Tuesday, December 16, 2014

पु.ल. तुम्ही स्वतःला कोण समजता?

सर्वाधिक आवडते लेखक किंवा लाडके व्यक्तीमत्व किंवा अनेकांचे दैवत! नांव आठवले की त्या नावाने लिहिले गेलेले सर्व काही क्षणात आठवते आणि माणूस असेल तेथे खुदकन किंवा फस्सकन हासतो. त्या हासण्याचे समर्थन देता येत नसल्यामुळे बावरून इकडेतिकडे पाहतो. हे अनुभव महाराष्ट्राने गेले काही दशके वारंवार घेतले. विनोदाला साहित्यात ठाम स्थान देणे ही बाब जवळपास अशक्यकोटीतील, पण ती क्षुल्लक वाटावी असे प्रभुत्व. शब्दाशब्दातून ज्ञान, वाचन, अनुभव, निरिक्षणशक्ती, मिश्कीलपणा आणि अनेकदा होणारा गलबलवणारा शेवट यांचे मिश्रण सातत्याने दिसून येते. रूढ असा साहित्यप्रकार हाताळण्याचा आव न आणता व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन, सौम्य व मिश्कील टीका यामार्गे नवीन 'ट्रेंड' सेट करणे. कर्मठ समीक्षकी वर्चस्वाला हास्याच्या धबधब्यात वाहून नेणे. जवळपास सहा ते दहा दशकांपूर्वीची मराठी संस्कृती चितारणे आणि त्या चित्रदर्शी लेखनातून विनोदाच्या परिभाषा अधिक व्यापक आणि अधिक 'सभ्य' व 'सुसंस्कृत' करत पुढच्या काही पिढ्यांना विनोदी लेखनाची ओढ लावणे.

पु.ल. अतिशय गंभीर लेखन करायचे हे मत वरकरणी हास्यास्पद वाटू शकेल. पण लयीपासून जाणीवपूर्वक फारकत घेत अगम्यतेचा पोषाख धारण करणारी कविता डोक्यावर घेतली जात होती तेव्हा या माणसाने केवळ एका व्यक्तीमध्ये किती पैलू असतात हे दाखवत ताज्यातवान्या अभिरुचीची एक नवीन पिढी निर्माण केली. दैनंदिन जीवनात सामान्य माणसे किती असामान्य भावविश्वात जगत असतात हे प्रभावीरीत्या रेखाटणे ही कला देणगी या स्वरूपातच देवाकडून मिळाली तर मिळेल. घोकमपट्टीतून जमणारी ती बाब नव्हे. ब्रिलिअन्स, जिनियस, टॅलेन्ट हे शब्द अशा लेखकांसाठी सढळपणे वापरले जात नाहीत. हे दुर्दैव बदलण्याची क्षमता त्यांच्यात होती.

पु.ल अ‍ॅट अ ग्लान्स या स्वरुपाच्या या आढाव्यात गुणविशेष नोंदवणे हा उद्धटपणा ठरेल, पण भरभरून बोलावेसे वाटत आहे. औदार्याच्या भावनेने बोलू द्यावेत.
.................................

१. चेहर्‍या व मुखवट्यातील अंतर -
माणूस प्रत्यक्षात जे असतो आणि स्वतःला जे समजतो त्यात असलेले अंतर हा पुलंच्या लेखनाचा मोठ्या अंशाने आधार होता. व्यक्ती वल्ली यात ते ठळकपणे दिसते तसे चाळीतही दिसते. हे अंतर पुलंनी मिश्कीलपणे पाहिले. एखादा साधा महानगरपालिकेचा कर्मचारी भारताची कुंडली मांडतो ही सामान्य माणसाला बोचरी टीका करण्यास पात्र असलेली बाब वाटली असती. पण पुलंनी त्या अंतराकडे गंमतीने पाहायला शिकवले. त्या व्यक्तीच्या अभिमानाची (किंवा दुराभिमानाची) सौम्य खिल्ली उडवत त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाला मात्र उदंड गौरवले. त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाच्या उल्लेखाने वाचकांना रडवले. विनोद म्हणजे असभ्यता, टवाळी व टीका हे समीकरण येथेच मोठ्या प्रमाणावर बदलले गेले. अशी उदाहरणे तर कित्येक आहेत, पण बाबा बर्वे यांची वासरी हे सहज आठवणारे आणि प्रभावी उदाहरण. माणूस स्वतःला जे समजतो व प्रत्यक्षात जे असतो त्यातील अंतरावर पुलंचे किमान अर्धे लेखन तरी विसंबून असावे असे वाटते. बराचसा विनोदही त्यावरच झालेला दिसतो. गुंड व तुरुंगात गेलेला मित्र आज 'प्याकार्ड' गाडीतून हिंडतो आणि तो घरातून गेल्यानंतर आई पुन्हा पावसात भिजलेल्या साखरेवरून आपल्याला बोलते येथे सत्याचरण कितपत शक्य आहे असा सवाल प्रत्यक्षात न विचारता वाचकावर सोपवले जाते. स्टनिंग!

२. निर्विवाद 'अवादग्रस्त' लेखन -
ज्या उल्लेखांमुळे आज वाद आणि मारामार्‍या होऊ शकतात त्यापैकीच्या विषयांबाबत पुलंनी अशा काही कौशल्याने लेखन केले की वादाची भीती तर सोडाच पण निखळ हसू यावे. शिवाजी महाराज्, संभाजी महाराज, गांधीजी, विनोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, टिळक, आगरकर यातले कोणीही त्यांच्या लेखणीतून सुटले नाही. पण त्या उल्लेखांचे निखळ हसूच का आले तर त्यातही पुन्हा सामान्य माणसाला 'या सर्व मोठ्या नावांच्या पूजनाने मला काय मिळणार' असे वाटते हेच प्रकर्षाने नोंदवले गेले. तात्यांनी इतिहासाच्या गोष्टी सांगताना ते सगळे एकाच वाड्यात राहात असावेत असे म्हणणे हे खुबीने लहान मुलाचे मत म्हणून नोंदवले आहे. पण खरेच ही सर्व महान नांवे एकाच वाड्यात राहतात ज्या वाड्याला अंधश्रद्धेची जमीन आणि जातीयतेचे छत आहे.

३. पितळ उघडे पाडणे -
मोठमोठ्या प्रस्थापित साहित्यिकांचे व समीक्षकांचे पुलंनी पितळ उघडे पाडले. शब्दबंबाळ मते मांडणार्‍यांना त्याच भाषेत उत्तरे दिल्यावर ते कसे नामोहरम होतात व मुळात त्यांचा आवेश कसा 'दोलायमान' असतो हे स्पष्ट केले. हे सर्व पूर्णपणे काल्पनिक नाहीच. उलट 'विनोदी लेखक तुच्छ समजला जातो' ही कळकळ त्यांनी हासवत हासवत व्यक्त केली.

४. बेजोड निरिक्षण -
काही आवाज, काही खाद्यपदार्थ, काही सुगंध / गंध यावर पुलंनी जे लिहिले आहे ते पटत नाही असा मराठी माणूस नसेल. आपल्या नकळत आपल्या मनावर या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. लहानपणी वर्गात सर्वांच्या डब्यातील पोळ्यांचा वास, कोणाच्यातरी गजर्‍याचा वास असा एकत्रीत वास असायचा हे सगळ्यांनी अनुभवलेले असते. म्हैस मध्ये कोकणातून निघालेल्या डब्यात एकत्रीत झालेले वास कोणकोणते हे वाचताना पटते. गोवेकरी नुसत्या एका प्रकारच्या माश्याची सव्वीस व्हर्जन्स सांगेल असे म्हणताना वाचकाला भूक लावण्याच कौशल्य दिसते. (आम्हाला तो मासा कोणता हे आठवत नाही म्हणून आम्ही दरिद्री).

५. विनोदाचे वेगळे प्रकार -
टीका, चॅप्लीन प्रकारचे विनोद, चित्रपटात वेडेवाकडे आविर्भाव करण्यातून विनोद निर्मीती, कंबरेखालचा विनोद, राजा गोसावी टाईपचे क्षणभंगुर विनोद यापेक्षा विनोदाचे वेगळे प्रकार त्यांनी दिले. प्रामुख्याने शाब्दिक कोट्यांमध्ये असलेली सरसता दुर्मीळ! अर्थात, त्यांनी ती सरसतेची पातळी दाखवल्यावर आज त्याच पातळीच्या कोट्या करणारे अनेक वीर गाजतात हेही पुलंचेच यश. व्यक्तीचित्रणामध्ये त्यांनी निरिक्षणातून चित्रदर्शीत्व या प्रकारचा विनोद निर्माण केला. म्हैस ही कथा याचे उत्तम उदाहरण. भिंत पिवळी आहे असे मी म्हणतो यावर तुझे काय मत आहे असे विचारल्यावर 'असे तू म्हणू नयेस' असे लिहून एक 'टायमिंग परफेक्ट' वाला विनोदही मोठ्या प्रमाणावर केला आहे. मास्तरांपेक्षा सापळाच जरा मांसल होता अशा प्रकारचे अतिशयोक्तीयुक्त विनोदही त्यात आहेत. नाथाचे लग्न झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी तो रस्त्यावरच्या एका मुलीबाबत सुस्कारे सोडत बोलतो हा करुण विनोद वाटतो. मात्र या सर्वाहून अधिक त्यांनी काय केले असेल तर स्वतःवर विनोद! हे कोणीच केले नव्हते चॅप्लीनशिवाय (आणि काही प्रमाणात राज कपूर). याची असंख्य उदाहरणे त्यांच्या लेखनात मिळतात. माणूस स्वतःला त्रयस्थपणे पाहू शकतो तेव्हा तो इतरांना स्वतःसारखा वाटतो हे तत्व पुलंनी सप्रमाण सिद्ध केलेले दिसते.

६. संस्कृती -
ब्रिटिश असताना आणि गेल्यावर अशा काहीश्या काळातील हे लेखन आहे. उत्तम निरिक्षणशक्तीमुळे पुलंच्या लेखनात समकालीन संस्कृती खच्चून भरलेली आढळते. पण त्याहीपेक्षा ती प्रभावीपणे लिहिली गेलेली दिसते. किंबहुना संस्कृती हा त्यांच्या लेखनाचा एक आधार असावा इतपत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजाला आलेला एक वैचारीक थकवा व रिकामेपणा आढळतो.

७. रोमिओगिरी -
या पातळीचे काहीच लिहिले नाही त्यांनी. मात्र स्त्रीचे ते रूप वारंवार त्यांच्या लेखनात येत राहिले. चाळीतल्या मुली, रस्त्यावरची चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे, पोंबुर्पेकराच्या वासरीतील एका दिवशीची फक्त 'हाय' (खाल्लेली की उद्गारलेली हे नोंदवलेले नाही) यातून पुलं 'तसे' रोमॅन्टिक होते हे म्हणता येईल. कदाचित लग्नापूर्वीची प्रेयसी असावी. असे लोक लेखनातून दु:खाला वाट देतात. ते लेखन पटकन भिडतेही.

८. वकूब -
त्यांचे अफाट वाचन, ज्ञान आणि चपखल उल्लेख इतके वारंवार आढळतात की एखाद्या महान समीक्षकापेक्षा फक्त पुलं वाचले की बास असे वाटू लागते. मुळात ते स्वतः अष्टपैलू असल्यामुळेही हे होणारच.

..............................

याहीपेक्षा कितीतरी अधिक असे गुणविशेष असतील जे एखाद्याला जाणवतील तर दुसर्‍याला नाही. पण विषय असा की आज पुलंचे विनोद वाचून हसू येते का? आज ती संस्कृती वाचण्यात रस असलेली पिढी आहे का? या गोष्टीचा संबंध संस्कृती बदलण्याशी अथवा इंग्रजी मिडियमशी लागणे येथे अभिप्रेत नसून पुलंच्या लेखनाची अमरता वा कालबाह्यता याबाबतच्या चर्चेशी लागावा असे वाटते.

साधारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत पुलंचे लेखन वाचून खो खो हासणारे आम्ही.. आज रात्री झोप पटकन यावी म्हणून 'उरलंसुरलं' किंवा 'गोळाबेरीज' वाचायला हातात घेतो यामागे आमच्या मनात कोरडेपणा उरला हेही कारण असेल. पण असे वाटते की एका मोठ्या, एका महान लेखकाला कालबाह्य करू शकेल इतका प्रचंड वेगवान बदल गेल्या दोन दशकात झाला. संस्कृतीची उलथापालथ झाली. वाडे इमारतीत रुपांतरीत झाले. चाळीत राहणारे आता उपनगरांमध्ये स्थलांतरीत होऊन आपल्या नातवांना मांडीवर खेळवू लागले. नुसत्या नजरेने प्रेम बसायचे तिथे आता फेसबूक आणि सेलफोनवर प्रेमाचे सर्व अध्याय एकाच आठवड्यात उरकू लागले. पोरींना बापाची भीती राहिली नाही आणि पोरांना पोरींची. आता परीट कपडे लंपास करत नाहीत आणि शिंपी राजकारणावर बोलत नाहीत. रत्नांग्रीतल्या सार्‍या म्हशी गाभण असण्याचा चहाच्या रंगाशी काय संबंध हे समजणारी मुले आता नाहीत. ते विचारणारी मुले तर नाहीतच. तो भिंगार्डे की कोण तो विचारायचा तसेच आता रडत रडत विचारावेसे वाटते..

"पु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता?"
..................................................

गंभीर समीक्षक
२५ एप्रिल २०१२
मुळ स्त्रोत --> http://www.maayboli.com/node/34513

2 प्रतिक्रिया:

Onkar Karandikar said...

Tumcha lekh khup awadla.
Pu.La n Chya lekhanache pailu chan mandlet.
Pan shevti Je tumhi mhntlay ki Pu.La n Che Vinod ajchya
Tarun mulana avadat mahit...asa ka?? Praman kami zala asel kadachit pan ajahi pu.la n var prem karnare lok ahetch... Mi swataha colg la janara 21-22 varshancha mulga ahe... Ani mala Pu.La n Che Vinod PranPriya ahet...tyanchya shabdik kotya ,kisse mi athvun haslo nahi kiva konala haslo nahi Asa ek ideas jat nahi.. Aso.. Kadachit tumcha correct pan asel ...

Apli harkat nasel tar mi Pu.La n var ek lekh lihilay mazya blog var...here is a link
mantaranga.blogspot.in

Anonymous said...

छान लेख! फक्त तपशिलातली दुरुस्ती - तो भिंगार्डे नसून भिरके आहे.
बाकी मस्तच!