Friday, April 17, 2020

गल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. ?

पाचवी-सहावीत असताना मामाने त्याच्या मित्राचा टेपरेकॉर्डर त्याच्याकडील कॅसेट सहित विकत घेतला व तो आमच्याच घरी आणला त्यावेळी गाण्याच्या कॅसेट्स मधून त्याने दोन कॅसेट मला दिल्या व म्हणाला, 'मंद्या तुझ्यासाठी ही 'पुलं' ची कॅसेट आणलीय ती ऐक ! त्यात एका कॅसेटवर 'बिगरी ते मॅट्रिक' व 'म्हैस' तर दुसऱ्या कॅसेटवर 'रावसाहेब' व 'अंतुबर्वा' होते. त्यानंतर पुढची कथाकथने वडीलांनी ऐकायला लावली. तेव्हापासून 'पुलंबागेत' प्रवेश केला. त्यानंतर आजतागायत त्यांची बरीच कथाकथने अतिशयोक्ती नाही हजारो वेळा ऐकली हे अभिमानाने सांगतो पण प्रौढी म्हणून नव्हे तर प्रांजळपणे ! 'पुलं' च्या 'बंदा' रुपयासारखं व रुपयाइतकं असलेल्या साहित्यांत मी फक्त 2-4 पैसेच साहित्य वाचलं-ऐकलं आहे. आजही 'पुलं' चे काही परवलीचे शब्द सर्रास वापरले जातात... घरात मुलींना सतत ऐकत जा म्हणून आग्रह होतो. गेलेल्या एखाद्या मागच्या पिढीतील कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांच्याबद्दल बोलले जाते. मुलींच्या मनातही त्यांची 'आजोबा' ही प्रतिमा तयार झाली आहे.

सध्या सगळीकडे गाजत असलेला 'भाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या पिक्चरला सहकुटुंब जाऊ असे ठरले. नाहीतर बाकीचे बरेच चित्रपट बघू निवांत, ही मानसिकता असते. त्यामुळे पिक्चरला थेटरात गेलो आणि 'गणित चुकल्यासारखा परत आलो' तसे बरेच चेहरे दिसले पण चौकात धाडकन पडल्यावर 'काय लागलं का रे ?' यावर प्रत्येकाचीच 'काय नाही - काय नाही' अशी अवस्था होते तशी झालेली काही 'पुलं प्रेमींची' दिसली ! बाकी पिक्चरमध्ये सुरुवातीचा डोळे ओलावणारा प्रसंग, भाई, आदरणीय सुनीताबाई, भीमसेनजी, गदिमा, कुमारजी, वसंतराव देशपांडे, आचार्य अत्रे, मा. बाळासाहेब ठाकरे, जब्बार पटेल, बाबा आमटे यांच्या भूमिका करणारे सर्वच कलाकार व झकासपैकी छप्पर उडवणारी शेवटची मैफिल एवढेच मनात घर करणारे होते मात्र 'गबाले' थोडंफार 'झेंडे' सारखंच बोलत होते. बाकी 'पुलं' च्या 'रावसाहेबांच्या' भाषेत 'गल्ली चुकलं काय ओ ह्ये पी. एल. ? असच होतं !

खरं तर 'श्यामची आई' नंतर कुणाला न दिसेल असं मुसमुसुन रडायला किंवा खळखळून हसायला गेलो होतो पण दोन्हीपैकी एकही पोटभर झालं नाही. एवढा ! 'अंतुबर्वा' व 'रावसाहेब' या व्यक्तिरेखा 'पुलं' च्या तोंडून ऐकल्यावर माझ्यासारख्या कलाक्षेत्रातील अडाणी माणसाला देखील कोणत्याही मैफिलीत पहिल्या रांगेत बसण्याचं धाडस 'पुलं' साहित्यानं होतं तर तुमच्यासारख्याना ते का कळू नये ? असा प्रश्न निर्माण होतो.

'शतकोनी' 'पुलं' कोणत्याही अंगाने दाखवू शकता त्याला दारू व सिगारेटचाच अट्टाहास कशाला ? प्रत्येकवेळी आपलं तुम्ही काय वाट्टेल ते दाखवायचं व आम्ही निमुटपणे बघायचं. घरी आल्या आल्या धाकटी कन्या म्हणाली 'काय ओ बाबा इतक्या जुन्या काळात 'पुलं' आईसमोर कसे सिगारेट ओढत होते ?' आता तिच्यासमोर काय म्हणून बोंबलायचे ? तुमचा जसा 'अंतुबर्वा' मधील प्रसंगासारखं 'आग्रह नाही आमचा' पिक्चर बघायला या असं म्हणणं असेल तर त्याच प्रसंगातील 'गावात आग्रहाचे बोर्ड टांगलेत' हे त्यावर उत्तर आहे ! त्यातीलच 'ओ जावाईबापू ' .. 'जमला काय एकच प्याला' ? .... 'लागे हृदयी' अगदीच पिचकवणी म्हटलं'...पुढचं 'कशी या त्यजू पदाला' जमले फक्कड तर थाळीत चार आणे जास्त टाकीन' या प्रसंगाचीच आठवण झाली ! 'जमत नाही तर हुंभपणा कशाला ? नवीन पिढीलासुध्दा 'भाई' साहित्यरुपाने प्रिय होतीलच यात माझ्यासारख्याच्या मतांची गरजच नाही. त्यापेक्षा 'पुलं' गेल्यावर तेंव्हाच्या अल्फा मराठीने संत कबिरांच्या दोह्याचं पं. कुमारजींच्या आवाजातील 'उड जायेगा हंस अकेला ।

जग दर्शन का मेला ।।' या टायटल वर एक biography काढलेली सर्वोत्तम होती. अशी एक 'पिंक' टाकतो ... बाकी आम्ही पटलं नाही तर अशाच 'पिंका' टाकणार ! पण 'यमकाचं' ज्ञान नसताना सुद्धा 'ते प्राचीला काय ते शिंदळीच म्हणाला ते त्यात तेवढं 'गच्ची' बसतं का बघा की' असा 'रावसाहेबासारखा' निरागसपणे आग्रहही करणार हे नक्की !

त्यांच्या अनेक साहित्यांमधून त्यांनी सूर्यप्रकाशाइतक स्वच्छ सांगितलं असताना जो दाखवायचा अट्टाहास केला हे बघून 'भाई' सारख्या महान विभूती बद्दल लिहिताना कवी 'संदीप खरे' च्या ओळी ओठांवर येतात -

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो .!

(विशेष सूचना - हा लेख लिहिण्यास मी कोणी मोठा लेखक, साहित्यिक, समीक्षक, दिग्दर्शन किंवा निर्मिती क्षेत्रातील जाणकार मुळीच नाही माझी डिग्री एकच ते म्हणजे 'पुलं प्रेमी' याची नोंद घ्यावी..!)

©मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
9422380146
mandar.keskar77@gmail.com

0 प्रतिक्रिया: