Thursday, May 12, 2022

पुलंची शाबासकी एक मानाचं पान - (सौ. जयश्री देशपांडे)

आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे “हसवणूक या पुस्तकातल्या खाद्यजीवन मध्ये लिहितात, “माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे." मला हे वाक्य अगदी मनापासून पटतं. मी गेली अनेक वर्षे केटरिंगच्या व्यवसायात असल्यामुळे चवीनं खाणाऱ्या लोकांना चवीपरीनं खाऊ घालण्यातील आनंद मी पुरेपुर अनुभवला आहे. केटरिंगच्या व्यवसायानिमित्त माझी पु. लं. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी ओळख झाली आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडून शाबासकीची थाप मिळविण्याचं भाग्यही मला लाभलं. लहानपणापासूनच लेखक म्हणून पु. लं. मला आवडत होते पण, प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला नव्हता. तो योग पुण्यात माझ्या व्यवसायाने घडवून आणला.

एकदा प्रभात रस्ता येथे राहणाऱ्या मधू गानू यांच्याकडून मला काही व्यक्तींसाठी केटरिंगची ऑर्डर होती. ती पोहोचवणारा माणूस ऐनवेळी आला नाही. माल वेळेत पोहोचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हाताशी कुणीच नव्हतं म्हणून मीच डबा उचलला आणि त्यांच्या घरी गेले. घरात प्रवेश केला तर समोरच पुलंचा फोटो. कुतूहलानं मी त्यांच्याबाबत चौकशी केली तेव्हा मधूजी म्हणाले, "अहो पु. लं. आमच्याकडे अनेकदा जेवायला येतात, तेव्हा तुमच्याकडून मागवलेलं जेवण आम्ही त्यांना देतो आणि ते त्यांना खूप आवडतं ह!"

हे मधू गानू म्हणजे पु. ल॑. चे परममित्र. मी केलेला स्वयंपाक पु. लं. ना आवडतो हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मग पुढे एकदा स्वतः सुनीताबाईचाच मला फोन आला. त्यांनी आवर्जून माझ्या हातचे पदार्थ आवडतात असं सांगून काही पदार्थ बनवून द्याल का, असं विचारलं. मी ती ऑर्डर आनंदाने घेतली. असं पुढे दोन-चार वेळेस झालं, मग एके दिवशी सुनीताबाईच मला म्हणाल्या, “या ना आमच्याकडे एकदा. आम्हाला तुमच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. भाईला कुतूहल आहे तुमच्याबद्दल. सार आणि बिरड्या तुम्ही ज्याप्रकारे करता त्यावरून तुम्ही कोकणस्थ वाटता, पण चिकनच्या पद्धतीवरून तुम्ही सारस्वत वाटता.” मग मी गेले तेव्हा पु. लं. चा पहिला प्रश्न होता, “तुम्ही नक्की कोण आहात?" मला हा संदर्भ लगेचच कळला. मी म्हटलं, 'मी देशपांडे म्हणजे आता देशस्थ, पण माहेरकडून कोकणस्थ!” पु. ल॑. ना माझ्या हातची मटण बिर्याणी, टोमॅटो सार, दहीवडा, वालाची उसळ,छोटे बटाटे घातलेली भरली वांगी आणि उपवासाची बटाट्याची भाजी हे पदार्थ खूप आवडायचे.

मी अशीच एकदा काही पदार्थ पोहोचवायला गेले होते, तर त्या दिवशी त्यांच्याकडे खरवस होता. पु. लं. नी मला विचारलं, खरवस आवडतो तुम्हाला? मी हो म्हटल्यावर मला त्यादिवशी आग्रहानं तो खाऊ घातलाच, पण माझी आवड लक्षात ठेवली. परत कधीतरी एकदा त्यांच्या घरी खरवस होता, तर 'अगं, यांना खरवस आवडतो हं! दे यांना” असं म्हणून अगत्यानं दिला.
                     
सुनीताबाईंनी पुलंच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त काही पदार्थ बनवून द्याल काय? असं विचारायला फोन केला तेव्हा तर मला खूपच आनंद झाला, त्यांना चारशे माणसांसाठी हाताने पटकन उचलून खाण्याजोगे पदार्थ पाहिजे होते. खरंतर तेव्हा माझा एवढा आवाका नव्हता. पण मी ही ऑर्डर स्वीकारायचं ठरवलं. त्याप्रमाणे सामोसे आणि इतर बरेच पदार्थ केले आणि त्यांच्यासाठी पुस्तकाच्या आकाराचा स्पेशल केकसुद्धा केला. त्यांना सर्व पदार्थ केक आवडला की नाही, याची मला खूप उत्सुकता होती. पण त्यादिवशी त्यांचा फोन आला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आणि म्हणाले, 'जयश्रीबाई सर्व पदार्थ नेहमीसारखे अगदी उत्तम झाले केकचं विचाराल तर एवढं सुंदर पुस्तक कापायचा काल काही माझा नाही. शेवटी आता केक कापला आणि तुम्हाला दाद देण्यासाठी केला.” खरोखर 'पु. लं. आणि सुनीताबाईसारख्या आपुलकी निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना माझ्या हातचे पदार्थ आवडायचे हेच मी माझे भाग्य मानते.

अजून एक अतिशय संस्मरणीय प्रसंग मला आठवतो. पु. लं. च्या अखेरीच्या काळात आजारपणामुळे त्यांची स्मृती मंदावली होती. काही महिने ते अमेरिकेलाही जाऊन आले होते. माझाही अनेक दिवसात त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. अचानक सुनीताबाईंचा फोन आला आणि म्हणाल्या, “जयश्रीताई, काल तुम्ही आमच्या स्नेह्यांकडची जेवणाची ऑर्डर घेतली होती ना! काल आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्याकडच्या बिर्याणीचा नुसता वास येताच भाई म्हणाला, “सुनीता आतल्या पातेल्यांवरचं नाव बघून ये. ही नक्की जयश्रीताईच्याच हातची बिर्याणी आहे. “सुनीताबाईंकडून हा प्रसंग ऐकून मी खरंच भरून पावले.

अशाच एका भेटीत पु. लं. नी विचारलं होतं,"सध्या काय करताय?*' मी म्हटलं, ''"पाककलेवरचं एक पुस्तक लिहिते आहे' आणि लगेचच पुढे म्हटलं, ''त्यासाठी तुम्ही काही करू शकाल?” पु. लं. म्हणाले,"सध्या मी पुस्तकांना प्रस्तावना लिहिणं बंद केलंय, पण तरीपण बघूया काय करता येईल ते.'' मग एक दिवस पु. लं. कडून अचानक एक सुंदर पत्र मला मिळालं. पु. लं. च्या सांगण्यावरून स्वतः सुनीताबाईंनी ते लिहिलं होतं. हे पत्र म्हणजे माझ्या पाककलेला मिळालेली सवोच्च दाद असं मी समजते. या उत्तुंग व्यक्तिमत्वांकडून मिळालेली ही दाद माझ्या या 'हमखास पाकसिद्धी' मध्ये नेहमीच एक मानाचं पान” बनून राहणार आहे.

सौ. जयश्री देशपांडे



पु. ल. देशपांडे यांच्या आवडत्या पाककृती
* मटण बिर्याणी
* टोमॅटो सार
* दहीवडा
* वालाची उसळ
* भरली वांगी
* उपवासाची बटाटयाची भाजी 

1 प्रतिक्रिया:

Abhishek Ghadge said...

खूप छान लेख!