Tuesday, June 27, 2017

प्रिय भाई

१७ वर्ष झाली, भाई, तुम्हाला जाऊन.... तरी अजून रोज भेटता.... कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेट्च्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात, कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून....

अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते, तेव्हा तुम्ही भेटता.

डिजिटायझेशनच्या ह्या बदलत्या काळात रस्त्यानी एखादं साईन-बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की, तुमची आठवण येते.

पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरली आहेत. पण, तुम्ही कथांमध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिसं अजूनही जिवंत आहेत.

गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं, 'असा मी, असा मी' आठवतं आणि हसू येतं.

"मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं" हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं... अगदी माझ्याही.

आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून "इंग्रज गेला तो कंटाळून... शिल्लकच काय होतं, इथं लुटण्यासारखं ?" हे नेहमी आठवतं.

एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि 'अंतू बर्वा'चा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो.

भारत सरकार कडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार 'चितळे मास्तरां'ना मिळायला हवा, अशी एक भाबडी आशा मनात घर करून आहे.

नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहताहेत.

एखादी मुलगी कुत्र्याशी लडिवाळपणे बोलत उभी असेल तर 'पाळीव प्राण्यां'चा संपूर्ण अल्बम डोळ्यापुढून झर्रकन निघून जातो.

लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लीक वर सुपारी पासून भटजींपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या, तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच ! त्याला अजून रिप्लेसमेंट मिळालेली नाही.

चाळी जाऊन सोसायट्या आल्या पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे.

जुन्या आणि मोजक्याच शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलांमधून आजही असंख्य 'नाथा' कामात एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरवात अजूनही "बाबा, रे" नेच होत आहे.

आजच्या ह्या कॉम्पिटिशन च्या जमान्यात काही 'रावसाहेब'ही आहेत. टिकून नाही, असं नाही... पण, तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही.

तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत. पण, तुम्ही नाहीत.

तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे... तुकारामाच्या गाथेसारखं...

भाई, तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी...!

मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकांचं कपाट माझ्यापुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभी होती. पण, त्यातही तुमची पुस्तकं मला चट्कन ओळखता आली... कारण, तुमच्याच भाषेत सांगायचं तर "कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती !"

लेखक : ओंकार जोशी

Wednesday, June 21, 2017

प्रिय पु.ल.

कागदावर तारीख लिहून मी कितीतरी वेळ त्या कोर्‍या कागदाकडे पहात होतो.....निश:ब्द. काहीतरी हरवलं होतं. जाणवतं होतं , ऐकूही येत होतं , फक्त दिसत नव्हतं. आठवणींचा पूर , विचारांचं उठलेलं काहूर , झालेला एक एक संस्कार , संवाद साधत होता. पण सारं काही मुकं होतं. त्या अभिव्यक्तीने जशा डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या तश्या आजही होऊ लागल्या होत्या. पटकन पाणी गालावर ओघळेल असंही वाटत होतं जे पूर्वी कधीही होत नव्हतं. अशा अनेक मर्यादा त्या अभिव्यक्तीनेच घालून दिल्या होत्या.

विचारांना आणि संवादांना गती आली. ३०-३५ वर्षांचा फेरफटका झाला. खूप ठिकाणी गेलो. अगदी परदेशात सुध्दा जाऊन आलो. खूप जण भेटले. काही शब्द भेटले , काही सूर एैकू आले. सारं काही माणुसकीने ओतप्रोत भरलेलं , देखणं आणि सुसंस्कृत. टाळ मृदुंगाच्या गजरात इंद्रायणीचा काठ कुंभारासकट दर्शन देऊन गेला. विशाल सागर , तिथल्या नारळी पोफळीच्या बागा आणि डिटम्याच्या दिव्याच्या उजेडातील खपाटीला गेलेली पोटं आतमधे काहीतरी कालवून गेली.

परदेशातील घर हरवलेली माणसं भेटली. लग्न कार्यातील निमंत्रण पत्रिका आठवली. मोतीचूराचा लाडू आठवला. टाचा झिजलेल्या चपला आठवल्या. रेल्वेच्या बोगीतील १००% तुकाराम आठवला आणि अचानक उदबत्तीचा वास आला. नव्या कोर्या छत्रीवर पडलेलं पावसाचं पाणी आणि छत्री वर करून केलेल्या छत्रपतींचा जयघोष आठवला. पटकन मुठी आवळल्या. दचकलो , ओळीत चुकून नववा शब्द आला होता , खोडला आणि नविन ओळ सुरू केली. क्षणात कागदावरती लांब केसांचा शेपटा पडला , वाटलं पुढचा पेपर भरूच नये. पण तेवढ्यात कल्हईवाल्या पेंडश्यांच्या बोळातील निळे डोळे मला शांत करून गेले.

जीवन कळलेली माणसं भेटली. सवाई , कुमार इतकंच काय हवाई गंधर्वही भेटले. त्यांच्या सारख्यांच्या गुणांचं आवडीने केलेले गायन एैकू आलं. शांतीनिकेतनातील पारावर बसलेला शांत वृध्द तपस्वी आठवला. बघता बघता चाळीचा जिना चढून गच्चीवर आलो. पाहिलं तर तिथे मोठ्ठे कुलूप म्हणून जिने उतरून खाली येऊ लागलो तर वृध्द चाळीचं मनोगत एैकू येऊ लागलं.

वरातीच्या निमित्ताने गावातील लोकल नाट्य पाहिलं. दिल देके देखोचा रिदम एैकला. दमयंतीमालेचं हंबरणं एैकू आलं. कोर्टाची साक्ष झाली. हशा आणि टाळ्यांचा गजर एैकू आला. बघता बघता गोष्टी इतिहास जमा झाल्या.

या सगळ्या गोष्टी तशा आपल्या आसपास असणार्या , दिसणार्या पण तरीही लक्षात न आलेल्या. माणसं , वस्तु ,वेगवेगळी ठिकाणं , सूर , शब्द आज सगळे अचानक एकदम जाणवायला लागले , दिसायला लागले. शब्दावाचूनचे सूर एैकता एैकता शब्दच सगळं सांगू लागले. आणि एकदा काय झालं ! अहो परवाचीच गोष्ट आहे असं म्हणत म्हणत गोष्टी गोष्ट सांगू लागल्या काय हरवलं आहे त्याची.

विनम्र अभिवादन.

अतुल कुलकर्णी
नारायणगाव
दि १२-०६-२०१७

Saturday, June 17, 2017

प्रिय सुनीताबाई...

पु.ल. गेल्यानंतर सुनीताबाईंना एकटं वाटणार नाही, हे सांगत दोहोंच्या नात्यातलं एकत्व स्पष्ट करणारा अग्रलेख ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी लिहिला होता.  हा अग्रलेखही  उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकेश माचकरांचे पुन्हा धन्यवाद.

'तुम्ही अतिशय धीराच्या आणि तशा गंभीर आहात. त्यामुळे हे पत्र केवळ सांत्वनासाठी वा धीर देण्यासाठी . पण केवळ औपचारिकपणा म्हणूनही लिहीत नाही. अवघ्या महाराष्ट्राला कालपासून भिरभिरल्यासारखे होत आहे. वरवर सगळे व्यवहार रीतसर चालू आहेत हे खरे, पण पायाखालून जमीनच सरकल्याचा सारखा भास होत आहे. ही सार्वत्रिक भावना आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे पत्र. तुम्हाला भावनाविवशता आवडत नाही. तशा विवश मानसिक स्थितीत माणूस कधी खोटेच भाव चेह-यावर वा शब्दात आणतो. तर कधी मेलोड्रामाच्या आहारी जातो. म्हणून असेल किंवा तुमच्या स्वभावातील निग्रहामुळे असेल, पण भावनांचे प्रदर्शन तुम्ही टाळता. याचा अर्थ तुमचं मन उचंबळून येत नाही वा भावनांच्या कल्लोळाने गजबजून जात नाही असा नाही. परंतु अनेक लोकांना निग्रहीपणा आणि कोरडेपणा यातील फरकच कळत नाही. त्यामुळे तुम्ही भाववृत्तींनी 'शुष्क' आहात, असे काहींना वाटते. काहींना तुम्ही कठोर वाटता, तर काहींना एकारलेल्या. जणू तुमच्या घरात आणीबाणी जाहीर झालेली असून, अनुशासन पर्व घोषित झाले आहे... पुलंवर तुमची तुमची अशी जरब होती, असे ही मंडळी सांगतात की, त्यांची काय टाप होती शिस्त मोडण्याची! तुमचे 'आहे मनोहर तरी' हे आत्मकथम प्रसिद्ध झाले मात्र आणि तमाम कुजबुज आघाड्यांमध्ये पुलंच्या आणि तुमच्या भावसंबंधांबद्दल चर्चा सुरू झाली. परंतु तुम्हीच तुमच्या मनाच्या हिंदोळ्यांचे इतके उत्कट वर्णन केले आहे की चर्चाच अर्थशून्य वाटावी. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे-गडद निळे जलद भरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी... चोहीकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि 'गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात...हे सगळं किती लोभसवाणं आहे! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होतंय? 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तकरी कोणती सांगू"' या भावोत्कट संभ्रमांतून तुम्ही तुमची कहाणी सांगू लागता- साठा उत्तरांची नव्हे, तर साठा प्रश्नांची कहाणी! “सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच!”सोमवारी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तुम्ही एकदम एकट्या झालात. जवळजवळ ५४ वर्षांनी. योगायोगाच्या भाषेत बोलायचं, तर अगदी त्याच दिवशी. तसा प्रत्येक माणशून एकटाच या जगात येतो आणि एकटाच जातो, असं म्हणण्याची चुकीची प्रथा आपल्याकडे आहे. माणसू कधीही एकटा येत नाही. तो येतानाच काही अतूट नाती बरोबर घेऊन येतो. मग कितीतरी नाती निर्माण करतो आणि जाताना ती नाती ठेवून फक्त लौकिक अर्थाने एकटा जातो. जाताना, त्याच्या जीवनाला अर्थ आणि समृद्धी प्राप्त झाल्याचं त्याला वाटत असतं; कारण ती नातीच. तुम्ही दोघांनी अशी हजारो, लाखो नाती निर्माण केली आहेत. सर्व अतूट. ब-याच जणांनी असा (सोईस्कर) समज करून घेतला होता की, ही सर्व नाती 'फक्त' पुलंची होती. तुमचा सहभाग फक्त 'म-म' म्हणण्यापुरता, किंवा तुमचा 'म-म' संस्कृतीवर विश्वास नाही, म्हणून फक्त साक्षीदाराइतका! प्रत्यक्षात मात्र असं एकही नातं नव्हतं की, जे तुम्हाला दोघांना वेढून टाकत नव्हतं वा एकत्रपणे गुंतवत नव्हतं. तुमचं लग्न झालं तेव्हा म्हणजे १९४६ साली पुल हे 'पुल' म्हणून लोकांना माहीत व्हायचे होते. परंतु तुमचा जीवनरस एकाच कलाविश्वात होता. तुम्ही तेव्हा जी नाटकं बसवत होता, लिहीत होता, तुमच्या मित्रमंडळींबरोबर रात्र-रात्र भटकत होता, गप्पा मारत होता, भांडत होता, हसत होता, गाणी-बजावणी करत होता, तेव्हा तो पूर्णपणे उधळून गेला होता. तेव्हा तुम्हाला दोघांनाही खूप कीर्ती मिळवायची ईर्षा नव्हती, श्रीमंत व्हायची महत्त्वाकांक्षा नव्हती, कोणाला तरी 'मागे' टाकून आपण 'पुढे' जायची पराकाष्ठा नव्हती. तुमच्या त्या जीवनासक्तीतच कलासक्तपणा होता. जीवन आणि कला यांना वेगळं करून शहाजोगपणे चर्चा करण्यात तुम्हाला रस नव्हता- वेळही नव्हता. तुम्हाला ओळखणा-या सगळ्यांना हे माहीत आहे सुनीताबाई की, तुमचा ओढा चळवळीकडे होता. स्वातंत्र्याला कष्टक-यांच्या जीवनाचे परिमाण असावे आणि राजकारणाला मूल्यांची जोड असावी, असा तुमचा आग्रह असे. व्यवहारवादी तडजोडींना तुमची अजिबात तयारी नसे. एकदा तडजोडी सुरू केल्या की, त्यांची परिणती निष्ठेच्या लिलावात आणि भ्रष्टाचारात व्हायला फारसा वेळ लागत नाही, असं तुमचं मत होतं. म्हणून तुम्ही अनेकदा अतिशय कठोर होताना लोकांनी पाहिलं आहे. नाती आणि मूल्यं यात कटुता पत्करून, नातं तुटलं तरी चालेल, पण मूल्य सोडणार नाही, असा ताठा तुम्ही दाखवला.व्यवहारवादी जगात अशा करारीपणाला भावनाशून्यता, असं संबोधण्याची पद्धत आहे. पुलंना तुमचा तो जिद्दी स्वभाव भावला असावा. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की, आपल्यावर अशी जरब ठेवणारा कुणी तरी हवाच! पुल भाबडे होते तसेच अतिशय भिडस्तही. त्यांना त्या भिडस्तपणाच्या आहारी जाऊ दिलं असतं, तर गाडी कुठेही घरंगळत गेली असती- म्हणजे पुलंनाच अशी स्वत:बद्दल भीती वाटली असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुमची 'भूमिकी' ही फक्त महाराष्ट्राचा हा तेजस्वी हिरा जपण्याची होती. आपल्या 'पुरुषी' संस्कृतीत सहचारिणीला तेवढीच भूमिका देण्याची रीत आहे! परंतु तुमचे भाग्य (!) हे की, पुलंना मात्र असे कधीही वाटले नाही. कृ. द. दीक्षितांनी एका लेखात तुमचे दोघांचे नाते हे 'भारती तत्त्वज्ञानातील पुरुष व प्रकृतीत यांच्यातील नात्यासारखं होतं'. असे म्हटले आहे. तेच अतिशय नेमके वर्णन आहे. म्हणूनच तुम्हाला सारखं,अगदी क्षणाक्षणाला चुकल्यासारखं वाटेल, पण कधीही एकटं-एकटं वाटणार नाही! पुरुष आणि प्रकृती विभक्त होऊच शकत नाहीत!

पुलंच्या आणि तुमच्या नात्यातलं एकत्व असं अध्यात्माच्या पातळीवरचं नव्हतं. म्हणून त्याला उगीचच तसं 'रोमँटिक' आणि खोटं खोटं करण्याची गरज नाही. तुमच्यातल्या एकत्वाचा साक्षात्कार तुम्हाला दोघांनाही नातं विकसताना होऊ लागला होता. भारतात अशी बहुतेकशी नाती फुलायच्या आतच विस्कटून जातात. लग्न हे दोघांचं असतं.अगदी एकत्र कुटुंबपद्धती संपली तरी नवरा-बायको आपापली मित्र-मैत्रिणींची नाती बरोबर घेऊन एकत्र येतात. कितीही उत्कट प्रेम असलं, तरी त्या सगळ्या नात्यांचं ओझंही वाहायचं असतं. आपल्याकडे ते ओझं मुख्यत: स्त्रियांना वाहावं लागतं. काही स्त्रिया ते ओझं वाहताना मोडून पडतात. परंतु बहुसंख्य स्त्रिया ते वाहण्यासाठी अंगी अधिक मानसिक सामर्थ्य मिळवतात. बहुतेक नव-यांना त्याचं भान येत नाही, काहींना ते उशिरा येतं. तुम्हावरही असे प्रसंग आले. तुम्ही ते वेळी अपमान सहन करूनही निभावून नेले.परंतु भाईंबद्दलची तुमची भावना कधीही आटली नाही. भाई आणि तुम्ही किती भिन्न स्वभाववैशिष्ट्यांचे आहात, ते तुम्ही वर्णन केलेल्या अनेक प्रसंगांतून आम्हाला कळलं आहे.भाईंशी, किंवा त्यांच्या अनेक सवयींशी जुळवून घेणं तुम्हाला किती कठीण गेलं असेल, याचा अंदाज आम्हाला आहे. परंतु तुम्हाला याचंही भान होतं की, भाईलाही त्याच्या मनस्वीपणावर बंधनं घालणं किती कठीण असलं पाहिजे. पुलंची निर्मिती आणि त्यांचा मनस्वीपणा यांना वेगळं करणं अशक्य आहे. लोक पुलंवर जे बेहद्द फिदा होते, ते केवळ साहित्यनिर्मिती वा संगीतामुळे नव्हे. पुलंचं मनस्वीपणच तमाम मराठी माणसांना भावून टाकत असे. कधीकधी या मनस्वीपणात काही स्त्रीवादी समर्थकांना 'पुरुषी आत्मकेंद्रीपणा वा स्वार्थ' दिसतो. तुमचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर ज्यांनी 'तुमची' बाजू घेऊन पुलंमध्ये व तुमच्यात तट पाडले, त्या स्त्रीवाद्यांनाही मानवी नात्यांतली गुंतागुंत समजत नाही असंच म्हणावं लागेल. या जगातल्या कोणत्याही माणसाला मनसोक्त, 'मै तो चला, जिधर चले रस्ता' शैलीत जगता येत नाही. कितीही वाटलं तरी, पुलंनाही ते शक्य नव्हतं. तुम्हालाही शक्य नव्हतं. तुमच्या मनात तसा एकटा स्वतंत्र, स्वत:चा, बिनधास्त प्रवास करायची कल्पना अनेकदा तरळून गेली. मग तुम्ही तसं का केलं नाही?अशक्य होतं म्हणून नाही. तुम्हाला माहीत होतं की, ते 'अयोग्य' आहे. तुम्ही लिहिलंय, “इतकी वर्षे दोघांचा संसार झाल्यानंतर स्वत:चा एकटीचाच विचार करणे, हे तितकेसे सोपे नाही. पण गेली काही वर्षे ही प्रक्रिया चालू आहे आणि आता मनाने मी पूर्णपणे मोकळी, सुटी, पुन्हा एकटी झाले आहे. तशी मी आयुष्यभर स्वतंत्रच होते, पण स्वत:हून स्वत:ला कुठे कुठे गुंतवत गेले... पण त्या कशाचेही मला कधी बंधन वाटले नाही. कारण मी जे काही करत गेले ते आनंदाने, स्वयंनिर्णयाने... आणि आता स्वयंनिर्णयानेच सर्व रेशीमधागे सोडवून मोकळी झाल्यावर ही अदृश्य जबाबदारी का जाणवत राहिली आहे?... स्वत:हून स्वीकारलेली बंधने स्वत:च तोडून टाकली, तरी ते पाश काचत का राहतात?” सुनीताबाई, तुमच्या या प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरं आहेत. माणूस 'मुक्त' होऊ शकतो, ही केवळ कल्पना आहे. खरंच तो तसा मुक्त झाला, तर जीवनाला काहीही अर्थ राहणार नाही. नाती, पाश, जाच, बंधनं राहणारच. संघर्ष करावा लागतो, तो जाच आणि बंधनं दूर करून नाती आणि पाश टिकवायचे असतात म्हणून. तुम्ही तुमच्या एकत्रित जीवनात तो संघर्ष केलात आणि ते पाशही जपलेत. काचत असूनही. म्हणूनच तुम्हाला एकटं वाटणार नाही. तमाम मराठी माणसांनी तुमची साथ केली आहे. पुल गेले म्हणून ती साथ सुटणार नाही!”
-- कुमार केतकर

एक जीवनगाणे संपले - कुमार केतकर

पु. ल.  देशपांडे हे व्यक्तिमत्व नेमकं काय होतं याचं सांगोपांग दर्शन घडवणारा अग्रलेख ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी पुलंच्या निधनानंतर लिहिला होता. हा अग्रलेख ‘पु.ल.प्रेम’ ब्लॉगसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकेश माचकरांचे अनेक धन्यवाद.

आपल्या सर्वांच्या जीवनातली अपूर्वाई आता संपली आहे. ज्या आनंदाच्या धबधब्यात आपण इतकी वर्षे न्हाऊन निघालो, तो धबधबा एकदम कोसळायचा थांबला आहे. ज्या एका माणसाने आपल्या कोरड्या मध्यमवर्गीय जीवनात आनंदाच्या बागा फुलवल्या, तो माणूस त्या बागेतून निघून गेला आहे. ज्या बहुरूप्याने अवघ्या महाराष्ट्राला गेली सुमारे ५० वर्षे रिझवले, तो बहुरूपी पडद्याआड गेला आहे. ज्याच्या आवाजाने समस्त मराठी माणूस आपले देहभान विसरून जात असे, तो आवाज आता फक्त ध्वनीफितीतच उरला आहे. ज्याच्या नुसत्या नामस्पर्शाने मनावरील शेवाळे दूर व्हायचे, ती व्यक्ती आता अनंतात विलीन झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत म्हणायचे तर, अशी व्यक्ती आणि अशी वल्ली गेल्या दहा हजार वर्षांत झाली नव्हती आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही. एका वेगळ्याच पोरकेपणाच्या भावनेने मन उदास झाले आहे. जणू हे औदासीन्याचे मळभ कधीच जाणार नाही. तसे पुल गेली सात-आठ वर्षे आजारीच होते. पण ते 'आहेत' ही भावना पुरेशी असे. त्यांचे नाटक पाहताना, एखादी ध्वनिफीत ऐकताना , त्यांचे छायाचित्र पाहताना, दूरचित्रवाणीवर त्यांची एखादी चित्रफीत पाहताना, ते प्रत्यक्षात येथे नसले, तरी या सचेतन चराचरात ते आहेत, ही जाणीव म्हणजे एक केवढा तरी भावनिक-सांस्कृतिक आधार होता. आता यापुढे त्यांच्या स्मृतींच्या आधारे मनातल्या बागा फुलवायचा प्रयत्न करावा लागणार आहे. अशी काय विलक्षण जादू होती या माणसात? असा कोणता मोहिनीमंत्र या माणसाने आत्मसात केला होता की, ज्याचे नुसते नाव प्रसन्नतेचा शिडकावा वातावरणात येत असे? आबालवृद्धांच्या जीवनात बहार आणण्याची ही किमया या माणसाने कुठे व कशी मिळवली? तसे पाहिले, तर महाराष्ट्रात नाटककारांचा तुटवडा नाही. विनोदी लेखकही कितीतरी. अभिनयकला अवगत असलेले तर हजारो. बेमालूम नकला करणारेही कमी नाहीत. संगीताची जाण आणि सुरांचे भान असलेले हजारो जण मैफिली जागवत असतात. परंतु पुल म्हणजे एक आनंदोत्सव होता, जगातल्या सर्व उदात्त व चांगल्या गोष्टींना एकाच मैफलीत आणणारा. बालगंधर्व आणि चार्ली चॅप्लिन, रवींद्रनाथ टागोर आणि पी. जी. वुडहाऊस, जी. ए.कुळकर्णी आणि हेमिंग्वे, राम गणेश गडकरी आणि बर्टोल्ड ब्रेश्त अशा सर्वांना आपल्या आनंदयात्रेत सामील करून घेणारा हा यात्रेकरू कशाने झपाटलेला होता? नास्तिकतेवर नितांत श्रद्धा असलेला हा आस्तिक चुकून देवांच्या दरबारात गेलाच, तर तमाम ३३ कोटी देव त्याला 'असा मी असामी'चा प्रयोग करायला भाग पाडतील. देवांना न मानणारा हा आनंदयात्री, रसिकांची ती गर्दी पाहून ताबडतोब त्यांच्यासमोर गाणी म्हणेल, नकला करील; मर्ढेकर-खानोलकर यांच्या कविता म्हणेल, पेटी वाजवेल आणि ते सर्व ३३ कोटी देव आपले देहभान आणि देवत्वही विसरून जातील. स्वर्गलोकात आलेले 'बोअरडम' निमिषार्धात उडून जाईल.

पुरोगाम्यांना पुल देशपांडे उमजले नाहीत आणि प्रतिगाम्यांना तर ते समजण्यापलीकडलेच होते. ते समीक्षकांच्या चिमट्यांमध्ये कधी सापडले नाहीत आणि त्यांच्या दुर्बोध संज्ञांच्या जंगलांमध्ये कधीही अडकले नाहीत. त्यामुळे भले भले समीक्षक अस्वस्थ होत. पुलंच्या अफाट लोकप्रियतेचे रहस्य उलगडू न शकलेले आत्मनिष्ठ-बंडखोर टीकाकार मिशा पिळत वा बोटे मोडत बसलेले असत, तेव्हा पुल कुठेतरी मैफलींचे फड जिंकण्यात दुंद असत. पुलंच्या साहित्य-संकल्पनांमधील सनातनी स्रोत शोधू पाहणा-या पुरोगामी विद्वानांना 'आनंद' ही भावना वर्गातीत असते, हे अजूनही कळलेले नाही. त्याचप्रमाणे धर्म, हिंदुत्व, रूढी-परंपरा याबद्दल अभिनिवेशाने बोलणा-या मार्तंडांना पुलंच्या लेखनातील मूर्तिभंजन आणि आधुनिकतेचा स्रोत कळायचा नाही. पण पुलंचा दबदबाच इतका प्रचंड की ते संस्कृतीरक्षक फारसे काही करू शकायचे नाहीत. पुढे पुढे ब-याच समीक्षकांनी पुलंचा 'नाद'च सोडला. पुल कायमच 'बिनधास्त' असतं. त्यांच्या लोकप्रियतेच्या जवळपासही कोणी जाणे शक्य नसल्यामुळे आपले 'स्थान; हिरावले जाईल, अशी भीती पुलंना नव्हती. विशेष म्हणजे त्या लोकप्रियतेचे ओझे त्यांच्या अंगावर नव्हते. हवेचा दाब आपल्याला कुठे जाणवतो? चारचौघांबरोबर गप्पा मारताना असो वा मोठ्या सभेत भाषण करताना, मैफलीत पेटी वाजवताना असो वा सुनीताबाईंबरोबर कविता सादर करताना, आर. के. लक्ष्मणबरोबर गप्पा मारताना असो वा बाळासाहेब ठाकरेंबरोबर दिलखुलास मस्करी करताना- पुलंची लय एकच असे. आजूबाजूला कोण आहे, हे पाहून त्यांची प्रतिक्रिया ठरत नसे. त्यामुळे त्यांच्यातला मिश्कीलपणा कधी आटत नसे आणि चेहरा व शरीर आक्रसत नसे. त्याचप्रमाणे त्यांची एखादी कोटी वा विनोद जिव्हारी लागेल, अशी भीती त्यांच्या जवळ बसलेल्यांना वाटत नसे. अनेक विनोदी लेखकांच्या शब्दांमधून जसे रक्त निघते, तसे पुलंच्या लिहिण्या-बोलण्यातून होत नसे. त्यांनी केलेल्या नर्म गुदगुल्यांमुळे एकूण वातावरणातच आनंद बरसत असेल. म्हणूनच पुलंना पी. जी. वुडहाऊस बेहद्द आवडत असे. वुडहाऊसच्या निधनाची बातमी कळल्यावर पुल मनातल्या मनात म्हणाले, “आय थॉट ही वॉज इम्मॉर्टल"- वुडहाऊस तर अमर आहे! नेमकी हीच भावना पुलंच्या लक्षावधी चाहत्यांच्या मनात आज उमचत असेल. पुंलनी वुडहाऊसबद्दल लिहिताना म्हटले आहे, “वुडहाऊस हे एक व्यसन आहे... वुडहाऊस आवडतो म्हणजे अथपासून इतिपर्यंत आवडतो. हे आपल्या बालगंधर्वांच्या गाण्यासारखे आहे. ते संपूर्णच आवडायचे असते. असा व्यसनांनी न बिघडता ज्यांना राहायचे असेल,त्यांनी अवश्य तसे राहावे. अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मानात मावनतचे कल्याण आहे, असा आग्रह धरणा-यांनी या भानगडीत पडू नये. (ते पडत नसतातच!) त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते. अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वैताग घेऊन ही माणसे जगत असतात... कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिलिले नाही. जीवनाच्या सखोस तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही... विनोदी लेखन हा त्याचा स्वधर्म होता. तो त्याने निष्ठेने पाळला.” पुलंनी वुडहाऊसचे केलेले वर्णन हे त्यांनाही तंतोतंत लागू आहे. पुलंच्या अशा स्वभावाचा, वागण्याचा, खट्याळपणाचा काहींना राग येत असे. या माणसाला काही पोच, खोली, गांभीर्याचे भान आहे की नाही, असे काही गंभीर प्रकृतीची माणसे विचारीत. पुल मराठी मध्यमवर्गीयांचे संवेदनाविश्व ओलांडू शकले नाहीत, अशी टाकी करणारेही होते. जणू काही इतर मराठी साहित्यिक अवघ्या विश्वाला गवसणी घालत होते. या टीकाकारांची फडी तरी मध्यमवर्गीय कुंपण कुठे ओलांडून जात होती? परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धिवादी चिमटीत पकडून तिच्या सूक्ष्मात शिरू पाङणारे हे समीक्षक, निखळ आनंद असा चिमटीत पकडताच येत नाही, हे समजू शकत नव्हते. सुदैवाने रसिक मराठी माणसाने पुलंच्या अशा टीकाकारांना संस्कृतीच्या कोप-यात केव्हाच झटकून टाकले होते. त्यामुळे पुलंचा आनंदरथ निर्वेधपणे मराठी संस्कृतीच्या महामार्गावरून चालत राहिला.

मराठी जीवनाचा मसावि

पुल या आनंदरथावर अगदी बालपणीच आरूढ झाले होते. गाण्याची, नाटकांची साहित्याची आवड असलेले आई-वडील आणि अगदी साध्यासुध्या वातावरणातील मध्यमवर्गीय कौटुंबिक परिसर. अगदी सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर विलेपार्ले. त्या वेळचे विलेपार्ले म्हणजे मुंबई शहरात वसलेले एक कोकणचे खेडे. त्यांच्यात शब्दात सांगायचे तर, 'पार्ले हे एकेकाळचे छोटे कुटुंब होते. जोश्यांच्या बब्याची मुंज झाली, तर नामा सुतारापासून खुशालशेटजींपर्यंत सगळ्यांना घरचे कार्य उभे राहिल्याचा आनंद होता. गावात खाणावळ चांगली चालू शकत नव्हती. कोणीही कोण्याच्या घरी जावे. ते घर त्याला परके नव्हते... त्या वेळी प्रत्येकाची कुठे तरी श्रद्धा होती. कशाला तरी आपल्या निष्टा जोडलेल्या होत्या. छोटेसे टिळक मंदिर. रात्री चर्चसारखी घंटा वाजली की, मंडळी व्याख्यान-पुराणाला घरात जगल्यासारखी अगत्याने जमत... दादासाहेर पारधी, चांदीवाले परांजपे, माझे आजोबा , असली त्या घरातली कर्ती माणसे. त्यांच्या शब्दावर पार्ल्याने चालावे... गावातल्या कुठल्याही चुकणा-या मुलाचा कान या वडीलधा-या मंडळींनी आजोबाच्या अधिकाराने उपटावा. कुठल्याची मुलाच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवायला या मंडळींनी पुढे यावे, आपल्या ब-यावाईट कृत्याने पार्ल्याला खाली पाहावे लागेल,ही भावना लहानपणापासून आमच्या मनात रुजलेली!' पुलंनी त्या पार्ल्याचे नाव नुसते उज्ज्वलच केले नाही, तर अवघ्या पार्लेकरांना अभिमानाचे एक बिरुद दिले. पुलंच्या साहित्यातील सर्व पात्रे हावदेवी, गिरगाव, जोगेश्वरी आणि विलेपार्ल्यातील आहेत. त्यांचे हावभाव, हेल, पेहराव, वागण्याच्या रितीभाती, आवडीनिवडी असे सर्वकाही त्या कौटुंबिक-सामूहिक जीवनातून टिपले आहे. तसे 'कम्युनिटी' जीवन आता मुंबईतून हद्दपार झाले आहे. त्याचबरोबर मराठी संस्कृती. त्यामुळे पुलंचा 'नॉस्टॅल्जिआ' हा समस्त मराठी मुंबईकरांचा आहे. म्हणूनच लंडन, लॉस एंजेलिस, न्यूजर्सी, न्यूयॉर्कमधल्या मराठी माणसांनाही पुल आणि त्यांचा 'नॉस्टॅल्जिआ' मुळापासून हलवून टाकतो. पुल हे अवघ्या मराठी जीवनाचे 'मसावि' होते. ज्या शास्त्रीय संगीताने व त्यावर आधारलेल्या नाट्यसंगीताने मराठी संस्कृतीवर एक शतकाहून अधिक काळ अधिराज्य केले, ते संगीत हा त्यांच्या जीवनाचा प्राण होता. शब्द आणि स्वर व त्याचबरोबर भावभावनाही लोकांपर्यंत कशा न्यायच्या, याचे उपजत ज्ञान त्यांना असावे. त्यांनी ज्या गीतांना स्वरबद्ध केले आहे, त्यातील शब्द आणि सूर कोणाच्याही जिभेवर आणि गळ्यात अगदी लीलया येतात. ते स्वत:च एक 'मल्टि-मीडिया' होते. सध्याच्या संगणकविश्वातील 'मल्टि-मीडिया' पुलंशी स्पर्धा करू शकला नसता. त्यांच्या 'गुळाचा गणपती'मध्ये सबकुछ पुलच होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत, दिग्दर्शन आणि नायकाची भूमिकाही. असा'मल्टि-मीडिया' प्रयोग आचार्य अत्र्यांनीही केला नव्हता. अत्रे गीते लिहीत, पण संगीत दिग्दर्शक आणि प्रत्यक्ष गाणी म्हणण्याच्या फंदात ते (सुदैवाने) पडले नाहीत. पुल राजकारणात पडले नाहीत आणि अत्रे संगीतसृष्टीत! नाही म्हणायला पुलंनी आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत प्रचाराचे फड गाजवले, पण जयप्रकाशप्रणीत जनता प्रयोग विस्कटून बंद पाडल्यानंतर १९८०च्या निवडणुकीत मात्र ते उतरले नाहीत. पुन्हा कशाला अपेक्षाभंगाने व प्रतारणेने मन पोळून घ्या, असेही त्यांना वाटले असेल!

लाडकेपणाचे रहस्य

पुलंचा जीव राजकारणात रमूच शकला नसता. त्यांच्या मनाचा ओढा त्यांच्याच 'तुझे आहे तुजपाशी' नाटकातील काकाजींच्या वृत्तीकडे होता. स्वानंद आणि आत्मक्लेश या दोन वृत्ती म्हणून त्या नाटकात साकारतात. पुलंनी हे नाटक लिहिले, तेव्हा त्या आत्मक्लेशामागचे तत्त्वज्ञान लोपलेले होते. उरला होता फक्त सांगाडा. चेतनाहिन पण करुणा निर्माण करणारा. आचार्यांची चेष्टा-टिंगल करून पुलंनी काकाजींच्या चंगळवादी जीवनशैलीचे कोडकौतुकच नव्हे, तर उदात्तीकरणही केले, अशी टीका तेव्हा झाली होती. वस्तुत: त्या दोन तत्त्वज्ञानांमधला संघर्ष त्यांना दाखवयाचाच नव्हता. त्यांना अभिप्रेत होता दोन वृत्तींमधला संघर्ष. म्हणूनच शेवटी काकाजी म्हणातात, 'अरे, काय सांगू यार, त्या सूतकताईतही बडा मझा असतो.' गंमत म्हणजे करुणेचा, प्रेमाचा संदेश देणारे आचार्य इतरांशी आणि स्वत:शी कठोर होत जातात आणि मजेचा, ऐहिकतेचा, आत्ममश्गुलतेचा विचार मांडणारे काकाजी आचार्यांकडे आस्थेने आणि करुणेने पाहू लागतात. निखळ आनंदाची सर्वत्र बरसात करू राहणा-या पुलंना राजकारण मानवले नसते ते त्यामुळेच.त्यांना कदाचित असेही वाटत असावे की, माणूस संगीतात रमला, मैफलीत धुंद झाला आणि आनंदात डुंबला की, त्याच्यातील अपप्रवृत्तींचा आपसूकच लोप होईल. मग राजकाणाची गरजच उरणार नाही; कारण हितसंबंधांनी उभे केलेल लोखंडी गज उन्मळून पडतील. राजकीय विचार म्हणून हा भाबडेपणाच म्हणावा लागेल; परंतु पुल भाबडेच होते आणि त्या भाबडेपणामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांना इतके प्रेम वाटत असे. जीवनाची ऐंशी वर्षे हा भाबडेपणा राहणे, हेच त्यांच्या 'लाडके'पणाचे रहस्य आहे. तो भाबडेपणा'टिकवण्याचा' प्रयत्न त्यांनी केला नव्हता. तसा केला असता, तर ते अगदीच ओंगळ दिसले असते. ते खरोखरच अंत:करणाने भाबडे होते. त्यांनी लहानपणची एक आठवण लिहिली आहे. “माझे पहिले जाहीर भाषण वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी आमच्या सोसायटीतील सद्‌भक्ती मंदिरात झाले. त्यातील एक आठवण मला पक्की आहे. माझ्या आजोबांनी लिहिलेले वीर अभिमन्यूवरचे भाषण मी चार-पाच मिनिटे धडाधड म्हणून दाखवले, पण शेवट विसरलो. मात्र लगेच प्रसंगावधान राखून 'असो, आता माझी दूध पिण्याची वेळ झाली आहे', असे म्हणून श्रोत्यांच्या चक्रव्यूहातून माझी सुटका करून घेतली. माझ्या या 'दूध पिण्याची वेळ झाली'ची त्यानंतर बराच काळ चेष्टा व कौतुकही होत असे.” हाच त्यांचा भाबडेपणा शेवटपर्यंत टिकला. भाबडा माणूस आग्रही असूच शकत नव्हती. त्यामुळे दुराग्रह, हट्टीपणा, एकारलेपणा, तणतण, चिडचिड असले दुर्गुण स्वभावात येऊच शकत नाहीत. स्वत:वरच खूश होताना, स्वत:च्याच विनोदाला डोळे विस्फारून दाद देताना, स्वत:चं गाणं म्हणताना, त्यावर फिदा होताना त्यांना कधीही संकोच वाटला नाही. आपले जीवनगाणे आपणच, आपल्याच मस्तीत गावे आणि ते म्हणत म्हणत इतरांवरही आनंदाचे गुलाबपाणी शिंपडत जावे, असे पुलंना कायम वाटत असे.ते तसेच जगले. त्यांच्या अशा गुलाबपाण्याच्या शिंपडण्याने मोहरून गेलेले असे हजारो लोक जगभर आहेत. त्या गुलाबपाण्याच्या आठवणी ते सर्वजण इतक्या काळजीपूर्वक जपतात की, त्यांच्याकडील दागदागिन्यांनाही त्या साठवणींचा हेवा वाटावा. पुल जितके स्वत:मध्ये रमत तितक्याच तन्मयतेने इतरांच्या मैफलीतही रमत. म्हणूनच भीमसेन,कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी यांच्या समेवत जर पुल असतील, तर त्या मैफलीत हजर असणा-यांना आपण गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केले असणार, असे वाटू लागे.नाही तर हे सुख आपल्या वाटेला आलेच कसे असते? पुलंच्या या स्वच्छंद, बहारदार शैलीला लौकिक जीवनाचे कुंपण मानवलेच नसते. म्हणूनच टेलिव्हिजनसाठी बीबीसीवर प्रशिक्षण घेतलेले असूनही ती प्रतिष्ठेची नोकरी त्यांनी सहज सोडली. नोकरीच्या चौकटीत पुलंना ठेवणे म्हणजे ती जन्मठेपेची शिक्षाच. त्या तुरुंगात ते गेले, पण तेथून जितक्या लवकर पळ काढता येईल तितक्या लवकर ते पळाले. एका शब्दानेही प्रौढी न मिरवता वा कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता, पुलंनी अनेक सांस्कृतिक-सामाजिक संस्थांना लक्षावधी रुपयांची मदत केली. असा महाराष्ट्रात काय, देशातही दुसरा साहित्यिक नसेल की, ज्याने इतक्या सहजतेने अशा संस्थांना आधार दिला. मनात आणले असते, तर ते केव्हाच मर्सिडिज-फार्महाऊस संस्कृतीत जाऊ शकले असते. पण पुलंनी त्यांच्या राहणीचा अस्सल मराठी मध्यमवर्गीय बाज कधीच सोडला नाही. म्हणूनच ते आनंदयात्रा काढू शकले. आता ती आनंदयात्रा संपली आहे. वुडहाऊसच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात पुलंनी म्हटले होते, 'त्या दिवशी मी वुडहाऊसचे पुस्तक उघडले.पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले, पण हसता हसता डोळ्यात पाणी आले, ते पाणी केवळ हसण्यामुळे आले असे मात्र नाही वाटले.' यापुढे तमाम मराठी माणसांच्या मनाची अवस्था अशीच होणार आहे. त्यांचे पुस्तक वाचताना, 'असा मी असामी' वा 'बटाट्याची चाळ'ची ध्वनिफीत ऐकताना, त्यांचा चेहरा टीव्हीवर पाहताना, त्यांची आठवण काढताना डोळ्यात पाणी येईल आणि ते हसण्यामुळेच असेल असे नाही!
-- कुमार केतकर

पु.ल. गेले तेव्हा.. - मुकेश माचकर

दोन हजारचा जून महिना.

पुलंच्या आजारपणाच्या बातम्या येत होत्या. हे शेवटचंच आजारपण ठरेल अशी शक्यता होती. ते पुण्यात डेक्कनवर प्रयाग हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूमध्ये होते. तेव्हा पुण्यात मटाचे प्रतिनिधी असलेल्या गोपाळराव साक्रीकरांनी, पुलं खरंतर गेलेच आहेत, तसं जाहीर करत नाहीयेत, अशा आशयाची बातमी लिहिली होती बहुतेक. त्यावरून बराच गोंधळ उडाला होता. पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं...

...महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांनी मला सांगितलं, पुण्याला जा. पुलं क्रिटिकल आहेत. साक्रीकर एकटेच आहेत. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून आता काय देता येतील त्या बातम्या दे. पुलं अचानक गेले, तर आपण बातमीदारीत कमी पडायला नको...

मी ११ जूनच्या सकाळी प्रयागला पोहोचलो. एका कोपऱ्यातल्या खोलीत पुलंना ठेवलं होतं. खिडकीतून त्यांचं दर्शन होत होतं. असंख्य नळ्या आणि यंत्रणा लावलेला अचेतन देह. पुलंचे स्नेही मधू गानू हे तिथे दिवसरात्र होते. सुनीताबाई जाऊन येऊन होत्या. जब्बार पटेलही अनेक दिवस तिथेच मुक्काम टाकून होते. अन्य स्नेहीमंडळी येऊन जाऊन होती. पुण्यातल्या आणि बाहेरच्या अनेक वर्तमानपत्रांचे वार्ताहर प्रयागच्या परिसरात येऊन-जाऊन होते. काही फोनवरून खबर घेत होते. टीव्ही पत्रकारिता फोफावलेली नसल्यामुळे ‘पुलंनी अचानक श्वास घेतला’, ‘एक नळी निसटली’, ‘पुलं मृत्युशय्येवर असताना सुनीताबाई कुठे आहेत’, ‘पुलं जिवंत आहेत का’, अशा थरारक आणि रोचक सवालांनी भरलेल्या ब्रेकिंग न्यूज आणि वार्तापत्रांना तेव्हाचा महाराष्ट्र मुकला होता.

साक्रीकरांनी आधी दिलेल्या अनुचित बातमीने मटाची बदनामी झाली, असं उघडपणे म्हणणारा प्रत्येकजण खासगीत मात्र ती बातमी खरीच होती, असं सांगत होता. पुण्यात सांस्कृतिक उठबस असलेल्या एका सत्ताधारी नेत्याच्या तोंडूनच साक्रीकरांनी प्रयागमध्येच हे ऐकलं होतं. त्यात तथ्यही असण्याची शक्यता होती. पुलंचा लाडका भाचा दिनेश परदेशात होता. त्याला यायला काही दिवस लागणार होते. त्याच्यासाठी अंतिम संस्कार थांबवायचे, तर पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवणं आवश्यक होतं. तोपर्यंत हॉस्पिटलने ‘आज प्रकृती सुधारली,’ ‘आज पुन्हा चिंताजनक झाली,’ अशा प्रकारची तांत्रिकदृष्ट्या बिनचूक हेल्थ बुलेटिन काढत राहणंही आवश्यक होतं... अर्थात, यातलं खरंखोटं अधिकृतपणे कोणीही कधीच सांगितलं नाही... त्यावरचं संशयाचं धुकं कधीच हटलं नाही...

...मी प्रयागसमोरच्या फुटपाथवर मुक्काम टाकला. श्रीपाद ब्रह्मेसह पुण्याच्या पत्रकारितेतले बरेच यारदोस्त तिथे भेटत होते. जवळ गुडलकला चहाची आचमनं होत होती. दिनेश रात्री उशिरा पोहोचणार, अशी खबर होती. त्यानंतर काहीही होऊ शकलं असतं.

तेव्हाचं राजकीय-सामाजिक वातावरण ढवळलेलं होतं. राज्यात युतीचं सरकार जाऊन नुकतंच आघाडीचं सरकार आलं होतं. पुलंनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना युती सरकारला चार खडे बोल सुनावले होते. त्यावर युतीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मोडका पूल’ ही त्यांना आणि त्यांच्या भक्तगणांना साजेशी कोटी केली होती. तेव्हा फेसबुकादि सोशल मीडिया नसल्याने, सरकारचा पुरस्कार स्वीकारताना सरकारवर टीका करण्याचा ‘देशद्रोह’ केलेल्या पुलंना पाकिस्तानात किंवा गेलाबाजार कर्नाटकात पाठवण्याच्या शिफारसींचा आगडोंब उसळण्याची सोय नव्हती. पण, पुलंनी सरकारची पंचाईत केल्यामुळे पुलंचं गारुड ओसरलेला किंवा त्याचा स्पर्श न झालेला आणि ठाकरेंच्या मोहिनीमध्ये गुरफटलेला हुच्च वर्ग ‘कोण पुलं? यांना विचारतो कोण, ते त्यांच्याजागी मोठे,’ मोडमध्ये गेला होता. जवळपास दशकभरात पुलंच्या अष्टपैलू प्रतिभेचं दर्शन घडवणारा एकही ठसठशीत ताजा आविष्कार समोर आला नव्हता, त्यामुळे पुलंमय झालेली पिढी जुनी झाली होती. अर्थात, पुलंची प्रकृती बिघडल्यानंतर आणि त्याच्या अटळ परिणतीची जाणीव झाल्यानंतर बाळासाहेबांनी प्रयागमध्ये जाऊन पुलंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ते आपले शिक्षक होते, अशी आठवण सांगितली. पुलंच्या थोरवीचे गोडवेही गायले. पुलंचे स्नेही राम कोल्हटकर यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार पुलंच्या अंतिम यात्रेत ‘माझिया माहेरा जा रे पाखरा’ हे पुलंच्या संगीतात ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं गीत वाजवावं, अशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सूचना होती. ती ऐकून पुलंचे स्नेही त्याही स्थितीत हतबुद्ध झाले आणि त्यांना हसू कोसळलं. मधू गानूंनी हे सुनीताबाईंच्या कानावर घातल्यावर त्यांनी कलेक्टरना फोन करून हे असलं काही करायचं नाही, अशी तंबी दिली. आघाडी सरकारने पुलंवर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं होतं... पण, सुनीताबाईंनी त्याला नकार दिला होता...

...त्यामुळेच काहीही घडण्याची शक्यता होती...

...सुनीताबाई निर्धारी वृत्तीच्या होत्या... उत्तररात्री दिनेश आल्यानंतर पुण्याला जाग येण्याच्या आत पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन जातील, अशी साधार भीती अनेकांना वाटत होती... प्रयागमध्ये नळ्या लावलेला देह हे आता पार्थिवच आहे, याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती...

...रात्र झाली, तशी गर्दी ओसरली... डेक्कन असल्याने बारापर्यंत जाग होती... नंतर रस्ताही सुनसान झाला... पुण्यातले नवेजुने आठनऊ रिपोर्टर, प्रतिनिधी आणि मी प्रयागसमोरच्या फुटपाथवर होतो... आम्ही सगळे दिनेशच्या येण्याकडे डोळे लावून होतो... त्याचं विमान मध्यरात्रीच्या आसपास लँड होणार होतं... त्याला पुण्याला आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल दिला गेला होता... म्हणजे मुख्यमंत्र्यांची गाडी ज्या प्राधान्याने प्रवास करते, ते प्राधान्य आणि पुढेमागे लाल दिव्याच्या गाड्या वगैरे... ही व्यवस्था ज्या क्षणी स्वीकारली गेली असेल, त्या क्षणीच सुनीताबाईंनी सरकारी इतमामही स्वीकारला असणार... त्यांच्या मनधरणीची जबाबदारी जब्बार पटेलांवर असावी... पुलंवर तुमच्याइतकाच महाराष्ट्राचाही प्रेमाचा अधिकार आहे, असं त्यांनी सुनीताबाईंना पटवून दिलं...

...मध्यरात्रीच्या आसपास सुनीताबाई तिथे आल्या... जब्बार होते... ते बाहेर येऊन गप्पा मारताना म्हणाले, सुनीताबाईंना भेटलास का? पुलंना पाहिलंस का?

मी म्हणालो, त्या खिडकीतून पाहिलं.

ते आत घेऊन गेले. निश्चेष्ट, चैतन्यहीन शरीराचं दर्शन घेतलं आणि मनातून पुसून टाकलं... पुलंचा सचेतन चेहरा, आवाज आणि ते मिष्कील, खोडकर हसूच आठवणीत ठेवायचं होतं... जब्बारांनी सुनीताबाईंना ओळख करून दिली... मी एक रूपाली या पुलंच्या घरी पुलंची भाषणं उतरवायला गेलो होतो, त्याची आठवण करून दिली... अगदी अलीकडच्या काळात आल्हाद गोडबोलेंबरोबर धावती भेटही झाली होती मालती-माधवमध्ये... त्याची आठवण करून दिली... सुनीताबाई बाहेरून नॉर्मल दिसत होत्या... आत मात्र सगळं काही ठीक नसावं... हेही समजत होतं...

...रात्री तीन-साडेतीनच्या सुमारास सायरनचा आवाज येऊ लागला, दूर लाल दिवा दिसू लागला...

दिनेश आला होता... तो येतोय हे कळल्यामुळे दोनपाच मिनिटं आधी मधू गानू, सुनीताबाईही आल्या होत्या... दुधाला निघालेले काही पुणेकर आणि पेपरवाले यांचं कुतूहल जागवत दिनेश मोटारीतून उतरला आणि तडक पुलंच्या खोलीकडे गेला... आम्हीही मागोमाग धावलो... पण, हा अत्यंत खासगी असा क्षण असल्यामुळे वार्ताहर आत घुसले नाहीत, आम्ही सगळे खिडकीपाशीच थांबलो... पुलंच्या देहासमोर उभं राहून दिनेश बराच काळ त्यांच्याकडे पाहात होता... मग तो काहीतरी बोलू लागला... ती रवींद्रनाथांची एक कविता होती, अशी माहिती नंतर मिळाली...

...दिनेश आला तसाच गेला, त्याच्याबरोबर सुनीताबाई आणि मधुभाईही गेले... सगळेच गेले... पुलंपाशी आता आमच्याशिवाय कोणीच नव्हतं... पुढे काय होणार, हे स्पष्ट होतं...

...आता ते कधी परतणार आणि काय निर्णय करणार, एवढाच प्रश्न होता...

... आम्हीही चहानाश्त्यासाठी गुडलककडे वळलो... नंतर काही काळ परिस्थिती तशीच राहिली... पुलं अजूनही ‘जिवंत’च होते, त्यामुळे फ्रेश होण्यासाठी घरी गेलो... अंघोळ-नाश्ता करून थोडी झोप काढण्यासाठी आडवा झालो, तोच फोन घणघणला... पलीकडे केतकर होते... म्हणाले, तू घरी कसा? म्हटलं आताच आलोय... रात्रभर तिथेच होतो... ते म्हणाले, निधन घोषित झालंय... गो बॅक. दिनेश येऊन गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लाइफ सपोर्ट सिस्टम काढण्याचा निर्णय झाला होता... ती काढल्यानंतर अटळ ते घडलं होतं...

नऊला पुन्हा प्रयागला गेलो, तोवर तिथला सगळा माहौल बदलला होता... पार्थिव साडेसहालाच मालतीमाधवला नेण्यात आलं होतं... सरकारी इतमाम स्वीकारण्यात आल्यामुळे मालतीमाधवच्या प्रांगणात अंत्यदर्शनाची व्यवस्था झाली होती... लोकांच्या रांगा लागल्या होत्या... मुंबई दूरदर्शनचे मुकेश शर्मा हे केंद्र संचालक स्वत: तिथे हजर झाले होते... पुलंच्या अंत्ययात्रेचं थेट प्रक्षेपण होणार होतं... सुधीर गाडगीळ लाइव्ह निवेदन करणार होते... पांढरं शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, अशी जितेंद्रछाप वेशभूषा केलेल्या, फिल्मी नटासारख्या दिसणाऱ्या आणि तसेच वागत असलेल्या शर्मांना औचित्य नाही का, असा प्रश्न पडत होता... पण, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या अंतिम यात्रेसाठी त्यांनी केलेली अद्वितीय तयारी पाहता तसं म्हणणंही धाडसाचं ठरलं असतं...

...दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्ययात्रा निघाली, ती शववाहिनीतून. रस्त्याकडेला तुरळक गर्दी होती. वैकुंठ स्मशानभूमीत पुलंच्या पार्थिवासमोर पोलिसांनी फैरी झाडलेल्या पाहून पुलं उठून काहीतरी समर्पक कोटी करतील, असं वाटत होतं... गर्दी नियंत्रित करण्यासाठी माइकवरून बोलणाऱ्या जब्बार पटेलांनी ‘भाईंच्या मागे कोणीही जायचं नाहीये’ असं अनाहूतपणे म्हणून अनपेक्षित हशा पिकवला, तेव्हा परीटघडीचं अवघडलेपण वितळलं... मृत्युचं सावट हललं आणि पुलंची अंतिम यात्रा पुलंच्या अंतिम यात्रेला साजेशी होऊन गेली...

...मटाने पुलंच्या निधनाच्या बातमीला गोपाळ साक्रीकर/मुकेश माचकर अशी बायलाइन दिली होती. हा केतकरांचा निर्णय होता. मराठीत ही अभूतपूर्व घटना होती. अनेकांनी त्यावर टीकाही केली. बायलाइनचा आग्रह जणू आम्ही धरला असावा, अशी आमच्याबरोबर वार्तांकन करणाऱ्या आणि त्यांच्या वर्तमानपत्रांत बायलाइन न मिळालेल्या वार्ताहरांची साहजिकच समजूत झाली होती... मुंबईला परतल्यानंतर केतकरांना विचारलं, तुम्ही ही अशी पंचाईत का केलीत? फार कानकोंडे झालो आम्ही.

केतकर म्हणाले, पुलंचं निधन ही महाराष्ट्रासाठी केवढी मोठी घटना होती, हे समजावं, यासाठी बायलाइन दिली. ते आकस्मिक नव्हतं. वर्तमानपत्रं युद्ध कव्हर करायला बातमीदार पाठवतात. त्यांच्या बायलाइन छापतात. आपण या घटनेला स्वतंत्र माणूस पाठवून कव्हर करण्याइतकं महत्त्व देतो, हे त्यातून सांगायचं असतं. पुलंचं निधन ही सांस्कृतिक क्षेत्रातली त्याच तोलामोलाची घटना आहे. म्हणून ही बायलाइन.

या लेखाच्या निमित्ताने केतकरांशी बोलणं झालं, तेव्हा आणखी एक गोष्ट प्रकाशात आली. पुलंच्या निधनाच्या अंकाची आखणी सुरू असताना दुपारी केतकरांच्या हातात अंकाची अॅड डमी आली... म्हणजे जाहिराती कोणत्या पानावर कशा आहेत, याची रचना केलेली डमी. त्यात शेवटच्या पानावर ‘आनंदोत्सवात सामील व्हा’ अशी हेडलाइन असलेली फुल पेज

अॅड होती. पुलंच्या निधनाचा अंक आणि मागच्या पानावर ‘आनंदोत्सवात सामील व्हा...’??

केतकर उठून प्रदीप गुहांकडे गेले... त्यांना अडचण सांगितली... गुहा म्हणाले, मी परदेशात जायला निघालोय. दिल्लीशी बोलून घ्या.

केतकरांनी दिल्लीला फोन लावला... तिथे जाहिरात विभागप्रमुख बंगाली होता. त्याला सांगितलं. तो म्हणाला, कोलकात्याशी बोलावं लागेल. क्लायंट तिथला आहे. पण, अडचण काय आहे?

केतकरांनी पुलंच्या निधनाबद्दल सांगितलं तर त्याने विचारलं, हे इतके मोठे गृहस्थ होते का? अगदी अशी एक जाहिरातही जाऊ नये इतके मोठे होते?

केतकर म्हणाले, सुदैवाने तुम्ही बंगाली आहात, तर समजू शकाल. आज टागोरांचं निधन झालं असतं, तर आनंदबझार पत्रिकेत अशी जाहिरात छापून आली असती का?

त्या अधिकाऱ्याने केतकरांना सांगितलं, कोलकात्याच्या अधिकाऱ्याला बोलायला सांगतो.

त्या अधिकाऱ्याने फोन केल्यावर केतकरांनी त्यालाही तेच सांगितलं... तो म्हणाला, पण, पुलं आम्हाला माहिती नाहीत.

केतकर म्हणाले, पुलं हे तेंडुलकरांप्रमाणे भारतभरात माहिती झाले नाहीत. ते कायम महाराष्ट्रीयच राहिले. सत्यजित राय यांच्या निधनाच्या दिवशी अशी जाहिरात औचित्यपूर्ण ठरेल का?

...ती जाहिरात रद्द झाली आणि पुलंच्या निधनाच्या आधीपासूनच लिहून तयार असलेले लेख आणि फोटो त्या पानावर गेले.

केतकरांच्या नेतृत्वाखालच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पुलं गेल्याची बातमी कशी येते, याचं अनेकांना कुतूहल होतं... हा पुलंचे स्नेही असलेल्या गोविंद तळवलकरांचा मटा नव्हता, हे त्याचं कारण होतं...

...कुमार केतकर मटाचे संपादक झाल्यानंतरच्या काळात, पुलंच्या पुस्तकांसाठी त्यांची भाषणं कॅसेटवरून उतरवून घेण्याच्या कामासाठी एकदा भल्या सकाळी पुलंच्या घरी, त्यांच्या त्या सुप्रसिद्ध काळ्या कोचावर बसण्याचं भाग्य लाभलं होतं. पुलं आणि सुनीताबाईंबरोबर एकदा नाश्ताही केला. तेव्हा पोहे छान झालेत, असं सांगितल्यानंतर सुनीताबाईंनी ‘शेजारच्या एसेम जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून येतात,’ असं सांगितलं होतं. त्यांच्या आजारामुळे हात थरथरायचे. भांडंही हातात धरता येत नसे. त्यामुळे स्वयंपाक बंद होता. नातेवाईकांकडून जेवणाचा डबा येत होता. आता पुढे त्यांच्याशी काय बोलायचं याचा विचार करत असताना मटाचा विषय निघाला आणि गोविंद तळवलकरांनी संपादकपद सोडल्यानंतर पुलं आणि सुनीताबाईंचं मटाबरोबरचं मैत्र संपुष्टात आलं होतं, हे लक्षात आलं. त्या म्हणाल्या, तळवलकरांशी आमचा स्नेह होता. केतकरांशी तसा संपर्क नाही. आता वयोमानाप्रमाणे पेपर पाहिलाही जात नाही. केतकरांनी पुलंवर कधीतरी खरपूस टीका केली होती. तिचा संदर्भ त्या दुराव्याला असावा.

...त्याच केतकरांनी पुलंचं निधन कव्हर करण्यासाठी खास वार्ताहर पाठवला... पुलंवरचा त्या दिवशीचा सर्वोत्तम अग्रलेख त्यांनी लिहिला... त्यात आपण पुलंचं मोठेपण समजण्यात चूक केली, अशी खुली कबुली दिली... दुसऱ्या दिवशी ‘प्रिय सुनीताबाई’ असा आणखी एक अत्यंत हृदयस्पर्शी अग्रलेख लिहून त्यांनी जबरदस्त षटकार मारला, सगळे दुरावे एका फटक्यात वितळवून टाकले... सुनीताबाई आणि मटा यांच्यातला स्नेह पुन्हा दृढमूल झाला...

पुलंच्या निधनाचा मटाचा अंक कलेक्टर्स इश्यू ठरला... तो त्या दिवशी ब्लॅकने विकला गेल्याची चर्चा होती... दुसऱ्या दिवशी तर तो पंधरा-वीस रुपयांना मिळत होता म्हणे तो...

पुलंच्या प्रत्येक स्मृतीदिनाला ती रात्र आठवत राहते... पुलंचा अचेतन देह पाहिला तेव्हाच विसरलो होतो... ते पुलं नव्हतेच... लक्षात राहिली ती पुलंना रवींद्रनाथांची कविता ऐकवणाऱ्या दिनेशची धीरगंभीर मूर्ती...

-- मुकेश माचकर

मुळ स्रोत -- http://www.bigul.co.in/bigul/1082/sec/8

’पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी लेख उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकेश माचकरांचे अनेक धन्यवाद !!  

Tuesday, June 13, 2017

परीस ....

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली - इयत्ता चौथी, पाचवीत @विकु).

पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखावायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.

तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते.

"...... अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.

परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला," अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!" माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय.

त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत.

पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली.

आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन...

थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो.

सुरूवातीला उगीचच वाटायचं ...
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/\_

सादर अभिवादन ! 💐

© विशाल विजय कुलकर्णी

Monday, June 12, 2017

स्मरण - आरती नाफडे

१२ जून २०००. आपल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. समाजाचा विवेक जागृत ठेवणारा आपला सांस्कृतिक नेता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तुमचे आमचे पुलं आपल्याला सोडून गेले. काळ फार बलवान असतो असे म्हणतात. पण, पुलंच्या बाबतीत त्याचे गणित नक्कीच चुकले. कारण पुलं काळाच्या पडद्याआड वगैरे असं काहीच होणार नाही. दरवर्षी १२ जून आली की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एखादा तरी पैलू मनाला भावलेला सूर मारून वरती येतो व मनाला घेरून टाकतो.

पुलंनी माणसावर, समाजावर अतोनात प्रेम केले. ते जसे आपल्या लिखाणाशी समरस होत असत तसेच ते माणसांशी व समाजाशी समरसत होत. समरस होणे याचा अर्थच एकरूप होणे असा आहे आणि म्हणूनच महत्त्वाच्या सामाजिक घटनांशी पुलंचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आलेला आहेच व तो कायम जडला व घडला आहे.

विलेपार्ले म्युझिक सर्कलची घडण, बालगंधर्व रंगमंदिर बांधण्याची प्रेरणा, त्याचा आठवडाभर चाललेला उद्घाटन सोहळा, आकाशवाणीवर बालगंधर्वाची पहिली पुण्यतिथी सादर करणं, १९५३ मध्ये संगीत नाटक अकादमीची स्थापना व विकास, १९६६ पासून मुंबईमध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌सची उभारणी अशा अनेक पातळ्यांवर पुलंनी समाजाच्या उत्कर्षात स्वत:ला झोकून दिलं.

आपले विस्तारित मोठे कुटुंब म्हणजे समाज. त्या समाजाशी समरसता साधताना कर्ता व कर्म भिन्न नसतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू. आंतरिक कळकळ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पुलंचे समाजाशी असे आगळेवेगळे नाते होते. समाजात कुठे आवश्यकता आहे हे हेरून आपला मदतीचा हात तत्परतेने समोर करणारे, तन, मन व धनाने समर्पित होणारे पुलं बघताना, समाजाला त्यांच्या कार्यातून मिळणारा आनंद, दिलासा, विसावा व समाधान बघितले की, एका समाजाशी नैसर्गिकपणे समरस होणार्‍या योग्याची गोष्ट आठवते. आपल्या कर्मात अगदी चोख, प्रामाणिक व सदाचारी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा एक योगी असतो. आपल्या आदर्श आचरणाने तो समाजप्रिय असतो. त्याचा सहवास सर्वांना सुखावह वाटत असे. त्यांच्या सद्वर्तनाने भगवंत खुश होऊन आपल्या देवदूताला पाठवतात. देवदूत त्यांना वर मागण्याची विनंती करतात. पण, आपल्या कर्मावर श्रद्धा असणारे योगी वर मागण्यास तयार नसतात. देवदूताचा फारच आग्रह असतो. तेव्हा योगी म्हणतात, ‘भगवंताची सतत कृपा असावी.’ देवदूत म्हणतो, ‘ती तर आहेच. विशेष मागा.’ योगी म्हणतात, ‘ठीक आहे माझ्याकडून माझ्या न कळत सर्वांचे भले होऊ दे.’ भगवंत योग्याच्या सावलीत एक अद्भुत सामर्थ्य भरतात. योगी चालताना सावली पडली की, तेथील दु:खी चेहरे आनंदित होत, वातावरण व निसर्ग प्रसन्न होई. योगी पुढे चालत राही सावली समाजाला सुखावत राही.

तेच सामर्थ्य भगवंताने पुलंच्या साहित्यात व कर्मात भरले आहे. पुलं जेथे जातील तेथे आनंद निर्माण करीत. कुठल्याही मोठ्या पदाचा विचारही मनात न आणता समाजातील गुणी व्यक्तींना त्यांनी लाभ मिळवून दिला. इंदुबाला एक बंगाली संगीत अभिनेत्री अत्यंत हलाखीत उत्तरायुष्य कंठत होती. पुलंनी आपलं स्थान वापरून तिला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळवून दिला. तर १९६१ सालापासून बालगंधर्वांना मासिक मानधन महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा करून मिळवून दिलं. उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिलं. बाबा आमट्यांच्या आनंदवनाचं कार्य त्यांच्या ध्यासाचा विषय होता. कार्यकर्त्यांची फळी उभारून त्यांचे वार्षिक मेळावे आयोजित करणे, देशपरदेशातल्या नामवंतांच लक्ष आनंदवन कार्याकडे वेधणे असे भरीव सामाजिक कार्य पुलंनी आपला वेळ, प्रतिभा, संकल्पना राबवून समाजासाठी केले.

एवढे करून ते थांबले नाहीत, तर अशा अनेक कार्यांच्या उभारणीसाठी लागणारा भांडवली पैसा पु.लं. देशपांडे प्रतिष्ठानने पुरवलेला आहे. १९६५ साली स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानला स्वत:चं स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, शिपाई असा कोणताही फाफट पसारा नव्हता. योग्य त्या दानेच्छु संस्था शोधणं, त्यांच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून पत्रव्यवहार करणं व संस्थेची नेमकी गरज ओळखून ती पूर्ण करणं हे काम पुलं व सुनीताबाई आपल्या विश्‍वस्त मंडळींना बरोबर घेऊन पूर्ण करत.

पुलंचे अचाट कर्तृत्व व अफाट दातृत्व संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे व त्यांच्याकडून कधी गाजावाजा नाही. गुप्तदान मोलाचं काम करणार्‍या संस्थांना दिलं. संस्थांचा उत्कर्ष केला. एकदा देणगी दिल्यावर संस्थेशी फारसा संपर्कही ठेवला जात नसे. हेतू हा की देणगीचे दडपण संस्थाचालकांना जाणवू नये. सांस्कृतिक विचारधारेचा विकास व्हायला मुक्त वातावरण हवं यावर पुलंचा विश्‍वास होता. पैशासाठी काम खोळंबू नये हा कटाक्ष होता. तळकोकणात काही शाळांमध्ये पेज योजना राबवली. दारिद्र्य व उपासमार असणार्‍या भागात मुलांची शाळेतील हजेरी कमी होते. अशा ठिकाणी वर्षभर शाळा भरताच तांदळाची पेज पोटभर द्यायची अशी योजना होती. ३० टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर पटावरची संख्या वाढली. मुलांची बौद्धिक पातळी पण वाढते असा निष्कर्ष निघाला.
‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. त्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुलं म्हणाले, ‘‘ज्या दिवशी देशात एकही गर्दचा व्यसनी राहणार नाही, त्या दिवसापर्यंत मुक्तांगण चालूच राहील आणि या केंद्राला पैसा कधीही कमी पडू दिला जाणार नाही. असा भक्कम आधार दानत, अशी निरपेक्षता आणि देताना बडेजाव नाही, कोणालाही ओशाळवाणं न करण्याचा मनाचा मोठेपणा खरोखरच दुर्मिळ आहे.

‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी’
हे तुकोबाचे वचन पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानचे बोधवाक्य आहे. सामाजिक बांधिलकीचे ब्रीद म्हणून बोधवाक्य वापरणार्‍या पुलंचे वर्णन रामदासस्वामींच्या दासबोधातील विरक्त लक्षणात ‘उदास असलेला जगमित्र’शी मिळतेजुळते आहे.

लोकप्रिय माणूस हा सर्वांचा म्हणजे सार्वजनिक असतो. त्याचं दु:ख व आनंद हा पण सार्वजनिक होतो. पुलंनी माणसाला फक्त हसायलाच नाही शिकवलं तर दु:खितांकडे बघून डोळे पुसायलाही शिकवलं व तेही आपल्या कार्यातून. नुसतं अर्थसाहाय्य करून भागत नाही तर, जगण्याला अर्थ द्यायला शिकवलं. माणुसकीचा वस्तुपाठ स्वत:च्या जगण्याने घालून दिला.

पुलंच्या सामाजिक समरसतेची मुळं खूप मागे जातात. सर्वसाधारण परिस्थितीतल्या पण कलासक्त, अगत्यशील घरामध्ये पुलं वाढले, जोपासले, पार्ल्यात बालपण गेलं ते ज्येष्ठांची भाषणं ऐकत, ध्येयवादाचे संस्कार घेत. शाळेतील शिक्षक, सेवादलाचा संपर्क, फर्ग्युसनमध्ये प्राध्यापकांचा ठसा, महायुद्धपूर्व जीवनाचा अनुभव, गांधीवादी विचारांचा मागोवा अशा अनेक परिणामांमुळे पुलं तरुण वयातच समाजोन्मुख झाले. व्यक्तिगत प्रगती साधताना माणसानं समाजहित जोपासलं पाहिजे हा फार मोलाचा विचार पुलंच्या जीवनातून प्रकर्षाने पुढे येतो.
स्वकर्तृत्वाने व उत्तम कलाव्यवहाराने जोडलेलं धन पुलंनी उदास विचाराने व्यतीत केले. ‘मला या जीवन वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते’ असं म्हणणार्‍या पुलंनी जीवनाचा खरा अर्थ पुढच्या कित्येक पिढ्यांना उकलून दाखवला. आपल्याला मिळणार्‍या धनाचा काही भाग तरी सामाजिक संस्थांना देणगी रूपात द्यावा व सामाजिक बांधिलकीची जाणीव, विवेक मनात जागृत ठेवावा हा मोलाचा अनमोल विचार आपण त्यांच्या सामाजिक समरसतेतून घ्यायला हवा.
– आरती नाफडे
तरूण भारत (नागपुर)
११ जून २०१७