Tuesday, November 16, 2021

कालातीत विचारवंत -- पिनाकीन गोडसे

शहर मेलबर्न. दिवस मे महिन्याचे. आमच्याकडे काही मैत्रिणी आल्या होत्या (पुणेकर नसल्याने तिसऱ्या वाक्यात हशा मिळवायची अट मला नाही). एकीने पुलंची पुस्तके बघून दुसरीला सांगितले की, "अरे हे फार विनोदी लेखक होते". मला कळेना की कीव कोणाची करावी माहिती देणारीची की माहिती जिला मिळाली तिची? की विनोदी लेखक एवढीच ओळख उरलेल्या पुलंची ? पण ते शब्द त्रास देत राहिले हे मात्र खरे. आधी एका लोकप्रिय कार्यक्रमात पु. ल. देशपांडेंच्या उल्लेख आद्य मराठी stand up comedian असा केला होता. हे म्हणजे रम चा उल्लेख शरीरात उष्णता निर्माण करणारे द्रव्य असा करण्यासारखे आहे. खरा आहे की नाही हा प्रश्न नाही पण पुरेसा नक्कीच नाही. ह्या पुरुषोत्तमाच्या अचाट आयुष्यातील एका उत्कृष्ट विचारवंताचा भाग थोडा उपेक्षल्यासारखा वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच. पुलंवर एवढे विपुल लेखन झाले आहे की ह्यापुढे काही लिहणे म्हणजे पुनरोक्तीचा दोष पत्करुन लिहणे क्रमप्राप्त आहे. तसेच या लेखात पुलंचे शब्दच जास्त आहेत कारण ते वाचल्यावर आपण काही लिहूच नये अशी भावना प्रबळ होते.

पु. ल. देशपांडे ह्या असामीने महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व अजूनही व्यापून टाकले आहे. पुलंना जाऊन २० पेक्षा जास्त वर्षे झाली, त्याआधी काही वर्षे ते आजारी होते. तरीही त्यांचे सांस्कृतिक ऋण महाराष्ट्र अजून अभिमानाने मिरवतो. हे न फिटणारे ऋण! ह्यांना आपण काय देणार! तेथे कर माझे जुळती असे म्हणून धन्य व्हावे. पुलंनी संस्कृतीच्या प्रत्येक अंगाला कडकडून मिठी दिली. संस्कृतीचे असे कुठले दालन नसेल जिथे पु. ल. बागडले नाहीत. हा समाजकारणी आपल्या विचारांचे मोती मुक्तहस्ते उधळत राहिला पण असे असताना जिथे काही अमंगल दिसले तिथे हाच माणूस पहार घेऊन उभा होता. ह्या सर्व सांस्कृतिक पराक्रमामागे एक सुंदर वैचारिक बैठक होती आणि ती पु.लंनी सदैव लख्ख ठेवली.

एखाद्या विचारवंताचे विचार समाज नेहमी एका प्रखरतावादी दृष्टिकोनातून पाहत आलाय. विचारवंत म्हटले की तो एखाद्या प्रखर विचारांची पाठराखण करणारा असतो असा एक ग्रह आहे. ह्याच ठिकाणी पुलंचे विचार निराळे ठरतात. ह्या माणसाने नेहमी मानवतावादी, सौंदर्यसाधक आणि आनंददायी विचारांची पाठराखण आणि पखरण केली. हे विचार तसे म्हटले तर साधेच आणि नेहमीचे होते. हे काय विचार झाले का? असा सुध्दा प्रश्न काहींना पडू शकेल. त्या काळी सुध्दा पुलंवर ते भाषणातून काही विचार देत नाहीत हा आरोप झाला होता. आचार्य अत्रे, S. M. जोशी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत इ. परखड विचारवंतांची सवय तेव्हा महाराष्ट्राला होती, तेव्हा ह्या पुरुषोत्तमाच्या सरळ विचारांची थोडी उपेक्षाच झाली. जीवनातील श्रेयस आणि प्रेयस दोघांवर मनापासून प्रेम करणारे विचार सोप्प्या शब्दांत मांडताना पुलंनी कधी विचारांची सक्ती केली नाही. बरं, पुलंना काही अनुयायी तयार करायचे नव्हते की खुर्च्या मिळवायच्या नव्हत्या त्यामुळे लोकप्रियता किंवा समाजमान्यता त्या विचारांना थोडी आली नाही असे जाणवते. आज, इतक्या वर्षांनंतर समाजात जेंव्हा गुणग्राहकता, सहिष्णूता, सामाजिक उत्तरदायित्व, धर्मनिरपेक्षता इ. मूल्यांची सार्वत्रिक गरज जाणवते तेंव्हा ह्या कालातीत विचारवंतांची आठवण येते.

आजच्या 'वाद'ग्रस्त जगात एक मानवतावाद हरवलेला वाटत असताना महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाने सदैव केलेल्या मानवतावादी विचारांची आठवण येते. मानवतावादात माणुसकीचे महत्व अधिक आणि ते जागोजागी पुलंनी मांडले. संस्कार आणि संस्कृती ह्या मानवतावादावर परिणाम करत असतात आणि तो परिणाम चांगलाच असावा असा आग्रह त्यांनी धरला. संस्कृतीचा संदर्भ फक्त धर्मकार्य आणि सणासुदींशी जोडणाऱ्या जगाने पुलंचे संस्कृतीचे विचार उमजून घेतले पाहिजेत. एखाद्या समाजाने एकत्र येऊन केलेल्या कृतीस संस्कृती म्हणतात. ह्यात उच्च-नीच असणे हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. पुलंनी सर्व संस्कृतीचे धागेदोरे दाखवले पण ते उसवण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न नाही केला. 'गणपतीबाप्पा मोरया'ची मुक्त आरोळी ही सुद्धा संस्कृती आणि आठवडाअखेरीस पब्ज मध्ये जाणे ही सुद्धा संस्कृती. पिठले आणि झुणका ह्याच्या सीमारेषा कळणे ही सुद्धा संस्कृती आणि केकवर ब्रॅंडीची फोडणी देणे ही सुद्धा संस्कृती. कंठ फुटला की गावे आणि सुकला की प्यावे ही सुद्धा संस्कृती आणि टिळकमंदिरात शिरताना वाकून नमस्कार करणे ही सुद्धा संस्कृतीच. संस्कृती ही फक्त कुळाचार अथवा परंपरेशी निगडित नसून मानवी मनाशी निगडित आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या भाषणात पुल म्हणतात की, "वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार ह्यावर सारी संस्कृती उभी राहिली आहे." ह्यामागे मानवी मनाची अचूक जाण पुल सहजतेने दर्शवतात आणि संस्कृतीचा संदर्भ हा माणसांच्या एकत्र येण्याशी आहे हे ठसवतात.

तसेच संस्कार ह्या शब्दाचा अर्थ नमस्कार करणे, शुभंकरोती म्हणणे असे मानणाऱ्यांस पुलंनी मानवी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. एका मुख्याध्यपकास "संडास कसा वापरावा ह्याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का?" असं प्रश्न विचारून संस्कारांची व्यापकता दाखवतात. पुल लिहतात, 'संस्काराचे वर्तुळ अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे, त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयीस्कर गणित मांडले जाते. आपल्या घरातला केरकचरा शेजारीच्या वाडीत टाकणे, खिडकीतून पान थुंकणे अगर केसांची गुंतवळ टाकणे हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही. वरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वगैरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाहीकडे गप्पांचा अड्डा जमवयाला जाणे आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवर न जाणे, लोकांना तिष्ठत ठेवणे- असली वागणूक हे एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे हे फारसे कुणाला पटलेलं दिसत नाही. जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिद्ध होते ती खरी संस्कृती; ग्रंथात असते ती नव्हे.' माणुसकी ह्या विचारांची इतकी स्पष्ट पाठराखण पुलंसारखा विचारवंतच करू जाणे.

ह्या मानवतावादाला विवेकवादाची आणि सर्वसामावेशकतेची भरजरी झालर होती. मनाचे आणि बुद्धीचे कोपरे उजळून टाकणाऱ्या विचारवंताचे पुलंना नेहमी आकर्षण राहिले आणि त्या सर्व ठिकाणी पुल नतमस्तकच दिसतात. मग ते फुले असोत, शाहू महाराज असोत, साने गुरुजी असोत, आगरकर असोत, टिळक असोत, गांधी असोत, सावरकर असोत, की सेनापती बापट असोत. ह्या विचारधारेत बुवाबाजीचा बुरखा फाडणे, हमीद दलवाईंवर लेख लिहणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मदत करणे हे ओघाने आलेच. खाद्यविशेषांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात ह्या एकाच ठिकाणी पुलंनी (विशिष्ट हेतूपुरतीच आणि विनोदी अंगाने) जातीची पाठराखण केलेली दिसते. आपल्या अनेक लेखांतून, भाषणांतून आणि कृतींतून पुलंनी जात, धर्म, पंथ, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, घातक परंपरा, ईत्यादींचा समाचार घेतला आहे. शाहू, फुले, गाडगेमहाराज, आंबेडकर यांची नावे घेऊन आणि पुतळे उभारून त्यांचे विचार विसरणाऱ्या वृत्तीवर पुलंनी खरमरीत भाष्य केले. भगवंतापेक्षा मला भक्त आवडतो असे लिहणाऱ्या पुलंनी वारी आणि वारकऱ्यांमधील आनंद टिपतानासुद्धा 'भेदाभेद भ्रम अमंगळ' ही शिकवण विसरून दिंड्या काढणाऱ्या समाजाचा धि:कारच केला. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, बुद्ध, जैन, शीख इ. सर्व धर्मांतील अनिष्टतेवर पुलंनी नेमके बोट ठेवले. पापमुक्तीचे पास विकणाऱ्या पोपची आणि नाण्यांनी हात ओले करून स्वर्गाची दारे उघडणाऱ्या गयेच्या पंड्यांची कधी गय केली नाही की पूर्वजन्म, प्रारब्धयोग, ग्रहयोगाची भीती ठेवून ज्योतिषाकडे धाव घेणाऱ्यांची तळी उचलली नाहीत. संतांची जात पाहणाऱ्या समाजाची कानउघाडणी केली तर सत्तेसाठी जात-धर्म आदींचा उपयोग करणाऱ्या राजकीय वृत्तीचा निषेध केला. व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतो हे जाणणाऱ्या या पुरुषोत्तमाने एखाद्या व्यक्तीचे सामाजिक भान सुटल्यास कानपिचक्या देण्यास हयगय केली नाही. मग ते कुळ-गोत्र-प्रवर-शाखा बघून मुलगी ठरवणारे तरुण असोत की शंकराचार्यांच्या दर्शनाला जाणारे पंतप्रधान असोत. एका पत्रात पुल लिहतात, 'विज्ञानाने निसर्गाची रहस्ये शोधायची चढाओढ सुरु केल्याक्षणी ह्या जुन्या व्यवस्थेचे धाबे दणाणू लागले. आजदेखील विध्वंसक अण्वस्त्रे हा विज्ञानाचा शाप नसून कधी राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली तर कधी स्वतःची सत्तापिपासा भागवण्यासाठी सज्ज असणाऱ्या गटांची ती निर्मिती आहे ही वस्तुस्थिती किती हुशारीने डावलली जाते आहे पाहा. धर्माच्या नावाखाली रक्ताचे पाट वाहत आलेले आहेत. त्या आसुरी वैरामागे विज्ञानाचा हात नसून स्वाधिकार प्रमत्त्तांचे डावपेच असतात ह्या सत्याकडे सत्तेच्या हातात हात घालून चालणारे धर्ममार्तंड आणि अध्यात्मिक गुरु किती निर्लज्जपणे कानाडोळा करत असतात. गौतम बुद्धांनी धर्मचक्रपरिवर्तन केले. यापुढे आवश्यकता आहे ती विज्ञान-धर्माची शिकवण देणाऱ्या एक नव्हे, असंख्य बुद्धांची. बुद्ध-निष्ठ; जर बुद्धी-निष्ठ नसेल तर तोही जुन्या चाकोरीतून निघून नव्या चाकोरीत जाऊन पडला आहे असेच मी मानेन. समोरची मूर्ती बदलेली असेल; पण पूजा, नावे बदलून त्याच आरत्या आणि नवा पुरोहितवर्ग! ख्रिस्ताच्या करुणेचा धर्मदेखील शेवटी पोप आणि पाद्री यांच्या चरितार्थाचा धर्मच झाला. तिथेही व्यापाराचीच तत्त्वप्रणाली आली. प्रत्येक पंथाने आपापली गिऱ्हाईके वाढवण्यासाठी कुठलेही अमानुष उपाय करायला मागेपुढे पाहिले नाही. वैरभावनेतून युद्धाची शस्त्रच नव्हे, तर शास्त्रेही तयार झाली.'

हे विचार मांडताना आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक क्रांतीचे पुलंनी नेहमी स्वागतच केले. अशा वेळी पुलंची लेखणी आणि वाणी क्रांतीचे गुणगान करताना हातचे राखून काहीच करत नाही. ही क्रांती रक्तरंजित नव्हती. ही तळागाळात पोचणारी आणि मूलतत्व मानणारी क्रांती होती. शिवाजी जन्मावा पण बाजूच्याच्या घरात मानणाऱ्या मराठी मानसिकतेला चपराक देणाऱ्या क्रांतीची स्वप्ने पुलंनी पाहिली. पुल लिहतात, 'काशीची गंगा तृषार्त गाढवाच्या मुखी जेव्हा एकनाथ महाराजांच्या हातून जाते, तेव्हा तिथे मला क्रांती दिसते. आदिवासी घरट्यांतून बालआवाजीत वाचलेला धडा माझ्या कानी पडतो, तो क्रांतीचा मंजुळ सूर मला आवडतो. कॉलेजातला फॅशनेबल तरुण बसस्टॉपवर अनोळखी म्हातारीला हात देऊन बसमधे वर चढवतो आणि क्यूमधला स्वतःचा नंबर खुशीने गमावतो हे दृश्य मला मोठ्या शहरात दिसते, तेव्हा मला क्रांतीचे स्मित पाहायला मिळते. आजारी मोलकरणीला जेव्हा एखादी मालकीण "तू चार दिवस विश्रांती घे; मी भांडी घासीन", असे सांगताना मला आढळते, तेव्हा गोपद्मासारखी क्रांतीची पावले तिच्या दारी उमटलेली मला दिसतात'

पुलंच्या या विवेकवादाला विज्ञानवादाची जोड होती. 'पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलऱ्याने मारत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलऱ्याची लस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकाने.' असे ठणकावून सांगताना पुलंचा विज्ञानवाद झळाळतो. हाच विज्ञानवादी आपली विचारांची बैठक पुढील वाक्यातून दर्शवतो. पुल लिहतात, 'आपल्या देशात इतके संत जन्माला येण्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा ऍनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणार संशोधक हा अधिक महत्वाचा वाटतो.'

सौंदर्योपासकता हा पुलंचा एक विशेष गुण होता. अतुलनीय निरीक्षणशक्तीतून जाणवलेले सौंदर्य दुसऱ्याला पोचवणे ह्याला त्यांनी आपले कर्तव्य मानले. हे सौंदर्य वसंताच्या गाण्यात त्यांना जसे दिसले तसेच रावसाहेबांच्या शिव्यांत दिसले. एका झाडावर येणाऱ्या पोपटांच्या थव्यात ते होते आणि चिवड्यातल्या शेंगदाण्यातसुद्धा. आगाऊ नामूमध्ये त्यांनी सौंदर्य पहिले आणि चौकोनी कुटुंबातसुद्धा. सौंदर्य द्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे आणि रुद्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे हे आग्रहाने सांगताना देशप्रेमाच्या चुकीच्या कल्पनांचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही. चॅप्लिन जेवढा प्रिय तेवढाच शंकर घाणेकर. फ्लोरेन्समधील चित्रकार प्रिय आणि शर्वरीरॉय चौधरीसुद्धा. चितळे मास्तर प्रिय आणि जपानी प्राध्यपक तनाष्कासुद्धा. हॅम्लेटमध्ये सौंदर्य आहे आणि सौभद्रमध्येसुद्धा. वुडहाऊस जितका प्रिय तितक्याच इरावतीबाई प्रिय. शेक्सपिअर प्रिय आणि गदिमासुद्धा. रसेल मुखोद्गत आणि उपनिषदांचासुद्धा अभ्यास. एकाच सौंदर्यापायी! सौंदर्य टिपताना पुलंनी सौंदर्य हा एकच निकष मानला आणि म्हणूनच पुलंची व्यक्तिचित्रेसुद्धा व्यक्तित्वचित्र जास्त आहेत. आपले पूर्वग्रह, संस्कार आणि सामाजिक परिस्थितीच्या आहारी न जाता नीरक्षीरविवेकबुद्धीने सौंदर्य टिपणे फार कठीण असते. भल्याभल्यांना हे जमत नाही पण पुलंचा सौंदर्यग्राहक आणि सौंदर्यआग्रहक विचार हा सर्व अनिष्टांवर मात करून दशांगुळे पुढेच होता.

सवाई गंधर्वांचे 'तू है मोहम्मद सा दरबार' आणि अब्दुल करीम खां साहेबांचे 'गोपाला मेरी करुना' ऐकताना बाकी कुठल्याही बाबींचा विचार सुद्धा मनात येणे त्यांनी पाप मानले. रामदास, ज्ञानेश्वर आणि तुकारामाचे दाखले देताना तसेच भगवद्गीतेतील वचने उद्धृत करताना त्यांनी आपला निरीश्वरवाद कधी मध्ये येऊ दिला नाही. निरीश्वरवादी असूनसुद्धा मला गजाननाची मूर्ती आवडते असे लिहताना किंवा कोलंबोतल्या बुद्धासमोर नतमस्तक होताना सौंदर्याची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हाच भाव. पंढरीच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात त्यांना जे सौंदर्य दिसले तेच आनंदवनातल्या बोटे झडलेल्या माणसात. त्यामागील विचारांची चिकीत्सा किंवा खिल्ली उडवण्यापेक्षा त्यामागील सौंदर्य हुडकून ते दाखवण्यात पुलंच्या विचारांची जातकुळी दिसते. ह्याचा अर्थ पुलंनी बोटचेपेपणा किंवा लाळघोटेपणा केला असा मुळीच नाही. पुरस्कार स्वीकारताना त्यामागील दंडेलीशाहीचे वास्तव जगासमोर आणण्यास ते कुचरले नाहीत की आणिबाणीविरुद्ध आगपाखड करताना मागेपुढे पाहिले नाही. सेन्सॉरशिपची अपरिहार्यता सांगतानासुद्धा पुल म्हणाले होते की, 'प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची सेन्सॉरशिप आहे. एका गोष्टीला मात्र माझा विरोध आहे. सत्तेचा जो पक्ष असेल त्याचे तत्त्वज्ञानच सांगण्याची परवानगी आणि इतर तत्वज्ञाने सांगण्याची परवानगी नाही, अस जर सेन्सॉरशिप असेल तर ते मात्र लेखकाने फोडून काढले पाहिजे असे माझे मत आहे. कुठल्याही एका विशिष्ठ तत्वज्ञानाचा आग्रह धरणारे सरकार हे मी कधीही मान्य करणार नाही. हे म्हणजे माणसाला गुदमरून टाकण्यासारखे आहे. मला ज्याप्रमाणे लिहण्याचे स्वातंत्र्य पाहिजे तसेच न लिहण्याचे स्वातंत्र्यसुद्धा पाहिजे.' जेव्हा अनिष्ट गोष्टी समजत घडत होत्या तेव्हा त्यांचा समाचार घेण्यास ते चुकले नाही आणि वेळीप्रसंगी आपली सर्व सांस्कृतिक ताकद पणाला लावून हा विचारवंत त्या त्या गोष्टीतील सौंदर्य दाखवण्यास पुढाकार घेता झाला. मर्ढेकरांच्या कवितेंच्यामागे पुल उभे राहिले. आंनंदवनातल्या आनंदमेळा यशस्वी होण्यासाठी पुल उभे होते. बालगंधर्व आणि बालगंधर्व रंगमंदिरामागे पुल उभे होते. मराठी विज्ञान परिषद, NCPA, टिळक मंदिर, मुक्तांगण अशी किती नावे घ्यावीत! विविध ठिकाणी सौंदर्याचा साक्षात्कार होत असताना त्याबरोबरील विसंवादी बाबींची दखल घेण्यास पुलंनी कधी दिरंगाई केली नाही. संगीतातली अप्रतिम जाण असल्याने वादी-संवादी सुरांना बरोबर घेऊनच जायचे असते हे त्यांना पक्के माहित होते. आजच्या एका सापेक्षी दुर्गुणाबरोबर माणसाचे अस्तित्वच नाकारणाऱ्या जगात ह्या विचारांचे मोल फार आहे. मदर तेरेसांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या संततिनियमनाच्या भूमिकेवर टीका ते करू शकले. विष्णु दिगंबराच्या आणि भातखंड्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यातील उणिवा त्यांनी नजरेस आणल्या. आदरणीय विनोबांवर आमीत्यतेने लिहले पण त्यांच्या 'अनुशासन पर्व' ह्या उद्गाराचा समाचार घेतला. स्वतःचे श्रद्धास्थान असलेल्या बालगंधर्वांच्या उतारवयातील नाट्यप्रवेशांवरसुद्धा त्यांनी टीका केली. अशा वेळी त्या त्या प्रसंगावर भाष्य करणे जरुरी असते पण त्यासाठी त्या व्यक्तीचा आणि कार्याचा अनादर न होऊ देणे ह्याला एक वैचारिक अधिष्ठान लागते. विचारांचा सामना विचारांनी करावा त्यासाठी लाठी घेऊन धावण्याची किंवा चिखलफेक करण्याची गरज नसते हे पुलंनी सप्रमाण दाखवून दिले. या विचारांपायी हा सौंदर्यउपासक गांधींवर लिहू शकत होता आणि सावरकरांवर भाषण करू शकत होता. नाथ पै, अत्रे, SM, लोहिया, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, सेनापती बापट अशा विविध विचारधारेच्या व्यक्तींवर भाष्य करताना त्यांच्यामागील सौंदर्यतेचा साक्षात्कार पुल सशक्तपणे दाखवून देतात. 'जो जो जयाचा घेतला गुण' हाच भाव.

ह्या सौंदर्यउपासकाच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आले की आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थानाचा विचार करून एखादा मूग गिळून गप्प बसला असता पण पुल बाह्य सरसावून पुढे झाले. ह्यामागे त्या सौंदर्याचा मला जो साक्षात्कार झाला तो तुम्हालाही व्हावा हा उद्दात हेतू होता. लंडनच्या आजीबाईंसमोर गणपतीची आरती म्हणणे असो की वस्त्रहरण नाटकाची स्तुती करणे असो. तमाशापरिषदेचे अध्यक्षपद असो की कोसलाची स्तुती असो. 'शाहिरी लावण्या आणि बिलोरी बांगड्या' असणाऱ्या मराठीवर पुलंनी निरतिशय प्रेम केले पण म्हणून दुसऱ्या भाषांचा किंवा बोलीभाषांचा दुस्वास नाही केला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातल्या भाषणात पुल म्हणतात, "जगातल्या प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाची किंवा साहित्यातली प्रत्येक गोष्ट सर्वांच्या तोंडी असलेल्या भाषेत यावी असा दुराग्रह मी करत नाही. मला इंग्रजी कळतं म्हणून इंग्रजीत लिहलेला आईन्स्टाईनचा सिद्धांत कळतो किंवा सर्व शब्द कळत असूनही मराठी कविता कळते असे नाही. पण शब्दांच्या बाबतीत तो शब्द संस्कृतमधील असला, तर तो अधिक सभ्य आणि त्या जागी मराठीतला रूढ शब्द असला, तरी तो गावरान म्हणून काढून टाकण्याचा जो प्रकार आहे तो मला समजू शकत नाही". बोलीभाषेचा आदर करताना पुलंनी कोंकणी हि स्वतंत्र भाषा नाही हे ठासून सांगितले. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यातील बलस्थाने तसेच मर्यादा दाखवताना त्यातील सौंदर्य महत्वाचे असते हे सहज दाखवले. प्रमाण भाषा आणि बोली भाषा दोन्ही महत्वाच्या पण त्या दोहोंच्या मर्यादासुद्धा लक्षात घेणे महत्वाचे. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची मर्यादा असल्याने त्याचे सौंदर्यमूल्य कमी होत नाही हे पुलंना उमगले होते आणि ते आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न त्यांनी मनापासून केला. रूढी-परंपरा-नियम ह्या बाबी पुलंनी सौंदर्याच्या साक्षात्कारापुढे गौण मानल्या. म्हणूनच कुमारांनी जेव्हा भूप रागात शुद्ध मध्यम लावला, किंवा पहाटे मारवा गायला, अथवा बालगंधर्वांनी बिहागाला कोमल निषाद लावला म्हणून अब्रह्मण्यम मानले नाही. हे सर्व करताना एखादा नकारात्मक सूर लागणे साहजिक असते पण हा स्वर पुलंनी शिताफीने टाळला. पुलंच्या प्रत्येक आविष्कारात एक आशावादी सूर असतो. विसंवादी सूर दाखवतानासुद्धा विरोधासाठी विरोध हा पुलंनी कधीच केला नाही. जी वृद्ध पिढी असते तिचे हल्लीच्या पिढीबद्दल तक्रार करणे हे वार्धक्याचेच लक्षण आहे असे म्हणणाऱ्या पुलंनी तरुणाईचे आणि नावीन्याचे स्वागतच केले. दीनानाथांचे कौतुक तसेच भीमसेनचे आणि तसेच अश्विनी भिडे-देशपांडेचेपण. केशवराव दात्यांचे कौतुक तसेच विजया मेहतांचे आणि तसेच अतुल परचुरेचेसुद्धा. जुने जरी उगाळत बसले नसले तरी जुने जाऊ द्या मरणालागुनी असे सुद्धा म्हटले नाही. एखाद्या कलेची किंवा असामीची कालनिरपेक्ष आनंद देण्याची शक्ती पुल जाणून होते

हे सौंदर्य हुडुकुन काढताना आणि तो दर्शविताना पुलंचा सर्वसामावेशकपणा सौंदर्याची खोली दर्शवतो. पॅरिस बद्दल पुल लिहतात, 'पॅरिस म्हणजे केवळ 'त्या रम्य रात्री' नव्हेत. केवळ ती निशामंडळे नव्हेत.- इथे लोकशाहीचे पहिले उष:सूक्त गायिले गेले. इथे एका झोलासारख्या साहित्यिकाने आपली लेखणी अन्यायाविरुद्ध तलवारीसारखी उगारली. इथे सोरबॉ विद्यापीठात उन्मत्त यौवन ग्रंथसंग्रहालयात नतमस्तक होऊन तासच्या तास समाधिस्थ झालेले दिसते आणि इथेच प्रस्तूसारख्या लेखकाने जीवनातला क्षण न क्षण पिंजण्याचा विराट प्रयत्न केला. आजही 'सारा बर्नहार्ट' थिएटरात मोलिअर लोकांना हसवतो आहे. ह्या शहराच्या अंतःकरणात दाटलेल्या सीन नदीने जे पाहिले ते जगातल्या फार थोड्या नद्यांनी पहिले असतील.'

पुलंवरच्या अनेक लेखांत त्यांना आनंदयात्री असे संबोधले आहे. हे अतिशय चपखल वर्णन आहे. त्यांच्या प्रत्येक लेखात, भाषणात, नाटकात, चित्रपटात, आणि आविष्कारात ह्या आनंददायी विचारांची पखरण सहज जाणवून येते. अगदी हुक्क्याचे झुरके घेणाऱ्या काकाजींपासून अमीनाचे गाणे ऐकणाऱ्या भैया नागपूरकरापर्यंत. दिनेशच्या बोबड्या बोलांत जसा आनंद आहे तसाच तर्कतीर्थांच्या ज्ञानोपासनेत आहे. आनंद घेणे आणि आनंद वाटणे ह्या विचारांवर पुलंनी निरतिशय प्रेम केले. जेथे जेथे हा आनंदाचा झरा त्यांना जाणवला तेथे तेथे ते समरसून गेले आणि हा आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोचवायला कष्ट उपसले. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे, हे लक्षात ठेवणं हेच पुलंनी माणुसकीचे लक्षण मानले. ह्या आनंदरंगात बाकी कुठल्याच मानवनिर्मित बंधने गौण ठरतात हे पुलंनी वारंवार दाखवून दिले. ह्या आनंदसागरात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांचे ऋण पुलंनी मानले आणि यथोचित कृतज्ञता व्यक्त केली. मग देवधर मास्तरांच्या भाषणात त्यांच्या पत्नीला वंदन करणे असो की कुरुंदकरांवरील पुस्तकाविषयी बोलताना ग्रंथ छपाईबद्दल तारिफदारी असो. अगदी केसरबाईंच्या गाण्याचे कौतुक करतानासुद्धा श्रीपाद नागशेकरच्या तबल्याचा उल्लेख येतोच. शेवटी विंदांनी पुलंना एका पत्रात म्हटलेच आहे की 'आनंद घेत घेत आनंद देणे आणि आनंद देता देता आनंद घेणे हे तुझ्या सगळ्या लिखाणाचे, कार्यक्रमाचे आणि आयुष्याचेच प्रधान सूत्र आहे.'

तळटीप - या लेखातील पुलंचा उल्लेख पुल आणि सुनीताबाई असा नाही वाचला तरी चालेल. सुनीताबाई हे एक स्वतंत्र विचारांचे सहृदय व्यक्तिमत्व होते. त्या एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत.

ता. क. - अक्षरास हसू नये.

'ह्या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीय' ह्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत,

-पिनाकीन गोडसे

पूर्वप्रसिद्धी- हितगुज २०२१ (दिवाळी अंक- महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया)

2 प्रतिक्रिया:

anamika said...

You are great at conveying things literally

Pinakin Godse said...

Thank you