पु.ल. हे बाळासाहेबांचे शालेय शिक्षणात शिक्षक होते असा कधीकधी उल्लेख होतो पण तशी वस्तुस्थिती कधीच नव्हती. पु.ल. आणि सुनीताबाई हे दादरच्या ओरिएंट स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना, त्या शाळेत बाळासाहेब, यांच्या ज्येष्ठ भगिनी दि. सुशीलाबाई आणि धाकटे बंधू श्रीकांत हे विद्यार्थी होते. गुणग्राही बाळासाहेबांनी एकलव्याच्या निष्ठेने पु.लंचं बहारदार वक्तृत्व, नाटक-सिनेमांतून पुढे प्रत्ययास आलेलं प्रभावी सादरीकरण, प्रसन्न विनोदशैली हे सर्व गुण एखाद्या टीपकागदाप्रमाणे टिपून घेतले आणि आत्मसातही केले. त्या दोघांत सुमारे १० वर्षांचं अंतर होतं. पण त्यांच्या परस्परांविषयी असलेल्या आपुलकी आणि जिव्हाळा यांमध्ये कधीच अंतराय आला नाही. ज्याप्रमाणे आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर पु.लं.नी साहित्य-नाट्य आणि संगीत या तिन्ही क्षेत्रांत आपल्या नावाचा एक रूळ तयार केला तर बाळासाहेबांनी आपलं संघटनाकौशल्य आणि व्यंगचित्रकार या गुणांमुळे स्वतःचा ठसा उमटवणारा एक रूळ बनवला. हे दोन्ही रूळ, आगगाडीच्या रुळांप्रमाणे नेहमी समांतर अंतरावरून जीवन वाटचाल करत राहिले. क्वचित या रुळांचं घर्षणही झालं, पण ते अळवावरचं पाणी होतं.
दोघांच्याही आयुष्यातली पहिली चार दशकं प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यातच गेली, पु.लंनी शिक्षण सोडून नाट्य आणि चित्रपट या क्षेत्रांत झेप घेतली. त्यांची आयुष्यातील पहिली आवड ही संगीतच राहिली. त्यांचं पहिलं नाटक ‘तुका म्हणे आता’ हे पहिल्या प्रयोगाच्या तिसर्या अंकातच कोसळलं होतं! ‘गुळाचा गणपती’ हा तर सबकुछ पु.ल. असा चित्रपट होता. लेखन, संगीत, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका सर्व गोष्टी त्यांनी एकहाती केल्या होत्या. पण चित्रपटसृष्टीइतकी कृतघ्न की पु.लं.ना त्या चित्रपटाच्या प्रीमिअर शोचं आमंत्रणही नव्हतं. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘ही कुणी छेडीली तार’, ‘इंद्रायणी काठी’ अशी अप्रतिम संगीतबद्ध केलेली पु.लं.ची गाणी अजूनही रसिकांच्या कानामध्ये गुंजन करत असतात. सुरुवातीच्या काळात पु.ल. – पुरुषराज अळूरपांडे अशा टोपण नावाने लेखन करत असत.
बाळासाहेब चित्रकलेचं शिक्षण घ्यायला कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये गेले नाहीत. ती त्यांच्या रक्तात ती उपजतच होती. त्याला प्रबोधनकारांनी प्रोत्साहन दिलं. बाबूराव पेंटरांनी उत्तेजन दिलं. व्यंगचित्र काढणं म्हणजे एखाद्याचं व्यंग चितारणं नव्हे याची त्यांना जाण होती. त्यात कोणती तरी कल्पना साकार झाली असली पाहिजे ही जाण लहानपणापासूनच होती. ‘मार्मिक’कार बनल्यावर त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता नवोदित चित्रकार जायचे. एकाने एक थोटा माणूस दाखवला होता आणि चित्राखाली लिहिलं होतं, I am a shorthand typist! बाळासाहेबांनी चित्रकाराला समजावून सांगितलं – त्या माणसाला हात नाहीत म्हणून तो शॉर्टहॅण्ड होत नाही. हे व्यंगचित्र नाही, तर व्यंगचित्रण आहे! उद्या तू एखाद्या लंगड्या माणसाचं चित्र काढशील आणि म्हणशील, मी एका पायावर उभा आहे. व्यंगचित्र प्रभावी ठरतं, ते त्यामधील आशयामुळे. बाळासाहेब फ्रिप्रेसमध्ये काम करत असताना ‘मावळा’ या टोपणनावाने इतर नियतकालिकांत व्यंगचित्रं काढत असत. म्हणजेच टोपणनाव घेऊन काम करणं हे त्यांनी आणि पु.लंनीही केलं होतं! पु.लंनी भाऊसाहेब हिरेंच्या शब्दाखातर त्यांच्या मालेगावच्या शिक्षणसंस्थेत नोकरी घेतली होती तरी स्वाभिमानाशी तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे त्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. बाळासाहेबांच्या कलेवर बंधनं यायला लागल्यावर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता-हे दोघांमधलं आणखी एक साम्य. १९६० साल हे दोघांच्या जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. देशात नुकत्याच सुरू झालेल्या टीव्हीसाठी प्र्रोगॅ्रम प्रमुख म्हणून पु.लंना दिल्लीस जावं लागलं. आपल्या विनोदी स्वभावामुळे हे ‘पांडेजी’ उत्तर हिंदुस्तानात कमालीचे लोकप्रिय ठरले. पुढे ते इंग्लंडला जाऊन आले. खुसखुशीत शब्दांत प्रवासवर्णन कसं लिहावं याचा आदर्श त्यांच्या ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकांनी मराठी भाषेत निर्माण झाला. त्याच सुमारास त्यांचं ‘वार्यावरची वरात’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने इतिहास घडवला. बाळासाहेब भल्या पहाटे बिर्ला मातोश्री सभागृहात जाऊन रांगेत उभं राहून तिकिटं घेऊन आले होते. त्या प्रयोगावर ते इतके खूश झाले होते की त्यांनी ‘मार्मिक’च्या पुढच्या अंकात संपूर्ण ‘रविवारची जत्रा’ त्या वरातीवर काढली होती. पु.ल. पंख्याच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या हातामधली संहितेची पानं इतस्ततः उडत आहेत आणि त्या पानांवर ‘वार्यावरची वरात’ हे शब्द उमटवले होते! त्यात पु.लंना सोंड दाखवून ‘द गॉड ऑफ विसडम्’ असं संबोधलं होतं आणि त्या खाली लिहिलं होतं, पु.लंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि सरस्वती भांडी घासते! एका चित्रात ते पेटी वाजवताना दाखवले होते आणि खाली कॉमेंट होती-अशी लाजवाब पेटी ऐकल्यावर वाटतं, रेडिओवरची पेटी वादनावरची बंदी उठवलीच पाहिजे आणि शेवटी स्वतः साहेब पु.लं.च्या पुढील बाजूने कडेवर चढून, आपल्या हातांनी त्यांना कवेत घेऊ पहात आहेत असं चित्र होतं पण त्यांचे हात पु.लंच्या पाठीमागे जाण्यास तोकडे पडत होते आणि कॉमेंट होती-पु.लंची थोपटावी तेवढी पाठ थोडीच ठरेल-पण काय करणार, हातच पुरे पडत नाहीत.
अत्रे आणि ‘मार्मिक’ हा वाद चिनी आक्रमण काळात कमालीचा चिघळला. ‘मराठा’च्या कम्युनिस्ट धार्जिण्या धोरणावर कोरडे ओढणारा ‘मार्मिक’चा अग्रलेख ‘प्रतिभासंपन्न अत्रे मावळले व उरला गलिच्छ वाणीचा कम्युनिस्ट’ प्रसिद्ध झाल्यावर अत्रे कमालीचे भडकले आणि त्यांनी ‘कमोदनकार ठाकरे व त्यांची कारटी’ असे तीन सणसणीत अग्रलेख लिहिले. लेखणी आणि कुंचला यांच्यातला कलगीतुरा कित्येक महिने रंगत होता! बाळासाहेबांनी अत्र्यांना सतत डुकराच्या रूपात चितारून त्यांची भंबेरी उडवून दिली. ‘मराठा’ने एकेदिवशी बाळासाहेबांचा फोटो छापला आणि त्याखाली लिहिलं- महाराष्ट्राचा भंगी चित्रकार! त्याला ‘मार्मिक’ने पुढच्या अंकात व्यंगचित्राद्वारे उत्तर दिलं. त्यात स्वतः बाळासाहेब हातात झाडू घेऊन कचरा काढताना दाखवले होते. कचर्यात अत्रे मृत डुकराच्या रूपात होते आणि भाष्य होतं-मी भंगीच आहे, कारण अत्र्यांसारखा कचरा मला दर आठवड्याला काढावा लागतो. त्या प्रतिहल्ल्यामुळे पु.ल. खूश झाले आणि त्यांनी फोनवरून आपली दाद दिली.
‘मार्मिक’ साप्ताहिक १३ ऑगस्ट १९६० साली, अत्र्यांच्या जन्मदिनी सुरू झालं. पु.ल. ‘मार्मिक’च्या वाढदिवसाला यावेत अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण ते जमलं नाही. विनंतीचा स्वीकार करता येत नाही हा खेद व्यक्त करण्याकरता पु.लंनी पत्र पाठवलं. त्यात बाळासाहेब-श्रीकांत या बंधुंच्या व्यंगचित्रकलेची भलावण केली होती, पण त्याचबरोबर ‘मार्मिक’मध्ये येणारा सर्वच मजकूर सामान्य दर्जाचा असतो अशी मल्लिनाथीही होती! त्याचवेळी पु.लंनी एका मुलाखतीत, मराठी रंगभूमीवरील प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अॅम्बॅसेडर गाडी असावी असं मला वाटतं, असे उद्गार काढले होते. त्यांच्या तुफान लोकप्रिय ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री, बहुरूपी प्रयोगाला मात्र प्रत्येक प्रेक्षकाला जास्तीत जास्त चार तिकिटंच मिळतील, पाच वर्षांखालच्या मुलास प्रवेश नाही, अशी बंधनं सुनीताबाई घालत होत्या. तरीही बुकिंग सुरू झाल्यापासून चार तासांत प्लॅन विकला जायचा! पुलंच्या सामान्य दर्जाच्या मजकूर शब्दप्रयोगावर बाळासाहेब चिडले आणि त्यांनी पुढच्याच अंकात पु.लंकडून नटांचा नाटकी कैवार आणि प्रेक्षकांवर छडीमार हा बोचक अग्रलेख लिहिला.
१९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली आणि बाळासाहेब अल्पावधितच मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत बनले. घणाघाती वक्तृत्व, भेदक कुंचला, मराठी अस्मितेचा जयघोष, नोकर्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हाती घेतल्याने त्यांची Larger than life! प्रतिमा साकार झाली. त्याचवर्षी ३० ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर भव्य मेळावा भरला तेव्हा, ‘मी लोकशाही मानत नाही. ठोकशाही मानतो. माझा कम्युनिस्टांना कडवा विरोध आहे तसाच दाक्षिणात्य प्रांतीय संकुचिततेलाही. मुंबईत उपर्यांनी येऊन आमच्या नोकर्या बळकावायच्या हे यापुढे चालणार नाही. इथला गुंडसुद्धा मराठीच पाहिजे आणि हातभट्टीवालासुद्धा मराठीच पाहिजे. यंडूगुंडू ही महाराष्ट्राच्या आचळाला लागलेली गोचीड आहे’, असा स्फोटक दारूगोळा भरलेली बाळासाहेबाची भाषणं लाखालाखांची गर्दी खेचत होती आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांच्या रूपाने एका देदीप्यमान तार्याचा उदय झाला होता. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. वृत्तपत्रांवर कडक बंधनं आली. बाळासाहेबांनी इमर्जन्सीला पाठिंबा दिला. ‘तुरुंगवास वाचवण्याकरता शिवसेनेच्या वाघाने शेपूट पायांत घातले’ अशा शब्दांत पु.लंनी खाजगीत निषेधही केला. ती बातमी साहेबांच्या कानावर गेली तरी नसावी किंवा समजूनही त्यांनी प्रतिभाष्य करण्याचं टाळलं असावं.
शिवसेना काँगे्रसमध्ये विलीन होणार अशा वावड्या उठवणार्या क्षुद्रबुद्धींना बाळासाहेब हा कसा धगधगता अंगार आहे हे समजलंच नव्हतं. इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यासाठी राजकीय किंमत शिवसेनेला मोजावी लागली. १९८० साली तर बाळासाहेबांनी काँग्रेसची तळी उचलून धरली आणि त्याबदल्यात दोन विधानपरिषदेच्या जागा पदरात पाडून घेतल्या. इंदिराजींनी निरोप पाठवला, ‘ठाकरेजी को कहो, मै उनको उंचेसे उंचाँ पद दुंगी.’ ते अशा विलोभनाला भुलणं शक्यच नव्हतं. १९८५ मध्ये मुरली देवराच्या मुंबई काँग्रेसच्या वर्चस्वाला अडसर घालण्याकरता मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांनी ‘मुंबई केंद्रशासित करणार ही अफवा खोटी आहे’, असं विधानपरिषदेत प्रमोद नवलकरांच्या एका ठरवून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचं भांडवल करून ‘मराठी माणसा रात्र वैर्याची आहे. मुंबई तुझ्यापासून तोडण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे’ अशी पोस्टर्स लागली आणि प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचा फोटो झळकत होता. त्याचा अपेक्षित परिणाम होऊन मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कब्जामधून मुंबई नगरपलिका शिवसेनेने हिसकावून घेतली आणि त्यावर वर्चस्व ठेवलं ते आजतागायत.
जुलै १९८७. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या न्यूजर्सीच्या अधिवेशनास पु.ल. अध्यक्षपद भूषवणार असल्याने तोबा गर्दी झाली होती. शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, मनोहर जोशींनी हजेरी लावली होती. परदेशात मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने एकत्र जमणार आहेत त्याचं बाळासाहेबांना अप्रूप होतं, म्हणून त्यांनी जोशींच्याकरवी अधिवेशनास संदेश देताना म्हटलं होतं, ‘सर्व जातिंचे मतभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा!’ याचं पु.लंनाही कौतुक वाटलं. हा संदेश शिवसेना स्थापनेपासून बाळासाहेबांनी कृतित उतरवला होता. भिन्न जातिंना मूठमाती देऊन शिवसेना उभारली गेली होती.
१९८९ मध्ये भाजपशी युती केलेल्या शिवसेनेला राज्यातलं विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि पाच वर्षांनंतर युती थेट सत्तेचा सोपान चढली. बाळासाहेबांनी झंझावती दौरा करून, एका महिन्यात ११५ विक्रमी सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सरकार स्थापन झालं. ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार देण्याचं ठरलं. शिवसेनानेत्यांना तो दस्तुरखुद्द बाळासाहेबांनाच द्यावा, असं प्रकर्षाने वाटत होतं. त्या सूचनेला फटकारताना ते म्हणाले, ‘मी महाराष्ट्रदूषण आहे हे पुरेसे नाही का?’ पुरस्काराचे पहिले मानकरी पु.ल. ठरले. मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात सोहळा होणार होता. पु.ल. कंपवाताने बेजार होते. म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत सुनीताबाईंनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. त्यात पु.लंनी म्हटलं होतं, ‘आयुष्यभर मी लोकशाही मूल्यांचं जतन करत आलो. ती जेव्हा धोक्यात आली तेव्हा माझ्या कुवतीनुसार ती जपण्यासाठी लढ्यातही भाग घेतला. पण आज ठोकशाहीचा उघडउघड पुरस्कार करणारे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे हे पाहून माझ्या मनाला अपार यातना होतात.’ अशी टीका बाळासाहेबांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. समारंभानंतर पुढच्याच आठवड्यात त्यांच्या हस्ते एका पुलाचं उद्घाटन होणार होतं. तेव्हा भाषणात बाळासाहेब म्हणाले – आता जुने पूल मोडून टाकले पाहिजेत. नवे पूल उभारले पाहिजेत! त्यात पूल हा शब्द Bridge या अर्थीही घेता येत होता आणि पूल म्हणजे ती साक्षात पु.लंवर टीकाही असू शकत होती!
त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे असं चित्र वृत्तपत्रांनी उभं केलं होतं. पु.लंची थोरवी जाणणाऱ्या बाळासाहेबांनी त्यांच्या पुण्याच्या घरी जाण्याचं ठरवलं. पुण्याची भेट घडली तेव्हा सुधीर गाडगीळ उपस्थित होते. त्यांनी या घटनेचं वर्णन असं केलं… ‘बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला. सुनीताबाईंनी ‘या बाळासाहेब’, या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहर्यावर नम्र भाव असलेले साहेब उत्तरले, ‘मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता. या घरात मी बाळच आहे!’ पु.ल. त्यांच्या चाकांच्या खुर्चीत जखडून बसले होते. अंग कंपवातामुळे थरथरत होते. बाळासाहेब त्यांच्या समोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि वाकवून डोकं पु.लंच्या पायांवर ठेवलं. पु.ल. गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पु.लंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, ‘बाळ, मला तुझा अभिमान वाटतो!’
पल्लेदार, समयोचित वक्तृत्व ही बाळासाहेबांना ईश्वराची देन होती. सुधीर फडक्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्यावेळी मुख्य वक्ते साहेब होते. त्यांनी सांगितलं, ‘बाबूजी व मी दोघेही कडवट हिंदुत्ववादी आहोत. फरक एवढाच की जन्मभर त्याचा संबंध सुरांशी आला व माझा असूरांशी!’ साऊथ बॉम्बे लायन्स क्लबच्या समारंभातखच्चून भरलेल्या हॉलमध्ये नजर फिरवून साहेब म्हणाले, ‘In this room, You are all Lions. I am the only Tiger, here!’
पु.लंच्या आयुष्यातलं शेवटचं दशक आजारपणातच व्यतीत झालं. घर ते प्रयाग हॉस्पिटल एवढाच प्रवास नियमितपणे घडत होता. बाळासाहेबांनाही अनेक व्याधींमुळे घरातच जखडून बसणं भाग पडलं. लीलावती हॉस्पिटलला चेकअपसाठी जाणं एवढंच क्रमप्राप्त होतं. त्यांना आधाराशिवाय चालणं मुश्कील व्हायचं. तरीही त्यांची उल्हसित वृत्ती कायम होती. अनेक संदर्भ त्यांना बिनचूकपणे देता यायचे. दोघेही मेहफिलीचे बादशाह होते. त्यांना आपल्याभोवती माणसांचा गराडा असलेला आवडायचा. पु.लंना एका वार्ताहराने विचारलं, ‘कंपामुळे तुम्हाला स्वतः लिहिणं शक्य होत नाही तर डिक्टेट का करत नाही?’ त्यांनी हजरजबाब दिला – I am not a Dictator!’ १९८५ नंतर बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढणं सोडून दिलं, कारण त्यांचा हात थरथरत असे. त्यावरही त्यांचं भाष्य होतं, ज्या हाताने काढलेली व्यंगचित्रं पाहून राज्यकर्ते थरथर कापायचे, तोच हात आता थरथरतो!’ पु.लंना वाचनाचं अफाट वेड. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणार्या डॉ. तात्याराव लहानेंनी त्यांच्या डोळ्यांत शक्तिशाली लेन्स बसवली होती. ‘मला वाचता येणार नसेल तर मला जगायचेच नाही’, असे त्यांचे उद्गार होते. बाळासाहेबांना कथा-कादंबर्या वाचण्यात रस नव्हता. १९६९ साली ते, जोशी आणि साळवी येरवडा तुरुंगात तीन महिने होते तेव्हा अनघाताई जोशींनी त्यांना रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ पुस्तक दिलं. त्यातल्या खाजगी संवादाची बाळासाहेब खिल्लीच उडवायचे. ‘माझ्या वडिलांनी मला बजावले होते, काय वाटेल ते बन, पण कधी विद्वान होऊ नकोस! थोडक्यात गंभीर, सुतकी चेहर्याने वावरू नकोस!’ बाळासाहेब रोज डझनभर वृत्तपत्रं वाचायचे. टिव्ही सहसा पहात नसत. अपवाद-क्रिकेट सामन्यांचा. पु.ल. आणि बाळासाहेब ही व्यक्तिमत्त्वं चुंबकीय होती. त्यांच्याकडे विविध भाषिक, धर्माचे, जातिचे, प्रांताचे लोक आकर्षले जायचे.
न. चि. केळकरांनी म्हटलं होतं, ‘ज्याच्या अंत्ययात्रेला जास्त लोक जमतात, तो मोठा!’ खुद्द केळकरांच्या वेळी लाखांचा समुदाय उपस्थित होता. तसाच पु.लंच्या वेळेसही. बाळासाहेबांसाठी त्याच्या दसपट लोक रस्त्यावर उतरले होते. दोघांनाही सरकारी इतमामाने अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत जन्मलेल्या पु.लंनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला तर पुण्यात जन्म झालेल्या बाळासाहेबांचं देहावसान मुंबईमध्ये झालं! पु.ल. अत्यवस्थ आहेत, हे समजल्यावर बाळासाहेब स्वतःच्या प्रकृतिच्या सर्व तक्रारी बाजूला ठेवून पुण्याकडे धाव घेते झाले. गाडीमध्ये ‘वार्यावरची वरात’ची टेप ऐकत होते. साल २०००, लोणावळा आलं आणि फोनवर पु.ल. गेल्याची बातमी समजली. सुनीताबाईंना सांत्वनपर शब्द सांगितले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, ‘वरात ऐकत आलो, आता त्या वरातीत सामील व्हायला लागत आहे!’ दोघेही अलौकिक, महान किमयागार, अफाट लोकप्रिय. पु.ल. हे शब्दांचे चित्रकार होते तर बाळासाहेब हे रेषांचे व्यंगचित्रकार होते! त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे.
डॉ विजय ढवळे
२९ जून २०१४
कलमनामा
http://kalamnaama.com/pu-l-ani-balasaheb/
1 प्रतिक्रिया:
सुंदर.. व्यक्तिचित्र अधिक इतिहास..
Post a Comment