Friday, December 23, 2022

नंदा प्रधान

शनिवारी दुपारी ऑफिस सुटले. फोर्टमधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाची दर्शनी खिडकीपुढे उभा राहून काचेमागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत ह्याला 'विंडो शॉपिंग' म्हणतात. मोठमोठ्या दुकानांतून अतिशय आकर्षक रितीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किंमतीच्या चिठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यांत महाग असते! मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला टाय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऎकून बाहेर पडलो. टायची किंमत तिस रुपये असू शकते हे ऎकून माझा कंठ दाटला होता! आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल याचा विचार करीत होतो. उगीचच! वास्तविक मनगटाला शोभण्याऎवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरीसुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळे चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत; फर्निचरच्या दुकानातल्या त्या त-हेत-हेच्या फर्निचरवर बसलो आहे; मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक दोनशे रुपयांचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला! डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्टक्लासमधून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला!


मी काचेतुन तसाच घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो. तेवढ्याच माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला, आणि आवाज आला, "हलो!"


मी एकदम चमकून मागे पाहिले. "नंदा! हो, नंदा....नंदाच तू---" 

"विसरला नाहीस!" 

नंदाला एकदा ओझरते पाहणारा माणूसदेखील विसरणार नाही. इथे मी तर चार वर्षे कॉलेजमध्ये बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीच विसरू शकणार नाही. पण आज जवळजवळ वीस वर्षांनी भेटलो आम्ही. मुली तर त्याच्यावर खूष होत्याच, पण कॉलेजमधली यच्चयावत मुलेही खूष! नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर,फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल, रोमन नव्हॅरो यांच्या नामावळीत घेत होतो. दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुटीतदेखील होस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान! कॉलेजच्या इंग्लिश नाटकांतून पारशी आणि खिश्र्चन मुलामुलींच्या गटांतून काम करणारा नंदा! 

मी बी०ए० ला होतो, त्या वर्षी नंदाने हॅम्लेटचे काम केले होते.त्यांनतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅम्लेटदेखील सिनेमात पाहिले, पण डोक्यात नंदाचा हॅम्लेट पक्का बसला आहे. इतका गोड हॅम्लेट! फ्रेनी सकलातवाला ओफीलिया होती. नंदा फ्रेनीशी लग्न करणार, अशी त्या वेळी अफवादेखील होती. पण नंदाच्या बाबतीत दर दोन महिन्यांनी अशा अफवा उठत. मला वाटते, कॉलेजातल्या सगळ्यांत सुंदर मुलीशी नंदाचे लग्न व्हावे अशी संर्वाचीच मनोमन इच्छा असावी. ह्या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खिलाडूपणाने वॉक ओव्हर दिला होता! जवळजवळ पावणेसहा फूट उंच, सडपातळ, निळ्या डोंळ्याचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथमदर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचादेखील इंग्लिश बोलणा-या कॉस्मॉपॉलिटन गटात! 

वास्तविक त्याची आणी माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला ह्या क्षणापर्यंत कोडे आहे. इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही साताआठच मुले-मुली होतो. त्यांत संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्धमागधीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी, अशी माझी समजूत होती! नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जाग्रण करुन आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परिक्षेत विश्र्वविद्यालयातली सगळी बक्षीसे घेऊन गेली, त्या वेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो! वास्तवीक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे मला धैर्य नव्हते; पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्या वेळी मी भिकारदास मारूतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात चार रुपये भाड्यात ज्या सुखसोयींसह खोली मिळे, त्या खोलीत मी आणि अरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. तो रात्रंदिवस फ्लूट वाजवायचा. मग त्याचे आणि मालकाचे भांडण होई. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की, मला ओशाळल्यासारखे होई. तारेवर माझा घरी धुतलेला लेंगा आणि फाटका बनियन, शर्ट वगैरे वाळत पडलेला असे. अरगड्याने एक जुने चहाचे खोके मिळवून त्याच्यावर बैठक केली होती. त्याच्यावर बसून तो फ्लूटचा रियाज करीत असे. चांगली वाजवायचा,पण पुढे त्याला फ्लूरसी झाली. 

"आपल्याला जायंच आहे." नंदा म्हणाला. 

"कुठे?" 

"इंदू वेलणकरकडे. चल." 

त्याची अशी चमत्कारिक तुटक बोलण्याची पद्धत होती. आवाजदेखील असा खजीतला, पण कठोर नाही, असा काहीतरी होता. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभे. नंदा एकदा माझ्याबरोबर एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशातही तो असा उमदा दिसला की,बुंवानी काही कारण नसताना गाता गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरश: भांबावलो होतो. काही माणसे जन्मतःच असे काहीतरी तेज घेऊन येतात की, त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.काही स्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्यापुढे आपण एखाद्या फाटक्या चिरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती. मला आठवतेय, आमचे प्रिन्सिपॉल साहेबदेखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणाने ऎकत असत. तिथेदेखील नंदा असा तोटकीच वाक्ये बोलायचा; पण इंग्लिशमध्ये! तीनचार शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे.त्या दिवशीसुद्धा "आपल्याला जायचंय" हे एवढेच म्हणाला होता. मी "कुठे?"म्हटल्यावर "इंदू वेलणकर" म्हणाला.

"इंदू वेलणकर?" 

"अभिनंदन करायला." 

"तिच्या घरी? अरे. तिचा म्हातारा भयंकर चमत्कारिक आहे म्हणे!" 

"असू दे! मीसुद्धा आहे. चल." 

"बरं, तू जरा गॅलरीत उभा राहा. मी कपडे बदलतो." आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या. 

"मग मी बाहेर कशाला?" 

मी शक्य तितके त्या आठ-बाय-सहाच्या खुराड्यात कोप-यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली. शर्ट कोंबला आणि आम्ही निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिशखेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी"कल्हईवाले पेंडसे आत राहतात" असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लिस कार्ट्याने खडूने "पण कल्हई रस्त्यात बसून काढतात" असे लिहीले होते. काही काही माणसे कुठे राहतात ते उगीचच आपल्याला ठाऊक असते. इंदू वेलणकर हा त्यांतलाच नमुना. एकदा कोणीतरी मला कल्हईवाल्या पेंडशांच्या बोळात राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पाय-यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे माना वळवून वळवून पाहत होती. इतक्या देखण्या पुरूषाचे पाय त्या बोळाला यापुर्वी कधी लागले नसतील! जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्रियांनी ह्याच द्र्ष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता 'ज०गो० वेलणकर, रि०ए० इन्स्पेक्टर' अशी पाटी दिसली.आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली "ही ओढा" अशी सूचना होती. त्याप्रमाणे 'ती' ओढली. मग आत कुठेतरी काहीतरी खणखणले आणि कडी उघडली. एका अत्यंत खत्रूड चेह-याच्या पेन्शनराने कपाळावर चष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले, "काय हवॅंय?" 

"इंदूताई वेलणकर इथंच राहतात ना?" मी चटकन 'इंदू' ला 'ताई' जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले. 

"राहतात. आपण?" हाही थेरडा नंदासारखा तुटक बोलत होता. 

"आम्ही त्यांचे वर्गबंधू आहोत." तेवढ्याच स्वतः इंदूच डोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो होतो. कॉलेजात काकूसारखी नऊवारी लुगडे नेसून भलामोठा अंबाडा घालणारी इंदू घरात पाचवारी पातळ नेसली होती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली होती. केसांत फूल होते. 

"या या--- तात्या, हेही माझ्याबरोबर ओनर्सला होते." 

"मग मिळाले का?" "हो, आम्ही दोघांनाही मिळाले." मी चटकन सांगून टाकले, नाहीतर म्हातारा "बाहेर व्हा" म्हणायचा. 

"बसा-- बसाना आपण." इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतकी बावचळली होती, घाबरली होती, आणि त्यामुळेच की काय कोण जाणे, क्षणाक्षणाला अधिकच सूंदर दिसत होती. नंदा मात्र शांतपणे बसला. 

"हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन!" 

नंदा ह्या माणसाला देवाने काय काय दिले होते! त्या बुद्रक म्हाता-याच्या दिवाणखाण्यात एका व्हिक्टोरिअन काळातल्या खुर्चीवर नंदा अशा ऎटीत बसून हे बोलला की, मला वाटले, तो थेरडा तिथे नसता तर तेवढ्या बोलण्याने इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती. 

"थॅं...क्य़ू..." सुकलेल्या थरथरत्या ओठांनी ती म्हणाली. 

"आज रात्री जेवायला याल का?" नंदा विचारीत होता. 

"कोण मी?" इंदूचा आवाज इतका मऊ होता की, मला उगीचच गालावर पीस फिरवल्यासारखे वाटले. 

"मी डिनर ऍरेंज केलंय." 

"डिनर?" म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला. 

"यस सर! टू सेलेब्रेट युअर डॉटर्स सक्सेस." 

"कुठं डिनर केलंय ऍरेंज?" 

"मोरेटोरमध्ये!" 

"हॉटेलात कां? घर नाही का तुम्हाला?" स्वतःच्या डोक्यावरचे एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला. 

"नाही!" 

नंदाचे ते 'नाही' माझे काळीज चिरत गेले. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती. इंदूच्या चेह-याकडे मला पाहवेना. रात्री मी आणि नंदा मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरणकमळे अधूनमधून नंदाच्या आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादकी, अधूनमधून हिटलर-चर्चिल वगैरे मंडळींना, संपादकांना अगदीच आळस आला तर, चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहीणे, ह्या कार्याबद्दल मिळणा-या अखंड तीस रुपयांत मला त्याला 'लकी'त नेण्याची देखील ऎपत नसे. पण नंदा "आज आठ वाजता मोरेटोरमध्ये" असा लष्करी हूकूम दिल्यासारखा आमंत्रण देई आणि मी हिन्पोटाइज्ड माणसासारखा तिथे जात असे....

(अपूर्ण)
नंदा प्रधान - व्यक्ती आणि वल्ली 
पु.ल. देशपांडे 

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवू शकता.

Tuesday, December 20, 2022

साता वारांची कहाणी - हसवणूक

सोमवार हा अत्यंत अरसिक वार! त्याला फक्त पोटासाठी लोकांना राबायला लावायचे, इतकेच माहीत. सोमवार हा पिशवी घेऊन वावरत असतो. ह्या वाराचे आणि मोहकपणाचे वावडे आहे. एवढेच नाही, तर हा अत्यंत रुक्ष आहे. हा मासे खात नाही. तसा गुरुवारदेखील कांदा खात नाही. उपास करतो. पण दत्ताचा पेढा खातो, शिकरण खातो. सोमवारला तेही सुख पचत नाही. आदल्या दिवशी रविवार झालेला असतो. त्यामुळे ह्या वाराला पक्वान्न नाही - काही नाही. ह्याला गाणे, नाटक कशाची आवड नाही. खाली मान घालून राबणारा हा कारकुन-वार आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केले, दिवाळी कशी साजरी केली, यापैकी एकाही गोष्टीची चौकशी न करता एकदम वर्गात आल्याबरोबर जॉमेट्रिचा थिअरम शिकवायला घेणाऱ्या मास्तरासरखा हा वार आहे. सोमवार नुसता नाकसमोर जाणारा. सोमवार कधी हसत नाही. हा सोमवार रुक्ष आहे,अरसिक आहे, पण कोणाच्या अध्यात ना मध्यात! आपले काम बरे की आपण बरे! आणि म्हणूनच एखादे दिवशी त्याला सुट्टी मिळाली की त्याची पंचाईत होते. दिवसभर बिचारा घरी पडून राहतो.

मंगळवाराचे श्रावणी सौंदर्य अफाट आहे. हा पठ्ठया त्या वेळी एरवीची सारी उग्रता विसरून कुटुंबातल्या सात्त्विक पुरुषासारखा वागायला लागतो ! घरोघर जमलेल्या पोरींना एरवी मनात आणील तर हाताला धरून खेचून फरफटत रस्त्यातून ओढीत नेण्याचे सामर्थ्य असलेल्या ह्या मंगळाचे मंगलात रूपांतर होते. ओठावर आणि हनुवटीवर दाढीची कोवळी पालवी फुटलेल्या काळात ह्या श्रावणातल्या मंगळवाराने आमची शनवाराची दृष्टी आपल्याकडे खेचली होती. त्यातून पाच मंगळवारांचा श्रावण आला, म्हणजे अधिकच रंग येई. लेकी-सुनांच्या मेळाव्यांतून, हिरव्या पत्रीतून लालसर कळ्या शोधाव्या, तशा (इतरांच्या) लेकी मन वेधून घेत. खालच्या माजघरात मंगळागौरींचा हसण्याखिदळण्याचा धिंगाणा सुरू झाला की, वरच्या खोलीतून पुस्तकावरचे लक्ष उडे. आणि मग कुठे पाणी पिण्याचे निमित्त कर, कुठे माजघरातल्या घड्याळाबरोबर आपले रिस्टवॉच जुळवायला जा, (हे बहुधा फर्स्ट इअरच्या परीक्षेत पास झाल्यावर मिळे!) असली निमित्चे काढून त्या खळखळत्या हास्याच्या काठाकाठाने उगीच एक चक्कर टाकून यावीशी वाटे ! अशा वेळी वाटे की, ही श्रावणी मंगळवारची रात्र संपूच नये.


तेवढ्यात एखादी जाणती आत्या "काय रे, फारशी तहान लागली तुला?" म्हणून टपली मारी, आणि कानामागे झिणझिणी येई. नेमकी ह्याच वेळी नव्या वहिनींची निळ्या डोळ्यांची धाकटी बहीण आपल्याकडे का पाहत होती हे कोडे उलगडत नसे. आजच दुपारी मधल्या जिन्यात तिने आपल्याला “ऑलजिब्राच्या डिफिकल्ट्या सोडवून द्याल का ?" म्हणून प्रश्न विचारला होता. डोक्यात एखाद्या गाण्याच्या चरणासारखा तो प्रश्न घोळत असे. मंगळवार आवडला तो फक्त तेव्हा. एरवी, हा वार सगळ्यांत नावडता.

बुधवार हा सात वारांतला हा मधला भाऊ. बुधवार हा थोडक्यात बिनबुडबंधू भाऊ आहे. ह्या वाराला कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमत्वच नाही. दिवसाच्या व्यवहारात अकरा-साडेअकराच्या सुमाराला कसलेही वैशिष्ठ्य नाही, रंग-रूप-आकार नाही, त्याचप्रमाणे ह्या बुधवाराला काहीही आगापिछा नाही. एखाद्या श्रीमंत कुटूंबात एखाद्या भावाला जसे एखाद्या पेढीवर कोणतेही महत्वाचे काम न देता नुसते बसवून ठेवतात, तसे ह्या वाराला दोन्ही बाजूंनी दोन वार देऊन रविवारने बसवून ठेवले आहे. तापट मंगळवार आणि सौम्य गुरुवार यांच्या मधे उभा राहून हा दोन्हीकडे आपली गचाळ दंतपंक्ती विचकत गुंडाचा आणि संताचा आशीर्वाद घेऊन स्वत:चे स्थान टिकवू पाहणाऱ्या गावठी पुढाऱ्यासारखा आहे. बुधवारच्या नशीबी काही नाही. हिंदूचा गुरुवार, मुसलमानांचा शुक्रवार, यहुद्यांचा शनिवार आणि ख्रिस्त्यांचा रविवार. पण बुधवार कुणाचाच नाही.

गुरुवार सज्जन आहे, पण गचाळ नाही. हा दोन-दोन बोटे दाढी वाढवून मातकट धोतर आणि कुडते घालणाऱ्या सज्जनांतला नव्हे. हा मुळातलाच सात्विक, सौम्य, हसऱ्या चेहऱ्याचा, सडपातळ, गहू वर्णाचा, मिताहारी. हा शाकाहारी खरा, पण त्या आहाराने अंगावर सात्विकतेचे तूप चढून तुकतुकणारा नव्हे. मला शनिवारच्या खालोखाल गुरुवार आवडतो. मुख्य म्हणजे हा व्रत पालन करणारा असूनही मऊ आहे. कडकडीत नाही.

शुक्रवार थोडासा चावट आहे. पण स्वभावात नव्हे. खाण्यापिण्यात. कुठे चणेच खाईल, फुटाणेच खाईल. हा पठ्ठ्या केसांची झुलपे वाढवून, गळ्यात रुमाल बाधूंन हिंडतो. दिवसभर काम-बिम करतो, पण संध्याकाळी हातांत जाईचे गजरे घालून, अत्तर लावून हिंडेल. ह्याला उपासतापास ठाऊक नाहीत.

स्वभावाने अतिशय गुल्ल्या ! कपड्यांचा षौकिन ! वास्तविक शुक्रवार शनिवारसारखा थोडासा रंगेल आहे. पण त्याला गुरुवारच्या सौम्य देखरेखीची किंचीत बूज असते. गुरुवारच त्याला उठवून कामाला लावतो.

...शनिवार नावाच्या गृहस्थावर माझे मन जडले. वास्तविक शनिवार हा इतरांच्या दृष्टीने न-कर्त्यांचा वार आहे. पण आजदेखील मला शनिवारचे आकर्षण विलक्षण आहे. शाळेत असताना मी शनिवारची वाट जितकी पाहिली, तितकी रविवारची नाही. काही चतुर मुले शनिवारी अभ्यास उरकीत आणि रविवार मोकळा ठेवीत. ज्याने शनवारच्या स्वभावातला खट्याळपणा ओळखला नाही, अर्धाच दिवस पोटासाठी राबून उरलेल्या अर्ध्या दिवसात आणि संपूर्ण रात्रीत गंमत केली नाही, त्याने जीवनातला महत्वाचा वार ओळखला नाही. जीवनात रंगणाऱ्या लोकांचा हा वार आहे. शनिवारी संध्याकाळी जसे जग दिसते, तसे रोज संध्याकाळी ज्यांना पाहता आले, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच ! अर्थात शनिवारचे मोठेपण रविवारच्या मोकळ्या स्वभावामुळे आहे हे अमान्य करु नये.

रविवार हा काही झाले तरी 'दादा' आहे. किंबहुना, घरातला कर्ता पुरुष आहे. एकत्र कुटुंबातला कर्ता पुरुष जसा स्वतः भाकरी बांधून कामाला जात नाही, त्याप्रमाणे इतर भावांप्रमाणे हा जरी स्वतः राबत नसला, तरी बाकीचे भाऊ याला मान देतात. हे सारे भाऊ आठवड्याच्या शेवटी याच्या जवळ येतात. सगळ्यांची हा प्रेमाने विचारपूस करतो. जेवू-खाऊ घालतो; आणि दुसऱ्या दिवसापासून सारेजण कामाला लागतात.

रविवार मात्र कर्त्या पुरुषाची सगळी जबाबदारी उचलतो. पोराबाळांना एरंडेल दे, कडुलिंबाचा पाला उकळून गरम पाण्याने आंघोळ घाल, बागेतला पाचोळा काढून जाळ, दुपारी जरा गोडाधोडाचे जेवण घाल, वगैरे कार्ये आपल्या देखरेखीने करून घेतो. एका गोष्टीसाठी मात्र मला रविवार आवडतो. तो दुपारी जेवून मस्तपैकी झोपतो. आजोबा देखील वामकुक्षी करीत - चांगली बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत. मग त्यांना चहासाठी उठवावे लागे. हे काम कठीण होते. पण आजीची त्यालाही युक्ती होती... गजबजत्या कुटुंबात एखादे तरी तान्हे मूल असायचेच ! त्याला घेऊन आजोबांच्या झोपायच्या खोलीत जायचे, आणि त्यांच्या श्वासाबरोबर वर खाली होणारे पोटावर ते रांगते मूल सोडून द्यायचे! ते पोर आपली बाळमूठ उघडून आजोबांच्या पोटावर चापटी मारून 'तँ पँ कँ पँ असे काहीतरी करी. मग आजोबा जागे होत. आणि संतापाची शीर फुगण्याच्या आत आपल्या पोटापर्यंत चढलेल्या नातवाला पाहिल्यावर "हात् गुलामा ! " म्हणून उठत. आजोबा उठले, की घरातला सारा रविवार उठे! आणि आजी हळूच म्हणे, "उठा, चहा झालाय केव्हाचा!" आजोबा उठत आणि आजी मोरीत चूळ भरायला तांब्या ठेवीत असे. चतुर होती माझी आजी. सगळ्या आज्या असतात तशी वारांची कहाणी सांगणारी आजी !

(अपूर्ण)
- साता वारांची कहाणी
पुस्तक -  हसवणूक
पु.ल. देशपांडे

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी पूर्ण पुस्तक खालील लिंकवरुन घरपोच मागवू शकता.


Friday, December 9, 2022

हसरे दुःख

प्रिय भा. द.

'हसरे दुःख' वाचून झाले. ह्यापूर्वीच पत्र पाठवायला हवे होते. परंतु गेले दोन- तीन महिने फार गडबडीचे गेले. त्यामुळे निवांतपणे पत्र लिहिणे जमले नाही. त्यातून हल्ली मला जडलेल्या कंपवाताच्या विकारामुळे हात थरथरतो आणि लेखन कष्टदायक होते. दुर्वाच्यही होते. लिहिण्यातला उत्साह ओसरतो. नाईलाज आहे. 

चॅप्लिन हा विनोदी लेखक, नट, चित्रपट-दिग्दर्शक. अशा कलावंतांचा परात्पर गुरु आहे. त्यांच्या निर्मितीतला आनंद लुटताना संगीतातल्या स्वयंभू गंधारासारखा, जीवनात वारंवार येणाऱ्या कटु अनुभवांचा अनाहत नाद उमटतो. त्या अनुभवाला तोड नाही. जगण्याची ही 'कळवळ्याची रीती' त्याच्या दर्शनी विनोदी असणाऱ्या कथेतून आणि अभिनयातून सतत जाणवत राहते. चॅप्लिनच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा हा मूलमंत्र तुम्ही नेमका टिपला आहे.

प्रचंड दारिद्र्य आणि त्या पोटी जन्माला येणारी भूक, मानहानी, आजार ही भुतावळ दरिद्री माणसाच्या मानगुटीवर सदैव बसलेली असते. त्यात 'भूक' हे महाभूत. ह्या भयंकर भुताने छळलेले चॅप्लिन कुटुंब! रोजची दुपार कशी ढळेल याची चिंता करीत त्या दरिद्री संसाराचा गाडा ओढणाऱ्या हॅनाची ती जीवघेणी धडपड, चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांच्या अभागी बालपणातले मनाला चटका लावून जाणारे प्रसंग तुम्ही कमालीच्या आत्मीयतेने रंगवले आहेत. चरित्रनायकाशी तुम्ही साधलेली एकरुपता हे तुमच्या ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य मानले पाहिजे. केवळ तपशिलाने भरलेली माहिती असलेले हे लेखन नाही. चॅप्लिनच्या अभिनयाचे, त्याच्या कथांचे विश्लेषण वगैरे करण्याचा इथे अट्टाहास नाही. खूप सहृदयतेने आणि जिव्हाळ्याने सांगितलेली चार्ली नावाच्या महान कलावंताच्या जीवनाची कहाणी आहे.

ह्या रचनेत कल्पनाविलास नाही. इष्ट परिणामासाठी घुसडलेल्या निराधार दंतकथांना इथे स्थान नाही. या कहाणीतला जिव्हाळ्याचा सूर मात्र मन हेलावून टाकणारा आहे. 

हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी तुम्ही चार्लीचे चित्रपट आणि चॅप्लिनविषयक साहित्य याचा कसून अभ्यास केल्याचे ध्यानात येते. पण तुमची भूमिका कलावंत साहित्यिकाची आहे. तपशील गोळा करून ते ओझे कागदावर रिकामे करणाऱ्या पढिक पंडिताची नाही. चॅप्लिनचे मोठेपण जाणवते ते तुमच्या कसलाही आव न आणता केलेल्या साध्या लिखाणामुळे. म्हणून चॅप्लिन हा मोठेपणाच्या उच्चास्थानावर बसलेला थोर माणूस वगैरे न वाटता वाचकाला मित्रासारखा वाटतो. वाचकाशी चरित्रनायकाचा असा स्नेहभाव जुळवणे ही तुमची किमया आहे. ह्यातच तुमचे चरित्रकार म्हणून यश आहे. कथेचा ओघ कुठेही न अडता चालू राहिला आहे. 

मराठीत एक चांगले चरित्र आल्याचा आल्हाददायक प्रत्यय आला. मनाला खूप समाधान वाटले. तुमचे अभिनंदन करतो आणि चार्ली चॅप्लिनचा एक परमभक्त या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो. 

-भाई

Tuesday, November 22, 2022

पंचनामा

सगळ्या पोलिसी व्यवहारात 'पंचनामा' हा तर एक अजब प्रकार आहे. नमुनेदार पंचनाम्यांचा संग्रह जर कुणी छापला, तर तो एक उत्तम विनोदी ग्रंथ होईल. एका चोरीच्या प्रकरणातला पंचनामा मला वाचायला मिळाला होता. त्यात हवालदारासाहेबांनी पहिलेच वाक्य लिहिले होते - “चोरट्यांनी मालकांची परवानगी न घेता घराच्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून प्रवेश केला होता.” मी हवालदारांना विचारले, "अहो हवालदारसाहेब, चोर कधी आगाऊ परवानगी घेऊन, 'आपली हरकत नसेल, तर थोडीशी चोरी करावी म्हणतो' अशी विनंती करून गज वाकवायला घेतात का ?” हवालदारांनी मला, “फालतू बकबक नाय पायजे" म्हणून चारचौघांपुढे बजावले आणि अशा थाटात माझ्यावर नजर रोखली की मालकाची परवानगी न घेता त्या दक्षिणेच्या खिडकीतून शिरलेला चोर मीच असेन अशी त्याला शंका आली की काय, असे मला वाटायला लागले.

जमिनीच्या कज्ज्यात सातबाऱ्याच्या उताऱ्याचे जे स्थान, तेच फ़ौजदारी कज्यात पंचनाम्याचे. पण खरी गोम आहे ती म्हणजे पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही ठोकणारे पंच न्यायालयात चक्क उलटतात ते. खोटी साक्ष देणे हा परदेशात फार मोठा गुन्हा मानला जातो. आपल्याकडे पंचनाम्यात एक आणि कोर्टापुढल्या जबानीत नेमके त्याच्या उलट हा प्रकार वैध मानला जातो. त्यामुळे 'पंचनामा' हा प्रकार खऱ्याखोट्याची फारशी चाड बाळगणारा नाही अशीच सर्वांची कल्पना असते. असल्या ह्या नुसत्या बोटावरची थुंकी चालवण्यासारख्या खेळात गुन्हेगार सुटण्याची शक्यताच अधिक दिसल्यावर पोलिसांना वैफल्याची भावना आली, तर त्यात नवल नाही.

अशा परिस्थितीत कायद्याबद्दलचा आदरच नाहीस व्हायला लागला आहे. आपण वेळोवेळी लोकशाही आणि लोकशाहीतल्या नागरिकस्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो. पण ह्या स्वातंत्र्याच्या योग्य वापरासाठी आपल्या कर्तव्याला जागण्याची अट स्वतःवर लादून घ्यायला तयार नसतो. तिथे फक्त स्वार्थच पाहतो.

(मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर श्री. वसंतराव सराफ ह्यांना १८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाठवलेल्या पत्रातून)
पुस्तक - गाठोडं

संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मागवा.


Monday, November 21, 2022

पु.ल. आज तुम्ही हवे होता - निकेत पावगी

आठ नोव्हेंबर आणि बारा जून हे दोन दिवस पुलप्रेमींसाठी महत्त्वाचे आणि मनात विविध प्रकारचे कल्लोळ उठवणारे दिवस.

"कशाला आला होता हो बेळगांवात?" अशा स्वरूपाचा विदीर्ण टाहो काही जणं फोडत होती, असतील, रहातील - मनातल्या मनात.

पुलोत्सव वगैरे आयोजित करणारी मंडळी आता साठीच्या आसपास असतील आणि उत्सव साजरे करण्याची सध्याची किंमत बघता, असे उत्सव साजरे न करणेच त्यांना योग्य वाटत असेल.
आज तुम्ही हवे होता - असं वाटत रहाण्याचे दिवस गेले. उलट, तुम्ही गेलात तेच बरं झालं -: असं राहून राहून वाटत रहाण्याचे प्रसंग वारंवार येत रहातात.

थोर थोर विचारवंत, साहित्यिक लोकांची विविध पध्दतीने अवहेलना बघून तुम्ही स्वस्थही राहू शकला नसता आणि काही करण्याचा विचारही सुचला नसता. तुम्हालाही कोणत्याही एखाद्या वर्गाचे प्रतिनिधित्व देऊन कुणीतरी ठोकून काढलं असतं आणि तुमच्या कार्याची चिरफाड संकुचित चष्मे लाऊन झाली असती. तुमच्या लेखनातील एखादा लचका तोडून एखादे आंदोलन वगैरे झाले असते आणि त्यावर विचित्र पद्धतीने वाद - प्रतिवाद, प्रतिक्रिया उमटल्या असत्या. त्याला एखादा रंग कुणीतरी दिला असता. त्याउपर आपल्याच काही जाहीर चाहत्यांनी सपशेल कुस बदलून ते रंग गडद करण्यासाठी हातभार लावला असता. तुमचे मोजके पुतळे काही ठिकाणी अजूनही सुरक्षित आहेत, हे आमचे भाग्य. पण काही भरवसा वाटत नाही.

कदाचित एखादा Stand up comedy show करण्यासाठी तुम्हाला आग्रह झाला असता. घरोघरी पैदास झालेल्या साहित्यिकांचे तुमच्या स्वभावानुसार कौतुक करता करता तुमची लेखणी थिजून गेली असती.

कालातीत रहाणे फार कठीण असते. जवळपास अशक्यच. कालानुरूप परिस्थिती, संदर्भ बदलत असतात. पण काही भुमिका, दृष्टीकोन आणि शैली अजरामर असतात. समस्त जगातील मराठी बांधवांच्या ज्या सर्वसमावेशक गटाचे तुम्ही लाडके व्यक्तिमत्त्व होता, तो गट आता शिल्लक राहिला नाही. त्यापैकी कित्येकांनी इहलोक सोडला आणि त्यापेक्षा जास्त मंडळींनी मायभूमी सोडली. तुम्हाला जे सांगायचे आहे, दाखवायचे आहे आणि वाटायचे आहे ते समजणारी आणि ते समजून आनंदाने चकित होणारी मंडळी आता क्षीण झाली आहेत.

तुमच्या नांवाचें समुह अजूनही नवीन आणि तुमच्यासाठी अनोळखी अशा माध्यमातून सक्रिय आहेत. तुमची लेखी वाक्य शेकडो मंडळी कपड्यांवर मिरवत असतात. पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर तुम्ही जे कोरलंत ते मिरवावे असं वाटत नाही आणि जे मिरवतात त्यांच्या मनापर्यंत ते रूजलं आहे का, समजत नाही.
अजातशत्रूत्वाला एक प्रकारची चतुराई लागते- तुम्ही लिहून गेलात. तुमच्यात ती चतुराई नसूनही तुम्ही कितीतरी दशकं अजातशत्रू राहिलात. ते तुमच्या मोकळ्या मनस्वीपणामुळे आणि मुख्य म्हणजे स्वतः कडे सहज कमीपणा घेणाऱ्या तुमच्या निरागसपणा मुळे. ती निरागसता हल्ली इयत्ता पहिलीत सुध्दा शिल्लक राहिली नाही. नवरसांमधील कणांपासून विविध प्रकारच्या जणांपर्यंत ज्यात तुम्हाला उदात्त, उत्कट, मंगल असे जाणवले त्या सगळ्यांना दाद देत तुम्ही निर्मिती करत राहिलात. वाईटातूनही चांगलं दाखवण्याच्या शैलीतून. त्या चांगल्याची आणि मांगल्याची जी जाणीव निर्माण झाली ती नुसती आनंददायी नाही तर सकारात्मक स्फूर्तीदायी आहे. आज चांगल्यातूनही नेमकं वाईट तेवढे शोधून पसरविणारी लोक वाढत चालली आहेत.

तंत्रज्ञान फारच प्रगत झाले आहे. आजच्या तंत्रयुगात तुमच्यासकट, तुम्ही पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समस्त प्रतिभावंतांनी काय कमाल केली असती असा विचार मनात येतो. पण त्या अभिजाततेसाठी पोषक असे समाजाचे कोंदणसुध्दा त्या प्रतिभावंतांना आवश्यक असते. रात्रभर चालणाऱ्या मैफलींमधून होणारी रसनिर्मिती कधीच नाहीशी झाली. त्यानुरुप होणारी प्रतिभा दुर्मिळ झाली तर दोष कुणाचा?

तरीही तुम्ही असता तर नक्कीच काहीतरी चिंतनाला आवाहन करणारी निर्मिती झाली असती. अद्वैताचे प्रतिरुप असणाऱ्या तुमच्या जोडीदाराला थोडे जास्त कठोर होऊन त्यासाठी तुम्हाला उद्युक्त करावे लागले असते, ते त्यांनी सजगपणे आणि अधिकाराने केले असते.

टिळक - गांधी पुण्यतिथी/ जयंती च्या दिवशी व्यक्तीगत पातळीवर आपापल्या परीने आदरांजली वाहणारी आमच्या आजी आजोबांची सहृदय पिढी कधीच नाहीशी झाली. कुणी लंघन करायचे, कुणी मौन व्रत त्या दिवशी धारण करायचे. काळ बदलत गेला. ती पिढी गेली, ते आवाज गेले, धुसर होत अदृश्य झाले.
तुम्ही गेलात हे एक प्रकारे बरं झालं असा व्यावहारिक विचार मनात गडद होत जातो आणि तरीही तुम्ही असायला हवे होतात हेही प्रकर्षाने जाणवत रहातं.
निखळ आनंदाची देवाणघेवाण सुरू झाली आणि निरपेक्ष दाद दिली घेतली जाऊ लागली कि मात्र सभोवताली कुठल्यातरी स्वरूपात तुम्ही असल्याचा साक्षात्कार होतो.
आठ नोव्हेंबर आणि बारा जून रोजी आयुष्यातील अशा सगळ्या साक्षात्कारांची उजळणी मनात सुरू असते....
मौनव्रत आणि उपास मागे गेले....
ही उजळणी मागे पडणे शक्य नाही.

निकेत पावगी
०८/११/२२

१०३ नॉट आऊट पु.ल. - मृणाल जोशी

८ नोव्हेंबर दैवताचा म्हणजे पु.ल. तुमचा १०१वा वाढदिवस... बाप्रे!!

तुमचं काय, तुम्ही सध्या चैनीत असाल म्हणा. तुमच्याच प्रमाणे रंभा तुमच्या डोक्यावर तेल थापत असेल आणि उर्वशी वारा घालत असेल नाही का?
        
पुलं, तुमचं नाव घेतलं की आपसूक तोंडावर स्मितहास्य उमलतं आणि काय काय नाही आठवत हो...

किती पिढ्या झाल्या तुमची म्हैस अजून काही म्हातारी होत नाही आणि अंतू बर्वे म्हातारा हुन काही मरत नाही, गटणे अजुनी खाकी चड्डीत दिसतो, त्रिलोकेकर याचं इंग्लिश अजुनी कानात साला इडियट म्हणून घुमत असतं, नाथा कामतचे "बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं" हे कुठूनही ऐकू येतं.
पेस्टनजी यांनी कुठली ही बाब परसेन्ट शिवाय बोललीच नाही. कुठे ही कुत्रा दिसला की 'जिम्या भाड्या'ची आठवण येते आणि माकड दिसला की लक्ष त्याच्या आचरटपणा करणाऱ्या मालकाकडे आधी जातं.
चाळीतल्या नळाचे भांडणं असोत किंवा तुमचा उपास असो, मद्राशी राम बघायची शंकऱ्याला घाई असो किंवा तुम्हाला भेटायची सव्याची अप्सव्य करणारी आपली सरोज खरे असो, आजही कुठे भांडण झालं की आम्हाला आधी आठवतं ते बाचाबाची.
कोणी घर पाहायला बोलावलं की पोटात आधी गोळा येतो.
हरितात्यामुळे आम्ही इतिहासात फिरून येतो.
तुमच्यामुळे कधी दामले तर कधी चितळे मास्तर आठवतात तसे चार्ली चॅप्लिन तर कधी पी जी वुडहाऊस किंवा रवींद्रनाथ आठवतात.
कधी तुम्ही संगीत दिलेल्या ओळी ओठांवर येतात आणि खडीसाखरे प्रमाणे तिथेच घट्ट चिकटून असतात.
किती तरी वेळ कधी मर्ढेकर कधी कवी गिरीश तर कधी बोरकर तुमच्याच मुळे आठवतात हो...

साहित्यात संगीतात आणि कलेत तुम्ही एकही शाखा नाही सोडली आणि ह्या सर्वांवर तुम्ही अमाप प्रेम केलं.
आम्हाला हे सगळं मिळालं नाही पण पुलं आम्हाला तुम्ही आणि तुमच्या कलेचा सहवास लाभला ह्याहून मोठा आनंद काय असेल?

तुम्ही कधी पुस्तकांतून, कथाकथन, संगीतातून , कोट्यातून, शब्दातून, तुमच्या आनंदातून भेटतात...
पुलं आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्ही सांभाळलं...
ही किमया तुमच्या लिखाणातील.

तुमच्या लिखाणावर आम्ही लिहून लिहून किती कागदाच्या रिमा वाया घालवणार?
तरी इथे महत्वाचं आहे ते पुलं... तुमच्या सोबत संवाद साधणे.
सर्वांना सर्व काही तोंडी पाठ आहे, मग म्हैस असो, शत्रूपक्ष असो, अंतू बर्वे, नामु परीट, नाथा कामत, नारायण, नंदा प्रधान, चाळ, वरात, असामी असामी काही ही असो, सगळ्यांना रामरक्षे प्रमाणे पाठ आहे.
तरी प्रत्येकाची आतुरता की पुलं यांच्याशी संवाद व्हावा.

आधी असं वाटायचं की व्यास, वाल्मिकी, आणि समर्थ रामदास यांनी जे लिहिलं त्यानंतर कोणी काही लिहू नये. कारण त्याच्याही पलीकडे काही असू शकेल याची शाश्वती कुणालाही वाटली नाही.
नंतर तुम्ही आला आणि त्यांच्या 'बिटविन द लायन्स' तुम्ही शोधल्या आणि लिहिल्या.
पण एक सांगतो तुम्ही सगळ्या लेखकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे.
तुम्ही जे लिहिलं आणि जे ऐकवलं त्या नंतर काही उरलं असेल असं मला तरी वाटतं नाही.

तुम्ही गेला?
छे छे मला असं अजिबात वाटतं नाही.
तुम्ही कधी ऑडिओमधे समोर येतात, कधी व्हिडीओत, कधी कोणाच्या संगीतात, कधी कोणाच्या बोलण्यात, कधी ऐकण्यात.
हल्ली तुमचे ग्रुप्स सुद्धा आहेत.
तुमचे फोटो हल्लीच्या राजनैतिक वातावरणावर ट्रोल होतायत.
आता तर तुम्ही चित्रपटात झळकलायत.
पण खरं सांगू का तुम्ही मला कुठे ही भेटतात.
तुम्हीं कधी कुणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भेटतात, कधी कोणी लेखक पुस्तकं तुम्हाला समर्पित करतो तुम्ही तिथे भेटतात, कधी पुरचुंडीच्या दोन फडक्याच्या गाठीत भेटता, कधी चाळीच्या कुठल्या कोपऱ्यात उभे दिसतात, कधी एकाकी खांद्यावर शबनम घेऊन पांढऱ्या सदरात आणि पायजम्यात दिसतात.
कधी पेटी दिसली की त्या 'काळ्या तीन'मधे तुम्ही बोटांनी गाताना दिसतात.
कधी असामीमधल्या तुमच्या वडिलांच्या घड्याळीत वेळ बघताना दिसतात.
कधी चार्ली पहिला की तुम्ही मागून झाकून बघताय अस दिसतं.
कधी लता गाते आणि तुमचा आवाज येतो -
"पोरी औक्षवंत हो."

कधी सावरकरांवर बोलताना दिसतात तर कधी भीमसेन कधी वसंतराव यांच्या सोबत मैफल गाजवताना तर कधी पुण्यात गुलजार समवेत सुद्धा दिसतात.
कधी तुम्ही आणि सुनीताबाई दोघे ही आनंदवनात दिसतात तर कधी ग्रेस यांच्या दाराशी थांबलेले दिसतात.
कधीमधी तुम्ही 'एक शून्य मी'च्या प्रश्नचिन्हाखाली त्या टिंबात आम्हाला नवं कोडं घालतायेत असं दिसतात.

तुम्ही विनोदी म्हणून जगविख्यात आहेतच पण संवेदनशील रंगकर्मी, आणि मनाला भिडणारा लेखक म्हणून मला ज्यास्त भावतात.
तुम्ही जे जे संवेदनशील लिहिलं ते खरंच अजोड आहे, टच कण डोळ्यांतून पाणी काढणं आणि पुढच्या क्षणी हसवता हसवता रडवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.
तिथे पाहिजे जातीचे कलावंत!

विनोद बुद्धी खरंच दैवी देणगी असते.
मान्य पण आपण जे संवेदनशील लेखक म्हणून लिखाण केले त्याला तोड नाहीच.

तुम्हीच आमच्या सारख्या दुःखात असणाऱ्या, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या आणि आपल्यालाच बघणाऱ्या नजरा असणाऱ्यांना आमच्यासारख्या लोकांना वाचायला, चांगलं ऐकायला प्रवृत्त केलं आणि आमची पिढी धन्य झाली.

तुमचं नवं कोरं पुस्तक जेंव्हा विकत घेतो न, मला त्यात तुमचा सुगंध दरवळतो!
स्वतः इंदूर इथला असल्यामुळे, त्या इतिहासाचा गंध सांगणाऱ्या वास्तू पाहिल्यात जिथे तुम्ही कुमार गंधर्व, रामुभैया दाते यांच्या समवेत मैफल सजवल्यात, रंगावल्यात आणि अर्थातच गाजवल्यात.

पुलं...
तुम्ही जे दिलं, जे आम्ही अनुभवलं त्याला तुलना नाही!

पुनःश्च धन्यवाद!

पुलं पुन्हा तुम्हाला कडकडून भेटावंस वाटतंय...

- मृणाल जोशी
०८.११.२१

Wednesday, November 9, 2022

शैलीमुळे कालातीत ठरणाऱ्या पुलंच्या रेडिओवरील श्रुतिका - रजनीश जोशी

पु. ल. देशपांडे यांनी रेडिओ माध्यमासाठी काम करताना केलेलं लेखन त्या त्या काळातलं आहे. त्यांनी त्यातून मांडलेले विषय तत्कालिक आहेत. पण त्यांची शैली मात्र कालातीत आहे. रेडिओच्या श्रोत्यांशी संवाद साधणारं लेखन कसं असलं पाहिजे, याचा वस्तूपाठ म्हणजे त्यांचं श्रुतिका लेखन आणि भाषणं. पु. ल. स्मृतिग्रंथासाठी लिहिलेल्या लेखातील काही भाग !

साल होतं १९५५. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या माळरानाचं नंदनवन करण्याच्या एका प्रकल्पासाठी पु.ल.देशपांडे तिकडं गेले, पण तिथली दांभिकता आणि फोलपण लक्षात आल्याने ते काम सोडून परत मुंबईला आले. त्यांच्याकडं कुठलंच काम नव्हतं. अशा अत्यंत गरजेच्या वेळी त्यांना आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सहनिर्माते म्हणून नोकरी मिळाली. पुलंच्या शैलीत या घटनेचं वर्णन करायचं तर ''तोपर्यंत 'दीनवाणी' असलेली 'नभोवाणी' एकदम 'गोजिरवाणी' तर झालीच पण खूप श्रवणीयही झाली.'' व्यंकटेश माडगूळकर यांच्यासमवेत ग्रामीण भागातील जनतेसाठी कार्यक्रम करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पुलंनी या कालखंडात अधिकाधिक श्रुतिका लिहिल्या, प्रसंगपरत्वे विविध विषयांवर भाषणे दिली. पॉल न्युरेथ नावाचे एक अधिकारी 'रेडिओ फार्म फोरम' नावाचा एक कार्यक्रम करीत असत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्यादृष्टीने या कार्यक्रमाचं महत्त्व मोठं होतं. त्यांनी या मंडळींना मार्गदर्शन केलं होतं. रेडिओची खासियत म्हणजे निरक्षरांनाही त्याचा उपयोग होतो. ५५ च्या सुमारास आपल्याकडील खेड्यापाड्यातील लोकांचं, शेतकऱ्यांचं शिक्षण बेतास बात होतं, किंबहुना अनेकजण निरक्षरच असत. त्यांना शेतीबाबत आणि तत्सम मार्गदर्शनासाठी रेडिओ उपयुक्तच होता. तथापि, नुसती भाषणं किंवा तज्ज्ञांच्या मुलाखतीसारख्या कार्यक्रमामुळं खेड्यातल्या श्रोत्याला जोडून ठेवणं थोडं अवघडच होतं. त्यासाठी संवादात्मक कार्यक्रम केले, त्यातही एखादं पात्र खेडुताचं असेल तर लोकांना अधिक जवळचं वाटेल हे पुलंनी हेरलं होतं. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या माध्यमातून मग 'बया दार उघड' सारखा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, तो लोकप्रिय झाला. शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम होता. तुमच्यासाठी हे ज्ञानाचे भांडार उघडले आहे, तेव्हा तुम्हीही आपल्या मनाचे दार उघडा आणि शहाणे व्हा, असा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पुलंचा सहभाग असल्याने त्याची रंजकता अपार होती, शिवाय गीत-संगीताचाही उत्तम उपयोग त्यात करण्यात आला होता.

फक्त शेतकरी बांधवांपुरतेच त्यांचे लेखन मर्यादित नव्हते. रेडिओ हे पुलंचे आवडते माध्यम होते. त्याचा यथायोग्य अभ्यास त्यांनी केलेला होता. शब्दप्रधानता हे त्याचे वैशिष्ट्य आणि पुलंना तर शब्दांचं वेड अतोनात होतं. ते म्हणतात : ''माझं पहिलं वेड शब्दांचं आहे, रंगांचं नाही. रंगदेखील मला शब्दांतून अधिक चांगला दिसतो. किंबहुना, साऱ्या विश्वाची सुरूवात परमेश्वराच्या ओंकाररूपी हुंकारातून झाली या कल्पनेचं मला अधिक वेड आहे.'' रेडिओवरील श्रुतिका व तत्सम कार्यक्रमांचं आणि नाटकांचं दिग्दर्शन करताना त्यांनी सर्वाधिक महत्त्व शब्दांनाच दिलं आहे. एखाद्या पात्राला त्याच्या भूमिकेसाठी अशुद्ध उच्चार करायचे असतील तर ते तसेच आले पाहिजेत, अशावेळी पानीऐवजी पाणी किंवा आनिऐवजी आणि शब्द उच्चारला गेला तर ते अस्वस्थ होत. ''शब्द गळला की नाट्यशरीराला जखम झाल्याची वेदना मला होते, वाक्य चुकलं की नाटकाला ओरखडा गेल्याचं दुःख मला होतं,'' असं त्यांनी संहितेतील शब्दांच्या उच्चारणाविषयी लिहून ठेवलं आहे.

पुलंनी एकेठिकाणी म्हटलंय की ते लेखक झाले नसते तर गायक झाले असते. संगीत त्यांच्या खूप आवडीचा प्रांत. आकाशवाणी असो किंवा त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही लेखनाचा प्रकार असो, त्यात कोणत्या ना कोणत्या रूपात संगीत अपरिहार्यपणे येतेच. आरंभीच्या काळात त्यांनी 'सत्यकथा', 'अभिरूची' अशा नियतकालिकांत कथा लिहिल्या, त्यातही संगीताचा उल्लेख आढळतो. रेडिओसाठीच्या श्रुतिकांमध्येही तो आहेच. 'नभोवाणी शेतकरी मंडळा'च्या कार्यक्रमात त्यांनी संगीताचा वापर केला, पण त्याशिवायदेखील त्यांनी अनेक संगीतिका सादर केल्या. जनाबाई किंवा अमृतवृक्ष वगैरेंचा उल्लेख त्यादृष्टीने करता येईल. कौटुंबिक श्रुतिका लिहून सादर करणं पुलंच्या आवडीचीच गोष्ट होती. 

रेडिओवर नोकरी लागल्यानंतर वर्षभरातच नभोवाणी सप्ताहासाठी त्यांनी लेखन केलं. १९५६ साली पुलंना पदोन्नती मिळाली. ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर नभोनाट्य विभाग प्रमुख रुजू झाले. आकाशवाणीसाठी लेखन करताना मनोरंजन आणि प्रबोधन अशा दोन्ही गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. पुलंनी केलेल्या तशा लेखनाचं एक महत्त्वाचं उदाहरण 'सर्वोदय' या श्रुतिकेच्या रूपानं देता येईल. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमधून भूमिहिनांना जमीन देण्यासाठी देशभरात यात्रा काढली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. शेकडो एकर जमीन भूदान यज्ञ म्हणून विनोबाजींना दिली जात होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ही खूप मोठी चळवळ होती. त्याविषयीचा एक संदेश मिळवण्यासाठी पु.ल.देशपांडे आणि आकाशवाणीतील त्यांचे सहकारी कवी मंगेश पाडगावकर यांनी विनोबाजींबरोबर कर्नाटकात यात्रा केली. त्यांच्याकडून संदेश मिळवला. पण 'सर्वोदय' नावाची जी श्रुतिका म्हणण्यापेक्षा नभोनाट्यच पुलंनी लिहिलं. ते त्यांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणारं आणि विनोबाजींच्या कार्याचा यथोचित गौरव करणारं आहे. त्यातून रंजनही होतं आणि प्रबोधनही. महात्मा गांधीजींचा आवडता शिष्य अशी विनोबाजींची ओळख होती. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही. गांधीजी त्यांना 'आश्रमातला माझा भीम' असं म्हणत. पवनारच्या आश्रमातून त्यांची पदयात्रा सुरू झाली. पुलं लिहितात : भारतीयांना शहाण्या, सुज्ञ, व्यवहारी, चतूर शहाण्यांमागून जाणं आवडत नाही. त्यांना असल्या वेड्यांचच वेड आहे. राजभोग त्यागून विषप्याला घेणारी वेडी मीरा, वेडे रामकृष्ण, दुकानाची दारं बंद करून विठ्ठलाच्या दाराशी बसलेला वेडा तुकाराम – ह्या वेड्यांनीच आम्हाला शहाणं केलं आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही भाषा ओळखतो ती त्यांची, कारण त्यांना एकच भाषा येते, 'अंतःकरणाची.'

विनोबाजींचा हा भूदान यज्ञ किती खडतर होता, त्याचं प्रत्यंतर त्यांनी स्वतः घेतलं होतंच. पण तेलंगणातील जमीनदारांची प्रचंड दहशत होती. हिंसक अत्याचारांनी तिथली जनता भयभीत झाली होती. दिवसासुद्धा दारं मिटून बसत होती. त्यांची व्यथा ऐकून विनोबाजींनी भूमीचा प्रसाद मागितला. त्याचं वर्णन पुलंनी केलं आहे, श्रोत्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या त्या शब्दांनी त्यांच्या मनात थरार निर्माण केला नसला तरच नवल. पुलं लिहितात : भारतीय इतिहासातील हा एक अत्यंत करुणोदात्त प्रसंग. दाता आणि घेता दोघेही कंगाल. जमीन देणारा परमेश्वर कुणाच्या मनात उभा राहणार? अनेक भूमिहिन आणि भूमिवान तिथं हजर होते. त्यातच रामचंद्र रेड्डी नावाचे गृहस्थ होते. पक्ष्याचं दुःख पाहून वाल्मिकीच्या शोकाचा श्लोक झाला. त्या श्लोकातून पुढं रामायण झालं. भूमिहिनांची प्रार्थना आमि विनोबांचा ''या गरीबांना जमीन देणारा आहे कुणी दाता?'' हा प्रश्न रामचंद्र रेड्डींचं काळीज कापत गेला आणि ते एकदम ओरडले, ''माझी शंभर एकर जमीन मी या भूमिहीन हरिजनांना दान देतो.'' भूदानगंगा अशा या पावन स्वरूपात तेलंगणातल्या पोचमपल्ली नावाच्या खेड्यात १८ एप्रिल १९५१ रोजी प्रकटली. पोचमपल्ली ही भूदानाची गंगोत्री. सर्वोदयगाथेचं मंगलाचरण.

आणि मग अंध कार्यकर्त्यानं मध्यरात्री येऊन आपली जमीन दान देणं, एका बाईनं आपली सगळी जमीन दान देऊन रोजीरोटीसाठी दुसरीकडं कामाला जाण्याचा निश्चय करणं अशी अनेक उदाहरणं देत हे नाट्य पुढं जातं. भूदानयज्ञामुळं शेतीचे लहानलहान तुकडे पडतील वगैरे अनेक शंका घेतल्या गेल्या, त्यांचंही निरसन त्यांनी केलं आहे. तीस हजार मैल फिरून यशस्वी केलेल्या भूदान यात्रेमुळे सगळ्या जगाला प्रेमाचा, शांतीचा संदेश पोचल्याचं ते लिहितात. ही श्रुतिका किंवा नभोनाट्य वाचणं हादेखील एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

पुलंची आकाशवाणीवरची कारकीर्द खूपच बहरली. पुण्यातून मुंबईत त्यांना बढती मिळाली. त्यांच्या कामाचा आवाका आणि दर्जा पाहता सरकारने त्यांना दूरदर्शनच्या निर्मिती प्रक्रियेसाठी दिल्लीत निमंत्रित केलं. त्यासाठी त्यांचा परदेशात अभ्यास दौराही झाली. नंतरच्या काळात आकाशवाणीवर अनेक मान्यवरांनी श्रुतिका लिहिल्या, नभोनाट्ये लिहिली. पण पुलंनी त्याला भाषेची जी उंची दिली ती अभूतपूर्वच होती. नभोनाट्य किंवा श्रुतिका कशा लिहावी याचंही विवेचन पुलंनी केलं आहे. रेडिओसाठी कसं लिहावं? या प्रश्नाचं उत्तर ते एका शब्दात देतात : 'बोलल्यासारखं.' रंगभूमी, चित्रपट किंवा रेडिओवर सादर होणाऱ्या नाटकातून रसिकांना आनंद झाला पाहिजे, हे मूळ सूत्र आहे. चित्रपट अगर नाटकात डोळे आणि कान एकमेकांच्या मदतीला धावून जातात. शब्द कानात शिरला नाही तर दृश्य खुलासा करीत असतं. चुकीच्या प्रकाशयोजनेमुळं पात्रं दिसलं नाही तर दृश्य खुलासा करत असतं. रेडिओत हे अगदी अशक्य! रेडिओ घरात चालू असतो, त्याचवेळी आत स्टोव्ह पेटत असतो. कदाचित नोकरांशी भांडण सुरू असतं. मुलांना कविता पाठ करायची लहर येते. शेजारचे गृहस्थ ऐनवेळी दारावर 'ठो' 'ठो' करून वर्तमानपत्र मागायला येत असतात. रस्त्यातून बँड लावून लग्नाची वरात जात असते. अशा एकूण विसंवादी परिस्थितीत रेडिओ ऐकायचा असतो. त्यामुळं रेडिओ-श्रुतिकेच्या लेखनाला काही विशिष्ट त्रुटींमधून मार्ग काढायचा असतो. शिवाय श्रुतिका लेखनावर तंत्राच्या काही मर्यादा असतात. त्यात कालमर्यादा पहिली. केवळ ध्वनी एवढंच रेडिओ श्रुतिकेचं साधन. रंग, रूप, रस, गंध यापैकी कोणतीही इतर साधनं वापरता न आल्यानं श्रुतिका कितीही परिणामकारक संवादांनी अगर साऊंड इफेक्ट्सनी नटवलेली असली, तरी तीस ते पंचेचाळीस मिनिटांहून अधिक वेळ ती टिकाव धरू शकत नाही. केवळ श्राव्य अशा या नाटकात श्रोत्याच्या कल्पनाशक्तीला फार ताण द्यावा लागतो. नाटक किंवा सिनेमा पाहायला गेलेला रसिक उठून नाट्यगृहात गेलेला असतो इथं नाटक आपल्या घरी आलेलं असतं. आणि घरातल्या सर्व परिस्थितीचा त्या नाटकाला, म्हणजे पर्यायानं नाटककाराला विचार करावा लागतो.

रेडिओचं तंत्र पुलंनी झटकन आत्मसात केलेलं होतं. चटकदार संवाद आणि शब्दांचा खेळ यात पुलं रमत होते, पण त्याचबरोबर पुरक अंगांचाही विचार त्यांनी केलेला होता. त्यांच्या एका नभोनाट्यात गरूड झेपावतो अशा आशयाचं वर्णन होतं. रेडिओवर गरूडाची झेप कशी दाखवणार. त्यांनी वर्तमानपत्रांच्या पानांची फडफड करून पाहिली, पण त्यातून अपेक्षित परिणाम साधत नव्हता. थोडक्यात, शब्दांबरोबर अन्य इफेक्ट्सची गरज तंत्राला असते. श्रुतिकेतील पात्रयोजना श्रोत्यांना कळायला हवी. त्यासाठी संबंधित पात्राच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. सुरूवातीला अशा उल्लेखानं संबंधित पात्राची भूमिका करणाऱ्या कलावंताचा आवाज 'एस्टॅब्लिश' झाला की मग ते कमी केले तरी चालतात. 'टार्गेट ऑडियन्स' हा आजच्या काळाचा सर्वच क्षेत्रांना लागू होणारा मूलमंत्र असला तरी श्रुतिकेबाबत तो अधिक नेमका आहे. श्रुतिका ही घरातल्या सर्वांसाठी असते. त्यात आई-बाबा, काका-काकू, आजी-आजोबा, मुलगा-मुलगी, शेजारी अशा सगळ्यांचा अंतर्भाव असतो. त्यांना गृहित धरून ती लिहावी लागते. पुलंनी त्याचा बारकाईने विचार केला आहे. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'सारखी त्यांची श्रुतिका विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे. लेडिज क्लब किंवा भगिनी वर्गात एक भाषण, एक नाट्यछटा आणि संवाद असा त्रिवेणी संगम, शिवाय जोडीला गाणं असा मसाला त्यांनी भरला आहे. ज्या काळात पुलंनी हे लेखन केलं, त्या काळात महानगरांमध्ये लेडिज क्लब, सखी मंडळ वगैरेंची नुकतीच सुरूवात झालेली होती. श्रीमंतांच्या बायका वेळ घालवण्यासाठी अशा क्लबांमध्ये सामील होत. त्यातही अनेकजणींना मिरवण्याची हौस असते. आपल्या नवऱ्याच्या नोकरीतील किंवा समाजातील पदाचा-प्रतिष्ठेचा फायदा त्या उठवत. हे सगळं हेरून त्यांनी आपलं लेखन विविधांगी केलं आहे. त्यांचं स्वतःच संगीतप्रेम मात्र अनेक ठिकाणी अगदी सहज श्रोत्यांच्या भेटीला येतं. कधी ते विडंबनाच्या आधारानं तर कधी थेट गायनाच्या स्वरूपात. 'भगिनी मंडळात भाऊगर्दी'मध्ये त्यांनी एका वक्त्याला चक्क 'नवऱ्याचं संगोपन' या विषयावर भाषण द्यायला लावलं आहे. शिशूसंगोपन, गोसंगोपन वगैरे आपल्याला ठाऊक आहे, पण नवऱ्याचं संगोपन या विषयातूनच ते विनोदनिर्मिती साधतात. पतीसंगोपनाचा पहिला धडा देताना श्रुतिकेतील पात्राच्या तोंडून ते म्हणतात, 'पतीचं संगोपन करायचं आहे, हा विचार सोडून द्या...' आणि मग नवराबायकोच्या साध्या संवादातून त्यांनी जी धमाल आणली आहे ती पुलंच्या शैलीचं अफलातून दर्शन घडवणारी आहे. त्यानंतरचा वक्ता चक्क 'लोकरीचे विणकाम आणि स्त्रिया' या विषयावर बोलतो. लोकर, सुया, रिकामा वेळ आणि नवऱ्याचं पाकीट रिकामं करण्याची शक्ती या विणकामाला आवश्यक गोष्टी आहेत, अशा वाक्यातून पुरूष श्रोत्यांकडून ते हशा वसूल करतात. सुज्ञ महिला श्रोतेही त्यात सामील होतात. पत्नी माहेरी जाणं हा वर्षानुवर्षे संसार केलेल्या नवरोजींसाठी कपिलाषष्ठीचा योग समजला जातो. अशावेळी नवऱ्याची जी धांदल उडते, ते नमूद करणारी नाट्यछटा भरपेट हसवते. बायकोची माहेरची ओढ, तिला स्टेशनवर वेळेपूर्वी सोडण्याची मनःपूर्वक दाखवलेली तयारी अशा अनेक गोष्टींचा उहापोह करणाऱ्या या नाट्यछटेनं ही श्रुतिका श्रोत्यांना रेडिओशी खिळवून ठेवू शकते. श्रुतिका लिहिताना पुलंनी योग्य भाषेचा काटेकोर वापर केला आहे. त्यांच्यामते काही शब्द वाचताना फारसे त्रासदायक नसतात, पण उच्चारल्यानंतर ते प्रक्षोभक होतात. त्याचं भान सतत ठेवलं पाहिजे. कौटुंबिक श्रुतिका लिहिताना त्याचा विचार अगत्यानं करायला हवा. लहान मुलांचं अनाठायी कुतुहल जागृत होऊ न देण्याची खबरदारी श्रुतिका लेखकाला घ्यावी लागते. त्यामुळं विषयाची निवड आणि मांडणी करताना निरनिराळ्या वयोमर्यादा व बुद्धिमर्यादेचे गट एकत्र असणार आहेत, याची जाणीव लेखकाला असावी, असं ते आवर्जून सांगतात.

'सुखी संसार' या श्रुतिकेत पुलंनी 'दोन किंवा तीन मुले' असतील तरच संसारात गोडी राहते, हे अगदी रंजक पद्धतीनं सांगितलं आहे. नारूमामा आणि रामराव या दोन मित्रांच्या भेटीतून ही श्रुतिका खुलत जाते. नारूमामाला नऊ मुलं आहेत तर रामरावांना तीन. त्यांची गावं वेगवेगळी असली तरी हे दोघे बालमित्र असतात. कारण त्या दोघांचं आजोळ एकाच गावात. एकेदिवशी एका गावच्या आठवडा बाजारात भल्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी नारूमामा बैल विकायला जातात तर तिथं रामराव बैल खरेदीला आलेले असतात. त्यांची भेट होते आणि रामरावाच्या आग्रहामुळं, परतीच्या वाटखर्चाला पैसे दिल्यामुळं नारूमामा त्याच्या गावी जातात. तीन मुलांचं त्याचं सुखी कुटुंब पाहून नारूमामाला आपली चूक कळते. खाणारी तोंड वाढली की उत्पन्न वाढवावं लागतं, ते नसलं तर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कचकच सुरू. रामराव आपल्या मुलांना बगीचा करून देतात, मुलीला गुलाबाची तर मुलांना भाजीपाल्याची देखभाल करायला लावतात. ही मुलं आणि त्यांची आई सुखानं नांदत असतात. त्याचवेळी नारूमामांना आपल्या नऊ मुलांची कटकट आठवते. शेवटी 'मुले थोडी तर संसारात गोडी' हा संदेश ते देतात. कुटुंबनियोजनाचं महत्त्व सांगणाऱ्या या श्रुतिकेत कुठंही सरकारी प्रचाराचा थाट नाही. पण संदेश मात्र नेमका दिला आहे. रेडिओ सरकारी माध्यम असलं तरी त्यात रुक्षता कशाला, विनोदाची पखरण करत हवा तो संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे देता येतो, हे पुलंनी या श्रुतिकेतून दाखवून दिलं आहे. अशा श्रुतिकेत वासनांच्या आहारी जाऊन चालत नाही, असं सांगताना योग्य त्या शब्दांचा वापर त्यांनी केला आहे. जोडीला संत रामदासांचं 'लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना...' या वचनाचा उल्लेख केला आहे.
 
पुलंनी लिहिलेल्या श्रुतिकांमध्ये पात्रसंख्या जाणीवपूर्वक कमी ठेवली आहे. जास्त पात्रं असतील तर कोण कोणता संवाद म्हणतंय, आणि कुणाच्या प्रश्नाला कोण उत्तर देतंय हेच श्रोत्यांना कळत नाही. म्हणून पुलंनी दोन किंवा तीन पात्रेच घेतली आहेत. गरजेनुसार लहान मुले किंवा एखाद दुसरं पात्र वाढवलं आहे. तथापि, ती विषयाची गरज म्हणून. पात्रं बोलताना त्यांचे संवाद दोन किंवा तीन-चार शब्दांचे ठेवूनही चालत नाही. त्यामुळं गुंता अधिकच वाढतो. प्रत्येक पात्राची विशिष्ट लकब किंवा शैली ठेवली तर ते आणखी सोपं होतं. काही जणांना 'काय हो' किंवा 'बरं का' अशी सुरूवात करून बोलायची सवय असते. ती एखाद्या श्रुतिकेत वापरता येते. त्याचप्रमाणं एखाद्याच पात्राला भरपूर संवाद आणि दुसऱ्याला एखाद-दुसऱ्या शब्दाचा हुंकार असं लेखन उपयोगाचं नाही, असंही ते सुचवतात. फक्त दोनच पात्रांच्या म्हणजे नवरा-बायकोच्या संवादाच्या 'एकेकाची हौस'सारख्या श्रुतिका श्रोत्यांना खिळवून ठेवतात.

'एकेकाची हौस'ची सुरूवातही गंमतीशीर केली आहे. बायको नवऱ्याला जेव्हा 'अहो ऐकलं का' असं म्हणते तेव्हा काहीतरी गडबड होणार हे त्यानं गृहित धरलेलंच असतं. पण तसं उघडपणे म्हणण्याची सोय नसते. चुकून तसा काही उदगार त्यानं काढलाच तर विसंवादाला म्हणजे भांडणाला सुरूवात.

वर्तमानपत्र वाचण्यात रमलेल्या नवऱ्याला बायको म्हणते, 'अहो ऐकलं का' आणि तो अभावितपणे उद्गारतो, 'अरे बाप रे.' आणि मग उभयतांच्या विसंवादी संवादाची फटाक्याची माळ उडू लागते तेव्हा श्रोत्यांना हसून हसून पुरेवाट होते. अरे बापरे म्हणायचं कारण काय, असं ती विचारते, त्यावर आपली चूक कळून ती सावरण्यासाठी तो म्हणतो, वर्तमानपत्रात बातमी आलीय, नागपूरचं तापमान ११७ डिग्री झालंय म्हणून. मग ती चतूर बायको वर्तमानपत्र पाहते. बातमी नसतेच. मुद्दा असतो तो तिच्या माहेरची माणसं राहण्यासाठी येणार असतात. शेवटी नवऱ्याला आपली वळकटी वऱ्हांड्यात पसरावी लागते आणि बायकोच्या माहेरच्या माणसांना जागा करून द्यावी लागते. मुंबईसारख्या शहरामध्ये एखाद्या दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या लोकांना पाहुणे हे संकट वाटते. त्यातही ते राहायला येणार आहेत, म्हटल्यावर तर अडचणीत भरच. त्याचं खुमासदार वर्णन पुलंनी आपल्या कमावलेल्या शैलीत केलं आहे.

पुलंच्या कौटुंबिक श्रुतिका रंगण्याचं कारण त्यांचं निरीक्षण. ज्येष्ठ नाटककार वसंत सबनीस यांनी पुलंच्या या गुणाचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हटलंय : पुलंची निरीक्षणशक्ती फार सूक्ष्म आहे. माणसांचे आणि माणसांच्या स्वभावातील तपशील त्यांना चटकन जाणवतात. सहज बघितले तरी अनेक बारकावे त्यांच्या लक्षात येतात. एखादी व्यक्ती समोरून गेली तरी ती व्यक्ती कोण असेल, तिचा व्यवसाय काय असेल, तिची परिस्थिती काय असेल, ती घरात कशी बोलत असेल याचे अंदाज ते सहज बांधतात. अशा व्यक्ती पाहून ते संवाद बोलत असत. हा त्यांचा खूप जुना छंद आहे.

श्रुतिकांमधील व्यक्तिरेखा नमुनेदार वठण्यासाठी पुलंच्या या गुणाचा उपयोग निश्चितच झाला आहे. पुलंचं मराठीवर असलेलं प्रभुत्व. त्यांनी केलेली माणसांची निरीक्षणं यातून त्यांच्या श्रुतिका आणि नाटकेही उत्तम उतरली आहेत. पुलंनी गडकऱ्यांची भाषा संत, पंत आणि शाहिरी अशी तीन्ही वळणे लीलेने घेते असं म्हटलं आहे. पुलंनीदेखील भाषेला हवे तसे वाकवले आहे. सुभाषितवजा वाक्यं लिहिताना त्यांनी म्हणी आणि वाक्प्रचारांचा केलेला वापर, नव्याने 'कॉईन' केलेले शब्द, म्हणी पाहिल्या की थक्क व्हायला होतं. सातारी, कोल्हापूरी, वऱ्हाडी वळणाचं त्यांचं लेखन विविध पात्रांच्या मुखातून ऐकायला मिळतं. पुलंच्या श्रुतिकाही श्रोत्यांना रोचक वाटतात, त्याचं कारण त्यांचं बोलल्यासारखं लिहिणं. वास्तविक, पुलंच्या सगळ्याच लेखनाबाबत तसं म्हणता येईल. त्यांचं लेखन बोलल्यासारखंच आहे. प्रथमपुरूषी एकवचनी उल्लेख असल्यानं त्यांचा लेख वाचताना ते समोर बसून आपल्याशी बोलत आहेत, असंच वाटतं. 'अत्र्यांच्या लेखनात मला बोलक्या शब्दांची क्वॉलिटी सापडली. अत्रे उत्तम वक्ते होते, त्यामुळं त्यांना शब्दांच्या प्रवाहाचा साक्षात्कार झाला होता,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'शब्द गाते-बोलते हवेत,' अशी त्यांची धारणा होती. बोलल्यासारखं लिहिल्यावर लिहिलेलं पुन्हा कसं बोलावं? हाही प्रश्नच आहे. ते म्हणतात : रेडिओ हा मुख्यतः बोलविता धनी आहे, वाचविता नाही. 'बोलेल तो करील काय?' या प्रश्नाला रेडिओनं चांगलं उत्तर दिलं आहे. जो चांगला बोलेल, तो उत्तम रेडिओ लेखक होईल. हा 'रेडिओ लेखक' शब्द जरा धेडगुजरी झाला. थोडासा वदतो व्याघातही त्यात आला. रेडिओ जर बोलविता आहे, तर तो लिहविता आणि वाचविता कसा? एवढ्यासाठी की इतर काही बंधनापूर्वी तो वेळेचं बंधन मानतो. तुम्ही नाटक लिहा, भाषण लिहा, कविता वाचा, बातम्या सांगा – काय वाटेल ते करा, समोरचा मिनिटाचा पंजर विसरून काहीही करता येत नाही. इथं शब्द सेकंदाच्या तालात मोजून लिहावे लागतात. पण ऐकणाऱ्याला बोलणारा मोजूनमापून बोलतो आहे हे न कळता मोजूनमापून बोलावं. म्हणजे सहजतेची गंमत हवी, आणि चालायचं आहे तारेवर.

पुलंनी 'रेडिओसाठी लिहावं कसं' यावर रेडिओवर दिलेल्या भाषणातून वरील मुद्दा घेतला आहे. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या कसोट्या त्यांच्याच श्रुतिका आणि नभोनाट्यलेखनाला लागू पडतात. पुलंचं लेखन उच्चारासह असतं. त्यांची भाषा लवचिक आहे. आपल्या नेहमीच्या बोलीभाषेतील संवादामुळं त्यांचं लेखन आपलंसं वाटतं.

'मी हात दाखवतो,' 'मी अभ्यास घेतो', 'मी कपडे शिवतो' अशा काही श्रुतिकांमधून पुलंनी मध्यमवर्गीय घराघरातील संवादांनी सर्वांना हसवलं आहे. 'मी हात दाखवतो'मध्ये ''तुम्ही नाही का म्हणाला, माझं इंग्लिश कच्चं आहे – सारखं इंग्लिश बोललं की सुधारेल म्हणून! इंग्लिश लोक सारखं इंग्लिश बोलतात म्हणून त्यांचं इंग्लिश सुधारतं. तुम्हीच नाही का सांगितलंत?'' किंवा वडिलोपार्जित इस्टेटीतील काही तरी येणार तुमच्यापर्यंत असं हस्तरेषातज्ज्ञ नाबर म्हणतात तेव्हा, '' वडलांना दमा होता आमच्या. तेवढा ठेवलाय आमच्यासाठी. त्याखेरीज काही ठेवलं नाही'', असं म्हणून ते हशा मिळवतात. भविष्याबाबत काही शंका विचारल्या तर त्याचं उत्तर देता यायचं नाही हे ओळखून हस्तरेषातज्ज्ञ नाबर सुनावतात, ''या भविष्याच्या बाबतीत भलत्या शंका विचारलेल्या रूचत नाहीत. मी स्पष्टच सांगतो. रागावू नका. मी कडक मंगळाचा माणूस, नको म्हटलं तरी तोंडातून शब्द जायचा तो जरा तिखटच!'' या श्रुतिकेतील अण्णा आणि त्याच्या कुटुंबाचं भविष्य सांगता सांगता नाबर अण्णांच्या पत्नीला शांताला त्यांचा गळा गोड असल्याचं सांगतात आणि सराव केल्यास उत्तम गायिका होण्याची चिन्हे असल्याचं भविष्य वर्तवतात.

नाबर – तुम्ही सकाळी उठून तंबोऱ्यावर स्वच्छ मेहनत करा.
अण्णा - मी?
नाबर – तुम्ही नाही हो! ह्या. नाही गळा तयार झाला तर दुसऱ्याचा सोडा, माझा हातदेखील मी हातात धरणार नाही - हां!

नाबर यांच्या अशा प्रोत्साहनानं मग शांताबाई गाणं शिकायला लागतात. 'मी अभ्यास घेतो'मध्ये त्यांच्या आवाज नसताना गाण्याच्या अट्टहासाची खिल्ली ते उडवतात. त्या गायला लागतात, तेव्हा अण्णा त्यांना म्हणतात, 'हळू.' कारण ते मुलांचा अभ्यास घेत असतात. एकाचवेळी शांताच्या गाण्याचा अभ्यास आणि दुसरीकडं मुलांचा अभ्यास यातून जी गंमत होते, ती पुलंनी सुरेख फुलवली आहे. शांताला अस्ताईचा सराव करायला सांगता सांगता, आईपेक्षा मुलगा शंकरच 'लट उलझी सुलझा' ही ओळ छान म्हणतो. तेव्हा छबीही तसं म्हणू लागते. अण्णा खेकसून म्हणतात, छबे गणित सोडवायचं ना तुला? तेव्हा शंकरनं गाणं म्हटलं की, असा हवाला ती देते. अण्णा म्हणतात, 'तो मुर्ख आहे.' छबी चटकन म्हणते, 'मग आई म्हणते ते? ती काय मुर्ख आहे?' तिच्या या बिनतोड युक्तिवादावर अण्णा निरूत्तर होतात. शेवटी छबी म्हणते की तिला आईसारखं गाणं म्हणायचं आहे. अभ्यास सोडून गाणं म्हणायला विरोध करण्यासाठी अण्णा म्हणतात, '' छबे, चावटपणा नाही -'' गाणं शिकवणारे नाबर गुरूजी त्यामुळं नाराज होतात. सुमार दर्जाचं असलं गाणं अण्णांना आवडत नसतं. पुलंनी असल्या शिकण्याची रेवडी मस्त उडवली आहे. 'गाणं ही सोपी गोष्ट नाही,' हेच त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. हौशी गायकांना मारलेला हा टोमणा मजेशीर आहे.
रेडिओ ऐकणारा जो वर्ग आहे, त्याची नस पुलंनी ओळखली होती, त्यामुळं त्यांच्या श्रुतिका त्यांच्या अन्य लेखनासारख्याच खुमासदार आहेत. रेडिओवर त्यांनी दिलेली विविध विषयांवरील भाषणेदेखील त्यांच्या खुसखुशीत लेखणीचा प्रत्यय देणारी आहेत. अफाट वाचन, सुक्ष्म निरीक्षण शक्ती, मानवी स्वभावातील उण्या-अधिक गोष्टी, विनोदी शैली यामुळं त्यांची भाषणं, श्रुतिका कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच भूरळ घालणाऱ्या आहेत. कारण नृत्य, नाट्य, गायन, वाद्यवादन, चित्रकार, इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या कौशल्य असलेल्या शिंपी, धोबी, सुतार अशा माणसांबद्दल पुलंनी जाणीवपूर्वक किंवा जाता-जाता केलेली शेरेबाजी खूप शिकवणारी आहे. प्रत्येक पात्रासारखी होणारी त्यांची लवचिक भाषा श्रोत्यांना त्या पात्राबरोबर वाहवत नेते आणि हितगूज साधल्यासारखी त्यांची भाषणशैली पुलं आपल्या पुढ्यात बसूनच जणू आपल्याशी बोलत आहेत, असा प्रत्यय देणारी आहे. रेडिओ माध्यमाचं मर्म नेमकं ओळखलेल्या पुलंनी त्या माध्यमासाठी केलेलं लेखन विषयदृष्ट्या कालबाह्य वाटत असलं तरी शैली म्हणून ते लेखन चिरकाल अभ्यास करण्यासारखं आहे, यात शंका नाही.

रजनीश जोशी,
सोलापूर

Tuesday, November 8, 2022

निर्मळ, निखळ आनंदाचा दिवस - किशोरी तेलकर

नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

प्रिय पु. ल.

वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आज तुम्ही १०३ वर्षांचे झालात... हो, झालातच! तुमच्याबाबत भूतकाळवाचक कुठलंही क्रियापद वापरायला मन धजत नाही. याचं कारण शरीरानं तुम्ही २२ वर्षांपूर्वी हे जग सोडून गेला असलात, तरी आजही तुम्ही तुमच्या अक्षर वाङ्मयाच्या रूपानं, तुमच्या सिनेमांच्या रूपानं, तुमच्या गाण्यांच्या रूपानं, तुमच्या एकपात्री व्हिडिओंच्या माध्यमातून आमच्यात आहातच. बहुतांश मराठी घरांत तुमचं एखादं तरी पुस्तक असतंच. आजही प्रवासाला जाताना ‘बोअर झालं तर वाचायला असावं’ म्हणून तुमचंच एखादं पुस्तक सहज बॅगेत टाकलं जातं. पुस्तक प्रदर्शनांतील पुस्तक विक्रीत तुम्ही आजही टॉपवर आहात. तुमच्या नावाचा सिनेमा निघाला, की तो पहिल्या दिवसापासून हाउसफुल्ल! तुमच्या नावे फेसबुकवर एखादा ग्रुप स्थापन झाला, की तो काही दिवसांत लाखभर सदस्यसंख्या सहज गाठतो. एकेकदा वाटतं, सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात तुम्ही असता, तर तुम्ही तेही जग केव्हाच पादाक्रांत केलं असतं; पण एक मन म्हणतं, नकोच ते! आजच्या या उथळ, थिल्लर आणि क्षणिक ‘मनोरंजना’च्या जमान्यातल्या कथित विनोदांपेक्षा तुमचा साधा-सोपा, निर्मळ, निर्विष विनोद किती तरी उच्च पातळीवरचा होता. महाराष्ट्रातल्या किती तरी पिढ्यांचं पोषण या दर्जेदार विनोदावर झालं आहे. अभ्यासातून, चिंतनातून, सूक्ष्म निरीक्षणातून तुम्ही मांडत असलेली विसंगती आम्हाला हसवता हसवता खूप काही शिकवून जात होती. तुमच्यामुळं आम्हाला परदेशी भाषांतलं दर्जेदार साहित्य मराठीत अनुभवता आलं. नाटकांचं रूपांतरही असं अस्सल मराठीत केलंत, की कळूच नये हे रूपांतर आहे! नाटक असो वा सिनेमा, आपला शेर संपला, की तुम्ही तिथं न रेंगाळता पुढं निघालात. तुम्हीच आम्हाला दर्जेदार कवितांचा आस्वाद घ्यायला शिकवलंत.

सुनीताबाईंच्या जोडीनं महाराष्ट्रभर कवितावाचनाचे प्रयोग करून तुम्ही रसिकांना अपरंपार आनंद दिलात. गांधीजींपासून रवींद्रनाथांपर्यंत अनेकांचं महत्त्वाचं समकालीन साहित्य भाषांतरित केलंत. रेडिओवर काम केलंत. ‘दूरदर्शन’चे पहिले निर्माते झालात. तुमच्याच डोळ्यांनी आम्ही लंडन, पॅरिसची ‘अपूर्वाई’ अनुभवली. तुमचंच बोट धरून सिलोन ते जपान असा ‘पूर्वरंग’ही बघितला. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकलात आणि ‘माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,’ हे स्वत:च्या वागणुकीतून सिद्ध केलंत. तुम्ही या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलंत; जगण्याचं प्रयोजन शिकवलंत! समाजाचं देणं समाजाला कसं (न बोलता) परत करावं हे शिकवलंत. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं तुमच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत, स्वच्छ जगलात! विनोदाच्या माध्यमातून मराठी जनांच्या मनाची मशागत करीत तुम्ही विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने तुमच्या मागून विनोदाचं, आनंदाचं गाणं गात गात चालत निघाला. म्हणूनच तुमची आनंदयात्रा आजही सुरूच आहे. तुमच्या साहित्यावर, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे!

- चकोर
महाराष्ट्र टाईम्स 

Monday, November 7, 2022

ब्रिज-देशपांडेंची भाईगिरी - मंदार केसकर

८ नोव्हेंबर पुलंचा जन्मदिन..

एखादी व्यक्ती आपल्या वक्तृत्वाने, लिखाणाने, शुद्ध सात्विक आचरणाने अनेक उत्तमोत्तम पिढ्या घडवू शकते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "पु.ल." ! सबकुछ पु.ल., पुलकित, पुलोत्सव, पुलमय, पु.ल. डे.... आणि बरचसं असच जे काही अप्रतिम ते सर्व फक्त "फुल्ल देशपांडे" च म्हणावं लागेल ! सर्व स्तरातील मित्रांशी लीलया मैत्री करून आपलं स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्याची खासियत शिकवणारा... साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतात आपली "भाईगिरी" निर्माण करणारा एक "बाप माणूस" !

खरं तर "भाई" हा शब्द आजच्या काळात समाजात वेगळ्या अर्थानं रूढ झालाय पण सगळ्याच प्रांतात कोणीतरी एक "भाई" असतोच ! तसंच साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रांतातही "पु.ल." नावाच्या "भाईनं" आपलं प्रेमळ साम्राज्य स्थापन केलय व ते अजूनही कित्येक शतकं टिकणारय यात काही शंकाच नाही. हा "भाई" अदृश्य रूपाने अनेकांची साथसंगत करतोय, कुणाला आपल्या साहित्यातून शहाणं करतोय, कुणाला समजावतोय तर कुणाला धीर देतोय व आपल्या "भाईगिरी"ची उपाधी सार्थ ठरवतोय हे मान्यच करावे लागेल. मला तर या "भाईने" बोटाला धरून शिकवल्याचा कधी कधी भास होतो. त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्र कोणत्या ना कोणत्या रूपाने सतत आपल्या अवतीभवती फिरल्याचा आभास होणं म्हणजेच ही "भाईगिरी" ...पण .... ती प्रेमाची, आपुलकीची !

ज्या व्यासपीठावर जातील तिथं "आपला माणूस" हा विश्वास निर्माण करणारे व "आपला माणूस" म्हणून Heart मध्येच रुतून बसणारे "पु.ल." म्हणजे साहित्यातील "तेजस्वीनावधीतमस्तु | मा विद्विषावहै। " या वेदातील शेवटच्या प्रार्थनेप्रमाणे आहेत. बालपणापासून गेली 30-35 वर्षे झाली मी पुलंच्या सर्व व्यक्तिरेखा आधी कॅसेट्स, मग सीडी व आता usb च्या माध्यमातून ऐकतोय पण प्रत्येकवेळी मला आजच ऐकतोय हा भास होतो. त्यामुळं त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा अजूनही माझ्या मनात त्याच वयाची व जिवंत झऱ्याप्रमाणे वाहतेय. उदाहरणच द्यायचं तर त्यांनी रंगवलेला "सखाराम गटणे" चा आज सहस्त्रचन्द्रदर्शन सोहळा झाला असेल किंवा "चितळे मास्तर" आज दीडशे वर्षाचे झाले असतील पण ही माणसं अजूनही हजारो लोकांच्या मनात ताजीतवानी आहेत ती केवळ पुलं च्या शब्द सामर्थ्यानेच ! पुलं नी आम्हा सर्व पिढ्याना माणसं वाचायला, ऐकायला, मिळवायला व जोडायला शिकवलं... त्यांच्या ऐकलेल्या व्यक्तिरेखेच्या जोरावर कोणत्याही गप्पांच्या मैफिलीत पहिल्या रांगेत बसण्याचं धाडस त्यांच्या साहित्यानं कित्येकांच्या अंगात निर्माण केलं अस म्हणणंच एकदम रास्त ठरेल !

प्रवासाला जाताना एस. टी. स्टँडवर पोट खपाटीला गेलेला एखादा वृद्ध कुठंतरी "अंतुबर्व्याची" आठवण करून जातो, शाळा सुटल्यावर रस्त्याच्या कडेने दोरी धरून सरळ जाणारा चपचपीत तेल लावून भांग पडलेला एखादा विद्यार्थी "सखाराम गटणे" सारखा दिसतो, कष्टाचे काम झाल्यावर तपकीर ओढत बसलेला एखादा चिवट म्हातारा उगीच "पेस्तनकाका" सारखा डोळे मिचकावून जातो, अंगात कोट व रस्त्याने चपल्या झिजवत आपल्याच स्वानंदात जाणारे एखादे आजोबा "चितळे मास्तर" सारखे भासून जातात. आपल्या नावीन्यपूर्ण कलेतून रसनिष्पत्ती करणारा जणू छोटेखानी विद्यापीठच चालविणारा "पट्टीचा पानवाला" हा "थुंकसांप्रदायिक" लोकांना जाता-जाता काही-काही फुटांवर 'भाईंची' आठवण करून देतो. "हरितात्या" इतिहासाच्या पानापानात जाऊन जगले पण कित्येक जण 'भाईंच्या' या पात्रांसोबत जगतायत ! एखाद्या संगीत मैफिलीला गेल्यावर आपली उगीच अवघडलेली मान सैल करण्यासाठी मानेला दिलेला हिसडा जेव्हा समोरच्या गाणाऱ्याला उत्तम दाद वाटते तेव्हा उगीच आपण "रावसाहेब" झाल्याचा फील देऊन जातो, तर एखाद्या मित्रमंडळींच्या कार्यात जीव तोडून event management प्रमाणे सिस्टीमॅटिक केलेले कष्ट सुद्धा "नारायणा" ची अचूकता साधायला थोडे कमीच पडतात आणि ओशाळल्यासारखी भावना निर्माण होते..यासारखी अनेक 'पुराव्यानी शाबित' होणारी 'हंड्रेड परसेंट रियल' विसंवादी पात्रं "भाई" आमच्या सोबतीला सोडून गेले आहेत.

निवांत वेळेत काम करताना, कुटुंबासोबत किंवा एकटे लांबच्या प्रवासात, ड्राईविंग करताना, रात्रीच्या वेळी कंटाळा आल्यावर दिवसातील कोणत्याही वेळी ही "भाई" ची माणसं तात्काळ हजर आहेत त्यामुळं एकटेपणा वाटायची काय बिशाद आहे ?

आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या "भाईच्या ओसरीवर" वेळ मिळेल तसं खोडकर पणानं थोडंफार दंगा करून जावं म्हणजे तेवढंच ताजतवानं होईल म्हणून हा लेखप्रपंच..!

कारण त्यांच्या कोणत्याही व्यक्तिचित्राला वयाचं बंधन नाही. मी लहान असतानाही "रावसाहेबांच्या" अड्ड्याचा मेंबर होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार व त्यांच्या दर तीन शब्दांनंतर येणाऱ्या "आलं तेच्या आयला...." सारख्या "झकासपैकी छप्पर उडवून देणाऱ्या" कचकावून दिलेल्या शिवीचा मनसोक्त आस्वाद घेणार !

अनेक व्यक्तीचित्र जीवंत ठेवलेल्या व्यक्तीवर चार ओळी लिहिणं म्हणजे सुध्दा त्यांच्याच भाषेत " पं. कुमारजींच्या मैफिलीत श्लोक म्हणून दाखवल्यासारखं" आहे... पण हे लिहिण्याचं धाडसही त्यांच्याच ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यामुळंच आहे हे मात्र 100% खरं ! कित्येकांचं साहित्य वाचताना "अनुवंशिकता" ही वाचलेल्या, ऐकलेल्या साहित्यातूनही निर्माण होऊ शकते हा विश्वास निर्माण झाला व कधीही भेट नसताना "पोटीचा जिव्हाळा" उत्पन्न झाला ! इतिहासात "बाजीप्रभू व मुरारबाजी देशपांडेंच्या" वीररसामुळे अनेक 'मावळ्यांना' लढण्याची उमेद निर्माण झाली तर आजच्या काळात "पुलं देशपांडेंच्या" साहित्यरसामुळे लिहित्या 'हातोळयाना' प्रेरणा मिळत गेली म्हणणेच योग्य होईल ! ह्या "ब्रिज देशपांडे (पुलं)" खालून माझ्यासारख्या सर्वसामान्यासारखे अनेक जण वहाते होत गेलेत व छान पैकी तरून जाताहेत ! तरुन जाताना या "ब्रिज" चा नक्कीच आधारासाठी उपयोग होतोय.... हा "ब्रिज देशपांडे" आम्हांला नेहमीच वाहते आणि लिहिते होण्यासाठी म्हणा किंवा मनं जोडण्यासाठी म्हणा "दीपस्तंभा" प्रमाणे अंतापर्यंत मार्गदर्शन करत राहणार ...!

"भाईंची"ही "भाईगिरी"..'बिगरी ते मॅट्रीक' च नाही तर 'बिगरी ते डिग्री' व त्याहीपुढे 'डिग्री ते तिरडी' पर्यंत आमच्यावर "राज्य" करणार हे नक्कीच !

मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
मोबा. 9422380146
mandar.keskar77@gmail.com

न संपणारा संवाद - मुग्धा भिडे

८ नोव्हेंबर आपल्या लाडक्या "पुलंचा" वाढदिवस आणि मनात आलं त्यांच्याशी पत्ररूपाने संवाद साधावा. म्हणून केला हा 'अट्टाहास'!

खरे तर 'फेसबुक'वर मोठं लिखाण सहसा वाचलं जात नाही. तरी लिहायला घेतलं पण माझ्या शब्दांना आवर घालता आला नाही. पुलंविषयी किती लिहिलं तरी कमीच आहे. लिहिणं जड मनाने थांबवलं. असो…आपल्या भावनांना शब्दांचं कवच घातलं आणि पत्र पूर्ण केलं.


आदरणीय भाई,
स. न. वि .वि.

भाई, आज तुमचा वाढदिवस. अर्थातच तुमचा 'वाढदिवस' हा आमच्यासाठी 'दसरा' 'दिवाळी' चा 'सण' जणू. अगदी आपल्या जवळच्या जिवलग माणसांवर आपण जशी प्रेमाची उधळण करायला सदा तत्पर असतो तसंच तुमच्या बाबतीत आम्हा चाहत्यांचं होतं. ज्याला आम्ही आमच्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणतो..

अहो! हल्ली गल्लो गल्ली काय राजकारणात काय स्वतःला 'भाई' म्हणवणारे व 'भाईगिरी' करणारे खोऱ्याने असतात पण आम्ही 'भाई' म्हणून तुम्हालाच जाणतो. आमच्या द्र्ष्टीने दुसरा कुणी 'भाई' होऊ शकत नाही. ज्यांनी माणसांच्या हृदयावर 'राज' करून मनावर 'भाईगिरी' केली आणि तेच आमच्या शेवटच्या श्वासापर्यत करत राहणार . आमच्या 'भाई' ना दुसरा कुठलाही पर्याय नाही

तुम्हाला सांगायचे तर तशी तुमची आमची 'गाठ भेट' होत असते. कधी नाथा कामत, नारायण होऊन तर कधी सखाराम गटणे, मास्तर होऊन तर नामू परीट, पानवाला होऊन...पण ही 'भेट' घडवून तुम्हीच आणता हे मात्र नक्की!

अहो, अशावेळी तुमची आमची 'गळाभेट' झाल्याचा परमोच्च आनंद आम्हाला होत असतो. तो आम्हाला होणारा आनंद गगनात न मावता खूप सारं मानसिक समाधान देऊन जातो. आमच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यात तुमचा महत्वाचा मोलाचा वाटा आहे. हे तुम्हाला मान्यच करावे लागेल. तुम्ही हे कधीच नाकारू शकणार नाही.

तुम्ही आम्हाला केवळ संस्कार दिले नाहीत तर त्याच बरोबर अवलोकन करून पराकोटीचा विचार करायला सुद्धा शिकवलं आहे.कानसेन होऊन चांगल्या संगीतावर प्रेम करायला शिकवलं आहे. आणि ते श्रवण केल्याने दुखं कसं हलकं होतं हे देखील आमच्या मनावर बिंबवल आहे. ह्याचा मला बरेचं वेळा अनुभव आला आहे.उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास 'देसाई मास्तरांच्या मजेशीर शैलीतील सदा आठवणीत राहणारी मेहफिल' हेच मी देईन. तुम्ही आमच्यासाठी काय आहात म्हणून काय सांगू!

तुम्ही म्हणजे आमच्या जीवनातील चैतन्य आहात. आमच्या जगण्यातील 'संजीवनी' आहात. तुम्ही आम्हाला बहाल ज्ञानाचा माधुर्य टिकवणारा मधुर झरा बहाल केला आहे. ज्या मध्ये वेळचे बंधन न पाळता आम्ही 'नखशिखांत' भिजायला तयार असतो. तुम्ही केललं 'प्रवास वर्णन' म्हणजे आमच्या साठी एक वेगळा मजेशीर अनुभव असतो. आम्ही आमच्या रोजच्या जीवनात आजूबाजूला इतकी वेगवेगळ्या स्वभावाची विचारांची चित्र विचित्र माणसं पाहत असतो. काही लक्षात राहतात तर काहींना आम्ही पार विसरूनही जातो. पण तुमच्या 'व्यक्तींना' तुम्ही तुमच्या लिखणातून आमच्या मनात कायमचं अढळ स्थान दिलं आहे, की ज्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही. मग तो अंतू बर्वा, चितळे मास्तर असो किंवा नारायण, सखाराम, गटणे असो. या सारख्या अनेक तुमच्या 'व्यक्तिरेखा' आमच्या मनात चिरकाल स्मरणात राहणार आहेत.

तुम्ही लेखक, कवी संगीतकार, पेटीवादक (पेटीला 'संवादिनी' म्हणतात हे सांगणारा तुमचा किस्सा मला नेहमी आठवतो) कथाकथनकार, वक्ता, नाटककार, कलाकार, अजून तुम्ही काय नव्हता हेच मला माहिती नाही. कुणीही 'सर्वगुणसंपन्न' नसतं असं म्हणतात. पण ह्याला तुम्ही एकमेव अपवाद आहात. तुमच्या अंगी इतके सारे गुण खचाखच भरले आहेत की गुणांनी देखील लाजावं. हे तुमचं नुसतं कौतुक नाही तर वास्तव आहे आणि उभ्या महाराष्ट्राने ते मान्य केलं आहे.तसं पाहिलं तर आम्ही तुम्हाला कधीही विसरू नये असं साहित्य नाटक, चित्रपट, संगीत असं कलेचे विशाल भांडार तुम्ही आम्हाला तुमच्यातील दानशूर वृत्तीने 'दान' म्हणून दिलं आहे. तुमचा हा अनमोल खजिन्यातील ठेवा आमच्याकडून पिढ्यानपिढ्या जपला जाईल ह्याची मला खात्री आहे. तुम्हीसुद्धा ते कौतुकाने पाहत असालच ना? की तुमचा अखंड 'वावर' सतत आमच्या हृदयात रात्रंदिवस चालू असतो ते!

भाई, पत्र पूर्ण करण्याची इच्छा होत नाही. शेवटी एवढेच सांगेन की तुम्ही आम्हाला साहित्याची देणगी जी दिली आहे त्याची 'गोळा बेरीज' कुणाला देखील मांडता येणार नाही. मग तो नावाजलेला 'गणितीतज्ञ' असला तरी...

असो कळावे, आपला हा न संपणारा संवाद अखंड चालूच राहील.

तुमची एक चाहती,
मुग्धा भिडे, पुणे

Sunday, November 6, 2022

नाटकाचं वेड हा रक्तदोष

कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुरुवातीचे दिवस म्हटले की कष्ट, परिश्रम, हालअपेष्टा वगैरे शब्द डोळ्यांपुढं उभे राहतात. पुष्कळदा मला “तुमच्या सुरुवातीच्या किंवा उमेदवारीच्या दिवसांबद्दल लिहा' असंही सुचवण्यात येतं. परवाच कोणीतरी “तुमच्या शागिर्दीच्या काळासंबंधी लिहा' असंही सांगितलं. मी म्हणतो, “मी शागिर्दी अशी कधी केलीच नाही.” त्याला माझं उत्तर उद्धटपणाचं वाटलं असणार. तो चटकन म्हणाला, “असं कसं शक्‍य आहे? तुम्ही कुणाला गुरू मानत नाही का?” मी म्हणालो, “कलेच्या क्षेत्रात ह्या गुरुप्रकरणामुळं बराचसा घोटाळा झाला आहे. कुणाला गुरू मानणं न मानणं ही एक मनात जतन करून ठेवायची गोष्ट आहे. गुरूच्या मोठेपणावर खपण्याची नाही. तुमच्या कलेतूनच तुमचं कर्तृत्व दिसावं लागतं. एखाद्या कलेच्या साधनेसाठी तुम्ही किती कष्ट केलेत, कुठल्या आर्थिक विपरीत परिस्थितीला तोंड दिलंत, तुम्ही लहानपणी श्रीमंत होता की गरीब ह्याला फारसं महत्त्व नसतं. नाटकात एकदा “शिवाजी' म्हणून उभं राहिलात की शिवाजीमहाराजांचं नाटककाराला अभिप्रेत असणारं “शिवाजीपण' तुम्ही किती समर्थपणानं करता हे महत्त्वाचं. मी स्वत: एखाद्या क्रीडांगणावर खेळायला जावं अशा भावनेनं रंगभूमीवर गेलो. नाट्यविषयाचा अभ्यास करणारे समीक्षक मला कधी कधी विचारतात की, रंगभूमीवर जाण्यामागली तुमची प्रेरणा कोणती?''

मला ह्या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी देता येईल असं वाटत नाही. फार तर मी एकच म्हणेन की, जिथं जिथं मला आनंदनिधानं सापडली तिथं तिथं मी गेलो. मला वाटतं, मीच नव्हे तर कलेच्या क्षेत्रातली बहुतेक माणसं तिथं त्यांना आनंदाचा ठेवा लाभतो म्हणूनच जातात. पुढं त्यात यश, कोर्ती, धनलाभ इत्यादी गोष्टी येतात. पण त्या दिशेची पहिली धाव ही आनंदाच्या प्राप्तीसाठी असते.

कुणीसं म्हणे हिमालयाची शिखरं चढणाऱ्या एका गिर्यारोहकाला विचारलं होतं की, “तुम्ही डोंगर कशासाठी चढता?” त्यानं उत्तर दिलं, ''कारण ते तिथं असतात म्हणून." डोंगर हे चढण्यासाठीच असतात ह्यावर त्याची नितान्त श्रद्धा होती. नाटक हे लोकांपुढं करून दाखवण्यासाठीच असतं अशा श्रद्धेशिवाय नाटकात जाईलच कोण? आणि नाटक पाहण्याची क्रिया आपल्याला आनंद देते असं वाटल्याशिवाय नाटक पाहायला जाईलच कोण? महाराष्ट्र नाटकवेडा आहे वगैरे आपण म्हणतो. पण ह्या महाराष्ट्रातच अत्यंत सुसंपन्न अशी लक्षावधी माणसं अशीही असतील की त्यांना नाटक पाहावं असं चुकूनही वाटलं नसेल. मागं एकदा एका विद्यापीठाच्या कुलगुरूनं क्रिकेट मॅच पाहण्यात लोक आपला वेळ फुकट दवडतात असं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर रिटायर्ड लोकांना “रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला लावलं पाहिजे.' असंही त्यांचं मत होतं. माझ्या हातात सत्ता असती तर ह्या कुलगुरूला मी रस्ते दुरुस्त करतच ठेवलं असतं. ज्यांना जीवनातली “वेडं' कळत नाहीत, त्यांच्या तोंडून जे जे निघतं ते किती मूर्खपणाचं असतं ह्याचं हे आणखी एक उदाहरण आहे.
वाऱ्यावरची वरात ह्या नाटकात पु.ल. आणि सुनीताबाई
वाऱ्यावरची वरात ह्या नाटकात पु.ल. आणि सुनीताबाई 
हे वेड कां लागतं? कोण लावतो? ते कां वाढीला लागतं? ह्याची उत्तरं कोण देणार? रंगभूमीवर यश मिळवणाऱ्यांची तर गोष्ट सोडाच, पण तिथं सतत मार खात आलेला माणूसदेखील मार खात खात तिथंच राहतो. मग हे वेड नाटकाचं असो, गाण्याचं असो, 'की इतर कुठल्याही कलेचं असो. जुन्या नाटकमंडळ्यांतली माणसं किंचित टारगटपणानं ह्या वेडाला 'अण्णासाहेबांची भुकटी' म्हणत. अण्णासाहेब म्हणजे किर्लोस्कर. नाटकमंडळींच्या जेवणातलं हे तिखट, पिठल्याबरोबर एकदा पोटात गेलं की ते त्या माणसाला भुतासारखं झपाटतं. “लाइम लाइट' नावाचा चार्ली चॅप्लिनचा रंगभूमीवरच्या झगमगाटापासून दूर फेकल्या गेलेल्या नटाच्या जीवनावरचा बोलपट आहे. तो उपेक्षित नट पुन्हा पुन्हा थिएटरच्या आसपास रेंगाळत असतो. एकदा तरी ग्रीज पेंट लावायला मिळावा म्हणून तडफडत असतो. त्याच्यावर माया करणारी एक तरुणी त्याला म्हणते, “ह्या रंगभूमीनं तुला इतकं झिडकारलं तरी पुन्हा पुन्हा तिथं कशाला कडमडतोस? तुला तिटकारा येत नाही का तिचा?” चॅप्लिन म्हणतो, “येतो ना. मला कुठं रक्‍त सांडलेलं पाहूनदेखील तिटकारा येतो. पण माझ्या धमन्यांतून रक्तच वाहत असतं-त्याला काय करणार?”

आम्हां काही निकटच्या मित्रमंडळींत 'रक्‍तदोष' असा एक परवलीचा शब्द आहे. रात्र रात्र जागून आपण गाणी कां ऐकली? याचं उत्तर 'रक्‍तदोष.' नाटकांच्या तालमीपासून ते उभं करण्यापर्यंतची, घरचं खाऊन धडपड कां केली-रक्‍तदोष. थोडक्यात म्हणजे नाटक-तमाशे-गाणी असलं काही केल्याशिवाय तन आणि मन ह्या दोघांनाही राहवत नाही हेच खरं. सामान्यांच्या भाषेत ह्याला 'खाज' म्हणतात. नाटकात पैसा मिळतो म्हणून कोणीही इथं प्रवेश करत नाही. अगदी नाटकांचा काँट्रॅक्‍टरसुद्धा. त्या काँट्रॅकटरला नाटकं लावूनच फायदा करायची आणि फटका खायचीच हौस असते. इतकंच कशाला? तिकीटविक्रीवरची माणसंसुद्धा एका विशिष्ट हौसेनं तिथं बसलेली असतात. केवळ तिकीटविक्रीचं काम केल्याचे पैसे मिळतात म्हणून नव्हे.

“नाटक' म्हटल्यावर माझ्या डोळ्यांपुढं थिएटरातल्या तिकीटविक्रीवरची माणसं, डोअरकीपर, स्टेज सजवणारी माणसं, रंगपटातली, कपडेपटातली माणसं, नट-नटी, डायरेक्टर, लेखक असं सगळं कुटुंबच्या कुटुंब उभं राहतं. ह्यांतला प्रत्येक जण या ना त्या प्रकारचं नाटकाचं वेड घेऊनच आलेला असतो. केवळ नट होण्याचंच वेड नव्हे तर डोअरकीपर होण्याचंसुद्धा.

अपूर्ण..
(सुरुवातीचे दिवस - पुरचुंडी)
पु.ल. देशपांडे

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा. 

Friday, November 4, 2022

द ग्रेट परफॉर्मर - मुकेश माचकर

(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री मुकेश माचकर ह्यांचे खूप आभार)

शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर पुलंना आठवताना.. ...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही...

स्थळ : ‘१, रूपाली’ हा तेव्हाच्या महाराष्ट्रातला कदाचित सर्वाधिक सर्वज्ञात आणि ग्लॅमरस असा पत्ता. 

वेळ : भल्या सकाळची. 
    
त्या पत्त्यावर कुमार गंधर्वांपासून पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर अशा अनेक मान्यवर अभ्यागतांनी आसनस्थ होऊन धन्य केलेला एक साधासा काळा सोफा. त्या सोफ्यावर बसलेला एक तरुण लेखनिक आणि समोर त्याचं दैवत... त्या घराचे मालक, अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे. 

वर्तमानपत्रात उपसंपादक असलेल्या पंचविशीच्या त्या लेखनिकाला पुलंची भाषणं, त्यांच्याच घरात बसून, ऐकून (खासगी संग्रहातल्या कॅसेट गहाळ होऊ नयेत आणि त्यांच्या नक्कलप्रति  निघू नयेत, म्हणून सुनीताबाईंनी कटाक्षाने घेतलेली ही खबरदारी) उतरवून काढण्याची कामगिरी मिळाली होती. तेव्हाच्या तंत्रानुसार वॉकमनमध्ये कॅसेट घालून प्ले/पॉझ करत करत भाषण ऐकायचं आणि ते मुळाबरहुकूम उतरवून काढायचं हे त्याचं काम. एरवी हे काम सुरू असताना हॉलमध्ये कोणीही असणार नाही आणि लेखनिकाला डिस्टर्ब करणार नाही, याची खबरदारी सुनीताबाई घेत.

त्या एका सकाळी मात्र खुद्द पु.ल.च एक जाडजूड पुस्तक घेऊन ते वाचत असल्याचा अभिनय करत समोर बसले होते... अभिनय अशासाठी की त्यांचं त्या पुस्तकाच्या वाचनात मुळीच लक्ष नव्हतं, हे साक्षात पु.ल.च समोर असल्यामुळे अतिशय कॉन्शस झालेल्या लेखनिकाच्या लक्षात आलं होतं. ते मिश्कील डोळ्यांनी सतत पुस्तकावरून कुतूहलाने लेखनिकाकडे आणि त्याच्या उद्योगाकडे पाहात होते. 

अखेर एका टप्प्याला पुलंना शांतता असह्य झाली. पुस्तक बाजूला ठेवून (आतला कानोसा घेतलाच असणार) आणि ‘अरे वा, तुम्ही फार वेगाने उतरवून घेताय मजकूर, कसं काय जमतं हे’ वगैरे प्रोत्साहनपर कौतुक करून शेवटी एकदम गुगली टाकला, ‘बरं जमलंय ना भाषण?’ 

लेखनिक काय बोलणार? त्याला एकदम अमिताभ बच्चनने कॅमेऱ्यासमोर तीन-चार गुंडांची एकसाथ धुलाई केल्यावर ‘बरी जमतीये ना अ‍ॅक्शन’ किंवा सुनील गावसकरने मख्खन स्क्वेअर कट मारल्यावर ‘फुटवर्क बरं होतं ना,’ असं काहीतरी विचारल्यासारखंच वाटून गेलं. 

तेवढ्यात आतून सुनीताबाईंनी येऊन ‘भाई, तू गप्पा मारत बसलास तर त्यांना वेळेत काम करता येणार नाही,’ असं म्हणून त्यांना आत नेलं आणि ती चर्चा तिथेच थांबली. 

या प्रसंगाला आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. तरीही ‘बरं जमलंय ना भाषण?’ हे विचारणारा तो लोभस, मिश्कील आणि निरागस चेहरा डोळ्यांसमोर ताजा आहे... त्यांच्या त्या प्रश्नात ‘कसला भारी बोललोय ना मी’ असा आविर्भाव नव्हता, त्यांच्या श्रेष्ठत्वाचा खुंटा उगाच विनम्रतेच्या मिषाने हलवून बळकट करण्याची आयडियाबाजी नव्हती... 

ती एका बहुरूप्याची, एका खेळियाची सोत्कंठ विचारणा होती... हा खेळ जमलाय ना? भावतोय ना?... सिंपल! 
पु.ल. हे त्यांच्या हयातीतले आणि कदाचित मराठीतले (देवांच्या पोथ्या, नाक कसं शिंकरावं वगैरेंची जीवनविषयक शिकवण देणारी ‘गुरुजी’ छाप पुस्तकं आणि इंटरनेटवरून माहिती भाषांतरून जुळवलेली ज्ञानवर्धक पुस्तकं यांच्याशी पुलंची स्पर्धा नव्हती, असं गृहीत धरलं आहे इथे) सर्वाधिक खपाचे लेखक होते, यापुढे त्यांचं परफॉर्मर असणं, खेळिया असणं, झाकोळलं गेलं सतत. 

आजही पु.लं.चं सगळं मूल्यमापन हे त्यांच्या लेखनाच्या विशिष्टकालीनत्वावर, त्यांच्या तथाकथित मर्यादित भावविश्वावर दुगाण्या झाडण्यात संपून जातं. 

पु.ल. आता अपील होत नाहीत, हे ज्यांना ते हयात असतानाही अपील होत नव्हतेच, तेच एकमेकांना सांगत असतात. एक लेखक म्हणून आपल्या मर्यादा इतरांपेक्षा पु.लं.ना अधिक माहिती होत्या आणि मान्यही होत्या. कारण ‘लेखक पु.ल.’ हा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक भाग, एक पैलू होता, हे बाकी कुणाला नसलं तरी त्यांना माहिती होतंच. सारस्वतांलेखी थोडासा गुन्हा करून सांगायचं तर हा पैलू आपल्याला वाटतो तेवढा महत्त्वाचा नसावा. त्यांच्या बहुतेक साहित्यकृती, अगदी त्यांच्या अतीव लोकप्रिय साहित्यकृतीही या एकपात्री परफॉर्मन्सच्या स्क्रिप्टच्या स्वरूपात आहेत, हे आपण आता तरी लक्षात घ्यायला हवं. 

समजा पुलंनी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी किंवा पूर्वरंग, अपूर्वाई ही त्यांची बेहद्द लोकप्रिय ठरलेली पुस्तकं प्रकाशित केलीच नसती, फक्त त्यांचे प्रयोगच झाले असते, तर काय झालं असतं? आजही ही पुस्तकं आणि त्यांतल्या व्यक्तिरेखा, ते प्रसंग हे सगळं पुलंच्या चाहत्यांना पुलंच्या आवाजातच ऐकू येतं ना! पुलंची पुस्तकं, त्यांची साहित्यिक ही ओळखही त्यांच्या परफॉर्मर या ओळखीत गुंतलेली आहे. त्यांची निव्वळ साहित्यिक गुणवत्ता आपल्याला खरोखरच माहिती आहे का? - 

ती जाणून घ्यायची असेल तर काचबंद प्रयोगशाळेत एक प्रयोग करायला लागेल. एखाद्या वाचकाला जन्मापासूनच पुलंच्या कॅसेट, व्हिडीओ यांचा वाराही लागू द्यायचा नाही आणि त्याला निव्वळ त्यांची पुस्तकं वाचायला सांगायचं, असं करता आलं, तर त्या वाचकाकडून होईल तेच पुलंचं निखळ साहित्यिक मूल्यमापन असेल. मात्र, असा वाचक खरोखरच विचक्षण असेल तर त्यालाही हे ‘परफॉर्मन्सचं मटिरिअल’ आहे, हे कळून जाईलच की!

पुलंचा हा खेळिया म्हणून अवतार मान्य केला की त्यांचा प्रचंड मोठा पैस लक्षात येतो... त्यांच्या पद्धतीचा आणि आवाक्याचा परफॉर्मर मराठीत त्यांच्याआधीच्या ज्ञात इतिहासात दुसरा नसावा, नंतर तर नक्कीच झालेला नाही.

पुलंकडून प्रेरणा घेऊनच की काय, काही अभिनेते चांगलं लिहितात, उत्तम एकपात्री कार्यक्र म सादर करतात. काही नाटककार चांगली समीक्षा करतात, कथालेखन करतात, कोणी स्टॅण्डअप कॉमेडी उत्तम करतात, खुसखुशीत लिहितात. कोणी किस्सेबाज कथा लिहितात, रसाळपणे कथन करतात. बाकी सोडा, आजकाल अनेक संगीतकार चाली देण्यापेक्षा संगीतावर उत्तम विश्लेषक बोलण्यामुळेच अधिक प्रसिद्ध झालेले आहेत आणि अभिनेत्यांना न्यूनगंड यावा इतका अभिनय गायक गाता गाता करताना दिसतात (गातात कसे ते सोडा). पण, पुलंना हे सगळं आणि यापलीकडेही बरंच काही अवगत होतं, त्याचं काय? फारतर शिल्पकला, नृत्यकला आणि चित्रकला हे ठसठशीत विषय सोडले तर ज्याला पुलंचा स्पर्श झाला नसेल असं महाराष्ट्रा च्या सांस्कृतिक जगतातलं एकही क्षेत्र नसावं. ते लेखक होतेच, नाट्यदिग्दर्शक होते, चित्रपट दिग्दर्शकही होते, नाटककार होते, कथा-पटकथा, संवाद, गीतं, संगीत, गायन, वादन या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांची मुशाफिरी होती. रेडिओसारख्या आधुनिक माध्यमात त्यांचा सजग वावर होता. दूरचित्रवाणीचं तंत्र त्यांना अवगत होतं, म्हणूनच ते देशातल्या पहिल्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते बनू शकले. स्वत: कविता करण्याच्या फंदात ते पडले नाहीत; पण, बा. भ. बोरकरांच्या, चिं.त्र्यं. खानोलकरांच्या कवितांचा त्यांनी सादर केलेला रसास्वाद संस्मरणीय होता. 

शास्त्रीय संगीत, तंबाखूचं पान आणि अस्सल मराठी खानपान या तिन्ही गोष्टींचा ष्टीं परस्परसंबंध आहे का? - पण, एका पिढीला या तिन्हीची गोडी लावण्याचं सामर्थ्य पुलंच्या लेखणीत होतं. अनेक शास्त्रीय गायक-वादक कलावंतांवर त्यांनी लिहिलेल्या रसाळ लेखनातून त्यांचा सर्वसामान्य रसिकांना परिचय झाला, त्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याची ओढ निर्माण झाली. ‘पानवाला’सारख्या लेखात त्यांनी तंबाखूच्या पानाचं असं काही रसभरीत वर्णन केलं की हे पान खाऊन आपण साक्षात भगवान श्रीकृष्णाचा वारसा चालवतो आहोत, अशी वाचकांची समजूत झाली. मराठी खाद्यसंस्कृतीवरच्या त्यांच्या लेखात अस्सल ब्राह्मणी शाकाहारी पाककृतींपा तीं सून ते मत्स्याहार, मांसाहारापर्यंत एक प्रचंड मोठा पट त्यांनी अतिशय सहजतेने कवेत घेतलेला होता. त्यात निव्वळ इकडून तिकडून ऐकून चतुर भाषेत केलेली पोपटपंची नव्हती, तर अव्वल सुग्रणीलाच समजेल अशा भाषेत, एकेका पदार्थाच्या पोटात शिरून, त्यातली गुह्यं हेरून केलेली ती मर्मज्ञ टिप्पणी असायची. 

पुलंच्या पेटीवादनाच्याही कॅसेट निघाल्या आणि खपल्या, म्हणजे पाहा ! पुलंच्या या सर्वसंचारी वावराचा यूएसपी, सर्वात महत्त्वाचा विशेष काय होता? - दर्जा ! त्यांनी केलेल्या सादरीकरणात, अगदी साध्या रेडिओवरच्या भाषणात किंवा अगदी प्रासंगिक उत्स्फूर्त भाषणातही एक विशिष्ट दर्जा दिसतो. सगळ्या कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वस्तीला आलेल्या होत्या आणि त्यांना अभिजात रसिकता आणि उत्तमतेची पारख यांची उपजत जोड होती (यावर काही मोठ्या शास्त्रीय गायकांनी नाकं मुरडल्याचं ऐकिवात आहे; पण ते एक असो), त्यामुळेच एक विशिष्ट दर्जा त्यांनी कधीच सोडला नाही (यात सुनीताबाईंच्या साथीचा आणि शिस्तीचाही मोठा वाटा असणारच). जेव्हा आपल्यापाशी आता फारसं काही उरलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यांचा सगळाच खेळ स्वेच्छेने थांबवला...

 ...त्यानंतर त्यांची उरवळ, पुरचुंडी यांसारखी दुर्लक्षित लेखांची, अमुक ठिकाणची भाषणं, तमुक ठिकाणची भाषणं अशी साठवणवजा पुस्तकं येत राहिली... त्यांच्या रूपांतरित, आधारित नाटकांचे प्रयोग होत राहिले... कॅसेट खपत राहिल्या... अभिवाचनाचे प्रयोग ध्वनिचित्रमुद्रित झाले... पण, या सगळ्यामागच्या खेळियाने आधीच एक्झिट घेतली होती... 

...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज, अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही...

- मुकेश माचकर 
लोकमत वृत्तपत्र 

Monday, October 31, 2022

पु.ल.- सुनीताबाई आणि आयुका (मंगला नारळीकर)

ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन येत्या आठ नोव्हेंबरला आहे. पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई या दोघांनी विविध संस्थांना प्रचंड मदत केली. डोळसपणानं हे दोघे ही मदत करत असत. राज्यातल्या अनेक संस्थांशी तसेच शास्त्रज्ञांशी त्यांचा स्नेहबंध होता. वैज्ञानिक जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांच्याशी त्यांचे कौटुबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांचे काम आवडल्यानं देशपांडे दंपतीनं आयुकाला मोठी देणगी दिली. त्याबद्दल आणि त्या दोघांच्या मायेच्या ओलाव्याबद्दल अंतरीचे बोल....
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुल यांचे आणि आमचे तसे जुने संबंध. अगदी पूर्वी, सुनीताबाई आणि ते इंग्लंडला गेले होते, त्या वेळी त्यांची जयंतशी गाठ पडली होती, कुमार चित्रे या त्याच्या मित्राबरोबर जयंतनं त्यांना केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, तो फार जुना किस्सा झाला. नंतर आम्ही मुंबईत नेव्हीनगर मध्ये ‘टी आय एफ आर’ च्या कॉलनीमध्ये राहत होतो, त्यावेळी प्रथम मराठी नाटकं आणि संगीताचे कार्यक्रम पहायला गिरगाव किंवा दादर भागात जावे लागे. रात्री परत येताना टॅक्सी मिळायला त्रास होई, एवढ्या लांब जाऊन तिकिटं काढणं हे देखील जिकिरीचं असे. `एन सी पी ए ’ चे सेंटर नरीमन पॉइन्ट ला तयार झाले आणि तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा पुल सांभाळू लागले, त्यामुळे आम्हाला तिथे दर्जेदार मराठी नाटके आणि संगीत कार्यक्रम पहायला मिळू लागले. त्यावेळी कधी कधी कार्यक्रमानंतर त्यांच्या तिथल्या ऑफिसमध्ये पुलंना भेटल्याचे आठवते. १९८९ साली आम्ही पुण्यात रहायला आलो कारण तिथे आयुका ची निर्मिती चालू झाली होती. एकदोनदा त्यांच्या आमंत्रणावरून पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला आम्ही दोघे रूपाली मध्ये गेलो होतो.

१९९१ साली आम्ही आयुकाच्या संचालकासाठी बांधलेल्या घरात राहण्यास आलो. अजून आयुकाची मुख्य बिल्डिंग पुरी व्हायची होती, तिला जरा वेळ लागणार होता, पण आयुकाचं काम जोरात सुरू झालं होतं. पुरेसे प्राध्यापक नेमले नव्हते, पण संस्थेच्या इमारतीपेक्षा राहण्याची घरे लवकर बांधून होतात म्हणून भविष्यकाळात येणाऱ्या प्रोफेसरांच्या साठी घरे लवकर बांधून घेतली आणि त्या घरांतूनच आयुकाची कामे चालू झाली. एका घरात लायब्ररी, एकात कॅन्टीन, एक किंवा दोन घरांत विद्यार्थी होस्टेल, अशी तात्पुरती रचना झाली. एकूण अतिशय उत्साहानं भारलेले दिवस होते ते. सगळे लोक अगदी उत्साहानं, आपल्याला काही तरी सुरेख, विधायक रचना करायची आहे, अशा विश्वासानं काम करत होते. त्या काळात पुल आणि सुनीताबाई आयुकाला भेट देण्यास आले. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतनं ज्या उत्साहानं त्यांना पूर्वी केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, त्याच उत्साहानं आयुकाची माहिती दिली. आमच्या घरी, मागची बाग आणि तिथली हिरवळ पहात आमचे चहापान झाले. ते १९९२ किंवा १९९३ चा कालखंड असावा, नंतर काही वेळा आम्ही दोघे पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला, बहुतेक वेळा त्यांच्या आमंत्रणावरून, आधी रूपालीमध्ये आणि नंतर मालतीमाधवमध्ये जात होतो. लहान किंवा तरुण मुलांनी काही चांगलं काम केलं की ज्या उत्साहाने ते आपलं काम ज्येष्ठांना दाखवतात, त्याच उत्साहाने आम्ही आयुकाची माहिती देत असू. ते दोघेही आपुलकीने विचारत.

काही दिवसांनी, बहुधा १९९९-२००० मध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो असता, सुनीताबाईनी एक आश्चर्याचा आणि आनंद देणारा त्यांचा निर्णय सांगितला. त्या म्हणाल्या, की त्यांचा रूपाली मधला फ्लॅट ते दोघे आयुकाला देणगी म्हणून देऊ इच्छित आहेत. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतने लगेच या देणगीचा कसा उपयोग करता येईल, याचा विचार केला. आयुकाच्या स्थापनेच्या वेळी आयुकाची खगोलशास्त्राशी संबंधित अशी आठ कर्तव्ये ठरवली गेली होती. खगोलशास्त्रातील संशोधन, पी एच डी साठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन, विविध युनिव्हर्सिटींमधील खगोलशास्त्रात काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकान्ना मदत व मार्गदर्शन, जवळ असलेल्या जी एम आर टी ची दुर्बीण चालवणाऱ्या संस्थेशी सहकार्य, खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी कार्यशाळा भरवणे, विविध दुर्बिणीन्च्यावर काम करण्यासाठी वेळ मिळवून देणे, दुर्बिणी व इतर यंत्रांची देखभाल व कम्प्युटरवर आवश्यकतेप्रमाणे प्रोग्राम तयार करणे, समाजामध्ये विज्ञानप्रसार करणे अशी ती कर्तव्ये होती. शालेय विद्यार्थ्यांच्या साठी खास असे काही त्यात नव्हते पण त्याची आवश्यकता दिसत होती. विज्ञानाचे शिक्षण अधिक चांगले देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे शालेय जीवनात व्हायला हवे. देशपांडे दंपतीच्या देणगीचा या कामासाठी उपयोग करावा असा जयंतने विचार केला व तसे त्यांना सांगितले. त्यासाठी वेगळी इमारत बांधण्यासाठी आणि तशी संशोधिका सुरु करण्यासाठी देशपांडे दंपतीच्या देणगीचा उपयोग होणार हे त्यांना आवडले. समाजोपयोगी अशा अनेक संस्थांना त्यांच्या फाउंडेशनने मदत केल्याचे माहित होते. मुलांचे आनन्दमय विज्ञानशिक्षण हा देखील त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता हे समजून आम्हाला त्यांच्या विषयी वाटणारा प्रेमादर वाढला. पण हे जेव्हा जयंतने आयुकामधील लोकांना सांगितलं, तेव्हा तेथील अकौंटंट श्री अभ्यंकर यांनी नियम सांगितला, की आयुका सरकारी संस्था आहे, तिला स्थावर मालमत्ता देणगीच्या रूपात स्वीकारणे सोयीचे नाही. तो फ्लॅट विकून त्याच्या पैशांत काही उपक्रम करण्यात प्राप्तीकराच्या नियमांचा खूप त्रास झाला असता. त्यामुळे त्यांचा पहिला बेत जरी बारगळला, तरी सुनीताबाईंनी जरा नंतर, रूपालीच्या अपेक्षित किमतीएवढे, म्हणजे एकूण २५ लाख रुपये आयुकाच्या स्वाधीन केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञानशोधिकेला कोणते नाव द्यावे हे विचारल्यावर समजले, की त्यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या संस्थांना “ मुक्तांगण ” हे नाव देणे त्यांना आवडते. आम्हालाही ते नाव आवडले. आमचेही मुक्तांगण बांधून तयार झाले. इमारतीला जयंतने नाव दिले “ पुलस्त्य ”. हा सप्तर्षींमधला एक तारा आहे आणि या नावातच पुल आहेत. सुदैवाने या मुक्तांगणासाठी प्रा. अरविंद गुप्ता यांच्या सारखा, मुलांना खेळणी बनवायला शिकवून, त्यातून विज्ञान शिकवणारा अवलिया संचालक म्हणून मिळाला आणि आमचे मुक्तांगण जोरात चालू झाले. प्रा गुप्ता यांच्या हाताखाली अनेक तरुण-तरुणी मुलांना हसत खेळत विज्ञान शिकवू लागले. विविध शाळातील मुले तिथे येऊन त्याचा लाभ घेऊ लागली, अजूनही घेतात. दुर्बिणीतून तारे दाखवण्याचे कामही तेथे होते.

“ पुलस्त्य “ बांधून झाले, तिथे मुक्तांगण ही विज्ञान शोधिका चालू करताना लहानसा समारंभ केला, त्यावेळी पुल हयात नव्हते. सुनीताताईंना आग्रहाचे आमंत्रण आम्ही केले, परंतु त्या आल्या नाहीत. त्यांचा एक डोळा काम करत नव्हता, दुसराही अधू होता, त्याला धक्का बसू शकेल या भीतीने त्यांनी बाहेर जाणे जवळ जवळ बंद केले होते. त्यांच्या वतीने त्यांचे सुहृद, श्री श्री. पु. भागवत मुक्तांगणाच्या उद् घाटनास आले होते. तो दिवस होता, २७ डिसेंबर, २००२. मुक्तांगण तर जोरात चालू झाले. पुणे व परिसरातील अनेक शाळातील मुले, आपल्या विज्ञानशिक्षकांसह तेथे येतात, २-३ तास थांबून साध्या, कधी कधी टाकाऊ साहित्यातून मजेदार खेळणी बनवायला शिकतात, मग त्यातील विज्ञान शिकतात. आपली खेळणी आणि अशा मजेदार रीतीने विज्ञान शिकण्यातला आनंद ती मुले घरी नेतात. महिन्यातून एकदा इंग्रजी व मराठी किंवा हिंदी मधून शालेय मुलांसाठी जवळच्या आयुकाच्या सुसज्ज अशा मोठ्या चंद्रशेखर हॉलमध्ये व्याख्यान आयोजित केले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या शाळातून मुले व त्यांचे शिक्षक येतात.

एकदा आम्ही सुनीताताईना हे मुक्तांगण पाहायला येण्याचा खूप आग्रह केला. त्यांचा भाचा दिनेश, त्याचा मुलगा आशुतोष आणि भाचीचा मुलगा आश्विन हे त्यांच्या बरोबर येणार होते. त्यावेळी आमचे जुनी, पण पुढचे दार मोठे असून प्रवेशाचा भाग रुंद असणारी टाटा इस्टेट गाडी होती. तिच्यातून त्यांना सांभाळून नेण्याचे ठरले. त्या आल्या. तो दिवस होता, १८ जून, २००७. म्युनिसिपल शाळेतील मुले आनंदाने विज्ञान शिकताना त्यांनी पाहिली. मुक्तांगणकडे नुकतेच एक फुगवून उभारण्याचे, लहानसे फिरते तारांगण आले होते. त्यात रांगत प्रवेश करून त्यांनी आपल्या नातवांसह तारे पाहिले. एकंदरीत त्या खूष झाल्या आणि आयुकासाठी, मुक्तांगणच्या लोकांसाठी त्यांची भेट हा एक मोठा सण झाला. सुनीताताईंच्या हस्ते दोन झाडे आवारात लावून घेतली.

या भेटीच्या जरा आधी, २००६ मध्ये, सुनीताताईनी आयुकाकडे त्यांच्या मृत्युपत्रातील एक भाग पाठवून दिला. त्यात पुलं आणि त्यांच्या स्वत:च्या पुस्तकांचे कॉपीराईट त्यांच्या मृत्युनंतर आयुकाला मिळणार असे लिहिले होते. नंतर सुनीताताई आजारी झाल्या, काही काळ अंथरुणावर होत्या. त्याही काळात आम्ही शक्य तेव्हा त्यांना भेटण्यास गेलो. नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुल आणि सुनीताताई यांच्या पुस्तकांचे कॉपीराईट आयुकाकडे आल्याने आयुकाला त्याची रॉयल्टी मिळत आहे. मुक्तांगणमधील उपक्रमांसाठी तिचा विनियोग होतो. एखादे समाजोपयोगी काम पटले, आवडले, तर कोरडे कौतुक करून न थांबता त्यासाठी अतिशय उदारपणे आर्थिक मदत देण्याची सुनीताताईंची वृत्ती स्पृहणीय होती. पुलंच्या जन्मशताब्दीच्या सांगतेला पुल आणि सुनीताताई यांच्या आयुकाबरोबरच्या या खास नात्याबद्दल लिहून त्याना आदरांजली वाहते.

- मंगला नारळीकर
सकाळ वृत्तपत्र
८ नोव्हेंबर २०२०