Sunday, August 30, 2020

साधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...

पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिलं आहे. त्या पुस्तकातच ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या १९६८ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. बाबा आणि साधनाताई ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करता येण्यासारखी नाहीत. ‘पुलं’नी या लेखात साधनाताईंचे गुणही गायिले आहेत. पाच मे हा साधनाताईंचा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्या प्रेरणादायी लेखातील साधनाताईंविषयीचा काही भाग प्रसिद्ध करत आहोत.........

तुकोबा म्हणाले, ‘आम्ही बिघडलों तुम्ही बिघडा ना-’ मुरलीधरपंत आमटे बिघडले. सारी सुखे सोडली आणि वनवासाला निघाले. आजतागायत त्या वनवासाची धुंदी उतरत नाही. झपाटल्यासारखा वावरतो आहे. उपेक्षितांच्या जीवनात अपेक्षा निर्माण करतो आहे.

आणि भाग्य असे, की ह्या भणंगावर भाळलेली एक गौरीही त्याच्या जोडीने जीवनातल्या साऱ्या ज्वालांना फुले मानीत चालते आहे. बाबा, साधनाबाई, त्यांची मुले, सारी जणे टुमदार बंगला, टुमदार गाडी, टुमदार बगीचा असल्या चौकटीत काय मजेत बसली असती. ते सोडून अभाग्याचे अश्रू पुसणे हा आमटे घराण्याचा एकमेव कुळाचार असल्यासारखे हे सारे कुटुंब राबते आहे. बाबांच्या निर्भयपणाचे आता चोहीकडे कौतुक आहे; पण आपल्या तान्ह्या पोरांना घेऊन गावाबाहेर त्यक्त, बहिष्कृत अशा अवस्थेत, दोनदोनशे-चारचारशे महारोग्यांच्या संगतीत राहणाऱ्या साधनाताईंपेक्षा दक्षप्रजापतीचा महाल सोडून स्मशानवासी, नररुंडधारी, बंभोलानाथाशी संसार करणारी गौरी आणखी काय निराळी होती? मला ह्या जोडप्यात शिवपार्वतीचे दर्शन झाले आहे. मुरलीधर आमटे नावाचा सर्वसंगपरित्यागी, साहसी, कलाप्रिय, बुद्धिमान तरुण आणि ज्या घुले घराण्यात चांगले आठ महामहोपाध्याय झाले, अशा व्युत्पन्न कुळातली आणि जिला रेशमाशिवाय दुसऱ्या सुताची वसने लेऊ दिली नाहीत असल्या धनत्तर वडिलांची इंदू घुले नामक कन्यका ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे मिळून ‘बाबा आमटे’ नावाचे अद्वैत वावरते.

भारतीय संस्कृतीत आम्ही शिवपार्वती, सीताराम, राधाकृष्ण, विठ्ठलरखमाई असे प्रकृतिपुरुषांचे संपूर्ण मीलन झालेले व्यक्तिमत्त्व आदर्श मानीत असतो. पूर्णत्वाची आमची कल्पना अर्धनारीनटेश्वराची आहे. पुरुषाच्या पराक्रमाला स्त्रीची करुणा लाभली नाही, तर त्या पराक्रमाचे क्रौर्यात रूपांतर होते. वादळवाऱ्यातून, आगवणव्यातून बाबांच्या जोडीने चाललेली त्यांची पत्नी खऱ्या अर्थाने त्यांची सहधर्मचारिणी आहे. त्यांचा भयंकर वनवास हा आनंदवनवास झाला त्याचे कारण त्या वनवासातला त्यांचा आश्रम हा सर्वश्रेष्ठ असा गृहस्थाश्रम आहे आणि म्हणूनच बाबा आमट्यांची क्रांती आग लावा, जाळा, तोडा-फोडा, पेटवा, घेराव, बंद ही भाषा बोलत कैदाशिणीसारखी येत नाही.

इथे अग्नी अन्न शिजवतो, बसेस जाळत नाही. जखमा केल्या जात नाहीत, बऱ्या केल्या जातात. हातांना मुठी उगारणेही शिकवले जात नाही, भिकेसाठी पसरणेही नाही. गृहस्थधर्मात ते बसत नाही. इथे बोटे गळून पडलेले हातदेखील शेते पिकवतात. इथे आस्वादाला प्रतिबंध नाही, अनावश्यक संग्रहाला आहे. इथे त्यागाची आणि भोगाची आत्यंतिक भाषा नाही. जीवनाचे पात्र कळकू नये म्हणून अनावश्यक भोगांच्या त्यागाची त्या पात्राला कल्हई लावावी लागते. आनंदयज्ञाचा संकल्प सोडून शुचिर्भूत होऊन राहिलेले हे जोडपे आहे. दाम्पत्याशिवाय यज्ञ होऊच शकत नाही. इंदूताईंचे सासरचे नाव ‘साधना’ असे बाबांनी ठेवले, तरी त्यांना ते स्वतः आणि इतर सर्व जण इंदूताईच म्हणतात.

हातभर दाढी वाढवून उघड्याबंब देहाने वावरणाऱ्या ह्या पहाडाएवढ्या भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुड्याच्या जोडीला दारिद्र्याचा वसा घेत आहोत, हे त्या जाणत होत्या. एका झंझावाताशी संसार करायला चंदनी गाभाऱ्यात जपलेली ज्योत निघाली होती. अशीतशी असती, तर केव्हाच विझली असती. अनेक वर्षांपूर्वी अशीच एक विदर्भकन्या कृष्ण नावाच्या गवळ्याबरोबर राजमंदिर सोडून पळाली होती!

ह्या विज्ञानवादी माणसाला निराशा ठाऊक नाही. मात्र विज्ञानाला जशी तडजोड मंजूर नसते, तशी बाबांनाही नसते. शिखरे धुंडाळण्याच्या वेडाने पछाडलेल्या क्यूरी पतिपत्नींसारखे, एडिसनसारखे हे जोडपे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘दारू प्यालो, तेव्हा घड्यांनी! प्रेमविवाह केला, त्यासाठी गुंडांच्या सुऱ्याचे वार छातीवर घेतले. नवरदेव पलिस्तरे मारून वेदीवर बसले होते. लग्नापूर्वी सुऱ्यांच्या वारामुळे रक्त ओकीत होते.’ डॉक्टर म्हणाले, ‘तुम्ही फारसे जगण्याची आशा नाही.’ तरीही लग्न करायचे दोघांनीही ठरवले. आणि एका पत्रात बाबांनी तिला लिहिले – ‘असे जगू आपण की एक एक क्षण म्हणजे एक एक दिवस ठरावा आणि एक एक दिवस म्हणजे एक एक आयुष्य व्हावे.’

या लग्नाने बाबांच्या अस्वस्थ भ्रमंतीला संरक्षक कुंपणाचे एक क्षितिज घातले. एक वादळ हळूहळू माणसाळले जाऊ लागले. प्रळयंकर महादेवाचा रुद्रावतार संपला. शिवपार्वतीने संसाराचा सारीपाट मांडला. आता जीवनातल्या साऱ्या प्रयोगांना गृहस्थी संस्कारांचे स्वरूप लाभले. म्हणून धाडस संपले नाही. ते संपणार नाही.‘पुलं’च्या या लेखाचा शेवटही मनाला हात घालणारा आहे.....
............

बाबांच्या आणि ताईंच्या सहवासातले ते सात दिवस आठवले की भगवद्गीतेतल्या संजयाच्या शेवटच्या आनंदोद्गारांची आठवण होते :

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः।
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनःपुनः।।

आनंदवन सोडून जीप वर्ध्याच्या दिशेला लागली होती. समोरच दोन पळस डोक्यावर आगीच्या पताका घेऊन फुलले होते. ज्वालांचा आणि फुलांचा काय मनोहर संयोग होता!
‘पळसाची जोडी काय सुंदर फुलली आहे!’ कुणीसे म्हणाले.

‘बाबा आणि ताईसारखी!’ मी मनाशी म्हणालो.

- पु. ल. देशपांडे
.....
(पु. ल. देशपांडे यांच्या ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा काही अंश आहे. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4701421677406893535&title=Sadhanatai%20Amte&SectionId=1002&SectionName=Be%20Positive

मूळ स्रोत -- https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4701421677406893535&title=Sadhanatai%20Amte&SectionId=1002&SectionName=Be%20Positive

1 प्रतिक्रिया:

Snehal said...

Very Nice...
Please visit my Marathi channel and subscribe...