Wednesday, June 26, 2024

पु. ल. आज तुम्ही हवे होतात. - (अविनाश चंदने)

पु. ल. देशपांडे यांचा जन्म हा देण्यासाठीच झाला होता. त्यांनी महाराष्ट्राला उत्तम साहित्य दिले, उत्तम संगीत दिले, सुंदर काव्य दिले, मराठीजनांना पोट धरून हसवले, सामाजिक संस्थांना न बोलता ओंजळी भरून दिले. गुणीजनांचे तोंडभरून कौतुक करण्याची ख्याती पुलंचीच! साहित्य, नाटक, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल या सर्वांवर त्यांची हुकूमत होती. पुलंनी प्रत्येक गोष्टीला चार चाँद लावले. आजच्या इंटरनेटच्या युगात पुलंचे सर्व साहित्य, त्यांचे प्रयोग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही त्याचा आनंद घेतला जात आहे. १२ जून रोजी पुलंचा २४ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने या निर्लेप, सज्जन मनाच्या माणसाची ही आठवण.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून माझ्या जुन्या मित्राचा मुलगा भेटायला आला होता. एसटीने आलो म्हणाला आणि डोळ्यासमोर उभी राहिली ती पुलंची ‘म्हैस’. मी त्याला हातखंब्याविषयी विचारले आणि अजूनही तिथे एसटीसमोर म्हैस आडवी येते का असे विचारले. त्याला काही कळले नाही, मात्र माझ्या चेहर्‍यावरचे हसू त्याच्या नजरेतून सुटले नाही. मग त्याने कारण विचारले. त्याला एकच उत्तर दिले, एकदा पुलंची ‘म्हैस’ ऐक नंतर मला विचार. लगेच त्यांनी यूट्यूबवर म्हैस शोधली आणि ऐकली. त्यानंतर पुलंचे बरेच एकपात्री प्रयोग पाहिले, ऐकले आणि एकदम खूश झाला.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राला लाभलेले दैवी देणे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रात त्यांचा सिद्धहस्त वावर होता. त्यांना अख्खा महाराष्ट्र ‘पुल’ म्हणून ओळखतो आणि फिल्म इंडस्ट्रीत तसेच देशात ‘पीएल’ नावाने त्यांना हाक मारायचे. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुलंना जाऊन दोन तपं झालीत. 12 जूनला पुलंचा 24 वा स्मृतिदिन आहे. 12 जून 2000 रोजी पुलंनी शरीराने हे जग सोडले, मात्र त्यांनी साहित्याची, कलेची, त्यांच्या संगीतप्रेमाची छाप कायमची अवघ्या मराठीजनांवर सोडली आहे. तिचा कधीही कुणाला विसर पडणार नाही. 

पु.ल. म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात प्रथम येतात ती त्यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्रे. ज्यांनी पु.ल. देशपांडे वाचले आहेत तो माणूस हातखंब्याला आला की हमखास एसटीतून बाहेर डोके काढून बघणार! न जाणो एखादी म्हैस एसटीला आडवी येईल आणि मग उगाचच तीन-चार तासांचा खोळंबा येईल, मात्र तो खोळंबा सर्वांना हवाहवासा वाटेल. कारण त्यात बाबूतात्या, खादीवाले, उस्मानशेट, मास्तर, मुलस्ट्यांचा मधू, ती सुबक ठेंगणी या सर्वांच्या भेटी होतील. ही सर्व पात्रे पुलंनी रत्नागिरी ते मुंबई या एसटी प्रवासात अजरामर करून ठेवली आहेत.

पुलंचे आणखी एक असेच विशेष पात्र म्हणजे ‘नारायण’, जो सगळी कामे बिनदिक्कतपणे करतो आणि त्यानंतर नामानिराळा होतो तो नारायण. पुलंनी नारायणाला असा काही घडवला आहे की विचारू नका! काही वर्षांपूर्वी लग्नानिमित्ताने पुण्याला मुक्कामी होतो. सर्व काही सुरळीत सुरू होते आणि तिथला एकजण सारखी धावपळ करत होता. जणूकाही लग्नाची सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली होती. हे पाहून एका पाहुण्याने मला विचारले, हे सद्गृहस्थ आहेत तरी कोण? नारायण, असे उत्तर माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. 

लग्नसोहळ्यात एखादी व्यक्ती अशी असते जिच्याशिवाय पानदेखील हलत नाही. तो ‘नारायण’ असे पुलंनीच म्हटल्याने नारायण अजरामर झाला. पुलंची सर्व पुस्तके गाजली. त्यांना कायम मागणी राहिली. या सगळ्यांत ‘व्यक्ती आणि वल्ली’ने अमाप लोकप्रियता मिळवली. ही पात्रे पुलंना खरंच भेटली होती का, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यावर ‘म्हटले तर भेटली आहेत, म्हटले तर नाहीत,’ असे उत्तर पुलंनी दिले होते.

पुराव्यानं शाबीत करीन म्हणणारे ‘हरितात्या’, ‘परोपकारी गंपू’, विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधीही बसून न करणारा आणि बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं म्हणणारा ‘नाथा कामत’, नुसतीच सोबत करणारा टेस्टलेस-कलरलेस-ओडरलेस ‘गजा खोत’, पोरगं तावडीत सापडलं की त्याला घासून पुसून जगात पाठवणारे ‘चितळे मास्तर’, बुद्धीजीवी ‘लखू रिसबूड’, बदनाम झालेला ‘बबडू’, बेळगावमध्ये वेव्हलेन्थ जुळलेले ‘रावसाहेब’, पावणेसहा फूट उंच आणि निळ्या डोळ्यांचा ‘नंदा प्रधान’, रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर ‘अंतु बर्वा’, प्राज्ञ मराठी बोलणारा ‘सखाराम गटणे’ ही आणि अशी अनेक पात्रे केवळ आणि केवळ पुलंनी जन्माला घातलीत आणि त्यांना चिरंजीव केले.

पुल केवळ साहित्यात रमले असे नाही तर ते संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट अशा सर्व ठिकाणी त्यांनी उत्तम तेच दिले. जे उत्तम असेल, चांगले असेल त्याचे पुल कौतुक करायचे. नवोदितांना प्रोत्साहन द्यावे तर पुलंनीच. ‘वस्त्रहरण’ हे मच्छींद्र कांबळी यांचे नाटक सर्वांना माहीत आहेच. हे नाटक सुरुवातीला चालले नाही. पुलंनी ते पाहिले, त्याचे जाहीर कौतुक केले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आजपर्यंत या नाटकाचे कौतुक करताना दमला नाही. ‘कोसला’ कादंबरीचेही असेच आहे.

पुलंनी ‘कोसला’चे जेवढे कौतुक केले तेवढे कदाचित कुणीही केले नसावे. विशेष म्हणजे ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि पुलंचे फारसे कधी जुळले नाही, मात्र ‘कोसला’चे कौतुक करताना त्यांच्यातील मतभेद कधीही दिसले नाहीत. साहित्य, नाटक, संगीत, चित्रपट आणि हो माणसांत रमणार्‍या पुलंना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्यांची पुस्तके, त्यांचे एकपात्री प्रयोग हे सर्व आजही मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत.

1942 चा लढा असो किंवा 1977 चा आणीबाणीचा संघर्ष, पुलंनी लेखणी बाजूला ठेवून राजकारणात उडी मारली होती. तिथे त्यांनी अनेकांची भंबेरी उडवली होती, मात्र हेतू साध्य झाल्यावर राजकारणातून अंग बाजूला काढून ते पुन्हा लिखाणाकडे वळले. पुल ही व्यक्ती अगदी हटके होती. आताच्या जनरेशनला कदाचित ठावूक नसेल म्हणून पण भारतात दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुलंना मिळाला होता.

त्यासाठी त्यांना लंडनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजनचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दूरदर्शनमध्ये सर्वकाही उत्तम चाललेले असताना त्यांनी ते सोडले. पुल कधीही एका जागी स्थिर राहिले नाहीत. राज्याच्या साहित्य, कला, संगीत क्षेत्रासाठी पुलंचे एका जागी स्थिर न होणे जमेची बाजू ठरली. पुल सर्व क्षेत्रात वावरले म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐश्वर्यात आणखी मोठी भर पडली.

पुलंनी पन्नाशीनंतर म्हणजे 1970 च्या सुमारास बंगाली शिकण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ते गुरुवर्यांच्या (रवींद्रनाथ टागोर) पश्चिम बंगालमधील शांती निकेतनमध्ये गेले होते. ते बंगाली नुसते शिकलेच नाहीत तर त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्वही मिळवले होते. बेळगावमधील राणी पार्वतीदेवी कॉलेज, मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मालेगावमधील महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते प्रमुख होते.

मुंबई, पुणे तसेच दिल्लीच्या आकाशवाणीत त्यांनी नोकरी केली. पुलंना काहीही वर्ज नव्हते. त्यांची नजर जिथे जायची त्यात ते पारंगत होत असत. असे असले तरी संगीत त्यांच्या नसानसात होते. पं. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व आदींशी पुलंची खास मैत्री तर बालगंधर्व यांच्याविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा होता. संगीत मैफलीत पुल रमून जायचे.

पुलंची ‘वार्‍यावरती वरात’, ‘रविवारची सकाळ’, ‘बटाट्याची चाळ’ यांचे प्रयोग तर प्रेक्षकांनी उचलून धरले होते. यांचे प्रत्येक प्रयोग कायम हाऊसफुल्ल होत असत. पुलंनी त्या काळी चित्रपटसृष्टीही गाजवली होती. त्यातील ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला सबकुछ पुल म्हटले जाते. म्हणजे याची कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आणि दिग्दर्शन पुलंनीच केले होते. विशेष म्हणजे चित्रपटाचे नायकही पुल होते. आता गंमत पाहा, हा चित्रपट खूप चालला, चांगली कमाई केली, पण दुर्दैवाची बाब ही की चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रणही नव्हते. तिकीट काढून पुलंनी तो चित्रपट पाहिला होता.

व्यवहारी जगात पुलांना अनेकांनी फसवले होते, मात्र पुलंनी कधीही कुणावर राग धरला नाही की फसवणूक करणार्‍यांना त्यांनी कधी कोर्टात खेचले नाही. एवढेच कशाला फसवणूक करणार्‍यांबद्दल कुणाजवळ वाईटही बोलले नाहीत. कारण पैसा ही त्यांची गरज नव्हती, तर पुलंची कमाई ही सामाजिक गरज होती.

पुलंनी कुठलाही गाजावाजा न करता समाजाला भरभरून दिले. पुस्तकातून दिले, प्रयोगातून दिले, कवितांच्या कार्यक्रमातून दिले आणि खिशातून न मोजताही दिले. अनेक सामाजिक संस्थांना पुलंनी कुठलीही वाच्यता न करता आर्थिक मदत केली. त्यांच्यासाठी कायमची आर्थिक तजवीजही केली. त्यांनी उजव्या हाताने केलेले दान त्यांच्या डाव्या हातालाही कळले नसेल इतके पुल निर्लेप आणि सज्जन मनाचे होते.

– अविनाश चंदने
९ जून २०२४
उप वृत्तसंपादक आपलं महानगर
मूळ स्रोत - https://www.mymahanagar.com/featured/saransh/pu-la-today-you-are-wanted/752763/

0 प्रतिक्रिया: