Friday, February 1, 2013

मोरपिशी आठवणी - प्रकाश गंधे

डेक्कन क्वीनच्या प्रवासात भेटलेल्या "महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाने मला अक्षरशः भरभरून दिले... त्यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तरही अत्यंत सुंदर शब्दांत आले. अलिबागला त्यांना यायचे होते, पण ते जमले नाही.. "पुलं'बरोबरचा हा पत्रव्यवहार म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवाच...

सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मी बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होतो. रविवार, ता. 9 ऑगस्ट 1981 रोजी मी डेक्कन क्वीनच्या अउ लहरळीलरी पुण्याहून मुंबईस निघालो होतो. लहरळीलरी आरामदायी असली तरी, एकट्याने प्रवास नकोसा वाटतो. कारण, तेथे मनमोकळ्या गप्पा नसतात. खळखळून हसणे नसते. पेपर अथवा पुस्तक उलटसुलट करून वाचत राहणे किंवा वाचल्यासारखे करणे, अधून-मधून खात राहाणे. येथे सहप्रवाशांची कोणी फारसी दखल घेत नाहीत.


मी माझ्या जागेवर बसण्यापूर्वी सहप्रवाशी कोण कोण आहेत ते पाहिले. सहप्रवाशांना पाहून मी गोंधळलो. स्वप्नात आहोत असे वाटले. मी माझ्या सहप्रवाशांना त्याच अवस्थेत नमस्कार केला. त्यांनीही प्रतिनमस्कार केला व म्हणाले "आता बॅग ठेवायला हरकत नाही.' सुरवातीलाच गुगली. कोण होते ते सहप्रवाशी? अगदी शेजारच्या खुर्चीत? आपणा सर्वांचे आवडते, महाराष्ट्राचे भूषण पु. ल. देशपांडे व सौ. सुनीतीताई देशपांडे!

मी माझा परिचय करून दिला. श्री. साठे म्हणून आणखी एक सहप्रवासी होते. गप्पा सुरू झाल्या. अगदी मनमोकळ्या आमच्या गप्पांचा विषय होता. डेक्कन क्वीन. लोणावळा स्टेशन सुटले आणि आमचे गप्पांचे विषयही बदलले. खंडाळ्याच्या घाटातील छोट्या-मोठ्या धबधब्यांपासून ते थेट नायगऱ्याच्या धबधब्यापर्यंत पु.लं. आम्हाला घेऊन गेले. पु.लं.च्या त्या धबाधबा वाहणाऱ्या वाकगंगेत पूर्ण चिंब झालो. दादर स्टेशन कधी आले ते कळलेच नाही.
या प्रवासाची मी डायरीत नोंद करून ठेवली होती. आणि गंमत म्हणून 9 ऑगस्ट 1982 ला पु.लं. वरील आठवणीचा उजाळा देण्यासाठी एक छानसे पत्र पाठविले. त्याचे अनपेक्षितपणे उत्तरही आले. मला, माझ्या पत्नीला, मुलींना व माझ्या मित्रांना खूप आनंद वाटला. पु.लं.च्या पत्रातील मजकूर असा होता.

.............................
प्रिय गंधे,

तुमचे पत्र मिळाले. 9-8-81 रोजी आपली आगगाडीत भेट झाली होती. ती लक्षात ठेवून तुम्ही त्या दिवसाबद्दल पत्र पाठविलेत त्याची मजा वाटलीय. माझ्याशी गप्पा मारणाऱ्याला बहुधा कानसेनाचीच भूमिका घ्यावी लागते. मुंबईचे ENT specialist डॉ. कर्णिक यांनी माझ्या नावाच्या आद्याक्षरांवर .श्रि. म्हणजे please Listen अशी कोटी केली होती. ते कानांचे डॉक्‍टर असल्यामुळे कर्णिक आहेत हे मीही त्यांना Listen करायला लावलं होते.
तुमच्या पत्रातील आपुलकीचा सूर कुणालाही सुखावून सोडेल असाच आहे. वेटर्स, विमानातले पर्सर वगैरे मंडळीविषयी मी बहुधा साशंक असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्यांची मला धास्ती वाटते; पण डेक्कन क्वीनमधील वेटर त्याला अपवाद आहेत. हमालांशीही माझे कधी भांडण होत नाही. दिलेली मजुरी स्वीकारून जाणारा हमाल क्वचित भेटतो. त्यांचे थोडेसे बोहारणी सारखे असते. नवा शालू दाखवला तरी बोहारीण ""बाई काही तरी चांगलं काढा ना!'' असं सवयीनेच म्हणून जात असावी. याबाबतीत त्यांची तुलना नाट्यसमीक्षकांशी करता येईल. कुठलेही नाटक त्यांना पूर्णपणे पसंत पडत नसते.
पत्राबद्दल मनःपूर्वक आभार. तुमच्या पत्नीला आणि मुलींना अनेक आशीर्वाद.
तुमचा - पु. ल. देशपांडे.
.....................

पुढे 1984 ते 1987 मी अलिबागला होतो. त्या वेळी पु. लं. देशपांडे हे श्री. माळगावकरांनी इंग्रजीत लिहिलेल्या "सरखेल कान्होजी आंग्रे' या कादंबरीचा मराठीत अनुवाद करीत होते. अलिबागला कान्होजी आंग्रेचा भला मोठा वाडा आहे. मी पु. लं.ना सविस्तर माहिती कळविली व त्यांना अलिबागला येण्याचे निमंत्रण दिले; परंतु पु. लं.ना अलिबागला काही येण्यास जमणार नव्हते. तसे त्यांनी एक पत्र मला पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा होता.

......................
"प्रिय प्रकाश गंधे,
9 ऑगस्टला डे. क्वीनमध्ये 81 मध्ये झालेल्या भेटीचं स्मरण ठेवून तुम्ही पाठविलेले पत्र मिळाले.
तुमच्या अलिबागला येण्याच्या आमंत्रणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. शाळकरी विद्यार्थी असताना अलिबागला गेलो होतो. त्यानंतर आणीबाणीच्या काळात भाषण द्यायला गेलो होतो. सध्या माळगावकरांनी लिहिलेल्या कान्होजी आंग्र्यांच्या इंग्रजी चरित्राचं मराठीतून भाषांतर करतो आहे. त्यात तुमचं आणि तुमच्या मुलीचं आग्रहाचं आमंत्रण. यावंसं खूप वाटतं; पण काही ना काही असे उपद्‌व्याप मागे लागलेले आहेत की इच्छा असूनही सागरकिनाऱ्यावर शांतपणे जाऊन बसण्याची संधी घेणे अवघड होते. अशा वेळी
Woods are Lovely.
Dark and deep.
But I have promises to keep.
And milis to go, Before I sleep. मागील असहायता अधिक प्रकर्षाने जाणवायला लागते.
तुमचा - पु. ल. देशपांडे.
(रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेतल्या चार ओळी आहेत.)
..............................

या पत्रांचा प्रवास, त्यातली मजा इथेच संपली नाही. अमृतसिद्धी या तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात
या पत्रांचा मजकूर माझ्या नावांसह प्रसिद्ध केला गेला आहे. धन्यता वाटली. या आठवणी पुस्तकांत ठेवलेल्या मोरपिसासारख्या जपायच्या असतात...

प्रकाश दत्तात्रय गंधे
सकाळ
१२ जून २०१२

4 प्रतिक्रिया:

Unknown said...

वाह दीपकराव, फारच छान पोस्ट... !!!

Prashant More said...

छान पोस्ट आहे...!!!

Prashant More said...

छान पोस्ट आहे....!!!

Yashodhan said...

उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
मेजवानी देत राहा.

माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!


InfoBulb : Knowledge Is Supreme

इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे



टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!