Saturday, February 20, 2010

चार शब्दांचा आहेर

प्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांच्या ‘सांगे वडिलांची कीर्ती’ ह्या पुस्तकासाठी पु.लंनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग..

‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख’ असे समर्थांनी म्हटले आहे. आपल्या वडिलांविषयी बोलणार्‍यांवर समर्थांचा एवढा का राग असावा हे मला कळत नव्हते. पण हळूहळू लक्षात यायला लागले की, कीर्ती सांगण्याजोगे वडिल एक तर क्वचित आढळतात आणि असलेच तर त्या वडिलांची कीर्ती सांगण्याची योग्यता प्राप्त करून घेणारा मुलगा, त्याहूनही क्वचित आढळतो.

त्यामुळे स्वत: काहीही न करता केवळ बापाची बढाई मारणारा किंवा बापाविषयी चार शब्द बरे बोलावेत अशा लायकिचा बाप नसूनही, केवळ आपल्या कथांतून आपल्या कल्पनेतल्या बापाला जन्म देणारा मुलगा हा समर्थांना मूर्ख वाटत होता. अण्णा काळ्यांचा वसंता भाग्यवान आहे आणि वसंताचे अण्णादेखील भाग्यवान आहेत. अण्णांनी ब्रश आणि लेखणी दोन्हीही उत्तम चालवली.

वसंताची जवळिक लेखणीशी अधिक. नाटक आणि नाटकी लोक हे बापलेकांचे समान व्यसन. आता तर तिसर्‍या पिढिनेही ‘वडिले आचरिला धर्म’ पाळायला सुरुवात केली आहे. अण्णांचा नातू बालवयात उत्तम नट म्हणून नाव कमावून राहिला आहे. शिवाय त्याला चित्रकलेचाही हात आहे, आणि तिसर्‍या पिढीतल्या या सुहासने एक पाऊल पुढे टाकुन, एखादेवेळी आपण उत्तम गायकही होऊ. अशी भीती काळे घराण्यात निर्माण केल्याचे ऎकतो.

अण्णा १ नोव्हेबंरपासून आठावर सहा शहाऎंशी वर्षाचे होताहेत. आम्हाला त्यांच्या वयाचे धाडे आठावर सात सत्याऎंशी करीत धाव्वर पुज्य शंभराच्या पुढेही म्हणत रहायला हवे आहेत. ते वसंताचे वडिल आहेत. पण आम्हा सर्व नाटकवाल्यांना पितृतुल्य वाटणारे आमचे आप्त आहेत.

अण्णांनी रंगविलेले पडदे नाटकात प्रसन्नपणे आमच्यामागे उभे असतात, तसेच आम्हा अनेकांच्या मागे अण्णाही प्रसन्नपणे ‘शाब्बास’ म्हणायला उभे असतात. तशाच प्रसन्नपणाने. ही प्रसन्नता त्यांच्या कलाकृतीत दिसते, त्यांच्या विनोदात दिसते, बोलण्या-वागण्यात दिसते. आपल्या समाजात वडिलांकडून आधार मिळतो. धाक असतोच मार्गदर्शन वगैरे मिळते. परंतु स्नेह क्वचीत मिळतो. सोळा वर्षाचा मुलाशी मित्रत्वाच्या नात्याने वागावे हे सुभाषितापुरतेच राहते. वसंताला त्याच्या अण्णांचा स्नेहही लाभला. ते त्याचे रुमपार्टनर होऊ शकले.आपळ्या चिमुकल्या कुटुंबाला चारापाणी आणण्यासाठी, पुण्यातल्या टुमदार बंगल्यातून सतत मुंबईच्या फेर्‍या करणारा हा कुटुंबप्रमुख, घरातल्या सानथोरांचा मित्र आहे. मर्यादा सांभाळून त्यांची लेक आणि सून, त्यांची थट्टा करू शकते. आपले वडिल रागावूदेखील शकतात याचे मुलांना आश्चर्य वाटावे, असे हे दुर्मिळ वडिल. बहुतेक कुटुंबातुन बाप मोकळेपणाने बोलला, हसला तर मुलाबाळांना ‘बाबा आज असं काय करताहेत’ म्हणून धास्ती वाटायला लागते.

अण्णा काळे कलावंत आहेत, हे फक्त त्यांच्या कलाकृतींकडे पाहून कळते. इतर वेळी कुठल्याही चार सभ्य मराठी माणसांसारखे ते दिसतात. हल्ली चित्रकलेचे शिक्षण घेणारी मुले आणि मुली त्यांच्या चित्रांपेक्षा रंगीबेरंगी पोशाखांमुळेच अधिक डोळ्यात भरतात. लेखनातली कलंदरी लेखकाच्या दाढीच्या लांबीरुंदीवरुन किंवा वेषभूषेतील बेफिकिरीवरून ठरण्याच्या या काळात, अण्णा पोशाखावरून भलतेच जुनाट ठरावेत.

पण अण्णा ८६ व्या वर्षी ज्या उत्साहाने रंगवतात ते पाहिले, तर विशीतल्या वृद्धांनाही आश्चर्य वाटेल. नाटकाचे पडदे रंगवणे हे मानसिक परिश्रमापेक्षाही कितीतरी पट शारीरिक परिश्रमाचे काम आहे. ऎंशीच्या घरात असताना अण्णांनी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरासाठी ‘महाल’. ‘जंगल’ वगैरे पडदे रंगवले आहेत. पडदे रंगवण्याची त्यांची स्वत:ची शैली आहे. कलेमध्ये सतत नवे नवे विचार येत असतात. चित्रकलमध्ये तर कितीतरी तर्‍हा आढळतात. प्रत्येक तर्‍हेला त्या त्या संदर्भातच महत्व आहे. अण्णांची शैली ही आनंदरावजी पेंटरांच्या परंपरेतील आहे.

रंगभूमीवर ज्याप्रमाणे नाटकाच्या विवीध परंपरांना स्थान आहे, त्याचप्रमाणे नेपथ्याचाही प्रकारांना आहे. काळ्यांनी पडद्याला टाळी घेतली आहे. त्यांच्या रेखनाइतकाच त्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे. त्यांनी लिहिलेले ‘ललितकलादर्श नाटक मंडळीचा इतीहास’ हे मराठी नाट्य-वाड्‍मयातले महत्वाचे पुस्तक आहे. नेपथ्यावरील त्यांचा ग्रंथ मोलाचा आहे. काळ्यांचा हात हळुवारपणे कॅनव्हासवर फिरतो, लेखणी घेऊन कागदावर फिरतो आणि तितक्याच हळुवारपणे स्नेह्यांच्या पाठीवरुनही फिरतो.

वसंताने ज्या भावनेने आजच्या या वाढदिवसानिमित्त हे चिमुकले पुस्तक प्रसिद्ध केले, त्याच भावनेने या शुभदिनी मी हा माझा चार शब्दांचा आहेर या ज्येष्ठ कलांवत स्नेह्याच्या चरणी अर्पण करतो.

- पु.ल. देशपांडे
पुस्तक: `सांगे वडिलांची कीर्ती'
लेखक- व.पु. काळे