Friday, December 24, 2021

परम संतोष जाहला

इतिहासाची पानें चाळतांना पुलंचे एक भन्नाट पत्र हाती लागले. ५ ॲागस्ट १९७८ रोजी 'भारतीय आयुर्विमा महामंडळ' या संस्थेने सोलापूर शहरात आपली दुसरी शाखा सुरू केली. महामंडळाचे एक अधिकारी श्री. विश्वास दांडेकर यांनी एक नाविन्यपूर्ण जाहिरात तयार केली. महामंडळाची अशा स्वरूपाची ही पहिलीच जाहिरात होती. त्या वेळचे आयुर्विमा महामंडळाचे प्रचार आणि प्रसार प्रमुख श्री. शरच्चंद्र मेघश्याम शिरोडकर हे होते. त्यांना ही जाहिरातीची कल्पना आवडली. श्री. शिरोडकर यांनी जाहिरातीतील मजकूर सेतूमाधवराव पगडी यांच्याकडे पाठवून तो दुरूस्त करून आणला होता.

प्रसिद्ध होणारी जाहिरात श्री. श मे शिरोडकरांनी महाराष्ट्रातील चाळीस नामवंत लेखकांना पाठवून त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. एकोणचाळीस लेखकांनी पत्राची साधी पोच पाठवण्याचेसुद्धा सौजन्य दाखवले नाही. फक्त पु. ल. देशपांडे यांनी जाहिरातीच्या भाषेतच श्री, शिरोडकरांना उत्तर पाठविले होते. जाहिरातीचा मजकूर आणि पु. ल. देशपांडे यांचे उत्तर मूळ स्वरूप असे :

जाहिरातीचा मजकूर

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजूरास विनंती अर्ज ऐसाजे. स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरीं आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळीं सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हें स्वामीस विदित आहेच. इकडील काम फते होतें तें स्वामींचे आशीर्वादेंकरून. आमची हिंमत व नेट वाढावयास कारण तरी स्वामींचे पाठबळच. यास प्रमाण म्हणाल तर आपले शहरीं दुसरी शाखा मल्लिकार्जून बिल्डिंग, ४४२, पश्चिम मंगळवार पेठ ये स्थळी स्थापन होणार हा मनसुबा पक्का जाहला आहे. मुहूर्त १५ आगस्त १९७८ इसवी रोजी दुपारचा ३|| वाजतांचा धरलेला असोन समारंभासाठीं शिवछत्रपती रंगभवनाजवळील, फ्री मॕसन हॉल हा ठिकाणा मुक्रर केला आहे. आजवर सेवकाचें कवतिक जाहलें तें स्वामींचा वरदहस्त मस्तकीं असलेमुळेंच. याउप्परही स्वामींनीं कृपालोभ पुढे चालविला तरच सेवकाची कार्यवृद्धि होत जाईल ये विषयीं तिळमात्र शंका नसे.आमचें अगत्य असों द्यावें. इति लेखन सीमा।

लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ॲाफ इंडिया

भाईंची प्रतिक्रिया

१ रुपाली, ७७७,
शिवाजीनगर पुणे ४ 
गोकुळाष्टमी. ख्रिस्तमास अगस्त, 
सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इसवी.

।।श्री मृत्यूंजयाविमाभवानी प्रसन्न।।

सकलगुणांलकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारणकार्यरत विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री श. मे. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारण कालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचे विनम्र प्रणिपात. निमंत्रण पावोन समाधान जाहले. धन्यवादाप्रित्यर्थ चार उत्तरे लिहिण्याचा प्रेत्न करीत आहे. मर्यादातिक्रमाची प्रारंभी क्षमा मागतो. विमेदारांच्या उदार आश्रये करोन आपणांस लाभलेल्या सन्मानाचे वृत्त वाचोन परम संतोष जाहला.
भारतदेशाचे भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणांलकारमंडित राजमान्य राजेश्री चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन इये देशी भारतीय विमा निगमाची प्रतिस्थापना जाहली. त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने प्राणपणाने चालविलेल्या विमाधारकाच्या प्राणोत्क्रमणोत्तर योगक्षेमाची धुरा वाहण्याचे कार्य नाना प्रकारचे मनसुबे रचोन विस्तारिले आहे हे लोकविश्रुत त्याची थोरवी केवळ वर्णनातीत. त्या कार्यसिद्धीचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

मात्र,

विमाधारके नित्य हप्ते भरावे
देहे त्यागिता द्रव्यरुपे उरावे

हे विमासूत्र जनसामान्याने उत्तरोत्तर अधिकाधिक मात्रेत मनीमानसी बाळगोन स्वकुटुंबियांचे आणि स्वार्थ साधो जाता परमार्थी भावनेने विमानिगम कर्मचाऱ्यांचे वर्तमान व भविष्य विषयक भयाचे निवारण करण्याविषयी सदैव तत्पर राहावे ही शुभकामना व्यक्त करण्याची सेवक इजाजत मागत आहे. उण्याअधिकाची क्षमा असावी. आमचे अगत्य असो द्यावे ही प्रार्थना लेखनसीमा।।

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

--
श्री. निलेश साठे

1 प्रतिक्रिया:

इंद्रधनु said...

छान, आवडले. सकलगुणांलकार हा शब्द संकलगुणालंकार असा हवा आहे का ?