Wednesday, December 17, 2014

मला भावलेले 'पु.ल.'

मी साधारण ५-६ वी मध्ये असेन, तेव्हा माझ्या हातात एक निबंध-लेखनाचं (इयत्ता १० वी च्या मुलांचं ) पुस्तक आलं.सहज वाचताना मला त्यात एक 'माझा आवडता लेखक' असा निबंध सापडला. त्यात एक ओळ होती 'विनोदाला कारुण्याची झालर असणारा लेखक' ,ती ओळ होती उभ्या महाराष्ट्राच्या हृदय-सिंहासनावर राज्य करणारे विनोदसम्राट,साहित्यिक,गीत-संगीतकार,नाटककार,नट … विशेषणं कमी पडतील असे 'पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे' यांच्याविषयी. तेव्हा मला त्याचा फारसा अर्थ कळला नव्हता ,पण ती ओळ मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहिली.

त्या नंतर काही वर्षांनी हळुहळू जेंव्हा पु.लंनी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत' यांसारखी पुस्तकं वाचली, 'असा मी असामी' वाचलं , तेंव्हा ती ओळ मला पुन्हा आठवली आणि त्याचा अर्थ उलगडू लागला. खरतर मी पु.लं .च सगळ्या प्रकारचं साहित्य वाचलेलं नाही . (ही खरतर माझी घोडचूक आहे) पण जे काही वाचलं त्यावर मनापासून प्रेम केलं. मला नेहमी खंत वाटते की मला कळत्या वयात पु.लं. ना बघता-ऐकता आलं नाही.मला त्यांच्या भाषणांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या ध्वनिफिती ऐकताना, पुस्तक वाचताना नेहमी असं वाटतं की अरे या माणसाची निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती किती जबरदस्त असली पाहिजे, कारण समाजात दिसणारे नमुने (त्यात मीही आलोच) आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी उभी केलेली पात्रं (आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गोवून) ही इतकी अप्रतिम आणि जिवंत वाटतात की सारखं आपल्याला वाटतं राहतं की आपणही त्या लोकांना पु.लं. सोबत भेटलोय की काय!!!

रत्नागिरीतला कडवट वाणीचा पण आतून प्रेमळ असणारा 'अंतू बर्वा', तोंडावर शिव्या देणारे पण मित्रांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे, संगीत-नाटकाच्या उद्धारासाठी खपणारे दिलदार 'रावसाहेब', शिवाजी महाराज-रामदास स्वामी ही मंडळी आपल्या पंक्तीला जेवत असल्याच्या थाटात त्यांच्या, गोष्टी सांगणारे 'हरितात्या', कधीही पुस्तकानुरूप (नुसतं पुस्तकी) न शिकवता विद्यार्थ्यांच्या तळमळीने- आपुलकीने शिकवणारे 'चितळे मास्तर ', लग्न समारंभात स्वयं-सेवाकासारखी धावाधाव करणारा अष्टपैलू 'नारायण', पुस्तकांशी वेड्यासारखा एकनिष्ठ झालेला 'सखाराम गटणे', रेल्वे प्रवासात जगण्यातली गम्मत सांगून जाणारे 'पेस्तन काका '(१०० % ), एकसुद्धा पुस्तक न वाचता बिनधास्त त्यावर परीक्षणं लिहिणारा टीकाकार 'लखू रिसबूड', संस्थाही स्थापन होण्याआधी त्यांचं सेक्रेटरी पद हाती घेणारा' बापू काणे'. . .

ही सगळी मंडळी एक बढकर एक विनोदी पण त्यात नुसता विनोद नसतो, कारण पु.लं च्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही मनुष्याला फक्त एकच बाजू कधीच नसते, त्याची एक दुसरी आपल्याला माहित नसलेली दुखरी बाजूही असतेच असते आणि हीच ती पु.लं. च्या विनोदाला लाभलेली 'कारुण्याची झालर'. जी आपल्या मनाचा ठाव घेते. पु.लंं. ना नुसताच हशा-धमाल करायची नसते , त्यांना प्रत्येक वेळी त्यातून काही तरी सांगायचं असतं. या सगळ्या पात्रांमध्ये असलेला एक दुखरा कोपरा , त्या द्वारे ते आपल्या काळजाला हात घालतात आणि अचानक पोट धरून हसत असताना आपले डोळे पाणावतात …या पेक्षा सामार्थ्याशाली दुसरं काही असूच शकत नाही !! हेच खरं यश आहे.

त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेला अजून एक अविष्कार म्हणजे 'बटाट्याची चाळ' आणि वाऱ्यावरची वरात'. शिवाय 'असा मी असामी', 'काही नवे ग्रहयोग', 'मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर', 'मी आणि माझा शत्रू पक्ष' ,'माझे पौष्टिक जीवन',ते चौकोनी कुटुंब', म्हैस,पानवाला, बिगरी ते मॅट्रीक, यांसारखे चौफेर हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे लेख आणि मग त्यांचंच खुमासदार पद्धतीने केलेलं वाचन या मधून पु.ल. त्यांच्या सगळ्या पात्रांशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात पण त्याचवेळी त्यांनी त्यात केलेली त्या त्या काळातील दाखल्यांची गुंफण हे केवळ अद्वितीय आहे.

त्यांनी जवळ जवळ ५०-६० वर्षांपूर्वी लिहिलेली हि व्यक्तिचित्र आजही तितकीच ताजी आणि हवीहवीशी वाटतात की माझ्यासारख्या कॉम्पुटर-स्मार्टफोन च्या जमान्यातल्या एका तरुण मुलाचा mobile पु.लं.च्या audio clips नी अभिमानाने भरावा इतकं कालातीत लिखाण त्यांनी केलय. 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' ही प्रवास वर्णनात्मक पुस्तकं कोणालाही आपल्या बुकशेल्फ वर असावीत अशी आहेत.शिवय त्यांनी कित्येक नाटकं लिहिली आहेत. त्या पैकी 'ती फुलराणी' हे नाटक मी पाहिलंय. अविनाश नारकर आणि अमृता सुभाष यांचा अप्रतिम अभिनय त्यात आहे .

खरतर मी पु.लं. बद्दल लिहिणं म्हणजे 'काजव्याने सुर्याविषयी बोलण्यासारखं आहे '(अर्थात सखाराम गटणेचे हे शब्द मला म्हणावेसे वाटले तर त्यात नवल नाही ). पण पु.लं. विषयी वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इतकं तरी लिहिण्याचं धाडस मी केलं. आज पु.लं आपल्यात नाहीत पण त्यांनी अजरामर केलेली ही सगळी पात्रं आपली नेहमीच सोबत करतील आणि सतत त्यांची आठवण करून देतील यात तिळमात्रही शंका नाही.

असो या महाकाय-चतुरस्त्र माणसाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच!! त्यामुळे आता थांबलेलंच बरं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं वाचायला वाचायला प्रारंभ करणं हे अधिक उत्तम.

- ओंकार करंदीकर
मुळ स्त्रोत -- http://mantaranga.blogspot.in/2014/04/blog-post_29.html

0 प्रतिक्रिया: