Friday, April 19, 2024

ऑल राउंडर पु. ल. - (नरहर कुरुंदकर)

आमचे मित्र पु. ल. देशपांडे हे मराठी जीवनातील एक दृष्ट लागण्यासारखे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमा उद्योगात पु. ल. ज्या वेळी शिरले त्या वेळी क्रमाने 'ऑल राउंडर' होण्याचा त्यांनी प्रयल केला. ते नट होते, दिग्दर्शक होते, पटकथा-लेखक, संवादलेखक, गीतकार, संगीत-दिग्दर्शक अशा नानाविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शेवटी 'गुळाचा गणपती' सारखा एक चित्रपट तर असा आहे की ज्याचे नायक, दिग्दर्शक, पटकथालेखक असे अनेक विभाग एकट्याने सांभाळून पु. लं. नी एकखांबी तंबू तयार केला.

प्रतिभेचा चौरसपणा
नाटकाच्या क्षेत्रात ते पुन्हा नाटककार, नट, कुशल दिग्दर्शक या सर्व भूमिकांतून चमकलेले आहेत. पडदे ओढणारा आणि प्रॉम्प्टरपासून नाटककार आणि प्रमुख नट इथपर्यंत त्यांचा संचार चालतो.

संगीताच्या क्षेत्राशी पु. लं. चा घनिष्ठ संबंध आहे. गायनाचा क्लास कोण्या एकेकाळी त्यांच्या चरितार्थाचा विषय होता, गायनातील नानाविध बारकावे, हरकती त्यांच्या हातात व गळ्यात मुरलेल्या आहेत. संगीताचा विवेचक अभ्यासही त्यांनी बराच केला आहे. यादृष्टीने श्री. मारुलकर यांच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहण्याजोगी आहे.

रेडिओ आणि टेलिव्हिजन यांचेही तज्ज्ञ म्हणून पु. लं. कडे पाहिले जाते. ते कलावंत आहेत तसेच हाडाचे रसिक आहेत. केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख त्यांच्या अस्सल रसिकतेची साक्ष पटवतील. हाडाचा कलावंत आणि तितकाच दिलदार रसिक हा योग फार क्वचित जुळणारा असतो. इतरांच्या क्षेत्रांत पु. लं.चा शिरकाव आहे. तसे त्यांचे स्वतःचे एक खास क्षेत्र आहे. एकपात्री प्रयोग सौ. मुळगावकरही करतात; पण 'बटाट्याची चाळ'ला जे प्रायोगिक आणि कलात्मक यश आले त्याला महाराष्ट्रात तर दुसरी तोड सापडणे कठीण आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे वाकडे आहे असे म्हणतात. व्यवहारी न होता व्यवहार सांभाळणे, अस्मिता न सोडता धन पायाशी खेचून आणणे आणि जीवनाचा रसिक आस्वाद घेऊन कंटाळण्याचे निमित्त सांगून गर्दीत चालणारे एकपात्री प्रयोग बंद करणे हे भाग्य मराठीत फक्त पु. लं. नाच मिळाले. छापलेल्या कथा केवळ वाचून दाखविण्यासाठी हजार रुपये मागणारे जसे पु.ल.च, तसे चाळीस हजार रुपये रक्तपेढीला देऊन मराठी साहित्यिकांचा साहित्य सेवेवर घडलेल्या दानाचा उच्चांक निर्माण करणारे पुन्हा पु.ल.च !

याखेरीज ते साहित्यिक आहेत नाटके, एकांकिका, विनोदी लेख, व्यक्तिरेखा, प्रवासवर्णने आणि गप्पाशप्पा हा पसारा तर आहेत; बाजूला विविध विषयांवर त्यांचे फुलणारे वक्तृत्त्व आहे. इतिहास-संशोधनापासून सेवादलापर्यंत आणि चित्रकलेपासून रक्तपेढीपर्यंत जागृत नागरिकांची सर्व कर्तव्ये सांभाळणारे, ज्ञानाविषयी आस्था असणारे आणि कलांची आस्था असणारे चौरसपण पु. लं. ना लाभलेले आहे. याबाबत त्यांच्याशी तुलना करता येईल असा दुसरा माणूस सापडणे फार कठीण

पु. लं. भोवतीचे कुंपण
एवढा मोठा चौरसपणा माणसाचा व्याप वाढवतो, आवाका वाढवतो तसाच त्याच्या मर्यादाही निर्माण करतो. पु. लं. ना. आता अशा मर्यादा निश्चित पडलेल्या आहेत. या मर्यादाच्यावर मात करण्याची फार मोठी सुप्त शक्ती त्यांच्याजवळ आहे, हे खरे असले तरी ठिकठिकाणी पडलेल्या मर्यादा ओलांडण्याची जिद्द आणि इच्छा त्यांच्याजवळ किती आहे हाच एक महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. नानाविध वाटांनी फुलणारे विस्तृत व्यक्तिमत्त्व हेच आता पु. लं.च्या भोवती कुंपण होऊन बसले आहे. या कुंपणावरून किती वेळा बाहेर उडी घेणे पु. लं. ना जमेल याचे उत्तर त्यांनी स्वतः द्यायचे आहे.

गौरव हाच शत्रू
महाराष्ट्राचे विनोदकार म्हणून सर्वत्र पु. लं. चा गौरव होत असतो. हा गौरवच या माणसाचा शत्रू ठरेल की काय अशी मला भीती आहे. मराठीतील विनोदाची परंपरा प्रामुख्याने बौद्धिक व रूक्ष आहे. न आवडणाऱ्या समाजविघातक घटनेची विविध प्रकारे चेष्टा करणे, टर उडविणे, रूढींना हास्यास्पद करून टाकणे किंवा दाखविणे असे आरंभीच्या मराठी विनोदाचे स्वरूप आहे. विनोद कोटीनिष्ठ असो, प्रसंगनिष्ठ असो की स्वभावनिष्ठ असो हास्यास्पद करून दाखविणे या जिद्दीची मर्यादा विनोदाला पडली आहे. कोल्हटकरांच्या सारख्या विनोदकाराच्या लिखाणात आपण हिंदूसमाजातील रूढींना हसतो. गडकरी आणि चि. वि. जोशी यांचा विनोद पाहत असताना आपण फजित झालेल्या, बावळट ठरलेल्या माणसाला हसत राहतो. कधी कधी एखाद्या कोटीमुळे लक्कन जाणवणाऱ्या विसंगतीकडे पाहून आपण हसतो; पण विनोदाची ही सारी रूपे स्थल-काल-समाजाने बद्ध केलेली आणि बौद्धिक रूपे आहेत. पु. लं.च्या लिखाणातील पुष्कळसा विनोद असाच आहे. चि. वि. जोशी, गडकरी, कोल्हटकर, वि. मा. दि. पटवर्धन यांच्या विनोदाची सर्व सामध्यें पु. लं.च्या ठिकाणी एकत्रित दिसू लागतात. या अर्थाने पाहिले म्हणजे मराठीतील विनोदाच्या मागच्या सर्व परंपरांचा पु. लं.च्या ठिकाणी समुच्चयाने आढळ दिसून येतो, पण असे असूनही चि. वि. जोशी किंवा कोल्हटकर यांच्या विनोदाला जो भरघोसपणा आहे, तसा पु. लं.च्या विनोदाला प्राप्त झालेला दिसून येत नाही. सुटे सुटे हसण्याजोगे प्रसंग एकजीव होऊन त्यातून विनोदाचा एक सलग पट उमलावा लागतो तसा सलगपणा अजून पु. ल.त नाही. त्यांच्या विनोदाचे स्वरूप अजूनही फुटकळ आहे. हा सलगपणा न जाणवण्याचे कारण लेखकाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अविछिन्न असणारी संगती अजून पु. लं.ना साधलेली नाही; या ठिकाणी आढळेल असे मला वाटते.

पु. ल. हे पु. ल. होण्याचे टाळत आहेत
पण माझी खरी तक्रार ही नाही. पु. ल. देशपांडे यांना चि. वि. जोशी, कोल्हटकर होता आले असते; पण तसे ते झाले नाहीत ही खरोखरी तक्रारच नव्हे. कारण पु. लं. नी कोल्हटकर, चि. वि. जोशी व्हावे अशी आमची इच्छाच नाही. माझी मुख्य तक्रार आपल्या नानाविध घाईगर्दीत पु. ल. हे स्वतः पु. ल.च होण्याचे टाळत आहेत, ही आहे. स्थळकाळाने आणि समाजाने, रूढींनी बंदिस्त केलेला असा माणूस असतोच; पण याच्यापलीकडे माणसाचे माणूसपण दडलेले असते. रूढींनी निर्माण झालेली परिहार्य मानवी दुःखे, वेदना असतातच; पण माणसाच्या माणूसपणामुळेच निर्माण झालेली दुःखे ही अधिक खोल व थक्क करणारी असतात. वेदनेचा हा मूलकंद जसा माणूसपणाच्या गाभ्यापर्यंत जाऊन भिडलेला असतो तिथेच हास्याचाही मूलकंद जाऊन भिडला पाहिजे. भावनेच्या पातळीवर विषण्ण होणे, सुन्न होणे हे जसे माणसांनाच शक्य आहे तसे हसणेही माणसांनाच शक्य आहे. जनावरांच्यासाठी 'Pain' आहे पण 'Sorrow' नाही आणि 'Pleasure' आहे पण 'Laughter' नाही. माणसाच्या माणूसपणाच्या साक्षीदार असणाऱ्या या मूलभूत ठिकाणापर्यंत जेव्हा विनोद जातो त्या वेळी तो वेदनेत, अनुकंपेत भिजून चिंब झालेला असतो. सहानुभूती, हळुवारपणा, दुःख, अनुकंपा, कीव ही ज्या विनोदाचा पाया आहे त्याचे स्वरूप मग केवळ बौद्धिक राहत नाही; ते तर्काची दारे ओलांडून आत्म्याइतके खोल जाते आणि वेदनेच्या दर्शनाप्रमाणेच एकाच वेळी माणसाला उल्हसितही करते आणि गुदमरूनही टाकते. मराठीला अनोखी असणारी विनोदाची ही पातळी पहिल्यांदा पु. लं.नी गाठली. या पातळीवर स्थिर होणे त्यांना जमत नाही; किंबहुना हे करणे त्यांना मनापासून फारसे महत्त्वाचे वाटत नाही, अशी माझी तक्रार आहे. या आपल्या हक्काच्या वैभवासाठी जागेवर पाय रोवून घट्ट उभे राहण्याइतकी पु. ल. स्थिरताच दाखवायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचा चौरसपणा त्यांचा शत्रू होईल की काय, व्यापकपणा कुंपण होईल की काय अशी मला भीती वाटते.

पु. लं. चा मराठीत विनोदकार म्हणून गौरव होत असताना त्या विनोदाचे हे स्वरूप प्रायः कुणी लक्षात घेत नाही. कुठलाही विनोदकार चमकदार बुद्धीचा आणि मिष्किल असतो. तसा बौद्धिक चमकदारपणा व मिष्किलपणा पु. लं.च्या जवळ आहे; पण कोल्हटकरांच्या विनोदाचा रोख अंधःश्रद्धांनी जखडलेल्या समाजाला परंपरांची हास्यास्पदता दाखविण्याकडे होता. एका दृष्टीने त्या विनोदाचे प्रयोजन पुढे नेणे असे होते. पु. लं. चा विनोद यापेक्षा निराळा आहे. पुढे जाता जाता ज्या वेळी माणूस यंत्रच होऊ लागतो, त्याचे जीवन पोकळ होऊ लागते आणि निवडुंगाला कॅक्टस म्हणून कुंडीत जपण्याची व त्या आधारे आपली कलाप्रीती दाखवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा या माणसाला 'थोडे थांब या पळण्याच्या घाईत सर्वस्वी पोकळ यंत्र आणि माणुसकीला पारखा होऊ नको असे सांगावे लागते. पु. लं. च्या विनोदाला हह्यामुळे सनातनीपणाची झाक येते असाही आक्षेप कधी कधी ऐकू येतो; पण पुढे जाणे अगर थांबणे या दोन्हींचाही हेतू माणसाच्या स्वाभाविकपणाला असणारे अडथळे दूर करणे इतकाच आहे हे ध्यानात घेतल्यावर सनातनित्वाचा आक्षेप अनाठायी वाटू लागतो. पण खरे म्हणजे शिष्टाचारांच्या विळख्यात जे गुदमरणे आहे ते आक्रंदन पु. लं. च्या विनोदातून मिष्किलपणे साकार होत असते. याहीपेक्षा खोल जाण्याची शक्ती पु. लं. च्या ठिकाणी आहे. वेदनेच्या तळ्यावर मधूनच लाटा उसळाव्यात तसे त्यांच्या विनोदाचे स्वरूप काही ठिकाणी दिसते.

दुःखाचे चित्रण
असा लेखक दुःखाचे चित्रणही फार सामथ्यान करीत असतो. यापूर्वी मराठीत हा चमत्कार गडकऱ्यांनी करून दाखविला आहे. उत्कट दुःख आणि हास्याचा खळखळाट सारख्याच सामथ्यर्थाने गडकऱ्यांच्या नाटकांतून दिसू लागतो. हा पाहून आपण फार तर असे म्हणू की गडकरी ढसढसा रडवू शकत होते आणि खदखदा हसवू शकत होते. दुःख आणि हसू यांचे प्रांत जीवनात इतके वेगळे नाहीत. ज्या ठिकाणी हसणे आणि रडणे या दोन्ही गोष्टी एकच होऊन जातात तिथे आपण जीवनाच्या आकलनात अधिक खोलवर जाऊन पोचलेलो असतो. कधी यातील हास्याचा पापुद्रा एकदम विरळ होऊन जातो आणि मग दुःखाचा सूक्ष्म पण उत्कट आविष्कार प्रभावीपणे जाणवू लागतो. व्यक्ती आणि वल्लीतील 'अन्तू बर्वा' सारखी व्यक्तिरेखा अशी आहे. या व्यक्तिरेखेचा आस्वाद घेताना आपण हसतो आहोत की विषण्ण होतो आहोत, भाबडे प्रेम पाहताना आपण हळुवार होत आहोत की अन्तू बर्व्याची आविष्कारशैली पाहताना आपण 'सिनिकल' होत आहोत हे कळणेच कठीण होऊन जाते. हसता हसताच एकाक्षणी आपल्याला हे लक्षात येते की, आपण हसत नव्हतोच. आपण हा माणूस पाहून सुत्र होत होतो. अंतूची जीवनगाथा ऐकत असताना कणवेचा एक थेंब डोळ्यांत जमू लागतो आणि आपल्या दारिद्र्यावरचे विदारक भाष्य जेव्हा अंतू सांगू लागतो त्या वेळी हा थेंब वाफ होऊन उडून जातो. 'व्यक्ती आणि वल्ली'तील सर्वच व्यक्तिरेखा वाचताना हा अनुभव येतो असे नाही, पण जे अन्तू बर्व्यात साधले आहे ते. इतरत्र बोटातून निसटून गेले ही जाणीव पु. लं.ना कितीदा असते हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या 'सोत्वन' सारख्या एकांकिकेत विनोदाचा हा पापुद्रा अगदी विरविरीत दिसू लागतो आणि मग सर्व प्रतिष्ठा आणि सुख यांनी घेरलेल्या माणसाचे गुदमरून गेलेले दृष्य त्या ठिकाणी साकार होऊ लागते. 'सांत्वन' मधील चित्रण वेदनेच्या बाजूला थोडे अधिक झुकले आहे असे आपण म्हणू शकू तर 'असा मी असा मी'तील चित्रण उथळ हास्याकडे फारच झुकले वा कलले आहे असे आपण म्हणू, अन्तू बर्वा काही जणांना एकदम स्थूल वाटू शकेल. पु. लं.नी निर्माण केलेल्या कलाकृतींच्या यशापयशाविषयी मतभेद होऊ शकतील; पण या ठिकाणी सहानुभूतीच्या कवडशात थरथरणारा अश्रू हाच विनोद म्हणून उभा करण्याचा एक विलक्षण नाजूक प्रयोग घडतो आहे यावर फारसा मतभेद होणार नाही. अशा विनोदाचे आकलन प्रामुख्याने भावनिक असते व ते एकदम माणुसकीच्या गाभ्याजवळ नेते असा माझा मुद्दा आहे. पु. लं.नी केलेल्या या प्रयोगाकडे त्यांना विनोदकार म्हणताना फारसे लक्ष कधी जातच नाही.

(अपूर्ण)
लेखक - नरहर कुरुंदकर 
पुस्तक -  रंगविमर्श

0 प्रतिक्रिया: