पुस्तक वाचणारा माणूस हा जीवनात आनंदाच्या, ज्ञानाच्या किंवा गेला बाजार इतरांना कसलाही उपद्रव नसलेल्या विरंगुळ्याच्या शोधात असतो. पाचपन्नास पानं वाचल्याशिवाय दिवस न घालवण्याची सवय मला अगदी लहानपणापासूनंच जडली ती आजही सुटली नाही. काहीतरी वाचल्याशिवाय दिवस गेला तर, अंघोळ न करता गेलेल्या दिवसासारखं मला वाटतं आणि अंघोळ करताना जसं आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं हा विचार मनात बाळगून अंघोळ करतो असं नाही, अंघोळ या गोष्टीचाचं आनंद असतो तसंच वाचनाचं आहे. कुठलं पुस्तक कुठल्या प्रकारचा आनंद देऊन जाईल ते सांगता येत नाही. समर्थांचं 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' यापेक्षा 'प्रसंगी अखंडित वाचीत जावे', हे मात्र मला शंभर टक्के पटलं.
आपलं सांगणं खूप लोकांना कळावं, ही ओढ माणसाला असते. लेखकाला ती अधिक असते. ज्याला काही सांगायचं असतं असा लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा वाचकाला आपण प्रिय व्हावं म्हणून न लिहिता ते त्याला कळावं म्हणून लिहितो. तिथं तो मग आपण लोकप्रियही व्हावं म्हणून तडजोड करत नाही. त्याचं म्हणणं कित्येकदा त्याचा समकालीन समाज स्विकारत नाही. पण समाजाला वर्तमानाची जाण असलीच लेखकमंडळी आणून देत असतात. *साहित्याचा इतिहास वैभवशाली केला आहे, तो प्रत्येक काळातल्या वर्तमानाची जाणीव असलेल्या साहित्यिकांनी.* पुष्कळदा अशा लेखकांच्या बाबतीत ते काळाच्या फार पुढे होते, असं म्हटलं जातं. वास्तविक ते त्या-त्या वेळच्या वर्तमानाबरोबर असतात. हरिभाऊ यमूचे हाल सांगत होते. ते त्यांच्या काळातल वर्तमान होतं, जोतिबा फुले ज्या वेळी शेतकर्यांच्या दारिद्र्याचं वर्णन करीत होते, ती त्यांच्या काळातली वर्तमान परिस्थिती होती. दुर्दैवानं पुष्कळशा प्रमाणात आजही ती बदलावी तितकी बदललेली नाही. आजचं वर्तमान हे भूतकाळाच्या कुठल्या चुकांची परिणती आहे, हे ध्यानात आल्यावर भूतकाळाचे नुसते गोडवे गात बसण्याला अर्थ राहत नाही.
आपल्या मराठीत भाषाप्रभुत्वाच्या बाबतीत आणि सभ्यता व संस्कृती यांच्या बाबतीत अजूनही काहीतरी भलत्याच कल्पना धरुन राहणारे लोक आहेत. ज्याच्या मराठीत संस्कृत भाषेतल्या तत्सम शब्दांचा खच्चून भरणा असतो, तो भाषाप्रभू अशी आपलीही समजूत आहे. जास्तीत जास्त लोकांना कळेल अशा भाषेत आपलं म्हणणं सांगणारा... तो आपल्याला भाषाप्रभू वाटतच नाही. साध्या वर्हाडी बोलीत लाखो लोकांना आपलं म्हणणं ऐकवीत एका जागी खिळवून ठेवणारे *गाडगे महाराज* हे आम्हांला भाषाप्रभू वाटलेच नाहीत.
आपल्याला सदैव भूतकाळाला जखडून ठेवणार्या आपल्या वर्णव्यवस्थेचं प्रतिबिंब भाषाप्रभुत्वाविषयीच्या आपल्या गैरसमजात लख्खपणाने उमटलेलं आहे. भाषा ही गोष्ट समाजापासून अशी अलिप्तपणानं वागून कधीही समृद्ध होत नाही. सभ्यता, शिष्टपणा, उच्चपणा हा आम्ही मराठी लोकांनीच मुळी संस्कृत भाषेचं सोवळं नेसवून ठेवला होता. पुढे साहेबाचं राज्य आल्यावर ह्या मोठेपणाच्या कल्पना आम्ही इंग्रजी भाषेच्या बॅगेत आणून भरल्या. त्यामुळे या महाराष्ट्रात एक तर संस्कृतप्रचुर भाषेला मान; नाहीतर फर्ड्या इंग्रजीला !
मराठी भाषेचे शिवाजी, चिपळूणकरसुद्धा मराठी म्हणून जी भाषा लिहित होते ते त्यांच्या वेळच्या मावळ्यांच्या डोक्यावरुन जाणारीच. आणि आम्ही त्या मराठी भाषेत संस्कृतचे पांडित्य दिसून येतं म्हणून खूश ! आजदेखील विंदा करंदीकरांचं सुंदर खमंग मराठीतलं बालगीत म्हणणार्या मुलापेक्षा 'जॅक अॅण्ड जिल' म्हणणार्या मुलाचं कौतुक अधिक. आणि लहान मुलावर 'दिव्या दिव्या दीपत्कार'पेक्षा 'शुभं करोति कल्याण' हे संस्कृत अनुष्टुभ म्हटलं तरंच संस्कार ! मुळात लोकांच्या वापरातील मराठी शब्दांची हकालपट्टी करुन तिथे कुणाच्याही कानावर न पडलेल्या संस्कृतशब्दांची नेमणूक करण्यामागे ज्ञान मर्यादित लोकांच्या हाती ठेवण्याची भावना असते असं मला वाटतं.
(अपूर्ण)
पु.ल.
(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जुलै-सप्टेंबर १९८२)

0 प्रतिक्रिया:
Post a Comment