Tuesday, June 11, 2019

जाल्मिकीचे लोक-रामायण (गोळाबेरीज)

हा लेख ‘पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री अमोल लोखंडे ह्यांचे मनपुर्वक आभार!!

काळ बदलतो आहे. त्याबरोबर सर्वांनी बदलले पाहिजे. एक काळ असा होता की सूर्य वेळेवर उगवत असे, हिमालयदेखील बराचसा उंच होता, हवादेखील थंड प्रदेशात थंड व उष्ण प्रदेशात उष्ण होती. काळ बदलला. एका खोलीत मनस्वी उकाडा तर दुसरीत थंडी हा चमत्कार आपण मोठमोठ्या शहरातून पाहू लागलो. हे पूर्वी नव्हते. पूर्वीच्या काव्यांतून वसंत आणि कोकिळा नियमितपणे येत-जात. हल्ली दोघांचाही पत्ता नाही. प्रत्यक्ष सूर्योदयापेक्षाही अधिक शोभिवंत सूर्योदय रंगीत चित्रपटांत दाखवून आपण निसर्गाचे नाक ठेचले. पूर्वी कविता कळत असे; हल्लीजे कळते ते काव्यच काय पण वाङ्मयच नव्हे, असा सिद्धांत आपण स्वीकारला. पूर्वी स्वप्नात राज्ये दान दिल्याचे पाहून खरोखरीच दुस-या दिवशी स्वप्नातला बोल खरा करण्याचा मूर्खपणा करणारे राजे होते. हल्ली दिवसाढवळ्या दोन्ही डोळे उघडे ठेवून दिलेला बोल खरा करणारा इसम स्वप्नातदेखील आढळणार नाही. काळ बदलतो आहे, आपण बदलले पाहिजे. सारे काही बदलवले पाहिजे- त्यातल्या त्यात जुने वाङ्ममय; कारण ते प्रतिगामी आहे. त्यात सत्याचा आग्रह न धरता खरे बोलणारे हरिश्चंद्र आहेत. ‘नॅशनल इंटरेस्ट’ न पाहता काका मामांशी लढाई करणारे कृष्णार्जुन आहेत. काळ बदलतो आहे. जुन्या काळात अफजुलखानाला हिंसात्मक पद्धतीने मारणारे शिवाजी आहेत; अहमद बंगशाला बुंदेलखंडाचे खंडदान न करता बाजीरावाच्या मदतीने पिटाळून लावणारे छत्रसाल आहेत. इंग्रजांची पाहुणे म्हणून सोय न करता भारताचा अतिथिधर्म बुडवणारे क्रांतिकारक आहेत.

तात्पर्य, काळ बदलतो आहे आणि त्याबरोबर आपण बदलले पाहिजे. याची रुखरूख सर्वाच्या मनाला सारखी लागली पाहिजे.

जाल्मिकीने सारेच बदलविले!

आपल्या सुदैवाने अशी रुखरूख लागलेली माणसे आपणांमध्ये हयात आहेत; आणि जाल्मिकीचे ‘लोक-रामायण' हा त्याचा पुरावा आमच्या हाती आला आहे. आजवर आपण वाल्मिकीचे प्रतिगामी रामायण वाचीत आलो. तुलसीदासाचे रामायण तर इथूनतिथून भक्ती नावाच्या एका प्रतिगामी रसाने भरलेले. मोरोपंतांनी (हा गृहस्थ स्वतःला कवी म्हणवीत असे) एकशेआठ रामायणे लिहिल्याची कथा आहे. तामील भाषेत कंबु-रामायण नावाचा असाच एक प्रतिगामी प्रकार आहे. ही सर्व रामायणे देशातील फुटीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणगी आहेत हे सिद्ध झाले आहे. जुन्या रामायणात आता काही राम उरला नाही. त्यात मूलभूत फरक करण्याचा काळ आता आला आहे. हे नवे रामायण लिहिणारा लोककवी आपल्यात अवतरला हे रामाचे भाग्य!

‘लोक-रामायण' ह्या अलौकिक ग्रंथाचा जनक (सीतेच्या बापाशी ह्या जनकाचा संबंध नाही.) जाल्मिकी' ह्याचा परिचय करून देणे आवश्यक आहे. जाल्मिकी'चे मूळ नाव सांगणे अवघड आहे. पाळण्यात त्याचे नाव जनार्दन असे ठेवल्याबरोबर बालकाने ‘नाव बदला’ असा आक्रोश केल्याची कथा आहे. बारा दिवसांच्या बालकाची ही कथा असल्यामुळे तिला ‘दंत'-कथा म्हणणे शक्य नाही. सुदैवाने बदलापूरला त्याचा जन्म झाल्यामुळे गावाच्या नावाखेरीज प्रत्येक गोष्ट बदला असा बाळपणापासून त्याचा आग्रह असे. आपले नाव तर त्याने नित्य बदलले. वडलांचेही बदलले. जे दिसेल ते बदलायचे हा बाळ जनार्दनाचा आग्रह असे. लहानपणी मुले विटी-दांडू खेळत तर जनार्दन (त्या दिवशी त्याचे नव जनता-जनार्दन होते) दांडविटी' खेळत असे. हुतुतूला ‘तुतुहू' म्हणत असे. आणि खोखोतला दुसरा ‘खो’ आधी म्हणून त्या खेळाचे नावही ‘खोऽखो’ असे बदलण्याचे कार्य त्याने केले. शाळेत असताना वर्ग बदलायचा, शिक्षक बदलायचा, एवढेच काय परंतु वर्गात कपडे बदलायचादेखील त्याने सपाटा चालू केला. असला असामान्य विद्यार्थी पाहून कित्येक शिक्षकांनी त्याच्या वर्गातून बाहेर पडताना बदलीचे अर्ज केले. तारुण्यात तर जनार्दनाने अनेक गोष्टी बदलल्या. त्यांचा तपशील देणे शक्य नाही; परंतु त्यांतील एका गोष्टीमुळे त्याने आपले नाव अजरामर केले आहे, त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ती म्हणजे त्याने वाल्मिकी नावाच्या कवीच्या रामायणाला पार बदलून दिलेले नवीन स्वरूप. हे कार्य करताना त्याने स्वतःचे जनार्दन हे नाव बदलून ‘जाल्मिकी’ हे नाव धारण केले आणि आपल्या नव्या रामायणाचे नाव ‘लोक-रामायण’ असे ठेवले. कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत हे ह्या रामायणाचे वैशिष्ट्य आहे. मूळ रामायणातील काडे केव्हाच पिचली आहेत हे जाल्मिकीच्या ध्यानात आले आणि लोकांना समजेल अशा भाषेत त्याने आपल्या लोक-रामायणाची रचना केली. जाल्मिकीने रामायणातील पहिल्या प्रकरणाचे नाव बालकांड असे न ठेवता ‘रुदन' ह्या बालकाच्या सहजप्रवृत्तीला साजेल असे भो-कांड हे नाव ठेवले. ‘भो-कांडा’-तील आणि इतर कांडांतील काही कथा पाहा.

‘भो-कांडा’पासून सुरुवात

शरयू नदीच्या तीरी अयोध्या नावाची लोकधानी होती. तेथे दशरथ नावाचा एक लोकपाल होता. त्याचे मुख्य काम लोक वाहनांची सोय करण्याचे होते. त्या काळी लोक रथातून प्रवास करीत. प्रस्तुत लोकपालाच्या ताब्यात दहा रथांची व्यवस्था असल्यामुळे ‘दशरथ' असा त्याला किताव होता. त्या काळात द्विभार्याप्रतिबंधक कायदा होता. परंतु त्रिभार्याप्रतिबंत्रक नव्हता. त्यामुळे लोकांच्या इच्छेला मान देऊन त्याने तीन पत्नीचा स्वीकार केला होता. एकीचे नाव कौसल्या, दुसरीचे कैकेयी आणि तिसरीचे सुमित्रा. ह्या एकमेकींशी कवीच भांडत नसत. अयोध्येत कोणीच कोणाशी भांडत नसे. तिघीही एकच स्वैपाक करीत. कौसल्येने हातसडीचे तांदूळ निवडले की, कैकेयी शरयू नदीवरून, अयोध्या-हस्तोद्योग-कार्यालयात तयार झालेल्या मडक्यातून, पाणी आणीत असे आणि सुमित्रा चूल पेटवीत असे. मग तिघी मिळून भात शिजवीत आणि मग आपल्या झोपडीच्या बाहेर अतिथीची वाट पाहात उभ्या राहात. ही सर्व मंडळी झोपडीतच राहात. त्या वेळी मोठमोठ्या महालात कोणीच राहात नसे. सारी मंडळी आश्रमात राहात म्हणूनच त्यांच्या घरांना गृहस्थाश्रम म्हणत. काही मंडळी आश्रमदेखील बांधीत नसत. कारण त्यांचा मुख्य व्यवसाय ‘अतिथी’ हाच होता. रोज अतिथीला वाढल्याखेरीज पुण्य मिळत नसे. त्यामुळे इतरांना पुण्य मिळवून देण्यासाठी गावात अतिथी असणे आवश्यक होते.

अयोध्येतील पुरुषमंडळी शेतांवर काम करीत. ‘सब भूमी गोपालकी’ ह्या तत्त्वाप्रमाणे कोणीही कुणाच्याही शेतीवर काम करीत असे व कुणीही कुणाचेही धान्य कापून आणीत असे. गावात गुन्हेच घडत नसल्यामुळे पोलीसदेखील शेतावरच काम करीत आणि कंटाळा आल्यास अतिथीचे काम करीत. दशरथाचा संसार सुखाने चालला होता. त्याला राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे चार पुत्र होते. काही मंडळीचे मत, हे आधी नव्हते, नंतर त्याने यज्ञ केला आणि मग मुले झाली, असे आहे. परंतु ते असत्य आहे. दशरथाच्या तीनही राण्यांत मिळून चार मुले पहिल्यापासूनच होती. ही मुलेदेखील आपापसात कधीच भांडत नसत. सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करून वसिष्ठगुरुजींच्या जीवनशिक्षण केंद्रात जात. वसिष्ठगुरूजी बेसिक पद्धतीचे शिक्षण देत असत. प्रत्येक गोष्ट समवायपद्धतीने शिकवण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.

‘इश्वाकू’ घराण्याचा परिचय

लोकपाल दशरथाने वसिष्टगुरुजींची आपल्या मुलांना शिकवणी ठेवली होती. त्याबद्दल मुले गुरुजींना दर्भाच्या दहा जुड्या प्रतिमासी देत असत.

इक्ष्वाकू घराण्याची माहिती वसिष्ठगुरुजींनी खालीलप्रमाणे सांगितली.

दशरथाच्या झोपडीत येताना वसिष्ठगुरुजी हातात एक भला मोठा ऊस घेऊन आले. मुलांनी गुरुजींना दंडवत घातला.

“लोकगुरूंना अभिवादन.” मुले म्हणाली.

“लोकांचे कल्याण असो," वसिष्ठ म्हणाले. “लोकांच्या मुलांनो, मी आज येताना काय आणले आहे?” वसिष्ठांनी विचारले.

“कमंडलू!” छोटा लोकपुत्र शत्रुघ्न म्हणाला.

“योग्य! लोकपुत्रहो, दुसरे काय?”

“रजकाकडून धुतलेली छाटी!” भरत म्हणाला.

“योग्य!! लोकपुत्र लक्ष्मणा, तू का उत्तर देत नाहीस!”

“लोकगुरुजी, माझा ज्येष्ठ बंधू राम जे सांगेल तेच माझे उत्तर असणार. तेव्हा त्यालाच विचारा.” लक्ष्मणाचे बंधुप्रेम उफाळून आले.

“रामचंद्रा, तू सांग मी काय आणले आहे?”

“ऊस.” राम म्हणाला.

“ऊस!” लक्ष्मण म्हणाला.

“योग्य. परंतु ऊस हा लोकवाणीतला शव्द झाला. देववाणीत ऊसाला काय म्हणतात, लोकपुत्र भरता‌‌‌-”

“ऊसम!” भरत म्हणाला. शत्रुघ्न हसला, त्यामागून राम हसला, म्हणून लक्ष्मण हसला.

“हसू नका! हसण्याने भावना दुखावतात. रामचंद्रा, ऊसाला देववाणीत काय म्हणतात?”

“इक्षू.” राम म्हणाला.

“इक्षू.” लक्ष्मण म्हणाला.

पुढे वसिष्ठगुरुजींनी तो ऊस वाकवला व विचारले,

“लोकपुत्रहो, मी आता उसाचे काय केले?"

“वाकवून दाखवला!” चारी लोकपुत्र म्हणाले.

“इक्षू वाकल्यावर काय होते?”

“मोडतो!”

“नव्हे, न मोडता काय होते?”

“काही होत नाही.” शत्रुघ्न म्हणाला.

“परंतु इक्षू आणि वाक यांचे काय होईल?”

“इक्ष्वाक.” राम म्हणाला व मागून लगेच लक्ष्मणही तेच म्हणाला.

“धन्य धन्य! आता त्याला ऊ लावल्यावर काय होईल?”

“ऊस खराब होईल.” भरताने उत्साहाने सांगितले.

“नव्हे! ऊ हे अक्षर लावल्यास काय होईल?”

“इक्ष्वाकु!” राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न म्हणाले.

“इक्ष्वाकु!!” आपल्या दाढीवरील घाम टिपीत वसिष्ठगुरुजी उद्गारले. “धन्य!! आज आपल्याला इक्वाकू घराण्याविषयी माहिती करून घ्यावयाची आहे.” एवंगुणविशिष्ट प्रस्तावना करून समवायपद्धतीला अनुसरून वसिष्टगुरुजींनी त्या चारही लोकपुत्रांस उसाच्या मळ्यात कामाला नेले. शेती, वल्कले शिवणे इत्यादी कलांमध्ये हे लोकपुत्र पारंगत झाले. कालमानाप्रमाणे लोकपाल दशरथ थकत चालला होता. दहा रथांच्या लोकवाहकांची दगदग त्याला सोसत नव्हती.

विश्वामित्र दशरथास भेटतात

आणि एके दिवशी सायंप्रार्थना आटोपून लोकपाल दशरथ आपल्या कुटुंबियांमध्ये गाईचे दुग्धपान करीत बसला असता तेथे आचार्य विश्वामित्र आले. वसिष्ठगुरुजी लोकपुत्रांची शिकवणी करीत तेथेच बसले होते. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे जिवश्च कंठश्च मित्र असल्यामुळे त्यांनी एकमेकांना कडकडून आलिंगन दिले. विश्वामित्रांनी अयोध्येनजिकच्या अरण्यात आदिवासी शिक्षणसंस्था चालविली होती. त्यांच्या ज्ञानयज्ञात राक्षस व्यत्यय आणीत असत. आदिवासी मुलांच्या पाट्या फोडीत. पेन्सिली पळवून नेत. चरखे जळणासाठी वापरीत. चोरून दारूदेखील

गाळीत असत. लोकपाल दशरथाने शांततामय मार्गाने त्या राक्षसांचा बंदोबस्त करावा अशी त्यांची इच्छा होती. वसिष्ठ गुरुजींचा सल्ला पडला की रामचंद्राने हे विधायक कार्य हाती घ्यावे. त्याप्रमाणे रामचंद्र व त्याच्यामागून लक्ष्मण हे विश्वामित्र मुनींबरोबर आदिवासी शिक्षणसंस्थेत गेले. तेथे पाट्यांचे तुकडे झालेले, पेन्सिली मोडून टाकलेल्या, सरंजामकार्यालय उध्वस्त झालेले पाहून रामास फार वाईट वाटले. रामास वाईट वाटले म्हणून लक्ष्मणासही वाईट वाटले. त्यांनी विश्वामित्रास धीर दिला व स्वतः आदिवासी मुलांचा वर्ग घ्यावयास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे राक्षस वर्ग उधळण्यासाठी आले. रामचंद्राने त्यांच्या शिष्टमंडळाची गाठ घेतली. ग्रामोद्योग आणि जीवनशिक्षण यांचे महत्त्व त्यांना पटवून दिले आणि शांततामय सहजीवनावर त्यांची ‘बौद्धिके’ घेतली. राक्षसांचे डोळे उघडले. त्यांनी आपापली मुले आणून प्राचार्य विश्वामित्रगुरुजींच्या संस्थेत दाखल केली. अशा रीतीने ब्रह्मविद्येत पारंगत झालेली मुले अजूनही ‘ब्रह्मराक्षस’ म्हणून ओळखण्यात येतात. त्यांतील काहींना हिंसात्मक पद्धतीने मानगुटीवर बसायची हुकी आली की ‘राम राम’ असे म्हटल्यावर त्यांच्यातील हिंस्र वृत्ती नष्ट होऊन जाते. हा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

जानकी-राम विवाह

राम-लक्ष्मणांच्या विधायक कार्यावर प्राचार्य विश्वामित्र प्रसन्न झाले. त्याच वेळी मिथिलानामक जनराज्यात जनक नावाचा जनपाल होता. त्याची जानकी नावाची उपवर कन्या होती. जनराज्यात, निवडणुकीच्या लोकशाही पद्धतीने विवाह होत असे. उपवर कन्येला एकच मत असून एकाचीच निवड करता येत असे. निवडणुकीला उभे राहण्याचा कोणाही पुरुषाला अधिकार असे. मत मात्र अविवाहित तरुणींनाच असे. निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत नसे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. विश्वामित्रगुरुजी राम-लक्ष्मणांबरोबर पदयात्रा करीत मिथिला जनधानीत येऊन पोहोचले. जानकीच्या स्वयंवराला (ह्या निवडणुकीला स्वयंवर म्हणत) देशोदेशीचे लोकपाल आले होते.

जानकीला सीता असेही नाव होते. जनपाल जनक शेतात जमीन नांगरीत असताना एका पेटिकेत ही कन्या सापडली, अशी एक कथा आहे. ह्यावरून त्या वेळी शेतात काय सापडत असे याची कल्पना येईल. वास्तविक त्या काळात सर्वच मंडळी शेती करीत. त्यांतून जनक, दशरथ वगैरे मंडळी तर ‘क्षत्रिय’. खरे म्हणजे ‘क्षत्रिय’ हा ‘क्षेत्रीय’ याचा अपभ्रंश आहे. सदैव क्षेत्रात राहणारे क्षेत्रीय. क्षेत्रस्थ ब्राह्मण आपण ऐकतो. क्षेत्रस्थ म्हणजे देखील क्षेत्रात राहणारे. वैश्यांची शेती वेशीजवळ असे. म्हणजे एक डोळा शेतीवर ठेवून दुसरा डोळा दुकानावर ठेवता येत असे. ‘शूद्र’ हे ‘शूत् शूत’ असा ‘रव’ करून पाखरे हाकलीत म्हणून त्यांस शत-रवः कुर्बन्ति इति शूद्राः असे म्हटल्याचे जुन्या शास्त्रग्रंथांत नमूद केले आहे. हे जुने ग्रंथ आता नष्ट झाले हे आपले दुर्दैव. तात्पर्य, जनकाने आपल्या शेतात सापडलेल्या कन्येचे स्वयंवर मांडले. देशोदेशीचे क्षेत्रपाल, लोकपाल आणि जनपाल त्या स्वयंवराला आले होते. विश्वामित्रांनी रामचंद्र आणि लक्ष्मण ह्या लोकपुत्रांसही बरोबर नेले.

सीता-स्वयंवर

जनकाच्या झोपडीसमोरील अंगण शेणाने सारवून स्वच्छ केले होते. मिथिलेतील सरंजाम-कार्यालयाला चिपळूण येथील जंगलात विधायक कार्य करणारे आचार्य परशुराम यांनी एक कापूस पिंजण्याची प्रचंड धनुकली भेट दिली होती. तिला दोरी जोडून जास्तीत जास्त कापूस पिंजून दाखवणाऱ्याची निवड होईल असे जाहीर केले होते. दुर्दैवाने त्या स्वयंवराला आलेल्या लोकपालांत ग्रामोद्योगकेंद्रात मधुपालन, चर्मालय, तेलाची घाणी वगैरे चालवणाऱ्या लोकपालांचीच गर्दी जमली होती. बहुतेक शेती-बेसिक पाठशाळेतले विद्यार्थी होते. वसिष्ठ गुरुजींनी रामाला सूत-बेसिक पद्धतीने जीवनशिक्षण दिले होते, त्यामुळे रामाने त्या कापूस पिंजण्याच्या धनुष्याला दोरी जोडून दहा शेर कापूस पिंजून दाखवला आणि धनुष्ये मोडले. तेवढ्यात लक्ष्मणाने त्या कापसाचे पेळूही वळले होते. हे सारे हस्तकौशल्य पाहून जनक प्रसन्न झाला आणि सीता-रामांचा विवाह झाला. अर्थात लक्ष्मणाचे पेळू करण्याचे कसब पाहून ऊर्मिळा नावाच्या आपल्या दुसऱ्या कन्येशी त्याचाही विवाह जनकाने लावला. त्या स्वयंवराला रावण नावाचा एक लोकपाल आला होता. त्याला जीवनशिक्षण मिळाले नव्हते, त्यामुळे तो ह्यातील काहीच करू शकला नाही. त्यामुळे त्याला हात हलवीत परतावे लागले. परंतु जनपाल जनकाने सर्व मंडळींना आग्रहाने ठेवून घेतले आणि विवाहानिमित्त सर्वांनी सामुदायिक उपोषण करून आपली चित्ते शुद्ध करून घेतली व त्यामुळे कुणालाही हर्षखेद काहीच न होता सर्व मंडळी स्थितप्रज्ञावस्थेत परतली.

लोकपाल दशरथाची सेवानिवृत्ती

राम-लक्ष्मणांप्रमाणे भरत-शत्रुघ्नांचेही विवाह झाले. लोकपाल दशरथाला कामाची जबाबदारी आता कठीण वाटू लागली आणि त्याने सेवानिवृत्त होऊन ते काम ज्येष्ठ लोकपुत्र रामचंद्र ह्याला द्यावयाचे ठरविले. यो वार्तेने कौसल्या, कैकेयी, सुमित्रा ह्या तिन्ही राण्यांना अत्यानंद झाला; परंतु खुद्द रामचंद्राच्या मनात विश्वामित्राचा जंगलातील आश्रम पाहिल्यानंतर आदिवासींच्या कार्यासाठी जीवनदान करावे असे फार दिवस घोळत होते. त्याने कैकेयीपाशी आग्रह धरला की, “हे सापत्न लोकमाते, केवळ विधायक कार्याच्या हितासाठी तू लोकपिता दशरथापाशी हट्टाचे नाटक कर.” कैकेयी अयोध्येच्या ‘साहित्य-संगीत-नाटक केंद्रा’त सांस्कृतिक विभागातून शिकून तयार झालेली स्त्री होती. तिने भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास केला होता. सांस्कृतिक कार्यात भारतीय स्त्रिया पहिल्यापासून तयार होत्या. तिने व मंथरा नावाच्या तिच्या जोडीच्या कार्यकर्त्या स्त्रीने हट्टाची सुंदर संवाद बसवला. विशेषतः क्रोधाचा अभिनय करण्यात तर तिची हातखंडा होता. तिने ‘भरताला लोकपालाची जागा द्या’ ऊर्फ ‘माझा भरत’ ही एकांकिका इतक्या परिणामकारक रीतीने केली की दशरथाने खरोखरीच रामचंद्राऐवजी भरताला लोकपालाची जागा दिली. यावरून त्या काळातील स्त्रियांचे अभिनयकौशल्य दिसून येते. रामचंद्र विधायक कार्यासाठी जंगलात जावयास निघाल्यावर त्याच्या एका पावलावर पाऊल टाकून जानकी निघाली व दुसर्या पावलावर पाऊल टाकून लक्ष्मणही निघाला. वास्तविक तिघांनीही जीवनदान करावयाचे योजले होते. परंतु शेवटी बारा वर्षेच हे कार्य करावे अशी तडजोड झाली. तिघांचाही अयोध्येत जाहीर सत्कार झाला व राम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात पदयात्रेसाठी निघाली.

शूर्पणखेच्या नाकाचे वाढलेले हाड

जंगलात रामाने आश्रम बांधला आणि आदिवासींमध्ये आपले विधायक कार्य सुरू केले. शेतीचे नवे प्रयोग सुरू केले. जंगलात अनेक वन्य जमाती राहात, त्यांचा उद्धार केला. त्याच वेळी शूर्पणखा नावाची एक स्त्री आश्रम पाहावयास आली व सीतेकडे पाहून सारखे नाक मुरडू लागली. सुरुवातीला बऱ्याच मंडळींचा समज हिच्या मनात सीतेची अवहेलना करून रामाला मोहित करायचे असे असावे असा झाला. परंतु तिला काहीतरी नाकाची व्याधी असावी असे रामाला वाटून त्याने लक्ष्मणाला तसे सांगितले. परीक्षेनंतर तिच्या नाकाचे हाड वाढले आहे असे लक्श्मणाने निदान करून तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केली. दुर्दैवाने जंगलात सगळी शस्त्रक्रियेची साधने नसल्यामुळे वाढलेले हाड कापल्यावर नाक जोडण्यासाठी आवश्यक आयुधे नव्हती व हाडाबरोबर नाक गमावून शूर्पणखा परतली. शस्त्रक्रियेत आयत्यावेळी काय होईल ते सांगणे अवघड आहे.

वानर नावाचे आदिवासी

जंगलात वानर नावाचे आदिवासी होते. त्यांची मुले आश्रमात शिकून फारच तयार झाली. हे कार्य जोरात चाढ असताना मारीच नावाच्या एका व्यापा-याने ‘हरणछाप' रेशमाचे, जरीनी भरलेले सिलोनी कटपीसेस विकायला आणले. आश्रमातील मंडळी कामात दंग होती. राम आणि लक्ष्मण कांचनमुक्तीचे प्रयोग आदिवासींना समजावून देत असतांना मारीचाची ‘कांचनमृगछाप कापऽऽड' अशी आरोळी सीतेने ऐकली. हा मारीच सिंहलद्वीपचा फिरस्ता व्यापारी होता. (हा महा-रिच-म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यापारी होता असे सुप्रसिद्ध सिंहली संशोधक चिचुंदरनायके यांचे मत आहे.) सीतामाईंनी बरेच दिवस वल्कलाच्या चोळ्या वापरल्या होत्या, आणि फेरीवाल्याची हाक आली की त्याला दारात बोल वायचा, या स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे त्यांनी आपल्या यजमानांना त्याला बोलावण्यास सांगितले. 'कांचनमृगछापकापड घ्या---' असे ओरडत मारीच दूरवर निघून गेला होता. बराच वेळ आपला पती येत नाही असे पाहून सीतामाईने लक्ष्मणास त्याच्या शोधार्थ धाडले. तेवढ्यात लंकेतील दुसरा एक गृहस्थ रावण याने सीतेस लंकेत असली पुष्कळ दुकाने आहेत व आपण दोन तासांत तुला आणून सोडतो असे सांगून तिला विमानातून लंकेत नेले. इकडे जंगलात रामचंद्राने एक युक्ती केली. धनुष्यबाणाच्या टोकाला आपल्या आश्रमाचा पत्ता लिहून त्याने तो बाण हवेत सोडला. हेतू हा की बाण मारीचाहून जलद गतीने जाऊन त्याच्यापुढे वाटेवर कुठेतरी पडेल; परंतु चुकून तो बाण मारीचास लागला व तो मेला. रामाने त्याच्याजवळ जाऊन पाहिले तर मारीचाकडे खऱ्या सोन्याच्या तारेत विणलेले कापड अजिबात नव्हते. तेव्हा राम व लक्ष्मण परतले, तो आश्रमात सीता नाही.

सीता-शोध

शेवटी राम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघाले. वाटेत त्यांना लंकेचा प्रमुख रावण याने सीतेला नेल्याची वार्ता कळली.

सीतेचा शोध करण्यासाठी आश्रमातली सारी आदिवासी मुले रामाबरोबर हिंडत होती. त्यांत हनुमान नावाचा एक चलाख मुलगा होता. तो सगळ्यात पुढे गेला आणि रामेश्वराजवळील खाडीतून पोहत जाऊन त्याने अशोकवनात सीता पहिली. वास्तविक त्याला सीतेला बरोबर आणता आली असती. परंतु लंका हे स्वतंत्र राष्ट्र होते आणि परवान्याशिवाय सीतेला पुनः स्वतःच्या देशात येता येत नव्हते. त्यामुळे त्याला काय करावे सुचेना. दुर्दैवाने त्याच वेळी लंकेत हिंसात्मक चळवळ करावी असा त्याच्या डोक्यात विचार आला आणि त्याने तेथील नारळाच्या झाडावर चढून येणाऱ्याजाणाऱ्याच्या डोक्यावर नारळ फेकून मारणे, आगी लावणे वगैरे विध्वंसक कृत्ये केली. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सीतेभोवती पाहारा वाढवला. तिला लंकेच्या न्यायालयाने 'लंका सुरक्षा कायद्या'खाली अटकेत ठेवली. तिच्यावर स्त्रीपोलिसांचा पहारी होता. तुरुंगातून तिला वागणूक चांगली मिळत होती. कारण लंकेचा मुख्य दंडाधिकारी कुंभकर्ण हा काही काम न करता झोपा काढीत असे. रावणाचा भाऊ बिभीषण याला शांततेचे धोरण मान्य होते.

लंकेची नासधूस करून हनुमान परत आल्यानंतर रामाने त्याच्या दुष्कृत्यांबद्दल उपोषण केले. कांही वानर मंडळींनी लंकेवर स्वारी करावी अशी रामास सूचना केली: परंतू आंतरराष्ट्रीय संबंध बिघडतील म्हणून रामाने हिंसेच्या मार्गाने न जाता समुद्रात पूल बांधून दंडकारण्य आणि लंका यांचे संबंध जोडावयाचे ठरविले. ह्या पुलाच्या विकासयोजनेचा दोन्ही देशांना फायदा होण्यासारखा आहे हे तत्व रावणाला पटावे म्हणून खटपट केली. पुलाचे काम श्रमदानाने करावयाचे ठरले आणि सारी मंडळी सीतेचा प्रश्न विसरून पूल, धरणे वगैरे बांधण्याच्या योजनेत गढून गेली. शेवटी पुलाचे काम पुरे झाले. वाली, सुग्रीव वगैरे स्थापत्यविशारदांनी स्वयंस्फूर्तीने काम संपविले. रीस (हल्लीच्या परिभाषेत ज्याला रूस म्हणतात), शृगाल वगैरे परदेशीय मंडळीही ह्या कार्यात मदतीला आली होती. वानरांत ताम्रमुखी वानर होते. पाताळदेशातूनही या कामी बरीच मदत झाली. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर सामोपचाराने आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्यासाठी राम, लक्ष्मण, वाली, सुग्रीव यांचे शिष्ट मंडळ लंकेत जाऊन रावणाला भेटले. रावणाच्या राष्ट्रात दहा मंत्री होते आणि ते दहा प्रकारची परस्परविरोधी मते मांडीत. त्यामुळे रावण दहा तोंडांनी बोलतो अशी आख्यायिका आहे. प्रत्येक वेळी सोयिस्कर रीतीने मते बदलायला रावणाची ही मंत्रिमंडळाची पद्धती रामचंद्राला फार आवडली आणि रामराज्यात आपण ह्याच पद्धतीचा अवलंब करू असे त्याने रावणाला कबूल केले. सीता हा विषय सोडून रावण अनेक अवांतर गोष्टी रामोशी आणि शिष्टमंडळाच्या इतर सभासदांशी बोलला. सिंहली लोक-नृत्याचे कार्यक्रम फारच उठावदार झाले! त्यानंतर लंका-शांति-सेनादलाचा प्रमुख बिभीषण याने रामराज्याशी परराष्ट्रीय संबंध अत्यंत प्रेमाचे ठेवले पाहिजेत असे पत्रक काढले. हनुमंत पुन्हा पुन्हा सीतेच्या मुक्ततेचा विषय काढू पाहात होता. त्याच्या शेपटावर रामाने पाय ठेवून त्यास दाबले. शेवटी लंकेतील एका नारळीवर लटकणारे नार पाडण्यासाठी रामाने तीर मारला. त्याच वेळी गवाक्षात रावण आला होता. त्याला चुकून बाण लागून तो धाडकन जमिनीवर पडला. उत्तरीय तपासणीत 'गवाक्षातून पडून' असा शेरा पडला व रामावर आरोप आला नाही आणि प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले नाही. अशा रीतीने अत्यंत शांततामय मार्गाने त्या प्रकरणाचा शेवट होऊन सीता व राम अयोध्येला परत आले. तोपर्यंत भरताने हंगामी सरकार स्थापन केले होते. राम परतल्यावर सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि राम लोकपाल झाला आणि देशात रामराज्य सुरू झाले. परंतु लोकांनी रामराज्य म्हणू नये असा लोकपाल रामचंद्राने वटहुकूम काढला आणि आपल्या राज्याला लोकराज्य म्हणावे अशी लोकांना विनंती केली आणि त्या शांतताप्रिय लोकांनी ती ऐकली. प्रथम लोक पालपदाची त्याग, नंतर पत्नीत्याग आणि सरतेशेवटी शरयूत देहत्याग केल्यामुळे कुणीही कोणाली व कशालाही सोडून जाताना “बरं आहे, राम राम मंडळी” म्हणावे, असा पुढे फतवा निघाला. फार काय, देहाचा त्याग करताना 'राम' म्हणावे असाही वटहुकूम काढला गेला. त्याची अंमलबजावणी आजतागायत चालू आहे.

सीता 'भू'दान-कार्य-निमग्न झाली

जाल्मिकीच्या लोकरामायणाचे हे थोडक्यात सार आहे. मूळ ग्रंथ पाहिल्याशिवाय खरी कल्पना येणे शक्य नाही. लेखकाची वर्णनशैली तर अद्वितीय आहे. विशेषतः राम आणि रावण यांची लंकेत निघालेली मिरवणूक सेतुबंधनप्रसंग वगैरे प्रकरणे केवळ शैलीसाठी वाचावीत अशी आमची शिफारस आहे. रावणाचा रामाच्या हातून चुकून घडलेला मृत्यू वाचताना डोळ्यांतील टिपे खळत नाहीत. सीतात्यागाच्या प्रकरणाला जाल्मिकीने दिलेली कलाटणी फारच सुंदर आहे. विचित्र कंठ्या पिकनणे हे रजकांचे काम होते हे सिद्ध केले आहे. आणि ह्या रजकांच्या गोटातून पिकणाऱ्या ‘राजकीय’ बातम्या ह्या आजतागायत कशा चालू आहेत हे पटवले आहे. अयोध्या हे शहर असल्यामुळे आपल्या उदरात असलेल्या बालकांवर संपूर्ण ग्रामीण संस्कार व्हावे म्हणून सीता खेड्यात राहावयास गेली ही जाल्मिकीची मीमांसा विचारात घेणे इष्ट आहे. पुन्हा ती अयोध्येत परत आली तीदेखील शहरी जीवनात कशी सुखी होऊ शकली नाही हे दाखवून शेवटी तिने भूमातेच्या पोटात प्रवेश केला हे खरे नसून ‘भू’दानकार्यात ती ‘निमग्न’ झाली हेच खरे, हे सिद्ध केले आहे. आजदेखील रजकवृत्तीचे प्राबल्य असलेल्या ‘राजकीय’ क्षेत्रातून काहीं मंडळी ‘भू’दानात कशी गडप होतात हे आपण पाहतो. जाल्मिकीच्या द्रष्टेपणाचे याहून अधिक चांगले उदाहरण कोणते हवे? आणि असे असून अजूनही काही लोक वाल्मिकीचेच नाव घेतात त्यांना काय म्हणावे ? राम राम !!

पुस्तक - गोळाबेरीज
पु.ल. देशपांडे

0 प्रतिक्रिया: