Monday, August 22, 2022

पार्ले टिळक विद्यालयाच्या अमृत महोत्सव प्रसंगी पुलंनी पाठविलेले पत्र

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे पार्ले टिळक विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. शाळेच्या अमृत महोत्सव प्रसंगी त्यांनी पाठविलेले पत्र.

दिनांक: २१ डिसेंबर १९९५
श्रीमती मालविका वाटवे
मुख्याध्यापिका
पार्ले टिळक विद्यालय
विलेपार्ले

स.न.

यंदा साजर्‍या होणाऱ्या आपल्या शाळेच्या अमृतमहोत्सवाचे प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. गेल्या पंचाहत्तर वर्षात शिक्षण क्षेत्रात अभिमान वाटावा, असे आपल्या शाळेचे स्थान आहे. या काळात पार्ले टिळक विद्यालय सर्वांगिण विकास व्हावा, या ध्येयाने प्रेरित झालेले पार्ल्यातले एक सांस्कृतिक केंद्र ठरले आहे. पारतंत्र्याच्या काळात विद्यार्थ्यांना बंदिस्त करून केवळ परीक्षार्थी न बनवता जीवनात चांगल्या मूल्यांचे जतन करणारे नागरिक बनवण्यासाठी सतत विकासाचे निरनिराळे कार्यक्रम हाती घेतले. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणाऱ्या निरनिराळ्या गुणांची वाढ करण्याला सतत प्रोत्साहन दिले. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुदैवाने सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेणारे शिक्षक शाळेला लाभले. कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांत प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी तयार झाले. अध्यापन हा केवळ उपजीविकेचा व्यवसाय न मानता शिक्षकांनी आपले व्रत मानले. बदलत्या समाज परिस्थितीत शिक्षणाच्या कार्याला बाजारी स्वरुप येणार नाही, याची दक्षता घेतली.

माजी विद्यार्थांच्या मेळाव्यात शाळेकडून आपल्याला आयुष्यात मोलाचे वाटावे, असे 'काय लाभले, याची चर्चा माजी विद्यार्थी करतीलच.


माझ्या सुदैवाने माझ्या वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून माझ्यातल्या साहित्य - संगीत - नाट्य इत्यादी क्षेत्रातल्या लहानशा गुणांचे माझ्या शालेय जीवनात कौतुक करून या शाळेने मला सतत प्रोत्साहन दिले. या कलांच्या क्षेत्रात आपण काहीतरी चांगलं करून दाखवू शकू, हा विश्वास माझ्या मनात निर्माण केला. आजचा माजी-बविद्यार्थी मेळाव्याचा प्रसंग त्या उपकारकर्त्या गुरूजनांचे कृतज्ञ भावनेने स्मरण करणे हा आहे. या प्रसंगी माझ्या गुरूजनांना स्मरणपूर्वक वंदन करतो आणि माझ्याहून वयाने लहान असलेल्या माजी विद्यार्थ्यांना वयाच्या वडीलकीचा आधार घेऊन यशस्वी व्हा, असा आशीर्वाद देतो.

(पु. ल. देशपांडे)
(संदर्भ: पार्ले टिळक विद्यालयाची अमृतमहोत्सवी स्मरणिका, इ.स. १९९६)


0 प्रतिक्रिया: