मला पाह्यला आवडतात माणसे! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे. विशेषत: पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विट्याहून अष्ट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !
अश्याच प्रेक्षणीय माणसांच्या यादीतली माझी आवडती माणसे म्हणजे रस्त्यावर खडी किंवा डांबर पसरून, तांबड्या फडक्याचा बावटा रोवून जवळच्या एखाद्या झाडाखाली तंबाखू चोळीत बसणारे मजूर ! ह्यांचेही विषय अफाट असतात. सारांश काय, माणसाने माणूस पाहावा ! तरुण पाहावा, म्हातारा पाहावा, सुरूप पाहावा, कुरूप पाहावा. पुष्कळदा वाटते की, जीवनाविषयीचे चिंतन माणसांच्या गर्दीत होते तसे एकान्तात होत नाही.
परदेशच्या प्रवासात मला सगळ्यांत अधिक ओढ होती ती तिकडची माणसे पाहण्याची, त्यांच्याशी बोलायची. पण हे कलम म्हणावे तसे जमले नाही. 'भावबंधना'तल्या धुंडिराजाच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'जो तो आपला ह्यात ! ' बरे, जी ओळखपाळख झाली ती सुंदर शिष्टाचारांचा मेकप करूनच बोलायची. तुम्ही किती चांगले, आम्ही किती चांगले, यापुढे भाषणाचे तट्रू पुढे सरकायचेच नाही !
- पु. ल. देशपांडे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment