Tuesday, September 6, 2022

चिनी शिंपी - पूर्वरंग

एकेका गावाच्या उरावर एकेक भूत असते . हाँगकाँग च्या मानगुटीवर शिंप्याचे भूत आहे. हाँगकाँग मधला प्रत्येक चिनी नागरिक हा क्षणाचा चिनी आणि अनंत काळाचा शिंपी आहे. हाँगकाँग मधल्या चिनी पोराचे पाय पाळण्यात देखील मिशनीवर चालल्यासारखे हलतात. आता माझे आणि शिंप्याचे कधीच सूत जमले नाही ही गोष्ट मी कपडे घालायला लागल्यापासून मला पाहिलेल्या जगात तरी जगजाहीर आहे. भगवंताने हा देह एक डगळ पायजमा आणि त्याहून डगळ नेहरू शर्ट नामक अभ्रा ह्याच योजनेने घडवला आहे अशी माझी ठाम श्रद्धा आहे. 

आमच्या लहानपणी आम्हा गरीब कारकूनांच्या पोरांची फ्याशनची कमाल डोक्यावरची शेंडी नाकाच्या शेंड्याला लागते की नाही ह्यावर ओळखली जात होती. आता ह्या संस्कारात बाळपण घालविलेल्या माझ्या सारख्या पोशाखाच्या बाबतीतल्या बालपणच्या अल्पसंतुष्ट आणि मोठेपणीच्या अघळ -पघळ माणसाला हाँगकाँगचा शिंपी काय किंवा शेणोली ताकारी बिच्चूद ह्यापैकी कुठल्याही आडगावच्या ठिकाणीचा काय दोघेही एकाच दर्जाचे! पण नाही. इथे मंडळी ऐकेनात.

शेवटी सूट शिवायला गेलो. माझ्या देहाकडे आपल्या डोळ्यांच्या फटीतून पाहताना तो चिनी शिंपी चाचरला. अंगाला फिट्ट बसणारा सूट शिवावा तर अंगभूत बेढबपणा जाहीर होतो, तो झाकावा तर सूट बेढब शिवावा लागतो . तो चिनी शिंपी कात्रीत सापडला होता. आधुनिक फ्याशनीची , पोटाखाली कटदोरा बांधायची जागा असे तिथून सुरू होणारी पँट शिवावी तर कंबर आणि पोट ह्यांची सीमारेषा सापडणे कठीण! म्हणजे चढवताना मला आडवा घालून पोटावर पाय ठेवूनच ती चढवावी लागली असती. बरे, जुनी बाबाशाही तुमान शिवावी तर त्याचे नाव बद्दू होऊन त्याच्या पोटावर पाय! माझ्या सुटाचे फिटिंग करताना तो चिनी शिंपी असा नरमला होता की ज्याचे नाव ते!फासावर चढवायची शिक्षा लिहून झाल्यावर न्यायाधीश नीब मोडून टाकतात म्हणतात. मला सूट चढवल्यावर त्या चिनी शिंप्याने आपली सुई मोडली असेल.

लेखक - पु.ल. देशपांडे 
पुस्तक - पूर्वरंग 


0 प्रतिक्रिया: