पु. ल. देशपांडे उर्फ पुलं : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं कुठल्याही मराठी माणसानं अभिमानानं सांगावं असा लेखक व गुणग्राही कलावंत! भाईंना जाऊन आतापावेतो दोन दशके झाली असली तरी त्यांच्या लिखाणातून ते घराघरात सामावलेले आहेत. गतवर्षी त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यांच्या नाटकांचे, व्यक्ती-वल्लींचे आणि इतर लिखाणाचे अनेक कार्यक्रम जगभर झाले. खऱ्या अर्थाने 'झाले बहु होतील बहु पर या सम हा' असं हे बहुविध आणि बहुपेडी व्यक्तिमत्व होतं. पुलंसारखं असं नानाविध क्षेत्रात लीलया वावरणारं आणि आनंदाची लयलूट करणारं व्यक्तिमत्व परत होणं अशक्य आहे. पण त्यांच्या विनोदाचं काय? त्यांच्या पूर्वीही अनेक विनोदी लेखक होऊन गेले आणि पुलंच्या पश्चातही अनेकजण चांगलं विनोदी लिखाण करत आहेत. पण मला वाटत पुलंच्या विनोदाची सर कुठल्याच लेखनाला आलेली नाही, किंबहुना ती येणं शक्य नाही. म्हणूनच पुलंसारखाच त्यांचा विनोदही एकमेकाद्वितीय आहे.
इतकी वर्ष झाली तरी पुलंचा विनोद आपल्याला अजूनही हसवतो, रिझवतो, हसता हसता डोळ्यात पाणी आणतो! त्यांनी लिहिलेली पात्र खरीखुरी, जिवंत वाटतात. पुराव्याने शाबित करिन म्हणणाऱ्या हरितात्यांचा भास कुणाच्यात होतो, कुणाच्या तरी छापील वागण्यातून / बोलण्यातून एखादा सखाराम गटणे डोकावतो. “समस्त रत्नाग्रीच्या गाई तूर्तास गाभण का रे झम्प्या?” असं म्हणत टोमणे मारणारा पण फणसासारखा आतून गोड असणारा कोकणातला अंतु बरवा सारखा कोणी भेटतो आणि पुलंनी वापरलेली प्रतीकं, उपमा किती चपखल आहेत हे पदोपदी जाणवत राहत. त्यांच्या प्रत्येक विनोदाला एक करूण, हळवी किनार आहे. ती डोळ्याचे काठ नक्की ओले करते, ह्रदयात एक प्रकारची "फील गुड" भावना निर्माण करते. कदाचित यामुळंच पुलंचा विनोद अजूनही हवाहवासा वाटतो.
त्यांच्या विनोदाची शैली मिश्किल आहे, कुणालाही न दुखावणारी आहे. तो विनोद खऱ्या अर्थाने निर्मळ आहे. पुलंनी कधीच कुणाला दुखावणारा किंवा कमरेखालचा विनोद केला नाही - त्याची त्यांना गरजच पडली नाही. सहकुटुंब सहपरिवार दिलखुलास हसता येईल आणि हसता हसता अंतर्मुख करून जाईल असा विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य. अर्थात त्यांच्या विषयाला काही मर्यादा आल्या हे निश्चित. काही झालं तरी तो मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाशी निगडीत राहिला. त्यांनी पाहिलेलं, जगलेलं चाळीतले आयुष्य, आणि काळाच्या ओघात झालेले बदल न रुचल्यानं एक प्रकारचं स्मरणरंजन करणारा झाला. त्यामुळं पुलंच्या विनोदावर/लिखाणावर तो स्मरणरंजनात रमणारा विनोद आहे असा एक आरोप होतो. काही प्रमाणात तो खरा असेलही. पण मला वाटतं तो फक्त तेवढ्यापुरता सीमित राहिलेला नाही. त्यांच्या विनोदाची वीण ही पक्की आहे. कधीकधी विनोद सांगताना त्यातून अचानक एखाद वैश्विक सत्य अलगदपणे सामोरं येतं. उदा. शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना” किंवा “शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!”
तो विनोद पूर्णपणे कालसापेक्ष नाही, स्थळसापेक्ष नाही हे खरंय. आता चाळी नामशेष झाल्या, ओनरशिपचे ब्लॉक्स आले, माणसामाणसातला आपुलकीचा ओलावा काही प्रमाणात कमी झाला, जीवन अधिक वेगवान झाले. त्यामुळे असो किंवा विनोदाचे काही संदर्भ जुने झाल्यानं (उदा. लुगडी नेसून शाळेत जाणारी गोदाक्का आता नाही!) असो, पुलंचे काही विनोद आता फारसे समजत वा रुचत नाहीत. असं जरी असलं तरी त्या विनोदाचा दर्जा मात्र नक्कीच उच्च प्रतीचा आहे आणि तो मात्र अजिबात बदललेला नाही. या उलट आजकाल करमणुकीच्या क्षेत्रात पाहिलं तर विनोदाचा दर्जा फारच ढासळलेला दिसतो. अनेकदा ज्याला 'स्लॅपस्टिक कॉमेडी' म्हणतात तिकडेच तो झुकताना आढळतो. त्या पार्श्वभूमीवर पुल लिखित 'ती फुलराणी', 'असा मी असामी' ह्यातील विनोद अजूनही ताजातवाना वाटतो. "तुम्हाला पुणेकर, मुंबईकर का नागपूरकर व्हायचंय?" हा लेख असो किंवा पुलंचं 'माझा शत्रुपक्ष' असो हे विनोद कधीच जुना झालाय असं वाटत नाही. त्यांनी सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून निवडलेली माणसांची वैशिष्ट्य अजूनही काही बाबतीत तंतोतंत खरी असल्याचं जाणवतं! त्यांचं पौष्टिक खाद्यजीवन वाचताना अजूनही जिभेला पाणी सुटत नाही असा रसिक न सापडणं विरळच ! एवढंच कशाला, आता परदेश प्रवासाची नवलाई कमी झाली असली तरीही त्यांची अपूर्वाई/पूर्वरंग वाचताना विनोदाची झालर लोभस आणि सुखदायी वाटते.
शाब्दिक कोट्यात तर पुलंचा हात धरणारा कोणी नाही! त्यांच्या अनेक कोट्या अजूनही वापरल्या जातात! अगदी पुलंची सुनीताबाईंना उद्देशून केलेली "मी देशपांडे व ही उपदेशपांडे" ही कोटी असो वा उपहासाने म्हणलेले "आपल्या मदरटँग मध्ये आपले थॉट्स जेवढे क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ना तेवढे दुसऱ्या भाषेत येत नाहीत" वाक्य असो, आपल्याला हमखास हसवतेच! उगाच नाही त्यांना कोट्याधीश पुलं म्हणत !
त्यांच्या पूर्वीच्या लेखकांच्या लेखनात ज्यांच्यावर विनोद व्हायचा/केला जायचा त्यांना कुठंतरी शालजोडीतले मारता मारता त्यांची कुठंतरी खलनायक/खलनायिका अशी प्रतिमा तयार होत असे, पण पुलंच्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्या विनोदात खलनायकच नाही. त्यामुळे त्यांचा विनोद अजिबात बुळबुळीत होत नाही. उलट तो कितीही टोकदार झाला तरीही तो दुखावत नाही. साध्या शब्दातून हसवत, कोटी करत, उणिवांकडे बोट दाखवत आपल्याही नकळत, हळूच डोळ्यातून पाणी काढण्याचं कसब फक्त पुलंच्याच विनोदात आहे.
दुःखी असताना पु.ल. वाचले तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि आनंदात वाचले तर तो आनंद दुप्पट होतो असा माझाच अनुभव आहे. आणखी किती लेखकांच्या लेखनाबद्दल असं खात्रीनं म्हणता येईल? पुलंची भाषा अलंकारिक नाही पण त्यांचा विनोद कळायला, त्याचा आस्वाद घ्यायला मराठी भाषेची बलस्थान माहिती हवीत हे मात्र नक्की. पुलांसारखा विनोद परत होणार नाही असं जेंव्हा मी म्हणतो त्यामागे हे पण एक कारण आहे. मराठी भाषा झपाट्याने बदलत चालली आहे. भाषेविषयी आपुलकी, आत्मीयता हळूहळू कमी होते आहे. साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यापेक्षा चित्रपटातील झगमगीकडे समाजाचे, विशेषतः युवापिढीचे लक्ष आहे. त्या आकर्षणापोटी चांगल्या, दर्जेदार विनोदी साहित्याच्या निर्मितीची गती कमी झाली आहे. या पूर्वी म्हटल्याप्रमाणे ते वेगळे दृश्य माध्यम असल्याने तेथील विनोदही शारीरिक व प्रासंगिकतेकडे झुकणारे आहेत. असले विनोद काही वेळा क्षणभर हसवतातही, पण पुलंच्या कुठल्याच विनोदासारखे लक्षात राहात नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणूनच तसा विनोद परत होणार नाही असं मला वाटतं.
मंगेश पाडगांवकरांनी पुलंबद्दल लिहिलंय ते परत एकदा उद्धृत करावंसं वाटतं :
पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली
अशी आनंदयात्रा, हास्यगंगा तयार करणारा, निराशेतून बाहेर काढणारा विनोद परत होणार नाही असं म्हणणं खरं तर एका अर्थानं त्यांच्या लिखाणाचं, विनोदाचं कौतुक करणारं, अभिमानास्पद आहे आणि त्याच वेळी असे दर्जेदार विनोदी लिखाण करणारे आणखी मराठी लेखक अजून मिळाले हे शल्य असणारही आहे. पण ज्यांच्या नावातच दुसऱ्याला "पुलकित" करण्याचं सामर्थ्य आहे असे लेखक नेहमी जन्माला येतात थोडेच?
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
1 प्रतिक्रिया:
१०० टक्के खरी गोष्ट आहे, लेख आवडला.
Post a Comment