Friday, June 28, 2024

शाहूमहाराज - आकाशाएवढा मोठा राजा

.....'संस्थानिक' ह्या कल्पनेला चांगल्या अर्थाने तडा देणारी जर कुणा एका संस्थानिकाची कथा माझ्या कानावर माझ्या लहानपणी पडली असेल तर ती कोल्हापूरच्या शाहूमहाराजांची. त्याला कारण होते. माझे आजोबा कोल्हापूर संस्थानात भाग-कारकून नावाच्या महिना तीनचार रुपयांचे वेतन मिळवायच्या हुद्द्यावर होते. 'करवीर दरबारातली नोकरी' असा ह्या नोकरीचा प्रौढ भाषेतला उल्लेख असायचा. माझ्या वडिलांचा जन्म आणि शिक्षण कोल्हापूरला. माझ्या आत्या कोल्हापूरच्या आसपासच्या एकदोन खेड्यांतल्या कुटुंबांत दिलेल्या. त्यामुळे 'कोल्हापूर 'विषयी मनात ओढ होती. अशा काळात मला माझ्या आत्याबाईने शाहूमहाराज आपल्या संस्थानातल्या एका शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याच्याबरोबर भाकर खायला बसले होते ही कथा सांगितली होती.. माझ्या लहानपणी कोल्हापूर संस्थानातल्याच एका खेड्यात शेती करणाऱ्या माझ्या आत्याने सांगितलेल्या कथेतले शाहूमहाराज हे खेड्यातल्या पारावर बसून फिरत्या चिलमीच्या लयीत रंगणाऱ्या कथांतले लोकप्रिय कथानायक होते. उत्तुरजवळच्या त्या माझ्या आत्याच्या खेड्यातले सुट्टीच्या दिवसांतले माझे मुक्काम मला खूप आठवतात.

'शाहूम्हाराजांच्या वख्ताला' असा पीस जोडून महाराजांच्या कथा उलगडणारी बरीचशी मंडळी आता देवाघरी गेली. त्या कथांत त्यांच्या शिकारींच्या शौर्याच्या कथा असत. गोरगरिबाच्या दारात न सांगता दत्त म्हणून उभे राहण्याच्या असत. खेड्यातल्या गरीब माणसाचे दुःख महाराजांनी जातीने लक्ष घालून कसे दूर केले ह्याच्या असत. 'कुणा स्नेह्याच्या लग्नाच्या पंक्तीत भज्यांचा हाराच्या हारा कसा फस्त केला' यासारखी त्या भज्यांची संख्या मनसोक्त वाढवून सांगितलेली कथा असे. जुलमी अधिकाऱ्यांची फटफजिती कशी केली याच्या कथा असत. आणि "आता त्ये समदं ग्येलं म्हनाना..." असे सुस्काऱ्याच्या साथीतले भरतवाक्य असे. ह्या साऱ्या कथांतून शाहूमहाराजांचे एक मोठे लोभसवाणे चित्र डोळ्यांपुढे रंगत असायचे. असला धिप्पाड राजा आपल्याला बघायला मिळायला हवा होता असे वाटे. त्या कथांतून दिसणाऱ्या लोभसवाणे- पणाबरोबर एका थट्टेखोर काहीशा खट्याळ पण चेष्टा करता करता फार मोठा शहाणपणा शिकवणाऱ्या राजाचे चित्रही डोळ्यांपुढे उभे राही. देहाच्या धिप्पाडपणासारखा मनाचाही धिप्पाडपणा दिसे. वाढत्या वयाबरोबर वाचनही वाढले. स्वातंत्र्याच्या चळवळी डोळ्यांपुढे चाललेल्या असताना त्यांतला संस्थानिकांचा वाटा फारसा अभिमानास्पद नव्हता हेही दिसायला लागले. पण त्याबरोबर औंधचे महाराज, सयाजीराव गायकवाड, शाहू छत्रपती यांची चित्रे त्या इतर संस्थानिकांशी मिळतीजुळती नाहीत हे ध्यानात यायला लागले. औंध किंवा बडोदे ह्या संस्थानांशी माझे काही नाते नव्हते, पण कोल्हापूरशी होते. त्यामुळे तसे काही खास कारण नसूनही ह्या राजाविषयीचे कुतूहल वाढीला लागले. 'शेतकऱ्याच्या झोपडीपाशी जाऊन त्याच्या चुलीवरची भाकर खाऊन ढेकर देणारा राजा' ह्या प्रतिमेने मनात घर केले होते. ते आजतागायत तसेच आहे. त्यानंतर शाहूमहाराजांविषयी खूप वाचायला मिळाले आणि दिवसेदिवस ही प्रतिमा उज्ज्वलच होत गेली.
    
माझ्या सुदैवाने मी जिथे धर्म-जाती असला भेदाभेद नाही अशा कुटुंबात वाढलो. आमच्या आप्तमंडळीत जरी देवाधर्माचे महत्त्व असले तरी माझ्या घरी देवबाप्पांचे फारसे लाड झाले नाहीत. पूजेचे भटजी येऊन एखादे धर्मकृत्य करताहेत हे दृश्य मी माझ्या बालवयात क्वचित पाहिले असेल. पुढे घरात गणपतिबाप्पा आले तरी त्यांच्या पूजेला भटजीबुवा आले नाहीत. माझ्या वडलांच्या निधनानंतर तर श्राद्धपक्ष वगैरेही आम्ही केले नाही. अशा वेळी समान विचाराच्या शोधात मन हिंडत असतानाच बुद्धीला न पटणाऱ्या ह्या रूढीविरुद्ध जे निबंध किंवा ग्रंथ लिहिले गेले, असल्या बंडखोरांची जी चरित्रे वाचली त्यांतून जन्मजात श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्याच्या प्रवृत्तीची चीडच येत गेली, मग ते श्रेष्ठत्व मानणारा ब्राह्मण असो की क्षत्रिय असो. मला आपण अमुक गोत्री ब्राह्मण आहे हे सांगणारा माणूस जितका हास्यास्पद वाटतो तितकाच आपण शहाण्णवकुळी असल्याचा अभिमान मिरवणारा मराठाही हास्यास्पद वाटतो. आणि ही रूढी मोडायला निघालेला प्रत्येक माणूस माझा वाटतो. शाहूमहाराजां- विषयीचे माझे 'माझेपण' त्यांच्या ह्या जन्मजात वर्चस्वाला ठोकरण्याच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा जो मला इतिहास वाचायला मिळाला त्यातून निर्माण झाले आहे. शाहूमहाराज 'हा किती मोठा राजा होता त्यापेक्षा किती मोठा माणूस होता हे पाहणे मनाला आनंद देणारे आहे.

......
ज्योतिबा फुल्यांनी 'सार्वजनिक सत्य' नावाचा सुंदर विचार सांगितला आहे: देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते. गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही. रयतेच्या पोरांना मुन्शिपालटीची काळोखी शाळा आणि व्यक्तिगत श्रीमंतीच्या बळावर दोघाचौघांच्या पोरांसाठी अद्ययावत ज्ञानसाधनांनी युक्त अशी विद्यालये ही समाजाला सार्वजनिक बौद्धिक श्रीमंती न देता पुन्हा एकदा सत्तेच्या नव्या सोयी करून देणारा नवा ब्राह्मणच निर्माण करतील. एकाच लोकशाहीत पुन्हा एकदा बडे लोक आणि छोटे लोक असे घटक तयार होतील आपल्या योजनांचा हा असा बोजवारा का उडावा ?

मला याचे एकच कारण दिसते. ते म्हणजे ह्या सर्व कार्यामागे मला कुठे अंतःकरणाचा ओलावा दिसत नाही. ह्या योजना करणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे तो पटकुरे नेसलेला माणूस येत नाही. ह्या साऱ्या योजना कागदावर होतात आणि कागदासारख्या कोरड्या राहतात. ही केवळ आकडेबाजांची हातचलाखी होते. शहरांत हजारो स्त्रीपुरुष भर रस्त्यात शौचाला बसताना दिसतात, हजारो पोरे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून पावांचे तुकडे शोधताना आढळतात. ह्या दृश्याने अंतःकरण द्रवून अस्वस्थ होणारे लोकनियुक्त प्रतिनिधी अभावानेच आढळतात. माणसांना किड्यांसारखे जगायला लावणारी झोपडपट्टी हा त्यांना लोकशाहीचा अपमान वाटत नाही. हरिजन स्त्रियांवरील अत्याचारांची सत्ताधीशांच्या मनाला जखम होत नाही. फक्त चौकशीची कायदेशीर भाषा ऐकू येते. रॉकेलच्या रांगा पाहून स्वतःला मंत्री, जिल्हा- परिषदेचा अध्यक्ष वगैरे म्हणवून घेताना खेद वाटत नाही. सकाळी शिवाजीमहाराजांचा उत्सव आणि रात्री 'ओबेराय शेरेटन' मध्ये जागतिक सौंदर्यस्पर्धा ह्या दोन्ही कार्यक्रमांना आमचे लोकनेते निर्लेप मनाने जातात. अशा वेळी सर्व स्पृश्य समाजाच्या तथाकथित धार्मिक भावना टाचेखाली तुडवून अस्पृश्याने उघडलेल्या हॉटेलात चहा प्यायला जाणारा हा राजा, राजा म्हणून आणि माणूस म्हणून आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो. ह्या थोर माणसाने भारतीय समाजाच्या अभ्युत्थानातले अग्रक्रम नेमके ओळखले होते. सरंजामशाही संस्कारांत वाढलेला हा राजा लोकशाहीच्या उभारणीची बीजे पेरत होता आणि आमचे लोकशाहीतले राजे आणि राण्या भाडोत्री गर्दी जमवून स्वतःवर पुष्पवृष्ट्या करून घेताना भुकेल्या जिवांचे आक्रोश आपल्या कानी पडू नयेत याची खबरदारी घेताना दिसतात.

महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ, असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. 'उपभोगशून्य स्वामी' ह्यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदा- वली नाही. शाहूमहाराजांच्या पुण्यस्मरणाच्या वेळी आमचे लोकनियुक्त सत्ताधीश 'उपभोगशून्य स्वामी' हे बिरूद मोलाचे मानून स्वतःच्या आचरणाने ते सिद्ध करण्याची ज्या दिवशी प्रतिज्ञा घेतील त्या वेळीच असल्या शतसांवत्सरिक उत्सवाला काही अर्थ येईल. एरवी उत्सवप्रिय भारतात आणखी एक उत्सव साजरा झाला याहून त्याला काहीही महत्त्व राहणार नाही. ही प्रतिज्ञा कोल्हापुरात घेतली गेली तर त्या नगरीशी जुळलेल्या माझ्या बालपणा- पासूनच्या ऋणानुबंधामुळे मला अधिक गोड वाटेल. चांगल्या कार्याचा आरंभ कुठेही झाला तरी चांगला हे खरेच, पण आपल्या गावी झाला ह्याचा अभिमान वाटला तर ते चूक नाही !

(अपूर्ण)
लेख - शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस
पुस्तक - मैत्र
लेखक - पु. ल. देशपांडे
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवा.

0 प्रतिक्रिया: