Tuesday, November 28, 2023

बहिणाईचे देणे

बहिणाबाईंच्या काव्याबद्दल मी अभिप्राय काय लिहिणार? जिथे 'झरा मुळचाचि खरा' याचा प्रत्यय येतो, तिथे शब्दांनी त्या अनुभूतींना प्रकट करणे अशक्य असते. 'देख ज्ञानियाच्या राजा/ आदिमाया पान्हावली सर्वाआधी रे/ मुक्ताई पान्हा पीइसनी गेली।' हे बहिणाबाईंनी मुक्ताईसंबंधी म्हटले आहे. तेच मी बहिणाबाईंच्या बाबतीत म्हणेन. 'रुक्मिणीच्या तुलसीदलाने ब्रह्म तुळीयेले' बहिणाईच्या एकेका ओवीला मराठी भावकवितेच्या संदर्भात त्या तुलसीदलाचेच मोल आहे.

कवितेचे दळण घालणारे असंख्य असतात. पण सुखदुःखाच्या जात्याचे दळण मांडून त्यातून कविता देणारी बहिणाई 'मनुष्याणाम् सहस्रेषु' अशी एखादीच. जीवनात अपरिहार्यपणाने येणारे भोग मराठी भाषेच्या इतक्या लडिवाळ स्वरूपात सांगणारी बहिणाई उत्कट वात्सल्याने आम्हाला आंजारीत गोंजारीत, खेळत, हसवत गीताईच सांगून गेली, व्यास- वाल्मिकींच्या विद्यापीठातल्या या दुहितेने त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मंथन कसे आणि कधी केले, ते बहिणाबाई जाणो आणि तिचे ते जाते जाणो.

जात्यातल्या पिठाच्या भाकरीबरोबर विचारमंथनातून आलेला लोण्याचा गोळा आमच्या हाती ठेवून बहिणाबाई गेली. तो वारंवार चाखावा आणि वयाचा हिशेब विसरून बाळगोपाळ होऊन जीवनसरितेच्या काठी हुतुतु-हमामा घालावा. बहिणाईचे हे देणे आम्ही लेणे म्हणूनच वागवतो.

(पुलंच्या एका पत्रातून )
-आणखी पु.ल.


Saturday, November 18, 2023

मी आणि पु.ल. - (सई ललित)

मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.

कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं सामर्थ्य त्यांच्या मधे आहे.

मी तर पुल वाचायच्या आधी त्यांच्या कॕसेटच (अलुरकरांच्या ) ऐकल्या होत्या . एवढा प्रसन्न खेळकर चतुर मिस्कील बावळट भासणारा विनोदी माणूस मी पहिल्यांदाच कानांनी बघत होते. मग दहावीला असताना बटाट्याची चाळ मधला एक लेख भ्रमणमंडळ धडा म्हणून अभ्यासाला आला.तो शिकवत असताना (माझी आईच दहावीला मराठी शिकवायची ) आम्ही सर्व जण वर्गात किती हसलो होतो.


माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे होते.सार्वजनिक जीवनात ते दिलखुलास असले तरी घरी बडबड त्यांना चालायची नाही. त्यांनीच नवीन टेपरेकॉर्डर आणि ह्या कॕसेट त्या काळी आणल्या होत्या .ही गोष्ट मला महान आश्चर्याची वाटली होती.आणि बाबा त्यातले विनोद ऐकून उघडपणे हसत होते.ते बघून शोले मधला गब्बरसिंग हसल्यावर जसे बाकीचे दरोडेखोर सावकाशीने घाबरत घाबरत हसतात तसे आम्ही हसलो होतो.हे बघून आईला पण हसु आवरत नव्हतं ! मग हळुहळु भीड चेपत गेली.बाबांना पुल आवडतात म्हटल्यावर पुलं बद्दलचा आदर सहस्त्र पटीने वाढला.कारण पुलं मुळे आम्ही घरात मोठ्याने हसु शकलो.

काॕमेडीचं एक वेगळं दालन कॕसेटच्या रुपात खुलं झालं .( बाय द वे अंध मुलांच्या शाळेत या आॕडीओ कॕसेट लावल्या जातात का ? नसतील तर जरुर लावाव्यात.) अजूनही घरात काही कॕसेटी असतील.पोटात लांबलचक आतडी असलेल्या या कॕसेटी तेव्हा घरोघरी दिसायच्या.मधेच ते आतडं बाहेर पडायचं मग आम्हीच ते सर्जन होवून हिराने नीट आत ढकलायचो. आमची सर्जनशीलता अशी बहराला यायची.

पुलं बरोबरच वपु काळे होते. शिवाजीराव भोसले होते.ते पण ऐकायला आवडायचे.पण पुलंची जादू वेगळीच होती.घरेलु प्रसन्न वातावरण त्यात खेळत असायचं. एकतर त्यांना नेहमी सोताकडे कमीपणा घ्यायची सवय.त्यामुळे चला हा माणूस आपल्या सारखाच आहे.असं तेव्हा वाटायचं .आपुलकी वाढीस लागली होती.आता कळतय ते बावळट नव्हते आणि नाहीत.पण फार व्यवहाराने किंवा काटेकोरपणे जगणे त्यांच्यातल्या माणसाला अवघड जायचं . असं जगून आपण काय साधणार हा त्यांचा साधा विचार असावा.

लबाड, ढोंगी, स्वार्थी ,उथळ ,कद्रु ,दिखावू ,मत्सरी, आपलं तेवढं साधून घेणाऱ्या अति शहाण्या माणसांना ते ओळखून होते. नाही असं नाही.पण त्यांना उघडं पाडणं त्यांच्या जीवावर यायचं. या अर्थाने ते आळशी होते.कारण एकदा वैर पत्करलं की ते झक मारत जोपासत ठेवावं लागतं. डाव प्रतिडाव, शह प्रतिशह लय राबणूक असते. त्यापेक्षा साधी माणूसकी जोपासायला सोपी. हिणकसपणाची कलाकुसर करावी लागत नाही.

शिवाय आपल्या समोर कुणाचा चेहरा पडलाय..किंवा आपल्या मुळे कुणाची मानहानी झालीय , कुणी तोंड फिरवलय ही गोष्ट त्यांना अजिबात रुचायची नाही. या बाबतीत मी अगदी पु.लं.सारखीच आहे.
काही माणसांना मात्र दिवसातून चार माणसांचे तरी धडधडीत अपमान केल्याशिवाय..आणि दहा एक माणसांचे चेहरे पाडल्या शिवाय अन्नच गोड लागत नाही.आणि त्यालाच ती आपली बुध्दीमत्ता समजतात.
ज्याला ज्यात आनंद आहे ते करुदेत. आपण मात्र त्यांच्या पासून लांब राहायचे. कदाचित असल्या माणसांशी डावपेच खेळत राहण्यापेक्षा तो वेळ साहित्य ,नाटक , गाणं बजावणं यात सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार असावा.
     
पुलंचं आणि माझं एक महत्वाचं साम्य म्हणजे माझे पुढचे दोन दात सेम पुलं सारखे आहेत. आम्हाला खाण्या विषयी असलेली आवड..म्हणजे केवळ पदार्थ खाण्याविषयी नाहीतर पदार्थ करण्याचं जस्ट मनात आल्या पासून ते खिलवण्या पर्यंतचे सर्व प्रकारचे सोपस्कार..वगैरे वगैरे आणि वगैरे.

पुलंना विनोदी लेखन करायला खूप आवडायचं.ते करताना त्यांच्या मनावर कसलाही ताण नसायचा.ते अगदी सहज असायचं .माझं सुध्दा अगदी सेम असं..असं म्हणण्याचा मी महाआगावूपणा करणार नाही. पुलं जबरदस्त परफाॕर्मर होते..हा गुण त्यांना इतर विनोदी लेखकांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या हार्मोनियम वादनाचं संगीत प्रेमाचं आणि अभ्यासाचं.लहानपणी खूप संगीत ऐकून ऐकून आपोआप अभ्यास झाला असं ते म्हणतात .पण तो नुस्ता अभ्यास नाही..रसिला अभ्यास आहे.अभ्यास म्हटलं की एक प्रकारची रुक्षता निदान मला तरी जाणवते.ती यात दिसत नाही .एका रसिक आनंदाची निर्मळ देवाणघेवाण यात दिसते. वादक लोक न बघता पेटी वाजवतात याचं मला कमालीचं आश्चर्य वाटतं !आम्हाला दोन डोळे सताड उघडे ठेवले तरी धोंडे काय वाजवता येत नाही. त्यात पुल पट्टीचे सुरेल वाजवणारे..!संगीताची आवड ज्ञान आणि त्यांना अवगत असलेली कला यामुळे त्यांना आयुष्याचा आनंद शतपटीने घेता आला.

खरोखरच ही दैवी प्रतिभाच होती. पुलंच्या साहित्याचं जर पारायण केलं तर तत्वज्ञानाची वेगळी पुस्तकं वाचायला नकोत. पुलंची पुस्तकं एक प्रकारे मानसिक समाधान वाढवणारी आहेत. पुलं वाचलेला पचवलेला माणूस आत्महत्या करुच शकत नाही.हे त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून..मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांची पुस्तकं नियमीत अभ्यासाला लावली पाहिजेत..असं माझं आपलं अभ्यासू मत आहे.

- सई ललित

Wednesday, November 8, 2023

मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)

सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .

पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचे काम सुरु ठेवलं होतं. त्यानंतर पुलंच्या जन्मदिनी आणि स्मृतीदिनी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील त्यांच्या घरी जाऊन सुनीताबाईंशी गप्पा मारण्याची अनेकदा संधी मिळाली . प्रत्येकवेळी त्यांनी हसतमुखाने स्वागतच केले.

या जगाचा निरोप घेताना देखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यात त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचे कळाले . अनेकजण वैकुंठकडे धावले, परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यामुळे माझ्याप्रमाणेच अनेकांना सुनीताबाईंचे अंतिम दर्शन झाले नाही .आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ अगदी काटेकोरपणे पाळली होती ! वैकुंठभुमीतील त्या अग्नीतून धुराचे लोट हवेत विरत होते…. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी पुलंच्या एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, " पोहचली आपली सुनीता पुलंकडे !" सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना 'मालती-माधव' इमारतीवरील नीलफलकाकडे पाहून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात . या दांपत्याने आपल्याला दिलेल्या ' मनोहरी आठवणी ' कायम तशाच राहतील.

- डॉ. वीरेंद्र ताटके

Wednesday, November 1, 2023

वो फिर नही आते...! - (संजीवनी इतक्याल)

आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.

आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.

पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.

मी मधू गानू यांचं 'सहवास गुणीजनांचा ' हे पुस्तक वाचत असताना "पु ल देशपांडे" यांनी "मधू गानू" यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत नाहीत. पण हे पत्र मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.

या पत्राचं वैशिष्ट्य असं की हे पत्र पुलंनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिले आहे. त्यात निरवानिरवीची भाषा आहे. इतरांसाठी पुलंनी आणि सुनीताबाईंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे पत्र आपल्या घरातीलच कोणी वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला लिहिलं आहे असं वाटतं.

या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. "मधू गानू" हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात -

'' ...माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ' मधू मेला ' अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये... तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. "

पुल पुढे लिहितात, " हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा... "

असे खूप काही सुंदर या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.

पण हे पत्र वाचल्यावर मला "किशोरकुमारने" गायलेलं

'जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते...'

हे 'आपकी कसम' या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.

- संजीवनी इतक्याल