Monday, April 22, 2024

मण्यांची माळ - एक विचारमंथन (तन्वी राऊत)

“आयुष्यात एका आवडत्या लेखिकेला भेटायची संधी तुला देवाने दिली तर तू कुणाला भेटशील?” असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर सर्वप्रथम सुनीताबाई देशपांडेंचंच नाव माझ्या मनःपटलावर तरळून जाईल यात शंका नाही. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी त्यात झोकून देण्याची वृत्ती हे गुण तर सर्वश्रुत आहेतच. पण त्यांबरोबरच आजबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याची सवय, स्वतःतील गुणदोषांची त्यांना असलेली जाणीव आणि स्वतःतले दोष स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा, स्वतःचं मत व्यक्त करण्याची सडेतोड पद्धत, त्याचबरोबर परिस्थितीकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मला भुरळ न पडती तर नवल. ‘आहे मनोहर तरी’ या त्यांच्या आत्मकथनाची पारायणं करुन झाल्यावर माझ्या वाचनात आलेलं मण्यांची माळ हे सुनीताबाईंचं दुसरं पुस्तक.

सुनीताबाईंच्या १३ पूर्वप्रकाशित ललितलेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. हे लेख म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितींचं, आलेल्या अनुभवांचं सुनीताबाईंनी केलेलं विचारमंथनच म्हणावं लागेल. त्याचबरोबर आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींसोबतचे अनुभवही या लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. या लेखांतील त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ओघवती असल्यामुळे, वाचकाशी लेखिकेने केलेला तो संवादच वाटू लागतो.

‘एक पत्र’ या पहिल्याच लेखात सुनीताबाईंनी पुलंसोबतचं त्यांचं सहजीवन, एकमेकांचे गुणदोष स्वीकारून केलेली आयुष्यभराची सोबत, पुलं गेल्यानंतरचं त्यांचं बदललेलं आयुष्य आणि त्या अनुषंगाने आठवणी, जीवन-मृत्यू, अस्तित्व यांबद्दलचे विचार मांडले आहेत. ‘निमित्त १२ मार्च’ या १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांवरच्या लेखात राजकारणात वाढीस लागलेली स्वार्थी वृत्ती, व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, त्यांतून निर्माण झालेली धार्मिक तेढ, वैरभावना यांबद्दल वाचताना मन सुन्न होतं. किंबहुना त्या घटनेनंतर ३० वर्षांनंतरची आजची परिस्थिती आणखीच विदारक झाल्याचं जाणवतं. ‘डोडी’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘आनंदमयी सृष्टीची जीवनासक्ती’ आणि ‘महात्मा थोरो’ या लेखांतून मानव आणि इतर पशूंमधील परस्पर संबंध, त्यांचा एकमेकांवरील विश्वास, निसर्गाला मानवाने आणि इतर पशूंनी दिलेली वागणूक याबद्दलच लिखाणही वाचनीय. या पुस्तकातील सर्वच लेख वाचकाला मानवी मूल्य, स्वभावातील गुणदोष, तसेच माणसाच्या अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीचे भविष्य काळात येणाऱ्या पिढीला भोगावे लागणारे परिणाम यांबद्दल विचार करायला भाग पाडतं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. वाचायलाच हवं असं पुस्तक.

- तन्वी राऊत 
https://www.instagram.com/herbookishworld

0 प्रतिक्रिया: