Monday, April 22, 2024

सबकुछ पु.ल. - (अनिल हर्डीकर)

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पु.लं. देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची वसंत सबनीस यांच्या साक्षीने घडलेली ही भेट.

पु. ल. देशपांडे यांचे नाव माहीत नाही असे सांगणारा मराठी माणूस मिळणार नाही. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' असा अत्यंत कमी शब्दांत त्यांचा पूर्ण परिचय केला जातो. पुलंनी जेवढे विपुल लेखन केले त्यापेक्षा काकणभर जास्तच त्यांच्याविषयी कौतुकाने, गौरवाने लिहिलेला मजकूर भरेल इतके त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम केले. पुलंनी मुख्यत्वे विनोदी लेखन केले असले तरी त्यांच्या गंभीर विषयाला धरून असलेल्या लेखनातही त्यांच्यात असलेला खोडकर स्वभाव डोके काढतो आणि लेखन क्लिष्ट होत नाही.पुलं चांगले वक्ते होते. सामजिक कार्यासाठी त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. चित्रपट क्षेत्रात असताना 'सबकुछ पुलं' असा गुळाचा गणपती त्यांनी बनवला. शिक्षक म्हणूनही काही काळ ते महाविद्यालयात, शाळेत रमले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेसुद्धा त्यांचे विद्यार्थी. ते जिथे गेले तिथे त्यांनी खसखस पिकवली. त्यांना संगीताची चांगली जाण होती, कविता त्यांना प्रिय होती. मात्र हा बहुरूपी कोणत्याही पदाला चिकटून राहिला नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी आपले वक्तृत्व किती प्रभावी आहे हे सिद्ध केले, पण तिथे ते रेंगाळले नाहीत. जसे ते इतरत्रही रेंगाळत राहिले नाहीत. ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांती निकेतनात राहिले. दूरदर्शनच्या निर्मितीत त्यांचे योगदान होते. त्यांना मिळालेल्या मान-सन्मानाचे मोजमाप करणे कठीण आहे.

आज मी त्यांचे पहिल्या भेटीचे दोन किस्से सांगणार आहे. साल वगैरे नक्की सांगता येणार नाही, पण तो काळ ज्या वेळी मोबाईल सोडा घरोघरी फोनदेखील नव्हते. पुण्यात पुलं राहत होते. काही कामासंदर्भात आपल्या एका मित्राला घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले. घरात तो मित्र नव्हता. त्या मित्राची 13/14 वर्षांची मुलगी एकटीच घरात होती. पुलं तिला म्हणाले, "मी येऊन गेलो असे सांग तुझ्या बाबांना.'' ती म्हणाली, "नक्की सांगते.'' पुलं आणि त्यांचा मित्र निघणार इतक्यात ती म्हणाली, "काका चहा घ्या ना. मला येतो चहा करता. तुम्ही चहासुद्धा न घेता येऊन गेलात तर बाबा रागावतील.'' मुलीच्या बोलण्यात आदर होता, आग्रह होता. पुलंनी "राहू दे'' असे म्हणूनही ती ऐकत नाही म्हटल्यावर पुलं म्हणाले, "चहा नको. पण घोट घोट दूध दे गरम करून.''

मुलीने दूध गरम करून दोघांना दिले. पुलंना दूध कितपत गरम असेल याचा अंदाज करता आला नाही. त्यांनी दूध प्यायले आणि त्यांची जीभ भाजली. पुलं त्या मित्राच्या मुलीला एका शब्दाने बोलले नाहीत. मात्र घराबाहेर पडल्यावर सोबत असलेल्या मित्राला म्हणाले, "पहिल्या भेटीत चटका लावून गेली पोर.''

पुलंनी विनोद करण्यासाठी व्यंगाची चेष्टा केली नाही. 'गुण गाईन आवडी' हा एकमेव उद्देश त्यांच्या ठायी होता. माणसातल्या दुर्गुणाकडे कानाडोळा करून त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे कौतुक करण्याचे विलक्षण कसब त्यांच्या ठायी होते.

महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना पुल पुण्यात राहत होते.वसंत सबनीस हा त्यांचा खास जुना मित्र होता. 'अघळपघळ' हे पुलंचे पुस्तक त्यांनी 'वसंता'ला अर्पण केले आहे. वसंत सबनीस कॉलेजच्या हॉस्टेलवर त्यांच्या एका मित्राबरोबर राहत असत. ज्यांचे नाव होते शरद तळवळकर. मराठी चित्रपटसृष्टीत एक बुद्धिमान आणि विनोदी अभिनेता म्हणून ते पुढे नावारूपाला आले, तर एक दिवस 'वसंता'ला भेटायला पुलं हॉस्टेलवर गेले. योगायोगाने वसंतरावांचा रूममेट असलेले शरद तळवळकर रूमवरच होते. साहजिकच वसंतरावांनी पुलंशी आपल्या रूममेटची ओळख करून दिली. म्हणाले, "पुर्ष्या, हा माझा रूममेट शरद तळवळकर आणि शरद हा माझा मित्र पुरुषोत्तम देशपांडे.'' क्षणाचाही विलंब न लावता पुलं वसंत सबनीसांना म्हणाले, "अगदी साधा, सरळ दिसतोय तुझा मित्र.'' पुलंच्या या बोलण्याचा अर्थ वसंत आणि शरद दोघांनाही लागेना. वसंत म्हणाले, "म्हणजे?''

पुलं म्हणाले, "आख्या नावात एकही काना, मात्र, वेलांटी नाही. श र द त ळ व ल क र.''

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पुलं देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची ही अशी भेट वसंत सबनीस हेही एक विनोदी लेखक यांच्या साक्षीने झाली.

- अनिल हर्डीकर
hardikarsutradhar@gmail.com



0 प्रतिक्रिया: