Thursday, January 20, 2022

माझे खाद्यजीवन (काही उतारे )

"एका जुनाट घरातले स्वैपाकघर आहे. काळोखे. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे. एके काळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भुक आहे. डोळ्यांत निज आहे. दारातून वाकून वडील आत येत आहेत. ते काहितरी गुण-गुणताहेत. पलिकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्यॅ ट्यॅ करुन रडणे आणि बोलणे ह्यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढत आहे. इतक्यात निखार्‍यावर टाकलेल्या पापडांचा वास येतो. झोप उडाल्यागत होते. पोटाची मागणी वाढते. "झालं हं---" म्हणून आई तो चिमटीत धरुन फू~~ फू~~ करते. वडील शेजारच्या पाटावर बसतात. इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते. पळीतून अंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण सार्‍या घराचा ताबा घेते. झोप पळते. पोटात रणकंदन सुरू होते. चुलीच्या एका बाजुला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोरा-चतकोराने पानात पडतात. "आज काय शिकवलं रे मास्तरांनी?" ओट्यावर नित्यनियमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात आणि गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या खमगं वास घश्यात अडकतो.

----
मी शाकाहाराचा भोक्ता आहे, तसाच स्वाहाकाराचा! मला तळलेले निषिद्ध नाही, पोळलेले नाही. लाटलेले (दुसऱ्याचे नव्हे, पोळपाटावर) नाही, वाटलेले नाही. ऊन-ऊन भात, वरण, लिंबू, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, चटणी, चांगले ताक हा मेनू मला जितका प्रिय, तितकीच 'तिरफळ' घालून केलेली बांगड्याची लालभडक आमटी, भात आणि खोबरेल तेलाचे बोट लावलेला पापड, सोलाची कढी! मात्र दुसऱ्या मेनूनंतर नुकत्याच फोडलेल्या नारळाची कातळी हवी, आणि पहिल्या मेनूनंतर पान हवे. भारतीय संस्कृतीबद्दलचा माझा आदर दर सणामागल्या पक्वान्नातून (ताटाबाहेर) सांडतो. होळीच्या पोळीची चव रामनवमीला नाही. रामनवमीचा सुंठवडा कृष्णजन्माला पटत नाही. बुंदीचा लाडू दिवाळीला चालतो, तसा दसऱ्याला चालवून पाहावा! आणि भुसभुशीत मोतीचूर लाडवावर माझी श्रद्धा नाही. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे. अनारशावर आणि चिरोट्यावर मात्र माझी अजिबात भक्ती नाही. अनारशाला काही 'कॕरेक्टर'च नाही. अनारशामागे कोणतीच संस्कृती उभी नाही. आणि चिरोटा? कुण्या पुस्तकी सुगरिणीचा घरी करायला घेतलेल्या खाऱ्या बिस्किटांचा साचा मीठ घालायला विसरून बिघडला,आणि ते पीठ थापून त्याच्यावर साखरपेरणीची मखलाशी करून बिस्किटाऐवजी चिरोटा म्हणून तिने नवऱ्याला बनवले.

खाद्यांचेदेखील एक खानदान आहे. ह्या खानदानाचा ते पदार्थ तिखट-गोड किंवा आंबट-तुरट असण्याशी काही संबंध नाही. चकलीला खानदान नाही. ती उपरी आहे. तिच्याभोवती वातावरण नाही. ती खुसखुशीत असो, अरळ झालेली असो, पण तिला आपला असा स्वभाव नाही. नुसतीच तुकडेमोड आहे. पण कडबोळ्याला मात्र कूळ आहे. उद्या पदार्थांच्या जातीच करायच्या ठरविल्या, तर कडबोळे हे देशस्थ वैष्णव कुळीचे, कानडी उच्चाराने मराठी बोलणारे आहे म्हणावे लागेल, तर चकली आंतरजातीय विवाहातून जन्मलेले अपत्य आहे. कारवारकडे कडबोळ्याचेच दोन वळसे कमी करून मुदी करतात. कारवारीत मुदी म्हणजे अंगठी. चकली भानगडगल्लीतली, तसा चिवडाही. पण चिवड्यात अठरापगड गोष्टी असून त्याच्या भोवती मित्रमंडळीच्या अड्ड्याचे कुंपण आहे. मात्र चिवडा हा एकट्याने खाण्याचा पदार्थ नव्हे. चिवड्याची चव खाणाऱ्यांच्या संख्येने गुणले असता वाढते! पण चिवड्यातला अत्यंत चविष्ट भाग तळाशी उरलेले तिखट-मीठ इतरांची नजर चुकवून तर्जनीने चेपून ती जीभेवर दाबल्यावर कळतो. ह्याला धैर्य लागते! चिवड्याचे मूळ स्वरूप म्हणजे भत्ता. ह्याला मजूर-चळवळीच्या प्रथम चरणात 'लेनिन मिक्श्चर' म्हणत असत. म्हणजे भोवती मार्क्सवादी गप्पा सुरू झाल्या की भत्त्याचे लेनिन मिक्श्चर होत असे! कुरमुरे, डाळ, दाणे, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर, मिरच्या आणि उघड्यावर गप्पा! चारचौघांत जो ओतला की "अरे बाप रे! एवढं हे कोण संपवणार?" असा सार्वजनिक उद्गार निघून ज्याचा शेवट रिकाम्या कागदाखाली पडलेला शेंगदाणा हळूच उचलून तोंडात टाकण्यावर होतो, तो खरा भत्ता!

----
महाराष्ट्रातल्या चारी वर्णांनी आणि सार्‍या जाती-जमातींनी जर एकमताने मान्य केलेली गोष्ट कुठली असेल, तर पुरणपोळी ! हीसुद्धा जसजशी अधिक शिळी होत जाते, तसतशी तिची चव वाढते. ती दुधाबरोबर खावी, तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी. महाराष्ट्राच्या सीमा ठरविताना पुरणपोळीचा निकष वापरायला पाहिजे होता. मात्र हे नाजूक हाताचे काम नव्हे. चांगल्या पुरणपोळीला चांगले तीस-पस्तीस वर्षांचे तव्याचे चटके खाल्लेला हात हवा. म्हणूनच आज्जीने केलेल्या पुरणाच्या पोळीची सर आईच्या हाताला येत नाही; पत्नीच्या तर नाहीच नाही. वडीलधार्‍यांनी ती करावी आणि लहानांनी खावी !

----
भेळ, मिसळ आणि उसळ ह्या ’ळ’-कारान्त चिजांनी जिभेचा चावटपणा खुप वाढवला. इथे ’चावट’पणा हा शब्द गौरवार्थी आहे. कारण चावट हा शब्दच मुळी ’चव’ ह्या धातूचे लडिवाळ स्वरूप आहे. चविष्ठ --> चविट्ट --> चावट्ट आणि चावट ! ह्या शब्दाचा चावण्याशी काही संबंध नाही. बेचव शब्दपंडितांनी तो जोडला आहे.

----
माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे. चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे. आदिमानव मिळेल त्यावर चरला. पुढे तो सुधारला आणि चरता चरता दुसरयाला चारू लागला. त्यानंतर फारच सुधारला तेंव्हा इतरांचे चोरून स्वतः चरू लागला. मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे, आणि चोरणे ह्या चकारी बाराखडीतून होत होत ' चम-' चः ' पर्यंत आली आहे.

----
माझी सुखाची कल्पना एकच आहे. आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी. सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी. ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे. आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा. दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी. आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे. मस्त पान जमावे. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्यासारखा फिरायला देखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी देखील घेऊन देतो!

--
माझे खाद्यजीवन
हसवणूक
पु. ल. देशपांडे