बटाट्याची चाळ’ नांदत आहे. साध्य ासुध्या संवादातून त्यांनी स्वभावातील खाचाखोचा, तिरकसपणा मांडून सहजपणे विनोद साधला आहे.

त्यांचा विनोद अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. कधीकधी ते बोलण्यातील विसंगतीवरही विनोद मांडतात. मध्यमवर्गाच्या व्यंगावरची फजितीही अनेकदा पाहायला सापडते. त्यावरही त्यांचे विनोद घडलेले आहेत. कधी हा विनोद पाककृतींच्या बिघडलेल्या घटनेवरही असतो.

एखाद्या स्वयंपाकघरातील खूपच वस्तू शेजारच्या घरातून आणलेल्याच अनेक वर्षे दिसून येतात. देणारे आणि वस्तू आणणारे दोघेही ते विसरतात. पुन्हा पुन्हा शेजारच्याही घरात तसेच चित्र दिसते. अनेकदा गृहिणी स्वयंपाक बिघडला तर हार न मानता सारवासारव करते. पुलंनी त्यावरही लिहिले आहे. ‘दिलेली शंकरपाळी दाताने तोडणे कठीण म्हणून तो अडकित्त्याने तोडतो. त्यावर कमलाबाई म्हणतात, आम्ही खाण्याचे पदार्थ मुद्दामच कडक ठेवतो, कारण दातातील शक्ती मऊ, खुसखुशीत पदार्थ खाऊन नष्ट होते. भात देखील पुरा शिजलेला आमच्याकडे नसतो.

‘नळावरील भांडणे’ यावर लिहिताना ‘एकमेकांना पाण्यात पाहणे, हा शब्दप्रयोग नळाच्या पाण्यावरून तर स्फुरला नसेल’ असे पुलं लिहितात.
जनसामान्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच आहे. अशा लोकांच्या जीवनातील विसंगती, आकांक्षा ते रंगून रंगून सांगताना दिसतात. ‘बटाट्याची चाळ’ ‘खोगीरभरती’ मधून त्याची प्रचीती येते. त्यात त्यांचा विनोद निर्मळ राहिलेला आहे. कुठेही अश्‍लीलता नाही. माणसांचे दोष मांडताना ते चेष्टा करतात, पण त्यांच्यावरही त्यांचे प्रेम असते, मायाच असते.

विडंबन हा आणखी एक त्यांच्या लेखणीचा सहजधर्म दिसतो. कोल्हटकर, चि. वि. जोशी, गडकरी, अत्रे यांची लेखन पद्धती, त्यातील नाट्यधर्म, त्यातील गोष्ट त्यांना भावलेली असते. काही तरी करून घसरून नाटक कसे पडेल याकडे प्रथम प्रयोगाकडे आलेल्या लोकांचे लक्ष असते. लोकांची ही वृत्ती त्यांनी उपरोधिक शैलीत मांडली आहे. पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले.

फजितीचं अत्यंत साद्यंत वर्णन पुलं करतात. ‘भांडकुदळ’ बायको या लेखात एक मजेशीर घटना घडते. आपल्या बायकोसाठी तो चोरून स्नो पावडर आणतो. त्यावर ती खूष होईल, असे त्यास वाटते. घडते वेगळेच. ती म्हणते, ‘माझ्या काळेपणाला एवढं हिणवायला नको, गोरी पाहिजे होती तर आणायची होती.’ तो म्हणतो ‘हिला काळे म्हणायला माझे डोळे का फुटले आहेत? कोळसे, डांबर, शाई वगैरे मंडळींचा राग मी सुखासुखी का पत्करीन?’
आपला विनोद त्यांनी चावटपणापासून अलग ठेवला आहे. चावटपणाचा साधा स्पर्शही आपल्या विनोदाला ते करू देत नाहीत. उपहासामधून पु.ल. एखाद्याची खिल्ली उडवत. शारीरिक ठेवण, मानसिक दोष, जीवनातील विसंगती यातून त्यांनी आपला विनोद साधला आहे. स्वभावनिष्ठ विनोद, प्रासंगिक विनोद, विडंबन उपहासात्मक विनोद, विसंगतीवरचा विनोद असे विनोदाचे प्रकार पडतात.

एका पानवाल्याची रसिकता किती और आहे, हे सांगताना पुलंची निरीक्षणशक्ती किती सूक्ष्म आहे याचे दर्शन होते. ते म्हणतात, त्याच्या दुकानात कुठल्याशा गोस्वामी बालब्रह्मचारी आणि ‘बंदुककी आवाज’ फेम लवंगलता या दोघांचेही फोटो एकाच फ्रेममध्ये बसवलेले मी या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. अनासक्ती आणि आसक्ती याचा असा योगायोग जुळवून आलेला त्यानंतर मी कुठेही पाहिलेला नाही. दर्याचा उल्लेख करताना मोठमोठ्या लेखकांनी ‘ऐलतीर पैलतीर’ पाहिलेला आहे, हा शब्दप्रयोग पुलंना मजेशीर वाटतो. ते म्हणतात, ‘ही भाषा वापरायला दर्या म्हणजे काय कोल्हापूरची पंचगंगा आहे?’ असे विनोद मांडताना त्यांना सामाजिक स्थित्यंतराची जाणीव होते. चाळ ही संस्कृती लोपल्यानंतर कुटुंब ही संकल्पनाही लोप पावणार, ओलाव्याचं नातं संपणार, बंद दार असलेली संस्कृती येणार हे त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेले होते. ब्लॉक माणूसपण न जपता खासगीपण जपणार हे त्यांनी तेव्हाच ओळखले होते. पुलंचे हे चिंतन मराठी मन जपते.

निकोपपणे माणसाच्या जगण्याकडे पहा असा जणू संदेश त्यांच्या विनोदवृत्तीने दिला आहे. अमंगल, गुंतागुंतीचे जगणे त्यांच्या खेळकर वृत्तीने नाकारले आहे. माणसाने सुंदरपणाने जगावे असे त्यांना वाटे. पुलंनी विनोदकार म्हणून लौकिक मिळवला, पण अंगाला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. पुलंनी लिहिलेले काही किस्से सतत आठवत राहतात. ते एके ठिकाणी लिहितात, हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच. पोपट, मांजर आणि कुत्रा. एका इसमाने माकडही पाळले होते, पण दोघांच्याही आचरटपणाची इतकी चढाओढ लागायची की, कोणी कोणाला पाळलेय हेच कळत नसे. आम्ही शून्यातून विश्‍व निर्माण केलं का विश्‍वातून शून्य? असा त्यांना माणसाच्या कर्तबगारीबद्दल प्रश्‍न पडतो. पुलंनी मात्र विनोदाचे एक स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायला शिकविले.


डॉ. श्रीकांत नरुले
नवप्रभा
८ नोव्हेंबर २०१९

Wednesday, November 20, 2019

माझ्या आठवणीतले पु.ल.

पु.लं. बद्दल काही लिहायचं, म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. श्री रामा ला ते जमलं कारण ते एक अवतार होते, पण आमच्या सारख्याला ते कसं जमायचं, कारण आमचा अवतार पाहाल, तर अगदीच अवतार आहे. तरी देखील, पु.लं नी जे काही दिलं आहे, माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या 'आयुष्यात' जे सुख आणि आनंदाचे क्षण दिले आहेत, त्या प्रती क्रुतज्ञता म्हणून हा सगळा खटाटोप. (इथे मुद्दामहून 'जीवनात' हा शब्द टाळला आहे, कारण सखाराम गटणे मध्ये पु. लं.नीच, त्यांना जीवन वगैरे शब्दांची भीती वाटते असे म्हटलं आहे) तसं पाहायला गेलं तर, पु.लं. नी जो काही आनंद दिला आहे, त्याला शब्दात मांडणं कठीण आहे. तरी सुद्धा, अनेक वर्षं मनात दाटून राहिलेल्या भावना व्यक्त कराव्यात असं सारखं वाटत होतं, आणि व्यक्त होत राहणे हा तर आपला स्थायी भाव आहे, म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. एवढं असूनही, लेख चांगला असेलच याची शास्वती नाही, तरी सगळ्यांनी हा लेख गोड मानून घ्यावा ही विनंती.

तर...

पु.लं ची आणि माझी पहिली ओळख, दूरदर्शन वरील त्यांच्या 'निवडक पु.लं' या मालिकेतून झाली. मला पहिल्या पासूनच वाचनाची आवड होती, शाळेत सुद्धा, भाषा व इतिहास हे गद्य विषय माझ्या खास आवडीचे. कॉलेजमध्ये आल्यानंतर, माझे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे वाचन वाढले. कॉनव्हेंट मध्ये शिक्षण झाल्याने, सुरवातीला इंग्रजी पुस्तके वाचण्याकडे माझा कल होता, मग एके दिवशी बाबांनी सल्ला दिला, "इंग्रजी बरोबरच मराठी साहित्य सुद्धा वाचत जा". मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांचे आजीवन सभासदत्व होते, मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. मराठी साहित्याबद्दल फारशी माहिती नसल्याने, काय वाचावे, कोणत्या लेखकाचे पुस्तक घ्यावे हा एक प्रश्नच होता. परंतु, पु.लं. ची थोडीफार तोंड ओळख झाली असल्याने त्यांच्या पासूनच सुरुवात करावी असं ठरवलं. आणि मग सुरू झाला एक अतिशय आनंदाचा आणि सुखाचा प्रवास...
खोगीरभरती, ह'फ'सवणूक, नसती उठाठेव, व्यक्ती आणि वल्ली, अघळपघळ, उरलंसुरलं, खिल्ली, अशा अनेक पुस्तकांनी मनमुराद हसवलं. 'निवडक पु.ल.' पाहिले असल्याचा एक फायदा असा झाला, की मी ती सगळी पुस्तकं पु.लं. च्या आवाजात वाचू शकलो, म्हणजे, मनातल्या मनात वाचताना सुद्धा मला पु.लं. च आपल्याला वाचून दाखवताहेत असे वाटायचे. त्यांच्या त्या खास जागा, विशिष्ट पद्धतीने उच्चार करण्याची लकब, त्यांचे एकूणच अभिवाचन, अगदी सगळं सगळं मी अनुभवत होतो. त्यामुळे त्या वाचनाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांचं निरीक्षण ईतके सूक्ष्म व विलक्षण असायचं आणि तितकंच लिखाण सजीव, की त्यांच्या पुस्तकातील अनेक प्रसंग, व्यक्तीरेखा, या खर्याखुर्या व जीवंत वाटायच्या, त्यातील अनेक प्रसंग आपण देखील अनुभवले आहेत व त्यातील अनेक व्यक्तीरेखा या आपल्या आयुष्यात सुद्धा आहेत असेच वाटायचं. किंबहुना ते बर्याचदा तसंच असायचं.

त्यांचा नामु परीट असो किंवा पेस्तनकाका, सखाराम गटणे असो किंवा भय्या नागपूरकर, सगळे आपले आपलेसे आणि ओळखीचे वाटायचे. हसवता हसवता मध्येच एकदम, चितळे मास्तर, अंतू बर्वा, हरी तात्या ही मंडळी अचानक काळजाला हात घालुन जायची आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या व्हायचा. या मंडळींना देखील आपण कुणा ना कुणात, कुठे ना कुठे पाहिलेले असायचे. एसटी चा प्रवास करताना आपण देखील सुबक ठेंगणी पाहिलेली आहे, ईतकी चूकीची माहिती ईतक्या आत्मविश्वासाने सांगणारे मास्तर सुद्धा भेटले आहेत, झंप्या दामले असो वा मधु मलुश्टे, ऑरडरली साहेब असो वा पुढारी, उस्मान शेठ असो किंवा बगु नाना, ही मंडळी आपल्याला देखील ठाऊक आहेत. "कैसा पान लगाऊ साहेब" असं आपल्या पानवाल्याने विचारलं, तर त्याला सुद्धा "तूच का तो ब्रूटस" असं कित्येकदा आपल्याला देखील म्हणावसं वाटलंय, बाबांची पोष्टातील कामं करायला पोष्टात गेलो की आख्खं पोष्टीक जीवन डोळ्यासमोर ऊभं राहिलंय. आज देखील, कुणीही वीट आला असं म्हटलं, तर एका हातातील बाजारातील वीट आणि दुसऱ्या हातातील स्वतःच्या भट्टीतील वीट आठवते. आजकाल फेसबुक चा जमाना आहे म्हणून बरंय, नाहीतर घरी बोलावून कुणी फोटो दाखवायला बसवलं असतं, तर मात्र माझी आणि माझ्या शत्रुपक्षाची चांगलीच जुंपली असती. कुणाच्या घरी बोलणारा पोपट किंवा शेकहँड वगैरे करणारा कुत्रा दिसला, की पाळीव प्राणी आठवतं आणि ती वँक वँक करणारी सिंडरेला नामक चेटकी आठवल्या खेरीज राहत नाही. "महाराषट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्त पणाची भावना अधिक बळावली आहे" हे पु.लं. च वाक्य प्रत्येक मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकराने खरं केलंय.

बटाट्याची चाळ आणि असामी असामी वाचल्यावर तर पु.लं बद्दल प्रेम अधिक की आदर असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहारात, धकाधकीत इतकी गंमत दडली आहे, हे केवळ पु.लं. नीच जाणून दिलं. आपल्या मध्यम वर्गीय माणसाच्या अडीअडचणींंने भरलेल्या आयुष्याकडे, विनोद बुद्धीने पाहायला आणि त्यातील गंमती हुडकायला, पु.लं. नीच शिकवलं, आणि माझ्या मते हे त्यांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं देणं आहे. चाळीतंच लहानाचा मोठा झाल्यामुळे, माझ्या सारखे अनेकजण, बटाट्याची चाळ अक्षरशः जगले आहेत. आमच्या चाळीत, सोकाजीनाना त्रिलोकेकर पासून ते समेळ काकांपर्यंत आणि अण्णा पावशे पासून ते बाबा बर्वयांपर्यंत सगळे नमुने आम्ही जवळून पाहिले आहेत. "त्या तिथे वसत असे चाळ बटाट्याची" यातील कळवळा आम्ही समजू शकतो. काळ बदलला तरी आजच्या काळातले आप्पा भिंगारडे, नानू सरंजामे, वगैरे मंडळी हापिसात भेटतातच. आपल्या घरी देखील आपला शंकर्या अथवा शरयू आपण किती फॉग आहोत अथवा टॉप्स आहोत ह्याची जाणीव करून देत असतात. जुन्या आणि नव्या पिढीतील चढाओढ अजूनही चालूच असते. "अंग किती गोरं आहे नाही" असं म्हटल्यावर आजदेखील आपली सौ डोळे वटारून "गोरं!!!" असाच प्रतिसाद देते. आता मुलांच्या शाळेत जाण्याचा योग आला की ओठांना ओठ न लावू देता (म्हणजे स्वतःचे) बोलणारी हेडमास्तरीण बाई भेटली की आपली ही अवस्था धोंडू भिकाजी जोशींच्या सारखीच होते. त्यामुळे मला असं वाटतं, की पु.ल. हे कालातीत साहित्यिक आहेत, त्यांचं साहित्य हे पिढ्यानपिढ्या साठी आहे आणि प्रत्येक पिढीला ते आपलं वाटतं, त्यांच्या आयुष्याशी सुद्धा ते समरस आहे, म्हणून तर बिगरी ते मँट्रीक हे प्रत्येकाला त्याच्या शाळेत घेऊन जातं, दामले गुरुजी, ड्रॉईंग चे मास्तर, संस्कृत चे गुरुजी, ईतिहास मधील वंशावळ्या, भूगोलातील वारे, भूमिती साठी वापरली जाणारी कंपास पेटी, करकटक वगैरेशी भेट घडवते.

हा "हसवण्याचा धंदा आपुला" करत असतानाच पु.लं. नी; आपुलकी, मैत्र, गणगोत सारख्या पुस्तकातून; बाल गंधर्व, वसंतराव देशपांडे, वसंत सबनीस, शरद तळवलकर, केसरबाई केरकर, खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू,शाहू महाराज, वूडहाऊस, चिंतामणराव कोल्हटकर, बेगम अख्तर तसंच रावसाहेब सारख्या थोरामोठ्यांचे, जवळून दर्शन घडवले. जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग सारख्या प्रवासवर्णनातून आपल्याला विविध देश फिरवले, तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा, माणसाकडे पाहण्याचा एक नवा द्रूष्टीकोण दिला.

असो, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, पु.लं. नी जो आनंद दिलाय तो शब्दात सांगणं कठीण आहे, त्यांच्या बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच आहे. तेव्हा माझा हा लेख आटोपता घेतो आणि आपल्या सर्वांना अतोनात आनंद देणाऱ्या या आनंद यात्रीला शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल अभिनंदन करतो व असेच आम्हाला पिढ्यानपिढ्या हसवत आल्याबद्दल आभार मानतो.

हिमांशू हाते
https://www.facebook.com/himanshu.hate.9

पु. ल. न विसरता येणारे

पुलं सोबतची (पुस्तकरूपी) ओळख झाली ते शाळेत असताना त्यांचा ‘उपास’ हा धडा शिकताना आणि वाटलं होतं सगळे धडे असेच का नसतात? आज पण जेव्हा कोणी डाएट बद्दल बोलतं तेंव्हा मला ‘उपास’ आठवतो. पुलं हे खूप कोणी तरी मोठे लेखक आहेत आणि त्यांच लिखाण किती महान असेल हे माझ्या सारख्या छोट्या बुद्धी असलेल्याला तेंव्हा समजलं नव्हतं.

पुढे जेव्हा थोडी वाचायची समज आल्यावर आणि त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केल्यावर कळलं अरे ह्यांची पुस्तके खूप आधीच वाचायला हवी होती. खर तर पुलं आपल्यातून जाऊन खूप वर्षे झाली पण त्यांची पुस्तके वाचताना , कथानक ऐकताना असं वाटतं अरे ते तर अजून अवतीभवतीच आहेत. मी पुलंच सगळं लिखाण वाचलं आहे असं नाही पण त्यांच जे काही लिखाण वाचलंय त्याला तोड नाही.पुलंनी जे काही लिखाण केलं ते आज सुद्धा मनाला भावतं.
                
पु.लं. च व्यक्ती आणि वल्ली जेंव्हा वाचलं होतं तेंव्हा आणि आज सुद्धा जेंव्हा कधी वाचतो त्या नंतर त्यातील वल्ली चा शोध कोठे ना कोठे घेऊ लागतो. जेंव्हा केंव्हा आमचा कोकण दौरा होतो तेंव्हा त्या कोकणातील नारळ आणि सुपारी च्या बागा पाहतो तेंव्हा मी ‘अंतू बर्वा’ ला आजूबाजूस शोधू लागतो. कधी त्या ठिकाणच्या छोट्या चहा च्या टपरी वर तर कधी बस स्टँड वर. जेंव्हा एखाद्या लग्न समारंभात जातो आणि निवांत बसलेला असतो तेंव्हा कोठे ‘नारायण’ नावाने कोणी हाक ऐकू येते का हे पाहत असतो. जेंव्हा कोणी नातं नसलेला पण आपुलकी असेलला कोणी ज्येष्ठ एखादी मुलगी लग्न होऊन निघताना डोळे पुसतो तेंव्हा मी त्या व्यक्तीत ‘चितळे मास्तर’ बघतो, कधी कोठे खूप अशी तळवे झिजलेली चप्पल बघतो तेंव्हा वाटत अरे ईथे चितळे मास्तर आले असतील काय असा अंदाज लावतो. कधी तरी सदाशिव पेठेत फिरत असताना ‘गटणे’ हे आडनाव कानावर पडतं तेंव्हा वाटत त्यांना जाऊन विचारावं सखाराम तुमचा कोण लागतो? रेल्वेतून जेंव्हा ही प्रवास होतो तेंव्हा वाटत आपल्या शेजारी पण ‘ पेस्तन काका’ यायला पाहिजेत म्हणजे काय धमाल येईल ना. तेंव्हा माझी नजर एखाद्या पारशी कुटुंबाला शोधत असते. कधी तरी आमचा परीट सुद्धा आमचे कपडे हरवून ठेवतो तेंव्हा मला नकळत ‘ नामू परीट’ आठवतो. मी त्याला म्हणतो तुझा नामू झाला वाटतं पण त्या बिचाऱ्याला त्यातलं काहीही कळत नाही. फिरत असताना एके ठिकाणी दोन व्यक्ती बोलताना दिसतात तेंव्हा त्यातील एकाच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या दिसतात व तोंडात थोडी गुंडगिरी ची भाषा आणि दुसरी व्यक्ती एकदम साधारण असते तेंव्हा वाटत अरे हा ‘बबडू’ तर नसेल ना.

‌ जेंव्हा बस किंवा आता ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असताना अचानक जर गाडी बंद पडली आणि गोंधळाचा आवाज आला तर वाटतं अरे गाडी खाली ‘म्हैस’ तर नसेल ना आली. कधी तरी नाटक पाहण्याचा योग येतो आणि तिसऱ्या घंटे नंतर जेंव्हा पडदा वर जाऊ लागतो तेंव्हा मला ‘शंकऱ्या’ ने विचारलेला प्रश्न आठवतो, आणि मी शेजारी पाजारी शंकऱ्या ला शोधू लागतो. जेंव्हा कोणी स्वतःच्या नवीन बांधत असेलेल्या घराबद्दल बोलायला लागतं तेंव्हा मला मी आणि माझा शत्रूपक्ष मधील कुलकर्णी पात्र आठवतं आणि हसायला येतं. कधी तरी कामा निमित्त पोस्टात जाणं होतं तेंव्हा मी पुलंनी वर्णन केलेल्या पोस्टाशी काही मिळतं जुळतं आहे का असं बघत असतो तेंव्हा जाणवतं अरे इथे तर अजून पण तिच स्थिती आहे.

‌ माझ्या मामाच्या घरासमोर अजून पण काही चाळी आहेत, आणि ती चाळ त्या चाळीतील घरे ,लोकं पाहिली की मी आपसुकच अरे ही तर ती ‘ बटाट्याची चाळ’ नाही ना असं स्वतःला विचारतो. कधी तरी एखाद्या अमृततुल्य ला चहा घेत असताना अचानक कानावर ‘ पुर्वीच पुणं राहीलं नाही हो आता’ असं जेंव्हा ऐकू येत तेंव्हा पुणेकर होण्यासाठी लागणाऱ्या अटींचा मी विचार करायला लागतो.

‌ पु ल तुम्ही कधी कोणी एके काळी केलेलं लिखाण आज सुध्दा तंतोतंत नजरेस दिसतं, पुलं तुम्ही नक्की च देवलोकी पुन्हा एकदा बटाट्याची चाळ तयार केली असणार आणि देवलोकी हास्याचे फवारे उडत असणार.

Monday, November 18, 2019

गृहिणी-सखी-सचिव

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.

मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे.

माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते. दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.

सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.

सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.

जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.” ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.

पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.

अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?

काही व्यक्तींना एखादे काम कसेही झाले तरी ते फक्त होण्याशी मतलब असतो. काही व्यक्ती याच्यापेक्षा थोड्या पुढे असतात. त्यांना ते काम निगुतीने होण्यात थोडाफार रस असतो. त्यामुळे त्या कामात थोडं इकडं-तिकडं झालं तरी त्या ते चालवून घेतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादे काम त्याच्या नियोजित पद्धतीनेच झालेले आवडते उलटपक्षी ते तसेच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. आणि असं असण्याचा सगळा त्रास त्यांच्या वाटयाला येतोच. अशा व्यक्तींना ‘ए’ टाईप व्यक्ती म्हणतात असं एक डॉक्टर मला सांगत होते. पुस्तकाच्या पानांवर काळे ठिपके दिसल्याने व त्यातला एखादा ठिपका एखाद्या शब्दावर आल्याने अर्थ बदलतो म्हणून स्वतः सही केलेलं पुस्तकच बदलून द्यायला निघालेल्या सुनीताबाई या अशी व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या सगळ्याच मतांशी अगदी ठाम असत. त्यापासून जरा देखील ढळत नसत. याचा अनुभव मला वेळोवेळी येत गेला होता.

माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला सहर्ष मदत करणाऱ्या सुनिताबाईंचा हा स्वभाव माहित असल्याने पुढच्याच वर्षी मी त्यांच्या घरी पोहोचलो ते ‘आनंदयात्री पु.ल.’ ही नवी थीम घेऊनच. त्यात मी काढलेली पुलंची प्रकाशचित्रे वापरणार होतो. त्याच्या पूर्वीच प्रकाशचित्रकार देवीदास बागूल आणि सुनीताबाई-पु.ल. यांच्यामध्ये फोटोंच्या स्वामित्व हक्कावरून तात्विक वाद बराच तीव्र झाला होता. बागुलांनी काढलेले पुलंचे फोटो पु. ल. सत्कार समितीने विनापरवानगी वापरल्याबद्दल त्यांनी पुलंशी पत्र व्यवहार केला होता. त्यात बागुलांबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या होत्या. मी बागुलांच्या स्वामित्वहक्काबाबतच्या भूमिकेशी सहमत होतो. या पत्रयुद्धात बागुलांना पाठिंबा देणारे महारथी हळूहळू मागे हटले आणि मी एकटाच बागुलांबरोबर राहिलो होतो.

पुलंच्या ‘चित्रमय स्वगत’ या पुस्तकासाठी सुनिताबाईंनी मी काढलेले काही फोटो मागितले होते. ते फोटो व त्याची परवानगी मी अतिशय आनंदाने दिली होती. पण मी बागुलांना त्यांच्या स्वामित्वहक्काबाबत दिलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे थोडा तणावही होताच. तरीही प्रत्यक्ष समोरासमोरच्या भेटीत आदरातिथ्य, माझी विचारपूस करणे हे त्यांच्याकडून चुकले नव्हते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता मी पुलंचे फोटो कॅलेंडरमध्ये वापरणार होतो. सुनिताबाईंची प्रतिक्रिया यावर कशी असणार याचाच मी विचार करीत होतो. माझे पुलंच्या त्या प्रकाशचित्रांचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले होते. एकेदिवशी -“संध्याकाळी जरा वेळ ठेऊन घरी येऊ शकाल का?” असे विचारणारा सुनिताबाईंचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचे एक स्नेही व मुंबईतील प्रसिद्ध प्रकाशचित्रकारही येणार आहेत हे त्यांनी मला सांगितले. मला कल्पना आली की ही बैठक नक्कीच ‘फोटोंचा कॉपीराईट’ याविषयी असणार आहे. मी संध्याकाळी ‘मालती-माधव’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो.

मला कल्पना होती की माझा सुनिताबाईंशी सामना होता आणि त्यांच्या बरोबर एक विख्यात, प्रथितयश व्यक्ती होती. विषय अवघड, संवेदनशील होता. स्वामित्व हक्काचा ! सुनिताबाईंच्या मते, मी काढलेल्या भाईंच्या फोटोंमध्ये माझ्याबरोबरच भाईंचाही कॉपीराईट आहे/होता. चर्चा सुरू झाली. त्या त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या. मी त्यांना विचारले – “ तुम्ही फोटोग्राफी ही एक कला आहे असे मानता नां ?” त्यांचा अर्थातच होकार आला. मी म्हटले की, मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो. त्यांच्या उत्तरानंतर मला तुमचे स्वामित्वहक्काविषयीचे मत सांगा. मी साक्षात ‘सरस्वतीपुत्राच्या’ घरीच बसलेलो. त्यामुळे असेल पण मला शब्द सुचत होते, बोलण्याचे धैर्य आले होते. मी प्रसंग उभा करू लागलो.

मी : “ मुंबईची गिरगाव चौपाटी आहे. वेळ संध्याकाळची आहे. निसर्गाची सुंदर प्रकाशयोजना आहे. सूर्यास्त होत आहे. मी हे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात पकडले. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ प्रकाशचित्रकाराचा म्हणजे तुमचा कारण निसर्गाला कॉपीराईट कुठे आहे?”

मी : या प्रकाशचित्रात काहीतरी कमी आहे असे मला वाटले. विचार करताच लक्षात आले की, यात मानवी अस्तित्व यायला हवे. मी खूप भाग्यवान. मला तेवढ्यात तेथे पु. ल. फिरायला आले आहेत असे दिसले. मी फ्रेम पकडून बसलो. काही क्षणातच माझ्या फ्रेममध्ये भाई आले. सूर्यप्रकाश भाईंच्या पाठीमागून असल्याने ‘सिल्ह्युट’ प्रकारचा उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा आणि भाईंचा.”

मी : “बरं ! आता मी इतका भाग्यवान नाही की, तेथे माझ्यासाठी भाई फिरायला यावेत. पण मला फोटोत मानवी अस्तित्व हवेच होते. तेवढ्यात तेथे एक कचरा गोळा करणारी छोटी मुलगी आली. मला मानवी अस्तित्वाबरोबरच एक हालचालही मिळाली. पुन्हा मला एक उत्तम फोटो मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा ! कारण ती मुलगी कोणी सेलिब्रिटी नाही. पु. ल. हे सेलिब्रिटी आहेत.”

मी : “ सुनीताबाई, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ती लहान-थोर जाणत नाही. तिच्यापुढे सर्वांना समान न्याय आहे.”

माझा चौथा प्रश्न बाकी होता. समोर बसलेली विख्यात, प्रथितयश व्यक्ती माझ्या धाडसाने चकित झाली होती.

मी : “ मी फिल्मच्या छोट्याशा तुकड्यावर अभिव्यक्त होतो. तुम्ही लेखक लोक बुद्धी, पेन व कागद यांच्या साहाय्याने अभिव्यक्त होता. मी एखाद्याचा फोटो काढला तर त्याला व्यक्तीचित्र म्हणतात , तसेच तुम्ही एखाद्याबद्दल लिहिलेत तर त्यालाही व्यक्तीचित्रच म्हणतात. मग मला आता सांगा की ‘औक्षवंत हो मुली’ या लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्तीचित्रावर भाईंचा व लता मंगेशकर यांचा कॉपीराईट हवा. कारण लता मंगेशकरही सेलिब्रिटी आहेत. मग तशी काही नोंद त्या पुस्तकात आहे का?”

माझ्या या चौथ्या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केलं. त्याचं कोणतंच उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. माझ्या युक्तिवादाने मी सुनीताबाईंना माझा मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झालो होतो. ते ही कोणतीही कटूता न आणता. अर्थात या विषयाला अनेक कायदेशीर पैलू आहेत आणि तो मोठा विषय होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण सुनीताबाई आणि माझ्यातला हलकासा असलेला ताणही दूर झाला होता. त्यांनी खिलाडूपणे माझा कॉपीराईट मान्य केला होता. त्यांनी मला परत एकदा कॅलेंडरसाठी प्रचंड मदत केली. त्या नोव्हेंबर महिन्यात भाईंच्या जन्मदिनी ‘ आनंदयात्री पु. ल.’ हे कॅलेंडर प्रकाशित झालं. सुनीताबाई ते सर्वार्थाने निर्दोष कॅलेंडर पाहून हरखून गेल्या.


मी वरचेवर त्यांच्याकडे जात राहिलो. २००० साली माझ्याकडे पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आला. बदलत्या तंत्रज्ञानाने ही नवी गंगा आणली होती. कधी-कधी या विषयी त्या बोलत–विचारत. एकदा चांगली संधी साधून मी त्यांना विचारले की – “ सुनीताबाई, मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी करू या?” यावर त्यांचे उत्तर होते की- “ मला फ्लॅशचा त्रास होतो.” मी म्हणालो – “ पण मी तर फ्लॅश न वापरता फोटो काढीन.” यावर त्यांची पळवाट होती की - “माझे फोटो चांगले येत नाहीत.” मीही हट्टी मुलासारखा म्हणालो – “ आता डिजिटल कॅमेरा आहे. त्याच्या डिस्प्लेवर लगेचच आपल्याला फोटो बघायला मिळतो. मी तो तुम्हाला दाखवीन. तो जर तुम्हाला आवडला नाही तर आपण डिलीट करून टाकू.” यावर लगेचच त्यांनी उत्तर दिले की – “ मी हल्ली घरी साडी नेसत नाही. गाऊन घालते. म्हणून नको.” यावर मी निरुत्तर झालो. पण मनातला विचार काही लोपला नाही. पुढे काही वर्षे गेली. आणि २००८ च्या जुलै महिन्यात त्यांना जी. ए. कुलकर्णी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मला खूप आनंद झाला. आनंद दोन गोष्टींसाठी एक म्हणजे पुरस्कार मिळाल्याचा आणि दुसरं म्हणजे तो घेण्यासाठी का होईना सुनीताबाई सर्वांना सामोरं जाणार म्हणून. मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आणि म्हणालो – “ सुनीताबाई, पुरस्कार घेण्यासाठी आता तुम्ही साडी नेसणार असाल नां ? पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यावर आता आपण फोटोसेशन करू शकतो की.” माझा हट्ट त्यांनी बेसावध क्षणी का होईना मान्य केला.

१० जुलै २००८ रोजी सकाळी मी त्यांच्या घरी पोहोचलो. पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला होता. मंडळी निवांत झाली होती. त्यांचा भाचा डॉ. दिनेश ठाकूर, त्यांची पत्नी सौ. ज्योती, बंधू डॉ. श्रद्धानंद ठाकूर, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, डॉ. शिरीष प्रयाग, बापू कांचन आदी सुहृद गप्पांमध्ये रंगले होते. कोणीतरी त्यांना काही ओळी लिहून पाठवल्या होत्या. त्यात लिहिलं होतं – “ सुनीताबाई, आज तुमच्या सन्मानासाठी आम्हीच आम्हाला मिरवले आहे. कारण तुम्ही आहात हीच आमची श्रीमंती आहे. अशी एखादी व्यक्ती असते, की जी केवळ जीवनमूल्यांच्या आधारानं जगू पाहते. ही गोष्टच आम्हाला धीर देणारी आहे. तुमचं पुस्तक ‘आहे मनोहर तरी..’ वाचलं तेव्हा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा झाली. आणि एक व्यक्ती – कणखर, स्वयंसिद्ध व्यक्ती म्हणून कितीतरी बायकांना आणि पुरुषांनाही खूप दिलासा मिळाला.” जणूकाही तेथे आलेल्या प्रत्येकाचे मन हेच तर सांगत होते.

आधीच उत्तम ‘स्कीन कॉम्प्लेक्शन’ असलेल्या सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरचे हसू जास्तच स्निग्ध झाले होते. मी काही अनौपचारिक असे क्षण कॅमेराबद्ध केले. पूर्वेकडच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा एकमेव स्त्रोत. उत्सवमूर्तीला काही सूचना करता येतील अशी परिस्थिती नव्हती. त्या जेथे बसल्या होत्या त्याच ठिकाणी मला फोटो घेणे गरजेचे होते. मी कॅमेऱ्यावर टेली लेन्स लावली. त्यांच्या नकळत मी फोटोसेशन सुरूही केला होता. त्यांचे हावभाव, त्यांची नजर, त्यांचे हसू, हळूहळू एक एक फ्रेम ! पंधरा मिनिटात माझं काम झालं होतं. बऱ्याच वर्षांची माझी इच्छा फलद्रूप झाली होती.

मी त्या फोटोंचे एडिटिंग केले. परत एकदा त्यांना फोन केला. माझ्या लॅपटॉपवर मी त्यांना ते एडीट केलेले सर्व फोटो दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू पसरले. त्यांच्या नकळत टिपलेल्या त्या भावमुद्रा पाहताना त्यांना परत एकदा त्या आनंदसोहळ्याचा अनुभव आला असेल का? चेहरा तर ते सांगत होता. मला आवडलेली खळाळून हसतानाची त्यांची भावमुद्रा त्यांनाही खूप आवडली. मग त्यांच्या डोळ्यांत पाणी का दाटून आले असेल? काहीच न बोलता त्या उठल्या. वॉकरला धरून हळूहळू चालत आत गेल्या. काही वेळात परत बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या हातात चार कॅसेट्स होत्या. पुलंच्या कॅसेट्सचा संग्रह होता तो. “ तुम्ही खूप छान फोटो काढलेत माझे” असं म्हणत माझ्या जवळ येत त्यांनी तो संग्रह मला दिला. माझ्यासाठी अमूल्य भेट होती ती.

नंतर परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही ! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षानी पुरस्काराच्यावेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या गरजा किती कमी असाव्या याचा तो साक्षात्कार होता. पुलंसारख्या प्रतिभावान, सर्व गुण संपन्न व्यक्तीची पत्नी – गृहिणी, सखी व सचिव अशा रूपांत वावरताना हा साधेपणा जास्तच उजळून आला होता. जणू संत तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जोडोनियां धन, उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी’ हेच साऱ्या आयुष्याचे ब्रीद या साधेपणातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या या भूतलावर आल्या असाव्या.


सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
https://www.facebook.com/sateesh.paknikar

Friday, November 15, 2019

जेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...

आकाशवाणीमध्ये काम करत असताना पुलंनी लंडनमध्ये BBCचं प्रॉडक्शन ट्रेनिंग घेतलं होतं. त्याबद्दल त्यांनी 'अपूर्वाई' या पुस्तकात लिहिलेले हे अनुभव तुम्हाला वेगळ्याच काळात घेऊन जातील

एडिन्बराहून निघाल्यानंतर पुढला मुक्काम खुद्द लंडन शहरातच दोनतीन महिने पडणार होता. त्यामुळे काँपेन गार्डन्समधल्या ज्युअरबाईच्या घरात आम्ही चक्क बिऱ्हाड थाटले. यापुढे माझा टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम BBCच्या शाळेत सुरू होणार होता. आतापर्यंत मी टेलिव्हिजनवर पुष्कळ कार्यक्रम पाहिले होते. आता प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन कामाला सुरुवात होणार होती.

रेडिओचे हे धाकटे भावंड कानामागून येऊन भलतेच तिखट झाले आहे. रेडिओची रवानगी आता सैपाकघरात झाली आहे. आधीच इंग्रजीला घरकोंबडेपणा मानवतो. त्यात त्याच्या खुराड्यात ही नवी करमणूक आली. त्यामुळे तासनतास हे कार्यक्रम पाहत बसणारी कुटुंबे निर्माण झाली. कुणी म्हणतात की ह्या यंत्राने सामाजिक जीवनावर आघात केला. कुणा म्हणतात, चित्रपटगृहे ओस पडली. कुणाचे मत, नाटकवाले मेले. मला मात्र तसे वाटत नाही. कारण करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांना तितकीच गर्दी असते.

शंभर वर्षांपूर्वींची लिफ्ट
आमची शाळा तुसॉदबाईंच्या मेणाच्या प्रदर्शनापुढल्या गल्लीतच होती. BBCचे 'स्टाफ ट्रेनिंग स्कूल' एका जुनाट तिमजली इमारतीत आहे. पहिल्या दिवशी इमारतीतली लिफ्ट पाहून मी थक्क झालो. शंभर वर्षांपूर्वी बसवलेली ही लिफ्ट लोखंडी दोरखंड ओढून वर न्यावी लागते. विसाव्या शतकात महाराणी विक्तूरियाच्या आमदानीतला हा पाळणा अजून वापरात ठेवण्याचा पुराणमताभिमान इंग्रजच बाळगू जाणे.

वर्गाचे स्वरूप अगदी एखाद्या शाळेतल्या वर्गाप्रमाणे होते. छोटीछोटी मेजे आणि पुढे मास्तरांचे टेबल, फळा, खडू, नकाशे अगदी यथासांग होते. टेबलावर छडी तेवढी नव्हती. आम्ही अठरावीस विद्यार्थी होतो. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत शाळा चालत असे. त्यानंतर प्रत्यक्ष स्टुडिओतील शिक्षण. इथली शिस्त, नियमितपणा, टापटीप पाहून आपण गारठतो.

टेलिव्हिजनच्या शास्त्रातले अनुभवी पंडित आम्हाला धडे देत - सक्तीने गिरवून घेत. सुमारे अडीच महिन्यांत हे सारे शिक्षण इतक्या पद्धतशीरपणे देण्यात आले की, आमच्यापैकी प्रत्येकजण ज्या वेळी आपापले प्रॉडक्शन करण्यासाठी तयार झाला, त्या वेळी BBCच्या टेलिव्हिजनमधला खिळा न् खिळा आमच्या परिचयाचा झाला होता. प्रत्येक शिक्षक शंकासमाधान करायला तत्पर असे.

उत्तरं देण्यासाठी मुदत
अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी शिक्षक मुदत मागून घेत आणि स्वत: पुस्तके चाळून त्यातले उतारे नोंदवून घेऊन उत्तरे देत. सर्वज्ञतेचा आव कुणी आणला नाही. BBCचा व्याप प्रचंड आहे. त्यातून टेलिव्हिजन हे तर जगड्व्याळ काम. हजारो माणसे इथे घड्याळाच्या काट्याप्रमाणे राबत असतात. पण ह्या सर्वांत मला जर खरोखर कुणाचे कौतुक वाटले असेल तर सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या पोरींचे! ह्या चलाख पोरी टणाटण उड्या मारीत हसऱ्या चेहऱ्याने कामाचे भारे उचलीत असतात.

प्रत्येक प्रोड्युसरला सेक्रेटरी असते. ह्या इतक्या तरबेज असतात की, कधी कधी प्रोड्युसरच्या गैरहजेरीत प्रॉडक्शनचेदेखील काम त्या करू शकतात. BBCच काय, परंतु पाश्चात्य देशांतल्या साऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ह्या सेक्रेटरी म्हणून राबणाऱ्या पोरी जणू रक्तवाहिन्या आहेत!

पहिल्याच दिवशी मला काही महत्त्वाची पत्रे टाईप करून घ्यायची होती. मी घरून पत्रे लिहून नेली आणि सकाळी टाईप करायला दिली. पंधरा मिनिटांत सहीला पत्रे आली. माझा विश्वास बसेना. आमच्याकडे सामान्यत: दोनतीन दिवसांनी टंकलेखकाला दहा वेळा ढोसल्यानंतर पत्र टाईपराईटवरवर चढायचे!
स्वावलंबी साहेब

दुसऱ्या दिवशी एका गोष्टीने मला असाच धक्का दिला. परदेशांतल्या हपिसांतून चपराशी कधीच आढळले नाहीत. कागदांची हालचाल दर अर्ध्या तासाने मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते व बाकीची कामे साहेब स्वत: उठून करतात. टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलवण्याची चैन परदेशांत नाही.

एवढेच काय, पण मोठ्यांतल्या मोठ्या साहेबालादेखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वत: उठून सार्वजनिक उपाहारगृहात जावे लागते. चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यांतून हिंडणारे 'बैरे' इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत. साहेबांची घरची कामे करणे हा आपल्याकडच्या चपराशांचा मुख्य व्यवसाय. त्यातून वेळ उरलाच तर फायली हलायच्या.

सकाळी सव्वाअकराला कॉफीची सुटी व्हायची. सव्वाअकरा वाजता उभे इंग्लंड कॉफी पिते. एक वाजता जेवते. चार वाजता चहा पिते. रात्री साताला पुन्हा जेवते आणि नऊ ते अकरा स्वत:ची करमणूक करून घेते. अकरा वाजता चिडीचूप करून झोपी जाते.

सारे जीवन आगगाडीच्या वेळापत्रकासारखे! बहुतेक हॉटेलेदेखील ठराविक वेळी उघडझाप करतात, भलत्या वेळी चहा प्यायचे म्हटले तर चहा मिळायचा नाही. दुपारी तीन वाजता भुकेने कळवळून हॉटेलच्या दाराशी कुणी पडला तरी दार उघडायचे नाही. मोठा अजब लोकांचा देश! अवेळी खाणाऱ्यांनी सहा सहा पेनी यंत्राच्या फटीत कोंबत चॉकलेटे खावीत, कागदी पेल्यांतून कॉफी प्यावी. वर्गात व्याख्यानाच्या रंगात आलेला वक्तादेखील सव्वाअकरा वाजले की विषय दहा सेकंदात गुंडाळून कॉफीला पळायचा!

अपॉइंटमेंटसाठी शतपावली
BBC सारख्या संस्थांचे यश नियमितपणात आहे. दोन वाजता नाटकाची तालीम सुरू म्हणजे सुरू. अडचण आलीच तर टेलिफोनवरून नटाचा किंवा नटीचा निरोप यायचा! वर्गात यायला एका मिनिटाने उशीर करणारा विद्यार्थी (वय वर्षे सामान्यत: चाळीसच्या आसपास) चौथी पाचवीतल्या पोरासारखा अपराधी चेहरा करून माफी मागत वर्गात शिरायचा! मी तर एखाद्याची साताची अपॉइंटमेंट असली तर साडेसहापासून त्याच्या दारापुढल्या फुटपाथवर शतपावली करीत हिंडत असे. नियमितपणा मुख्यत: दुसऱ्या माणसाच्या वेळेला किंमत देण्यातून येतो.

पाश्चात्त्य देशांत मनुष्यबळ कमी. युद्धाने प्रचंड नरबळी घेतले. त्यामुळे माणसाला विलक्षण भाव आला आहे. यंत्राचा उपयोग अत्यंत अपरिहार्य आहे. बोलण्यात नेहमी हॉर्स पॉवरसारखा 'मॅन अवर्स' हा शब्दप्रयोग येतो. टेलिव्हिजनच्या कोणत्याही एका कार्यक्रमाला किती 'मॅन अवर्स' लागतात ह्याची गणिते असतात आणि त्यावर खर्च मोजला जातो.

टेलिव्हिजनच्या शाळेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत पंधरा पंधरा, वीस वीस वर्षे काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळात गणवेष चढवून रणांगणावर कामगिरी बजवाली होती. त्यातले दोघेतिघे हिंदुस्तानातही आले होते. या युद्धाने त्यांना खूप गोष्टी शिकवल्या.

अर्थात वर्गात मास्तरांची चित्रे काढणे, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणे हेदेखील चालायचे. ह्या शिक्षकांतदेखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक एक तज्ज्ञ असे. मी एकूण पन्नाससाठ व्याख्याने ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचे मला कौतुक वाटे! टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषयदेखील गमतीदार चुटके सांगत सांगत चालायचा.

इंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसालादेखील आपण हशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या झिरमिळ्या निसटून खाली पडतील, अशी भीती वाटत नाही. बीबीसीतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हांला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला धक्का बसेल हे भय त्यांना नाही. त्याउलट देशी साहेबांचे काडेचिराइती चेहरे जिज्ञासूंनी आठवावे!

गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग
अनेक अभिवादने, हस्तांदोलने - गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक यू, बेग युवर पार्डन, असल्या शब्दप्रयोगांनी यांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणालादेखील स्निग्धता येते. वरिष्ठांतल्या वरिष्ठाला कनिष्ठांतल्या कनिष्ठाने अभिवादन केले तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एकजण मुजरा करतो आणि दुसरा त्या दिशेला ढुंकून न पाहता जातो. जसजसा माणूस हुद्द्याने मोठा होत जातो तसतशी ही पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो, हा एतद्देशीय अनुभव आहे!

तिथे आमचा लिफ्टमनदेखील तो दोरखंड ओढता ओढता शीळ घालून गाणे म्हणायचा! तिसऱ्याचौथ्या दिवसापासून त्याने मला 'पी.एल.' म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब समज देऊ. मला वाटते, लोकशाहीदेखील रक्तात मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोण जाणे. एकमेकांना मानाने वागवणे हेच कुठल्याही संस्कृतीचे बीज आहे.

(पु. ल. देशपांडे यांचा हा लेख 'अपूर्वाई' या पुस्तकातून साभार. या पुस्तकाचे सर्व हक्क श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे - 30 यांच्याकडे आहेत.)

बीबीसी मराठी
१२ जून २०१८

Thursday, November 14, 2019

आमचे भाई आजोबा ! - आशुतोष ठाकूर

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त त्यांचा नातू आशुतोष ठाकूर यांनी भाई आजोबांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

भाई आजोबांनी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठीही प्रयत्न केले. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली...

मी सतरा वर्षांचा होतो, त्या वेळची म्हणजे २००९ मधील गोष्ट. अमेरिकेतील महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मला निबंध लिहून द्यायचा होता. विषय होता तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती. त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यावर नेमका काय प्रभाव पडला, हे लिहिणे अपेक्षित होते. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत सोपा निबंध होता. मराठीतील एक महान लेखक पु. ल. देशपांडे हे माझे आजोबा. सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो आणि त्यातून समाजाच्या प्रगतीच्या वाटा अधिक मजबूत होत असतात, ही बाब आजोबांच्या सहवासातून मला शिकायला मिळाली. अगदी लहान वयात ज्या वेळी इतर मुलांना पोलिस किंवा अशाच प्रकारचे काही तरी व्हावे असे वाटत असताना मी मात्र माझ्या आजोबांच्या पावलांवरून पाऊल टाकण्याचा निश्‍चय केला होता. पुलं हे साहित्य, नाटक, संगीत, वक्तृत्व आणि इतर कलांच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच त्यांनी समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. पुलंची उंची गाठणे आपल्याला शक्‍य नाही हे मला अगदी सुरवातीलाच उमगले होते. मात्र त्यांचे आयुष्य आणि अनुभवांतून मी बरेच काही शिकलो.

कुटुंबातील सर्वांत मोठा मुलगा असलेल्या पुलंवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वेगवेगळ्या कला आणि संगीतातील गती हाच घरातून मिळालेला वारसा होता. त्याच्या आधारे पुलंनी आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला. पुढे त्यांना ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ हा बहुमान प्राप्त झाला, तोही याच कला-कौशल्यांच्या बळावर. आयुष्यातील संघर्षामुळे पुलंना अगदी सुरवातीलाच शिक्षणाचे महत्त्व समजले होते. शिक्षण हेच पालकांनी आपल्याला दिलेली सर्वांत मोठी भेट असते आणि शिक्षणाच्या बळावर आपली स्वप्ने साकारत भविष्याला आकार देता येऊ शकतो, हे मी पुलंचा प्रवास पाहून शिकलो. भाई आजोबा केलेले कुठलेही काम असो, त्याची आजच्या तरुण पिढीलाही भुरळ पडतो. साहित्य, अभिनय, वक्ते, संगीतकार, गायक, चित्रपट दिग्दर्शक आणि कवी अशा सर्वच क्षेत्रांत पुलंनी मुशाफिरी करत, एकापेक्षा एक महान कलाकृतींची निर्मिती केली. आयुष्यभर अनेक मानसन्मान लाभलेले पुलं अखेरच्या क्षणापर्यंत त्याच उत्साहाने, समरसतेने काम करीत होते. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण मला भाई आजोबांकडून मिळाली. त्यांनी मोठी संपत्ती कमावली होती, त्यामुळे त्यांनी ठरविले असते तर ते अतिशय सुखासीन आयुष्य जगू शकले असते. मात्र अखेरपर्यंत साधे आयुष्य जगून आपल्या संपत्तीमधील मोठा भाग त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊन टाकला. चांगले आयुष्य जगण्यासाठी भौतिक सुखांची रेलचेल आवश्‍यक नसते. त्यासाठी हवी असते इतरांच्या मदतीची आस असलेले संवेदनशील हृदय आणि नवनव्या कल्पनांनी भरलेले कलात्मक मन. हे भाई आजोबांकडे पाहूनच मी शिकलो.

समोरच्या व्यक्तींमधील सकारात्मक गुण फक्त पुलंना दिसत असत. इतरांच्या गुणांचे, कौशल्याचे कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्या अंगी ठायी ठायी भरलेला होता. समोरच्यात दडलेला एखादा गुण दिसला, की पुलं त्याला हमखास सांगणार म्हणजे सांगणारच. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक मोठे कलाकार उजेडात आले. प्रत्येक व्यक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यामुळे इतरांमध्ये दडलेल्या गुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या व्यक्तीला बळ मिळते, हा त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला प्रचंड भावला.

या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा मोठा सहवास मिळण्याचे भाग्य मला लाभले. मला तबल्याची ओळख त्यांनीच करून दिली. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला भारतातील अनेक मोठे संगीतकार, अभिनेते, वक्ते आणि कवींचा सहवास लाभला. भारतीय संगीत आणि संस्कृतीमधील माझी रुची त्यांच्यामुळेच वाढली. त्याचबरोबर पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विज्ञानाचे महत्त्वही त्यांनी मला समजावून सांगितले. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि समाजाला घडविण्यासाठी चांगल्या सांस्कृतिक नेतृत्वाची फार आवश्‍यकता असते, हे मला भाई आजोबांमुळेच समजले.

शेतकरी लोकांची भूक भागवतो, डॉक्‍टर त्यांना बरे करतो, लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र लोकांना हसविण्याची, त्यांचे मनोरंजन करण्याची आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढविण्याचे जन्मजात कौशल्य फार थोड्या जणांकडे असते...
‘जीवन त्यांना कळले हो....’

आता या दहा वर्षांनंतर मला वाटणारा भाई आजोबा आणि माई आज्जी (सुनीता देशपांडे) यांच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतो आहे. मी अवघा आठ वर्षांचा होतो, त्या वेळी भाई आजोबा जग सोडून गेले. माझ्या आजोबांमुळेच मला भीम काका (भीमसेन जोशी) यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराचे प्रेम मिळाले. पैसे नसताना लहानपणी संगीत शिकण्यासाठी केलेली धडपड आणि विनातिकीट केलेला प्रवास आणि तिकीट तपासनीसाने पकडल्यानंतर गाणे गाऊन करून घेतलेली सुटका अशा अनेक गोष्टी भीम काका मला सांगत. ते मला दोस्त म्हणूनही हाक मारत. तबला आणि संगीत शिकण्याच्या माझ्या प्रवासात सत्यशील देशपांडे काका, प्रभाकर कारेकर काका, शंकर अभ्यंकर काका आणि गुरुजी सुरेश तळवलकर अशा अनेक मोठ्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून मला लहान असताना मिळालेले प्रेम आजही कायम आहे. ही सारी भाई आजोबा आणि माई आजी यांची पुण्याई आहे.

कुमारगंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बेगम अख्तर अशा अनेकांबरोबरच्या त्यांच्या मैफिलींच्या आठवणी ऐकण्याची संधी मला आणि माझ्या कुटुंबीयांना भाई आजोबांमुळे मिळाली. आपली भाषणे आणि साहित्यातून लोकांना एकत्र आणण्याची हातोटी पुलंकडे होती. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचे नैसर्गिक कौशल्य त्यांच्याकडे होते. भाई आजोबा हे मैफिलीत रमणारे माणूस होते.

त्यांच्याभोवती सदैव त्यांच्या ‘गॅंग’ची उपस्थिती असायची. मग त्यात साहित्य, नाटक, संगीत अशा सर्वच क्षेत्रांतील बड्या मंडळींचा समावेश असायचा. आयुष्य ही एक मैफील आहे, असे समजूनच पुलं जगले. कुठल्याही मैफिलीत रंग भरण्याचे कसब हे तर पुलंचे वैशिष्ट्य होते. भाई आजोबांनी त्यांच्या पुस्तकांतून, रेखाटनांमधून, नाटकांतून अनेक काल्पनिक पात्रे रंगविली, जिवंत केली. या पात्रांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशावर अमिट ठसा उमटलेला तुम्हाला दिसून येईल. पुलंचा विनोद हा नेहमीच वरच्या दर्जाचा असायचा. त्यांनी कधीही सामान्य दर्जाचा किंवा कमरेच्या खालील विनोदाला स्थान दिले नाही. स्वतःवरच हसता येते आणि अशा पद्धतीने हसता हसता स्वतःबद्दल शिकताही येते, हे पुलंनी आपल्या विनोदातून दाखवून दिले.

आपणच आपला आत्मशोध घेऊ शकतो, फक्त त्याला विनोदाची जोड दिली, की ही प्रक्रिया अतिशय आनंददायी बनते हे भाई आजोबांनी समाजाला आपल्या पद्धतीने समजावले. त्यांच्या साहित्यात बदलत्या कालखंडाचे प्रभावी चित्रण आहे. बदलत्या काळात जगलेल्या माणसांच्या कथा त्यांनी आपल्या साहित्यातून समोर आणल्या आहेत. विनोद आणि उपहासाचा आधार घेत तो काळ, त्या काळातील व्यक्तिमत्त्वे, संस्कृती आणि कलेचा पट आपल्या कलाकृतींमधून मांडला आहे. जुन्या काळातील अनेक गोष्टी मला भाई आजोबांच्या साहित्यामुळे कळू शकल्या. लिहिलेले शब्द आणि भाषेची शक्तीही मला भाई आजोबांमुळेच समजली. पुलं हे संगीतकार होते आणि अतिशय प्रभावीपणे आपली कला लोकांसमोर सादर करण्याचा गुणही त्यांच्याकडे होता. सहजता हा मला त्यांच्यातील कलाकारामध्ये असलेला सर्वांत मोठा गुण वाटत आलेला आहे. भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशा एकाहून एक सरस कलाकारांबरोबर पुलंनी काम केले आहे. समोर कितीही मोठा कलावंत असो, आपली छाप कार्यक्रमावर टाकणार नाहीत, ते पुलं कसले? मोठा कलावंत तयारी आणि रियाज यांच्या पलीकडे जात उपजेने आपली कला सादर करतो.

भाई आजोबा हे चार्ली चॅपलीनचे मोठे चाहते होते. चॅपलीनच्या ‘ग्रेट डिक्‍टेटर’ या प्रसिद्ध चित्रपटातील अखेरचे भाषण हे पुलंचे सर्वांत आवडते भाषण होते. ‘या दुनियेत प्रत्येकाला श्रीमंत करणारे खूप आहेत. त्यामुळे इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा सारेजण आनंदाने जगू...’ या आशयाचे चॅपलीनचे शब्द पुलं हे अक्षरशः जगले, असे मला वाटते. इतरांवर हसण्याऐवजी स्वतःवर हसायला पुलंनी आपल्याला शिकविले. आयुष्य हे मुक्त आणि सुंदर आहे, हेच त्यांनी आपली कला, संगीत आदींमधून दाखवून दिले. ‘जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...’ हे बोरकरांचे शब्द भाई आजोबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरतात!

(पुलंच्या नातवाने मूळ इंग्रजीत लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश)
(अनुवाद - अशोक जावळे)
सकाळ
८ नोव्हेंबर २०१९

मुळ इंग्रजी लेख --> https://www.facebook.com/ashutosh.thakur.94/posts/3130511813688527

Monday, November 11, 2019

मला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.

आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?

अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.

तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?

युगानुयुगे माणसाला तारुण्यात जी आकर्षणं वाटत आली आहेत, तीच होती. पण आकर्षण सांगण्यापूर्वी तो काळ कसा होता, ते सांगायला हवं. तारुण्यातला स्वप्नरंजनाचा काळ. प्राप्त परिस्थितीविरुद्ध बंडखोरीनं उसळून येण्याचा काळ. भोवतालचं वातावरण विलक्षण विसंवादी. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीत कुटुंबात भांडणं मतभेद, डोक्‍यात राख घालणं असले प्रकार. आपण जिवंत असताना पोराने मिश्‍या काढल्या म्हणून त्याला घराबाहेर घालवून देण्याचा कर्मठ मूर्खपणा होता. कॉलेजमध्येच, काय पण हायस्कूलमध्येसुद्धा मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं हा गुन्हा होता. साक्षात भाऊ आणि बहीण एका शाळेत शिकत असतील, तिथे परस्परांशी ओळख सुद्धा दाखवायची नाही. असा दंडक आपली मुलं विचारांचे इंद्रिय बंद करून परंपरेच्या चौकटीतून आसपास जाऊ नयेत याची खबरदारी म्हणजे मुलांना वळणं ही पालकांच्या मनाची पक्की धारणा. हा धाक किती भयंकर होता याची आजच्या तरुणपिढीला कल्पना येणार नाही.

कुटुंबात बाप म्हणजे "हुकूमशहा' त्याला जाब विचारायची कुणाची टाप नसे. मुलींची अवस्था तर कमालीची केविलवाणी होती. आमच्या लहानपणी बायका नऊवारी लुगडी नेसायच्या. वयात आलेल्या मुली परकर-पोलक्‍यातून नऊवारीत शिरायच्या. त्या काळी नऊवारीऐवजी पाचवारी साडी नेसायचा काही बंडखोर महिलांनी प्रयत्न केला, तर या गोल साडीने संसाराचे वाटोळे केले, अशा प्रकारच्या आरोळ्या उठल्या होत्या. मुलींना आईवडिलांची आणि त्यांच्या पिढीच्या आप्तेष्टांची बोलणी खावी लागत होती. त्या अवस्थेपासून जीन्सपर्यंतच्या तरुणी पाहिल्या, की त्यावेळचा "सकच्छ की विकच्छ' हा वर्तमानपत्रे, मासिके, चर्चा ह्यांतून गाजलेला वाद मला आठवतो.

परंपरा, घराण्याची इभ्रत वगैरे कल्पना किती क्षुद्र गोष्टींवर आधारलेल्या होत्या याची कल्पना आजच्या तरुण पिढीला येणार नाही. आजही "खानदान की इज्जत'चा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. तरुणपिढीचं भांडण मुख्यतः वडील पिढीच्या असल्या मतांविरुद्ध होतं. ते कुटुंबाच्या परिघातले होते. अशा काळात आपल्या देशात एक अभूतपूर्व घटना घडली, ती म्हणजे महात्मा गांधींचा उदय. महाराष्ट्रापुरतं बोलायचे म्हणजे सुशिक्षित मराठी माणसाला लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही प्रतिज्ञा दिली होती. लोकमान्यांचं निधन झालं आणि महात्माजींचा उदय झाला. स्वराज्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचायला लागली.

समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असं वाटणाऱ्या तरुणांना गांधीजींनी निरनिराळ्या प्रकारच्या विधायक कार्यात ओढून घेतलं. तरुण पिढीपुढे एक निराळं आकर्षण उभं राहिलं. मुलामुलींनी एकत्र येणं, गप्पा मारणं, एकत्र खेळणं, आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात एखादं भावगीत म्हणणं हे अब्रण्यम्‌ होतं. देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्याबरोबर हजारो तरुणी पुढे आल्या आणि त्यांनीही स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. इंग्रज सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. स्वराज्याला पर्याय नाही अशा भावनेने तरुणपिढी राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊन लागली. रोजच्या चर्चेत सिनेमा नटनटींच्या ऐवजी गांधी, नेहरू, सरदार पटेल ही नावं ऐकू यायला लागली. बेचाळीसची चळवळ तर अनेक दृष्टींनी युवकांची चळवळ ठरली. गांधी, नेहरू, पटेलांची थोरवी मान्य करूनही अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, अरुणा असफअली, युसुफ मेहेरअली ही जवळजवळ समवयस्क वाटावी अशी मंडळी अधिक जवळची वाटायला लागली.

तरुण मनाला भूल पाडावी असं त्यांची देखणेपण होतं. तासन्‌तास ऐकत राहावं आणि पाहत राहावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. मनात आणलं असतं तर सरकारी नोकरीत उच्च स्थानावर बसून ऐषआरामात राहाता आलं असतं. सुबक संसार करता आला असता. आय.सी.एस. होणं ही परतंत्र भारतातल्या सुशिक्षितांची एकमेव महत्त्वाकांक्षा होती. आय.सी.एस.मध्ये निवड होऊनही त्या नोकरीला स्वातंत्र्याच्या चळवळीत पडण्यासाठी लाथ मारणाऱ्या सुभाषचंद्र बोसांनी तरुणांपुढे त्यागाचा नवा आदर्श उभा केला होता. सर्व राष्ट्रप्रेमी जनतेत असंतोष खदखदत होता. तरुणपिढी युद्धाला सज्ज झाली होती. रणशिंग केव्हा फुंकलं जाणार याची जणू काय वाट पाहात होती. अशा वेळी महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत सोडून चालते व्हा' असं हजारो लोकांच्या सभेत बजावून सांगितलं आणि तरुणांना "करा किंवा मरा' हा महान मंत्र दिला. त्या मंत्राने तरुणच काय; पण मध्यमवयीन वृद्ध सगळेच भारले गेले आणि लहानांच्या वानरसेनेपासून ते वृद्धांच्या पेन्शनरसेनेपर्यंत सारा भारतीय समाज आपल्या कुवतीप्रमाणे चळवळीत भाग घेऊ लागला.

"कॉलेज स्टुडंट' नावाचा बूट-सूट वापरून साहेबी ऐट मिरवणारा तत्कालीन पिढीतला लोकप्रिय नमुना आता सिनेमातला "हिरो होण्याऐवजी गांधीजींच्या चळवळीतला सत्याग्रही होण्यात धन्यता मानू लागला. केशभूषा आणि वेषभूषा यांचं स्थान गौण ठरलं. पोलिसांच्या लाठीमाराने कपाळावर झालेल्या जखमेला बांधलेल्या बॅण्डेजला तरुण-तरुणींच्या मनात विलायती हॅटपेक्षा शतपट अधिक महत्त्व आलं.

फ्रेंच लिनन्‌ आणि डबल घोडा सिल्क शर्टिंगऐवजी अंगावर जाडीभरडी खादी आली. कट्ट्यावर जमणारे तरुण स्टडी सर्कल्समध्ये गांधीवाद, मार्क्‍सवाद म्हणजे काय ते जाणून घ्यायला एकत्र जमू लागले. परंपरावादी कुटुंबप्रमुखाची भीती नाहीशी होत चालली. अर्थात निसर्ग आपलं काम चालू ठेवतच होता. स्टडी सर्कल्समध्ये एकत्र जमणाऱ्या तरुणतरुणींचे परस्परांबद्दलचं आकर्षण कमी झालं नव्हतं. सिनेमा, प्रेम, कविता यांचं आकर्षण टिकून होतं. पण स्वतंत्र्यांच्या चळवळीत तरुण मनं अधिक झपाटली गेली होती.

जे तरुण प्रत्यक्ष भूमिगत चळवळीत भाग घेऊ शकत नव्हते. ते आपल्या कडून झेपेल तितका हातभार लावत होते. चळवळीतल्या काळातला हा नवा नायक ना. सी. फडक्‍यांनासुद्धा आपल्या कादंबरीत आणावा असं वाटलं आणि "प्रवासी'तला देशभक्त नायकक त्यांनी स्वतःच्या साहित्यात आणला.

आई-वडील रागवायचे का? मारायचे का?

आईवडिलांकडून मार खाल्ल्याचं मला स्मरत नाही. वडील तर मुलांना मारण्याच्या अतिशय विरुद्ध होते. आपला एखादा वडील स्नेही असावं, तसं आम्ही भावंडांचं नातं होतं. आम्हाला लहानपणी कधी भारी कपडे मिळाले नाहीत. मॅट्रिक पास होऊन कॉलोजात जाईपर्यंत हाफ प्यांट आणि त्यात खोचलेला हाफ शर्ट हीच माझी आणि माझ्या शाळासोबत्यांची "ड्रेपरी' असे शाळेत गणवेष नव्हता. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः अशा जातीचं मद्रास मिलचं एक टिकाऊ कापड बाजारात यायचं. त्या "अ' फाट कापडाच्या अर्ध्या तुमानी दोन-दोन वर्ष टिकायच्या पोशाखाबिशाखाच्या बाबतीत जरी आमचे लाड पुरवले नाहीत, तरी माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला वेळेवेळी पुस्तकं आणून दिली. त्यांची फिरतीची नोकरी होती. प्रवास संपवून घरी येताना आम्हा भावंडांसाठी खाऊ आणि पुस्तक घेऊन येत.

अशाच एका प्रवासावरून परतताना त्यांचा मुक्काम पुण्यात होता. तिथून त्यांनी मेहेंदळ्यांच्या दुकानातून बाजाची पेटी आणली होती. बावीस रुपयांची ती पेटी होती. मुलांच्या संगीताच्या, लेखन, वाचनातल्या आवडीला प्रोत्साहन देणारे वडील मला लाभले. त्यांच्या हातून मार मिळण्याची शक्‍यताच नव्हती. शिवाय वर्गातही माझा नंबर असायचा. त्यामुळे माझ्यामागे अभ्यासाचा लकडा लावण्याची त्यांना जरुरीही भासली नाही.

शाळा-कॉलेजात अनेक मित्र लाभले. कोणाकोणाची म्हणून नावं सांगू? मैत्रिणीही होत्या. सुस्वभावी होत्या. काही सुंदरही होत्या. कथा, कादंबरी, कविता अशा विषयांवर आमच्या चर्चाही चालायच्या. पण हे सगळं परस्परांतलं सभ्य अंतर राखून. आज परिस्थिती अगदी निराळी आहे. कित्येकदा वैशालीतल्या अड्ड्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक दिसते आणि मुलं फारशी तोंड उघडून बोलताना दिसत नाहीत. तोंड उघडलंच तर ते मसाला डोसा खाण्यासाठी. आमच्यावेळी कॉलेजात तर मुलामुलींनी एकत्र येता कामा नये असा अलिखित नियम होता. असल्या गोष्टींवर प्राचार्यांची कडक नजर असे. खूप वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या मुख्य शहरात असलेल्या कॉलेजात गेलो होतो. कॉलेजला विस्तीर्ण मैदान होतं.

कडेला आंब्याचा एक डेरेदार वृक्ष होता. खोलीतून, ह्या मैदानाचा देखावा फार सुरेख दिसे. पण प्रिन्सिपलसाहेबांची खोली म्हणजे त्यांचा टेहेळणी बुरूज होता. त्या आंब्याच्या झाडाखाली कुणी एखादा विद्यार्थी आपल्या वर्गातल्या मुलीशी गप्पा मारत असलेला दिसला की प्रिन्सिपलसाहेब पहाऱ्यावरच्या गुरख्याला पाठवून त्या मुलामुलीला पांगवून टाकीत. हे प्राचार्य संस्कृत शिकवीत म्हणतात. कालिदासाने ह्यांची मुलामुलींसमोर, विशेषतः मुलींसमोर शिकवताना ठायीठायी काय गोची केली असेल ते देवी शारदाच जाणे.

पहिल्यांदा लिखाण केव्हा केलं? काय स्वरुपाचं होतं? त्याचं कौतुक वगैरे झालं का?

माझ्या घरातच ग्रंथप्रेमाचं वातावरण होतं. माझे आजोबा लेखक होते. आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास, अभंग गीतांजली ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं. त्यांच्या भेटीला बरीच साहित्यिक मंजळी यायची. त्या मैफलीत मला मज्जाव नव्हता. त्यामुळे वाचनाबरोबर लेखनाचीही आवड होती. पण वक्तृत्वाची आवड सगळ्यात जास्त. कित्येक वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊन मी बक्षिसं मिळवलेली होती. भाषण विनोदी करण्याकडे जास्त ओढा असायचा. विशेषतः आपल्या वेळी सुचवलेल्या विषयावरच्या भाषणात. त्यामुळे लेखनाची सुरवातही विनोदी लेखनाने झाली. पस्तीस-छत्तीस मध्ये म्हणजे मी मॅट्रिकच्या वर्गात असताना "खुणेची शिट्टी' ही माझी गोष्ट "मनोहर' मासिकाच्या एका अंकात छापून आली. मागे एकदा ती पुन्हा वाचायला मिळाली. या मासिकांचे संपादक शं. वा. किर्लोस्कर यांनी ती विनोदी (?) गोष्ट केवळ भूतदयेपोटी स्वीकारून छापली असावी असं मला वाटतं.

एखाद्याचं नाव दैनिकांत किंवा मासिकांत छापून येण्याला त्या काळी खूप महत्त्व होतं. त्यामुळे माझं कौतुक वगैरे झालं. पण त्या आधी मी एक कारवारच्या प्रवासाचं वर्णन करणारा लेख किर्लोस्कर मासिकासाठी पाठवला होता. माझ्या आयुष्यात "साभार परत' आलेला तो पहिला आणि शेवटचा लेख. कौतुकाचं म्हणाल तर माझं खरं कौतुक व्हायचं पेटीवादनाचं. शाळेतल्या आणि स्काऊटच्या नाटकात किंवा मेळ्यात केलेल्या कामाचं. त्यामुळे लेखन हे आपलं क्षेत्र नसून, गाणंबजावणं, अभिनय या क्षेत्रातच आपण राहायला पाहिजे अशीच माझी धारणा होती.

चित्रपट पाहणं, खेळ खेळणं, कैऱ्या-चिंचा तोडणे, प्रेम करणं असे प्रसंग घडले का?

चित्रपटाचं तर मला वेडच होतं. दादरच्या कोहिनूर सिनेमाचे मी आणि माझे काही मित्र हे तीन आणे तिकिटांचे प्रमुख आश्रयदाते होतो. परळच्या भारतमाता सिनेमात सिनेमा सुरू होण्याआधी रंगीबेरंगी दिव्यांची स्टेजजवळ चमचम सुरू व्हायची. आणि अँग्लोइंडिया पोरींचा "ड्यान्स' सुरू व्हायचा. "ड्यान्स' या शब्दातल्या "न्स'चा उच्चार वन्स मधल्या "न्स' चा उच्चाराशी जुळणारा होता.

तो एकदा संपला, की थेटरात अंधार व्हायचा आणि "खामोष,' "अब टॉकी शुरू होती है' अशी अक्षरं यायची. बडबड करणारे पब्लिक खामोश व्हायचे आणि पुढले दोन एक तास कसे गेले ते कळायचंदेखील नाही. आमच्या पार्ल्यात सिनेमाचं थेटर नव्हतं. पण मूकपट तयार होत पार्ल्याच्या रेल्वे स्टेशनाशेजारी मोर बंगला नावाचा राजवाड्यासारखा प्रचंड बंगला होता. भोवताली बागेत संगमरवरी पुतळे, भला मोठा पोहण्याचा तलाव, उंच घनदाट वृक्ष अशी तत्कालीन स्टंटपटाला लागणारी बॅंक ग्राऊंड तयार होती. गडबड न करता उभं राहिलं तर शूटिंग पाहायची परवानगी मिळे. धीरूभाई देसाई तसे चांगले होते.

मिस गुलाब, मा. नवीनचंद्र, मा. आशिक हुसेन अशी नावं आजही मला आठवतात. बहुतेक मूकपटात फायटिंग घोडदौड ही अभिनयाची मुख्य अंग असायची. अधूनमधून एखादा गंमत करून जायचा. पुढे फियरलेस नादिया वगैरेचे बोलपट सुरू झाले. आणि विष्णू सिनेटोन बंद पडला. खेळांच्या बाबतीत माझी भूमिका मुख्यतः प्रेक्षकाची राहिली. मैदानी आणि बैठ्या या दोन्ही प्रकारात रमलो नाही. तासन्‌ तास गेले ते गाण्याच्या मैफिलीत किंवा पुस्तकांच्या संगतीत. तसा क्रिकेट वगैरे थोडेफार खेळलो. क्रिकेट पाहायचो मात्र खूप! सी. के. नायडू, विजय मर्चंट, लाला अमरनाथ, मुश्‍ताक अली, अमरसिंग, खंडू रांगणेकर, निसार, अमर इलाही अशा नामवंत खेळाडूंचा खेळ पाहिला. अजूनही क्रिकेट पाहण्याची आवड टिकून आहे. पण प्रत्यक्ष स्टेडियममध्ये न जाता घरी टीव्हीवर पाहतो (एक गोष्ट मात्र निश्‍चित - क्रिकेट अधिक आकर्षक व्हायचा तो बॉबी तल्यारखानच्या "आखों देखा हाल'मुळे) क्रिकेटचा असा समालोचक पुन्हा होणे नाही. शनिवार, रविवार, आमच्या पार्ल्यातल्या पोरांचे अत्यंत आवडते उद्योग होते.

जावरू, लॉरेन्स असल्या नावाच्या लोकांच्या वाड्या होत्या. चिंचा-कैऱ्यांची तिथं मुबलक झाडं, सिमेंट कॉंक्रिटच्या पार्ल्याने आंबे, चिंचा, बोरं, आवळे नेस्तनाबूत केले. वाडीवरच्या पहारेकऱ्याला चुकवून चिंचा-कैऱ्या पाडण्यात एकप्रकारचा थ्रिल होता. चोरून आणलेल्या कैरीची आणि बटली आंब्याच्या कच्च्या फोडीची चव बाजारातल्या आंब्याला नसे. हाय चोरून मिळवलेल्या कैऱ्या-चिंचांप्रमाणेच "प्रेम' हे देखील चोरून करण्याचं प्रकरणच होचं. परण ज्या मध्यमवर्गीय वातावरणात आम्ही वाढत होतो तिथं प्रेम करणं जाऊ द्या, प्रेम हा शब्द मोठ्याने म्हणायची चोरी होती.

चित्रपटातल्या आवडत्या नायक-नायिका कोण? त्यांच्या लक्षात राहिलेल्या मुख्य भूमिका कोणत्या?

- पहिल्यापासूनच नाटक, गाणं वाचन या गोष्टी अतोनात आवडायच्या. त्यामुळे चित्रपट पाहाणं हे आपलं कर्तव्य आहे. आपली खरी दुनिया तिचं अशीच भावना होती. प्रभात, न्यू थिएटर्स, हंस, कोल्हापूर सिनेटोन, नवयुग या चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्था ही सांस्कृतिक तीर्थक्षेत्रे होती. माझ्या आधीच्या पिढीचं महाराष्ट्रात तरी नाटक मंडळीचं बिऱ्हाड हे असंच ठिकाण होतं. तीस पस्तीस सालानंतर नाटक मंडळ्या बुडल्या. प्रेक्षक चित्रपटांकडे ओढले गेले. प्रभात आणि न्यू थिएटर्सचे जवळ जवळ सगळे चित्रपट मी पाहिले आहेत. मराठी चित्रपटात मास्टर विनायक आणि हिंदीत मोतीलाल हे माझे आवडते नट होते. विनायकरावांचा "ब्रह्मचारी' आणि मोतीलालचा "मिस्टर संपत' हे माझे आवडते चित्रपट.

मराठीत शांता आपटे आणि हिंदीत देविकाराणी, ललिता पवार या आवडत्या नट्या. पण पश्‍चिमेकडील आवडायच्या त्या ग्रेटा गार्बो, क्‍लॉलेट कॉलबर्ट, मर्ल ओवेरॉन, नॉर्मा शिअरर, डॉरथी, लामूर मराठी हिंदी वगैरे चित्रपट काही आवडत. पण मनाचा कब्जा घेतला होता तो हॉलिवूडच्या चित्रपटांनी. "गुडबाय मिस्टर चिप्स' तर मी पुण्यातल्या अपोलो सिनेमा थेटरात ओळीने तीनदा पाहिला होता. म्हणजे तीनचा खेळ, संध्याकाळी सहाचा आणि नऊचा सलग बसलो होतो. त्या नटनट्यांनी मनावर असंख्य ठसे उमटवले. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल.

तारुण्यात सर्वात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण? त्यांच्या काही आठवणी?

- जीवनाच्या अनेक क्षेत्रात मी वावरलो. प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज पाहायला मिळाले. त्यामुळे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची यादी खूप मोठी होईल. स्थूलमानाने सांगायचं झालं तर, साहित्यात राम गणेश गडकऱ्यांचा, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात बालगंधर्वांचा, अभिजात संगीताच्या क्षेत्रात मल्लिकार्जून मन्सूरांचा, राजकीय क्षेत्रात साने गुरुजींचा प्रभाव माझ्यावर पडला.

दुसऱ्याच्या दुःखाने व्याकुळ झाल्यामुळे सहानुभूतीने झरणारा अश्रू हे निसर्गाने माणसाला दिलेले सर्वात मोठे देणे आहे हे साने गुरुजींनी स्वतःच्या आचरणाने सिद्ध करुन दाखवले. साने गुरुजींप्रमाणे मनावर तितकाच प्रभाव पाडणारी दुसरी व्यक्ती म्हणजे एस.एम. जोशी, "मी पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो' हे ज्यांच्याबद्दल अंतःकरणपूर्वक म्हणावं अशी ही देवदुर्लभ माणसं.

प्रेमविवाह या कल्पनेबद्दल काय वाटतं?

- प्रेम ही कल्पना मला खूप आवडणारी आहे. निरनिराळ्या संदर्भात ते प्रकट होतं. पण स्त्री-पुरुष प्रेम हा प्रकार निराळा आहे. इथं दोन जिवांच्या विसर्जीत होण्याची कल्पना आहे. हे प्रेम का निर्माण झालं? परस्परांविषयी इतकी ओढ का वाटायला लागली, स्त्रीपुरष सौंदर्य हे या प्रेमाला आवश्‍यक अशी अट आहे का? लैलाला, मजनूच्या डोळ्यांनी पहा म्हणजे ती किती सुंदर आहे ते तुम्हाला कळेल असं म्हटलं आहे. प्रेमाचं रसायन मनात कसं तयार होतं हे कोडं अजून उलगडायचंच आहे. मात्र लग्न ही माणसाने निर्माण केलेली समाजधारणेसाठी लागणारी गोष्ट आहे. प्रेम कुठलेही शिष्टमान्य नियम पाळायला बांधलेलं नाही. पण लग्न ही नियमांनी बांधलेली व्यवस्था आहे. तिचे कायदेकानून आहेत. हिंदूधर्मात "नाचिचरामि नातिचरामी-नातिचरामि' अशी शपध घेऊन वधूचा स्विकार केलेला आहे. मुसलमानी धऱ्मात तर लग्न हा इतर कुठल्याही करारासारखा करार आहे. इतर करारासारखीच तो मोडण्याची तिथे व्यवस्था आहे. इतर धर्मात लग्नाचे असे छोटेमोठे नियम आहेत.

आत्मविसर्जन या भावनेने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींनी लग्नाचं बंधन स्विकारताना या व्यवहारात आपणा दोघांच्याही भूमिकेत बदल झाला आहे हे ओळखमे महत्वाचे आहे. आपल्या देशात आपला प्रियकर हा मालक होतो. स्वामी सेवक संबंधात रुढीने लादलेल्या नियमांना धरुन वागण्याची सक्ती असते. संवेदनशील स्त्रियांना ती जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेमात पडलेल्या अवस्थेत जी धुंदी असते तिची जागा लग्नानंतर तडजोडीने घेतलेली असते.

गेली अनेक वर्षे तुम्ही तरुणांचे आवडते लेखक आहात याचं कारण काय असावं?

- माझ्या तरुण वाचक श्रोत्यांनी तर मला खूपच प्रेम दिलं आहे. पण सर्व वयोगटातल्या वाचकांच मला उदंड प्रेम लाभलं आहे. गेली पन्नासएक वर्षे मी लेखन करतो आहे. मुख्यतः विनोदी, मुक्तपणाने हसायला लावणार विनोद मुक्तपणाने हसणं हे तारुण्याचं व्यवच्छेद लक्षण आहे. किंबहूना एखादा वृद्ध माणूस मनमोकळेपणाने हसतो त्यावेळी तेवढ्या वेळेपुरतं का होईना त्याला तरुण झाल्यासारखं वाटतं. माझ्या लेखनातून संवाद साधला गेला असावा. त्यासाठी मी मुद्दाम काही अभ्यास वगैरे करून लिहायला बसत नाही. तसं पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षात समाजात किती कमालीचं परिवर्तन झालं आहे.

मला मात्र या परिवर्तनात बाह्य फरक असला तरी मूळचा मनुष्यस्वभाव हा युगानुयुगे सारखाच राहिला आहे असं वाटतं. नऊवारी साडी, नथ, निरनिराले दागिने घातलेली आणि लांब केसाची आकर्षक रचना केलेली पन्नास साठ वर्षापूर्वीची तरुणी काय किंवा तंद जीन्स घातलेली, केसांचा पुरुषी बॉयकट केलेली अत्याधुनिक युवती काय, आपण सुंदर दिसावं ही त्यामागची भावना समानच आहे. स्वतःला भूषवणारी आहे. सफाईच्या दुटांगी काचा मारलेले धोतर नेसणं ही एकेकाळची फॅशन होती. धोतरं गेली, तुमानी आल्या. आपण फाकडू दिसायला पाहिजे हीच भावना त्या काळातल्या धोतरव्यांच्या मनात होती. आणि आजच्या "मॉड' पोशाखातल्या तरुणींच्याही मनात आहे. नटणं हा स्थायीभाव आहे आणि युगानयुगे तो टिकून आहे. या बाह्याकारी गोष्टींना मी महत्व देऊन त्यावरुन नीती अनितीची गणितं मांडत बसलो नाही. त्यामुळे माझ्या वाचकांच वय काहीही असलं तरी त्यांच्यात आणि माझ्यात फार मोठी दरी असल्याचं मला कधीही वाटलं नाही.

जगताना मला जे जे भावलं, कधी मी कथा केली, नाटकं केली, प्रवासाच्या हकीकती सांगितल्या, कागदावरुन सांगितल्या, ध्वनिफितीवरुन सांगितल्या आणि असंख्य वाचकांना त्या ऐकाव्याशा वाटल्या. त्यांना त्या तशा का वाटल्या याचं उत्तर माझ्यापाशी नाही. पण माझ्या अपेक्षेपेक्षा शतपट प्रमाणात मला रसिकांचं प्रेम मिळालं. कदाचित या माणसाने आम्हाला हसवलं आणि हसवण्यासाठी भाषेचा अभद्र वापर केला नाही, त्यामुळे आपल्या हसण्याला आनंद डागळला नाही. अशीही भावना असावी.

सध्याच्या युवकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुण पिढी बेशिस्त आहे का?

- मला युवक पिढीची चिंता वाटत नाही. पण साहसाची आवड, काहीसा बेशिस्तपणा, ही सारी तारुण्याची लक्षणं आहेत. त्यांनी थोडाफार दंगा केला तर त्याला आपण "यौवनमय अपराध्वते' असं म्हणू शकतो. ज्या वृद्धांनी तरुण पिढीपुढे आदर्श म्हणून उभं राहावं, त्यांच्या सत्तालोभाच्या आणि सत्ता मिळण्यासाठी लागणाऱ्या द्रव्यलोभाच्या हकीकती ऐकून धक्काच बसतो. जिथं विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने ज्ञानोपासनेसाठी जमतात अशी विश्‍वविद्यालय ही भ्रष्टाचाराने सडत चाललेली दिसतात. पैसे टिकवून जिथं पदव्या मिळवता येतात, पैसे मोजून जिथे परिक्षेतल्या पेपरातले गुण भरमसाठ प्रमाणात वाढवले जातात अशा वातावरणात जगावं लागलेल्या तरुणांची मला चिंता वाटते. म्हणून मी निराश आहे असे नाही.

समाजहिताच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणारे तरुण आणि तरुणी आजही भेटतात. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी धडपडणाऱ्या या तरुणांची जिद्द पाहिली की मनाला समाधान वाटतं. वाटतं की हे ही दिवस जातील. पारतंत्र्याचे दिवं मला आठवतात. सगळीकडे अंधार होता. देश लुळापांगळा होऊन पडला होता. इंग्रजी सत्तेपुढे लाचार होऊन पडला होता. आणि यावच्चंद्र दिवाकरौ ही स्थिती बदलणार नाही असं मानतं होता. त्या अवस्थेतून बाहेर पडून इंग्रज राज्यकर्त्याला चालता हो असं समर्थपणे सांगणारा प्रचंड समाज उभा राहिला. स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निघणाऱ्यामध्ये महत्वाचा वाट तत्कालीन तरुण पिढीने उचलला होता. "सूत कातून आणि चरखे फिरवून, उपास आणि सत्याग्रह करुन काय स्वराज्य मिळतं का?' असले कुत्सित उद्‌गार काढणाऱ्यांनी जेव्हा शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक खाली येऊन तिरंगा वर चढताना पाहिला असेल तेव्हा त्यांना काय वाटलं असेल ते त्यांनाच ठाऊक.

तत्कालीन तरुणांनीच हा चमत्कार गांधींच्या "करा किंवा मरा' या निर्वाणीच्या संदेशातून घेतला होता. आजच्या तरुण पिढीतून मेधा पाटकरांसारखी तेजस्विनी निर्माण झालेली आपण पाहतो. मग देशाच्या भल्यासाठी "युवाशक्ती' अधिक जोमदार करणारं नेतृत्व लाभणारच नाही, असं वाटून हताश होऊन कशाला जगायचं?

दूरदर्शन, एम.टी.व्ही. सारख्या आक्रमणामुळे तरुणांची वाचनीयता, नैतिकता कमी होत आहे का?

- सध्याच्या तरुणतरुणींची वाचनाची आवड कमी होत आहे, असं मला वाटत नाही. मी कॉलेजात असताना म्हणजे सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी ही मुलं अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर फारसं वाचन करीत असतील असं मला वाटत नाही. त्याकाळी टी.व्ही. संगीताच्या ध्वनिमुद्रित फिती असल्या काही गोष्टी नव्हत्या म्हणून विद्यार्थी लायब्ररीत गर्दी करीत होते असं नाही. खेळ, गायन, चित्रकला यासारखीच वाचनाची आवड असावी लागते. ती नीटपणाने वाढीला लागायला एखाद्या ग्रंथप्रेमी मित्राचा किंवा शिक्षकांचा सहवास लागतो. तसा आजही मिळू शकतो.

सध्याच्या युवा पिढीबद्दल तुम्हाला सर्वाधिक खटकणारी व आवडणारी गोष्ट?

- युवा पिढी अशी घाऊक कल्पना मनात बाळगून तिच्यावर बरेवाईट शेरे मारणं मला योग्य वाटत नाही. तारुण्य हा समान घटक धरला तरी प्रत्येक एकाच साच्यातला गणपती नव्हे. तरीही मनाचा मोकळेपणा, साहसाची हौस, तरुणतरुणींना परस्परांविषयी वाटणारं आकर्षण, फार शिस्त लावू पाहणाऱ्या मंडळीविषयी थोडीफार भीती, थोडापार तिटकारा ही प्रतिक्रिया सनातन आहे. कॉलेजात असताना पुण्यातल्या "गुडलक'मध्ये आमचा अड्डा जमत असे. आताची पिढी वैशालीत जमते. प्राध्यापकांपासून ते बोलघेवड्या देशभक्तांपर्यंत आणि लेखकांपासून ते एखाद्या शामळू सिनेमा नटापर्यंत टिंगळटवाळी चालायची, नकाळत व्हायची, चांगल्या आणि फालतू विनोदांची, पाचकळ शाब्दिक कोट्यांची फैर झडायची. त्यामुळे कट्टा संस्कृती पाहिली की एक सुदृढ परंपरा आजतागायत चालू असल्याचा मला आनंद वाटतो. तत्कालीन पेन्शनरांना उनाड वाटणाऱ्या त्यामधल्या कित्येक तरुणांनी बेचाळीसच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं.

तुरुंगवास सहन केले होते आणि तुरुंगातही देशाचे कसे होईल याची चिंता करीत न बसता तिथेही कट्टा जमवला होता. आजही मला तरुणतरुणींची कट्टाथट्टा रंगत आलेली दिसली, की ती मंडळी माझ्या स्वकीयांसारखीच वाटतात. आपण उच्चस्थानावर उभं राहून त्यांच्या त्या वागण्याची तपासणी करीत राहावं असं न वाटता त्या कट्टेबाजांच्या मैफिलीत हळूच जाऊन बसावं असंच वाटतं. त्यामुळे त्याचं ते मोकळेपणानं वागणं मला कधी खटकत नाही. पोशाखांच्या तऱ्हांची मला मजा वाटते. रस्त्यावरच्या भयंकर गर्दीत आपली स्कुटर चरुराईने घुसवणाऱ्या मुलींचं मला कौतुक वाटतं. मात्र अकारण उद्धटपणाने किंवा दुसऱ्या कुणाला ताप होईल असं वागणे हे मात्र मला खटकतं.

पुन्हा तरुण व्हायला मिळालं तर?

- खूप आवडेल. डोंगरदऱ्यातून मनसोक्त, गिरिभ्रमण करीन. मैदानी खेळात भाग घेईन. भरपूर पोहीन, चित्र काढीन, अशा अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत. त्या पूर्ण करायला मनाला शरीराची साथ मिळायला हवी. त्याबरोबरच त्या नवीन तरुण मनाला साजेल अशा जिद्दीने सामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करण्यामागे लागेन.

तरुणांना काय संदेश द्याल?

- संदेश वगैरे द्यायला मला आवडत नाही. तरीही आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्‍यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील. पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

सकाळ
८ नोव्हेंबर २०१९

Friday, November 8, 2019

पुलंचा आठव..

एखाद्या रागात वर्ज्य मानलेला सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो, हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु. ल. देशपांडे हे तसे होते..

आपापले वैविध्य जपूनही धर्मजातपातविरहित राहणाऱ्या मोकळेपणाच्या संस्कृतीची गोष्ट ‘बटाटय़ाच्या चाळी’तून सांगणारे पु.ल. हे या महाराष्ट्रीय संस्कृतीतील खरेपणाच्या मूल्यास मानणारे होते. त्यामुळेच सर्व राजकीय विचारधारांच्या टोप्या त्यांनी उडवल्या, तरी दुस्वास कोणाचा केला नाही. पुलंचे हे गुण पुलंसोबतच संपले, असे म्हणावे लागते..

बळवंतराव टिळकांचा कित्ता घेण्यापेक्षा त्यांचा अडकित्ता घेणे हे सर्वकालीन सोयीचे होते. म्हणून समाजाने तेच केले. यात विशेष काही नाही. कारण सर्वसामान्यांना नेहमीच सुलभतेचा सोस असतो. हे अटळ आहे. लोकमान्यांनंतर महाराष्ट्रात इतकी लोकप्रियता लाभलेली व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. टिळक ते पु.ल. यांदरम्यानच्या टप्प्यात आचार्य अत्रे नावाचे एक अजस्र व्यक्तिमत्त्व या राज्यात होऊन गेले. अत्र्यांवर मराठी माणसाने प्रेम केलेच. पण त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. त्यात अत्र्यांची शत्रू निर्माण करण्याची खुमखुमी. पुलंच्या बाबत असे काही घडले नाही. याचा अर्थ शत्रुत्व नको म्हणून पु.ल. नेहमी व्यवस्थेशी जुळवून घेण्याचे मराठी कलावंतांचे अंगभूत चातुर्य कुरवाळत बसले असे नाही. जेथे घ्यायला हवी तेथे त्यांनी आवश्यक ती भूमिका घेतली. पण त्या भूमिकेची आवश्यकता संपल्यावर देशपांडे पुन्हा आपल्या ‘पु.ल.’पणात परत गेले. टिळकांप्रमाणे महाराष्ट्राने पुलंवर भरघोस प्रेम केले खरे. पण अंगीकार मात्र कित्त्यापेक्षा अडकित्त्याचाच केला. समग्र ‘पु.ल.’पणातील त्यांच्या नावचे खरेखोटे विनोद तेवढे पुढे पुढे जात राहिले. अफवा ज्याप्रमाणे माध्यमाखेरीजही पसरू शकतात, तसेच हे. अशा वेळी महाराष्ट्रधर्म आणि ‘पु.ल.’पणा यांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. तो घेताना पु.ल. नेमके कशासाठी आठवायचे, या प्रश्नास भिडावे लागेल.

याचे कारण आजच्या सर्वार्थाने फ्लॅट संस्कृतीतील उच्चभ्रू मध्यमवर्गीय आपल्या सांस्कृतिक जिवंतपणाचा पुरावा म्हणून पु.ल. तोंडी लावत असतो आणि ‘बटाटय़ाच्या चाळी’चे गोडवे गातो. ही ‘बटाटय़ाची चाळ’ हे वाङ्मयीनदृष्टय़ा स्मरणरंजन आहे. पण सामाजिकदृष्टय़ा पाहू गेल्यास ते निर्मम, धर्मजातपातविरहित मोकळेपणाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्या मोकळेपणाच्या वातावरणात पापलेटे आणणाऱ्या कामतमामांच्या हातात जोडीला कोचरेकर मास्तर आहेत. त्रिलोकेकरणीने खास प्रवासासाठी करून दिलेला गोडीबटाटीचा रस्सा मांडीवर सांडला तरी सहन करणारे शेजारी आहेत. ते वाचताना विनोदाने हसू फुटते हे नैसर्गिक. पण त्यामुळे त्यातील खरा आशय दुर्लक्षित राहतो किंवा तो मुद्दामहून दुर्लक्षित ठेवला जातो, असेही म्हणता येईल. ज्या मुंबईत ही बटाटय़ाची चाळ दिमाखात उभी होती, त्याच मुंबईत आज मांसमच्छी खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्या इमारती उभ्या राहतात, याइतका पुलंचा पराभव दुसरा नसेल. तो त्यांना प्रिय मुंबईने केला हे विशेष. या अशा ‘फक्त शाकाहारी’ इमारती उभारणाऱ्यांना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी वगरे लढणाऱ्या पक्षांचेच संरक्षण आहे, ही बाब पुलंचा पराभव मराठी माणसांनीच केला हे सिद्ध करण्यास पुरेशी ठरते. ‘मी माझा’ या संकुचित वातावरणात ‘बटाटय़ाची चाळ’ ‘एन्जॉय’ करणारे (आनंद घेणारे नव्हेत) दुसरे काय दर्शवतात?

तीच बाब ‘होल केऑसमधून कॉसमॉस निर्माण’ होत असतानाची बाष्कळ बडबड करणाऱ्या ‘असा मी असामी’तील ‘स्पिरिच्युअल’ बाबांबाबत आजही लागू पडते. या बोगस बाबाची यथेच्छ टवाळी पु.ल. करतात. त्यांचा अप्पा भिंगार्डे या बाबाच्या प्रवचनात ‘‘पारशिणीच्या उघडय़ा पाठीकडे’’ पाहात ‘‘ईऽ ठय़ांऽऽश’’ अशा केवळ पुलंच लिहू शकतील अशा आवाजात शिंकतो. अशा दरबारी बाबांकडे जाण्याची गरज वाटणाऱ्या श्रीमंत वर्गाचे प्रतीक म्हणजे ती पारशीण आणि या सगळ्याविषयी अंगभूत तुच्छता दाखवणारा अप्पा भिंगार्डे हा खरा मराठी. या मराठीस काहीएक प्रबोधनाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, रामदास आदी हे संत होते. पण बाबा वा बापू नव्हते. आजच्या मराठी माणसास या दोहोंतील फरक कळेनासा झाला आहे. त्यामुळे या मराठी माणसाची अवस्था पिठात पाणी घालून दूध म्हणून प्यायची सवय झालेल्या अश्वत्थाम्यासारखी झाली आहे. जेव्हा त्यास खरे दूध मिळाले तेव्हा त्याने थू थू म्हणत ते थुंकून टाकले. आजचा सर्वसामान्य मराठी हा असा खऱ्या मूल्यांना झिडकारतो. असे होते याचे कारण तेच. पुलंचा कित्ता न घेता अडकित्ताच घेतला, हे.

पुलंच्या नंतर महाराष्ट्रास विसर पडलेला तिसरा मुद्दा म्हणजे विनोद आणि विद्वत्ता एकत्र नांदू शकते, हे वास्तव. पुलंच्या ठायी ती होती. त्यामुळेच राजकीय विचारधारा असोत वा रवींद्रनाथांचे वाङ्मय वा शेक्सपीअर आदींच्या अभिजात कलाकृती. पुलंनी त्या केवळ नुसत्याच वाचलेल्या नव्हत्या, तर आत्मसात केल्या होत्या. यामुळे त्यांच्यातील लेखकाने विद्वत्तेस पर्याय म्हणून कधी विनोदाचा आसरा घेतला नाही. पुलोत्तर काळात नेमके हेच दिसून येते. या काळात विनोदाचे निर्बुद्धीकरण सामूहिकरीत्या झाले. खाली पडणे नैसर्गिक असते. त्यासाठी गुरुत्वीय बल काम करतेच. त्याविरोधात, म्हणजे गुरुत्वीय बल खाली खेचत असताना त्याविरोधात काम करणे हे खरे आव्हान. ते पुलंनी आयुष्यभर पेलले. त्यामुळे त्यांच्या विनोदास गुरुत्वीय बल खाली ओढू शकले नाही. त्यास विद्वत्तेचा वरून आधार होता. त्यानंतरच्या काळात विनोदाचा दर्जा किती खालावला, हे सांगण्यास उदाहरणांची कमतरता नाही. उलट ती मुबलक आहेत. परिणामी विनोदकार गांभीर्याने घेण्याच्या लायकीचे नसतात, असा समज दृढ झाला. असे होणे या विनोदकारांचा दर्जा पाहता खरे असले, तरी पुलंना घडवणाऱ्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे, हे आपण विसरलो आहोत. हे अधिक दु:खदायी.

चौथा मुद्दा विरोधक म्हणजे शत्रू असे मानण्याचा. ज्ञानेश्वर ‘दुरिताचे (दुरितांचे नव्हे) तिमिर जावो’ अशी इच्छा बाळगतात. कारण हे ‘तिमिर’ वगळले तर उर्वरित व्यक्ती ही नकोशी वाटायचे कारण नाही. पुलंचा जीवनविषयक दृष्टिकोन हा असा होता. त्यांनी गांधीवाद्यांच्या साधेपणाच्या अतिरेकाची चेष्टा केली, समाजवाद्यांच्या भोंगळपणाची यथेच्छ टिंगल केली, काँग्रेसी बनेलपणाच्या आणि संघीयांच्या साजूक सात्त्विकतेच्या टोप्या उडवल्या. पण वैयक्तिक आयुष्यात यातील कोणाचाही दुस्वास पुलंनी कधी केला नाही. आपल्या विचाराचा नाही, म्हणजे त्याचे सर्वच निंदनीय असे मानणारे महाराष्ट्राचे संकुचित वर्तमान पुलंच्या भूतकाळात या राज्याने कधीही अनुभवले नाही. यातील सर्वच विचारसरणींतील त्रुटी पुलंनी आपल्या शैलीने दाखवल्या. पण एस. एम. जोशी ते स. ह. देशपांडे अशा अनेकांच्या गौरवांकित कार्याशी पु.ल. आपुलकीने समरस झाले होते. हा मोकळेपणा पुढच्या काळात महाराष्ट्राने गमावला. म्हणजे पुलंना पुन्हा एकदा आपण विसरलो.

हे असे सांस्कृतिक- सामाजिक मोकळेपण त्यांच्या संगीतप्रेमामुळे आले असेल का? असेलही तसे. कारण रागात एखादा वर्ज्य स्वर असला म्हणून त्या स्वराच्या नावाने बोटे मोडायची नसतात, ही संगीताची शिकवण. तो एखाद्या रागाशी विसंवाद असणारा एखादा सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु.ल. तसे होते. पण त्यांचे हे संगीतप्रेमही आपण मागे सोडले आणि गोंधळास जवळ केले.

हा गोंधळ म्हणजे लग्नघरातला हवाहवासा गोंधळ नव्हे. ‘नारायणा’ची जागा कंत्राटदारांनी घेतल्यावर तो गोंधळही ठरावीक- उदाहरणार्थ ‘जूते’ लपविण्यासारख्या प्रसंगीच तेवढा होतो. म्हणजे काळ बदलला, हे खरेच. आपण असे नव्हतो, असे रडगाणे गाण्यात आता अर्थ नाही हेही खरे. पण आपण कसे होतो समजण्यासाठी पुलंचा आठव आवश्यक असतो. आज ते असते तर शंभर वर्षांचे झाले असते. या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांचा हा आठव.

लोकसत्ता
८ नोव्हेंबर २०१९