Tuesday, July 26, 2022

भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन - पु.ल. देशपांडे

इंग्लंड वरून परततांना बोटीवरील हिंदी पोरांच्या इंग्रजी बायका आणि त्यांचे प्रयत्न बघून मनात आलेले विचार मांडताना पु.ल. 'अपुर्वाई'त म्हणतात,

माझ्या बोटीवर ज्या काही गौरकाय सुनबाई दिसत होत्या, त्यांची मात्र मला मनापासून दया येत होती. त्या बिचाऱ्या आपल्याकडून अगदी खूप साड्या नेसायचा आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण पदरदेखील नीट न सावरता येणाऱ्या पोरी इथे संसार कसा सावरणार, ह्याची मला उगीचच चिंता वाटत होती. पुष्कळजणी खूप उत्साहाने येतात आणि तितक्याच निराशेने परततात. पण आमच्या तरुणांनी तिथे जी गौरांगनांसह बिऱ्हाडे थाटली आहेत, त्यांची तर अवस्था फारच करुण आहे. हिंदी लोकांच्या संगतीला हे मडमांचे देशी नवरे सारखे टाळतात आणि गोऱ्यांच्या कुटुंबात त्यांचे स्वागत फारसे मनापासून होत असावेसे वाटत नाही.
 
गोऱ्या बाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची एक गोष्ट मला आठवते. तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला होता. पण तिला ‘खरकटं’ म्हणजे काय ते समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला होता. ती म्हणे, “जेवून ताटात उरलेलं जर खरकटं, तर हात कसा खरकटा? पेला कसा खरकटा?” मला वाटते, संसारात भावनात्मक एकात्मता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. खरकटे म्हणजे काय? पारोसे म्हणेज काय? पाण्यातली दशमी ओवळ्याची आणि दुधातली सोवळ्याची कशी? निऱ्या काढणे आणि घडी करणे ह्यातला फरक करणारी रेषा कुठली? कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा केव्हा होतो आणि चटणी कधी होते? पिठले आणि झुणका ह्यांच्या सीमारेषा कुठल्या? हे कळणे अधिक महत्वाचे! जेवताना सणसणीत भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन कसे होणार?
धागे जुळतात ते अशा चिल्लर गोष्टींनी!
ओंजळीतले तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्यांना लावताना जे गार वाटलेले असते, ते बर्फाचा खडा घेऊन वाटत नाही. माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होते! इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन हिंदुस्थानात जाऊन केळीच्या पानावर मऊ मऊ भात, वरण, लोणकढे तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून दोन घास खाऊन यावे, असे डोहाळे लागले होते. आजन्म पाश्चात्य वातावरणात राहिलेल्या माझ्या जेष्ठ मित्राने मृत्युशय्येवरून पिठलंभात खायची इच्छा व्यक्त केली होती. रक्ताच्या थेंबा थेंबात लपलेला तो आत्माराम अशा काही चमत्कारिक गोष्टींची मागणी करतो आणि – ‘गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर केवळ दुवा आहेस’ याची जाणीव करून आपल्याला एकदम लहानांत काढून टाकतो.

'अपूर्वाई' मधे इंग्लंड/फ्रान्स फिरून झाल्यावर परतीच्या प्रवासात पु.ल. म्हणतात
 
'मला सदैव वाटे की, इंग्रजी अन्न्पाण्याचे माझ्या नसांतून रक्त झाले नाही. केवळ देह्धारणेच्या ते कामी आले. पॅरीसला सर्व प्रकारची मुक्तता असूनही सीन नदीच्या काठी एका संध्याकाळी आम्ही भटकत असताना कोणी नाही असे पाहून मी जोरजोरात 'मनाचे श्लोक' ओरडून घेतले तेव्हा जिवाला गार वाटले.'


पु.ल.देशपांडे
-अपूर्वाई

संपूर्ण पुस्तक मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

1 प्रतिक्रिया: