१९९९ मधला नोव्हेंबर महिना..
तेव्हा मी गोदरेज-जीई अप्लायन्सेस मध्ये कामाला होतो. तिथला माझा सहकारी विक्रम भोपटकर, (माझ्यासारखाच पुलंचा वेडा चाहता) मला एकदा बसमध्ये म्हणाला (त्यावेळी पुणे ते गोदरेज - शिरवळ, बस ने ये-जा करत असू), पुलंना भेटायची खूप इच्छा आहे रे. त्यांचा ८ नोव्हेंबर ला वाढदिवस आहे. त्याला विचारलं तुला खरंच भेटायचंय? हो म्हणाला.. ठीक आहे.. मी करतो व्यवस्था. (अस्मादिक), कशी काय?.. तो
मी घरी पोहोचल्यावर टेलिफोन डिरेक्टरी मधून पुलंचा घरचा नंबर शोधून काढला.. आणि थेट फोन लावला..
स्वतः सुनीताताई देशपांडेंनी माझा कॉल घेतला..
मी - नमस्कार.. मी शशी करंदीकर, उद्या पुलंचा वाढदिवस आहे, त्यांना भेटायची इच्छा आहे.. कधी आलं तर चालेल?
सुनीताताई - तुम्ही पुण्यात राहता ना? मग एक काम करा, उद्या यायच्या ऐवजी तुम्ही १२ तारखेला या म्हणजे तुम्हाला शांतपणे त्यांना भेटता येईल. उद्या खूप गर्दी असेल त्यामुळे तुम्हाला नीट भेटता येणार नाही.
मी - चालेल.. परत कॉल करू का?
सुनीताताई - हो ११ तारखेला मला कॉल करा आणि आजच्या संभाषणाचा संदर्भ द्या म्हणजे मला चटकन कळेल.
मी - ठीक आहे. अच्छा
७ नोव्हेंबर पासून ११ नोव्हेंबर पर्यंतचा काळ जाता जात नव्हता.. शेवटी ती ११ तारीख उजाडली आणि पुन्हा नव्या उत्साहाने सुनीताताईंना कॉल केला.
मी - नमस्कार, मी शशी करंदीकर. आपले ७ तारखेला बोलणे झाले होते पुलं ना भेटण्यासंदर्भात.. आपण मला त्यांना उद्या भेटायला या असे सुचविले होते..
सुनीताताई - हो हो आहे लक्षात.. या तुम्ही उद्या.. ७ ~ साडेसात पर्यंत या
मी - एक छोटासा प्रॉब्लेम आहे.. मी शिरवळहून बस ने येणार.. ट्रॅफिकमुळे उशीर होऊ शकतो..
सुनीताताई - हरकत नाही, पण शक्यतोवर लवकर येण्याचा प्रयत्न करा..त्यांना फार वेळ जागं ठेवता येत नाही.
मी - नक्की अच्छा
विक्रम ला हि बातमी दिली आणि तो माझ्यावर प्रचंड खुश झाला..
*१२ नोव्हेंबर १९९९*
ह्याच दिवशी सकाळच्या सुमारास माझी मैत्रीण सोनाली अधिकारी हिचा कॉल आला.. "आज माझ्या "वाऱ्यावरची वरात" नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे बालगंधर्व ला, तू येतोयस"..(ती त्या नाटकात कडवेकरमामींची भूमिका करत होती). किती छान योगायोग आहे असा विचार करून तिलाही सोबत न्यायचे ठरवले.. तिला हे समजल्यावर तीही प्रचंड खुश झाली कारण तीसुद्धा त्यांना पहिल्यांदाच भेटणार होती..
शेवटी भेटीची वेळ ठरली आणि आम्ही भांडारकर रोड वरच्या "मालती-माधव' बिल्डिंगमधल्या त्यांच्या घरी वेळेत पोहोचलो..
घराचा दरवाजा स्वतः सुनीताताईंनी उघडला.. आणि आमचं स्वागत इतक्या अगत्यपूर्वक केलं की जसे काही आमचा वर्षानुवर्ष परिचय आहे. घरात प्रवेश करताच एक विशेष समाधान लाभले.. स्वतः सुनीताताई आमच्यासाठी खाऊ आणि पाणी घेऊन आल्या.. आम्हाला कुठलेही अवघडलेपण येणार नाही याची विशेष दक्षता त्या घेत होत्या आणि आम्ही सर्व मनातल्या मनात, "आपण कित्ती भाग्यवान आहोत" याचाच विचार करीत आमचं म्हणजे कधी एकदा पुलंना भेटतोय असं झालं होतं.. आणि इतक्यात, व्हीलचेअरवरून सुनीताताई पुलंना दिवाणखान्यात घेऊन आल्या.. देवाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार त्याक्षणी झाला. मी सोफ्यावर बसलो होतो तो ताडकन उठून त्यांच्या पायाशी बसलो. सुरवातीला काही क्षण वाक्य जुळवण्यात गेली.. आणि मनाचा हिय्या करून प्रत्येकाची ओळख करून दिली.. सोनालीची विशेष ओळख करून दिली कारण ती त्यांच्या नाटकात काम करत होती. तिनेही त्यांना वाकून नमस्कार केला आणि तिने तिच्या शुभारंभाच्या प्रयोगाला साक्षात पुलंचा आशीर्वाद घेतला.. मग मी माझ्याविषयी सांगताना, माझ्या आजोबांबद्दल विषय काढला.. दोघेही कलाप्रांतातले.. मी म्हंटलं, कि आपल्या भारतातल्या पहिल्या बोलपटाचे "आलमआरा" चे कॅमेरामन माझे आजोबा होते.. ते विशेष बोलत नव्हते पण माझ्याशी काही वाक्य बोलले.. त्यांनी नाव विचारल्यावर मी सांगितले, अनंत परशुराम करंदीकर.. त्यावर चटकन पुलं म्हणाले.. हां हां बरोबर ती त्रयी होती.. करंदीकर दिवेकर आणि पाटणकर.. पुलंच्या त्या अवस्थेतही त्यांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे हे बघून आम्ही सर्वच अचंबित झालो होतो.. त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना असल्यामुळे, त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही ह्या उद्देशाने आम्ही आमची भेट १५ ते २० मिनिटात एक फोटो सेशन करून आटोपती घेतली . ती २० मिनिटं आमच्यापैकी कोणीही विसरणं शक्य नाही.. खरोखर धन्य ते पुलं.. त्यांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन!
-शशी करंदीकर
0 प्रतिक्रिया:
Post a Comment