Thursday, December 24, 2009

साने गुरूजी

अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!' केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो..."

पुलंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. "शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला."

Wednesday, November 25, 2009

मधुराधिपतये अखिलम मधुरम्

बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पुलंनी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण.
              
मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही घाबरून गेलो आहे. भाषणाला मुद्दे नाहीत म्हणून नाही, तर इतके मुद्दे आहेत की काय बोलावं ते समजत नाहीये.

बालगंधर्व या विषयावर मी काय बोलणार? उद्या जर कुणी सांगितलं की ‘चांदणं’ या विषयावर बोला. तर काय बोलणार? आपल्याला बोलता येत नाही हे न कळणारा माणूसच कदाचित बोलू शकेल.

बालगंधर्वाच्या प्रेमाने आजही इतकी माणसे एकत्र येताहेत हाच मुळी एक अद्भुत चमत्कार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची तीन सांस्कृतिक दैवतं आहेत. शिवाजी महाराज, लो. टिळक आणि बालगंधर्व! महाराष्ट्राने या तिघांवर भरभरून प्रेम केलं. त्यांना विभूतीमत्व दिलं. लोकप्रियता एक वेळ मिळते, पण विभूतीमत्व मिळत नाही. बालगंधर्वाविषयी अधिकारवाणीने बोलावे एवढा मला अधिकार नाहीये आणि त्याची मला जाणीव आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट! मात्र एक सांगतो, तो अधिकार मला मिळण्याची शक्यता आहे. बालगंधर्व ज्या मार्गाने कलेकडे गेले तो मार्ग अनुसरला तर आपल्याला त्यांच्याविषयी (निदान) बोलायचा अधिकार मिळू शकतो.

बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेकडे अगदी प्रेमात पडून पाहिलं. त्यांनी एखाद्या भूमिकेचा विचार केला, चर्चा केली असं मला वाटतच नाही. ‘एकच प्याला’तली सिंधू त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. मात्र त्या तन्मयतेत त्यांनी स्वत:ला वाहू दिलं नाही. ते नुसतेच प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंतही होते. परिष्करणाची तर त्यांना अतिशय आवश्यकता वाटायची. त्यामुळे त्यांची भक्ती आंधळी न ठरता डोळस ठरली.

बालगंधर्वाच्या गायकीबद्दल बोलायचं तर भारतीय संगीतातल्या गायकीबद्दलच बोलायला पाहिजे. ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं ठरेल. बालगंधर्वाचा यमन आणि भास्करबुवांचा (बखले) यमन यांची जातकुळी वेगळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. अर्थात बालगंधर्वाना अजून एक दैवी देणगी लाभली होती. ती म्हणजे त्यांचा स्वर हा जन्मजात भिजलेला स्वर होता. त्याला अंत:करणातल्या प्रेमाच्या ओलाव्याचा स्पर्श होता. बालगंधर्वाची म्हणून एक खास गायकी होती. त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्यातलं जे प्रेम आहे ते सुसंस्कारीत प्रेम आहे. ‘सुखविलासी सोडी न विनया’ अशा प्रकारचं प्रेमाला सुखसंवेदना स्फुरावी असं ते प्रेम आहे. त्यांनी स्त्रीभूमिका केल्या. त्यातून स्त्रीत्वातलं जे जे काही पवित्र, सुंदर, सात्त्विक अशा प्रकारचं आहे त्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून दर्शन घडवलं. म्हणूनच लोकांची त्यांच्यावर भक्ती जडली.

माझ्या बाबतीत म्हणाल, तर वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून बालगंधर्वाच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. (पूर्वी मुलगा होतो- आता राहिलेलो नाही, पण बालगंधर्व म्हटलं की मला माझं मुलगेपणच आठवतं) बालगंधर्वाचं नाटक म्हणजे आमच्या घराचा एक कुळाचारच होता. कुलदैवतेला जसं दरवर्षी जातात तसं आम्ही दरवर्षी बालगंधर्वाच्या नाटकांना जायचो. त्यांची नाटक कंपनी मुंबईत आली की त्यांचं नाटक आपल्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे अशी जिद्द- आवड- ओढ असलेले आई-वडील मला मिळाले हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. घरामध्ये एखादं लग्नकार्य असावं अशा तऱ्हेने लोक नाटकाला यायचे. ती नाटकं म्हणजे एखाद्या धार्मिक संस्कारासारखा उत्सव असायचा. असा उत्सव मी परत पाहिला नाही. नाटकांची लोकप्रियता पाहिली. माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली (चुकून!) पण लोकांचा असा अमाप उत्साह मी पाहिला नाही. एखाद्या लग्नकार्याला जावं तसे कपडे घालून, नटून-थटून लोक नाटक बघायला यायचे. नाटकातल्या सुभद्रेपेक्षा ते बघायला येणारी बाईच जास्त नटलेली असायची. कारण ते फक्त नाटकाला जाणं नसायचं तर एक प्रकारचा उत्तम सांस्कृतिक अनुभव घेणं असायचं. अशा वृत्तीने लोक जायचे आणि बालगंधर्वही अशा वृत्तीने जाणाऱ्या लोकांच्या पदरात पुरेपूर माप टाकायचे.

पडदा वर जायचा. रंगमंचावर लाईटस् पडायचे. ‘प्रभुपदास नमित दास’ म्हणून नांदी सुरू व्हायची आणि खरं सांगतो, ज्या क्षणी- हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत याचा अभिमान वाटतो- असा तो क्षण असायचा. असे असंख्य क्षण ज्या माणसाने आपल्याला दिले त्या माणसाचं नाव नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व! त्यांनी आम्हा सगळ्या लोकांच्या क्षणाचं, आयुष्याचं सोनं करून टाकलं!
       
नारायणरावांनी जे केलं ते अमूल्य होतं. बिनतोड होतं. ‘नाथ हा माझा’ मधल्या यमनाची काय किंमत ठरवणार तुम्ही? एक गोष्ट सांगतो, नारायणरावांनी जरूर नसलेलं असं काहीच केलं नाही. असं वाटायचं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठय़ा कलाकारांचे हे वैशिष्टय़ आहे, त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही. ताजमहालमध्ये थोडी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. बालगंधर्वानी जे केलं त्याला पर्यायच नसायचा. शिवाय आपण काहीतरी विशेष करून दाखवतोय असा आविर्भावही त्यात नसायचा. हे घडतंय, हे होतंय असंच वाटायचं. त्यात एक सहज बरोबर जन्मलेला नैसर्गिक भाव असायचा. नाटकात एखादं राजाचं पात्र असतं. त्याने कुणाला शिक्षा केली तरच तो राजा ठरतो असं नाही. त्याचं वागणं बोलणं असं असलं पाहिजे हा राजा आहे. हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. बालगंधर्व जे काही करत होते ते सहजतेनं करत होते. तद्रूप होऊन करत होते. ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. ते फक्त गात होते. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला, अक्षराला, लयीला धरून ते गात होते.

संगीत नाटकं आल्यावर बरेचसे समीक्षक- जे संगीतातले औरंगजेब होते, ते म्हणाले, संगीत आणि नाटक यांचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला, संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे का? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो संगीताचा दोष नव्हे. हे म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखं आहे. या लोकांना आपली परंपरा किती माहीत नाही याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक महान समीक्षक मला म्हणाले, काय तुमचे ते बालगंधर्व! ते ‘कशी या त्यजू पदाला’ गाणं म्हणत असायचे, तेव्हा तो सिंधूचा बाप नुसता मख्खासारखा उभा! मी म्हटलं, साहेब, सगळं ऑडियन्स ‘कशी या’ गाणाऱ्या बालगंधर्वाकडे तल्लिन होऊन बघत असताना तुम्ही सिंधूच्या बापाकडे कशाला बघत बसलात? म्हणजे नाटक कसं बघावं हे ज्यांना कळत नाही, त्यांना संगीत नाटकांचा परस्परसंबंध कसा कळणार?

जेव्हा गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होतं. गाणं सुरू होतं. आईला जेव्हा वात्सल्याचं भरतं येतं तेव्हा ती मुलाला ‘तो एक नंबरचा चमचा घे. तोंडात घाल’ वगैरे सांगत बसत नाही. ती सरळ ‘घास घेरे तान्ह्य़ा बाळा’ असं गायला लागते. तिला जे म्हणायचं असतं ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. कीर्तनातही एखादा नाटय़मय प्रसंग उभा करायचा असेल तर गाण्यांचाच आधार घेतला जातो. कल्पना करा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, असा प्रसंग आहे. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतोय. तो गद्यात कितीही वर्णन केला तरी अपुराच पडणार. पण त्याच वेळी कीर्तनकाराने उच्च रवात ‘रथचक्र उद्धरु दे, श्रुतीशास्त्र ये फळाला’ असा स्वर लावला की तो कर्ण, अर्जुन, तो एकंदर प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. प्रसंग सजीव होतो. ‘नाथ हा माझा मोही खरा’च्या प्रसंगी ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले म्हटल्यावर तिला जे वाटलं, ते तिनं पद्यातच म्हटलं पाहिजे. गद्यामध्ये ती शक्ती नाहीये.

मानापमानातला ‘नाही मी बोलत नाथा’चा प्रसंग घ्या. (बायका जेव्हा ‘काहीतरी बोलू नका’ असं म्हणतात तेव्हा त्यांना ‘काहीतरी बोला’ असं म्हणायचं असतं. स्त्री जेव्हा ‘चला’ म्हणते तेव्हा उठून जायचं नसतं. बसायचं असतं. हे समीक्षकांना कळणार नाही.) ‘नाही मी बोलत नाथा’ हे बालगंधर्व किती प्रकारे सांगतात? ज्यांना गाणं कळत नाही, त्या मूर्ख लोकांनी त्याला ‘दळण घालणं’ म्हटलं. त्यांना कळलंच नाही ते. ‘नाही मी बोलत’ हे ५० वेळा नव्हे तर ५० तऱ्हांनी म्हटलेलं असायचं. एकासारखी दुसरी नाही. दुसऱ्यासारखी तिसरी नाही. उगीच नाही बालगंधर्वाची साथ करताना मी- मी म्हणवणाऱ्या तबलजींची बोटे दुखून येत. लयीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म बदलाची त्यांना जाणीव होती.

काहींनी त्यांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला की तिथे नाटक थांबायचे आणि गवई गात सुटायचे. वास्तवात कुणी गातो का? आता त्यांना काय सांगावं? नाटक ही गोष्टच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येते. बहिरंगातली नव्हे! बहिरंगातली वास्तवता त्यात येईलच कशी? लोक तिकीट काढून नाटकाला येतात, पडदा वर जातो तिथे प्रॉम्टर असतो. त्यातला शिवाजी, शिवाजीच्या मिशा सगळं खोटंखोटंच असतं. पण हे खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे, विविधांगी आहे हे सांगत असतं. नाटकातलं गाणं हे कृत्रिम वगैरे काही नाही. तो त्याचा एक भाग आहे. लंगडीच्या खेळात कुणी म्हटले, दोन पाय असून एका पायाने कशाला धावायचे, तर त्याला काय उत्तर देणार? तो खेळच तसा आहे. तसं नाटकाचं आहे. गाणं नाटक थांबवत नाही. ते नाटक बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं आणि नाटक पुढे नेतं. बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कनक्वीनसारखा ठराविक वेळ ठराविक स्टेशनं घेत केलेला (आखीव-रेखीव) प्रवास नसतोच मुळी! तो एका सुंदर उद्यानाचा फेरफटका आहे. त्यातली प्रत्येक सुंदर जागा बघत, सौंदर्यस्थळं निरखत रमतगमत केलेला तो एक उन्मुक्त फेरफटका आहे.

भारतीय संस्कृतीत संगीताला मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आमचा तत्वज्ञानपर ग्रंथ- गीता- हा पद्यात आहे. लग्नामधल्या मंगलाष्टकांना दुसरी (उडती) चाल लावून बघा. लग्न लागण्याऐवजी मोडलं असं वाटेल.

नाटक हा एक यज्ञ आहे. त्यात सगळे कलाकार आपापला हविर्भाग अर्पण करतात. नट येतो. अभिनय करतो. गायक येतात. गातात. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, तबलजी, सारंगिये येतात. प्रत्येक जण आपली आहुती अर्पण करतो. बालगंधर्वानी आपल्याला काय दिलं? जीवनामध्ये सौंदर्य हे एक मूल्य आहे हे मनावर ठसवलं. सुबकपणे जगणं, सुरेख रीतीने मांडणी, गाणं शिकवलं. बरं हे सर्व अगदी सहज रीतीने शिकवलं. स्त्रीत्वात जे काही मोहक, सुंदर, मधुर आहे ते त्यांनी अभिनयानं दाखवलं. म्हणूनच ५-५ पिढय़ांनी त्यांचा अभिनय बघितला. बालगंधर्व म्हातारे होऊ शकतील, पण लय म्हातारी होणार नाही. त्यांनी मात्रांचा हिशेब बोटांवर नाही घातला. अंत:करणात घातला. म्हणूनच त्यांचे संगीतशास्त्रीय प्रमाद त्यांचे गुण ठरले. त्यांनी भीमपलासात शुद्ध निषाद लावला. इतर कुणी लावला असता तर संगीताच्या रखवालदारांनी ते करणाऱ्याची जीभ कापली असती. बालगंधर्वाच्या बाबतीत हे फक्त तुम्हीच करू शकता, असं म्हणून सर्वानी त्यांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वाचा षडज् ऐकताना भीमसेन (जोशी) म्हणाला होता, आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्यांची भाजी करून खावी! खरं आहे ते! बालगंधर्व फार थोडे आणि सोपे राग गायले. फार मोठे राग गाऊन आपण काही करामत करतोय असं त्यांना दाखवायचंच नव्हतं.
   
बालगंधर्वानी खूप वेडेपणा (अव्यवहारीपणा) केला. हजार-हजार रुपयांचे शालू घेतले. पण ते नारायणराव बालगंधर्वासाठी नव्हते. तो शालू द्रौपदीचा होता. सुभद्रेचा होता. राजा भीष्मकाच्या राजकन्येचा होता. मायबाप प्रेक्षकांच्या मनावर रुक्मिणी ठसावी म्हणून होता. ते सगळं रंगदेवतेसाठी होतं. प्रेक्षकांसाठी होतं. त्यांची तारीफ करून आम्हाला काय मिळवायचं? त्यांच्या हाती कुठली सत्ता होती? ते मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते. क्रेडीट सोसायटीचे चेअरमनही नव्हते की एखादं लोन पास करतील. पण खरं सांगायचं तर त्यांनी इतका आनंद दिला की त्यांचे ऋण फेडताच येणार नाही.

बालगंधर्वाबद्दल बोलणं संपणारच नाही. त्याचा कधी कंटाळा येणार नाही. चांदण्याचा, गंगेच्या ओघाचा, गुलाबाचा, जाईच्या सुगंधाचा कधी कंटाळा येईल का? वल्लभाचार्य म्हणतात, ‘रुपं मधुरम्, गीतं मधुरम्, वचनं मधुरम्, नयनं मधुरम्, हसितं मधुरम्, चरितम् मधुरम्, ललितं मधुरम्, मधुराधिपतये अखिलं मधुरम्.’
गदिमा म्हणाले, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ ते सर्वस्वी खरं आहे. त्यांच्या शंभराव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं संकीर्तन करायची मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. कुणीतरी म्हणालं, बालगंधर्वाचा तीन दिवसांचा महोत्सव करावा. मी म्हणतो तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात सर्वकाळ बालगंधर्वाचा, कलेचा, कलाप्रेमाचा उत्सव साजरा होवो. हीच माझी शुभेच्छा!

लोकसत्ता,८ नोव्हेंबर २००९
संकलन,शब्दांकन,संक्षिप्तीकरण - प्रशांत असलेकर

Monday, November 9, 2009

आठवणींच पिंपळपान - पु.ल. आणि सुनीताबाई

काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले. पु.ल. आणि सुनीताबाईंच्या प्रेमळ सहवासाने पावन झालेल्या थोरांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या काही आठवणी.... भाईकाकांचे एकुणच माणसांवर प्रेम होते. त्यांच्या घरी अनेक लोकांचा राबता असे. नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळीच्या सहभागाने मैफिली रंगायच्या. अनिल अवचटांनी म्हंटले आहे. ‘बेल दाबली की सुनिताबाई दार उघडत. प्रसन्न हसून ‘या~~’ म्हणत. मला, सुनंदाला कधीही या घराचा तुटक अनुभव आला नाही. बसायला सांगत आणि आत तोंड वळवून ‘भाई~~’ अशी हाक मारीत. आतून हसऱ्या चेहऱ्यानं पु.ल. येऊन बसत. त्यांना अलिकडेच घरच्या कपड्यात पाहिलं. पण त्या वेळी ते घरीही नेहमी खादी सिक्लचा झब्बा, पायजमा अशा स्वच्छ इस्त्रीच्या कपड्यांतच भेटले. सुनीताबाईंचा वावर स्वयंपाकघर ते हॉल अस असे. मधे दाराजवळ जरा खालच्या लेव्हलला फोन असे. आणि त्यासमोर त्याच उंचीचा, बुटका मोढा असे. फोन आला, तर सुनीताबाई त्या मोढ्यावर बसून फोन घेत. आमच्यासमोरच्या प्लेटमध्ये कधी बाकर वडी, कधी कडबोळी किंवा एका स्टीलच्या भोकं पाडलेल्या डब्यात डाळिंबाचे दाणे ठेवत. स्वयंपाकघर व्यवस्थित असे. मी कधी आत जाऊन म्हणालो की, ‘मी करतो चहा, तुम्ही बसा बाहेर,’ तर त्या म्हणत, ‘तू इथे घोटाळा करून ठेवशील. ते निस्तरण्यात माझा वेळ जाईल. तू बस जा बाहेर.’ पु.ल. घरी नसतानाही केवळ सुनीताबाईंकडेही मी व सुनंदा चक्कर टाकायचो. एकदा त्या भाज्या निवडत होत्या. पालेभाज्यांचे, भाज्यांचे ढिग पाहून म्हटलं, ‘कुणी येणार आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नाही, भाई आता चार दिवस येणार आहे ना, त्याच्या आवडीच्या भाज्या, पदार्थ याची तयारी करून त्या फ्रिजमध्ये टाकून ठेवते. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेगवेगळं करता येतं. हे जर आता करून ठेवलं नाही ना, तर त्या वेळी काहीच करता येत नाही. तो आला की लोकांची गडबड सुरू होते. त्यांच्याकडे बघावं लागतं. म्हणून हे.’ सुनीताबाईंचं पु.ल.वरचं प्रेम कधी शब्दात व्यक्त व्हायचं नाही. पण ते असं व्यक्त व्हायचं. दरवेळी जाताना मी नवीन काढलेली चित्रं, लाकडातील शिल्पं दाखवायला घेऊन जायचो. शिल्प समोरच्या टीपॉयवर ठेवलं, की ‘अग सुनीता~~’ अशी हाका मारायचे. त्या वेळी आलेल्यांनाही आवडीने ते दाखवायचे. त्या काळात सुनीताबाईंची भाची आणि तिचा नवरा डॉ. लोहोकरे कुटुंब पुण्यात जवळच राहायला आले. त्यांची दोन मुलं, म्हणजे पु.ल. सुनीताबाईंची नातवंडं, पु.ल.च्या घरात सतत खेळायला असत. त्यांना मी ओरिगामी देऊ लागलो. त्यांचं खेळून झाल्यावर सुनीताबाई ती ओरिगामी मॉडेल्स व्यवस्थित उचलून आत जाऊन एका ड्रॉवरमध्ये ठेवत. मी त्यांना अनेकदा म्हंटलं, ‘अहो, तुम्ही हे कशाला करता? मी परत करून देईन.’ त्या म्हणायच्या, ‘असू दे, तू गेल्यावर या मुलांनी हट्ट केला तर मी काय करू?’ नंतर मला कुणी सांगतही असे, कुणी मुलं खेळायला आली की सुनीताबाई ते ड्रॉवर बाहेर आणतात. टेबलावर सगळी मॉडेल्स मांडून ठेवतात आणि म्हणतात, याच्याशी खेळा. पण फाडायची नाहीत बरं का.’ 
व्यसनी मुलांबद्दल जेव्हा पु.ल. दापत्यांला कळलं तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. दोघांनी सांगितल, ‘तुम्ही या मुलांसाठी काहीतरी करा. आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देणगी देणार आहोत.’ मला काय करावं हा प्रश्न पडला. पण सुनंदा धडाडीची. ती म्हणाली, ‘यांच्यासाठी सेंटर काढू.’ तिने सरकारी परवानग्या काढल्या आणि मेंटलमधल्या एका इमारतीत हे केंद्र सुरू झालं. सरकारनं बजावलं होतं, तुम्ही इथं नेमणाऱ्या सेवकवर्गाला सरकारी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही. मग प्रश्न पडला. आमचा ट्रस्ट तोपर्यंत स्थापन झालेला नव्हता. सुनीताबाई म्हणाल्या. ‘ठिक आहे. पुढची सोय होईपर्यंत सेवकांचे पगार पु.ल. देशपांडे फाउंडेशनतर्फे करू. आम्ही व्यसनातून बऱ्या झालेल्या दहा-बारा तरुणांच कामावर घेतले. सगळ्यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर महिन्याला लिहून ठेवत. त्यांची आणि पु.लंची त्यावर सही असे. ‘मुक्तांगण’ या सस्थेंचा जन्म सुनीताबाईंच्या पुढाकरानेच होऊ शकला.अगदी मुख्य मंत्र्यांना फोन करून त्या ‘इतक्या चांगल्या कामांना अडचणी येऊच कश्या दिल्या जातात, शरम नाही का वाटत’ अशा शब्दांत सुनवायच्या. त्यानंतर प्रशासन धावत यायचे. 
दिनेश ठाकुर आपल्या भाईकाकांच्या आणि माईआत्तेच्या नात्याबद्दल सांगतात ‘भाईकाका व माईआते यांचा माझ्यावरचा प्रभाव मी वेगळा काढुच शकत नाही. ही दोन व्यक्तिमत्वे जरी खूप वेगळी असली, तरी त्यांचा विचार व त्यानुसार ठरलेली कृती शेवटी एकत्रच व्हायची. आजी-आजोबा किंवा पार्ल्याच्या आजी असतानाही ठाकूर आणि देशपांडे कुटुंबियाचे ते दोघेही (प्रत्यक्षात माईआतेच!) कुटुंबप्रमुख होते. माईआते आपला सल्ला ठामपणे, आग्रहीपणे मांडून तर्काने समजून सांगायला जाई(व भाईकाकांनी दिलेले ’उपदेशपांडे’ नाव सार्थ करी.) तर भाईकाका तीच गोष्ट इतक्या सौ म्यपणे, सहज किंवा विनोदाने सांगत, की हेच योग्य, याला पर्यायच नाही, असेच सगळ्यांना वाटे. भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेचे भाष्य अगदी समर्पक होते... ’भाई, तू शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.’ 
विद्या बाळ म्हणतात ’मला नेहमीच या जोडप्याकडे बघताना असं वाटत आलं आहे की पु.ल. हे एक बहुरुपी, बहुआयामी कलावंत होते यात वादच नाही. मात्र त्यांचं कलावंतपण, त्यांचं मोठेपण, त्यांचा पैसा या साऱ्याची सुनीताबाईंनी निगुतीनं जपणूक केली. तीही स्वत:साठी नाहीच तर त्यात एक विलक्षण ताकदीची समाजाभिमुखता होती. पु.लं.नी खूप काही मिळवावं आणि त्याच्या गुणवत्तेची निगराणी करत, ते सुनिताबाईंनी इतर, काहींना हे समजलं तरी एकेकदा घेता आलं नाही. काहींना मात्र हे समजलंही नाही म्हणूनच त्याबाबत कितीकांनी काय काय तारे तोडले, ते ऎकून माझ्याच मनाला भोकं पडली!’

 
’आहे मनोहर तरी..’ हे शिर्षक कसे सुचले ह्याची हकिगत विजया राज्याध्यक्ष यांनी सांगतली आहे. ‘पी.एल. व सुनीताबाई आपल्या गाडीतून चालले होते. वाटेत ‘मनोहर बेकरी’ लागली. सुनीताबाईंचे कवितांबद्दलचे स्मरण पक्के. मनाची उपस्थितही विलक्षण. त्यांना ‘मनोहर’ या शब्दातून लगेच ‘आहे मनोहर, तरी गमते उदास’ ही ओळ आठवली. पाठोपाठ वाटले, आपल्या पुस्तकाला हे शिर्षक द्यायला काय हरकत आहे? पी.एल.नाही ते आवडले. श्री.पुं.शी चर्चा झाली. दुसरे एखादे अधिक चांगले शिर्षक सुचेपर्यंत ‘आहे मनोहर, तरी...’ हे शीर्षकच मनात ठेवायचे ठरले. दुसरे शीर्षक सुचले नाही, म्हणून ‘आहे मनोहर, तरी..’च कायम झाले. अनेकांप्रमाणे मलाही या कवितेचा संदर्भ ठाऊक नव्हता. मी विचारले, तेव्हा सुनीताबाईंऎवजी पीएल्‌नीच तो संदर्भ सांगितला. इतके ते शिर्षक त्यांनी आपलेसे केले होते. इतर शिर्षकांची त्यांच्या मनातली आठवण केव्हाच पुसली गेली असावी, इतके या नियोजीत शिर्षकावर ते खूश होते, असे वाटले. त्या त्या क्षणापुरते कशावर तरी, कोणावर तरी बेहद्द खूश असणे हा त्यांचा स्वभाव आहे. इथे तर सुनीताबाईंचीच कल्पना. त्यामुळे या खूश असण्याचे प्रमाण अर्थातच काही टक्के अधिक!’  
मुकुंद टाकसाळे एका ठिकाणी म्हणतात.. ‘सुनीताबाईंनी इतक्या काटेकोरपणे पु.ल.चा व्यवहार पाहिला. उत्तम व्यवहार करुन जोडलेले हे धन त्यांनी मुक्तहस्तानं समाजालाच परत देऊन टाकलं. पु.ल. सुनीताबाईंनी स्वत:साठी एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला मिळतील एवढेच पैसे दरमहा घेतले आणि टुकीनं संसार केला. जयंवत दळवींनी मला सांगितलेली एक आठवण आहे. ‘पु.ल.: साठवण’ या ग्रथांचे संपादन करण्याची कामगिरी दळवींनी उत्साहानं स्वत:च्या शिरावर घेतलेली होती. त्या काळात कधीतरी ते एका संध्याकाळी पु.लं.कडे गेले. सुनीताबाईंनी त्यांना विचारलं, ’तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी?’ ती वेळ दळवींच्या दृष्टीनं ही दोन्ही पेये घेण्याची नव्हती. त्यामुळे ते गप्प राहिले. तेव्हा सुनीताबाईच पुढे त्यांना म्हणाल्या, "दळवी, खरं तर तुम्हाला ड्रिंक्सबद्दलच विचारायला हवं. परंतु पु.ल. देशपांडे फाउंडेशनमधून आम्ही आमच्यासाठी म्हणून महिन्याची जी रक्कम घेतो, त्यातून ड्रिंक्स ऑफर करणं आम्हाला खरोखरच परवडत नाही." समजा, सुनीताबाईंनी आणखी रक्कम घेतली असती तर त्यांना कोण बोलणार होतं? पण बेचाळीसच्या चळवळीचे संस्कार घेऊन आलेल्या सुनीताबाईंना ही ‘चैन’ आवडणारीच नव्हती. आज पैशाला नको इतकी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. जिथून जे जे फुकटात मिळेल ते ते लाटण्याकडे लेखक-कलाकारांचा कल दिसतो. (उदाहरणार्थ, टेन पर्सेंटमधील फ्लॅट- एक पुण्यात आणि एक मुंबईत घेऊन ठेवणे.) या पार्श्वभूमीवर पु.ल.- सुनीताबाईंची साधी सात्विक राहणी खरोखरच ‘राजस’ वाटू लागते. आपल्या स्पष्ट आणि सडेतोड वागण्यानं वागण्यानं स्वत:बद्दल गैरसमज निर्माण करायला आणि शत्रू वाढवायला सुनीताबाईंना आवडतं. ‘पु.ल. सारखा देवमाणुस कुठल्या कजाग बाईच्या तावडीत अडकलेला आहे’ अशीच त्यांची ‘इमेज’ त्यांनी घडू दिली. ‘पु.ल. सारखा मनस्वी (आणि आळशी) माणूस गप्पांच्या मैफलीतच फक्त अडकून राहिला असता तर त्याच्या हातून एवढं लेखन घडलंच नसतं. ‘बटाट्याची चाळ’ उभी राहू शकली नसती. लोकांचे सारे शिव्याशाप स्वत:च्या अंगावर झेलून सुनीताबाईंनी पु.ल. च्या आयुष्याला शिस्त आणली. पु.लं.च्या यशामागं आणि लोकप्रियतेमागं सुनीताबाईंसारखी खंबीर बाई उभी होती, हे कुणालाच नाकारता येणार नाही.’  
सरोजिनी वैद्द सांगतात.. ‘मॅजेस्टिक पारितोषिका’च्या एका वितरण समारंभात केशवराव कोठावळे यांनी पुलंना एक सुंदर भलामोठा पुष्पगुच्छ दिला होता. समातंभानंतर तो तसाच हातात धरून, अनेकांशी गप्पा मारताना पु.लं.ची थोडी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. ती पाहून मी हात पुढं करीत सहज त्यांना म्हटलं, ‘मी सांभाळू का तुमचा हा गुच्छ? बिलकूल पळवणार नाही. घरी जाताना अगदी आठवणीनं परत देईन.’ त्यावर थोड्या वेळासाठी तो गुच्छ माझ्या हातात देत पु.ल. हळूच म्हणाले, ‘हा गुच्छ सुनीतासाठी आहे. तो घरी न्यावाच लागतो. ती यापुढेही आठ-दहा दिवस त्याचे सगळे लाड पुरवील. ह्यातलं शेवटचं फूल पूर्ण सुकेपर्यंत त्या फुलदाणीतलं पाणी वेळोवेळी बदलत राहिल...’ सुनीताबाईंविषयीच्या त्यांच्या अशा ओघाओघानं निघणाऱ्या उद्‌गारांत हळवेपणाबरोबरच आणखीही वेगवेगळे भाव असायचे. सुनीताबाईंची वागण्यातली शिस्त, त्यांचं काव्यप्रेम, त्यांनी दोघांनी बरोबर घालवलेले जगप्रवासातील गंभीर आणि गमतीदार क्षण यांबद्दलच्या त्यांच्या बोलण्यात पुष्कळ मोकळेपणा असायचा. बरेच जण समजतात तसा नात्यातील दडपणाचा भाग नसायचा. अनेक कंटाळवाण्या व्यावहारीक जबाबदाऱ्या स्वत:वर घेऊन सुनीतानं आपल्याला ‘मुक्त’ ठेवलं याची कृतज्ञ जाणीवही दिसायची. कधी कधी मधूनच खट्याळपणाही असायचा. ‘आहे मनोहर तरी’ बद्दल बोलताना एकदा गंभीरपणानं त्यांनी मला सांगितलं, हे लिहिणं ही तिची मानसिक गरजच होती. ‘मी ‘हूं’ म्हटलं; पण लगेच हलक्या सुरात मिस्किलपणे ते पुटपुटले-- तिला रॉयल्टीचा घसघशीत चेक आला तेव्हा मी तिला म्हटलं, ‘घे, माझेच पैसे आहेत, घे.’ मी नाटकी सुरात उद्गारले, ’हाच तो पुरुषी अहंकार बरं~’ त्यांच्या दोघांमधील नात्याच्या अशा लहानसहान गोष्टी पाहताना माझ्या मनात येऊन जायचं.... असं परस्पराचं स्वातंत्र्य मानणारं आणि वेळप्रसंगी त्याचा संकोचही करायला लावणारं जोडपं पाहण्याची सवय आपल्या समाजाला अजून लागायचीच आहे.’  
सुधीर सवूर ‘भाई न्युयॉर्कमध्ये आले असताना माझ्या घरी आले होते. त्यादिवशी भाईंना भेटायला काही मित्रमंडळीही आली होती. मैफलीत भाई असताना ती रंगली नाही तरच नवल. अर्थातच मैफलीचे केंद्रबिंदू फक्त भाईच. त्यांना आवडेल म्हणून गीताने गोव्याच्या पद्धतीचे माशाचे हुमण केले होते. गप्पा मारता मारता जेवण संपले. भाईंनी आपण आतापर्यंत काय काय खाल्ले आहे हे सांगायला सुरुवात केली. भाई आपल्या खाद्दजीवनाचे वर्णन करीत असताना मी काही कारणासाठी स्वयंपाकघरात गेलो. सुनीतावहीनी माझ्या पाठोपाठ आत आल्या व मला म्हणाल्या की, "हे पहा, भाईला माशाच्या जेवणानंतर ओला नारळ खायला आवडतो. त्याला एखादा तुकडा नेऊन द्या आणि तो कसा खुलेल बघा." मी एका वाटीत खोबऱ्याचे तुकडे घालून ती भाईंसमोर नेऊन ठेवली. भाईंनी चमकून माझ्याकडे पाहिले. आपली आवड याला कशी कळली याचे त्यांना आश्चर्य वाटले असावे. सुनीतावहिनींकडे नजर जाताच त्यांच्या लक्षात आले. किंचित हसून त्यांनी मैफल पुन्हा सुरू केली. सुनीतावहीनी व भाई एकमेकांच्या आवडी कशा हळुवारपणे जोपासतात याची मला मिळालेली ही पहिली झलक. यानंतर काही वर्षांनी मला भाईंनी दिनेशला लिहिलेले एक पत्र वाचायला मिळाले होते. त्यात काही ओळी सुनीता वहिंनीनी लिहिल्या होत्या. त्यात त्यांनी लिहिले होते, तुझे भाईकाका ताटातला एखादा पदार्थ आवडला की जसा माझ्यासाठी थोडासा बाजूला काढून ठेवतात तसाच त्यांनी या पत्राचा थोडासा भाग माझ्यासाठी ठेवला आहे. मला आठवलं, की न्युयॉर्कच्या या मुक्कामात सुनीतावहीनी मला म्हणाल्या होत्या की, तुमची व भाईंची व्हेवलेंग्थ जुळली. अर्थातच हे सर्टिफिकेट सुनीतावहीनींकडून मिळाल्यामुळे त्याला विशेष महत्व होते.’  
शरद पवार 
‘पुलंच्या सुदैवाने त्यांना सुनीताबाईंसारख्या सहचारीणी लाभल्या. मराठी मनात आज पुलंची जी प्रतिमा आहे ती घडवण्यात सुनीताबाईंचा मोठा वाटा आहे. त्या स्वत: कर्तबगार, प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या होत्या. चिकित्सक रसिकता व कलागुण यांची देणगीही त्यांना लाभलेली आहे आणि स्वत:चे विचार व निष्ठा त्यांनी ठामपणे जपलेल्या आहेत. पण पुलंवरील प्रेमामुळे आपले सारे कर्तुत्व पुलंच्या बालसुलभ व्यक्तिमत्वाला सांभाळण्यात व कलागुणांना फुलवण्यात त्यांनी व्यतीत केले आणि पुलंमधील आदर्शवादाला उत्तेजन दिले. त्याचबरोबर त्यांनी पुलंच्या सामाजिक बांधिलकेच्या भावनेला उत्तेजन देऊन अनेक समाजोपयोगी उपक्रमांना आधार प्राप्त करून दिला. 

निशिकांत ठकार.. 
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत? पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते. भाई गेल्यानंतर सुनीताबाईंनी भाईंसाठी एक पत्र लिहिले त्यातला काही भाग- "बोरकरांची एक ओळ आहे, ‘चंदन होवोनि अग्नि भोगावा’- जिंवत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि शेवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्निदेखील भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरुपता. तो चिरंजीवच. नाहं हन्ति न हन्यते! तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.  
तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी- एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-" 

लेखातील भाग ‘पु.ल. नावाचे गारुड’ `आनंदयोगी पु.ल.' आणि ‘जीवन ज्योत दिवाळी अंक २००९’ मधुन साभार..

Tuesday, October 20, 2009

जे रम्य ते बघुनिया.. - निशिकांत ठकार

(श्री ना. ध. महानोर लिखीत ‘आनंदयोगी पु.ल.’ ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.) 

..शहरात राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांच्या शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं.ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. 

’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे. हरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरोधात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते. 

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। 
उदास विचारे वेच करी॥ 
हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत? पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. 

कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते. 
-निशिकांत ठकार

Tuesday, August 18, 2009

आमचा हसवणारा मित्र पी.एल. - म.का. पारुंडेकर

(अस्मिताताई बाविस्कर आणि आनंद कुलकर्णी यांचे ह्या लेखासाठी खुप खुप आभार.)

पु लंना "पी. एल." म्हणणाऱ्यांच्या पिढीतला मी आहे. कारण माझी त्यांची ओळख साठ वर्षांपासूनची- म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयापासूनची. त्यांच्या खट्याळपणाच्या, महाविद्यालयात नव्याने आलेल्या मुलांची खिल्ली उडवण्याच्या, उत्स्फूर्त विनोदाच्या अशा कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या आहेत. वयोमानाप्रमाणे जशा आठवतील तशा थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सुरवातीला त्यांच्या उत्स्फूर्त विनोदाचा एक नमुना देत आहे. सवाई गंधर्व महोत्सव सुरू झाल्यापासून मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचा कमिटी मेंबर आहे. प्रसंग होता सवाई गंधर्वांचा पुतळा संभाजी पार्कमध्ये बसवला त्या वेळचा. कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना सहसचिव डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या "आलापिनी' बंगल्यावर जेवण होते. पी. एल., महापौर या नात्याने ना. ग. गोरे, आयुक्त भुजंगराव कुलकर्णी, वामनराव देशपांडे, पं. फिरोज दस्तूर, मी, डॉ. गंगूबाई हनगल वगैरे मंडळी जेवणास हजर होते. जेवणाच्या टेबलावर ना. ग. गोरे, पी. एल., भुजंगराव कुलकर्णी असे बसले होते. ससोर बाकीचे आम्ही लोक होतो. जेवणाचा बेत उत्तम केला होता. सगळे लोक आता जेवण्यास सुरवात करणार, इतक्यात पी. एल. डॉ. नानासाहेबांना म्हणाले, "नाना, तुम्ही जेवणाचा बेत फारच उत्तम केला आहे; पण मला आज जेवण जाईल का नाही याची शंका आहे.'' डॉ. नानासाहेबांनी त्यांना विचारले, "काहो पी.एल., पोट बरोबर नाही का?'' तेव्हा पी. एल. म्हणाले, ""तसं काही नाही नाना, पण माझ्या एका बाजूला नाग व दुसऱ्या बाजूला भुजंग असताना मला कसे जेवण जाईल?'' आणि प्रचंड हशा पिकला.


आमच्या महाविद्यालयीन जीवनात तर पी. एल. विनोदाचा शिडकावाच करीत. बाहेरगावाहून आलेल्या मुलांच्या ते सारख्या फिरक्या घ्यायचे. आमच्याबरोबर हैदराबादचा करमरकर नावाचा मुलगा होता. जिमखान्यावर फिरताना पी.एल.नी त्याला सांगितले, "करमरकर, पुण्यात ट्रॅफिकचे नियम फार कडक असतात. इथे पायी चालणाऱ्यालासुद्धा वळायचे असले, तर त्याला कुणीकडे वळायचे त्या दिशेकडे हात दाखवावा लागतो.'' तेवढ्यात आम्ही "गुडलक'कडून भांडारकर रोडकडे वळणार होतो व करमरकर सगळ्यात डाव्या बाजूला होता. त्याला पी. एल. म्हणाले, "अरे करमरकर, डावा हात दाखव, आपल्याला डावीकडं वळायचं आहे'' आणि खरोखरच करमरकरने वळण्यासाठी चक्क डावा हात दाखवला व आम्ही सर्व जण वळेपर्यंत त्याला खाली हात करू दिला नाही.


आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. ती नेहमी डाव्या मनगटावर पट्टीसारखा मोठा पांढरा रुमाल बांधायची व त्याचा एक वेढा अंगठा व अनामिकेच्या मधून घ्यायची. सर्वांना या रुमाल बांधण्याबद्दल उत्सुकता होती. तिच्या खूप ओळखीचा एक मुलगा आमच्या ग्रुपमध्ये होता. त्याला पी. एल.नी विचारले, "काय रे, तुझी ती मैत्रीण हाताला रुमाल का बांधते?'' तो म्हणाला, "तसं काही कारण नाही. उगीचच बांधते.' तेव्हा पी. एल. त्याला म्हणाले, "हात लेका! तू तिच्या इतका जवळचा मित्र असून तुला काहीच कसं माहीत नाही? तिच्या हातावर एक छोटासा केसांचा पुंजका आहे, तो लोकांना दिसू नये म्हणून ती रुमाल बांधते. खात्री नसेल तर विचार तिला?'' आम्ही कॉलेजच्या आवारात फिरत असताना मागचा- पुढचा काही विचार न करता त्या मुलीला थांबवून तिला म्हणाला, "कुसुम, मला माहीत आहे तू हाताला रुमाल का बांधतेस ते?'' ती मुलगी एकदमच चकित झाली. आम्ही बाकीचे थोडे पुढे जाऊन गंमत पाहत उभे राहिलो. ती त्याला म्हणाली, "काय माहिती आहे रे तुला?'' तो म्हणाला, "तुझ्या हातावर केसाचा लहान पुंजका आहे, तो झाकण्यासाठी तू रुमाल बांधतेस.'' ती जी भडकली, तिने तरातरा हातावरचा रुमाल काढला आणि त्याला हात दाखवला. त्याच्यावर मार खायचीच पाळी आली होती. एवढे झाल्यानंतरसुद्धा पी. एल.नी त्याचा ग्रह कायम ठेवला. त्याला सांगितले, "अरे, ती कसं सांगेल कुणाला, की माझ्या हातावर केसाचा पुंजका आहे म्हणून? माझी एक आतेबहीण आहे, तिनं मला खासगीत हे गुपित सांगितलं आणि तू तरी अगदीच भोट, असल्या गोष्टी कधी विचारायच्या असतात का? बरे तिने प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली नाही. नाही तर तुला त्यांनी रस्टिकेट केलं असतं.''


कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पी. एल. तर उत्सवमूर्तीच असत. पी. एल.चे एक खास दोस्त होते श्री. श्याम देशपांडे. तो उत्तम तबला वाजवत असे. हैदराबाद संस्थानातील एका श्रीमंत जहागीरदाराचा मुलगा (तो पुढे आयएएस झाला व कर्नाटक सरकारमध्ये सेक्रेटरी होता). त्याला सगळे "नबाब' म्हणायचे. आम्ही जेव्हा दोन आणे तासांनी सायकल घ्यायचे, त्या वेळेस हा श्याम देशपांडे पाच रुपये तासांनी श्री. जोग यांच्याकडून भाड्याने मोटारसायकल घेऊन फिरायचा (व्यक्ती आणि वल्लीमधील "भय्या नागपूरकर' हे शब्दचित्र त्याच्यावरच आहे). पी. एल.ची. पेटी व साथीला श्याम देशपांडे याचा तबला हे नेहमी ठरलेले.४० सालच्या गॅदरिंगमध्ये पी.एल.नी एक कव्वाली बसवली होती. त्यात पी. एल. मध्यभागी दाढीमिशा लावून, गोंड्याची टोपी घालून, गळ्याला रंगीत रुमाल, जरतारी जाकीट, लेंगा व पठाणी पद्धतीचा कमीस अशा वेशात पेटी घेऊन बसले होते. शेजारी तबल्यावर श्याम देशपांडे व बाजूला आम्ही इतर मित्रमंडळी गोंड्याच्या टोप्या घालून कव्वालीला साजेसा पोशाख घालून बसलो होतो.कव्वालीचा साधारण अर्थ असा असतो, "त्याला एक मुलगी भेटते, त्याला ती आवडते, ती त्याच्या बरोबर हिंडते-फिरते, हॉटेलमध्ये जाते आणि शेवटी काय झाले ते सांगते!''. सर्व आठवत नाही. कवाल म्हणतो, "ओ मुझे बहोत चहाती थी, मेरे साथ घुमती थी, "लकी'मे कटलेट बी खाती थी, "गुडलक'में चिकनबी खाती थी'' वगैरे वगैरे. "लेकिन, एक दीन उसने मुझे बतायारे, बतायारे'' आणि आम्ही लोक त्याला विचारतो "क्या?'' त्या वेळेस पी. एल. म्हणतात, ``पर्वतपें अपना डेरारे'' असे म्हटल्यावर अँफी थिएटर कोसळून पडले की काय असे जबरदस्त स्टॅंपिंग झाले. बऱ्याचशा प्रोफेसरना, विनोद काय झाला, एवढे स्टॅंपिंग का झाले, हे कळलेच नाही. (व्ही. शांताराम यांचे याच नावाचे पिक्चर नुकतेच त्यावेळेस लागले होते.) या झाल्या जुन्या आठवणी!


ते अलीकडेच शस्त्रक्रिया करून अमेरिकेहून परत आल्यानंतर मी भेटावयास गेलो असताना सुनीताबाईंनी, एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा त्यांची विनोदबुद्धी किती जागृत होती याचा एक नमुना सांगितला. तिथे त्यांची काळजी घेणारी जी मुख्य नर्स होती तिची समजूत अशी, की एवढा मोठा भारतातला लेखक, म्हणजे त्याचा भला मोठा बंगला असणार. बॅकयार्ड, बाग, समोर भलेमोठे लॉन असणार. पी. एल. यांचा आवाज नीट बाहेर येत नव्हता म्हणून त्यांनी तिच्याकडे तक्रार केली तेव्हा तिने त्यांना सल्ला दिला ,"मिस्टर देशपांडे, तुम्ही तुमच्या बंगल्याच्या पुढील दरवाजात उभे राहा आणि तुमच्या मिसेसना तुमच्या बंगल्याच्या लॉनच्या दुसऱ्या टोकाला उभे राहावयास सांगा आणि तुम्ही जोरजोरात माय हनी, माय स्वीट हार्ट, माय डिअर अशी हाक मारा, म्हणजे तुमचा आवाज मोकळा होईल.'' हे तिने सांगितल्यावर लगेच पी. एल. तिला म्हणाले, "माझी हाक ऐकून माझी शेजारीण धावत आली तर मी काय करू? हे ऐकल्यावर ती नर्स खळाळून हसली.


सुनीताबाईंनी पी. एल. करिता काय केले नाही? लोक जरी (मी सुद्धा) त्यांना घाबरत होते, तरी त्यांनी पी.एल.मधला लेखक जागवला, फुलवला, जिवापाड जपला आणि पी. एल.नी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेला पैसा सुनीताबाईंनी उत्तम प्रकारे जपला. स्वतःच्या साध्या राहणीपुरता लागेल तेवढा वापरला व उरलेला सर्व पैसा काहीही गवगवा न करता समाजाच्या कल्याणासाठी दानशूर कर्णाप्रमाणे वाटला. याचे सर्व श्रेय पी. एल.नी कित्येक भाषणांत उघडपणे सुनीताबाईंना दिले आहे. पी. एल.च्या आजारातही स्वतःची दुखणी विसरून त्यांची जी जिवापाड सेवा शुश्रूषा केली, तिला तोड नाही. लक्ष्मणाच्या या ऊर्मिलेचे मन फारसे लोकांनी जाणलेच नाही...


-म. का. पारुंडेकर

Wednesday, July 8, 2009

न पेलणारी पगडी

लहानपणी आमची आजी आम्हाला एक गुरूदेव दत्ताची कथा सांगत असे. दत्तमहाराज आपली दैनिक नित्यकर्मे निरनिराळ्या क्षेत्रांत जाऊन करतात. स्नान काशीला, भिक्षा करवीरक्षेत्री, भोजनपात्र शिरोडला अश्या रीतीने प्रत्येक कर्म निरनिराळ्या ठिकाणी जाऊन करणाऱ्या देवाचा आम्हाला लहानपणापासून एक प्रकारचा आदर वाटत असे. परंतु दुसऱ्या महायुद्धाने अश्या कितीतरी दत्तात्रयांना जन्म दिला आहे. 

असाच आमचा एक स्थळहीन मित्र झोपायला गोरेगावाला, स्नानाला अंधेरीला, कपडे बदलायला वांद्ऱ्याला आणि नोकरीला बोरीबंदरला, अश्या अवस्थेत दिवस काढतो आहे. रजेच्या दिवशी तर बिचाऱ्याला रस्त्यावर दिवस कंठाला लागतो. कारण झोपायला त्याला गोरेगावला एक तबेला मिळाला आहे. तबेला दिवसभर बंद असतो. सुटीच्या दिवशी टांग्याला अधिक स्वाऱ्या मिळत असल्यामुळे रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत टांग्याच्या गाद्यांची वाट पाहत त्याला बसावे लागते. त्यामुळे सुट्टी आली की रात्रपाळी आल्यासारखा चेहरा करून हिंडत राहणे याखेरीज तो काहीही करू शकत नाही. बरे, ज्या तबेल्यात तो झोपतो तिथे इतरही अनेक भाडे न देता राहणारे सोबती आहेतच. उंदिर आहेत. उंदरांना एकलेपणाची आग लागू नये म्हणून घूशीही येतात. टांग्यातल्या गादीखालचे ढेकूण रात्रभर आमच्या मित्राच्या शरिराचे पानीपत करीत असतात. शिवाय दिवसभर अश्वराजाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या गोमाशा काही वेळ घोड्याशी तर काही वेळा आमच्या मित्राशी लडिवाळपणा करत असतात. परंतु ह्या सर्व परिस्थितीला जुन्या नाटकातल्या धीरोदत्त नायकाप्रमाणे आमचा रणझुंजार मित्र टक्कर देतो आहे. रोज अक्षरश: बारा निम्मे सहा गावचे तो पाणी पीत असल्यामुळे त्याच्या अंगात एक प्रकारचे ’योगसामर्थ्य’ आल्यासारखे झाले आहे. त्यातून तबेल्यात राहून राहून सोबत्याचा गुण नाही तर वाण लागला आहे. तो तबला मिळवण्यासाठीसुद्धा पागडी द्यावी लागली रोज घोड्याला खरारा करायच्या बोलीवर त्याला झोपायला जागा मिळाली. सुरुवातीला काही दिवस त्याने नविन जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काही यश आले नाही, तूर्त घोड्याचे मन न दुखेल अश्या बेताने वागून आहे ती जागा टिकवून धरणे हेच त्याच्यापुढे एकमेव ध्येय आहे. सुदैव इतकेच की त्याची गाठ एका पशूशी आहे. मालकरुपी माणसाची मर्जी सांभाळण्याचे कार्य त्याच्यापुढे असते तर मात्र कठीण अवस्था होती.

अश्याच एका इसमाला चांगली नोकरी मिळाली. तडकाफडकी बिचाऱ्याचे लग्नही झाले. शिताच्या आणि सुताचा प्रश्न सुटला आणि छताचा प्रश्न उभा राहिला. कारण तो ज्या मालकाकडे राहत असे त्याला ’लग्न केल्यास ताबडतोड जागा सोडीन’ असे त्याने लिहून दिले होते. त्या मालकाचे लग्न एका संपादिकेशी झाले असल्यामुळे बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्याच हातचे लेख या दुहेरी भडीमाराने तो अधिच जेरीला आला होता. फुंकणी आणि लेखणी ही एका हाती नांदणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळे कोणाचे लग्न म्हंटले की त्याला भयंकर संताप येत असे. दारात कोणी तुळशीचे लग्न लावलेलेसुद्धा त्याला खपत नसे.  

अश्या परिस्थितीत आमच्या मित्राने लग्न केले. पहाटे दोनला वरात निघाली. घरमालकाने बेकायदा मिरवणूकी सारखी वरात आपल्या वाड्यासमोर अडवली. करारभंगामुळे मालक भाडेकरूला घरात घ्यायला तयार होईना. नाना तऱ्हेने लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्याची एकसष्टी करण्याचा सुद्धा विचार जाहीर केला. पण म्हतारा ऎकेना. शेवटी बॅंडवाल्यांना आणखी दोन तासांचे पैसे देऊन सदाशीव पेठेतून शुक्रवार पेठ, गंज पेठ पुन्हा उलट कसबा, नवा पुल करीत हिंडवीत आळंदीला पालखी सारखी पहाटे पाच वाजता संगमावर आणून वरात थांबली. बिचाऱ्या बॅंडवाल्यांनी ’संडे के संडे’ पासून ते प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ पर्यंत येतील तितकी गाणी वाजवली आणि त्या नवपरिणीत जोडप्याला संगमावर सोडून बाकीची वरात परतली. 

बाकी संसाराची सुरूवात संगमावर व्हावी हाही योगायोग काही कमी अपूर्व नव्हता. आमच्या मित्राने आपल्या बायकोला ’तुझ्या माझ्या जिवनसरिता-आयुष्याचा प्रवाह- पहाटेचा शुक्र’ वगैरे सांगुन पहाटेपर्यंतचा वेळ काढला आणि तेथून दोघांची खरी वरात सुरू झाली. नवऱ्या मुलीला तर बिचारीला बाप घरात घेईना आणि नवऱ्याला जागा मिळेना अश्या अवस्थेत दिवस काढावे लागले. नुकतीच त्यांना जागा मिळाली. जागा म्हणजे जिथे पूर्वी मालक कोळश्य़ाच्या गोणी, कांदे, मधल्या काळात बाबागाडी वगैरे ठेवत असत असा पोटमाळा. या जागेसाठी प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने पागडी घेणे जमले नाही. तेव्हा जागेच्या भाड्य़ाखेरीज माझ्या मित्रपत्नीला घरमालकाच्या घरचा स्वैपाक करणे, त्यांच्या वंशविस्ताराला वाढवणे-भरवीणे. मालकिणबाईच्या मोठेपणाच्या गोष्टी ऎकणे फावल्या वेळात त्यांच्या चोळ्या बेतणे आणि दर चोळी बेतताना "गेल्या खेपेपेक्षा थोड्य़ा अशक्तच झाल्यात बरं का शालिनीबाई" अस म्हणणे. शेजारच्या प्रमिलाबाईच्या फॅशनला नेहमी नावे ठेवून मालकिणबाईच्या साधेपणाचा गौरव करणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु तिच्याहून आमच्या मित्राची परिस्थिती फारच वाईट आहे. मालकांना तबला वाजवायचा नाद आहे आणि रात्री दोनदोन वाजेपर्यंत आमच्या मित्राला मोडक्या भात्याच्या पेटीतून ’कृष्ण मुरारी’ वाजवायला लावून मालक तबला कुटीत बसतात. सध्या दिवसा माझ्या मित्राच्या कानाजवळ कुणी हे गाणेच नव्हे तर नुसते कृष्ण किंवा मुरारी म्हटले तरी त्याला घेरी येते! अगदी ’जागा नको पण तबला अवर’ म्हणण्याची पाळी आली आहे. पण करतो काय बिचारा? आणि असले अनेक बिचारे आज जागेच्या अभावी काही करू शकत नाहीत. 

साधुसंत म्हणतात ’ठेविले अनंते तैसेची रहावे’ परंतु अनंत कुठे ठेवायलाच तयार नाही तर त्याने कुठे रहावे? आणि मला वाटते की ह्या ’कुठे रहावे’ चे उत्तर प्रत्यक्ष अनंतालासुद्धा देता येणार नाही. जगातल्या सगळ्या जागा गेल्यात कुठे? ह्याचे उत्तर देणारा एकच पंथ आहे आणि तो म्हणजे न पेलणार्‍या पगड्या घालणार्‍या लोकांचा फरक एतकाच , ही पगडी देणार्‍याच्या डोक्यावर भार अस्तो, घेणारा मात्र परवापरवापर्यंत निर्धास्त असे. जागेसाठी लाच म्हणून द्यावा लागणाऱ्या पैशाला ’पगडी’ हे नाव ठेवणाऱ्या माणसाच डोके मात्र केवळ पगडी ठेवण्याच्याच लायकिचे नसावे. कारण सरकारी संकट आल्यावर तो पैसा इतक्या हातचलाखीने फिरवण्यात येतो की त्याला धुर्त माणसाच्या पगडी फिरवण्याचीच उपमा शोभेल. पगडीवाल्या म्हातार्‍याचे ही गोष्ट असल्यामुळे ती एखादी पडकी दंतकथा असण्याचाही संभव आहे. इतकेच कश्याला, पगडी घेतल्या कारणाने एका बाईला पकडल्याची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात आली तेव्हा आमच्या दत्तकथा सांगणार्‍या आजीने "पगडी घालयची एवढी फॅशन बायकांत राहिली होती, ती सुद्धा आली" असे म्हणून नाक मुरडून मनातला राग हातातल्या वातीवर काढला होता. महागाईच्या आणि टचांईच्या तोंडओळखीच्या काळातल्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पगडी -पागडी किंवा पग्री- ही चिज अबालवृद्धांच्या परिचयाची झाली आहे. अमतमक्याने जागेसाठी अमुकअमूक रुपये पगडी दिली असे म्हणण्यात येते. परंतु वास्तविक इतक्या हजाराची पगडी स्वताच्या डोक्यावर चढवल्यावर जागा मिळाली असे म्हणणे अधिक योग्य आहे. सरकारी नियंत्रणे कडक होण्यापुर्वी हा प्रकार अगदी उघड आणि मांडली होती. परंतु आता काय मोबदले द्यावे लागतिल काही सांगता येत नाही.

माझ्या एका दुर्दैवी मित्राला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या तिरळ्या मुलीशी चक्क लग्न करावे लागले. जागेकडे पाहून तिच्या डोळ्याकडे ह्याने कानाडोळा केला, तरी जागेसाठी घालावी लागणारी नवरदेवाची पगडी त्याला बायकोच्या डोळ्याशी डोळा भिडवू देत नाही. तिच्याच बोबड्या प्लस तिरळ्या बहिणीशी लग्न करणार्‍यास दोन खोल्या, एक हॉल आणि स्वतंत्र बाथरुम अशी खुल्ली ऑफर आहे. कोणाला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या मुलाला शिकवणे, संध्याकाळी फिरायला नेणे, रविवारी सिनेमा दाखवणे किंवा राणीच्या बागेला ’मालकिण बाई आणि तिची मुले’ दाखवणे अश्या भयानक गोष्टी कराव्या लागतात. माझ्या परिचयाच्या एका नास्तिक डॉक्टरला वाड्यच्या मालकाला रोज दुर्वा आणि बेल काढुन देऊन रात्री ’भक्तिविजय’ वाचून दाखवायच्या अटीवर दवाखाना खोलायची परवानगी मिळाली. शिवाय मालक आणि त्यांच्या प्रजेला औषध फुकट द्यावे लागते ते वेगळेच. मालकांना रोज इन्सुलिनचे इंजेक्शन देताना त्या डॉक्टरच्या मनात अनेक पाशवी विचार येतात. इतर वेळी दिवसभर कांतिच्या गोष्टी सांगणारा हा गृहस्थ सकाळी बिल्वपत्रे खुडायला बेलावर चढला की सर्कशीतल्या पिंपावर चढणाऱ्या हत्तीसारखा केविलवाणा दिसतो. परंतु त्याच्या निर्घुण मालकाला यत्किचिंतही दया येत नाही. कारण बेल काढायला डॉक्टर पाणी काढायला वकिल आणि केर काढायला वकिल आणि केर काढायला विदुषी असा थाटात सध्या मालक आपल्या मालकिच्या वाड्य़ात मोठ्या सुखाने नांदत आहेत. वरुन पुन्हा "आम्ही अर्धा दमडीसुद्धा पागडी घेतली नाही" म्हणायला तयार. ’लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ अशी म्हण जरा दुरुस्त करून ’घर पाहावे शोधुन’ असे म्हणण्याची पाळी आली आहे.

जागा शोधणाऱ्या मनुष्यस्वभावाचे काय विलक्षण नमुने पाहायला सापडतात. घरमालकाच्या उमेदवार भाडेकरूला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपुढे धर्मराजाला विचारण्यात आलेले यक्षप्रश्न आहीच नाही. सगळ्यात लोकप्रिय किंवा मालकप्रिय प्रश्न म्हणजे ’तुमचे लग्न झाले आहे का? गाफिल भाडेकरू आजूबाजूला न पाहता खर बोलून गेला की संपलच. वास्तविक वरवर पाहणाऱ्याला ह्या प्रश्नात अवघड असे काहीच वाटत नाही. ’तुमचे लग्न झाले आहे का?" ह्या प्रश्नाला दोन उत्तरे संभवतात, "झाले आहे" किंवा "झाले नाही." परंतु भावी भाडेकरू म्हणून तुम्ही एकदा घरमालकापुढे गेलात की इतक्या सरळपणे उत्तर देऊन भागत नाही. घरमालकाच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर हे उत्तर अवलंबून आहे. जात, उत्पन्न आणि लग्न अश्या क्रमाने हा प्रश्न आला की नक्की समजावे की धोका आहे. मालकाच्या तुमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून नव्हे तर ’स्थळ’ म्हणून पाहण्याचा विचार आहे. जागा मिळवण्यासाठी तुम्हाला स्थळ व्हावे लागेल. तेव्हा उत्तर देण्यापुर्वी "सावधान" बरे "लग्न झाले आहे" अशी बेधडक थाप ठोकली तर "बायको दाखव नाहीतर जावई हो" असा ठोक सवाल टाकायलाही घरमालक कमी करत नाही. त्यापेक्षा जगाच पसंत नाही म्हणून आपली शान राखणे चांगले. वाड्य़ाचा मालक नवख्या भाडेकरूला पहिल्याच भेटीत आपल्या मुलीसंबंधी असे काही बोलू लागला की समजावे की त्या सौभाग्यकांक्षिणीच्या कुंकुवाचा धनी होण्यापेक्षा फुटपाथवर पाथरी टाकणे बरे.काही ठिकाणी मालकांना लग्न झाले आहे का?" या प्रश्नाचे उत्तर अस्तिपक्षचे हवे असते. लग्न झालेला भाडेकरू हा वाड्याच्या सार्वजनिक सुरुक्षिततेच्या दॄष्टीने अत्यंत विश्वसनीय अशी एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे. त्यामुळे वेळा लग्न होऊन गेलेले असणे ही जागा मिळवण्याच्या दृष्टीने उत्तम शिफारस होऊ शकते. फक्त वंशवेल वाढलेली नसावी. अर्थात लग्न झालेले असणे आणि जागा मिळवणे ह्याचा हमखास सांधा जुळेलच असे नाही. पुष्कळ वेळा जागा नाही म्हणून लग्न नाही आणि म्हणून जागा नाही असल्याही शृंगापत्तीला तोंड द्यावे लागते. 

याशीवाय तुम्ही शाकाहारी की स्वाहाकारी, रात्री साडेआठ नंतर दिवा पेटता कामा नये, सकाळी दहानंतर बाथरूम मिळेल इथपासून तो तुमच्या राजकीय मतापर्यंत वाटेल त्या प्रश्नाला उत्तर द्यावी लागतात. एका होतकरू भाडेकरूला तो पगडी देण्यास तयार असूनसुद्धा, सायन आणि निरयन पद्धतींतला फरक न सांगता आल्यामुळे जागेला मुकावे लागले. एका वाड्य़ाच्या मालकाने तर आपली ओसरी फक्त शांडिल्यगोपत्रोत्पन्नांनाच भाड्याने मिळेल अशी जाहिरात दिली होती. बाकी ज्याने ज्याने म्हणून हल्लीच्या काही वर्षात जाग भाड्य़ाने मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा माणूसकी, सभ्यपणा, सचोटी, चांगुलपणा, प्रामाणिकपणा या इतिहासजमा गुणांवरचा विश्वास पुर्णपणे नष्ट झाला आहे. भाकरीचाकरीचे प्रश्न चुटकी सरसे सुटतात, पण जागेचा प्रश्न एकदा उभा राहिला की काजी केल्या तो बसायलाच तयार नसतो. माणसाची तो फिरवून टाकतो.

परवाची गोष्ट, आमच्या गावचे पोष्टमास्तर बदलून दुसऱ्या गावाला जाणार होते. तर जातांना, ते विलायतेला निघाल्यासारखा समारंभ घडवून आणला. पोष्टमास्तरांच्या गूणवर्णनाची इतकी भाषणे सुरू झाली की पोष्टमास्तरांना आपण पोष्टमास्तर आहोत की कोणी धर्मगूरु आहोत असा भ्रम झाला. एका गृहस्थाने तर बोलण्याचा भरात पोष्टमास्तरांची आमच्या गावाहून दुसऱ्या गावाला बदली केल्याची दाद यूनो परिषदेसमोर मांडावी असा ठराव सुद्धा आणला. एका कवीने "जातो की मम टपाल गुरूजी आजच परगावाला" अशी सुरूवात करून आपल्या हॄदयभेदक आवाजाने सभेला काकुळातीला आणले. तर गावच्या शाहिराने "भले बुद्धीचे मास्तर आता असे नाही येणार" अशी सुरुवात करून शेवटी "पोष्टवाल्याचा पोवाडा पोष्टवाल्यानेच एकावा." असा दोन तासाने समारोप केला. पोष्टमास्तरही लोकांच्या आपल्यावरही अपरिमीत प्रेमाने गहिवरले. सभा संपली मंडळी जड अंत:करणाने निघाली. मास्तर घरी येतात तोच ती सभा पुन्हा त्यांच्या दारात जमलेली दिसली. प्रत्येकाने हळूच मास्तरांच्या कानात सभेचा उद्देश सांगितला. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी दुसऱ्या गावी जाऊन आपल्या कामाचा चार्ज घेतला तेव्हा त्यांना डोक्याला बॅंडेज हाताला फॅक्चर चष्मा बेपत्ता आणि पायताण गहाळ अश्या अवस्थेत उभे रहावे लागले. मास्तरांनी आपली जागा नवीन येणाऱ्या पोष्टमास्तरला अगोदरच दिली होती हे गावकऱ्याक ठाऊक नसल्यामुळे त्यांनी हा मास्तरांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता आणि ही बातमी अत्यंत गुप्त ठेवण्यासाठी पोष्टमास्तरमजुकरांनी आपल्या पत्निला बदलीहुकुम मिळाल्या दिवशीच तिच्या माहेरी रवाना केली होती. बदललेल्या मास्तरांचा रिकामी जागा हाच सत्कारसमारंभामागे हेतू होता. तो ढासळलेल्या गावकऱ्यांनी चिडून मास्तरांचा पुन्हा सत्कार तर केलाच शिवाय गावातल्या पोष्टावर बहिष्कार घालून शेजारच्या गावातून कार्ड पाकिटे घेण्याचा निर्णय घेतला. ह्या पोष्टाचा धंदा बसावा म्हणून बाहेरगावच्या लोकांना इथल्या पत्त्यांवर सारख्या मनीऑर्डर पाठवायला लावून रक्कम संपवायचा ठराव त्याच बैठकीत केला. ही झाली साध्या बदलीची गोष्ट. ज्या वेळी आपली इहलोकातून परलोकात बदली होते ती घटना आजवर तरी दु:ख करण्यासाठी समजली जात होती. आज मात्र समर्थसुद्धा "मरे एक ज्याचा दुजा शोक वाहे" म्हणण्याऎवजी "मरे एक ज्याचा दुजा ब्लॉक पाहे"असेच म्हणाले असते. 

(अपूर्ण)
खोगीरभरती
हे पुस्तक मिळवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Friday, June 12, 2009

मन हाच माणूस

मनाचिये गुंफी ह्या डॉ. प्रकाश साठये यांच्या पुस्तकाला पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना.

(नोंद - हा लेख "मनाचिये गुंफी" ह्या पुस्तकाचे लेखक मान्यवर डॉ. प्रकाश साठये यांच्या पुर्वपरवानगीने इथे प्रकाशित करत आहे. सदर लेखाची परवानगी घेण्याचे मोलाचे कार्य आणि संपुर्ण लेख मराठीत टंकुन देण्याचे अत्यंत मेहनतीचे काम आमचे एक जालमित्र आणि पु.ल.प्रेमी श्री. नितीन येमुल ह्यांनी केले आहे. मराठीत टंकण्यासाठी श्री नितीन येमुल यांना त्यांच्या पत्नी सौ.लता येमुल आणि त्यांचे सुपुत्र अमर येमुल यांची बहुमोल साथ लाभली. ह्या लेखासाठी डॉ. प्रकाश साठये आणि श्री. नितीन येमुल यांच्या परिवाराचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत तरिही आम्ही त्यांचे मनापासुन आभारी आहोत. सर्व श्रेय ह्या दोन मान्यवरांचेच.)

‘मन हाच माणूस’
-- पु. ल. देशपांडे

माणूस ह्या प्राण्याची व्याख्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. अजूनही ते चालू आहेत. योगवासिष्ठाने ह्या विषयावर एक निर्णय देऊन टाकला आहे की ‘मन एव मनुष्य:।’ मन हाच माणूस. ही व्याख्या माणसाच्या बाह्य वर्णनाशी जुळणारी नसली तरी आपण जेव्हा अमक्या अमक्या माणसाला ओळखतो असं म्हणतो त्यावेळी त्याच्या केवळ शारीरिक घडणीशी परिचित आहोत एवढंच सांगत नाही. त्याच्या मनाच्या घडणीशी आपल्या त्या ओळखण्याचा संबंध असतो. आपला निरनिराळ्या माणसांशी परिचय असतो म्हणजे निरनिराळ्या मनांशी परिचय असतो आणि निसर्गानं स्वत:च्या निर्मितीची हुबेहूब नक्कल, प्रत न काढल्यामुळे प्रत्येक सर्वसाधारण मनाप्रमाणे असूनही त्यात एक निराळेपण असतं. हे आपलं विशिष्ट मन घेऊनच मनुष्य जन्माला येतो आणि त्यातूनच त्याचं चारचौघांतला एक असूनही एक प्रकारचं निराळेपण दिसून येतं. ह्या निसर्गदत्त किंवा प्राकृतिक निराळेपणामुळे आपण व्यक्ति तितक्या प्रकृती असं म्हणत असतो. मनाची ठेवण उपजत असल्यामुळे एखाद्या प्रसंगी एखाद्याचं वागणं विचित्र वाटलं की ’स्वभावो दुरतिक्रम:’ असे हताश उदगार काढून त्या विचित्रपणाचा संबंध मनाच्या घडणीशी जुळवतो. म्ह्टलं तर आपल्या ताब्यात राहील आणि म्ह्टलं तर बेफाम उधळेल अशा ह्या मन नावाच्या शक्तीशी आपली आयुष्यभर झुंज चालू असते. त्यात पुन्हा माणूस हा काही एकटा जगत नाही. त्याला समाजातला एक घटक म्हणूनही जगावं लागतं; त्यामुळे व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:च्या विचारांतून स्वत:चा विकास घडवण्याच्या प्रयत्नात असताना सामाजिक परिस्थितीतून होणाऱ्या मनावरच्या संस्कारांचाही त्याच्यावर परिणाम घडत असतो. आपल्या मनाची मालकी सर्वस्वी आपल्या हाती नाही. त्याच्यावर सत्ता गाजवणाऱ्या इतर अनेक अदृश्य सामाजिक शक्ती आहेत हे त्याला उमजतं. म्हणूनच मनाची सुदृढता कमी होऊन ते रोगग्रस्त व्हायला लागलेलं दिसल्यावर त्याच्यावर जन्मजात स्वभावाचे आणि परिस्थितिजन्य संस्कारांचे आघात ह्या दोन्हींची दखल घेऊन मनोरुग्णावर इलाज करावा लागतो.

मनाचा तोल कुठल्या पायरीपायरीनं ढासळत जातो याचं अतिशय मार्मिक वर्णन गीतेतल्या, ध्यायतो पुंस: संगस्तेषूपजायते, ह्या आणि त्यानंतरच्या श्लोकांत आढळते. साऱ्या मनोविकृतीचं मूळ विषयवासनेत तिथे दाखवलं आहे. आणि त्यानंतरच्या काम-क्रोध-संमोह-स्म्रतिविभ्रम, बुध्दिनाश आणि विनाश ह्या अवस्था आजच्या मनोविकारतज्ज्ञांनीही स्वीकारलेल्या आहेत. मनोरुग्णतेचा इतका तर्कशुध्द विचार इतक्या प्राचीन काळी होऊनही त्यानंतर त्या विषयावर संशोधन किंवा शास्त्रीय स्वरुपातलं लेखन आणि ग्रंथनिर्मिती दुर्देवाने देशात झालेली नाही. उलट इतर व्याधीसारखी मनोरुग्णता हीदेखील एक इहलोकी घडणाऱ्या संस्कारातून घडणारी व्याधी आहे असं न मानता हा कुठल्या तरी देवदेवतांचा कोप आहे, आकाशस्थ ग्रहांनी दिलेली पीडा आहे, भूतपिशाच्च बाधा आहे अशा समजुतीनी ह्या व्याधींचा बुध्दिनिष्ठ, वैज्ञानिक प्रयोगनिष्ठ असा पाठपुरावा केला गेलाच नाही. युरोपदेखील अशा प्रकारच्या जादूटोण्याच्या उपचारात फसला नव्हता असं नाही. परंतु युरोपात वैचारिक आणि सांस्कृतिक समाजप्रबोधनाची क्रांती घडविली गेली. अंधश्रद्धेवर पोसलेल्या गेलेल्या आणि माजलेल्या धर्मपीठाना आणि त्यांनी प्रसृत केलेल्या विवेकशुन्य रुढींना धडका देण्याचं कार्य ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या विद्वानांनी सुरू केलं. त्यातच शरीरचिकित्सेच्या जोडीला मनाची चिकित्सा सुरू झाली. मनाच्या व्यापाराची शास्त्रशुध्द तपासणी व्हायला लागली. मनोरुग्णावस्था येणं म्हणजे मेंदूच्या दळणवळणात अडथळा निर्माण होणं. हा अडथळा कुठे निर्माण होतो? का होतो? तो अडथळा काढून टाकण्याचे भौतिक उपाय काय ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड सुरू झाली. अनेक प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत संशोधकांनी धर्मांध सत्ताधीशांची गैरमर्जी ओढवून घेतली. काहीजण देशोधडीला लागले पण प्रयत्नात खंड पडला नाही. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात निसर्गाची नाना प्रकारची कोडी बुध्दीनं आणि प्रयोगशाळेत अहोरात्र चालवलेल्या परीश्रमामुळे हळूहळू सुटायला लागली. निसर्गाला नुसतीच एक प्रचंड शक्ती मानून किंवा ह्या निर्मितीचा हवाला देव या कल्पनेवर टाकून त्याची आंधळेपणाने आणि भेदरलेल्या मनाने पूजाअर्चा करीत न बसता त्या निसर्गाचे वागण्याचे नियम शोधून काढले. त्या शक्तीचं बलस्थानही ओळखलं आणि मर्मस्थानही शोधून काढलं. आकाशातल्या विजेचं भयभीत मनानं नुस्तं स्त्रोत्र न गाता तिला वठणीवर आणून माणसाच्या ऐहीक सुखासाठी, समृध्दीसाठी कशी राबवता येईल याचा विचार सुरू केला. आणि वीज ही माणसाघरी राबू लागली. अग्निदेवतेची प्रार्थना करायची गरज उरली नाही. बटन दाबलं की ते कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या माणसानं दाबलं ह्याचा विचार न करता दिवा पेटायला लागला. पंखा फिरायला लागला. विजेकडून पाणी तापवूनही मिळायला लागले. थंडगार करूनही मिळायला लागले. ह्या भौतिक शोधांसारखाच माणसाच्या मनाचा शोध सुरू झाला. मेंदूची रचना तपासायचे नवे प्रयत्न सुरू झाले. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईड याने प्रचंड क्रांती घडवून आणली. आणि वैद्यक शास्रात मनोवैद्यकाला महत्वाचं स्थान प्राप्त झालं. माणसाच्या मनोव्यापाराच्या तळाशी एखाद्या पाणबुडयाप्रमाणे बुडी मारुन मनोरुग्णतेचं मूळ तिथे सापडतं की काय याचा शोध सुरू झाला. पुष्कळ वेळा ह्या बिघाडांचं मूळ लैंगिक वासनांच्या पूर्ती-अपूर्तीशी निगडीत असल्याचं दिसून आलं. तोटीतून वाहणारं पाणी कुठेतरी एखादा चोथा अडकून तुंबावं आणि त्या पाण्याची घाण सुटावी त्याप्रमाणे मेंदूतही पूर्वायुष्यातील अप्रिय घटनांचा चोथा अडकून तो भाग अकार्यक्षम होतो. त्यातून स्मृतीभंश होतो आणि माणूस भ्रमिष्ट होतो. त्याचा विवेकाचा लगाम सुटतो असं दिसून यायला लागलं. माणसाना पडणाऱ्या स्वप्नांचं वर्गीकरण करून त्यावरून मनोरुग्णावस्थेची चिकित्सा सुरू झाली. हजारो रूग्णांची तपासणी झाली. त्यातून मिळालेल्या माहितीतून व्याधींच्या कारणांची छाननी करण्यात आली. त्यावर इतर व्याधींना द्यावयाच्या औषधाप्रमाणे औषधोपचार सुरू झाले. मनोरुग्ण विज्ञानाची एक शाखा वैद्यकाला जोडली गेली.

इंग्रजी अमलानंतर भारतात युरोपीय पद्धतीच्या वैद्यकीय चिकित्साशास्त्रांच्या अभ्यासाला सुरूवात झाली. आयुर्वेद-युनानी वगैरे चिकित्साशास्त्राची जागा ऍलोपथीने घेतली. वैद्यक इंग्रजीतून शिकवलं जाऊ लागलं. त्यामुळे ज्ञानाच्या त्या शाखेतल्या साऱ्या ग्रंथांची निर्मिती इंग्रजीतून झाली. भारतीय भाषांतून हे ज्ञान आलंच नाही. वास्तविक मंत्रतंत्र, जादूटोणे, अंगारे-धुपारे वगैरे अडाणी उपचार हे आपल्या देशात शारीरिक आणि मानसिक व्याधींनी पछाडलेल्या माणसांवर फार मोठया प्रमाणावर होतात. अशा वेळी प्रयोगशाळेत रीतसर परीक्षा करून सिद्ध झालेलं हे आधुनिक वैद्यक विज्ञान भारतीय भाषांतून लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. पण डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्यांना धंदा करण्यात अधिक रस होता. हे नवं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवावं, अंधश्रद्धेतून केल्या गेलेल्या आसुरी उपचारांच्या भयानक परीणामांची जाणीव करून द्यावी असं अगदी तुरळक अपवाद सोडले तर आमच्या भिषग्वर्यांना वाटलं नाही. आधुनिक वैद्यक-विज्ञानावरची मराठीतली ग्रंथनिर्मिती एका कपाटात मावण्याइतपतच आहे.

आणि इंग्रजीत दरसाल हजारो ग्रंथाची भर पडते आहे. ही पुस्तकं काही मुद्रणालयात जन्माला येत नाहीत. त्यासाठी ज्ञानाची ओढ असलेल्या संशोधकवृत्तीच्या आणि ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याची तळमळ असलेल्या विज्ञान क्षेत्रातल्या उपासकांची गरज असते. निसर्गाची ही कोडी सोडवून सत्य उजेडात आणण्याची बुध्दीनिष्ठ धडपड करणाऱ्या सत्यसंशोधकांची फळी उभी रहावी लागते. आपापल्या प्रयोगशाळांत रात्रंदिवस तप करणारे ऋषी असावे लागतात. असले तपस्वीच अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती करीत असतात. दुर्दैवाने आधुनिक ज्ञानविज्ञान आपल्या लोकांना कळेल अशा भाषेत सांगायाची ओढ असलेली माणसं आपल्या देशात अपवाद म्हणूनच आहेत. त्याबरोबर वैद्यकातलं नवं संशोधन काय आहे याविषयी काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असलेला वाचकही इथे नाही. असल्या ह्या निराशाजनक आणि जिथे वाचकवर्गच कमालीचा मर्यादित आहे अशा परिस्थितीत मराठीतून हे शास्त्रीय ज्ञान देण्याचा खटाटोप कोण करील? पण प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात. डॉ. प्रकाश साठये हा असाच एक अपवाद आहे. मनोवैद्यकाच्या क्षेत्रात तो गेली सतरा-अठरा वर्षे आहे. अनुभव आणि अभ्यास अशा दुहेरी आधारांमुळे त्याला हा ग्रंथ लिहिण्याचा अधिकार आहे. पण ह्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असं त्याला का वाटले ते मात्र मला कळत नाही. मी मनोवैद्यकाचा अभ्यासक नाही. किंवा मनोरुग्ण्ही नाही. (अशी निदान माझी समजूत आहे.) मला प्रयोगशाळेत उंदीर वापरतात तसं प्रकाशनं वापरलं असाव. म्हणजे मला मराठीतून हे पुस्तक सुबोध वाटलं तर सर्वसाधारण वाचकाला ते समजेल असा त्याचा कयास असावा. ते काहीही असो, सुरुवातीपासून अखेरपर्यंत मी हे पुस्तक उत्सुकतेनं वाचलं. मात्र प्रकाश वैद्यकाचा विद्यार्थी होता त्या काळापासून त्याचा आणि माझा स्नेह आहे. व्यवसायात असूनही त्यानं आपली अध्ययनवृत्ती ताजी ठेवली आहे. समोर येणाऱ्या रोग्याकडे केवळ अर्थोत्पादनाचे साधन म्हणून न पाहता आपल्या वैद्यकविद्येला मिळालेलं नवं आव्हान म्हणून तो पाहण्याची त्याची दृष्टी आहे. त्याच्याकडून मी त्या मनोविकारांनी पछाडलेल्या रुग्णांच्या व्यथांचा इतिहास ऐकलेला आहे त्यावरुन मी हे सांगतो. रुग्णांच्या नावांची गुप्तता ठेवून त्यानं सांगितलेल्या कथांतून प्रत्येक मनोरुग्ण हे नवं आव्हान कसं आहे याची कल्पना येते. रोगाची कारणं किती विविध असतात, त्याची वाढ निरनिराळ्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्तरावर जगणाऱ्या रुग्णांत किती निरनिराळ्या कारणांनी होते ते ऐकल्यावर आश्चर्य वाटतं. वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या जोडीला तज्ज्ञांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या ह्या विषयावरच्या ग्रंथांचं वाचन वैद्यकासारख्या व्यवसाय आणि सेवा अशा दुहेरी स्वरुपाच्या कार्यांना किती आवश्यक आहे याची जाणीव होते.

आज दुर्दैवानं वैद्यकीय व्यवसाय ही इतर वस्तूंच्या दुकानदारीसारखी दुकानदारी झाली आहे. रुग्ण हे डॉंक्टरांच्या उत्पन्नाचे साधन एवढंच मानलं जातं असं वाटायला लागलं आहे. काहींनी तर धनाढ्य देशीविदेशी औषध निर्मात्यांचे दलाल होण्यात आणि बेसुमार द्रव्य कमावण्यात स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायाची इष्ट फलश्रुती आहे असं मानलं आहे. अशा ह्या बाजारात आपल्या विषयाचे सतत अध्ययन करुन, आपल्या चिकित्सालयात येणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीची टिपणं ठेवून, त्यांची छाननी करुन मनोवैद्यकावर, जिथे खपाची खात्री नाही असा देशी भाषेत ग्रंथ लिहिण्यात वेळ घालवावा हीच मुळात कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्या ग्रंथाचं स्वागत केवळ कौतुकापोटी करावं इतका हा सामान्य खटाटोप नाही. ह्या ‘ मनाच्या गंफेत ’ ज्ञानमय प्रदीप हाती धरुन फेरफटका मारलेला आहे. अनेक अज्ञात गोष्टी अंधारातून उजेडात आणल्या आहेत. आणि ह्या मन नावाच्या अजब गुहेतली गुह्यं अतिशय साध्या भाषेत, तज्ज्ञतेचा बडेजाव न मिरवता उलगडून दाखवली आहेत. विषय कळलेला असला की भाषा आपोआप साधी होते. रोगाची कारणं, लक्षणं, त्यावरची उपाययोजना, मनोविकारांवरच्या संशोधनांची माहिती, ह्या विकाराविषयीचे गैरसमज, सामाजिक दडपणामुळे ही व्याधी लपवण्याकडे आणि योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेण्याकडे असलेली प्रवृत्ती, ह्या असल्या लपवाछ्पवीतून उदभवणारी भयानक परिस्थिती, अशा निरनिराळ्या अंगांनी प्रकाशनं ह्या शास्त्राचा परिचय करून दिला आहे.

डॉं. प्रकाशनं ह्या ग्रंथात मनोरुग्णाचा एक व्याधिग्रस्त व्यक्ती म्हणून विचार केला आहे. तसा तो सामाजिक परिस्थितीचे संस्कार घेणारा एक समष्टीतला घटक असल्यामुळे जनमनोवैद्यकाचाही ऊहापोह केला आहे. ह्या दृष्टीनं प्रस्तुत ग्रंथातलं "सामाजिक प्रश्न आणि जनमनोवैद्यक" हे प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटतं. मानसिक संतुलन बिघडायला अनेक कारणं असतात. त्यात आपल्या कुटुंबपध्दतीत आढळून येणारा सासुरवास आणि त्यातून उदभवणारी स्त्रियांच्यातली मनोरुग्णता हाही प्रकार आहे. ‘व्यसनाधीनता’ हाही मनोविकारांच्या वाढीला भरपूर प्रमाणात हातभार लावणारा प्रकार आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पना, पापाविषयींचा धार्मिक धाक हे सामाजिक घटक व्यक्तीच्या मानसिक दौर्बल्याला कारणीभूत होतात. म्हणून मनोविकारावरील उपचारयोजनेत समाजाची बुद्धिनिष्ठ चिकित्सेच्या दिशेनं वाटचाल होणं हेही अत्यंत आवश्यक आहे.

मनोव्यापाराविषयींचं योग्य शिक्षण मिळालं तर कितीतरी माणसं मनोरुग्णतेच्या अवस्थेला पोहोचण्याआधी बचावली जातील अशी हे पुस्तक वाचताना खात्री पटते. मनोव्यापारातील सर्व प्रश्नांचे उलगडे झाले आहेत असा मनोवैज्ञानिकांचा दावा नाही. मंतरलेल्या पाण्यानं किंवा अंगाऱ्या धुपाऱ्यांनी साऱ्या आधीव्याधी नष्ट करता येतात अशा प्रकारच्या किंवा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून मधुमेहापासून ते हृदयविकारापर्यंत सर्व रोगांवर विजय मिळवता येतो अशा प्रकारचा तर्कशून्य दावा विज्ञान करत नाही. विज्ञान आपल्या मर्यादा, आपल्या त्रुटी मान्य करतं. आपले सिध्दांत पुन्हा पुन्हा तपासून पाहतं आणि सत्याचा शोध चालू ठेवतं. मनाच्या गुंफेत अजूनही कितीतरी अज्ञात प्रदेश आहेत. मेंदूच्या रचनेचा आणि कार्यपद्धतीचा शोध घेण्याचं कार्य युरोपात आणि अमेरिकेत वर्षानुवर्षं चालू आहे. आजही दर महिन्याला ‘मेंदू’ या विषयावरच्या नव्या संशोधनाचे निबंध प्रसिद्ध होत असतात. अंतर्मनाची फ्रॉईडनं कार्यपद्धती शोधून काढल्यावर आणि स्वप्नांचे अन्वयार्थ लावण्याच्या रीतीवर कितीतरी साधकबाधक चर्चा झाली. मार्क्सनं साऱ्या सामाजिक अनर्थाचं मूळ हे अर्थव्यवस्थेचं संतुलन बिघडण्यात आहे हा सिद्धांत मांडून प्रचंड विचारचक्र परिवर्तन ज्याप्रमाणे घडवून आणलं त्याचप्रमाणे फ्रॉईडने लैंगिक भूक हीच मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी शक्ती असल्याचा सिद्धांत मांडून मनोरुग्णांसाठी नवीन उपचारपद्धती शोधून काढली. सारं जग हादरून टाकणाऱ्या ह्या दोन्ही सिद्धांतांचा स्वीकार वैज्ञानिकांनी आंधळेपणानं करून ते स्वस्थ राहिले नाहीत. त्यातल्या त्रुटी शोधण्याचंही कार्य त्यांनी चालू ठेवलं आहे. ज्ञानाच्या उपासनेला खंड मानवत नसतो. मेंदूच्या कार्याचं रहस्य शोधण्यासाठी चाललेले पाश्चात्त्य देशांतल्या वैद्यक शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नात येणाऱ्या अनुभवांचं लेखन केलेले ग्रंथ वाचताना आपण थक्क होऊन जातो. पण हे सारं ज्ञान इंग्रजीत आहे. आपल्या देशात इंग्रजी वाचणारांची संख्या शेकडा दोन तरी आहे की नाही याची मला शंका आहे. अशा परिस्थितीत माणसांचे जगणे रोगहीन करण्यासाठी लिहिलेले ग्रंथ त्यांना कळेल अशा भाषेत जनसमुदायापर्यंत नेऊन पोहोचविणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचं खूप चांगलं स्वागत झालं पाहिजे.

रोगाचं कारण सापडलं की रोग नव्वद टक्के बरा झाला असं समजावं. त्यासाठी मनोविकार हा सुद्धा देहविकारासारखाच विकार आहे आणि कित्येक देहविकारांचं मूळसुद्धा मनोविकारात आहे हे सूत्र लोकांच्या मनात ठसवायला हवं. साऱ्या दु:खांचं कारण ‘मन अनावर’ असल्याचं संतांनी सांगितलं आहे. पण मनाच्या त्या अनावरपणाचं विश्लेषण विज्ञाननिष्ठ वैद्यक शास्त्रज्ञांनी करून अनेक मनोरुग्णांना वेडाच्या दरीतून वर काढून जीवदान दिलं आहे. अशा ह्या शास्त्राची उत्तम ओळख करून देणार हा ग्रंथ डॉं. प्रकाश साठये यांनी मराठी वाचकांपुढे ठेवला आहे. तो वाचायला आपण स्वत: मनोरुग्ण किंवा एखाद्या मनोरुग्णाचा आप्त असायची जरुरी नाही. आपल्या स्वत:च्या मनोव्यापाराची माहिती होण्यासाठी आणि ते संतुलन न बिघडण्यासाठी घ्यायच्या खबरदारीसाठी देखील हा ग्रंथ वाचायला हवा.

ह्या विषयाला आवश्यक अशी तंत्रिक परिभाषा मराठीत रूढ झालेली नाही; त्यामुळे कानावर पडणाऱ्या इंग्रजीतील ह्या विषयाशी संबंधित असणाऱ्या शब्दांना मराठीतले प्रतिशब्द सांगणारा छोटासा पारिभाषिक शब्दकोशही ह्या संग्रहात दिलेला आहे. त्याचाही सर्वसामान्य वाचकाला लाभ होईल.

शरीर ढासळलं तरी जोपर्यंत मन ढासळलेलं नाही तोपर्यंत मनुष्य आपलं व्यक्तिमत्त्व टिकवून असतो. शहाण्यातला शहाणा, प्रकांड पंडित, कलाचतुर, उमद्या स्वभावाचा, उत्तम रसिकवृतीचा, कशाही योग्यतेचा माणूस असला तरी मनाचं संतुलन बिघडलं की तो चैतन्यहीन पालापाचोळा होऊन गेलेला असतो. म्हणूनच मन सुदृढ ठेवण्यावर संतांनीही भर दिला आहे. ‘मन करा रे निश्चल’ असा उपदेश शतकानुशतके चालू आहे. एकदा मनावरचा ताबा उडाला की माणूस आणि आवेग आवरता न येणारा पशू ह्यात फरक उरत नाही. म्हणून पुन्हा म्हणावसं वाटतं मन एव मनुष्य:। त्या मनाचे व्यापार, त्या मनाची कार्यपध्दती समजावी ह्या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. माणसाला आपण आत्महत्या का करतो आहोत हे देखील कळू नये अशा अवस्थेपर्यंत नेणाऱ्या मानसिक व्याधींच्या निरनिराळ्या प्रकारांसंबंधी माहितीपूर्ण असं हे पुस्तक मराठीतून लिहिल्याबद्दल मी प्रकाशचं अभिनंदन करतो.

पु. ल. देशपांडे
पुणे, २३-३-८६

Friday, May 15, 2009

एका गाढवाची गोष्ट

..आणि एके दिवशी कधीही कारणाशिवाय न ओरडणारे ते दोन गाढव निष्कारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळी करु लागले. चहूबाजूचे लोक धावून आले. 'अशी लाथाळी आम्ही जन्मात पाहिली नव्हती' असे जो तो म्हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जन्मभर सालसपणाने सेवा करणारे हे गाढव असे का वागताहेत? तिला काही सुचेना. येथे या गाढवांची लाथाळी चाललीच होती. त्या विवंचनेत एके दिवशी संध्याकाळी ती खिन्न मनाने गावातल्या भगिनी-समाजापुढला उकिरडा फुंकीत असताना तिला शेजारच्या कुंभाराची गाढवीण भेटली.

'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'

'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'

'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.

'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.

'पण याला उपाय काय बाई?'

'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.

'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूट आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता.

..अपुर्ण (-उरलंसुरलं)

Tuesday, March 31, 2009

पु.लं.च्या आठवणींना उजाळा

'मराठी वाचकांना आणि प्रेक्षकांना आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला लावणारा, नव्याचा स्विकार निखळपणे करायला शिकविणारा, सामान्यातील असामान्यत्व हुडकणारा माणुस म्हणजे पु.ल.देशपांडे आणि अशा या भल्या माणसाच्या आनंदोत्सावात आपण सहभागी होतो, याबद्दल स्वत:चाच हेवा वाटतो.’ पु.लं.च्या आठवणी सांगताना विजयाबाई अक्षरश: हरवुन गेल्या होत्या. जबरदस्त मित्रवर्ग लाभलेला ’अवलिया’ पण भला माणूस असलेल्या पु.लं.ना कायम आपला म्हणून जो अनुभव आहे, तो इतरांनाही जाणवून देण्याचा ध्यास होता. त्यामुळेच त्यांचा विनोद आणि लिखाण हे दोन्ही आयुष्यभर आपल्याकडे ठेवणीतला साठा जपून ठेवावा तसे टिकून आहेत.

एवढेच नव्हे तर पु.लं.चे लिखाण वाचताना नकळत ते आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. पु.लं.च्या सान्निध्यात असताना, या माणसाकडे अशी कोणती जादू आहे!’. याचं कायम अप्रूप वाटत असं सांगताना विजयाबाईंनी भावनाविवश होत पु.लं.ची एखाद्याचं कौतुक करण्याची अगर प्रोत्साहन देण्याची हुबेहुब नक्कल करुन दाखवीली, त्या वेळी प्रेक्षकही गहिवरले होते. कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याच्या पु.लं.च्या स्वभाविषयी सांगताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, विजय तेंडुलकरांनी ’घाशीराम कोतवाल’ चे केलेले पहिले वाचन ऎकल्यानंतर पु.लं. नी, हे नाटक फार मोठे असून हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर व वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. असे वारंवार बजावत प्रोत्साहन दिले. तसेच ’घाशीराम...’चा प्रयोग पाहिल्यावर, मी तुझ्यासाठी नाटक लिहायला घेतोय आणि त्याचे नाव असेल ’तीन पैशांचा तमाशा’, असं सांगून ’घाशीराम’साठी शाबासकी दिली. ’तीन पैशांचा तमाशा’चे पु.लं.नी पहिले वाचन केले, त्या वेळी हे नाटक मुंबईच्या वास्तवाशी जुळवून करु या, असे आपण सुचविताच, आता हे नाटक तुझे आहे, तुला हवे ते बदल कर, असं पु.लं. सहजपणे म्हणाले, त्यानंतर पु.लं. एकदाही नाटकाच्या तालमीला आले नाहीत. नाटकाच्या पहिला प्रयोग बघितल्यानंतर, ’आपण याला काय लिहून दिले अन्‌ याने हे काय केले?" असे भाव पु.लं.च्या चेहर्‍यावर होते. परंतु पं. वसंतराव देशपांडे आणि सी. रामचंद्र यांनी नाटकाचा बाज आणि त्यातील जाझ संगिताचे कौतुक करुन नाटक आवडल्याची पावती देताच पु.लं. खुलले...ही आठवण सांगताना जब्बार पटेलांनी, दिग्दर्शाने केलेले बदल खुलेपणाने स्विकारणारा नाटकार, अशी पु.लं.ची ओळख करुन दिली. ’देव नावाची गोष्ट कधी कधी मला कळत नाही’, असं मार्मिक विधान करणारा अतिशय मर्मग्राही भाष्यकार म्हणूनही पु.ल. मोठे होते. 

आणीबाणीच्या काळात पु.लं. नी शनवारावाड्यासमोर केलेले भाषण म्हणजे त्यांचं खरं व्यक्तीमत्व उलगडून दाखविणारं स्वगत आहे, असे जब्बार पटेल म्हणाले. ’मोठा कलावंत व्ह्यायचे असेल तर तुझ्यातल्या लहान मूलाला जप;, अशी फार मोलाची शिकवण देणारे पु.ल. स्वत:ही एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे होते, असे सांगताना प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे पदर उलगडुन दाखविले. एखाद्याची अमूक एक गोष्ट वा उपक्रम आवडला की, पु.ल. त्याला अवघडायला होईल, इतकं त्याचं कौतुक करायचे, असं सांगून प्रा. केंद्रे यांनी ’झुलवा’च्या पहिल्या प्रयोगानंतरची आठवण सांगितली नाटक बघितल्यानंतर पु.ल. दोन दिवस बोलले नाहीत. मी एनसीपीएतच त्यांच्या हाताखाली काम करायचो, त्यांच्यासमोर गेलो तरी ते माझ्याशी काही बोललेच नाहीत. त्यामुळे आपलं काही तरी चुकलं, म्हणून पार गोंधळून गेलो होतो. 

तिसर्‍या दिवशी सकाळी एनसीपीएमध्ये गेल्यावर चौकीदारापासून जो भेटेल तो, पु.लं.नी तुम्हाला तातडीने भेटायला सांगितलं आहे, असं सांगत होता, मी पु.लं,च्या पुढ्यात दाखल होताच, नाटक बघितल्यानंतर बोलता येईल याचा आत्मविश्वास मला नव्हता’, असं सांगितलं. त्या वेळी एखादा माणूस किती मोठा असू शकतो, याचं पु.लं. च्या रुपाने आपल्याला दर्शन झाल्याचे प्रा. केंद्रे म्हणाले, ते नेहमी म्हणायचे तु मला एखादी चांगली कथा सुचव, मी तुला चांगले नाटक लिहून देतो. त्यामुळे आपण एक रशियन कथा त्यांना वाचायला दिली. पु.लं. चा कथा कशी वाटली म्हणून दुसर्‍या दिवशी त्यांना विचारायला गेलो तर म्हणाले, ’कथा छानच आहे, बरोबर चार दिवसांनी मी या कथेच्या नाटकाचे वाचन करणार, तु तयार राहा.’ पु.लं.नी केवळ चार दिवसांत ’एक झुंज वार्‍याशी’ या नाटकाचे वाचन केले. ही आठवण सांगताना प्रा. केंद्रे यांनी जेव्हा असं काही केवळ पु.ल.च करु शकतात, असे उद्‌गार काढले. 

(९ नोव्हेंबर २००६ रोजी रविंद्र नाट्यमंदिर इथे झालेल्या 'पु.लं. च्या आठवणींना उजाळा' या पु.लं. च्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमातून)

Monday, February 9, 2009

अभ्यास : एक छंद

माझ्या विद्यार्थी मित्रांनो,

मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खुप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असताना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हाला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटारारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणूनच सांगतो. जरासा गबाळाच आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचे चौथे बटण तिसर्‍या काजात खुपसून तिसर्‍या बटनाला वार्‍यावरच सोडलं आहे.

पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलताना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलचं आहे, की वेश असवा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत. तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी असाव्या नाना कळा' हे समर्थाचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे.

तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऍंटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करून म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळ्या कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी....मी काय सांगणार आहे ते ऎकाल का? अशी विनंती करण्य़ासाठी म्हणतो आहे-- माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या.

खरं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहीजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोललो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय? पुस्तकांतून तुमच्याशी बोलणंच की नाही? माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळ्या विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, सानेगुरुजी बोलतात, जोतीबा फुले, टिळक, आगरकर, हरी नारायण आपटे, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवतं कादंबरीकार, नाटककार , कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्युसुद्धा थांबवु शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा.

परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खूप हौसेनं देतो आहे. अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरू होनार नाही.

एखादी कविता तुम्ही वाचत असताना एकदम म्हणता की नाही 'वा ! वा ! काय छान आहे ही ओळ !' एखादी विनोदी कथा वाचताना खुदकन हसता की नाही? अशा वेळी आई विचारत असते, 'काय रे मधू, एकट्यानंच हसायला काय झालं?' त्या वेळी आपण वरवर पाहणार्‍याला एकटेच आहोत असे वाटत असतं; पण आपण एकटे असतो काय? आपल्याशी चिं.वि.जोश्यांचे चिमणराव बोलत असतात. गडकर्‍यांचे बाळकराम ठकीच्या लग्नाची कथा सांगत असतात. आईला बिचारिला कसं कळणार, की तुम्ही त्या वेळी थोर विनोदी लेखकाशी कानगोष्टी चालवल्या आहेत ते?

नव्या सत्राच्या आरंभी तुम्हांला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भूगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय, कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक अगीचच तुम्हांला परिक्षेची भीती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखी तुम्हांला वाटेल.

पोहता न येणार्‍या मुलांना पाण्याची भीती वाटते; पण एकदा पाण्याशी मैत्री केली, ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवे तितका वेळ उचलून धरतं हे कळलं, की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही? सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी. पुस्तकांचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळतच नाही. अशा वेळी नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणार्‍या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.

मी कशाचा अनंद म्हणालो ? ज्ञानाचा आनंद नाही का ? तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा! आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद! मग तो एखाद्या यापूर्वी की न ऎकलेल्या शब्दाचा असेल../ न सुटणारं गणित सुटल्यावर होणार असेल किंवा एखाद्या संगितातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल.

तुम्ही सगळे विद्यार्थी आहात नाही का? विद्यार्थी म्हणजे तरी काय? विद्‌ म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणून त्याला विद्यार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हालवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात.

या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणी जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला देखील ट्यॅं... ट्यॅं... असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरूजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात.आता तुम्हांला एखादी नवीन माहिती नेमकी कळली, की कळली नाही हे त्यांना कसं कळायचं? आपल्यापरीनं ते तुम्हांला वर्गात शिकवून सांगतात. मध्येच प्रश्न विचारतात. तुमच्या उत्तरावरुन त्यांना कळतं, की तुम्हांला नीट कळलयं की नाही ते; पण एवढ्या मोठ्या वर्गात सगळ्यांनाच प्रश्न विचारणं शक्य नसतं. अशा वेळी 'गुरुजी मला कळलं नाही' हे सांगण्याचं तुमच्यात धैर्य पाहिजे.

'अज्ञान' असणं यात काहीही चूक नाही; पण 'अज्ञान' लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषत: कळण्याची इच्छा मनात बाळगुन येणारया तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी 'आपल्याला कळलं नाही' हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्युटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना, की वाळवंटातल्या एका वाळूच्या कणाएवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा-आम्हांला कसली लाज ! आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंत कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो आणि चांगले शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नाही; पण मी ग्रंथालयातून या विषयावर लिहिलेली पुस्तकं वाचून तुला उद्या उत्तर सांगेन.' विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात.

तसं पाहायला गेलं तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळ्यांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का? हे जग इतक्या अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षींसुद्धा विद्यार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला? अहमदजान तिरखवॉंसाहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा-दहा, पंधरा=पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो. "खॉंसाहेब तुम्हांला कंटाळा येतो का?" नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत.

सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागलात, की तो अभ्यास हासुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हांला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं. की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हांला वाटलं, इंग्लिश आपल्याला आवडत नाही. फार अवघड आहे. मग तोच विषय पकडा. बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या... त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरून जा. शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले, की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात, तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे.

तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय? त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता? किंवा हाताशीच जमवता? तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता नुसत्याच आपल्या चपल्या पाठवल्या तर चालेल तुम्हांला? नाही चालणार. तो संपूर्णपणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलाशी तुम्ही दोस्तीच केली नाही म्हणण्यासारखं आहे.

हल्ली मुलींना गृहशास्त्र हा विषय असतो. त्यात भात-भाजी-वरण-पोळी-चटणी वगैरे स्वयंपाक करायचं शिक्षण असतं. आता गृहशास्त्रातली एखादी मुलगी म्हणाली, की १०० पैकी ३५ गुणांना पास ना, मग मी आपली नुसतचं वरण आणि चटणी करायचं शिकेन. म्हणजे वरणाचे पंचवीस आणि चटणीचे दहा मिळाले की पास; पण मग ती पुढे तिच्या घरी पाहुणे येतील, त्यांना काय वरण आणि चटणी वाढून 'हं, करा जेवायला सुरुवात; म्हणणार?

तुम्हांला नेमलेलं नवीन पुस्तक आलं, की खरं तर कळो ते अधाशासारखं वाचून काडःअलं पाहिजे. एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हांला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्ही वाचायला हव्यात. आईने बशीत एकच करंजी दिली, की बाकिच्या करंज्या कुठल्या डब्यात ठेवल्या आहेत, ते हळुच पाहून ठेवता ना तुम्ही? मग एक कविता आवडली, की बाकीच्या कुठल्या पुस्तकात असतील हे शोधुन काढायला काय हरकत आहे?

तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकीटं गोळा करायचा, काड्याच्या पेट्यांवरची चित्र गोळा करायचा छंद असतो. अभ्यास हासुद्धा छंद झाला पाहिजे, तरच शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल. अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखंच आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण. ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं, हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे.

हिमालयाचं शिखर चढून जाणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकानं विचारलं, "का हो, इतकी उंच शिखरं पाहून तुमची छाती दडपून जात नाही का? इतक्या उंच आपण कसं काय चढणार बुवा, या विचारानं तुम्हांला भीती वाटत नाही का?" तो म्हणाला, "पण मी कधी शिखराकडे पाहतच नाही. मी एक पाऊल टाकलं की दुसरं कुठं टाकायचं ते पाहतो. हातातल्या नकाशावर माझं लक्ष असतं. होकायंत्रावर दिशा पाहतो. एक पाऊल चढलो की म्हणतो, शिखर एक पाऊल आलं जवळ आणि असं करता करता माझ्या लक्षात येतं, आलं शिखर!"

पुस्तकातल्या पानांचं तसंच आहे. कसलाही विषय असो. त्या पानांत संपूर्णपणे घुसा... एकेका-एकेका ओळीत काय मजा आहे ते पाहत चला... अडलात एखाद्या ठिकाणी की ठरवा. उद्या हे गुरुजींना विचारायचं. घरात कुणी वडील माणूस अस्लं तर त्यांना विचारा. आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या एखाद्या अभ्यासात आनंद वाटणाऱ्या मुलाशी दोस्ती करा. तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही, की पुस्तकाचं शिखर तुम्ही केव्हा गाठलंत. ते तुम्हीच आठवा बरं.--गेल्या वर्षी खालच्या इयत्तेत असताना तुम्हांला कठीण वाटलेलं गणित आता किती सोपं वाटतं ते. असंच पायरी-पायरीनं चढत जायचं असतं.

इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकीटासारखा एक-एक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा आल्बल जसा तुम्ही पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात, की पाहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सपिअर, डिकन्स, बर्नाड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक, पत्र-मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ-मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भुगोलाची आणि इतर विषयांची.

एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्यापुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासुन ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परिक्षा हा त्या सगळ्या मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे, असा जगाला दाखवुन देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा... ही तुम्हां सर्वांना शुभेच्छा.